Friday, May 28, 2010

संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज... - I

Iसध्या शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिलेला इतिहास समाजातील काही गटांना अप्रिय आहे.

त्यातूनच मग

समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना काही उपदेश केलाच नव्हता, त्यांची कधीही भेट झाली नव्हती, दादोजी कोंडदेव हे महाराजांचे गुरु नव्हतेच, यांसारख्या कल्पना त्यांच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडू लागल्या...


आपण संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबधी काही लिखाण पाहू...

रामदास स्वामी यांनी वेळोवेळी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली आहे...

१६४९ साली छत्रपती आणि समर्थांची भेट झाली, त्यावेळी महाराजांनी समर्थांना, काही उपदेश करावा अशी विनंती केली.
शिवछत्रपतींनी पहिल्या भेटीतच समर्थांकडून अनुग्रह घेतला.
ह्यावेळी समर्थांनी शिवाजी महाराजांना राजधर्म नावाचे मौलिक प्रकरण सांगितले...

आधी मनुष्य ओळखावे । योग्य पाहुनी काम सांगावे ।
निकामी तरी ठेवावे । येकीकडे ।।१।।
पाहोनी समजोनी कार्य करणे । तेणे कदापी न येणे उणे ।
कार्यकर्त्यांच्या गुणे । कार्यभाग होतो ।।२।।
कार्यकर्ता प्रयात्नी जाड । काहीएक असला हेकांड ।
तरी समर्थपणे पोट वाड । केले पाहिजे ।।३।।
अमर्याद फितवेखोर । यांचा करावा संहार ।
शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।४।।
मनुष्ये राजी राखणे । हीच भाग्याची लक्षणे ।
कठिणपणे दूरी धरणे । काही येक ।।५।।
समयी मनुष्य कामा येते । याकारणे सोशिजेते ।
न्यायची नसता मग ते । सहजची खोटे ।।६।।
न्यायासिमा उल्लंघू नये । उल्लंघिता होतो अपाय ।
न्याय नसता उपाय । होईल कैचा ।।७।।
उपाधीस कंटाळला । तो भाग्यावाचून चेवला ।
समयी धीर सांडिला । तोही खोटा ।।८।।
संकटी कंटाळो नये । करावे अत्यंत उपाये ।
तरी मग पाहता काय । उणे आहे ।।९।।
बंद बांधावे नेटके । जेणेकरिता चतुर तुके ।
ताबे न होता फिके । समुदाय होती ।।१०।।
धुरेने युद्धासी जाणे । ऐसी नव्हे ती राजकारणे ।
धुराच करून सोडणे । कितेक लोक ।।११।।
उदंड मुंडे असावी । सर्वही एक न करावी ।
वेगळाली कामे घ्यावी । सावधपणे ।।१२।।
मोहरा पेटला अभिमाना । मग तो जीवाचे पाहेना ।
मोहरे मेळवून नाना । वरी चेपटे करी ।।१३।।
देखोन व्याघ्राचा चपेटा । मेंढरे पळती बारा वाटा ।
मस्त जाला रेडा मोठा । तो काय करावा ।।१४।।
रायांनी करावे राजकर्म । क्षत्री करावे क्षात्रधर्म ।
ब्राह्मणी करावे स्वधर्म । नाना प्रकारे ।।१५।।
तुरंग शास्त्र आणि स्वार । पहिलाच पहावा विचार ।
निवडुनी जाता थोर थोर । शत्रू पळती ।।१६।।
ऐशा प्रपंचाचा विवेक । स्वल्प बोलिलो काही येक ।
येका मनोगते स्वामी सेवक । असता बरे ।।१७।।

संत तुकाराम महाराज यांनी १६५० सालच्या जानेवारी महिन्यात देह ठेवला. त्यापूर्वी त्यांनी महाराजांना पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात.

रामदास स्वामी । सोयरा सज्जन । त्यासी तनमन । अर्पि बापा ।।
मारुती अवतार । स्वामी प्रकटला । उपदेश केला । तुजलागी ।।

या अभंगात समर्थांनी शिवाजी महाराजांना उपदेश दिल्याचा उल्लेख संत तुकाराम महाराज करतात. त्यामुळे इ.स. १६४९ च्या भेटीमधेच शिवरायांनी अनुग्रह घेतला हे स्पष्ट होते.

शिवाजी महाराजांनी संत तुकाराम यांचा आशीर्वाद मागितला असता ते महाराज शिवाजी महाराजांना म्हणतात -


तुझी भेट घेणे काय हो मागणे । आशेचे ही शून्य केले तेणे ।।१।।
निराशेचा गाव दिधला आम्हासी । प्रकृती-भावाशी सोडीयेले ।।२।।
पतिव्रता मन पतीशीच भेटो । तैसे आम्ही विठोमाजी नांदो ।।३।।
विश्व हे विठ्ठल दुजे नाही काही । दुखणे तुझेही तुजमाजी ।।४।।
बहुतांची वृत्ती चाळावली जेंव्हा । रामदास्य तेव्हा घडे केवी ।।५।।
सद्गुरू श्रीराम-दासाचे भाषण । तेथे घाली मन चालू नको ।।६।।
तुका म्हणे बापा चातुर्य सागरा । भक्ती एक थारा भाविकासी ।।७।।

या श्लोकामध्ये तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना समर्थांची कास धरावी असे सांगितले आहे...


विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
हाटोची नये ।।१।।

चालू नये असन्मार्गी ।
त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।।२।।

जनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।

दिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।।४।।

या श्लोकातील Bold केलेले अक्षर घेतले तर 'विजापूरचा सरदार निघाला आहे' असे वाक्य तयार होते, ही बातमी दिल्यावर "येकान्ती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।।" असेही समर्थ लिहितात.

"विजापूरचा सरदार निघाला आहे" हे संकेतिक भाषेत समर्थांनी शिवरायांना सांगितले यावरून ते स्वराज्यासाठी, पर्यायाने शिवरायांसाठी राजकीय हालचाली ही करत होते हे स्पष्ट होते.

त्यावेळचे वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. त्यामुळे समर्थ काळजी पूर्वक हालचाली करत होते. त्यामुळे समर्थ आणि शिवराय यांच्या भेटीचे पुरावे कमीत कमी असावेत याकडे त्यांनी लक्ष दिले होते.

जाते स्थळ ते सांगेना । सांगितले तरी तेथे जाईना ।
आपुली स्तिथी अनुमाना । येवो ची नेदी ।।
लोकी केले ते चुकवी । लोकी भावले ते उलथवी ।
लोकी तर्किले ते दावी । निर्फळ करुनी ।।
एवं कल्पिता काल्पेना । तर्कीताही तर्केना ।
कदापी भविता भावेना । योगेश्वर ।।

म्हणजे कोठेही जाताना सांगून जावू नये, अथवा सांगितल्यास त्या ठिकाणी जाऊ नये. आपल्याबद्दलची खरी माहिती गुप्त ठेवावी. कोणी काही निष्कर्ष काढल्यास तो निष्फळ ठरवावा...

राजकीय हालचाली अश्याच कराव्या लागतात, अथवा त्या असफल होऊ शकतात.

याचा अर्थ असा की आपल्या कार्याचा दुसऱ्याला अंदाज येऊ नये व आपल्याबद्दल कुणी विशिष्ठ मत तयार करून घेऊ नये याची काळजी स्वतः समर्थ घेतात.

शिवाजी महाराज तर आपल्या मावळ्यांना सुचना देतात की "प्रत्येक दगडाखाली विंचू आहे असे समजून दगड उचलावा" अशा बिकट परिस्तिथीत समर्थ आणि शिवराय यांनी आपल्या भेटीचे कागदपत्र ठेवले असतील असे वाटत नाही.

शिवाजी महाराजांना आग्र्याहून राजगडावर येताना समर्थांच्या मठाचे जे सहकार्य झाले त्याची कागदोपत्री नोंद ठेवली असती तर औरंगजेबाने सगळे मठ जाळून टाकले असते.

एकंदरीत देशस्तिथी पाहिल्यानंतर समर्थ स्वराज्य संस्थापनेसाठी इतके व्याकुळ झाले आहेत की शहाजी राजांच्या जहागिरीत येऊनही तीन वर्षात शिवाजी राजे भेटले नाहीत म्हणून ते अधीर झालेत. तुळजाभवानीला शिवाजी महाराजांसाठी समर्थ इ.स. १६५७ साली प्रार्थना करतात,


'तुझा तू वाढवी राजा । सिघ्र आम्हाचि देखता'

केव्हा एकदा शिवाजी महाराजांना सिंहासनावर बसलेले पाहतोय असे त्यांना इ.स. १६५७ सालीच झाले होते.

यावरून त्यांचे स्वराज्यावरील आणि शिवरायांवरील प्रेमही दिसून येते.

तात्पर्य, शिव-समर्थ भेट इ.स. १६५० साली झाली इ.स. १६८० पर्यंत त्यांनी एकत्र कार्य केले.
शिवाजी महाराजांना समर्थांची जशी मदत झाली त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांचा राजाश्रय मिळाल्यामुळे समर्थांच्या मठांचा विस्तार झाला आणि ते स्थिर होण्यास मदत झाली.



सौजन्य: "चिंता करितो विश्वाची" लेखक: सुनील चिंचोळकर