Thursday, July 8, 2010

संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज... - II

समर्थ आणि शिवराय या दोन प्रभूतींच्या भेटीआधीचा प्रसंग...


हात जोडून अत्यंत नम्रपणे शिवाजी राजेंनी तुकाराम महाराजांना विचारले, “महाराज!, रामदास गोसावी काय करतात? त्यांचा पोशाख कसा असतो? ते आपल्यासारखेच गृहस्थ आहेत का?”

तेंव्हा तुकाराम महाराजांनी वर्णन करणारा एक अभंगच शिवाजी महाराजांना लिहून दिला.


हुर्मुजी रंगाचा उंच मोतीदाणा ।
रामदासी बाणा या रंगाचा ॥१॥
पीतवर्ण कांई तेज अघटित ।
अवाळू शोभत भ्रृकुटी माजी ॥२॥
रामनामुद्रा द्वादश हे टिळे ।
पुच्छ ते वळवळे कटीमाजी ॥३॥
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी ।
तुंबा कुबडी करी समर्थांच्या ॥४॥
काष्टाच्या खडावा स्वामींच्या पायांत ।
स्मरणी हातात तुळशीची ॥५॥
कृष्णेच्या तटाकी जाहले दर्शन ।
वंदिले चरण तुका म्हणे ॥६॥


रामदास स्वामीनी शिवाजी राजेंना आपले दोन शिष्य ‘दिवाकर’ आणि ‘कल्याण’ ह्यांच्या हस्ते पत्र पाठवले होते, त्यात ते म्हणतात -


निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ॥
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी॥
परोपकाराचिया राशी । अखंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्वासी । तुळणा कैची ॥
नरपती हयपती । गजपती गडपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायी ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाही ॥
महराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ॥
कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकास धाक सुटले ।
कित्येकास आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणू ॥
सर्वज्ञ तुम्ही धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळली पाहिजे ॥
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
संग नसता लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥

शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामींबरोबरच्या ह्या भेटींनंतर समर्थांना म्हणाले, “स्वामीमहाराज, या सैनिकांना आपण कृपा करुन उपदेशपर काही सांगावे” तेंव्हा समर्थ म्हणतात -


जयास वाटे मरणाचे भये । त्याने क्षात्रधर्म करू नये ।
काहीतरी करोन उपाये । पोट भरावे ॥
मारिता मारिता मरावे । तेणे गतीस पावावे ।
फिरोन येता भोगावे । महद़भाग्य ॥
विन्मुख मरणे नर्के जाती । वाचोन येता मोठी फजिती ।
इहलोक परलोक जाती । पाहा ना का ॥
मरण हाक तो चुकेना । देह वाचिता वाचेना ।
विवेकी होऊन समजाना । काये करावे ।
देव मात्र उच्छेदिला । आपला स्वधर्म बुडाला ।
जित्या परीस मृत्यु भला । ऐसे समजावे ॥
धर्माकरिता मरावे । मरोनी अवघ्यासी मारावे ।
मारता मारता घ्यावे । राज्य आपुले ॥
देवद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावे परत ।
देवदास पावती फत्ते । यदर्थी संशयो नाही ॥
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्ल्लोळ करावा ।
मुलुख बडवा की बुडवावा । धर्म स्थापनेसाठी ॥


संदर्भ – शिवाजी आणि रामदास, प्रसाद प्रकाशन