Wednesday, June 1, 2011

खेळ नामांतराचा...

सध्या "नामांतर-नामांतर" खेळ जोरात सुरु आहे. हा खेळ सोपा आहे, पण त्यासाठी तुमचे स्थान मात्र उच्च असायला हवे.
तुम्ही साहेब आहात का? दादा आहात का? तुमच्या मागे "हाताचा पंजा" तरी आहे का? आशीर्वादासाठी...
"काका मला वाचवा" म्हटल्यावर वाचवायला एखादे काका आहेत का तुम्हाला?
तुमच्याकडे एखादे घड्याळ आहे का? धनुष्य-बाणा सारखे एखादे शस्त्र? काहीतरी पाहिजेच या खेळासाठी.
साध्या सुध्या माणसाने या खेळात भाग घेऊ नये. त्याला कोणी विचारणार नाही....
वरच्यापैकी काहीही असले तरी चालेल, मग तयारीला लागा...
साधारणपणे एखादा पूल, एखादे रेल्वे स्थानक, शहर, गांव, विद्यापीठ असे काहीतरी शोधा. असे काही नाही मिळाले तर एखादे कार्यालय, नाट्यमंदिर गेला बाजार एखादी भाजी मंडई सुद्धा चालेल.
नवीन असल्यास उत्तम, नाहीतर मग थोडे कठीण पडेल. नाहीतर सरळ एखादे विद्यापीठ उभारा आणि ते वापरा.

ठीक, आता तुम्ही निवडलेली वस्तू कुठे आहे ते ठिकाण बघा, आसपासचा परिसर लक्षात घ्या...
खेळात आपल्याबरोबरचे खेळाडू आपल्याबरोबर राहिले पाहिजेत हे हि ध्यानात असू द्या, ते विसरून अजिबात चालायचे नाही. त्यांचे मन दुखावले तर ते दुस-या संघातून खेळायला जाण्याची शक्यता असते.
दुस-या संघातून आपल्या संघात खेळाडू मिळवण्यासाठी वेगवेगळे डाव टाकावे लागतात. ते महत्वाचे आहे.
आता तुमचा गणवेश निश्चित करा. म्हणजे त्याचा रंग. म्हणजे बघा....
आपल्याकडे महत्वाचे रंग आहेत भगवा, निळा, हिरवा आणि पांढरा... पांढरा रंग यासाठी कि तो पाहिजे तेव्हा कोणत्याही रंगाशी जवळीक साधू शकतो.
खेळताना हे लक्षात घ्या कि राज्य आपल्याकडे ठेवण्यासाठी खेळायचे आहे. रंगासाठी नाही...
रंग काय, गणवेश बदलला कि बदलतो. पण हे लोकांना लक्षात येऊ द्यायचे नाही. मात्र संघात खेळाडू निवडताना त्यांचे आपल्या रंगाशी इमान असायला हवे याकडे लक्ष द्यावे.

खेळ खेळायच्या आधी खेळाडू, team building, खेळाचा उद्देश हे सगळे लक्षात घ्या, खेळायची घाई करू नका. सगळे व्यवस्थित पार पडले कि आयुष्यभर हा खेळ पुरतो. तुम्ही एकदा नीट सुरु केलात खेळ कि तो तुमचा मुलगा, मुलगी (सासरी गेली तरीही), नातू, पणतू, भाचा कोणालाही खेळायला सोपे पडते हे ध्यानात ठेऊन संघ तयार करा...

हां, तर, रंगाशी इमान... हा थोडा घोळात टाकणारा विषय आहे. आपल्याला इमान राखायचे आहे असे गृहीत धरून चालू, ते सुरुवातीला सोपे पडेल.
तर...
आपला रंग कोणता यानुसार खेळाडू जमवायला सुरुवात करा.
तुमचा रंग भगवा आहे का? मग लक्षात घ्या तुमच्या साठी फार मोठी माणसे पूर्वी होऊन गेली आहेत त्यांचा वापर करा.
भगवा रंग असेल तर तुमची जवाबदारी फार मोठी आहे, तुमच्या मागे फार खेळाडू जमा होऊ शकतात, फक्त त्यासाठी योग्य समीकरणे आखली गेली पाहिजेत.
या रंगात फुट पडण्याची दाट शक्यता असते ते गृहीत धरून संघ एकवटून ठेवण्याकडे लक्ष द्या.
जर तुमचा रंग निळा असेल तर सोप्पे आहे, आपल्या मागे खेळाडू कमी येणार आहेत, पण ते निष्ठावंत असणारेत हे नक्की, त्यामुळे अश्मयुगीन काळात भगव्या लोकांनी आपल्याला दगड मारले होते हे सारखे-सारखे आपल्या खेळाडूंना सांगत रहा. भगव्या रंगाच्या संघातून बरेच लोक आपल्याला मिळू शकतात, त्यामुळे त्यातील काही लोकांनाहि त्यांना त्यांच्याच रंगातील काही लोकांनी दगड मारल्याच्या थापा मारून फितवायचा प्रयत्न चालू ठेवा. १०० लोकांतील १० तरी आपल्याकडे येणारच याची खात्री बाळगा.
रंग हिरवा असेल तर सावधानी बाळगा. भगवे-निळे कितीही एकत्र झाले तरी ते तात्पुरते आहेत हे आपल्या सर्व खेळाडूंना सांगत रहा. आपण आपल्या रंगासाठी खेळतो आहोत, त्याचे साधन हे "खेळातील राज्य" आहे, साध्य नव्हे, हे मनावर ठसवून घ्या .
रंग पांढरा असल्यास सदरा खाकी ठेवावा, डोक्यावर टोपी हि हवीच. त्याशिवाय दुस-यांना टोप्या घालता येणार नाहीत.
हा गणवेश हीच आपली शक्ती आहे, त्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत याची जाणीव असल्याशिवाय तुम्ही या संघात आलेले नाहीत हे सगळ्यांना माहित असतेच.
आपले आडनांव काहीही असले तरी शेवटी एकाच अडनावाशी इमान राखायचे आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आपल्याला नियम, कायदे काहीही बदलायची गरज नाही आणि त्याचा हक्कही नाही हे कायम लक्षात ठेवा... सगळा हक्क हा एकट्या Madam चा आहे, त्याशी प्रतारणा करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला डावलले जाऊ शकते अथवा संघातून काढलेही जाऊ शकते हे पक्के लक्षात असू द्या, तुम्ही कोणत्याही प्रदेशातून आलेले असा, कोकणातून आलेले असले तरी!

असो, आपली -% तयारी झालेली आहे. अजून खुप शिल्लक आहे, ती सध्यापुरती राहू द्यात.
तरी, या खेळासाठी "महापुरुष" category तले लोक शोधून ठेवा. त्यावेळी अजिबात लाज बाळगू नका, आपल्याला त्यांच्या नावाखेरीज काहीही माहिती नाही हे विसरून जा.
त्यांनी केलेले कार्य आपण पुढे चालवणे सोडाच पण किमान त्याचा अर्थही नीट समजून घेतलेला नाही हे हि मनाला लावून घेऊ नका.
तुमच्या संघानुसार हा खेळ ठरतो, उगीच काहीही बडबडून चालत नाही, नाहीतर संघातील लोक चिडतात.
निळ्या संघाने कोणते नांव पुढे करायचे, भगव्याने कोणते हे ठरलेले आहे. हिरव्याने कोणालातरी पाठींबा द्यायचा फक्त. आपले खेळच मैदान म्हणजे आपला इलाखा, त्याबाहेर कोणी विचारणार नाही.
पांढ-याला choice नाही, आडनाव ठरलेले, फक्त नांव आपण चिठ्ठ्या टाकून ठरवले तरी चालते.

आपण - नामांतर करून दाखवली कि आता खेळाच्या उद्देशावर लक्ष द्या, "खेळातील राज्य"!!!
राज्य हे महत्वाचे असल्याने त्यासाठी खेळाडू, त्यांच्या भावना, रंग हे सगळे गौण आहे हे मनाशी नक्की करा.
आता कोणत्या रंगाशी "युती" करावी लागेल ह्याची जुळवणी करा...

उदाहरणार्थ....
समजा आपला रंग भगवा आहे आणि काही कारणाने आपल्याला निळ्या रंगाशी युती करायची आहे, तर त्यांच्याही भावना लक्षात घेऊन हा खेळ खेळावा लागतो...
प्रथमतः आपण निवडलेली वस्तू (पूल, शहर .) हे आपले स्वतःचे अथवा आपल्या तीर्थरुपांचे असून खेळाचे संघ सोडल्यास कोणाचाही त्यावर हक्क नाही हे समजावे किंबहुन तसले विचारही डोक्यात आणू नयेत.
आता एखादा "महापुरुष" निवडा, निळ्या रंगाचा, मग त्या वस्तूला त्याचे नांव द्यावे यासाठी लढा सुरु करा...
महापुरुष निवडताना त्याने केलेले कार्य, यापेक्षा त्याची प्रसिद्धी हा महत्वाचा निकष असू द्या. मग त्यासाठी खूप मोठे महापुरुष डावलले गेले तरी लक्ष देऊ नका. आपलेच गाडे पुढे रेटत रहा.
(पांढ-या रंगाच्या खेळाडूंना तोही निकष नाही. आधी नामांतर, मग प्रसिद्धी आहेच हे तत्व बाळगा, तसा दुसरा पर्यायही नाहीच!!)
आता अजून एखादा महापुरुष निवडा, त्याच रंगाचा (दुसरा सापडत नसल्यास repetition चालेल), मग दुसरी कोणतीतरी वस्तू शोधून त्या वस्तूला त्याचे नाव देण्याचा आग्रह... स्वतः धरू नका, तो पांढरट रंगाच्या घड्याळधारी संघाच्या खेळाडूला सांगा...
त्यालाही आव्हान द्या... गोंधळात पडू नका. याला "पाहुण्याच्या काठीने साप मारणे" म्हणतात.

असो, तर असा हा "नामांतर-नामांतर" खेळ आहे, त्यात वस्तू भरपूर असल्याने खेळायला मजा येते. महापुरुष काय, तेच तेच वापरता येतात.
आपणच कित्ती मोठे आणि सामान्य लोक आपल्याकडे अगतिक होऊन पाहतात हे पाहून आनंद होतो. त्यातून राज्यही मिळण्याची शक्यता असते.
असे अनेक फायदे असल्याने या खेळाला सध्या खूपच प्रसिद्धी लाभली आहे.