Tuesday, October 6, 2015

साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-रामशेज भाग II

डावीकडे सालोटा आणि उजवीकडे साल्हेर
ट्रेकला गेलं की रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी सकाळी ६ च्या आधी उठायचे नाही असे कितीही ठरवून झोपले आणि कितीही उशीर झाला तरी सकाळी ५:३० पर्यंत उठणे होतेच. उठून आवरून परत शुक्ला काका. न्याहारी उरकून वाघांब्याकडे निघालो. आदल्या दिवशी साल्हेर मधे पाऊस झाला होता, तिकडून एक ग्रुप सालोट्याचा रस्ता न सापडल्याने फक्त साल्हेर करून मुल्हेर गावात येऊन राहिला होता. आमचाही मुल्हेरचा अनुभव लक्षात घेऊन वाघांब्यातून साल्हेरची वाट दिसत असली तरी वाटाड्या घेऊन जायचे पक्के केले होते. पोचल्यावर अजिबात वेळ न घालवता वाटाड्या मोहिले काकांना घेऊन साल्हेरकडे निघालो. राहायला परत मुल्हेर मठात यायचे ठरवले होतेच म्हणून स्लीपिंग बॅग, स्टोव्ह वगैरे न घेताच साल्हेर-सालोट्याच्या एकमेकांशी उंचीची स्पर्धा करणाऱ्या सुळक्यांकडे कूच केली. मोहिलेकाका बरोबर असल्याने रस्ता चुकायची भीती नव्हती. पहिला टप्पा चांगलाच मारला. उन अजिबात नव्हते, दोन्ही गड सुंदर दिसत होते. खाली दिसणाऱ्या गावावर धुक्याची दुलई अंथरलेली होती. निसर्गाच्या कर्तुत्वामुळे साल्हेरपेक्षा सालोटाच उंच भासत होता. पठारावर पोचल्यावर दोन्ही किल्ल्यांमधली खिंड पाहून घेतली. धुके सगळे गांव, किल्ले अदृश्य करून पसरत होते. मधूनच किल्ल्यांची एखादी झलक पाहायला मिळत होती, परत धुक्यात गायब होत होती. एकाच फोटोत दोन्ही किल्ले मावत नसल्याने पॅनोरमा काढायचा प्रयत्न मी, साकेत आणि रविंद्र तिघेही करत होतो आणि कोणाचाच पूर्ण येत नव्हता. अखेर मिळाला आणि परत धुक्यात घुसलो. वातावरण आल्हाद-दायक असले तरी वाट थोडा थोडा दम काढत होती. सुरुवात धुक्याने केल्यावर आता कारवीची फुले स्वागतासाठी हजर होती. संपूर्ण गडावर ही चादर पसरलेली असणार हे दिसत होते. ह्या फुलांच्या पायघड्यावरूनच आम्ही चालत होतो. पायथ्यापासून बरोबर दीड तासांत म्हणजे ९:३० ला आम्ही खिंडीत पोचलो होतो. 

दीड तासांत खिंडीत पोचलो
इथे चांगली १५-२० मिनिट विश्रांती घ्यायची असे ठरवलेले होते पण धुके आम्हाला थकवाच जाणवू देत नव्हते, गार वारं अंगात अक्षरशः अंगात घुसत होतं. त्यातच साल्हेरच्या उतरत्या पायऱ्या दिसल्या आणि त्यावरून येणारे लोकही. फोटोसेशन मधेच १० मिनिट काढून पायऱ्यांच्या दिशेला लागलो. आता उत्साह दुणावला होता. सरळ वाट दिसत असतानासुद्धा मधेच Rock-Patch मारून वाट लहान करत, हौस भागवत, पायऱ्यांपर्यंत पोचलो. सालोट्याचे दृश्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवायचा मोह आवरला नाही. सालोट्यावर पोचणारी वरची पायऱ्यांची वाट दिसत होती पण मधली गायब होती. अर्ध्या तासांत साल्हेरचा पहिला दरवाजा लागला. पहिली एक भिंतच दिसली, त्यात कोण आलेय ते पाहण्यासाठी एक कोनाडा होता फक्त आणि खरा दरवाजा उजवीकडे होता. एक-एक माणूस १० जणांना थोपवून धरेल अशीच रचना. काही पायऱ्या चढून गेल्यावर आणखी एक दरवाजा लागला. त्याच्या डाव्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे. तिथून संपूर्ण सालोटा दिसत होता. 

साल्हेरच्या दरवाजातून दिसणारा सालोटा

साल्हेरच्या दरवाजातला शिलालेख
मगाशी उतरत असलेला ग्रुप आता सालोट्याची वाट शोधत होता. आम्हाला ते वाट विचारत होते ओरडून ओरडून, जेवढी वरून वाट दिसत होती तेव्हढी आम्ही सांगितली पण आम्हालाच पुढे दिसत नसल्याने जास्त सांगू शकलो नाही. परत वरच्या दरवाजाकडे निघालो. अजून २-४ गुहा सापडल्या. इथे राहण्यासाठी सुंदर जागा आहे. काही अंतरावर अजून एक दरवाजा आणि पाण्याची टाकी आहेत. गुहांच्या कडेने कपारीतून ही वाट पुढे जाते. अजून एक ग्रुप भेटला, त्यांना गुहेत राहावे लागले होते. पावसाने हैराण केले होते आणि सालोटा सोडाच, साल्हेरही फिरायला त्रास झालेला होता.

गुहा, पाण्याची टाकी आणि शेजारून जाणारी वाट
आमच्यावर निसर्ग मात्र चांगलाच प्रसन्न होता. मुल्हेर-मोरा ला पण पाऊस लागलेला नव्हता आणि इथेही. उनही लागत नव्हते, उलट धुक्याचे थेंब मधेच स्पर्शून जात होते. तिसरा दरवाजा लागला आणि थेट पठारच. ४-५ जण परशुराम मंदिरावरून उतरताना दिसले, ते मुंबईचे होते. मोहिले काकांच्या म्हणण्यानुसार आधी पाण्याच्या टाक्यांकडे आधी जायचे ठरले. ढगांनी सगळे व्यापून टाकले होते. मांगी-तुंगी त्याच्या वर डोकावत होते. सालोटा मात्र खाली गेला होता. उगाचच डोके वर काढायचा अधून-मधून निष्फळ प्रयत्न करत होता. पलीकडेच गुजरात लागते, ते पूर्ण ढगांखालीच होते.  ५ मिनिटांतच गंगासागर तलाव लागला. मोहिले काकांनी त्याच्याशेजारी असलेली २ टाकी दाखवली. त्याला गंगा-जमुना म्हणतात. लागूनच असलेल्या टाक्यातली पाण्याची चव मात्र निराळी आणि अप्रतिम होती. त्यापुढे असलेल्या दगडाखालूनच पाणी गंगासागर तलावात जात होते. गंमत म्हणजे तरीही तलावातले पाणी पिण्यायोग्य नाही असे म्हणतात. तलाव बघूनच त्यात उडी मारायचा मोह अनावर होत होता. पण बरोबर अजून कपडे घेऊन आलेलो नसल्याने तो मोह आवरला.

गंगासागर तलावात उडी मारण्याचा मोह आवरला
एकमेकांना लागूनच असलेली गंगा-जमुना टाकी, पाण्याची चव मात्र निरनिराळी. पाणवठ्यावर आलेले वाघ.

आता परशुराम मंदिराकडे जायचे होते. खडा चढ चढून जायचे असल्याने लगेच निघालो. वाटेत रेणुका मातेचे मंदिर लागले. वर गुहा लागल्या. त्यात १०० सव्वाशे पान सहज उठेल एवढ्या मोठ्या. त्यांतच हनुमानाचेही मंदिर आहे. खाली वळून बघितल्यावर गंगासागर तलाव आणि त्याच्या डावीकडे लांबवर यज्ञकुंडही दिसते. परशुराम मंदिर खुणावत होते. वेग वाढवला. मधे-मधे वेळ काढूनही खिंडीपासून अवघ्या २ तासांच्या आतच महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अश्या साल्हेर किल्ल्याच्या शिखरावर होतो. भगवान परशुरामांचे हे महाराष्ट्रातले सर्वात उंचीवरील मंदिर. येथे भगवान परशुरामांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली आणि जिंकलेली पृथ्वी/जमीन दान दिल्यावर स्वतःला राहण्यासाठी बाण मारून समुद्र मागे सारून कोंकणाची भूमी तयार केली ती इथूनच अशी कथा आहे.

रेणुका माता मंदिर

भगवान परशुराम मंदिर
गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समाजाला "कोंकणा समाज" असे ओळखतात ह्यांची भाषाही कोंकणा/कोंकणी भाषा आहे. पण ही भाषा गोव्यातल्या कोंकणीसारखी अजिबात नाही. इथल्या भाषेत अहिरणी/मराठी/गुजराथी शब्द आहेत. साल्हेर वरून कंडाणा (ह्यावर एक मोठे छिद्र आहे, परशुरामांनी मारलेल्या बाणाने ते पडले असे गावकरी मानतात), रवळ्या-जावळ्या, धोडप, मुल्हेर, मोरा, हरगड, न्हावी-रतनगड, मांगी-तुंगी असे अनेक किल्ले/सुळके दिसतात, पैकी आम्हाला फक्त थोड्याच किल्ल्यांचे दर्शन झाले, बाकीचे सगळे ढगांच्या कुशीत लपले होते. जेवायला खाली दरवाज्यात जायचे ठरले होते. फुलांतून वाट काढत भरभर उतरलो.

ढगांच्या कुशीत लपलेले किल्ले
जेवतानाच खालून आणखी एक ग्रुप आला, त्यांनाही सालोट्याची वाट सापडली नव्हती. आधीच डळमळीत असलेला सालोट्याचा विचार आणखीनच नाहीसा होत होता. पण तरी प्रयत्न करायचाच म्हणून पटकन खिंडीत परतलो.

विंचू - पण निष्प्राण!

१ वाजला होता. १५-२० मिनिट विश्रांती घेऊन सालोट्याची वाट शोधत निघालो. अजिबात वाट बंद आहे असे म्हणून तिकडे जाण्याची मनाई करणाऱ्या मोहिले काकांनाही आता जोर चढला होता. आमचा उत्साह बघून हातात काठी घेऊन रान झोडपत वाट सारखी करत होते. आमच्यानंतर आणखी एक ग्रुप येणारे हे माहित होते. त्यांना नक्कीच मदत होणार होती. कारव्यांची झाडे वाट अदृश्य करत होती. त्यांचाच बोगदा करून आम्ही त्यातून पलीकडे गेलो, पाण्याच्या वाटेने जरा पुढे गेल्यावर मात्र पायऱ्या लागल्या. आम्ही आनंदाने ओरडायचो बाकी होतो. पायात गोळे आणणाऱ्या पायऱ्या चढून वर गेलो आणि दरवाजा सापडला. पलीकडे पडलेले दगड वाट बंद करू पाहत होते पण त्यांना ओलांडल्यावर २ मिनिटातच अजून एक दरवाजा लागला पुढे पाण्याचं टाकंही. मागे वळून बघितलं तर चक्क दरवाजावरती ६-७ लोक आरामात झोपू शकतील अशी जागा. ह्या जागेला देवडी म्हणतात. पाण्याची २-४ टाकी.

दरवाजावरच्या देवडीत बसलेले त्या दिवसापुरते पहारेदार
पाण्याची टाकी, ह्यांच्या पुढे गेल्यावर फ्रिजरचे टाके आहे
दुपारी २ वाजता धुक्यात हरवलेली कपारीतून गेलेली वाट
अजून २ दरवाजे ओलांडून वर गेल्यावर एकदम वर पोचलो होतो. १० मिनिटं थांबून परतीला लागलो. पाणी भरून घेतले. बाहेर धुके आमच्या जणू अंगातूनच जात होते. बाटल्यांच्या बाहेर पाणी भरल्या-भरल्या थेंब धरत होते, फ्रीजरच! सगळ्यांच्या बाटल्या भरेपर्यंत माझा हात गोठून गेला होता. पावसाची शक्यता दिसत होती. तडक खाली उतरायचे होते पण देवडीवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फोटो काढून जेमतेम ३०-४० मिनिटांत खिंडीत येऊन पोचलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. न थांबता गावाकडे निघालो. सगळ्यांना वेगळाच जोर आला होता. पठारावर पोचून परत एकदा दोन्ही गडांना डोळ्यात साठवून घेतले. सालोटा परत साल्हेरच्या उंचीचा दिसत होता. काही सेकंदातच दोन्ही गड ढगांत गायब झाले. पाऊण तासांतच परत गाडीजवळ पोचलो सुद्धा!

३:३० लाही धुक्यात हरवलेले साल्हेर-सालोटा
या गावातले शेतकरी सधन आहेत. सोयाबीन, बाजरी सारखी पिके मुबलक होतात. मोहिले काकांच्या संपर्काची देवाण-घेवाण करून निरोप घेतला. खाली उतरतानाच आमचे वेगळेच नियोजन झाले होते. मुल्हेर मधे राहायच्या ऐवजी मांगी-तुंगीचे पायथ्याशी दर्शन घेऊन रात्रीतच रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी पोचायचे ठरले होते.
नाशिक रस्त्याला लागलो, रात्री ९:३० च्या आतच रामशेज च्या पायथ्याच्या "अशेवाडी" गावात पोचलो.गावातच हनुमानाचे मंदिर आहे, त्यात समान उतरवले. स्वयंपाकासाठी स्टोव्ह पेटवताना आम्हाला त्यातले काहीच येत नाही ह्यावर शिक्कामोर्तब झाले. अश्विनीताईंनी झकास स्टोव्ह पेटवला. त्यात नुडल्स झाले. मॅगीची भूक यीप्पीवर भागवली. पोटात अजून भूका होत्याच, आम्ही भात-प्रेमी असल्याने खिचडीचाही बेत झाला. जेवून तृप्त झालो, समान आवरले आणि पथाऱ्या पसरून त्यावर अंग टाकले, समाधानाची झोप लागली.

नुडल्स, खिचडी हाणून गडी तृप्त झाले.
नेहमीप्रमाणे गजर व्हायच्या आधीच उठून तो व्हायची वाट बघत बसलो. कंटाळून त्या आधीच उठलो. रात्रीत पाऊस पडून गेला होता. पटापट वाघ मारून आलो. चहा वगरे रद्द करून किल्ल्यावर जायचे ठरले. किल्ला छोटासाच आहे, पण सुंदरच आहे. राम वनवासात असताना इथे काही दिवस मुक्कामी होता म्हणून त्याची शेज/शय्या म्हणून रामशेज. वरती रामाचे मंदिर आहे, पाण्याचे टाके आहे. त्याच्याच उजव्या बाजूला गुहेत शंकराची पिंड आहे. पिंडीच्यावरती गुहेलाच एक  छिद्र आहे, गडावरून इथे यायला पायऱ्याही आहेत. वर पोचून घोषणा दिली आणि २० मिनिटात परत गाडीजवळ पोचलो.

रामशेज किल्ला

रामशेजवरील गुहेतली शंकराची पिंड आणि नंदी
साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा ह्या पक्वान्नांच्या भरपेट तृप्त करणाऱ्या जेवणानंतर सुंदरसा रामशेज किल्ला ही मुखशुद्धी करून दुपारी ४ च्या आत घरी पोचलोही. जणू आम्ही घरी पोचायचीच वाट बघत असल्यासारखा पाऊस आता बरसायला लागला. पण मन तर त्याआधीच चिंब भिजून गेले होते. आठवणींचे दवबिंदू त्यावर मोत्यासारखे चमकत राहणार होते...

साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-रामशेज भाग I

डावीकडे अगदी छोटासा दिसणारा मोरा-गड, पसरलेला मोठ्ठा मुल्हेर किंवा मयूरगड

"साल्हेर-मुल्हेर", अगदी "अही-मही" या थाटात म्हणावीत अशी बागलाण प्रांतातली नावे. ट्रेकिंगची आवड (आवड? वेडच ते!) नसेल तर साल्हेर-मुल्हेर असली नावे ऐकिवात असण्याची शक्यताच नाही. आणि ट्रेकर असाल तर ह्या नावांचे स्वप्न कुठेतरी रोजच्या रहाटगाडग्यात स्वस्थ बसू देत नाही. अनुक्रमे ५१४१ आणि ४२९० फूट उंची मिरवणारे हे अहिमहीच आहेत. ह्यांच्याबरोबर सालोटा आणि मोरा अशी भावंडेही दिमाखात उभी आहेत. प्रत्येक ट्रेकवेड्या मराठी स्वप्नातली ही नावे आपल्या यादीत कोरण्याची संधी ट्रेकवेडे शोधत असतात आणि अशी संधी साकेत आणि माझ्या लक्षात आली. २ ऑक्टोबर, शुकरवार बडा अच्छा दिन है आणि त्याला जोडून ३-४ ऑक्टोबर हे शनी-रविवारही आहेत. पाऊसही नाही. संधी सोडून चालणार नव्हती. तयारी जोरदार लागणार होती. कोणताच माहितगार जोडीला नव्हता, ना कोणत्या ग्रुप बरोबर जायचे होते. मनात विचार आल्यावर त्यादृष्टीने पाऊल, सॉरी, माऊस जाऊ लागला. हातात चांगले १५ दिवस होते. ब्लॉग वाचले गेले, मोहिमेची आखणी होऊ लागली.


कोणीतरी आधीच आखून ठेवलेल्या मोहिमेत जाणे आणि स्वतः आखणे ह्यात प्रचंड अंतर असते. त्यातून ह्या अहिमहींची आदरयुक्त भीतीही होतीच. नकाशे कागदावर उतरवून घेतले, मनात खुणा पक्क्या केल्या. ऑफिसला सुट्टी होतीच, घरी रजेचा अर्ज टाकला. अर्ज मान्य होत नव्हता पण तयारी सुरु होती. मुल्हेरमधे राहायची व्यवस्था मठात होऊ शकते आणि जेवण्या-खाण्याचीही ही माहिती आम्हाला मिळाली होतीच, तिकडे संपर्क साधून त्याची खात्री करून घेतली. एका बाजूला गडांची माहिती काढायची तयारी चालू होती तर दुसरीकडे मोहिमेसाठी गाडी जमवत होतो. मी आणि साकेत तर २ वर्ष भेटलोही नव्हतो. पण सह्याद्रीची एक गम्मत आहे. सह्याद्रीने एकदा जोडलेली वेडी माणसे कधी तुटत नसतात. सरळ तवेरा ठरवली. ५ फिक्स झालेच, अजून १-२ जमल्यास परवडणार होते. २ जणांचे होय नाही करतानाच ६ वा गडी ठरला आणि ७ वा २ दिवस आधी ठरून १२ तासांच्या आत रद्दही झाला. अजून २ दिवस होते, साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा करायचे पक्के होतेच त्यात जमला तर आणखी एक मारू असे डोक्यात होते. पण सगळे डळमळीत होते. आधी नक्की कोणते करायचे ते ठरत नव्हते. तो मान मुल्हेर-मोराला मिळाला कारण तिकडे राहायची सोय नाही, आणि रात्री बिबट्या येतो असे वाचलेले होते. दुसऱ्या दिवशी साल्हेरवरच राहू असे ठरवून तंबू, स्टोव्ह, रॉकेल, चहा/खिचडीचे समान ह्याची तयारी झाली, त्याही पाठीवर बाळगाव्या लागणार होत्या.
१ ऑक्टोबरची रात्र अंधारली. पाऊस नाही ह्या आनंदावर सकाळपासूनच थेंब पडू लागले होते, सगळ्यांनी साकेतकडे जमायचे होते. मला रेनकोटमधे बंदिस्त होऊनच तिकडे पोचावे लागले. पाण्याने नखशिखांत ओथंबतच त्याच्या दारात उभा राहिलो. साकेत, विवेक, अश्विनी, केतकी आणि रविंद्र माझी वाटच बघत होते, १० मिनिटात तवेराही आली. तीत सगळे समान रचून मोहिमेला निघालो. पहाटे ४ पर्यंत पोचून सकाळी मस्त २ तास झोप काढायचा विचार होता, पण त्यावर ढगांनी आधीच पाणी ओतले होते, रस्ता ओला होता, गाडी सावकाश न्यावी लागणार होती. त्यातून पूर्ण रात्रभर प्रवास असल्याने ड्रायव्हर बरोबर गप्पा मारत जावे लागणार होते, मी आणि साकेत पूर्ण वेळ बडबड करत जागत होतो त्यांच्याबरोबर. बाकी गड्यांनी थोडी थोडी झोप काढून घेतली. मनमाडनंतर रस्ता नीट बघावा लागतो. विवेकला उठवले आणि GPS चालू केले. मुख्यरस्त्याकडून डावीकडे वळल्यावर उमरणेकडे उजवीकडे रस्ता जातो, त्याने आपण नाशिक रस्त्याला येऊन मिळतो. तेथून सर्विस रस्त्याने मुख्यरस्ता धरायचा आणि देओला गाठायचे पण गुगलदादांनी कुठून वाट शोधली होती ते लॅरी पेज जाणे. मधेच चक्क गाडीतून उतरून पुढे रस्ता आहे की नाही ते बघावे लागले. त्यातून गाडीच्या गियरने काही घोळ केला होता, गाडी थांबली की सरळ बंद करून सेकंड वर उठवावी लागत होती, फर्स्ट तर पडतच नव्हता.  पण सटाणा-कारंजड-ताहाराबाद करत साडे तीनशे किमीच्या आसपास प्रवास करून मुल्हेर गावात ६:३० ला पोचलो. मठात खोली आमची वाटच बघत होती. त्यात समान टाकले. शुक्ला काकांना न्याहारीची तयारी आधीच करायला सांगितली होती. सकाळची कामे उरकून खोलीला कुलूप लावून त्यांच्याकडे झकास पोहे खाल्ले, घराच्या गायीच्या दुधाचा फक्कड चहा झाला. दुपारचा डबा तयार होताच. आता मुल्हेरवाडीकडे जायचे होते, तो २ किमीचा रस्ता पायीच तुडवावा लागणार होता कारण गाडीच्या गियरच्या कामासाठी ड्रायव्हरना गाडी घेऊन  लगेच सटाण्याकडे जाणे क्रमप्राप्तच होते.
८ वाजता निघालो आणि ८:३० ला मुल्हेरवाडीला गडाच्या पायथ्याशी पोचलो. इथल्या लोकांची भाषा अहिरणी आहे. बहुतांश मराठी आणि गुजराती मिश्रित. त्यांना मराठी बऱ्यापैकी समजते पण त्यांचे मराठी आपल्याला कधीकधी जड जाते. त्यांना विचारून गडांची खात्री करून घेत होतो. मुल्हेर-मोराच्या शेजारीच हरगड आहे पण आम्हाला कोणता गड कोणता हेच समजत नव्हते. गावातले लोक हरगडला औरंगजेब/औरंग्याचा किल्ला म्हणत होते, तर मोरा नक्की कोणता ते त्यांनाही धड सांगता येत नव्हते. खिशात आणि मोबाईलमधे नकाशे बाळगून असल्याने आम्ही तोऱ्यात वाटाड्या नाकारला होता. शोधायचा पहिला टप्पा होता गणेश मंदिर. पाऊण तासाच्या आतच पहिला दरवाजा लागला, २-३ मिनिटांच्या अंतरावर अजून २ दरवाजे सापडले. झाडी खुपच वाढलेली होती.

गणेश मंदिर, येथून दोन वाटा फुटतात

गणेश मंदिर त्यामानाने लवकर सापडले. तिथून गडावर कोरलेला हनुमान स्पष्ट दिसतो. फोटो घेऊन निघालो. हत्ती टाके, मोती टाकेही सापडले. पाण्यात दगड टाकला तर खाली जाताना मोत्यासारखा दिसतो म्हणून मोती टाके, पण पाणी खरच सुंदर होते. हत्ती टाकेही मोठ्ठे होते. ९:३० झाले होते, नकाशावर बघून सोमेश्वर मंदिर गाठायचे होते. सोमेश्वर मंदिरापर्यंत बिबट्या येतो म्हणून चोफेर लक्ष ठेऊन चाललो होतो. त्यात मला संशयास्पद आवाज आला, त्याकडे दुर्लक्ष केले. परत आवाज आल्यावर मात्र मागे वळून बघितले, साकेतच्या चेहऱ्यावरही तो आवाज येऊन गेल्याचे भाव होते. तडक मागे फिरलो, मोतीटाके गाठले. नकाशातून दुसरी वाट शोधू लागलो. २-४ चुकीच्या वाटा आळीपाळीने शोधून झाल्या. झाडी डोक्याच्या वर जात होती. आता अडकलो असे वाटत असतानांच वरून एक धनगर मुलगा आम्हाला ओरडून वाट सांगू लागला. ते आमच्या डोक्यात शिरत नाही हे पाहून तो झपझप खाली उतरला. आमच्या जीवात जीव आला. नकाशात कुठेच न दाखवलेल्या भुलभुलैय्या वाटेने त्याने आम्हाला व्यवस्थित वाटेवर आणून सोडले, अन्यथा आम्ही वाटेलाच लागलो असतो ;) पुढे आम्ही हनुमानाच्या कोरीव मूर्तीच्या दिशेने निघालो.

निकॉनच्या ६०x zoom ची कमाल, गडावर कोरलेला प्रचंड हनुमान (गणेश मंदिराजवळून)

ह्या गडावर २ वाटांनी जाता येते, मुल्हेर-मोराच्या मध्ये असलेल्या घळीतून किंवा मुल्हेर-हरगडच्या मधल्या घळीतून. आम्ही मधल्याच वाटेने मुल्हेरच्या घळीत पोचलो होतो, थेट हनुमानाजवळ. इथे पाण्याचे टाके होते पण पाणी पिण्यायोग्य नव्हते. आम्हाला काळजी नव्हती गडावर भरपूर पाणी मिळणार होते आणि आमच्याजवळही साठा होताच. ११:३० च्या आतच गडावरच्या पाण्याच्या टाक्याजवळ पोचलो. इथे ५-६ तरी टाकी आहेत. मोठ्ठ्या टाक्यात चांगले पिण्यायोग्य पाणी आहे. जवळ पांढरे घुबड मारून पडलेले दिसले. गड फिरत फिरत असताना मोरागडाकडे जाणारा रस्ता दिसला. अप्रतिम तटबंदी आणि रेखीव पायऱ्या आणि २ सुंदर दरवाजे दिसल्यावर पावले तिकडे वळली नसती तरच नवल. मोरागड हा मुल्हेरचा दुसरा बालेकिल्लाच मानला जाऊ शकते. मुल्हेरसमोर छोटासाच भासणारा जेमतेम त्याच्या खांद्याला डोके लाऊ पाहणारा हा किल्ला मोठा रेखीव आहे.मुल्हेर-मोराची रचना इतकी अप्रतिम आहे की दरवाजासमोर कोणी तडक कोणी येउच शकत नाही. प्रत्येक दरवाजाच्या आधी मोठी भिंत लागते आणि एक दरवाजा उजवीकडे आणि दुसरा डावीकडे, म्हणजे अवघे २०-२५ जण हजारोंना थोपवू शकतात.

मुल्हेर वरील टाक्यांचा पॅनोरमा व्ह्यू

वरून लहानसा दिसणारा दरवाजा पलीकडे गेल्यावर मोठ्ठा झालेला!
मोरा-गडावरून दिसणारा मुल्हेर आणि मोरा वर यायची वाट

मुल्हेर वरून दिसणारा मोरा-गड आणि त्याच्या रेखीव पायऱ्या, सुंदर दरवाजा

थोड्या पायऱ्या उतरल्यावर छोटासा दरवाजा आणि दरवाजावर झालेली मोठी पडझड दिसली. पलीकडे गेल्यावर हाच दरवाजा एकदम तिप्पट मोठा दिसायला लागला. ह्या दोन्ही गडांवर गावातले लोक बकऱ्या चारायला घेऊन येतात, मधेच जंगलात सोडल्या तर बिबट्याचा धोका असतो म्हणून वर आणतात. मधल्या घळीवर पाण्याचे टाके आहे. रेखीव पायऱ्या चढून आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला कोरलेले गणपती मन मोहून टाकतात. इथे अजून एक पाण्याचे टाके आहे, जवळच गुहा आहेत, तिथेही राहता येऊ शकते. आता मात्र आम्हाला न सापडलेले सोमेश्वराचे मंदिर दिसले. जातानाचा रस्ता मनात पक्का केला. दरवाजातून पलीकडे वर दिसणारा अजस्त्र हरगड, खाली दिसणारे सोमेश्वर, गणपतीचे मंदिर यांनी फोटोसाठी आम्हाला अडकवून ठेवले. आता सर्व पाहून झाले होतेच. मनसोक्त फोटो झाल्यावरच उतरायला सुरुवात केली. ट्रेकिंग करताना उत्साहात आगाऊपणा कधीच करायचा नसतो. सावधपणे उतरतच मोरा वरून अवघ्या तासाभरात सोमेश्वर मंदिरात पोचलो. मंदिर अप्रतिम आहे. समोरच नंदी आहे, पण त्यासमोरच लगेच शंकराची पिंड नाहीये, तिथे फक्त झरोका आहे, पिंड तळघरात खाली आहे. ह्या मंदिरात राहायची सोय होऊ शकते. आधीच ब्लॉगवर वाचल्याप्रमाणे इथे राहणारे साधू मुडी आहेत, आम्हाला बघितल्यावर ते मंदिरातून मागे निघून गेले. २० मिनिटांच्या ब्रेक नंतर मोतीटाके शोधार्थ निघालो, वाट विचारून घेतली, सोपी सरळ जाते वाट असे कळले. पण आम्हाला मुल्हेर-माचीचे संपूर्ण दर्शन घडण्यासाठीच की काय देव जाणे, पण रस्ताच सापडला नाही. वाट धरूनच निघालो होतो पण रस्ता साफ चुकलो होतो, झुडुपांच्या बोगद्यातून जावे लागत होते, कधी कधी गुडघ्यावर बसून जावे लागेल इतका बोगदा लहान होत होता. साधारण अंदाज घेतल्यावर कळले की आम्ही मुल्हेर-हरगडच्या घळीच्या जवळ पोचलो होतो, मोती-टाके केव्हाच मागे पडले होते. जवळपास विचारायला कोणीही नव्हते. वाटाड्या न घेतल्याचा पश्चाताप होत होता. जेमतेम २:३० वाजत होते पण संध्याकाळचे ६ वाजल्या सारखा अंधार पडला होता. जेवणापेक्षा आता खाली पोचणे जास्त महत्वाचे वाटत होते. अडकून पडल्यासारखे वाटत होते. एक एक जण जाऊन पायवाटेसदृश जे काही दिसेल तिकडे जाऊन वाट सापडत्ये का ते बघत होता, पण काही सापडेना. तेवढ्यात आम्हाला खाली कुठेतरी एक मंदिराचा कळस दिसला. असले मंदिर आम्हाला वर चढताना लागलेच नव्हते. पण आता दिशा मिळाली होती. कळसाच्या रोखाने चालत सुटलो. मंदिर सापडले, ते रामेश्वराचे होते, शेजारी टाकेही होते. आता वाट दिसत होती. ह्या वाटेने आम्हाला गणेश मंदिराच्या मागच्या बाजूला आणून सोडले. चढताना मंदिराच्या समोरच्या बाजूने सुरु झालेली प्रदक्षिणा बरोबर पूर्ण झाली होती. ३ वाजले होते, अजून जेवण झालेच नव्हते. पोळी-भाजी खाऊन घेतली आणि जास्त वेळ न काढता परतीला लागलो. आता वेळ शिल्लक असल्याने पटकन उतरून मांगी-तुंगी च्या पायथ्याला जाऊन येऊ म्हणून ड्रायव्हरना फोन केला तर सकाळी गाडी दुरुस्त करायला गेलेले अजून आलेच नव्हते, त्यांना रात्र होणार होती. मग परत रस्ता तुडवत शुक्ला काकांकडे आलो. कुटुंब चांगले होते, हक्काने चहाची मागणी केली. रात्री थोडेच जेवणाचे सांगून मठाकडे निघालो.
श्री देव सोमेश्वर मंदिर

झुडुपांतली बोगद्याची वाट
रस्ता चुकल्याने, जंगलात अडकल्याने धडधडत असलेलं हृदय शांत होत होतं. थकलेलं शरीर गार पाणी पडण्याची वाट बघत होतं. तेवढ्यात चिंचेच्या लटकत असलेल्या आकड्यांनी आम्हाला लहान केलं. उड्या मारून चिंचा काढल्या. झालेली सर्दी, लागलेला वारा ह्याचा विसर पडला आणि तोंडाने आवाज करत त्या चिंचांचा फाडशा पाडला. हलकं जेवण करून मठातल्या त्या खोलीत खिडकीला बांधलेल्या बैलाच्या आणि दरवाजाबाहेर बसलेल्या मांजराच्या साक्षीने स्लीपिंग बॅग मधे स्वतःला कोंडून घेतलं!

Sunday, March 22, 2015

माझी भ्रमंती - अलंग-मदन-कुलंग (AMK) Part II

                                                आमचा ग्रुप सोडला तर आसपास कोणी मनुष्यप्राणी असण्याची शक्यताच नव्हती. सह्याद्रीच्या त्या कुशीत आम्ही शिरलो. गजबजाटापासून कोसो दूर सुरेख चांदण्यात विसावलो. उद्या कुलंग वाट बघत होता. पहाटे चार-सव्वाचार च्या सुमारास जाग आली. torch लावली तर बाकीच्यांना त्रास म्हणून तसाच पडून होतो. महत्वाची कामं उरकायची होती. पण कोणीच उठले नव्हते. ही जागाही अडनिडी होती. एक तर उठताना कोणाच्यातरी तोंडावर पाय पडायचा म्हणून रिस्क घेत नव्हतो. स्लीपिंग बॅग मधेच घुसून होतो. अचानक ग्रुप मधला कोणीतरी torch लावून हातात पाण्याची बाटली घेऊन वाट काढत रांगताना दिसला. मीही, बाटली काढून शिकारीसाठी तयार झालो. torch च्या प्रकाशात "निवांत" जागा शोधली. तेवढ्यात torch च्या पट्ट्यांनी दगा दिला. ती पडली, नशिबाने विचार सोडून देण्याइतकी खाली नव्हती गेली, मग सरकत-सरकत जाऊन ती आणायचा कार्यक्रम झाला. शिकार उरकल्यावर परत येऊन स्लीपिंग बॅग मधे घुसलो. एक चुटका काढून ६ च्या दरम्याने बाकींना उठवले. WTA अजिबात आळस करत नव्हते, चुलीवर आधण ठेवले गेले. गरम मॅगी आणि वाफाळता कप मला बोलावत होते, पण एका दगडावर ठिय्या मांडून विको पावडर घेतली. तोंड धुवून मॅगी, चहा झाला. सगळे कुलंगसाठी तयार होतेच, ८ वाजत आले होते. आज वातावरण साफ होते. एका बाजूला चंद्र आणि दुसरीकडे नुकताच कामाला लागलेला सूर्य होता. कुलंगला climbing वगैरे नसले तर वाट सोपी नक्कीच नव्हती. अक्षरशः बसून बसून घसरावे सुद्धा लागत होते. बॅग मुळे आणखी कठीण होत होते.

                                                
                                               Risky असा patch लगेचच आला. WTA वाल्यांनी निवडलेली ही वाट आडवळणाची होती, short-cut होता, ३ दिवसांचा ट्रेक दीड दिवसात करण्यासाठी अशाच वाटेने जाणे भाग होते. झाड कसले, मिळेल त्या काठीचा आधार घेत हा patch पार पडला. सोपे काहीच नव्हते, पण आधीच्यापेक्षा कमी रिस्की असा प्रवास चालू झाला. मदन केव्हाच मागे पडला होता. नवरा-नवरीच्या सुळक्यालाही मागे टाकले. आता पायऱ्या चालू होणार होत्या. तिथूनच उतरायचाही मार्ग होता म्हणून बॅग तिथेच ठेवल्या, सव्वा ९ झाले होते. पायऱ्या गाठल्या. कालचा पावसाळी ट्रेक संपला होता. आता श्रावणानंतर एकदम वैशाख चालू झाला होता. पाणी संपत आले होते. ते कुलंगवर मिळणार होते. पोहण्यासाठी वर 5 star swiming pool आमची वाट बघतोय हे माहित असल्याने कपड्याची पिशवी बरोबर घेतली होती. खूप दम लागत होता. उंच-उंच पायऱ्या अजूनच दमछाक करत होत्या. मधे मधे मागे वळून खालचे आपण किती उंचीवर आलो हे सुखावणारे दृश्य बघत होतो. लहान दरवाजा लागला. एक गुहा, परत पायऱ्या. वरच्या दरवाज्यात पोचलो. ४-५ पाण्याच्या टाक्यांनी आम्हाला बोलावून घेतले. मनसोक्त पाणी प्यालो, बाटली भरून घेतली. तडक swimming tank कडे निघालो. मुली तिकडे फिरकणार नसल्याने swimming constume वर पाण्यात उतरलो. वर भाजून निघत असलेलो पाण्यात मात्र चांगलेच कुडकुडलो. पाणी कुत्र्यासारखं गार होतं.


                                                वेळ जास्त नव्हता, तरीही थोडा सनबाथ घेऊन नवीन कपडे चढवले आणि गड फिरायला निघालो. आता जाम फ्रेश वाटत होते. शीण निघून गेला होता. एक कोरडं टाकं आणि त्यावर बांधलेलं धरणही दिसत होतं. एक मेलेलं गिधाडही पाहायला मिळालं. सगळ्यात उंच point वर पोचलो आणि परत आजोबा, सीतेचा पाळणा, मदन, अलंग, सांधण दरी, रतनगड, आदि सगळ्याचे दर्शन घेतले. मदन वरून ज्या वाटेने आलो ती वाटही दिसत होती.


                                                अजून बॅग ठेवल्या तिथपर्यंत उतरायचे होते, तिथून पुढे अडीच तास उतरायचे होते. वेळ न काढता निघालो, टाक्यावरच्या गणपतीचा निरोप घेऊन. माझा उजवा गुडघा आता ओरडू लागला होता. वेग जास्ती नसला तरी न थांबता मी उतरत होतो. प्रसाद, प्रणव आणि एक जण पुढे होता, खूप जण मागे होते. धोकादायक आणि सुंदर अश्या वाटेवरून खाली उतरत होतो. बॅग मात्र त्रास देत होती. कमी उंचीच्या माणसाला पायऱ्या उतरताना नेहमीच त्रास होतो. त्यात त्या मातीवर पाय टिकत नव्हता. नशीब पाऊस नव्हता. मागचे येण्यासाठी २ वेळा halt घेतला. आम्ही कुलंगवाडीलही जाणार नव्हतो आणि भगतवाडीकडेही. भगतवाडी आणि आंबेवाडीच्या मधे एका ठिकाणी आमची बस आम्हाला घेणार होती. शेवटच्या १० मिनिटाच्या अंतरावर एक हमखास चुकण्याचे ठिकाण होते. ४ रस्ते तिथे एकत्र येतात. तिथे चुकले तर २ किमी डांबरी रस्त्यावरून चालत यावे लागते. त्यासाठी तिथे व्यवस्थित खुण करून आम्ही नियोजित स्थळी पोचलो. सावलीत अक्षरशः पसरलो. एक-एक करून सगळे येत होते. नीट खुणा करूनही २ जण चुकले. तरीही आम्ही वेळेत होतो. आंबेवाडीत गरम जेवण वाट बघतच होते. पोटात आहुत्या दिल्या, अग्नी शांत झाला. पुणे आणि मुंबईच्या लोकांनी आपापल्या गाड्या धरल्या आणि AMK, आंबेवाडीला टाटा करून निघालो. रात्री उशिरा घरी पोचलो.
                                                सोमवार फिदी फिदी हसत माझ्याकडे बघत होता. कोणीच आमच्यासाठी थांबणार नव्हते, जगाच्या दृष्टीने आम्ही काहीच विशेष केले नव्हते. पण एक समाधान मनावर होते. घडी करून ठेवलेली ती सगळी जळमटं आता मात्र उलगडली. तीच पांघरून तो ट्रेककिडा शांत झोपी गेला, परत कधीतरी त्या कोषातून तात्पुरता का होईना, बाहेर येण्यासाठी!!!

माझी भ्रमंती - अलंग-मदन-कुलंग (AMK) Part I

                                                 तसा गेल्या वर्षभरात ट्रेक झाला नव्हता काही कौटुंबिक कारणामुळे. नाही म्हणायला दिवाळीत निर्लज्जपणे हरिहर-भास्करगड केले होते. बाकी ऑफिसच्या जिन्याच्या पायऱ्या सुद्धा चढत नव्हतो. ट्रेक किडा झोपला होता किंवा झोपवला होता. ऑफिस चे काम, deadlines, interview  drives, घरात वेळ द्यायचाय, रत्नागिरीला जायचंय, आणि कोणाकडे जायचंय अश्या जळमटांत अडकवून ठेवलेला किडा अचानक एका फोनने जागा झाला, सुबोध विचारत होता "AMK" ला येणार का? हे म्हणजे "आधीच हौस ..." त्यातली गत झाली. WTA group बरोबर जायचे होते 14-15 ला. सगळी जळमटं व्यवस्थित घडी करून बाजूला ठेवली. घरातून २ दिवसांची सुट्टी घेतली.
                                                 शिवाजीनगर वरून रात्री ११ ला निघालो. नाशिक फाट्याला २-३ जण join झाले. वाटेत एकदा चहा मारला आणि तडक AMK च्या पायथ्याचे आंबेवाडी हे गांव. साडेचार-पावणेपाच झाले होते. मुंबईकर आधीच येऊन पहुडले होते. आम्हीही तासभर तरी झोपू म्हणून एका घराच्या अंगणात पथाऱ्या पसरल्या. पण वातावरणाचा रंग काही वेगळाच होता. "शिंच्यांनो 'ब्राह्म' मुहूर्तावर जागं होण्याच्या वेळी झोपताय कसले?" असे अस्सल कोंकणी स्वरात सांगण्यासाठी काळे ढग जामा झाले आणि जोरदार वाऱ्याने त्यात होकार भरला. स्लीपिंग बॅग भिजणे परवडणारे नव्हते. त्याही कशाबश्या गुंडाळल्या. शाळेला तयार करताना जशी मुलाच्या डोळ्यावरची पूर्ण झोप गेल्यावरच आई शांत होते तसं आता वातावरण शांत झालं होतं. गांव केव्हाच जागं झालं होतं. गरम पोहे आहे, त्यावर चहा. तरतरीत झालो. दुपार आणि रात्रीचे जेवण गडावरच असल्याने त्याचे समान सगळ्यांना वाटण्यात आले. rappelling/climbing चे समान (sling, carabiners etc) प्रत्येकाचे प्रत्येकाजवळ देण्यात आले. सगळे मावळे तयार झाले आणि गडांकडे कूच केली. वातावरणाने परत रंग बदलून स्वागताची तयारी केली आणि आमचा रस्ता धुण्यासाठी पावसाचा शिडकावा चालू झाला. WTA च्या कार्यकर्त्यांनी कळसूबाई रांगेची माहिती दिली, आजोबा (आजागड), कळसूबाई, किरडा, श्रीकिरडा, नवरा-नवरी सुळके, अलंग, मदन, कुलंग यांचे दर्शन घेऊन चढायला सुरुवात केली. आत्तापर्यंत रणरणत्या उन्हात कच्ची करवंद खाल्ली होती, पण आत्ता पावसांत भिजत खात होतो. पाऊस थांबायचे नांव घेत नव्हता. तसे मी "हिवासाळा/उन्ह्साळा" चालू असल्याने पूर्ण रेनकोट बरोबर घेतला होता तो काढला. अर्थात तोपर्यंत बॅग जड होण्याएवढे पाणी त्यात गोळा झाले होतेच. समीर आणि प्रणव पुढे होते. एका वळणावर ते पुढे गेले आणि शेजारच्या जालावरून एक फुरसे शांतपणे येणाऱ्या आम्हा पाहुण्यांकडे निरखून बघत असलेले दिसले. इमानीत सगळ्यांना थांबवले. पावसामुळे बॅगेत ठेवलेला कॅमेरा बाहेर काढेपर्यंत डोळ्यातच त्याचे रूप साठवले. ते कॅमेरा conscious होते, पण एक फोटो मारलाच!


                                                 पावलं पटापट पडू लागली. वाट नक्कीच सोप्पी म्हणवी अशी नव्हती. पण येताना किमान ह्या वाटेवरून यायचे नव्हते हे माहित होते. गुहेत पोचलो, इथून अलंग-मदन च्या वाटा वेगळ्या होतात. लगेच चुलीची तयारी चालू झाली. ९ वाजले होते. चिवडा, बिस्किटे, पाणी बाहेर पडले. देवाण-घेवाण झाली.  rappelling/climbing चे साहित्य चढवून झाले. आयुष्यात प्रथमच अशी साधने वापरणार होतो. पण ते कसे वापरायचे ते वेळीच कळणार होते. पुणेवाले मदन आणि मुंबईवाले अलंगकडे निघाले. सगळ्या वाटा डोंगराच्या कापरीतूनच एका बाजूला दरी ठेऊन जायच्या होत्या. रात्रीच्या मुक्कामाकडे जायच्या वाटेत आमच्या बॅगा ठेवल्या. मदनच्या Rock patch कडे जायच्या पायऱ्या अप्रतिम होत्या.


                                                
                                                Rock Patch जवळ पोचलो. पावसाने Patch निसरडा झाला होता. प्रसादला रोप लावण्यासाठी चढायचे होते. २-३ प्रयत्न झाले. मग सरळ शूज काढून तो चढला. एका बाजूला पूर्ण दरी! पण त्याच्या प्रशिक्षण, सराव आणि आत्मविश्वासामुळे तो चढला. माझ्याआधी प्रणव आणि सम्या होते, पण वरून "हलक्या माणसाला" आधी पाठवा असा हुकुम आला, सर्वानुमते मलाच पुढे करण्यात आले. माझ्यासकट बहुतेक जणांचे पहिलेच climbing असल्याने भीती होतीच. जरा तोल गेला तर खाली दरी आ वासून होतीच. अर्थात, दोरी बांधलेली होती, पण कोणी ओढून घेणार नव्हते, patch आपल्या आपणच दगडातल्या खाचा शोधत चढायचा होता. climbing ला सुरुवात केली. खडक ओला होता. पाय सरत होता. माझी उंची कमी असल्याने होल्ड पर्यंत हात पोहोचवायला ताण पडत होता. पण जमले. 


प्रसाद पर्यंत पोचलो. मग समीरचा नंबर. प्रसाद बरोबर मीही दोरी धरली. तोही वर आला, एक-एक करून सगळे आले. ह्यात तास गेला. आता मदनवर निघालो. त्यावरून अलंगचे पठार सुंदर दिसत होते.
                                                ३ वाजून गेले होते. सुरुवातीचा patch दोरी फारशी न धरताच चढला. पुढे ६०-६५ फुटाचा उभा कातळ वाट बघतच होता. त्यावर आंबेवाडीतल्या कैलासने आधीच रोप लावलेला होता. तो सरसर चढला आणि दोरी धरून थांबला. ह्यावेळी फोटोसाठी मला खाली थांबायचे होते. पण वरून परत हुकुम आला, "हलका माणूस"! मग काय, हा हलका माणूस मान डोलवत कातळाला चिकटला. एकदा दोरी धरली की कैलास ओढूनच वर घेतो, मग rock patch चढल्याचे thrill मिळतच नाही, म्हणून खालून-वरून मिळणाऱ्या होल्डसाठीच्या सूचनांकडे लक्ष ठेवत दोरी न धरताच चढत होतो. मदनच्या तुलनेत हा चांगलाच वाळलेला होता. होल्डही बरे होते. अर्थात अर्ध्यापर्यंतच. नंतरचा कठीण होताच. पण चढलो. मग कैलास बरोबर दोरी धरून, चढणाऱ्याना सूचना, फोटो आणि प्रोत्साहन. सुबोध, सम्या, प्रशांत आणि प्रणव सगळे आले. ४ वाजले होते. ५ चे परतीचे target होते. fast निघालो. कोरीव गुहा बघितल्या, फोटो झाले. पाणी होते, पण अधिक चांगल्या पाण्याच्या शोधार्थ निघालो. ह्यावर एकच टाके दिसले. वेळेत परत यायचे होते, ते पाणी भरले, पिऊन घेतले आणि परतीचा मार्ग धरला. त्यावेळी काही जण वर येत होते. वर येताना जास्त कठीण न वाटणाऱ्या पायऱ्या आता भीतीदायक वाटत होत्या. समोर दरी दिसत होतीच. पण उतरलो. एकदा rappelling झाले होतेच. तुलनेने वाढलेल्या आत्मविश्वासाने पटपट उतरलो. नंतरचा छोटासा patch एकटाच rappelling karat उतरलो. अंधार होण्याच्या आत झोपायच्या गुहेकडे पोचायचे होते. बॅगा उचलल्या, झपझप चालत गुहेत पोचलो. WTA मधल्या पल्लवी आदि मुलींनी चुलीची तयारी चालू केलीच होती. जागा मात्र फारच congested होती. उंची फारच कमी होती, मलाही उभे राहता येणार नव्हते. पण पाऊस आला तरी काही problem होणार नव्हता. ७ वाजत आले होते. गप्पा सुरु झाल्या, झोपायच्या जागा पकडून ठेवल्या. रात्री गरमागरम सूप तयार झाले, त्यानंतर बिर्याणी! अति हाव न करता जेवण केले. सकाळी वाघ मारायला जागा सापडणे कठीण होणार होते.