Monday, October 30, 2017

जत्रा ढुकढुक गाड्यांची

जत्रा
ढुकढुक गाडी म्हणजे "ढुक, ढुक, ढुक, ढुक" असा आवाज करत जाणारी गाडी. जसं बुलेट, Harley-Davidson etc...
वेग कमी-आवाज जास्त, भलतीच गडगड-पाऊस रिमझिम फक्त वगैरे वगैरे...
सध्या परदेशी आहे ना, म्हणून फक्त Harley बघू. Wollongong (NSW, Australia) भागात तशी जत्रा भरली होती harley वाल्यांची!

ह्या ढुकढुक गाडीची एक गंमत आहे. काही नियम असावेत ही बाळगण्यासाठी.
एक तर मालकाचं वजन 100 किलो तरी असावं. कपडे चुकूनही फॉर्मल, साधा Tshirt वगैरे असू नये.
पूर्ण बाह्यांचा TShirt बहुतेक विकतच नसावेत ह्या लोकांना कोणी, तो अर्ध्या बाह्यांचाच पाहिजे, आणि त्यावर Harley-Davidson तरी लिहिलेलं पाहिजे नाहीतर त्यांचा लोगो तरी, Harley चं चित्र.. अगदीच तसलं काही नसेल तर गेला बाजार एखादी कवटी वगैरे तरी...

मी काढलेला नाहीये हा फोटो, मी फक्त गाड्यांचे काढलेत.(लक्ष फक्त जॅकेटकडे असू द्या!)
ह्या गाड्या विकणाऱ्याचंच ते टॅटू गोंदण्याचीही टपरी असावी. हॉटेलच्या बाहेर नाही का पानाची टपरी असते त्याच नावाची. कारण ही गाडी घेतली की accessories मध्ये टॅटू गोंदवून देत असावेत. त्याशिवाय रस्त्यावर न्यायला बंदी. अंगभर गोंदवून घेतला तर पहिला नंबर! नाहीतर हात, छाती वगैरे. किमानपक्षी बाह्या सोडल्यास उरलेल्या हातावर बंधनकारक.
म्हणजे सर्वांगावर टॅटू, Harley चा Tshirt, Harleyचंच जर्किन, हेल्मेट Harleyचंच आणि उतरल्यावर हेल्मेट काढलं की घालायला टोपीपण Harleyचीच. चड्ड्या काय दिसल्या नाहीत त्यांच्या. (ते टॅटूवाले पण फोटो घेतले नाहीत मी)
शक्यतो दोन्ही बाजूला 1-1 मोठी डिकी असावी, कितीही किराणा घेतला तरी ठेवायची चिंता नाही. पाठीमागे एखादी आडवी डिकी असल्यास उत्तम. (Pizza वाल्यांच्या मागे असते तशी किंवा पाववाल्यांच्या मागे)
बरं कुठेही फिरायला जावं तर एकटे-दुकटे फारसे हे भटकत नाहीत, थवेच्या थवे! सुट्टीचा दिवस असला कि आपल्याच जातीची गाडी ज्यांच्याकडे आहे असे भरपूर जण एकत्र हिंडायला निघतात.
आता गाडी stand वर लावणे ही तशी just formality आहे, जरासा support उगाच. तशी ही गाडी स्वतःची स्वतः उभी राहण्यास समर्थ आहे.
गाडी stand वरून काढून घेऊन जाणे हीही एक वेगळी गोष्ट असते. सामान्य माणूस गाडी stand वरून काढून घेऊन जायची असेल तर हेल्मेट वगैरे जे असेल ते घालतो, गाडीवर बसतो, किक मारली किंवा बटन दाबून चालू केली कि निघाला...
पण ढुकढुक वाले सामान्य थोडीच असतात, सर्वप्रथम गाडीजवळ आल्यावर आपलीच गाडी नावीन्याने बघत असल्यासारखी चारही बाजूंनी फिरून बघणे हि पहिली गोष्ट. त्यात ते काय बघतात देव जाणे? एखाद्या वेळी हवा वगैरे बघावी लागणे ठीक, पण प्रत्येक वेळी काय बघायचे? बरं इथे Australiaत रस्त्यावर कुत्रे पण फिरत नाहीत, लाईटचे खांब पण नाहीत, कुत्र्यांना गाडी खांब वाटावी अशीही शक्यता नाही. ते जे काही असेल ते निरखून झाल्यावर डिकी उघडून संसार बाहेर काढावा, हेल्मेट, जॅकेट, ग्लोव्ह्ज . हे सगळं अंगावर चढवण्याआधी गाडी सुरु करणे महत्वाचे. आपल्याकडे नाही का टमटम/डुगडुगी वाले दोरी ओढून टमटम चालू करून ठेवतात, मग ती दिवसभर बंदच करत नाहीत, निसता रॉकेलचा धूर!
हा, तर ते धूड पाहिलं सुरु करून ठेवायचं, गाडी अजून standवरच हा, आणि Nutralवर. नुसता आवाज झाला पाहिजे १० मिनिट ढुग-ढुग-ढुग... मग साज शृंगार करत ती सगळी आयुधं अंगावर चढवायची. गाडी Stand वरून सरतेशेवटी काढायची, पण जायचं नाही बरं का अजून, किमान ३ मिनिट त्यावर  बसून पेट्रोल जाळायचं. मग असा काही आवाज करायचा कि जणू काही पुढच्या ३ सेकंदात २०० किमी/तास वेगाने "मौत का कुवां" मधेच जायचंय. आणि मग गाडी चालू करून, पायाने ढकलत ढकलत ५ च्या वेगाने गाडी पार्किंगच्या बाहेर काढायची.
पुढचं मग ठरलेलंच, ढुग-ढुग-ढुग-ढुग-ढुग आवाज करत जात राहायचं. अगदी बुलेटसारखंच.
पण एक फरक आहे हा, इथे ते लोक ४० पेक्षा जास्त, अगदी १५० पर्यंत वेगाने जातात. बुलेटचा वेग तेवढा जातच नसावा, एखाद-दोन बुलेट बघितल्या होत्या मी, ८० च्या वेगाने जाताना भारतात. सगळा रस्ता अडवत २० च्या वेगाने माजात जाण्याची प्रथा आपल्याकडे फक्त. इथे १०० च्या वेगाने सुद्धा ते रस्त्याच्या डाव्या बाजूने जातात. रस्त्यावरच्या सगळ्यांना "मी आssssssलो, मी निघाsssssलो" असं गाडीच्या आवाजाद्वारे सांगितलंच पाहिजे असा ह्यांचाही आग्रह असतो बुलेटवाल्यांसारखा. ते नाही का Ice-cream ची गाडी आली कि प्रत्येक वेळी सांगायची गरज भासू नये म्हणून घंटा लावलेली असते त्याला, किंवा बैलाच्या गेल्या नाही का खुळखुळा बांधतात किंवा ... हा तसंच काहीसं असेल बुआ हे आवाजाचं प्रकरण!

काही गाड्यांची सीट म्हणजे पूर्ण खुर्ची

डिकीत माझ्यासारखा माणूस सहज बसेल

पण एक आहे हा, ह्या Harley मध्ये ना, टेकायला आधार, बूड नव्हे हा, पाठ. ट्रकला गरज भासल्यास गाडीचा काढून लावता येईल एवढा जाड टायर. ४-५ वेगवेगळे Speedometer, त्यात काय वेग, MRP, दोन्ही चाकातलं हवेचं प्रमाण, टाकीतलं पेट्रोल आणि फुगलेल्या छातीचा घेर पण मोजतात काय harley जाणे. किंवा Davidson. अजून जोडीला earphones लावायला जागा, एखाद २ स्पीकर सुद्धा! तीर्थाच्या बाटल्या ठेवायलाही जागा असावी एखादी.
काही गाड्यांना सीट एकच, पण डिकीत माझ्यासारखा माणूस सहज बसेल. तर काही गाड्यांची सीट म्हणजे पूर्ण खुर्ची!

तर असा, skydive झाल्यानंतरचा वेळ मी ह्या लोकांना अलविदा करण्यात घालवला.
इति Harley-Davidson पुराणं समाप्तं!

अरे हो...
गडगड/कडकड नाही पण सुsssss असा आवाज करत काहीही समजायच्या आत पावसाची जोरात सर येऊन काहीही समजायच्या आत झुमकन निघून जावी, तशी जाणारी हि गाडी मात्र नेत्रसुख देऊन गेली मला. हि आपली लाडाची हायाबुसा!
हायाबुसा


-- ॐ रत्नांग्रीकर