Wednesday, December 12, 2018

किल्ले मोहनदर उर्फ शिडका आणि कण्हेरगड - II

                 आम्ही नंदुरी-अथांबे वरून मोहिमेच्या दुसऱ्या भागात शिरलो. गांव: सादडविहीर. इथून 2 पोरांना आमच्याबरोबर येण्यास तयार केले, पण गाडी थांबवायच्या जागेवर आल्यावर त्यांनी माघार घेतली. त्यांना घरी काम निघाले आणि अर्थातच शेतीचे काम जास्ती महत्वाचे. पण त्यांनी गडाकडे जायची वाट दाखवून दिली.

किल्ले कण्हेरगडचा खालपासून दर्शन देणारा बुरुज
                 सादडविहीर गावाकडून पुढे जाणाऱ्या रस्त्याने साधारण 500 मीटर अंतरावर रस्त्याखालून मोरी बांधलेली आहे (पाणी जायला जागा) हीच खूण. इथून उजवीकडे बुरुजावर फडकत असलेला ध्वज दिसतो. वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. पहिला टप्पा परत डावीकडचा डोंगर आणि उजवीकडे किल्ला ह्या मधल्या खिंडीचा. इथे पोचायला आधारानं 15-20 मिनिटं लागतात. इथून डावीकडे डोंगरावरही वाट जाते. पलीकडच्या कण्हेरवाडीतून लोक इथे ससे पकडायला जातात, तसेच वर बहुतेक डोंगरदेवाचे मंदिरही आहे. आपण उजवीकडे वर बुरुजावर फडकणाऱ्या ध्वजाकडे बघत सरळ वरती जायची वाट धरायची. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. इथे आपल्याला साध्य व्यवस्थित दिसत असले तर तिथे नेणारा मार्ग सोपा नाहीये. सरळ नाकाडाने चढल्यास अगदी घसाऱ्याची वाट आहे. परंतु जरा उजवीकडची वाट पकडल्यास नाकाडाच्या कडेने पण झुडुपातून वाट वरच्या बाजूला जाते. परंतु ह्या वाटेने जाताना आपले साध्य नक्की कुठे आहे त्याचा अंदाज ठेवावा, कारण आपण जात असलेली ही कडेची वाट सरळ आपल्याला बुरुजकडे न जाता पुढे कुठेतरी घेऊन जाते. म्हणून वाटेत अंदाज घेऊन डावीकडे वरच्या बाजूला जावे लागते. इथून परत आपले साध्य म्हणजे ध्वज दिसू लागतो. आता मात्र पर्यायी रस्ता नाही. सरळ वर जायचे.

छोटेखानी पण शीण दूर करणारे नेढे
                 हा किल्ला 4 टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात पोचतानाच गडाचे अवशेष म्हणजे पायऱ्या दिसू लागतात. इथून मागे बघितल्यास उंच वाटत असलेले गडाच्या डावीकडचे डोंगर खुजे वाटू लागतात. इथे पाण्याची छोटी विश्रांती घेऊन बुरुज उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने पुढे व्हायचे. परत पायऱ्या आपल्याला बुरुजाला वळसा मारून त्याच्या वरच्या लपून बसलेल्या बुरुजावर घेऊन जातात. इथे एक पाण्याचे कोरडे टाके आहे. मागे बुरुजकडे गेल्यास दोन्ही बाजूला तटबंदी दिसते, तर मधेच मोठा चर खोदलेला दिसतो. समोरच खालच्या बुरुजवरचा ध्वज आणि समोर डोंगर दिसतो. आता मागे फिरून कोरड्या टाक्याजवळून वरच्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जायचे. सरळ टप्प्या-टप्प्यातल्या पायऱ्या आणि अगदी उंचावर अर्धवट तुटका दरवाजा सदृष अवशेष दिसतात. पुढचा पायऱ्यांचा टप्पा पार केला कि ह्या किल्ल्याचा दागिना शोभेल असे छोटेखानी पण सुंदर असे नेढे आहे. अगदी 5 फूट उंचीचे आणि 25 एक फूट लांब असे त्यात आरामात वारा खात बसावे असे वाटणारे हे नेढे आहे. त्यात बसायचा मोह तात्पुरता टाळून डावीकडच्या पायऱ्यांनी पुढच्या टप्प्याकडे जायचे. इथे वरती कातळात काही खड्डे आहेत. अजून वरच्या तुटक्या दरवाजा वाटणाऱ्या अवशेषांकडे पोचायचे. हे अवशेष दरवाजाचे वाटत नाहीत आणि मुख्य वाटही इथून नाही, तर त्याच्या डावीकडून आहे. इथे अजून काही खड्डे, गोलाकार आकार कोरलेले आहेत. इथे अजून एक कोरडे टाके आहे. आता गड माथ्यावर म्हणजे एका पठारावर पोचायचे. इथे समोरच तुळशी वृंदावन, शंकराची पिंड, नंदी वगैरे उघड्यावरच आहेत. जवळच पाण्याची टाकी, खोल्यांचे चौथरे वगैरे अवशेष आहेत. पाणी पिण्यायोग्य नाही. समोर विस्तीर्ण पठार आहे आणि पलीकडे धोडप किल्ल्याच्या माचीला जशी भलीमोठी खाच आहे, तशीच इथेही आहे. पण इथे जाता येत नाही. इथून डावीकडे गेल्यावर टाक्यांचा समूह आहे. सगळ्यात उजवीकडच्या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य असले तरी त्यात शेवाळे खूप आहे, पाणी रुमालात गाळून घ्यावे.

टाकी, गुहा आणि इतर अवशेष
                 ह्या गड माथ्यावरून सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप, कांचना हे किल्ले, तर हंड्या, बंड्या आणि इखारा हे सुळके दिसतात.
                 कडेने परतीच्या वाटेकडे येताना उजव्या बाजूला खालच्या बाजूला एक वाट जाते. इथे पूर्वाभिमुख 2 गुहा लपलेल्या आहेत. विस्तीर्ण अश्या ह्या दोन गुहा आहेत. जागा सपाट नसली तरी गरज लागल्यास पाऊस-पाण्यापासून संरक्षित आहे. ह्या गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या दिसतो. धोडपच्या डावीकडे ईखारा सुळकाही स्पष्ट दिसतो. आता गडफेरी पूर्ण होते. साधारण 10 टाकी हा किल्ला बाळगून आहे. येताना नेढ्यात निवांत बसून जेवण करावे. इथून आपण आल्या वाटेने पाऊण तासांत आपण अगदी गडाच्या पायथ्याशी पोचतो.

गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या
                 ह्या गडाचा इतिहास अंगात वीरश्री निर्माण करणारा आहे. हा फारसा प्रसिद्ध नसलेला गड आपल्या पराक्रमाने अजरामर करून ठेवलेला आहे "रामजी पांगेरा" नावाच्या मराठी रक्ताने. पावनखिंड म्हणजे वीर बाजीप्रभू, पुरंदर म्हणजे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरे असे समीकरणच आहे जणू, तसेच कण्हेरगड म्हणजे रामजी पांगेरा.
                 १६७२ च्या जानेवारी महिन्यात दिलेरखान आपली १० हजारांची भलीमोठी फौज घेऊन कण्हेरगडाच्या पायथ्याशी आला. त्याने कण्हेरगडाला वेढा घातला. त्यावेळी रामजी हे कण्हेरगडाचे किल्लेदार होते. गडावर शिबंदी होती अवघी 800 ते हजार. गडावर उपलब्ध रसद जास्त काळ पुरणार नाही हे रामजी जाणून होते. ह्या रामोश्याने आपले कपडे फाडले, दोन्ही हातात समशेरी घेऊन रामजीने मावळ्यांना आव्हान केले. 'आरं गनिम येतुया, चलाऽऽऽऽ मरायला कोन कोन तयार हाय त्येनं माज्या म्हागं यावं...' त्याचे आव्हान शब्दशः सत्य होते. हजारी सैन्यापुढे हे वेडे वीर अक्षरशः मरण्यासाठीच जात होते. ह्या वेड्याची साथ द्यायला असेच सातशे वेडे वीर तयार झाले आणि गडाचे दरवाजे अचानक उघडले. कमरेचे वस्त्र फक्त अंगावर ठेऊन उघडे बंब असे हे रामोशी हातात नागव्या तलवारी घेऊन 'हर हर महादेव' अशी गर्जना करत गनिमावर अक्षरशः कोसळत गेले. अंगावर असंख्य जखमा झाल्या. सभासद या लढाईचे वर्णन करताना लिहतो, 'टिपरी जैसी शिमग्याची दणाणते, तैसे मावळे भांडीले'. खरंच रामजी पांगेरा आणि त्याच्या मावळ्यांचा आवेश पाहून दिलेरखानाने अक्षरशः तोंडात बोटे घातली. त्याच्या डोळ्यासमोर पुरंदरच्या युद्धात उभा ठाकलेला मुरारबाजी देशपांडे आला नसेल तरच नवल. 'ये मराठे नही, भूत है' असे म्हणत दिलेरखान परत फिरला. अवघ्या सातशे मावळ्यांनी गड राखला.
                 संध्याकाळ झाली होती. थोडासा उशिर झाला होताच निघायला. घरी पोचायला साडेबारा वाजून गेले होते. सोमवार सुरूच झाला होता ऑफिस आजच होते. सह्याद्री, किल्ले, रामजी पांगेरा... सगळे तात्पुरते बाजूला ठेवले आणि 5 एक तासांची झोप मिळवायला पांघरुणात शिरलो.

किल्ले मोहनदर उर्फ शिडका आणि कण्हेरगड - I

ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर बहुतांशी Netherlands ला असल्याने ट्रेक चुकले होते. युरोपात नवीन देश आणि शहरं पहात असलो तरी एक कान आणि डोळा सह्याद्रीकडे होता. त्यातून WhatsApp आणि फेसबुक इतर ट्रेकर्सनी केलेले ट्रेक दाखवून त्यावर मीठ शिंपडत होतं. आधीचे ट्रेक मित्र एक तर संसारात व्यस्त आहेत आणि काही जण आपापले Trek groups काढून त्यात गुंतलेले आहेत. पण ट्रेकप्रेमी मात्र कमी नाहीत आणि हक्काने फोन करावा असे नंबरपण शाबूत आहेत. तसंही भारतात आल्यावर मालवणची एक कौटुंबिक मोहीम काढून झाली होती आणि 2 तारीख मोकळीच होती, ट्रेकसाठी खडा टाकून ठेवलेलाच होता. न राहवून विनीतला फोन केला. अगदी त्याच्याही मनात 2 तारखेचा काहीतरी प्लॅन शिजतच होता.

किल्ले मोहनदर उर्फ शिडका
आता माझ्यासारख्या नवख्या ट्रेकवेड्याला ह्या मातब्बर ट्रेकर्स बरोबर जायला मिळते तेव्हा "ट्रेकसाठीची जागा" हा मुद्दा फारसा महत्वाचा ठरत नाही, कारण त्यांच्याबरोबर कुठेही जाणार असलो तर माझ्यासाठी सगळे नवीनच असते. ह्यावेळीही नाशिकमधल्या वणी जवळच्या किल्ले मोहनदर (शिडका) आणि कण्हेरगडचे नियोजन त्याच्या डोक्यात होते. सुदैवाने त्याने अजून प्लॅन जाहीर न केल्याने मला जागा नक्की मिळणार होती. शनिवारी रात्री निघून रविवारी परत. असा साधा प्लॅन होता. हापिसात शुक्रवार पर्यंतचा वेळ कसाबसा काढला. शनिवारी घरातली काही कामं पण आटपून घेतली. संध्याकाळी नेहमीचीच तयारी केली आणि सव्वा आठ ला घराबाहेर पडलो. गिरीश कुलकर्णी ह्यांची भेट घेऊन आम्ही बरोब्बर 9:25 ला विनीतच्या घरी पोचलो. 2-4 मिनिटातच सचिन जगताप आला आणि ठरल्याप्रमाणे साडेनऊला तिथून निघालो. वाटेत भूषणला घेतले आणि मध्यरात्री मसाला दूध न विसरता घेऊन पहाटे पावणे 3 ला मोहनदर गावात अगदी ग्रामपंचायतीसमोर पोचलो. मस्तपैकी जाळीच्या compound मध्ये ग्रामपंचायतीच्या आवारात तंबू टाकला आणि 3 ला झोपलो सुद्धा. 5 ला तशीही जाग यायला लागली पण सध्या उशिरापर्यंत अंधार असल्याने थोडा वेळ पडून राहिलो आणि साडेपाच नंतर उठलो. गांव तसं जागं झालेलंच असतं ह्यावेळी. त्यातून आमच्यासारखे असे अचानक उगवलेले नवीन प्राणी म्हणजे गावातल्या लोकांसाठी जरासे कुतूहल असते. त्यामुळे बादलीभर पाणी मिळणे काही अवघड गेले नाही. दंत-मार्जन आणि वाघ-ससे मारण्याचे कार्यक्रम लगेचच सगळ्यांनी उरकून घेतलंनी. रात्री लक्षात न आलेला मोहनदर किल्ला त्याचा प्रचंड भिंतीरूपी फणा काढून आमच्या डोक्यावरच होता. त्यातून ह्या किल्ल्याला प्रचंड असं नेढं आहे. जणूकाही त्याचा डोळाच.

नेढं
ह्याची आख्यायिका आहे. जेव्हा सप्तशृंगी माता आणि महिषासुर यांचं युध्द झालं, तेव्हा महिषासुर रेडयाच्या शरीरात लपून बसला होता. जेव्हा देवीला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने रेडयाचा शिरच्छेद केला. त्यातून महिषासुर अतिशय जोराने बाहेर पडला आणि त्याने डोंगराला धडक दिली. त्यामुळे देवीच्या मंदिरासमोरच्या डोंगरात हे खिंडार पडलं. ह्याबाबत अजून एक वेगळी आख्यायिकाही ऐकायला मिळते. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. त्यावेळी महिषासुर मात्र रेड्याच्या रुपात पळाला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला आणि या डोंगराच्या मागे लपून बसला. तेव्हा त्याच्या पाठलाग करत आलेल्या देवीने या डोंगराला जोरात लाथ मारली आणि हे नेढ तयार झालं. हे नेढं ह्याच आख्यायिकेमुळे "देवीचा पाय" म्हणून प्रसिद्ध आहे. वणीला येणाऱ्या असंख्य भक्तांपैकी बहुतेकांना देवीचा पाय असलेला हा डोंगर, हा किल्ला आहे ह्याची कल्पनाही नाही. पिंपळा उर्फ कंडाळा किल्ल्याला तर सह्याद्रीतलं सगळ्यात मोठं नेढं मिरावायचा मान मिळालेला आहे त्यामागेही एक आख्यायिका आहे. पिंपळा आणि धोडपच्या मोहिमेत त्याचा उल्लेख केलेला होता. ह्या मोहनदर उर्फ शिडका किल्ल्याचे नेढे त्याच्यापेक्षा लहान असले तरी ह्याचे सौंदर्य काही कमी नाही.

ह्या किल्ल्याची माहिती आमच्याकडे अश्याच ट्रेकवेड्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्याने मोबाईलमध्ये हजर होती, तरीही ग्रामपंचायतीसमोरच्या घरात चौकशी केली. गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. आम्ही वळसा मारून जायचे ठरवले. गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो. वातावरण धुरकट असले तरी सुदैवाने त्या शेंडीमागून येणारा सूर्य मात्र धोडपचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. 2 वाटा फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात.

सप्तशृंगी देवीचा गड, मार्कंड्या, डावीकडे मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे गडप झालेलाधोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण.
आपण डावीकडून वरती गेलो तर तटबंदीचे अवशेष ओलांडत एका सपाटीवर येऊन पोचतो. इथे उजवीकडे 2 टाकी दिसतात. पाणी भरपूर असले तरी पिण्यायोग्य राहिलेले नाही. डावीकडे चालत गेल्यास गडाच्या पूर्व टोकाला येतो. इथे काहीही अवशेष नसले तरी अप्रतिम दृष्य बघायला मिळते. खाली मोहनदर गाव, उजवीकडे आश्रमशाळा तर समोर वरती प्रचंड डोंगर. त्याच्या मागे उजवीकडे सप्तशृंगी देवीचा गड, डावीकडे मार्कंड्या, मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे धोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. हे मोहून टाकणारे दृष्य डोळ्यात, कॅमेरात साठवले कि मागे बघताच विस्तीर्ण असा मोहनदर उर्फ शिडका पश्चिम टोकाकडून आपल्या नेढेरुपी डोळ्याने आपल्याकडे पाहतोय असेच वाटते. आता मागे फिरून पश्चिम टोकाकडे जात जात उरलेले अवशेष पाहून घ्यावे. ह्यात अजून पाणी असलेली आणि कोरडी अशी टाकी बघायला मिळतात. पश्चिम टोकाकडून परत येत असताना डाव्या हाताला खाली दरीच्या बाजूला गड आणि बाजूचा डोंगर ह्यांना जोडणारी अर्धवट अशी तटबंदी दिसते, त्यात एक बुरुजही दिसतो. अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण होते. गडावर साधारण 8-10 कोरडी/पाण्याने भरलेली तर काही बुजत आलेली टाकी आहेत. परत आल्या वाटेने खिंडीत पोहचायचे. आता डावीकडे गड आणि उजवीकडे डोंगर असे उभे राहिल्यास समोर दरीकडे तोंड करून समोर झाडीतून खाली उतरायचे. वाट तशी बऱ्यापैकी आहे. वरून पाहिलेली अर्धवट तटबंदी आणि बुरुज उजवीकडे दिसतात. इथे अजूनही एक बुरुज असावा आणि गडाचे दार असावे असे वाटते. इथून त्याच वाटेने डावीकडे जात राहिल्यास आपण साधारण 15 मिनिटात नेढ्याच्या खाली येऊन पोचतो. दगडातल्या खाचा नीट बघत ह्या नेढ्यात येऊन अंगावर वारे घेत बसायचे. इथून पलीकडे उतरून गावात जायला वाट आहे. पण त्यासाठी साधारण 10 फुटाचा कातळटप्पा उतरावा लागतो. ह्यासाठी चांगल्या प्रतीचे (म्हणजे महागातले नव्हे) बूट आणि आत्मविश्वास असायला हवा. रोप असल्यास उत्तम.



गावात परत आलो तेव्हा 11 वाजत आले होते, त्यातून गावकऱ्यांचा चहाचा आग्रह मोडवेना. मग त्यांच्याशी गप्पा मारत अजून वेळ गेला. पण त्यांच्या त्या आपुलकीने मूड अजून फ्रेश होतो. आम्ही अपरात्री अचानक प्रकटतो काय, कोणाच्याही दारावर टकटक न करता तंबू टाकून झोपतो काय, सकाळीही कोणाला त्रास नाही, आवाज, आरडा-ओरडा नाही, रात्री राहिलो तरी कुठे कचरा नाही ह्याचे त्यांना अप्रूप होते.

Tuesday, July 31, 2018

रायगडच्या प्रभावळीतले किल्ले - पन्हळघर, भोपाळगड आणि सोनगड

सध्या जरा दुर्लक्षित किंवा अल्पपरिचित किल्ले यांचीच भटकंती करायची हे जणू काही ठरून गेले होते. एक तर लोकप्रसिद्ध, भरपूर अवशेष उपलब्ध असलेले किल्ले हे ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांसाठी हक्काचे ठिकाण. व्यावसायिक ट्रेक ग्रुप यांचे माहेरघर. त्यातून पावसाळा. म्हणजे हवश्या-नवश्या लोकांसाठी पर्वणी. त्यामुळे गर्दी नसलेली ठिकाणे शोधून काढणे, त्या अनवट वाटांमधून भटकणे आणि त्यात लपून बसलेले अवशेष शोधून काढणे ह्यातला आनंद वेगळाच. विनीतने ह्याच मोहात पडून असेच ३ किल्ले फिरायचे ठरवले होते, “पन्हळेदुर्ग उर्फ पन्हळघर”, “दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड” आणि “सोनगड”.
हे किल्ले रायगडच्या प्रभावळीत येतात. दुर्गदुर्गेश्वर रायगड याच किल्ल्याला राजधानीचा मान देण्यामागे ह्या किल्ल्याच्या शेजारची भौगोलिक स्थिती हे महत्वाचे कारण होते. प्रभावळ म्हणजे मुख्य किल्ल्याच्या संरक्षणाच्या बळकटीच्या दृष्टीने बांधलेल्या उपदुर्गांचा विळखा. त्या किल्ल्याच्या कोणत्याही बाजूने हल्ला करायचा म्हटला तरी प्रभावळीतले किल्ले पहिले उभे ठाकतात. प्रभावळीतल्या ह्या पाहरेकऱ्यांचा उपयोग टेहळणीसाठीही होतो. रायगडाच्या प्रभावळीत साधारणपणे ८ किल्ले येतात. मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, कावळा, मंगळगड, चांभारगड, सोनगड, पन्हळघर.
मी नांवं न ऐकताच येणार हे सांगून टाकलेले होते. बरोबर कौस्तुभ, प्रसाद आणि नेहा होते. विनीतच्या Tiago ला ह्यावेळी विश्रांती देऊन आमच्या सोबतीला आली होती कौस्तुभची Skoda Laura. २९ जुलै, रविवारी सकाळी ५:३० ला आमच्या भटकंतीला सुरुवात केली आणि ताम्हिणी घाटाने Skoda चे suspension तपासून घेतलेन. माणगावपर्यंत कशीबशी कळ काढली आणि मिसळ, पोहे, इडली, वडापाव हाणले. पहिले ठिकाण होते रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील छोटेखानी पन्हळघर किल्ला.

किल्ले पन्हळघर

अवशेष - किल्ले पन्हळघर

पुण्याहून आल्यावर ताम्हिणी उतरून पुढे माणगावमध्ये पोचल्यावर लोणेरेच्या आधी डावीकडे रस्ता पन्हळघरला जातो. आदिवासी वाडीपर्यंत गाडी जाते. तिथून समोरच किल्ला दिसतो. पायथ्याशी वाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या २ मोठ्या टाक्या आहेत. तिथून सरळ वर जाण्यास सुरुवात करावी. गावातले लोक बकऱ्या चारण्यासाठी वर घेऊन येतात, त्यामुळे वाट चांगली मळलेली आहे. पावसाळ्यात दगडांवर शेवाळे साचलेले असल्याने पाउल टिकत नाही, जपून जावे. वर चढायला सुरुवात केल्यावर अवघ्या १० मिनिटांत वाटेच्या डाव्या बाजूला पाण्याच्या ३ टाक्यांचा समूह दिसतो. पाणी उत्तम असून पिण्यायोग्य आहे. माथ्यावर जाण्यासाठी हा टाकी-समूह डावीकडे ठेवत मळलेली वाट वर जाते. पण टाकी ओलांडूनही एक वाट सरळ माथ्यावर जाते. ह्या वाटेने गेल्यास माथ्यावरचे एक टाके दिसते. ह्यातीलाही पाणी अतिशय उत्तम आहे. दुर्ग संवर्धन उपक्रमातून ह्या टाक्यातील गाळ उपसून ठेवलेला दिसतो. उजवीकडे जवळच एक ध्वज उभारलेला दिसतो. उपलब्ध माहितीनुसार अजून एक टाके ह्या गडावर असल्याने त्याची शोधमोहीम सुरु झाली. त्या भानगडीत गडाला लागून असलेल्या डोंगरावर पण एक लहानशी चक्कर मारून झाली. परंतु नीट बघितल्यास ध्वजाजवळच्या टाक्यालाच एक जोडटाके असावे असं लक्षात आलं. गडावर एवढेच अवशेष उपलब्ध आहेत. ठरलेल्या वेळापत्रकाच्या मागे असल्याने पटापट गड उतरून, पुढच्या साध्याकडे निघालो.

दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड

दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड हा किल्ला अगदी महामार्गाला लागून आहे. लोणारे फाट्यापासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये दासगांव गाव आहे. दासगांव खिंड ओलांडल्यावर महामार्गाला लागूनच उजवीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरून वर चालत निघाल्यावर 2 मिनिटांतच शाळा लागते. गडाकडे जाणारा रस्ता शाळेच्या आवारातूनच जातो. शाळेच्या परिसराचे फाटक बंद असल्यास शाळेच्या उजवीकडून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने शाळा ओलांडता येते. पुढे उजवीकडे वर जाणारी पायवाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते. पावसाळ्यात गवत वाढलेले असल्याने वाटा नीट समजत नाहीत. जेमतेम 10-15 मिनिटं चालल्यावर पठाराच्या डावीकडून पुढे गेल्यावर 3 वाटा दिसतात. ह्यातली डावीकडची वाट पाण्याच्या टाक्याकडे जाते. समोरची वाट गडाच्या माथ्यावर जाते, तर उजवीकडची वाट वळसा घालून गडाच्या मागच्या बाजूला जाते. आधी डावीकडच्या वाटेने टाके पाहून घ्यावे. पाणी अतिशय सुंदर पिण्यायोग्य आहे. आम्ही तिथले पाणी पिऊन परत माथ्यावर जाण्यासाठी त्या तिठ्यावर आलो. समोरच्या वाटेने माथ्यावर जाताना प्रचंड झाडी लागली. त्यातून डासही खूप आहेत. गावातली गुरे इथून सारखी जात असावीत, त्याच्या खुणाही जागोजागी दिसतात. पुढे वाट जाण्यायोग्य न वाटल्याने परत फिरलो. उजवीकडच्या वाटेने गडाच्या मागच्या दिशेला निघालो. इथून उजवीकडे गडाखालच्या वाड्या, काळू नदीचे पात्र, रेल्वेचा ट्रॅक असे सुंदर दृश्य दिसते. ते आम्ही डोळ्यात आणि कॅमेरात साठवून वाटेला लागलो.

अवशेष - किल्ले भोपाळगड

इंग्रजांनाही मोहात पडणारे विहंगम दृश्य

गडमाथा न बघायला मिळाल्याने थोडा विरस झाला होताच. पण सुदैवाने एक गाववाले मामा गुरं घेऊन आलेले होते. त्यांना वर बुरुज, वाड्याचे काही अवशेष अशी माहिती विचारली. त्यांनी गडाच्या मागच्या बाजूने वर जाणारी वाट दाखवून दिलंनी आणि निघून गेले. त्या वाटेने खडा चढ चढल्यावर गडाच्या तटबंदीने आमचे स्वागत केले. वर लगेच कुणी उभारलेल्या ध्वजाचा खांब तेवढा शिल्लक आहे. ह्याच जागेवर चौथऱ्याचे काही अवशेष दिसतात. आम्ही झाडीत लपलेले आणखी काही अवशेष शोधले आणि गडाच्या शेवटच्या टोकाला गेलो. तिथे बुरुज असावा. त्याचे अवशेष बऱ्यापैकी आहेत. इथून दिसणारे दृष्य न चुकवण्यासारखे आहे. सावित्री नदी आणि काळू नदीचा संगम, त्यावरचा रेल्वेचा पूल आणि गाव. ह्या दृश्याचा मोहात पडून इंग्रज इथे वाडे बांधून राहिले होते. ह्या गडाचा वापर मुख्यत्वे जलवाहतूक, जमिनीवरची वाहतूक ह्यावर नजर ठेवण्यासाठी होत असावा. आमची गडफेरी पूर्ण झाली होती. वेळापत्रक मात्र कोलमडले होते. पायथा गाठला. पुढचे लक्ष होते सोनगड.

किल्ले सोनगड

दासगांव सोडल्यावर पुढे वहूर गाव लागते. महामार्गावरूनच डावीकडे डोंगरावर ध्वज दिसतो हाच सोनगड किल्ला. ह्याच वेळी उजवीकडे महेंद्रगड म्हणजे चांभारगड सुद्धा खुणावत असतो. आमचे लक्ष सोनगड होते आणि वेळ उरला तर हा चांभारगड. वहूर गावाच्या पुढे गंधारपाले लेणी रस्त्याला लागूनच डावीकडे दिसतात.

किल्ले सोनगडकडे - गवळीवाडी/पठारवाडीतून

सोनगडला जायला एक वाट गंधारपाले लेण्याच्या वरच्या बाजूने आहे. दुसरी वाट मोपहारे गावातून जाते असे माहिती होते. पावसामुळे झाडी प्रचंड वाढलेली होती आणि जंगल असल्याने गावातला माणूस बरोबर असावा ह्या दृष्टीने याच गावातून जायचे ठरवले. गावात पोचून चौकशी केली तर आमच्या बरोबर यायला कोणीही तयार झाले नाही. गंधारपाले जवळून कोणी येतेय का बघावे म्हणून परत फिरून लेण्याच्या आसपास आलो. एकही माणूस यायला तयार नाही म्हणून निराशा झाली. मग अजून मागे येऊन बौद्धवाडीत चौकशी केली तर तिथूनही कोणी नाही. ह्या वाडीच्या विरुद्ध दिशेला एक कच्चा रस्ता गवळीवाडीत जातो. महामार्गापासून तिथे जायला साधारण तासभर लागेल आणि तिथून किल्ला जवळ आहे असे समजले. कच्चा रस्ता न चुकणारा आहे. पाऊण तासात गवळीवाडी/पठारवाडी गाठली आणि तिथूनही कोणी माणूस मिळेना. पण उजवीकडच्या वाटेने गेल्यावर पुढची टेकडी चढून जायची आणि पुढे किल्ला दिसतो अशी माहिती मिळाली. इथे थोडी विश्रांती घेऊन वाटेत न थांबता टेकडीचा माथा गाठला. इथूनही गड दिसत नाही. झाडी दाट आहे. मग दाट झाडीत न घुसता टेकडीच्या डाव्या बाजूने निम्यात उतरून कडेने वाट काढत निघालो. गड नाही सापडला तर डोंगर फिरल्याचे समाधान मानायचे अशी मानसिक तयारी झाली होती. पण प्रबळ इच्छा आणि दीड तासाची तंगडतोड याचे फळ म्हणून किल्ला दिसला. चाल वाढली. 20 एक मिनिटात किल्ला गाठला.

अवशेष - किल्ले सोनगड

सोनगड हा जावळी जिंकल्यावर महाराजांनी चांभारगडाबरोबर जिंकला आणि हेन्री रेव्हिंगटन आणि त्याच्या सहकाऱ्यांना कैद करून सोनगडवर रावजी पंडित याच्या स्वाधीन केले. कालांतराने कैद्यांची सुटका झाली, पुरंदरच्या तहात हा गड इतर 23 किल्यांबरोबर इंग्रजांकडे गेला. पुढे पेशव्यांच्या काळात त्यांनी रायगड ताब्यात घेतल्यावर सोनगडच्या प्रदेशाचा बंदोबस्त करण्याची आज्ञा दिल्याचा उल्लेख मिळतो.
सोनगड माथ्यावर काळ्या पाषाणाची दगडी ताटभिंत आहे. त्यावर भगवा ध्वजही आहे. पूर्वेस दाट जंगल तर पश्चिमेस खोल दरी आहे. उत्तरेस गांधारी तर पश्चिमेस सावित्री नदीचे पात्र असे अप्रतिम दृश्य इथून दिसते. गडावर आजूबाजूला गवतात लपलेले जोत्याचे अनेक अवशेष दिसतात. लयाला जाण्याच्या अवस्थेत असलेल्या बुरुजाचे काही अवशेषही दिसतात. परत मागे येऊन पाषाणाची भिंत समोर ठेवल्यास डावीकडे, म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे खालच्या बाजूला कातळात कोरलेली 2 पाण्याची टाकी दिसतात. इथे जाण्यासाठी वाट बिकट असून सांभाळून जावे.
आमची गडफेरी आता पूर्ण झाली होती. साडेचार होत आले होते. चांभारगड होणारच नव्हता. दुपारचे जेवणही झालेले नव्हतेच. मग सरळ ठिय्या मारून खाऊचे बकाणे भरले. आता वाट शोधायची नव्हती. सरळ मिळेल त्या वाटेने गवळीवाडी गाठली आणि महामार्गाला लागून परतीचा प्रवास सुरु झाला. निघायला 6 वाजून गेले होते, सव्वाशे किलोमीटर पेक्षा जास्त रस्ता गाठायचा होता आणि पुढे सोमवार पूर्ण आठवडा बरोबर घेऊन आ वासून बसला होता.

Sunday, July 15, 2018

किल्ले रामदरणे

"Trek Alert" नावाचा एक प्रकार आहे. पत्र आल्यावर जसा आनंद होतो, ना तसाच आनंद असला alert आल्यावर होतो. आत्ताचा alert होता "रामदरणे" किल्ल्याचा.
"सह्याद्रीचे ट्रेकर" वगैरे म्हणवून घेणाऱ्या बहुतांशी लोकांना सुद्धा हा किल्ला माहित नसेल, तर माझ्यासारख्या भटक्याची गोष्टच सोडा. पण असलं नांव वाचून मला प्रचंड आनंद होतो. जत्रा नक्की नसणार या ठिकाणी, निवांत किल्ला पाहता येणार आणि मनसोक्त फोटो पण काढायला मिळणार. फक्त एकच मानसिक तयारी हवी. "किल्ला" म्हणून त्यावर काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. पण किल्ला नेमका कुठे दडलाय ते शोधणे आणि त्यावरचे अवशेष शोधून एकमेकांना दाखवणे ह्यात प्रचंड आनंद असतो हे अल्पपरिचित किल्ल्यांची भटकंती करणाऱ्यांना कळेल. अश्या किल्ल्यांची जागा आणि त्यावरचे अवशेष हे अश्याच प्रचंड भटकंती करणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेले असतात पण तरीही दुर्लक्षित ठिकाण म्हणून त्यावर लोकांचा राबता नसतो किंवा उलटं म्हणा, लोकांचा राबता नसतो म्हणून दुर्लक्षित! पण कोणीतरी काढलेला ढोबळ नकाशा, कोणीतरी लिहिलेली त्रोटक माहिती तर कोणी लिहिलेल्या दिशा आणि खुणा अश्या गोष्टी जमवून असले किल्ले आणि त्यावरचे अवशेष बघायला मजा येते. नाहीतर रसाळगड सारखा पायऱ्या, बुरुज, वाडा, मंदिर, पाण्याची टाकी आणि 15-16 तोफा बघून सुद्धा त्यावर फार काही नाही बघायला असं म्हणणारेही असतात.
तर असाच एक अल्पपरिचित किल्ला बघायला जाणारा trek alert आला होता. घरून परवानगीही मिळाली, पण... जागाच भरल्या होत्या!!
एक तर संपूर्ण मे आणि जून महिना संपून गेला तरी घरात "ट्रेक" शब्द उच्चारायला मी धजावत नव्हतो. एप्रिलमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्याने ते धाडस मला करताच येत नव्हते. नशीब! त्यामुळे मग रविवारी बाकीची बारीक सारीक कामं ठरवली, शनिवारी दुचाकीवरून सहकुटुंब जवळच भटकून आलो आणि संध्याकाळी विनीतचा फोन, येणारेस ना उद्या? भरलेल्या जागांपैकी कोणीतरी गळाला होता. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. रविवारची कामं कारणं शोधून बाजूला ठेवली गेली. उशिरा घरी आलो तरी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली. पहाटे पावणे 5 च्या आधीच घरातून आपल्या दुचाकीवरून निघालो.
पावणे 6 म्हणजे पावणे 6. प्रसाद, कौस्तुभ वेळेवर पोचले विनीतच्या घरी आणि त्याच्या Tiagoने 6 च्या आधीच निघालो. सातपुते काकांना घेऊन अलिबागकडे प्रस्थान केले. पालीकडे जाणाऱ्या फाट्यावर उडुपीच्या "मयुरी" मध्ये तुडुंब न्याहारी करून "मेली ठेचेवर ठेच" करत  वाटेला लागलो. पावसाळ्यात गाडीतून फिरणे ह्यात काहीच मजा नाही म्हणून गाडीत बसूनही होडीत बसल्याचा आनंद मिळवा ह्यासाठी भारत सरकारने ठिकठिकाणी रस्ता तसा बनवून ठेवलेला आहे. (मुंबईत तर पाणबुडीचा ही आनंद घेता येतो म्हणतात बा!)
तर आता भरल्या पोटी ट्रेकचे नेमके ठिकाण, रस्ता, पायथ्याचे ठिकाण अश्या प्रश्नांवर विचार करण्याइतपत शक्ती आली होती. विनीत अर्थात तयारीनिशी असणार ह्यात काहीच शंका नव्हती. पण एकाला दोन बरे म्हणून उपलब्ध माहिती वाचून काढली. रामदरणे हा किल्ला अगदीच दुर्लक्षित. त्याची माहिती फक्त Trekshitij आणि सचिन जोशी यांच्या लिखाणातून मिळाली. ह्या गडावर जाण्यासाठी खूप वाटा आहेत. वायशेत, चोरोंडे, परहूरपाडा, भाल, मूळे आणि कार्ला अश्या गावातून वाटा ह्या किल्ल्यावर जातात. हा किल्ला गावातल्या लोकांनाही तेवढा परिचित नाही, जेवढे इथल्या डोंगरावरचे "रामदरणेश्वर मंदिर" आहे. त्यामुळे ह्या मंदिराची चौकशी करावी. आम्ही परहूरपाडा गावातून जायचा निर्णय घेतला होता. तिकडे चौकशी करत करत एका दुकानात "कृष्णा" नावाचा इसम आम्हाला नेऊ शकतो आणि तो "सोगांव" इथल्या आदिवासी पाड्यात राहतो हे एका आजोबांकडून कळले. परहूरपाडा पासून तसा फार लांब नाही हे सोगांव, आणि जरासा पुढे आदिवासीपाडा. पण ह्या पाड्यापर्यंत गाडी काही जात नाही. थोडी आधीच गाडी थांबवून त्या पाड्यात शिरलो. स्वागत कुत्र्यांनी केले. तिथली माणसं आमच्याकडे ढुंकूनही बघत नव्हती आणि हाकेला ओ पण देत नव्हती. बऱ्याच प्रयत्नांनंतर कृष्णा कामावर गेलेला असून आमच्या बरोबर यायला कोणीही तयार नाही असं कळलं. सोमा कि काहीसं नांव असलेल्या दादांनी जरा दया येऊन घराच्या बाहेर येऊन आमच्याशी बोलायची कृपा केली. मगाशी जिथे चौकशी केली होती त्या दुकानात बसलेला नितीन नावाचा मुलगा हा ह्या सोमाचाच मुलगा निघाला. बऱ्याच विनवण्या केल्यानंतर सोमा येतो म्हणाला पण त्याची गावात गरज आहे म्हणून नितीन आमच्याबरोबर निघाला. पाण्याची टाकी, जुन्या वाड्याचे अवशेष ह्यातले काहीही त्यांना कोणाला माहिती आहे असे दिसत नव्हते पण रामदरणेश्वर मंदिर मात्र पक्के ठाऊक होते. जवळजवळ 11 वाजले होते. Something is better than अजिबात nothing.
त्याच्या भरावशावर निघालो. किल्लाच काय, मंदिरही नक्की कुठेसे आहे ते कळत नव्हते त्या टेकड्या आणि डोंगरांमध्ये. लहान लहान पाण्याचे ओहोळ आणि मधूनच डोकावत असेलेले हिरवे गवत त्या चढाईची जाणीव होऊ देत नव्हते. एक साधारण 15 एक मिनिटांत एक पठार लागले. उजवीकडे लांबवर समुद्रात खांदेरी, उंदेरी दिसत होते. एका बाजूला वर लांबवर असलेले डोंगराचे टोक "कनकेश्वर" अशी ओळख सांगत होतं. पण ज्याच्या शोधात होतो तो किल्ला किंवा मंदिरही नेमके कुठे दडलेय त्याचा नुसताच अंदाज मनात बांधत होतो. समोरच्या डोंगरावर सरळ न जाता नितीनने मोर्चा डावीकडे वळवलान आणि एका बेचक्यात येऊन पोचलो. वाटेत उजवीकडे एक पाण्याचे टाके आहे असे नितीन हलकेच बोलला, पण किल्ल्याशी संबंधित 3 टाक्यांपैकी ते काही असावे असे त्याच्या आवाजात जाणवत नव्हते. सारखे, पाण्याची 3 टाकी, उंच वारूळ, पडक्या वाड्याचे अवशेष असे शब्द मध्ये मध्ये टाकून नितीनच्या माहितीचा अंदाज घेत होतो पण काही आशा दिसत नव्हती. त्या बेचक्याजवळ एक ब्रेक झाला आणि परत दिशांचा अंदाज घेतला. टेकड्या, वाटा अश्या खुणा बांधल्या. बेचक्यातून समोर आलेले उंच टोक, तिथेच मंदिर आहे रामदरणेश्वराचे असे नितीनने सांगितलेन. तिथे पोचल्यावर पुढचे बघता येईल म्हणून मोर्चा मंदिराकडे वळवला.

पठार
खांदेरी-उंदेरी

जंगल आणि मंदिराकडे जाणारा रस्ता
छत्री वाऱ्यापुढे टिकत नव्हती, ती घट्ट पकडली. तिच्याच आडोश्याने कॅमेरा धरून फोटो काढत होतो. निलगिरी सारख्या जातीच्या झाडांच्या बनातून वाट काढत बेडं ओलांडून मंदिरात पोचलो. मंदिराच्या बाहेरच नंदीच्या 2 जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिर प्रशस्त आहे, आतमध्ये समोरच एक नंदी असून गाभाऱ्याच्या बाहेर डावीकडे एक गणपती आहे. पिंडीशेजारी 2 शंख ठेवलेले आहेत तर पिंडीवर अभिषेक पात्रही आहे. दररोज पूजा होत असावी.
12 वाजले होते, म्हणजे तासाभरात इथे तर पोचलो होतो. दर्शन घेऊन बाहेर पायऱ्यांवर बसून आणलेल्या खाऊवर ताव मारला. पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. पुन्हा माहिती वाचन आणि अंदाज घेणे चालू झाले. मागे एक डोंगर, त्यावर न जाता वळसा घालून आलो तिथेच किल्ला असावा असं मला वाटत होतं. नितीनला देवीचे मंदिर माहिती होते, ते ह्या रामदरणेश्वराला नमस्कार करताना बरोब्बर पाठीकडे खालच्या बाजूला येते. 5 मिनिटातच खाली उतरून त्या मंदिरात पोचलो. वाटेत एक लहानसा ओढाही लागला.

रामदरणेश्वराचे मंदिर
देवीचे हे मंदिर मात्र जीर्णोद्धार झालेले आहे. परहूरपाडा मधून एक वाट इथे येते असं नितीन म्हणाला. जुन्या मंदिरातल्या मूर्ती इथे आणून ठेवलेल्या आहेत. बाहेर ठेवलेल्या 4 मूर्ती ओळखू न येणाऱ्या आहेत तर आतमध्ये देवीची नवीन मूर्ती आहे. मंदिराचे नवीन बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. आता खुणा जमत होत्या पण दिशा लक्षात येत नव्हती. नितीनच्या तर अजूनही गडाचे काहीही अवशेष लक्षात येत नव्हते.
मंदिराच्या बरोबर समोरचा डोंगर (देवीकडे तोंड करून उभं राहिल्यावर मागचा डोंगर) चढून गेल्यावर खरं तर किल्ला दिसतो. त्या डोंगराकडे निघालो तर जवळच अजून काही मूर्ती डावीकडे ठेवलेल्या नितीनने दाखवल्यान. ह्या मूर्ती मस्त आहेत, रेखीव. ह्यात महिषासुर मर्दिनी आणि खंडोबाच्या मूर्ती सहज ओळखता येतात. अजूनही काही मूर्ती इथे आहेत. परत वाटेला लागलो आणि माथ्यावर आलो तर पलीकडे एक डोंगर दिसला. जिकडे जायचे त्या वाटेवरून काही आवाज पण ऐकू आले. किल्ला शंभर टक्के तिकडेच असणार असा अंदाज बांधला तर काही लोकं भेटलेच. हे trekshitij वालेच लोक होते जे काही ट्रेकर ना घेऊन आलेले होते.

देवीचे मंदिर
महिषासुर मर्दिनी, खंडोबा आणि इतर मूर्ती
समोरचा किल्ला आणि उतरलेला डोंगर याच्या मधल्या घळीत हे लोक भेटले आणि खुणेचे 4 फुटी वारुळही दिसले. ही घळ मानवनिर्मित असून किल्ला आणि डोंगर वेगळा करण्यासाठी निर्माण केलेली आहे असे उल्लेख आहेत. ते वारूळ दिसल्यावर वाचलेली माहिती डोळ्यासमोर आली आणि आता आम्ही नितीनला वाट आणि खुणा दाखवू लागलो. वारूळ उजवीकडे आहे. उजवीकडून त्याच्याच बाजूने जाणारी वाट 3 टाक्यांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट बुरुज आणि अवशेषांकडे जाते. आधी उजवीकडे टाकी बघायला जावे. वाट मळलेली आहे, चुकत नाही. पण वाट खचलेली आहे आणि अरुंद. पूर्वी वाट चांगली असावी पण पावसाने दरड कोसळून खूप लहान लहान दगड वाटेवर आलेले आहेत. सांभाळून गेल्यावर 10 मिनिटात गडाच्या अवशेषांचे म्हणजे टाक्याचे दर्शन होते. पहिल्या टाके, नंतर दुसरे टाके. त्यातून जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी सुंदर दगडी पन्हळ खोदलेली आहे. लगेचच पुढे तिसरे मोठे आणि 2 खांबांवर तोललेले टाके आहे. ह्या टाक्यात एका भिंतीवर गणपतीआदी देवांची चित्रे असलेल्या 2 फारश्या लावलेल्या आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. इथूनच एक वाट खाली वायशेत गावाकडे जात असावी.

पाण्याचे टाके १

पाण्याचे टाके २ आणि पन्हळ

पाण्याचे टाके ३
बुरुज आणि उर्वरित अवशेष बघण्यासाठी वारुळाकडे परत यायचे आणि सरळ उजवीकडे वरच्या बाजूला जायचे. (आता डावीकडे असलेली वाट म्हणजे जिकडून आलो तिकडे परत जाणारी वाट.) झाडी दाट आहे, झाडांच्या फांद्यापासून झालेल्या कमानीतूनही जावे लागते. इकडे चावऱ्या उपद्रवी माशा आणि डास खूप आहेत. कदाचित पावसामुळे असाव्यात. ही वाट गोलाकार बुरुजावर घेऊन जाते. वाट बुरुजवरच जाते तर पलीकडे दगडाने बांधीव भिंत दिसते. हा आणखी एक बुरुज असावा. आणि ह्या 2 बुरुजांच्या मधून मूळ वाट वर येत असावी. इथे पायऱ्यासदृश काही दगडही दिसतात. बुरुज डावीकडे ठेवत वाट सरळ वरती माथ्यावर घेऊन जाते. इथे डावीकडे एक टोक जाते त्या बाजूला वाटेवरच काही अवशेष दिसतात, हे वाड्याचे जोते असावे. पुढच्या टोकावर काही नाही. इथे गडाचे अवशेष बघून पूर्ण होतात. इथून कनकेश्वर, सागरगड दिसतात तर पाऊस आणि धुके ह्यामुळे आणखी काही स्पष्ट दिसू शकले नाही.
आता 2 वाजून गेले होते, म्हणजे पायथ्या पासून निघून 3 तास झाले होते. पण गड आणि अवशेष सापडल्याचे समाधान होते. पाऊस जराचीही उसंत घेत नव्हता.

बुरुज आणि अवशेष

परत फिरलो. नितीनला आता पुढे येणाऱ्यांना इथे घेऊन हेच अवशेष दाखव म्हणून सांगितले. परत वारूळ, मुर्त्या आणि देवीचे मंदिर इथे येऊन पोचलो. वाटेत काही खाऊ आणि चिवड्याचे बकाणे भरले. आता मात्र रामदरणेश्वराला खालूनच नमस्कार करून वर न चढता तो डोंगर डाव्या बाजूला ठेवत उजवीकडच्या वाटेने त्याला वळसा मारून परत पठारावर आलो. वाटा मात्र भरपूर असल्याने नेमकी वाट सापडणे कठीण जाते. माहितगार किंवा गावातला माणूस बरोबर असणे उत्तम. ससे पकडण्यासाठी लावलेले सापळेही दिसत होते. हिरवागार गालिचा अमच्यासाठीच पसरलेला होता. फोटो काढायचा मोह काही आवरला नाही. पटापट खाली आलो. पाऊसही तसा कमी झाला होता. साडे 3 झाले होते. ओले कपडे बदलून परतीच्या प्रवासाला लागलो. आमचं जेवण तसं झालेलं नव्हतंच. वाटेत गरम पोळ्या, भाजी पुलाव वगैरेंवर ताव मारला आणि परत एकदा ठेचेवर ठेच करत express highwayला लागलो आणि 10-10:15 ला घरी पोचलो.

परतीच्या वाटेवर - हिरवागार गालीचा


लहानगे ओहोळ
घरातून निघून पूर्ण किल्ला बघून परत घरी येईपर्यंत पावसाने काही पाठ सोडलीन नव्हती. 4 दिवसांपूर्वी ज्या किल्ल्याचे नावंही माहिती नव्हते तो किल्ला पूर्ण बघून झाला होता.

Wednesday, March 14, 2018

रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड - II

महिपतगड
थोडासा फराळ केला आणि एक वाजायच्या आधीच महिपतगडकडे वाटचाल चालू केली. सिताराम जाधव यांच्या घराच्या मागच्या बाजूने ही वाट वरती महिपतगडाकडे जाते. वाटेतच 5 मिनिटांवरच एक विहीर आहे. ह्या विहीरीचे पाणी हे सर्व लोक पिण्यासाठी वापरतात. वाडी-बेलदार गावात ५-७ घरं मिळून सुमारे १८-२० लोकच राहतात. बहुतेकांची मुलेबाळे शिक्षणासाठी-नोकरीनिमित्त मुंबईत आहेत. या विहिरीतले पाणी अत्यंत सुंदर आहे. सीताराम काकांच्या बोलण्यातून विहिरीचे कौतुक लपत नव्हते. त्यांनी खास काढणे आणि Can आणला होता पाण्यासाठी. आम्ही आपापल्या बाटल्यात पाणी भरून घेतले आणि विहीर उजवीकडे ठेवत डाव्या बाजूच्या वाटेने वर निघालो. येथून वळून पाहिले तर सुमारगड स्पष्ट दिसतो. ही वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही, मळलेली आहे. डावीकडेच काही अंतरावर एक बुरुज स्पष्ट दिसतो हा बुरुज आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत असतो पण तरीही हा बुरुज डावीकडे ठेवत आपण पुढे गेल्यावर समोरच एक बांधकाम दिसते आणि त्यातले एकही भोकही. इथे परत इतरांची वाट बघत थांबलो. सर्वांना येऊ दिले. इथे यायला जेमतेम ३० मिनिटे पुरतात. हे बांधकाम म्हणजे खेड/गायमुख दरवाजा. त्याच्या मागून वाटेने पुढे गेल्यावर अजून एक मोठी बांधीव विहीर आहे. या विहिरीला पंप लावून पाणी गावात यायची सोय केली आहे. 

खेड/गायमुख दरवाजा
विहिरीच्या डावीकडून वाट पारेश्वर मंदिराकडे जाते. तिकडे आधी न जाता ही विहीर समोर ठेवत उजवीकडे जावे. इथून गडाचे अवशेष दिसायला सुरू होतात. आमच्याबरोबर वाटाड्या असल्यामुळेच हे अवशेष शोधायला त्रास पडला नाही. गडावर पूर्णपणे जंगल पसरलेले असल्यामुळे वाटाड्या सोबत असणे गरजेचे ठरते नाहीतर खूप वेळ जाईल. जंगल घनदाट आहे समोरच जोत्यावर एक मंदिर आहे ज्यावर हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती ठेवली आहे. ह्या मूर्ती पश्चिममुखी आहेत. या मूर्तीजवळ आम्ही आरती केली. परत मागे फिरून आम्ही उजव्या बाजूला दिसत असलेल्या अवशेषांकडे गेलो इथे तीन मोठे चौथरे दिसतात. जागोजागी मुंग्यांचे वारूळही आहेत. थोडे डावीकडे घेऊन गेल्यावर 1 पीराचे ठिकाण दिसते. हे अतिशय सुंदर दगडी बांधकाम आहे. 

पश्चिमाभिमुख मारुती आणि गणपती
पीराचे ठिकाण - सुंदर बांधकाम
ही वाट अशीच घनदाट जंगलातून पुन्हा मोकळ्या जागेत जाते तिथे होळीचा माळ आहे. तिथेही काही अवशेष शिल्लक आहेत. तिथून पुढे गेल्यावर वाटेत पूर्वाभिमुख हनुमानाची मूर्ती आहे तर शंकराची पिंडही आहे. आमच्या वाटाड्यानी मात्र ती आम्हाला दाखवलनी नाही. पुढे वाट उत्तरेकडे असलेल्या कोतवाल दरवाजाकडे जाते. त्याचेही काही अवशेष शिल्लक नाहीत. पूर्वेला पुसाटी दरवाजा आहे असे उल्लेख आहेत. समोर महाबळेश्वर दिसते. शेजारीच भीमाची काठी, मधु-मकरंदगड, पर्वत, चकदेव तर खालच्या बाजूला उजवीकडे वडगाव दिसते. समोर डावीकडे प्रतापगड असावा. उजवीकडून पुढे गेल्यावर समोरच सुमारगड दिसतो. इथून वाट खाली वडगावमध्ये उतरते. इथून खालच्या बाजूला आग्नेयेस यशवंतदिंडी दरवाजा आणि २ बुरुज आहेत. तिथे न वापरलेल्या चुन्याचे काही अवशेषही आहेत. तिकडे खालच्या बाजूला न जाता वरतीच एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही मागे फिरलो. 

ग्रुप फोटो
आता आमचे ठिकाण होते पारेश्वर मंदिर. या मंदिराजवळ लहान-मोठे बरेच अवशेष शिल्लक आहेत एक चौथरा आहे. मंदिराच्या जवळच डावीकडे काही अवशेष आहेत मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे मंदिरात बऱ्याच छोट्या छोट्या मूर्ती असून पारेश्वराची  शंकराची पिंड आहे तसेच त्रिशूळ घेतलेली एक मूर्तीही आहे. पिंडीसमोर नंदीची मुर्तीही आहे. समोरच तुळशीवृंदावन असून त्याच्या शेजारी तोफेचा गोळा ही ठेवलेला आहे. मंदिराला उजवीकडे ठेवत डावीकडून एका चौथऱ्याला वळसा मारून परतीच्या वाटेवर पुन्हा काही अवशेष बघायला मिळतात. हे अवशेष सगळे गवतात दडून बसलेले आहेत. डावीकडे ती मोठी विहीर ठेवत उजवीकडे वाट जाते. तिथे गडाची माहिती वाचन झाले. वाट पुढे उजवीकडे जाऊन एका दरवाजाकडे जाते. (शिवगंगा दरवाजा?) इथे पुन्हा शंकराची पिंड-नंदी आहे. एक-दोन तोफगोळे शिल्लक आहेत. थोडी साफसफाई केली, उजव्या बाजूला एक कोरडा पडत चाललेला पाण्याचा साठा आहे. समोरच दहिवलीतून येणारी वाट दिसते. इथे शिवगंगा दरवाजाचे अवशेष असावेत. डावीकडच्या वाटेने गेल्यावर आपण त्या बुरुजावर जातो जो आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत होता. इथून आपल्याला गाव स्पष्ट दिसते. उजवीकडे दहिवलीतून वर आलेली वाट शिवगंगा दरवाजाकडे गेलेली दिसते. मागे फिरून पुन्हा उजव्या बाजूला आपण वर येताना आलेल्या वाटेने परत जायचे. साडे चार वाजेपर्यंतच आम्ही खाली परत आलो. 
शंकराची पिंड-नंदी. एक-दोन तोफगोळे
किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा. एक तर त्याचे फारच कमी अवशेष शिल्लक आहेत आणि जे आहेत त्यातलेही सगळे बघायला मिळाले नाही. आता गावात न थांबता जेवून रसाळवाडीला जायचे होते. सव्वा सहाच्या दरम्यान जेवण आमच्या समोर आले. फारशी भूक अशी लागली नव्हती. एक तर ऊन तापत होते आणि ही तशी ही जेवायची वेळही नव्हती. पण जेवायला बसलो. गरम-गरम तांदळाची भाकरी, बटाटा रस्सा, भात आणि मुगाची आमटी. नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी खाल्ली गेली. 
रसाळगड
काल रात्री तो घाट चढून आलो होतो त्यावेळी अंधार होता. उतरण्यासाठी सातच्या आधीच तिथून निघालो. आता सगळ्यांनी तो घाट बघितला. रसाळवाडी शोधत निघालो रसाळवाडीचा हा फाटा डावीकडे आहे. तिथून साधारण पाच-सात किलोमीटरवर वाडी आहे. इथेही डांबरी रस्ता असला तरी धाकधूक होतीच. पुन्हा डांबरी रस्ता संपला, कच्चा रस्ता सुरू झाला आणि आम्ही चार जण उतरून पुढे रस्ता बघायला गेलो. ८ वाजून गेले असतील, अंधार पडल्याने काहीच समजत नव्हते. खालच्या बाजूला वाडीत घरं दिसली. आमच्या डोक्यावरचा टॉर्च त्यांना दिसल्यावर खालनं आवाज आले. थोडी चौकशी केली तर साधारण डांबरी रस्ता जिथे संपतो तिथेच आसपास पायर्‍या असाव्यात अशी शक्यता वाटली. तशीही पुढे गाडी नेण्यासारखी जागा नव्हतीच. सरळ मी आणि नितीन असे दोघेजण पायर्‍या शोधात निघालो. पायवाट संपल्यावर पुढे टाकी आणि बांधीव पायर्‍या दिसल्या. आता सगळ्यांना बोलावण्यास काहीच हरकत नव्हती पण खात्री करून घेण्यासाठी तसेच पुढे निघालो. 

मिशीवाला हनुमान
साधारण साडेआठ झाले होतेच. पायऱ्या चढून पुढे गेलो आणि एक दरवाजा लागला. दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर काही पायर्‍यानंतर समोरच एक हनुमानाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या हनुमानाला असलेली मिशी! उजवीकडून वळसा मारून वर गेल्यावर अजून एक दरवाजा लागतो या दरवाजाला सुंदर कमान आहे. पायऱ्या तशाच पुढे जातात. वाटेत डावीकडे चुन्याचा घाणा दिसतो. हा भाग पुरातत्त्व खात्याने बांधून काढलेला आहे. अजून एक दरवाजा लागला की हा मार्ग संपतो. लगेच डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशी तोफ ठेवलेली आहे. समोर पायवाटेने गेल्यावर आम्हाला बॅटरीच्या प्रकाशात ते झोलाई देवीचे मंदिर दिसले. मंदिरा जवळ पोचलो. मागून मुकुंद जाधवसरही आलेच. बाकीच्या मंडळींना बोलावण्याआधी अजून काही खात्री करुन घ्यावी म्हणून मंदिराच्या पलीकडचे पाण्याचे टाके बघून ठेवले. पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिरात विजेची सोय आहे, पंखे आहेत. मंदिरासमोरच दिपमाळ आहे, त्याच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे, एक लहान तोफही ठेवलेली आहे. जवळ एक चूल मांडलेली दिसते. जवळच लाकडे आहेत. दीपमाळे जवळच तुळशीवृंदावन आणि एक तोफ ठेवलेली आहे. तसंच मंदिराच्या कठड्यावर अजून एक तोफ ठेवलेली आहे. मंदिर झोलाई देवीचे असले तरी अजूनही देव त्यात आहेत. मंदिराच्या आतमध्ये जमवलेल्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. शिवाजी महाराजांची वस्त्र नेसवलेली मुर्तीही आहे. आता मात्र परत सगळे जण खाली गेलो. तिथे कोणाला काहीच माहिती नव्हते. इथेच गड, मंदिर, पाणी सगळे सापडल्याचा सगळ्यांना दिलासा दिला आणि जिथे डांबरी रस्ता संपतो तिथे गाडी लावण्यास सांगितले. सगळे सामान घेऊन परतलो. जेवण झालेलेच होते, आता फक्त झोपायचे बाकी होते. सकाळी पोहे करण्यासाठी लाकडे शोधून ठेवली. सगळ्यांचीच इच्छा झाल्यामुळे चहा झाला. साडेदहा वाजता आम्ही झोपलो. काही जण मंदिराच्या बाहेर झोपले तर काहीजण आतमध्ये. 

डोंगराआडून वर येताना सूर्यनारायण
मला ५च्या आधीच जाग आली पण काही चुळबूळ दिसेना, म्हणून वाट बघत तसाच पडून राहीलो. पाच वाजता एक-दोन आवाज आल्यावर लगेच उठलो आणि आवराआवर केली. ती “ठराविक” बाटली घेऊन कामाला गेलो. कालच जागा बघुन ठेवली होती. काम उरकून परत आलो तोपर्यंत अजून काही सुरवंट डोक्यावर लाईट आणि हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन जात होते तर काही फुलपाखर होऊन परत येत होते. पटापट पुढच्या कामाला लागलो. सगळ्यांचं आटपेपर्यंत आम्ही आम्ही चार-पाच जणांनी पोहे बनवले. चहा ठेवला गेला. भरपूर पोहे खाऊन घेतले, चहा घेतला तोपर्यंत सूर्याने डोके वर काढले होते. सूर्योदयाचे कितीतरी फोटो जमा झाले असले तरी कित्येक वेळा तो मोह आवरत नाही तसाच डोंगराआडून वर येताना त्या सूर्यनारायणाचा फोटो घेतला. मंदिरातल्या शिवाजी महाराजांनाही किरणांनी न्हाऊ घालण्याचा त्या सूर्यनारायणाला मोह आवरला नसावा. मला त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. तो घेतला आणि सगळ्यांनी बॅगा भरून गड बघण्यासाठी कूच केली. 
झोलाई देवी मंदिर, दीपमाळ आणि ग्रुप फोटो
सुर्यनारायणाने महाराजांना किरणांनी न्हाऊ घातले
मंदिराच्या डावीकडे लागुनच पाण्याचे टाके आहे, पाणी पिण्यायोग्य आहे. ह्यात एक गुहेसारखा भागही दिसतो. त्याच्याही डावीकडे वरच्या बाजूला बालेकिल्ला आहे. त्याच्या आतमध्ये न जाता उजवीकडून वळसा घालून पलीकडे गेलो. गडाची माहिती वाचन झालं. उजवीकडे खाली डांबरी रस्ता दिसत होता, गडावर येण्याची वाटही दिसत होती. डावीकडून गड फेरीला सुरुवात केल्यावर एक बुरूज आहे त्यावर ध्वज आहे. बांधकामाचे अवशेष असे बऱ्यापैकी आहेत. इथे एक तोफही आहे. एक पाण्याचा मोठा साठा आहे पण पाणी पिणे योग्य वाटत नाही. ते टाके ओलांडून पुढे गेल्यावर समोरच एक पठार लागते. त्यावर धान्याचे कोठार आहे. कोठाराच्या मागच्या बाजूने पुढे अजून एक टाके आहे त्यात पंप बसवून गावात पाण्याची सोय केलेली दिसते. इथेच कातळात लपलेले एक टाके असल्याची माहिती होती. हे टाके सहजासहजी कोणाला सापडत नाही. बरेच लोक ते माहितीच नसल्याने न बघताच परत जातात. ते बघायचे होते पण त्याचे अचूक ठिकाण माहिती नसल्याने फोनाफोनी चालू केली. एकतर मला सोडून बाकी कोणाला फार इच्छा असल्यासारखी वाटत नव्हती किंवा मला जाणवत नव्हती. त्यातून मी एकटाच त्यासाठी हट्ट करत असल्यासारखं वाटत होतं. व्यवस्थित पण पटापट बाकी अवशेष बघत एक डोळा त्या टाक्याकडे एकीकडे ठेवून होतो. पुढे एक सोंड गडाच्या शेवटच्या टोकाकडे जाते. विनीतला फोन झाला तेव्हा सोंडेवरून शेवटाकडे न जाता उजवीकडे एक वाट खाली टाक्याकडे उतरत असल्याचे त्याने सांगितलेन. प्रत्यक्षात ती वाट काही सापडत नव्हती सोंडेकडे निघालो तेव्हा उजवीकडे खालच्या बाजूला एक मंदिर दिसले शंकराची पिंड आहे समोर एक नंदी आहे तसंच काही कोरीव दगड आहेत. ते पाहून परत आल्यावर पुढे निघाले की काही सतीचे दगड ठेवलेले दिसतात. पुढे गेलं की सोंडेचे बऱ्यापैकी शेवटचे टोक दिसते. तिथूनही पुढे गडाचा काही भाग शिल्लक आहे परंतु तिथे बघण्यास काही नाही. डावीकडच्या शेवटच्या टोकावर एक ध्वज उभारलेला दिसतो. टाके न सापडल्याने थोड्याश्या निराशेने मी परत फिरलो. 

गडावरच्या तोफा
आत्तापर्यंत मी एकटाच त्या टाक्याच्या शोधात होतो आणि तो हट्ट सगळ्यांना कळला होता कदाचित काही जणांना रागही आला असेल अशी मला शक्यता वाटत होती. पण मलाही ते टाके बघायचे होते. शेवटच्या टोकावर नामजोशी काका आधीच पोचलेले होते. त्यांनाही तसे काही दिसले नव्हते. परत फिरताना डावीकडे खालच्या बाजूला एक कपार दिसली. निरखून पाहिल्यावर एक खांब दिसला आणि ते टाके असावे असे वाटले पण तिथे जाण्यास काही मार्ग नव्हता. रोप लावून जावे लागले असते. तसही जे मला शोधायचे होते त्या टाक्यापर्यंत वाट जाते हे मला माहिती होते. बराच फिरल्यावर मग परत येताना मी उरलेले सगळे अवशेष बघितले. ते कोठार, त्या समोर असलेली तोफही बघितली. तिथे एक अर्धवट तुटलेली तोफ शिल्लक आहे. उजवीकडे अजून एक पाण्याचे टाके आहे. जवळजवळ गडफेरी पूर्ण झाली होती. त्या मंदिराजवळचा बालेकिल्ला मात्र बघायचा शिल्लक होता. आता त्यात शिरलो आणि त्यावरून चालत चालत त्याचे चारही बुरुज बघितले. शेवटच्या मंदिराच्या कडील बुरुजावर 3 तोफा रचून ठेवलेल्या आहेत. एका तोफेचे तोंड बरोबर मुख्य दरवाजाकडे आहे. बांधकामाच्या मध्ये चुन्याचा घाणा आहे. सर्वजण मंदिरापर्यंत घेऊन पोहोचले होते गडफेरी पूर्ण झाली होती पण मला ती अपूर्णच वाटत होती. तोफा हे या गडाचे वैशिष्ठ्य. गडावर १६ तोफा असल्याचा उल्लेख आहे. आम्हाला त्यातल्या १५ दिसल्या होत्या.

कातळात लपलेले ४ खांबी टाके
मंदिरात पुजारी आलेला होता. कोणीतरी म्हणाले कि त्यांना माहिती असेल. लगेच त्यांना जाऊन त्या टाक्याचा पत्ता विचारला, त्याने सविस्तर सांगितले. माझ्याबरोबर राहुललाही ते टाके बघायचं होतं. मी ते शोधून दिसते का हे बघतो म्हणून परत निघालो. मागून प्रभू काकाही येत होते. नामजोशी काका आणि अजूनही एकदोन जणही येऊ लागले आता मात्र मला टेन्शन आलं. एकतर मी एकट्यानेच या टाक्याचा मार्ग ऐकला होता, तोही अर्धवट. त्यातून ते टाकं मिळेल की नाही याची खात्री नव्हती. उगाचच पोरं हट्ट करतात म्हणून वडीलधारी मंडळी चिडतील की काय एक शंका मनात होती. भीत भीतच मी आणि राहुल पुढे गेलो. सोंडेचा शेवटच होतो असे वाटले होते तिथुनच पुढे खाली उतरलो. नाही नाही म्हणत भवश्री पण तिथपर्यंत येऊन पोहोचली होती. खाली मात्र कोणीही येऊ नका म्हणून मी आणि राहुल पुढच्या वाटेकडे निघालो. पायवाट थोडी आशा दाखवत होती. वाट उजवीकडे खाली उतरत होती. आम्ही उतरलो, वाट अतिशय घसार्‍याची आहे. या वाटेवरच खाली गेलो आणि उजवीकडे खड्डा दिसला. आशा निर्माण झाली आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. तिथे एक तोफ ठेवलेली आहे आणि चार खांब असलेलं अतिशय सुंदर टाकं आहे. अतिशय आनंदाने सगळ्यांना ते टाकं सापडल्याचं सांगितलं. काही फोटो काढले. तोपर्यंत मालुसरे सर आणि प्रभू सर येऊन पोहोचले. त्यांच्याबरोबर नितीनही होता. तोफ अगदीच कडेला असल्यामुळे आम्ही ती टाक्याजवळ उचलुन ठेवली. टाक्यावर बरच गवत वाढलेलं होतं. तेही साफ केलं. गड फिरल्याचं समाधान मिळालं होतं. परत मंदिराजवळ आलो. सामान आवरलं आणि दहाच्या आतच परतीच्या प्रवासाला लागलो रसाळवाडी फाटा, भरणा नाका, खेड, महाड करत माणगावला पोचलो. पुढे थोडे खाणे झाले. मग मात्र कुठेही थांबा न घेता सरळ पुन्हा हिंजवडी-चिंचवड असं करत स्वारगेटला येउन पोहोचलो. साडेसहा वाजेपर्यंत चक्क मी घरात होतो. माझ्याच जिल्ह्यात असूनसुद्धा मला अपरिचित असे तीन किल्ले बघुन झाले होते.

रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड - I


सुमारगड

काही गडांची नावं कायम एकत्रच घेतली जातात. अलंग-मदन-कुलंग, साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा तसंच हेही, रसाळ-सुमार-महिपतगड. हे नाव ऐकून एखाद दोन वर्ष झाली असतील तेव्हा जमले नाही, तेव्हापासून योगही आला नव्हता. गेल्या महिन्यात एका भटक्यांच्या भेटीत तिथे जायचं वगैरे बोलणही झालं होतं पण तसं काही नियोजन झाले नाही. कर्मधर्मसंयोगाने एका व्हाट्सअप ग्रुप वर 1 pdf  मिळाली. “Pune Venturers” नावाच्या ग्रुपचा प्लॅन  होता 10-11 मार्चला. आता दोन गोष्टी समोर आल्या. एक तर त्यात कोणीच ओळखीचे नव्हते, माझ्यासाठी पूर्ण ग्रुपच नवीन होता आणि दुसरे म्हणजे घरून परवानगी. एक तर हा ट्रेक करायचाच होता. त्यामुळे ओळखी-अनोळखी हा प्रश्न निकालात निघाला. पण महत्त्वाचं होतं घरून परवानगी. ती पण नशिबाने मिळाली. लगेचच confirmation कळवले. शेवटची एकच सीट शिल्लक होती माझ्या नशिबाने. होळीला मला घरी जायचे असल्याने आगाऊ रक्कमही त्यांना देणं शक्य नव्हतं. Online transfer option  त्यांच्याकडे नव्हता, पण त्यांनी विश्वासावर माझी जागा नक्की करून ठेवलंनी. दोन दिवस पाठीवरच वागवावं लागणार या हिशोबाने सामान बांधले. शुक्रवारी रात्री सव्वानऊला सारसबाग जवळून गाडीत बसलो. गाडीत माझ्याबरोबर अजून दोन-चार जण होते, अजून तरी  मी कोणालाच ओळखत नव्हतो. सगळे माझ्यापेक्षा बर्‍यापैकी मोठे लोक होते, वयाने आणि अनुभवाने पण. मग एकमेकांना गोळा करत गाडी university road, चिंचवड असं करत हिंजवडीतून ताम्हिणीला लागली. झोपेचा लपंडाव चालू होता. माणगांव-महाड-पोलादपूर सोडून कशेडी घाट उतरला आणि खेडला आलो. रत्नागिरी जिल्ह्यात यायला मिळण्याचा हा सलग दुसरा विकांत. पूर्ण काळोखी रात्र असल्याने रस्ता फारच भयाण वाटत होता त्यात डांबरी रस्ता संपला आणि कच्चा मातीचा रस्ता चालू झाला. डोंगर पोखरूनच ह्या नवीन रस्त्याचे काम चालू असल्याने खाली फक्त लाल माती. एका बाजूला कडा, तर दुसऱ्या बाजूला दरी. रस्त्याला पाट्या नाहीतच. बाजूला पट्ट्या मारलेल्या नाहीत. कडेला गेले तर गच्छंतीच. मस्त घाट बांधून काढत होते. कच्चा रस्ता सुरु व्हायच्या आधी पाट्या लागल्या होत्या, त्यातून रस्त्याला फाटा असा नव्हताच त्यामुळे हा रस्ता सरळ नक्कीच वाडी-बेलदार या गावात जातो हे खात्रीशीर होते. फक्त रस्ता जाण्यायोग्य वाटत नव्हता. आमच्या ग्रुपमधले एक-दोन जण त्यांच्या खाजगी नॅनो गाडीने रात्रीच तिथे पोहोचले असल्याने गाडी तिथपर्यंत जाते हे माहिती होते. किंबहुना त्या भरवशावरच निघालो होतो. वाटेत बोर्ड नव्हतेच आणि मध्यरात्र उलटून गेलेली असल्यामुळे माणसेही दिसत नव्हती (तशीही इथे दिवसाही दिसण्याची शक्यता कमीच!) कोणाला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. मोबाईलवरचा google map आणि काल गेलेली नॅनो गाडी यांच्या भरवशावर चाललो होतो. काही किलोमीटर झाले असतील आणि शंका यायला लागली. एक तर त्या रस्त्याने नॅनो गाडी वर चढू शकेल अशी शक्यता वाटत नव्हती. ड्रायव्हरही मनातून थोडा घाबरलेला समजत होता. पूर्ण यू-टर्न असणारी वळणं, मध्येच खडा चढाव, दरी अशातून ते गाव सापडत नव्हतं. एक तर गाडी वळवायला जागाही दिसत नव्हती. आमची १७ सीटर बर्‍यापैकी मोठी बस असल्यामुळे तिला जागाही जास्ती लागणार होती. अखेरीस एका ठिकाणी गाडी उभी असलेली दिसली, नॅनो नव्हती ही. पण रस्ता संपला होता. पुढे सरळ शेतच होतं.

वाडी-बेलदारला येणारा वळणावळणाचा कच्चा रस्ता

गाईड सीताराम जाधव

आम्ही चार जण उतरलो आणि शेजारी असलेल्या घरात गेलो. तिथे गेल्यावर आमचे आधीचे आलेले दोन जण ओसरीवर झोपलेले दिसले. जीवात जीव आला. तिथे सीताराम जाधव भेटणार होते. शेजारच्या घरातून एक व्यक्ती आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सीताराम जाधवना उठवलं. आता सगळे लोकं आपले सामान घेऊन त्या अंगणात येऊन बसले. झोपण्याला काही अर्थच नव्हता. सरळ आवरायला घेतलं. तोंड धुतलं. ग्रुपच्या लीडर लोकांनी घरातून आणलेला शिधा घेऊन उपमा करण्यास सुरुवात केली. आम्ही आपापली सकाळची कामे आटपून त्यांच्या मदतीला गेलो. चुलीवरच चहा ठेवला गेला. सगळ्यांनी चहा घेतला आणि साडेसहा वाजता सुमारगडाकडे वाटचाल चालू केली. तोपर्यंत माहितीच नव्हते की नक्की पहिल्यांदी कुठे जायचे आहे. शक्यतो हा ट्रेक  रसाळगडला सुरु करुन सुमार वरून महिपतगडला संपवतात. परंतु आमच्या ग्रुपचा प्लॅन वेगळा होता. आम्ही 18 जण होतो, त्यातले तीन जण पंचाहत्तरीच्या आसपासचे. पाच-सहा जण साठ-पासष्ठच्या दरम्यानचे आणि बरेचसे ३०-४० च्या दरम्यानचे होते. एकच मुलगी होती, ती चौदा वर्षाची. त्यामुळे प्लॅन थोडा वेगळा होता. सोबतीला सीताराम जाधव आमचे गाईड म्हणून असल्याने वाट शोधावी लागणार नव्हती. त्यांच्या घरातून निघून शेतं ओलांडल्यावर एक पठार लागले. डाव्या बाजूला लांबवर वाडी-बेलदार दिसत होते तर उजव्या बाजूला काल रात्री आम्ही चढून आलेला घाट. वाडी-जैतापूर हे गावही दिसत होते. वाडी-बेलदार गावातल्या लोकांना काहीही आणायचे असेल तर ह्या जैतापुरात चालत जावे लागते, अगदी बस मिळवण्यासाठी सुद्धा. त्या पठारावरून चालत गेल्यावर आम्ही जंगलात घुसलो. काही थोडक्या खुणा लक्षात ठेवत पुढे निघालो, वाटेत एका धनगराचे झाप लागले. पुढे परत जंगलच. अर्थात आम्ही काही विचार न करता फक्त चालत होतो, वाट सीताराम जाधव दाखवत होते. सगळे बरोबर आहेत ना याची खात्री मध्ये मध्ये केली जात होती. साठ-पासष्टीच्या पुढचे तरुणसुद्धा जोमाने चालत होते. आता एक यु-टर्न लागला जिथे रसाळगडकडून येणारी वाट मिळत होती. गुरांना जाण्यास प्रतिबंध म्हणून वाटेत काठ्या टाकून ठेवलेल्या आहेत. ही वाट उजवीकडे रसाळगडाकडे जाते, तर डावीकडे सुमारगडाकडे. आम्ही डावीकडून वरच्या बाजूला सुमारगडाकडे चाललो. वाडी बेलदार मधून इथे यायला आम्हाला साधारण तासभर पुरला होता. आता खडा चढ चालू झाला होता. परत गुरांनी जाऊ नये यासाठी बेडं टाकलेलं दिसलं. ते ओलांडून पुढे गेलो आणि मग वळसा घेत गेलेल्या वाटेवरून सुमारगडाचे सुंदर दर्शन झाले. या जंगलात बरेचसे वन्यप्राणी आहेत त्यात बिबट्याही आहे. थोड्याच अंतरावर आम्हाला बिबट्याच्या पायाचे ठसे त्याची खात्री देऊन गेले. आमच्याबरोबर सिताराम जाधव असल्यामुळेच अर्थात ते कळले होते, नाही तर त्यावर पाय देऊन आम्ही पुढे गेलो असतो. लाल मातीत ते ठळक ठसे छान नक्षी उमटवून होते. एक छोटासा रॉक पॅच लागला. मागच्या बाजूला दृश्य फारच छान होते.

बिबट्याच्या पायाचे ठसे

समोर वाट संपली असे वाटणारा एक काळा-कभिन्न कातळकडा आला. इथे क्षणभर विश्रांती घेतल्यावर त्याच्या डावीकडून वळसा मारुन पुढे निघालो. आता धोकादायक वाट चालू झाली. एक भुयार लागले त्यात बराच कचरा होता. आतमध्ये जाण्यास काही वाव नव्हता पण ते भुयार आपण गडावर आलो आहोत अशी निशाणी ठेवून गेले. डावीकडे दरीच तर उजवीकडे कडा धरूनच पुढे पुढे जात राहायचे. वाटेत एका धोकादायक ठिकाणी एक मजबूत झाड चांगला आधार देऊन जाते किंबहुना त्या झाडामुळेच पुढे सहज जाता येते नाहीतर कदाचित दोऱ्या बांधाव्या लागल्या असत्या. आमच्याकडे दोऱ्या होत्याच गरजेला. ही वाट अतिशय खडतर आहे. पुढे उजव्या बाजूला कातळात अजून एक भुयार दिसले. हे भुयार म्हणजे पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता होता कारण आतमध्ये पाणी होतेच. घाणही बरीच होती. ती आत मध्ये राहणाऱ्या वटवाघळांनी केलेली होती. आत वटवाघळं उलटी लटकलेली दिसत होती. पुढे निघालो आणि एक कठीण अशी जागा आली. जिथे अतिशय लहान जागा होती पुढे सरकण्यासाठी. दगडाकडे तोंड करूनच अशा वाटेवरुन पुढे जायचे असते, दरीकडे कधीही तोंड करू नये. आपले वजन दगडाकडे झुकवून सरकत-सरकत पुढे जायचे. मी बारीक असल्याने मला ते सोपे गेले. काहीजणांना थोडी कसरत करावी लागली. पुढे जाऊन मग बाकीच्यांना आधार देत पुढे येण्यास मदत केली. ह्या भानगडीत मी सगळ्यात शेवटी राहिलो होतो माझ्याबरोबर राहुल होता. आता उजवीकडे आणखीन एक भुयार दिसले. हे कोरडे होते. पुन्हा मी बारीक असल्याचा फायदा घेऊन आत मध्ये घुसलो. पुढे “L” शेपमध्ये भुयार उजवीकडे वळत होते. उजवीकडे वळल्यावर मात्र पुढे पाणी दिसले, तिथे जाणे धोक्याचे होते आणि काही विशेषही बघण्यासारखे नव्हते. मागे फिरलो आणि रांगत-रांगत परत भुयाराच्या बाहेर आलो.

धोकादायक वाट

तोपर्यंत सगळी मंडळी पुढे जाऊन वरती उजवीकडे वळण घेऊन जवळजवळच गडावर पोचत होती. इथे एक प्रचंड कठीण असा रॉक पॅच आहे. पण आता एका लोखंडी शिडी लाऊन हा मार्ग सोपा केला आहे. शिडी फार पक्की नसली तरी आपले काम चोख करते. आमचे गाईड मात्र इथेच थांबले. कधीतरी ह्या शिडीवरून पडल्याने त्यांच्या मनात भीती बसली होती. इथपर्यंत खडतर वाटेवरून पायात नुसत्या स्लीपर घालून लीलया आलेले ते सोप्या शिडीला मात्र भ्यायले होते. ह्या शिडीवरून आम्ही वर आलो. पुढे वाट चिंचोळी असली तरी रेलिंग बांधलेले आहे. आता वरती डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अशी वाट आहे. खडकात सतीची शिळा ठेवली आहे. थोडं पुढे गेल्यावर अजून एक गुहा आहे, त्यात काही निरांजन वगैरे ठेवलेले दिसते पण आतमध्ये देव नाही. आता गडाची तटबंदी चालू झालेली होती.


सतीची शिळा आणि मी

गडावर पोचल्यावर वाट डावीकडे जाते तिथून सुरुवात करावी. सुरुवातीलाच समोरच दोन मोठ्या टाक्या दिसतात. टाक्यांच्या आधीच एक मंदिरासारखी रचना आहेत त्यात काही काही देव एकत्र करून ठेवलेले आहेत. तिथे शंकराची पिंड आहे, त्यातल्या साळुंका गायब आहेत. ह्या टाक्यांच्या डावीकडे गुहेत शंकराचे मंदिर आहे, त्यात अजूनही मूर्ती आहेत, बहुतेक भोलाईदेवीची मुर्तीही असावी. लगेचच पुढे टाक्यांच्या पलीकडे भुयारात दोन खांबी टाके आहे. हे पाणी पिण्यायोग्य अतिशय सुंदर आहे. पाणी पिऊन मागे असलेल्या गुहेत परत आलो. महाशिवरात्रीचा उत्सव होऊन गेल्यामुळे मंदिर सजवलेले होते. पिंडीच्या मागे काही आकृत्या रेखाटलेल्या आहेत. समया, घंटा, अभिषेकपात्रही आहे. पूजेचं सर्व साहीत्य आहे, तसंच कळशी, हंडा, ताट-वाट्या असे बरेच साहित्य आहे. डावीकडून पुढे गेल्यावर एक मंडपाचा सांगाडा उभारलेला आहे. हा उत्सवासाठी उभारलेला असावा. गडाच्या अवशेषांवरच हे बांधकाम आहे. अजून एक चौथरा इथे दिसतो. समोरच एक कोठार असावे, तेथेही भुयारात एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे वरच्या बाजूला एक चौथरा आणि त्यावर ध्वज दिसतो. आधी तिथे न जाता जवळचे अवशेष बघून घ्यावेत. याच परिसरात आणखी एक टाके आहे त्यातही पाणी पिणे योग्य दिसले. पालापाचोळा बऱ्यापैकी त्यात असला तरी पाणी स्वच्छ दिसत होते. डावीकडून आपली गडफेरी चालू ठेवावी. पुढे अजून एक चौथरा आहे त्याला वळसा मारल्यावर उजवीकडे पाण्याचे एक खांबी टाके आहे. पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. वळसा मारून वर गेल्यावर गडाचे सर्वोच्च टोक लागते. अवशेष अजून काहीही नाहीत. इथून आपल्याला खालच्या बाजूला पाण्याची टाकी मंदिर वगैरे नजारा दिसतो. पलीकडे बघितल्यावर मधु-मकरंदगड दिसतात तसेच महिपतगड दिसतो.

सुमारगडावरची पाण्याची टाकी

आल्या वाटेने परत निघायचे आणि जीथं वर चढलो त्याच ठिकाणी अजून एक पाण्याचे टाके आहे तेही बघायचे. हे एक खांबी टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला दोन तीन खोल्या आहेत, पण त्यात आज जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित राहिलेला नाही. सगळे खाली उतरत असल्यामुळे मी पटकन त्यावर नजर टाकून परतीला लागलो. आल्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली सगळ्यात पुढे नामजोशी काका होते मागे वळून बघितल्यावर सुमारगड छान दिसत होता. पुन्हा रसाळगडाची वाट लागली आणि तिकडे न जाता उजवीकडच्या वाटेने निघालो. आता ऊन वाढलं होतं. रस्ता चुकण्याची शक्यता वाटत नव्हती. आमचे गाईड जरी मागे असले तरी समोरची पायवाट धरून आम्ही उतरणीला लागलो. मध्ये खूप अंतर पडल्याचे लक्षात आलं आणि आम्ही वाट बघत थांबलो. सुमारे २-३ ठिकाणी मिळून अर्धा-पाऊण तास वाट बघितली. सगळे लोक परत आले. डावीकडे ती घाटवाट ठेवत उजवीकडे दिसत असलेल्या सीताराम जाधव यांच्या घरी परत आलो होतो. सगळेच थकले होते. सुमारे साडेअकरा वाजले होते. एक-एक करत सगळे परत आले.