Saturday, January 5, 2019

विदर्भीय भटकंती – किल्ले रोहिलगड आणि असदगड उर्फ अकोल्याचा किल्ला


          मराठवाडा-विदर्भ म्हटले कि बीड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, गोंदिया... काय वाट्टेल ती नांवे आठवतात. ह्यातलं काय विदर्भात आणि काय मराठवाड्यात हेही नक्की सांगता येणार नाही एवढा माझा भूगोल. त्यामुळे विदर्भात किल्ले बघायचे नियोजन तसे मनातही आले नव्हते कधी. पण २२ ते २५ डिसेंबर अशी ४ दिवसांची सुट्टी बघून त्यात असे लांबचे नियोजन ठरले आणि २१ ला रात्री निघालो हा वेगळा प्रदेश फिरायला...

          भटकंती ठरली होती रोहिलगड, गाविलगड, जिल्पी अमनेर उर्फ हासीर किल्ला, नरनाळा, वारीचा भैरवगड, मैलगड  असे ६ गिरिदुर्ग, बाळापुर, असदगड उर्फ अकोल्याचा किल्ला, एलिचपूर उर्फ अचलपूरचा नगरकोट, खामगावचा नगरकोट असे ४ भुईकोट व सुलतान आणि गोंधणपूरची गढीची.

रोहिलगड
                         
          सुरुवात होती जालना जिल्ह्यातल्या रोहिलगडपासून. विनीत दाते, प्रसाद आणि नेहा परदेशी, भूषण नाडकर्णी, केतन मावळे आणि सोबत मी असे ६ जण दिमतीला टाटा सुमो घेऊन २१ तारखेला शुक्रवारी रात्री निघालो. रोहिलगड हा किल्ला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलगड गावाजवळच्या टेकडीवर आहे. रोहिलगड गावातून जालन्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून जवळच “फिरंगीमाता मंदिर” आहे. ह्या देवळाच्या पलीकडेच टेकडीवर हा किल्ला आहे. देवळापासून किल्ल्यावर जायला १५-२० मिनिटं पुरतात. ह्या किल्ल्याचा माथा बऱ्यापैकी सपाट असून त्याचा आकार साधारणपणे लंबुळक्या बदामाच्या आकाराचा आहे. फिरंगीमाता मंदिरापासून निघाल्यावर आपण ह्या किल्ल्याच्या बदामाच्या खालच्या टोकाला पोचतो. इथून खाली रोहिलगड गांव तर डावीकडे लागुनच एक किल्ल्याच्याच उंचीचा पण आकाराने जास्त पसरलेला "पालखा" नावाचा डोंगर दिसतो.



          इथून डाव्या हाताने कडे-कडेने चालत गेल्यास एका बाजूला तटबंदीचे काही अवशेष दिसतात तर इथेच गडाच्या मध्यभागी जमिनीच्या आतमध्ये दहा एक खांब असलेले बाहेरून लहान वाटणारे पण प्रचंड मोठे असे टाके आहे. यातील काही खांब अखंड दिसतात तर काही अगदीच तोकडे दिसतात, कारण हे टाके समोरून आतमध्ये उतरत्या छपराचे असून आतील बाजूस मातीने भरत गेलेले आहे. ह्या टाक्याच्या जवळच आणखी एक बुजत गेलेले टाके आहे. इथून पुढे गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे जुन्या वाड्याचे काही अवशेष दिसतात. मागे फिरून ध्वज असलेल्या टोकाकडे जाताना लगेचच एक फुटके दगडी रांजण दिसते. गडाच्या उजवीकडे खाली उतरल्यावर पूर्वाभिमुख असे अजून एक मोठे टाके दगडात खोदलेले आहे. हेही टाके मोठे असून ह्यात एक तुटका खांब दिसतो तर प्रवेशालाच ३ पूर्ण खांब आहेत.

गडावरील टाकी
          इथून परत वर येऊन ध्वज असलेल्या गडाच्या सर्वोच्च टोकाकडे जायचे. इथेही काही जुन्या वास्तूचे अवशेष दिसतात तर काही जुनेच दगड गावकऱ्यांनी तटबंदीसारखे रचून ठेवलेले आहेत. आता ह्याच टोकावरून गडाच्या खाली उतरायचे. सपाटीवर आल्यावर पुन्हा पायथ्याच्या मंदिराच्या दिशेने चालत जाताना डावीकडे गडाच्या डोंगरातच दक्षिणाभिमुख म्हणजे गावाच्या दिशेने तोंड करून १०-१२ खांबी गुहा खोदलेली आहे. ह्यात बरोब्बर मध्यभागी मोठा कोनाडा असून त्यात दगडाला शेंदूर फसलेला आहे. ह्या गुहेचे मूळ प्रवेशद्वार मात्र जमिनीच्या पातळीला नसून अगदी गुहेच्या तोंडाजवळ मध्यभागी खाली उतरायला जागा केलेली आहे आणि त्यातून डावीकडे वळून परत पायऱ्या चढून गुहा-मंडपात यावे अशी सोय आहे. गुहेच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा असून ती बऱ्यापैकी बुजलेली आहे. त्यात साळींदर प्राण्याचा वावर असल्याने शक्यतो आतमध्ये जाऊ नये. संपूर्ण गडावर कोणत्याही टाक्यांत पाणी नाही.

कातळकोरीव गुहा
          इथे गडफेरी पूर्ण होते. गडावर जाऊन सगळे अवशेष निवांत पाहून २ तासांत पायथ्याला पोचता येते. गडाच्या जवळ आणखी एक मोठा पसरलेला "पालखा" जोड-डोंगर असून त्यातही गुहा/लेणी आहेत. वेळ असल्यास जरूर पाहून घ्याव्यात.
          ह्या गावातले विशाल टकले आणि त्याचे काही मित्र यांनी गडावर साफसफाई केली आहे. हा गड छोटेखानी असला तरी ह्यावरची टाकी आणि गुहा मात्र अतिशय सुंदर आहेत.

असदगड
          अलोक्यात मध्यवर्ती ठिकाणी मोरणा नदीच्या काठी असदगड किंवा अकोल्याचा किल्ला आहे. हा किल्ला अकोलसिंग ह्या राजपूत राजाने अकोला ह्या शहराबरोबर बांधला असे मानले जाते. पुढे औरंगजेबाने असदखान ह्याला अकोला गाव दिल्यावर त्याच्या देखरेखीखाली ख्वाजा अब्दुल लतीफ याने त्याची 1698 ला पुनर्बांधणी केली. हा खरं तर नगरकोट असून परकोटला चार दरवाजे आहेत. दहीहंडावेस, शिवाजी किंवा बाळापूरवेस, अगरवेस आणि गजवेस या नावांनी ते ओळखले जातात. ह्यातील अगरवेस ही गोविंद अप्पाजी यांनी 1843 ला बांधली. असद, फतेह किंवा पंचबुरुज आणि अगर बुरुज ह्या तीन बुरुजांपैकी असदबुरुज हा असदगड किंवा अकोल्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो.

शहिद स्मारक
          ह्या किल्ल्याचे आता पार्क केले गेले असून थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला हिंदीत तर उजवीकडे मराठीत गडाची आणि पुनर्निर्मितीची माहिती संगमरवरी फलकावर कोरलेली आहे. प्रवेशद्वार म्हणून "आझाद पार्क" असे नांव देऊन एक कमान बांधण्यात आलेली आहे. त्यातून आतमध्ये गेल्यावर समोरच एक कारंजे दिसते, जे इतिहासकालीन असावे. ह्याच्या पलीकडे एक "शहिद स्मारक" असून त्यावर एक सिंहाचा पुतळा आहे. ह्याच्या पायथ्याशी -
शहीदोंकी चिता ओपर।
जुडे रहेंगे हर बरस मेले।।
वतनपे मरणेवालोका।
यही निशा बाकी है।।
          असा संदेश लिहिलेला आहे. 7 मे 1957 रोजी अकोला नगरपालिकेने हे शाहिद स्मारक आणि पार्क उभारले असून त्यावेळी हे लिहिण्यात आलेले आहे.

हवामहाल
          डाव्या बाजूस एक पडकी इमारत असून ह्यास हवाखाना किंवा हवामहाल म्हटले जाते. ह्याचे 6 मोठे झरोके शिल्लक असून त्यांवर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. इथे उजव्या बाजूने खाली उतरल्यास ह्या हवा महालाच्या खालच्या बाजूस असलेला बुरुज दिसतो. हा बुरुज पूर्णपणे भाजलेल्या लाल विटांनी बांधलेला असून सुस्थितीत आहे. इथूनच गडापासून थोडा दूर असा एक बुरुज/दरवाजाही दिसतो. गडाच्या कडेनेच प्रदक्षिणा घालत गेल्यास भक्कम तटबंदी दिसते तर पुढच्या बुरुजाच्या खाली चुन्याचा घाणा दिसतो. त्याचे दगडी चाक आणि 2 हौदही दिसतात. पुन्हा प्रवेश द्वाराशी येऊन उजवीकडच्या बाजूचे राहिलेले अवशेष बघून घ्यावेत.
          पार्क म्हणून जतन केल्यानेच हा भाग तरी शिल्लक राहिलेला आहे, अन्यथा अतिक्रमणामुळे इतर किल्ला झाकोळून गेलेला आहे.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

No comments:

Post a Comment