Sunday, January 6, 2019

विदर्भीय भटकंती - किल्ले बाळापुर

         आजच्या दिवसाचा दुसरा टप्पा होता अकोला जिल्ह्यातला बाळापुर किल्ला. पण त्या आधी मिर्झा राजे जयसिंग यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली (कि जसवंतसिंहाने बांधलेली?) एक छत्री पहिली.

मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली एक छत्री
         काळ्या दगडात सुंदर कलाकुसर असलेली ही छत्री आवर्जून पहावी अशी आहे. मध्यभागी एक मोठा घुमट असून बाजूला चार लहान लहान घुमट आहेत. छत्रीच्या मागच्या बाजूने डावीकडे बाळापुर किल्ला तर उजवीकडे मन नदीवर बांधलेले धरण दिसते.
         बाळापुर किल्ला हा अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील शहर नावाच्या भागात आहे. हा भुईकोट किल्ला असून किल्ल्याच्या एका बाजूने मनतर दुसर्या बाजूने म्हैस/महिषीनद्या वाहतात आणि पुढे त्यांचा संगम होतो.
         गडाच्या अगदी दरवाजापर्यंत डांबरी रस्ता जातो. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूने येणाऱ्या डांबरी रस्त्याने गेल्यास गडाची भक्कम तटबंदी दिसून येते. ही तटबंदी बघताना राजस्थानी किल्ल्यांचा भास नक्की होतो. त्याच्या उजव्या बाजूने वळसा मारून प्रवेशद्वाराकडे जाताना उजवीकडे नदीच्या काठावर एक दरवाजा दिसतो. अगदी दरवाजात पानाची टपरी असून दरवाजात भरपूर घाण आहे. मुख्य गड आणि हा दरवाजा हे आता पूर्णपणे वेगवेगळे झालेले आहेत. इथून गडाकडे जाताना डाव्या बाजूला जुन्या तटबंदीचे काही अवशेष दिसतात परंतु वाढलेली झाडी आणि लोकांनी केलेली घाण ह्यामुळे तिकडे बघवत नाही. उजवीकडेही वस्तीत गडाचे काही जुने दगड दिसतात. गडाच्या भागात शिरताना भक्कम स्थितीतील एक भक्कम दरवाजा पार करून आतमध्ये जातो. सध्या ह्या गडात तलाठी कार्यालय असल्याने गडाच्या दुसऱ्या दरवाजाच्या बाहेरच पार्किंगची सोय केलेली आहे.

गडाचा दुसरा भक्कम दरवाजा
         दगडी फरसबंदीच्या मागे असलेला हा दरवाजा अतिशय सुंदर असून शेजारची तटबंदीही उत्तम आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला मात्र सरकारी जाहिराती रंगवलेल्या आहेत. दरवाजाच्या ह्या भव्य कमानीला मोठे लाकडी दार असून त्यावरील लोखंडी पट्ट्यांना अणकुचीदार खिळे ठोकलेले आहेत. हत्तींनी डोक्याने धडक देऊ नये म्हणून असे मोठाले अणकुचीदार खिळे दरवाजाला ठोकलेले असतात, अगदी शनिवारवाड्याच्या भक्कम दरवाजातल्या खिळ्यांची आठवण हा दरवाजा बघताना नक्कीच होते. ह्या प्रचंड दाराला एक लहान दारही आहे.

नक्षीदार कमान असलेला तिसरा दरवाजा
         आतमध्ये गेल्यावर उजवीकडे तिसरा दरवाजा असून त्याचे बऱ्यापैकी बांधकाम दगडी आहे तर वरच्या बाजूना कमी जाडीच्या भाजीव विटांनी बांधकाम केलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला २-२ हत्ती कोरलेले असून डाव्या बाजूला एक घोडाही कोरलेला आहे. ह्या कमानिलाही लाकडी दार असून त्यात लहान दारही आहे. ह्या कमानीवर अप्रतिम नक्षी कोरलेली आहे. दोन्ही बाजूला फुलांच्या खवले-खवले कोरून केलेल्या फुलांच्या पाकळ्या आणि त्याचे कणसाच्या आकारातले छोटेसे मनोरे तर अतिशय सुंदर आहेत. दरवाजा समोरच्या भिंतीवर चढून ही नक्षी वेळ काढून नक्की पहावी. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर समोर सदरेची इमारत दिसते. सध्याच्या सरकारी कार्यालयाचा हा प्रवेश बनवलेला आहे.

सध्याच्या सरकारी कार्यालयाची इमारत
         दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या असून त्यावर पावसाचे पाणी आत येऊ नये यासाठी सुंदर झडपा केलेल्या आहेत. आतमध्ये गेल्यावर आजूबाजूला जुन्या इमारतीत सरकारी कार्यालये थाटलेली दिसतात. सदरेच्या इमारतीत इतिहास कालीन लाकडाची बाके सध्याचे Stamp Vendor वापरतात. ह्या इमारतीच्या पलीकडे उजवीकडे जाऊन तटबंदीवरुन फिरायला सुरुवात करायची. आम्ही प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे Clockwise फिरायला सुरुवात केली. तटबंदी सुस्थितीत असून बांधकाम चपट्या आकाराच्या भाजीव विटांचे आहे. (अवांतर: आता ह्या विटा... घरी पाडून घेतल्या आहेत, बाजारच्या नाहीत. मला फक्त बुंदी घरी पाडतात हे ठाऊक होते. असले पुलं विचार पुलंप्रेमी व्यक्तीच्या मनात आल्याखेरीज राहत नाहीत. त्यातून हा इतिहासकालीन किल्ला असल्याने इथे खरोखरच "भिंतीत चिणून मारण्यासाठी" काही सोयही केलेली असेल असा विचार नक्कीच येतो) गडाचे बुरुज तर प्रशस्त जागा असलेले भव्य असेच आहेत. तटबंदीच्या प्रशस्त अश्या फांजीवरून ह्या विटांचे सुंदर बांधकाम, जंग्या आणि चर्या पाहत तटबंदी फिरायची. तटबंदीत जुन्या मंदिरांचे दगड वापरलेले त्यावरील सुंदर नक्षीमुळे सहजपणे कळून येते. बुरुज सुस्थितीत असून गडाचा आतील भाग आणि इमारती नीटपणे न्याहाळता येतात. गडाच्या मध्यभागी उघड्यावरच एक हनुमानाची मुर्तीही आहे.

गडाचे बुरुज आणि भक्कम तटबंदी
         बाहेरच्या बाजूस डावीकडे गडापासून दूर अजून एक दरवाजा बघायला मिळतो, तसेच परकोटही (किंवा दुहेरी तटबंदीचा बाहेरचा भाग) व्यवस्थित बघता येतो. बुरुजावरुन पायऱ्यांनी खाली उतरल्यावर एक खालपासून विटांनी बांधून घेतलेली एक अतिशय सुंदर विहीर दिसते. उभ्या-आडव्या आणि तिरक्या अश्या प्रकारे विटांनी नक्षीच ह्या बांधकामात बनवलेली आहे. ह्या विहिरीला लागून एक इमारतही आहे. ह्याच इमारतीवर पाण्याचे हौदही दिसतात. पुन्हा तटबंदीवर चढून उरलेला भाग फिरताना बाहेरील बाजूस मन नदीचे पात्र आणि त्यावरचे पूल सुंदर दिसतात तसेच परकोटावरील बुरुजही दिसतात. एका बुरुजावर ध्वज तर पुढच्या बुरुजावर एक थडगे असून इथे आपली गडफेरी पूर्ण होते.

सुंदर बांधीव विहीर आणि इतर अवशेष

गडाचे इतर दरवाजे
         गडाच्या बाहेर पडल्यावर प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला अजून एक मजबूत स्थितीतील दरवाजा आणि कमान असून ह्यावरही नक्षी कोरलेली आहे. मोहल्ल्यातले लोक ह्या कमानीचा वापर बिनदिक्कतपणे मुतारी म्हणून करताना दिसतात.
         एकंदरीतच अतिशय सुंदर कलाकुसर करून केलेले हे बांधकाम सध्याच्या परिस्थितीत चुकीच्या हातात पडल्याने त्याचा अवमानच होत आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

No comments:

Post a Comment