Sunday, June 2, 2019

विदर्भीय भटकंती – किल्ले गाविलगड

गाविलगड
विदर्भाची तब्बल शंभर वर्षाची राजधानी असा मान बाळगून असलेल्या अचलपूरच्या नगरकोटानंतर आता बघायचा होता गाविलगड.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नावाच्या अत्यंत प्रसिद्ध अशा थंड हवेच्या ठिकाणी गाविलगड हा किल्ला आहे. चिखलदरा आणि गाविलगड या दोन्ही नावांची व्युत्पत्ती तशी गंमतीशीर आहे. पांडव अज्ञातवासात असतांना भिमाने किचकाचा वध या ठिकाणी करून त्याला दरीत फेकून दिले त्यामुळे याच नाव किचकदरा नाव असे पडले. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन ते चिखलदरा असे झाले. तर मूळ मातीचा हा किल्ला बाराव्या शतकात यादवांनी म्हणजेच गवळी राजांनी बांधला म्हणून त्याचे नाव गाविलगड असे असे पडले.
बाराव्या शतकातील याच्या जन्मानंतरचा इतिहास अगदी इंग्रजांपर्यंत येऊन थांबतो. मातीचा किल्ला दगडी करण्याचं काम बहामनी राजा (नववा) अहमद अली याने ई.स. १४२५ ला केले. पुढे इमादशाहीचा मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने किल्ल्याची दुरुस्ती आणि विस्तार करून ह्यावर इमादशाहीची स्थापना केली. कालांतराने हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर मुगल साम्राज्य-निजामशाही आणि परत मुघल साम्राज्य, असा त्याचा प्रवास झाला. रघुजी भोसल्यांनी जिंकून घेतलेला किल्ला निजामांनी काही काळासाठी परत ताब्यात घेतला परंतु भोसल्यांनी तो पुन्हा जिंकून आपल्याकडेच राखला. भोसल्यांनीच या किल्ल्याला भव्य असा परकोट बांधला. परत इंग्रज-भोसले असा प्रवास करून हा किल्ला इंग्रजांकडे स्थिरावला. गड जिंकलेल्या प्रत्येकाने त्याची डागडुजी आणि वाढ केली.
या गाविलगडाचे गारुड बहामनी सत्ता, इमादशाही, निजामशाही, भोसले आणि इंग्रज या सगळ्यांना पडले यावरूनच त्याचे महत्त्व लक्षात येते. हेच गारुड पुढे दुर्ग भटक्यांना न पडले तरच नवल. असा हा किल्ला पर्यटकांच्या दृष्टीने दुर्लक्षित नसला तरी उपेक्षित म्हणायला हरकत नाही. कारण प्रचंड मोठा असलेला हा किल्ला संपूर्ण बघण्यासाठी लागणारी तंगडतोड करण्याची ईच्छा/तयारी अनेकांची नसावी किंवा कदाचित कमी असलेला वेळ हेही कारण असू शकेल. आम्हाला मात्र हा किल्ला संपूर्ण बघायचा होता आणि तोही खूप कमी वेळात म्हणजे साधारण पाच तासात, कारण पुढच्या मुक्कामाला आम्हाला जायचे होते जिल्पी-अमनेर या किल्ल्याजवळच्या कोणत्याही ठिकाणी.
या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या “सिमाडोह” पर्यंतचा जवळचा रस्ता मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जात असल्याने संध्याकाळी बरोबर सहा वाजता त्याचे फाटक बंद केले जाते. तसाही जवळपास सगळाच रस्ता या मेळघाट प्रकल्पातून जात असल्याने उशीर करणे चालले नसते. या सगळ्यामुळेच आम्ही एक स्ट्रॅटेजी बनवली होती. किल्ल्याची माहिती आणि नकाशा आम्ही बाळगून होतोच. विनीत माहिती वाचून काय बघायचे ते सांगणार आणि मी नकाशा बघून ते ठिकाण कुठे असेल ते. मग सगळे मिळून ते ठिकाण शोधायचे. गड विस्ताराने प्रचंड मोठा असल्याने आणि पाहण्यासारखी खूप ठिकाणे असल्याने असे करावेच लागणार होते.
गाडी पार्किंगला लावून या मोहिमेला सुरुवात साधारण साडेबारा वाजता झाली. लांबूनच गडाची तटबंदी, दरवाजा दिसतात आणि त्याचे सौंदर्य मोहून टाकते. लांबूनच मछली दरवाजा हे गडाचे प्रवेशद्वार दिसते. या दरवाजाच्या इथे पोचायच्या आधीच उजवीकडे मछली तलाव दिसतो, तर त्याच्याच वरती दिसतो चांदणी बुरुज. मछली दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे भक्कम तटबंदी असलेल्या प्रशस्त रस्त्यावरून आपण वीरभान किंवा बुरुज-बंद नावाच्या दरवाजाकडे  पोचतो. हा दरवाजा दोन्ही बाजूंनी भक्कम बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. तिथे आतमध्ये आल्यावर दिसणारी एक मोठी वाट डावीकडे पुढल्या दरवाजाकडे जाते. परंतु उजवीकडील भाग राहून न जावा यासाठी आधी उजवीकडे जायचं. इकडे पर्यटक फारसे फिरकत नाहीत, परंतु किमान चार-पाच तरी बुरुज ह्या वाटेवर असून ही वाट पुढे मोझरी दरवाज्याकडे जाते. मछली आणि चांदणी बुरुज ओलांडल्यावर मोझरी दरवाजा लागतो. या बाजूला पाहण्यासारखे खूप  अवशेष आहेत. नीट लक्ष देऊन पाहिल्यास या वाटेत एक शिवलिंग आणि एक नाथपंथीय समाधीही दिसते. हे सर्व अवशेष परकोटाचे असून भक्कम दुहेरी तटबंदी भोसल्यांनी बांधलेली आहे. मछली बुरुजावरुन समोर खालच्या बाजूला मछली तलाव, तर समोर चिखलदरा असे अप्रतिम दृश्य दिसते.

वाटेवर ठेवलेले हत्ती आणि शरभ शिल्प
इथून पुढे जायला वाट नाही. परत मागे फिरून सरळ वीरभान दरवाजाकडे यावे लागते. आता डावीकडे जाणार्‍या रस्त्यावरून पुढे निघाल्यास जवळ शरभ व हत्तीचे शिल्प असणारे दगड आणून ठेवलेले दिसतात. या वाटेने पुढे जाताना डावीकडे तेलिया बुरुज, दर्या तलाव, तर एक बांधीव चौकीही दिसते. साधारण पंधरा ते वीस मिनिटात अप्रतिम कलाकृती असलेल्या शार्दुल नावाच्या दरवाजाजवळ आपण पोचतो.

शार्दुल दरवाजा
हा दरवाजा या गडाचा एक उत्कृष्ट दागिना आहे. आपल्या सौंदर्याने तो प्रत्येकाला तिथे नक्कीच खिळवून ठेवतो. फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने या दरवाजाची बांधणी केली. त्यासाठी त्याच्या सौंदर्यदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अत्यंत मजबूत बांधणीचा हा दरवाजा प्रशस्त असून कमानीच्या उजव्या व डाव्या बाजूला दोन कमळे कोरलेली आहेत. मध्यभागी इस्लामिक चिन्ह असलेले मोठ्या आकाराचे खजुराचे झाड आहे. हे चित्र सुबक असून कुंडी सारख्या भांड्यातून वर निमुळते होत गेलेले खोड, दोन्ही बाजूला पाने व खजुरांचे घड उत्तम चितारले आहेत. हे चित्र तंतोतंत सममितीय म्हणजेच Exactly symmetrical आहे. याच्या दोन्ही बाजूला मोठाले शरभ आहेत. इस्लामिक राज्यात असलेल्या बहुतांशी किल्ल्याच्या दरवाजावर शरभ न चुकता असतोच, परंतु या दरवाज्यावरचे शरभ-शिल्प खास असंच आहे. शरभांच्या प्रत्येक पायात प्रत्येकी एक हत्ती धरलेला असून, तोंड व शेपटीतही एक-एक हत्ती पकडलेला आहे. प्रत्येकी एक हत्ती डोक्यावरून पडतानाही दिसतो. दोन्ही शरभ-शिल्पांच्या वरच्या बाजूला “गंडभेरूंड” कोरलेले आहेत. “गंडभेरूंड” म्हणजे दोन डोके असलेला काल्पनिक गरुड पक्षी. इतरही काही किल्ल्यांवर हे चित्र आढळते, परंतु या दरवाजावर असलेले गंडभेरुंड असामान्यच आहेत. मानवी देह धारण करून असलेले हे गरुड, पंख पसरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी दोन्ही तोंडात एकेक शरभ उचललेले आहेत.

शार्दुल दरवाजावरील शिल्पे
शरभ हे इस्लामिक राजवटीचे चिन्ह असून प्रत्येकी ७-७ हत्ती उडवून लावणारे दोन शरभ इस्लामिक शक्ती दर्शवणारे म्हणून कोरलेले असणे स्वाभाविक होते, परंतु हिंदू राजवटीचे चिन्ह असणारे गंडभेरुंड आपापल्या दोन्ही तोंडातून शरभालाच पकडलेले दाखवणे हे आश्चर्यकारक आहे. परस्परविरोधी ही शिल्पे, या दरवाजाची निर्मिती करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते त्या फत्तेउल्ला इमाद उलमुल्क, यांनीच चितारलेली आहेत. त्याने दरवाजाची बांधणी करताना मुस्लिमांची चिन्हे कोरलीन, परंतु तो मूळचा हिंदू होता आणि विजयनगरच्या राज्यात चाकरीही केलेली असल्याने इस्लामिक चिन्हांबरोबरच विजयनगरच्या साम्राज्याचे चिन्हही त्याने कोरून ठेवलेन.

गडावरचे दरवाजे
हे सगळे पाहून झाल्यावर आत मध्ये जाताना दरवाजाच्या आतील बाजूस असलेला सुंदर नक्षीदार घुमट न चुकता बघायचा. आमच्याकडे वेळ मर्यादित असला तरी घाईघाईत हा दरवाजा पाहून पुढे जाण्याचा प्रमाद आमच्याकडून घडणे शक्यच नव्हते. असे करणे म्हणजे फत्तेउल्लाचा अपमान ठरला असता आणि आम्ही त्या कलाकृतीच्या  सौंदर्यालाही मुकलो असतो. निवांतपणे हा चौथा दरवाजा न्याहाळून मनोसोक्त फोटो घेऊन पुढचा पाचवा दरवाजा ओलांडून सहाव्या भक्कम दरवाजाकडे जायचे. हा “दिल्ली दरवाजा”. या दरवाजाच्या कमानीवरही दोन मोठे शरभ कोरलेले आहेत. दोन्ही बाजूला बुरुज सदृश मनोरे, प्रशस्त देवडया असा दिल्ली दरवाजा आहे.

२२ फुटी तोफ
गडाच्या ६ दरवाजांपैकी मछली-वीरभान आणि शार्दुल-दिल्ली हे दरवाजे एकमेकांना काटकोनात बांधले आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने ही एक उत्कृष्ट रचना आहे. दरवाजापलीकडे समोरच डाव्या हाताला खाम तलाव आहे, परंतु तो टप्पा परतीच्या वेळचा शेवटचा टप्पा म्हणून ठरवलेला होता. आधी तुटकी तोफ शोधायची असे दाते सरांनी सांगितल्यामुळे उजवीकडच्या वाटेने त्या तोफेच्या शोधमोहिमेत निघालो. वाटलं होतं त्यापेक्षा जास्त अंतरावर आणि चटकन दिसणारही नाही अशा ठिकाणी ही तोफ पडलेली आहे. रस्ता चुकत तर नाहीये ना असा विचार होत असतानाच की तोफ दिसल्याने मी आणि भूषणने सगळ्यांना ओरडून ती सापडल्याचे सांगितले. या गडावरची आम्ही बघितलेली ही पहिलीच तोफ. मग जवळच नगारखाना/सदर अशी एक वास्तू ही लगेच सापडली. तिथेच वरच्या बाजूला टेकडीवजा उंचवट्यावर भरभक्कम अशी साधारण २२ फुटी (कि १७.५?) तोफ आहे.

कुत्र्याच्या आकाराचा नसर्गिक बांधणीचा दगड
पुढचा टप्पा होता कुत्र्याच्या आकाराचा दगड. ऐकायला विचित्र वाटलं तरी सगळीकडे, अगदी नकाशातही याचा उल्लेख आहे. याच्याकडे जाणाऱ्या वाटेत छोटे-छोटे आणखी बुरुज आहेत. ते पाहत, नकाशा बघत हा दगड शोधत असतानाच आणखी एक तोफ दिसली. आमच्याकडे असलेल्या माहितीत या तोफेचा उल्लेख नव्हता, त्यामुळे नविनच खजिना जणू आम्ही शोधून काढला असा हुरूप आला. तसंही दुपारचे अडीच वाजले होते, भर दुपारी साडेबाराला सुरुवात करून क्षणाचीही उसंत न घेता वेड्यासारखे आम्ही किल्ला उंडगत त्यावरचे सगळे अवशेष बघायचेच म्हणून पायपीट करत होतो. त्यामुळे आमच्या यादीत आणि नकाशात आधी उल्लेख नसलेली एखादी वस्तू बघायला मिळणे हे नक्कीच सुखावह होते. काही मिनिटातच बसलेल्या कुत्र्याच्या आकाराचा नैसर्गिक बांधणीचा दगड दिसला. त्याच्या खालच्या बाजुला लांबवर असलेल्या मोझरी बुरुजाचेही दर्शन झाले.

गडाचे काही बुरुज

बेहराम बुरुजाच्या बांधणी संबंधीचा शिलालेख
पुढचे आकर्षण होते बेहराम बुरुज. याची बांधणी बेहराम नावाच्या निजामशाहीच्या एका अधिकाऱ्याने केली त्यावरूनच याचे नाव तसे पडले. कुत्र्याच्या दगडापासून डावीकडे वळून कमानींच्या तटबंदी उजव्या बाजूला धरून पुढे गेल्यावर या बुरुजाचे दर्शन होते आणि या बुरुजाला गडाची शान का म्हणतात ते वेगळे सांगायची गरज पडत नाही. वाटेत एक चोर दरवाजा ओलांडल्यावर पुढे या बुरुजाच्या बांधणी बाबतचा एक शिलालेखही दिसतो. या बुरुजाला तब्बल बारा कमानी सदृश झरोके असून प्रशस्त अशा अर्ध-गोलाकार आकारात हा बांधलेला आहे. या झरोक्यांमध्ये बसून फोटो काढून घ्यायचा मोह न झाला तरच नवल. त्यातून सुरुवात केल्यापासून इथपर्यंतच्या न थांबलेल्या पायपिटीला खंड म्हणून सगळ्यांकडचे तहानलाडू-भूकलाडू बाहेर पडले.

गडावरच्या तोफा
पण अवघ्या पाच मिनिटातच विश्रांती आटोपती घेऊन पुढच्या दोन तोफा शोधायला निघालो. बुरुजासमोरच्या टेकाडावर चढून आल्यावर लगेच या दोन अजस्त्र तोफा दिसतात, पहिली बिजली तर दुसरी साडेतेरा फुटांची कालभैरव अशी या तोफांची नावे त्यांना शोभून दिसतात. पाठीमागे झाडाझुडपात लपून गेलेले एका वाड्याचे अवशेष आजही आहेत.

तटबंदी व काही अवशेष

शेंदूर फसलेली हनुमानाची मूर्ती
एवढे सुंदर आणि मनामध्ये भरणारे अवशेष पाहून झाल्यावर सुद्धा अजून आगामी आकर्षणे संपली नव्हती. या पुढचे आकर्षण होते जामा मशीद. तटबंदीला उजवीकडे ठेवत कडेकडेने या वास्तूकडे जायचे. ही वास्तू एका टेकडीवर असल्याने आपल्याला आधीपासूनच दिसत असते, त्यामुळे ते लक्ष्य समोर ठेवून मिळेल त्या वाटेने तिकडे जायचे. वाटेत एक शेंदूर फासलेली हनुमानाची मूर्ती दिसते. या मूर्तीच्या मागेच ही लांबूनच खुणावत असलेली मशिदीची वास्तू दिसते.

जामा मशीद
आम्ही धावतच तिकडे गेलो. मुळातच उंचावर बांधलेली ही वास्तू भव्य असून याला तब्बल २१ घुमट आहेत. प्रत्येकी सात सात घुमटांच्या तीन रांगा पैकी दोन रांगा शाबूत असून एक मात्र पूर्णपणे ढासळून गेली आहे. १८ चौकोनी भक्कम अशा खांबांवर हे घुमट तोललेले आहेत. त्यामध्ये सुंदर कमानी आहेत. वास्तूच्या चारही कोपऱ्यात मनोरे असून दोनच सुस्थितीत आहेत. घुमटाच्या आतील भागात मात्र वटवाघळांनी बस्तान मांडलंनी आहे. वास्तूसमोर विस्तीर्ण प्रांगण असून तिथून संपूर्ण वास्तू फोटोत घ्यायचा मोह आवरत नाही. परंतु या वास्तूची भव्यता येथून एका फोटो साठवणे कठीणच आहे. या प्रांगणाच्या पलीकडे इमारतीत शार्दुल दरवाजाचा निर्माता फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याचे थडगे आहे.

३२ फुटी नौगज तोफ किंवा पीरफत्ते तोफ
नकाशानुसार थडग्यापलीकडे गेल्यावर गडावरचा महत्त्वाचा दागिना सापडणार होता. त्यामुळे मधूनच पलीकडे जाण्याचा विचार केला. पण या वास्तूत प्रचंड प्रमाणात वटवाघळे आहेत आणि त्यांनी या थडग्यावर घाणीचे अक्षरशः साम्राज्य जमवलंनी आहे. समाजकंटकांनी याचीही तोडफोड केलेली आहे. पलीकडे जाण्याचा मार्ग त्याच्या शेजारूनही आहे पण केवळ आळस आणि अंगात मस्ती म्हणून त्या घाणी मधूनच वर वटवाघळे घोंगावत असताना चटकन पलीकडे गेलो. तिथे मात्र वाट नक्की कोणती ते समजणं कठीण जात होते. बरसाती तलाव जवळच लागला परंतु राणी झरोका आणि पीरफत्ते  दरवाजा काही सापडेना. त्याच्याजवळच मोठा दागिना सापडणार होता. बर्‍याच वेळाने गर्द झाडीत दिसेनाशा होणाऱ्या वाटा बघून आम्ही सोनकिल्ला बुरुज आणि धामाजी तलावाच्या जवळपास पोहोचू अशी शक्यता निर्माण झाली. आम्हाला तिकडे जायचेच नव्हते कारण एक तर हे अवशेष फार लांबवर घेऊन जाणारे होते आणि त्या बाजूने परतायला वळसा पडणार होता. तिकडे गर्द झाडीत काही जनावरे नक्कीच सापडली असती (किंवा आम्ही त्यांना सापडलो असतो) कारण की या किल्ल्यावर अस्वले-सांबर इत्यादीचा वावर असल्याचे उल्लेख आहेत. भूषणला सांबर सदृष्य काहितरी असल्यासारखे वाटले आणि आम्ही मागे फिरलो. थोडा नैराश्यानेच परतीचा प्रवास सुरु करावा याची तयारी करत असतानाच तो दागिना अचानक समोर आला. तब्बल २५ पेक्षा जास्त लांबीची तोफ  समोर आली. (भगवान चिले हिची लांबी ३६ फूट लिहितात). तिथे मात्र चक्क तिच्या शेजारी झोपून फोटो काढला. हा भरभक्कम असा दागिना शोभून दिसायला गाविलगडासारखा अजस्त्र किल्लाच हवा. या तोफेला नौगज तोफ किंवा पीरफत्ते तोफ म्हणूनही ओळखले जाते.

इतर अवशेष
मन भरेपर्यंत या तोफेचे निरीक्षण केल्यावर या तोफेच्या तोंडाच्या दिशेकडे खालीच पीरफत्ते दरवाजा बघायचा. ही वाट खाली बागलिंगा गावात उतरते म्हणून हा दरवाजा बागलिंगा दरवाजा म्हणूनही ओळखला जातो. या दरवाजाची बांधणी मजबूत असून एका बाजूचा बुरुज भक्कम स्थितीत आहे तर दुसर्‍या बाजूला ढासळलेला आहे. याची बांधणी एकसारखी दिसत नाही, म्हणजेच याची वेगवेगळ्या काळात दुरुस्ती करण्यात आल्याचे स्पष्ट होते. यावर झाडी वाढली असून यामुळे बांधकामाला धोका पोहोचतो. या बुरुजातही एक लहानसा दरवाजा आहे. हा दरवाजा बुरुजावरच्या दोन मजली इमारतीत घेऊन जातो. यालाच राणीचा झरोका म्हणतात. पीरफत्ते दरवाजा कलाकुसरीने बांधलेला असून कमान अतिशय सुंदर नक्षीकामाने कोरलेली आहे. कमानीवरती दोन्ही बाजूला पक्षी (हंस?) कोरलेले  असून त्यांनी चोचीत बहुतेक साप पकडलेले दाखवले आहेत. प्रत्येक पक्षाच्या समोर एक एक कमळही कोरलेले आहे, तर कमानीवरती पर्शियन भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. या दरवाजातच आतील बाजूला एक पीराचे थडगे आहे.

गडावरचे तलाव
ह्या बाजूचे सर्व बघून झाले होते. आता मात्र सरळ मार्गाने दिल्ली दरवाज्याकडे जायचे होते. वाटेत अजुन एक कोठार लागते, त्यानंतर वाटेवरच सती तलाव, धोबी तलाव, लेंडी व देव तलाव लागतात. यावेळी काही तलाव कोरडे असले तरी इतिहासात या भव्य किल्ल्यावरच्या शिबंदीला पाणीपुरवठा करण्यात यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली असणार नक्कीच. अजूनही लहान-मोठ्या काही वास्तू/वाडे जवळपास दिसतात. काही समाध्या व वीरगळीही दिसतात.  धोबीतलावाच्या पुढे देव-तलावाजवळून सोनकिल्ला बुरुजाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर महादेवाचे मंदिरही लागते. दुर्दैवाने यात कोणतीही मूर्ती शिल्लक नाही. मंदिराच्या समोरच्या बाजूला सोनकिल्ला बुरुजाच्या दिशेने लांबवर पाहिल्यावर वीस फुटी लांबीची बिजली तोफ दिसते. या मंदिराकडे येणार्‍या पायऱ्यांचा मार्ग सुस्थितीत असून सुंदर आहे. तिथे काही तुळशीवृंदावनेही दिसतात. परत मागे फिरून देव-तलावाजवळून कडेकडेने जाणार्‍या वाटेने परतताना डावीकडे एक इमारत दिसते. ही इमारतही बर्‍यापैकी मोठी असून याची बांधणी आणि छताच्या आतील बाजूस असलेले उच्छवास लक्षात घेता हे धान्याचे कोठार पाहिजे असले पाहिजे हे स्पष्ट होते. या इमारतीच्या बरोबर समोरच घुमट असलेली छोटी मशीद आहे. या वास्तूचे सौंदर्य त्याच्या पूर्वाभिमुख अशा तलावाकाठच्या बाजूकडील तोंडासमोर गेल्याशिवाय लक्षात येत नाही. तीन कमानी असलेली ही समोरची बाजू असून छताकडचा भाग ढासळला असला, तरी शिल्लक अवशेषांच्या कलाकुसरी वरून ही वास्तू अप्रतिम असणार याची खात्री होते. दरवाजांच्या खांबावर तसेच कमानीवर कमळे कोरलेली आहेत. खांबही नक्षीदार चौकटीने सजलेले आहेत. मध्यभागी चार खांबांवर तोललेल्या या इमारतीत एक फारसी भाषेतला शिलालेखही आहे.

गडावरच्या वास्तू
येथे आपली गडफेरी पूर्ण होते. दिल्ली दरवाजा-शार्दुल-वीरभान दरवाजाने मछली दरवाजाकडे परत येताना शार्दुलपाशी पाय परत रेंगाळले. मछली दरवाजापर्यंत परत आलो तर सव्वा पाच वाजून गेले होते. आमच्या वेळापत्रकानुसार आम्ही काठोकाठ बरोबर होतो पण बाहेर जाण्याचा दरवाजा बंद करण्यात आलेला दिसत होता. चक्क कुलूप! मग दरवाजाशेजारी बाहेरून बुरुजाला टेकून ठेवलेल्या शिडीने उतरावे असा विचारही केला, पण कोणीतरी बाहेरून किल्ली म्हणून दरवाजा उघडलानी वेळेत.
बाहेर पडलो. जंगलात घुसणारे सहाला बंद होणारे ते गेट आम्ही ०५:५५ ला ओलांडले. प्रवास सुरू झाला तो दाट गर्द जंगलातून, भीती वाटावी अशा मिट्ट काळोख असलेल्या त्या गर्द झाडीने वेढलेल्या रस्त्यावरून. ठरलेल्या वेळातच सुरक्षित पलीकडे पोहोचून त्या रात्री मुक्काम केला तो जिल्पी-अमनेर किल्ल्यापासून बारा-तेरा किलोमीटर अंतरावर अलीकडे असणाऱ्या धरणी गावात. सकाळी उठून बघायचा होता तो जिल्पी-अमनेर हा महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असणारा किल्ला.


सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Saturday, January 12, 2019

विदर्भीय भटकंती - एलीचपूर उर्फ अचलपूर

               दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली ती समस्त भटक्या लोकांचे दैवत गो. नि. दांडेकर यांच्या जन्मस्थानी, अमरावतीतील परतवाडा या गावी. नेहमीप्रमाणे आजचेही नियोजन अगदी tight schedule मध्ये, म्हणजे विनीत दाते styleमध्येच होते. म्हणजे ना कमी ना जास्त वेळ. त्यातून त्याला यावेळी चिले सरांच्या पुस्तकाबरोबरच, डॉ. जयंत वडतकर सर यांचेही पुस्तक आणि फोनवरून मार्गदर्शन मिळाले होते.
               आजच्या भटकंतीत सुरुवात होती अचलपूर इथल्या नगरकोट पासून. पण त्या आधी बघायचं होतं हौजकटौरा, सुलतानाची गढी आणि कबरस्तान!
               सकाळी साडेसहा वाजता चक्क आंघोळीसकट सगळं आटपून सहाही जण तयार होतो. आम्हाला आजच्या भटकंतीचा साथीदार म्हणून ते सगळं दाखवण्यासाठी लाभला होता डॉक्टर वडतकर यांच्याबरोबर ज्याने काम केलं आहे, तो मनिष ढाकुलकर. हा माणूस आमच्यासाठी चक्क साडेसहाला त्या थंडीतही हजर झाला होता. पहिला टप्पा होता सुलतानाची गढी. परतवाडा वरून अमरावतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हरम-टलवार व अचलपुर फाटा लागतो इथून उजवीकडे अचलपूरच्या बाजूला वळायचे आणि "सापन" नदी ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलावर पोहोचायचे. इथे डावीकडे थोड्या अंतरावर दोन बुरुज असलेली ही गढी दिसते. सुलतानपुराकडे जाणाऱ्या वाटेजवळच्या पायवाटेने गढीजवळ पोचायचे. बरीच पडझड झालेली असली, तरी मोठा पश्चिमाभिमुख दरवाजा चांगला शाबूत आहे. हा दरवाजा पूर्णतः लाकडी असून त्यावर अणकुचीदार खिळेही आहेत. आतमध्ये उजवीकडे एक बुरूज आहे आणि त्यापलीकडे डावीकडे प्रचंड मोठे गोलाकार मैदान आहे. आता झाडी वाढल्याने त्यावर फिरता येत नाही. समोर आणि डावीकडे मिळून "L" आकारात तटबंदी असून त्यावर जाता येते. त्याच्या पलीकडे नदी असून, पाणी वाहत असताना तिथून दिसणारे दृष्य नक्कीच मनमोहक असेल. तटबंदीवर बाहेरच्या बाजूने डावीकडे असलेल्या बुरुजावर जाता येते आणि तिथून उजवीकडचा बुरुज सुद्धा व्यवस्थितपणे बघता येऊ शकतो. या गडाचे संपूर्ण बांधकाम भाजीव विटांचे असून अत्यंत मजबूत आहे.


               पुढचा टप्पा होता "हौजकटोरा". सुलतानाची गढी बघून त्याच रस्त्याने पुढे जावे आणि रस्ता संपल्यावर उजवीकडे वळून साळेबाद किंवा खानापूर/भिनखेडा कडे जायला डावीकडे फाटा आहे तिथे वळावे. साधारण दोन-तीन किलोमीटरवर आजूबाजूला केळीच्या बागातून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यावर डावीकडे रस्त्याला लागूनच एका तळ्यात ही अष्टकोनी इमारत उभी आहे. तळे साधारणपणे कोरडे असते. इमारत तीन मजली असून तळ्यात पूर्ण पाणी भरल्यास तळमजला पूर्णपणे पाण्यातच राहील असा आहे. कदाचित त्यामुळेच तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पायर्‍या नाहीयेत. ही इमारत म्हणजे इमादशाहीत बांधण्यात आलेली एक सुंदर कलाकृती आहे. बहुतेक ही इमारत जलक्रीडा करण्यासाठी बांधलेली असावी आणि त्यावरूनच त्यांची श्रीमंती लक्षात येते. तळमजला व पहिला मजला हे पुर्णपणे दगडी बांधकाम असून असून दुसरा मजला मात्र विटांनी बांधण्यात आलेला आहे. प्रत्येक मजल्याला प्रत्येक कोनात एक, असे आठ दरवाजे असून इमारतीतील नक्षीकाम बघण्यासारखे आहे. पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला मात्र पायर्‍या आहेत.
               ह्या वास्तूंच्या मार्गावर आपण एक रेल्वेचा मार्ग ओलांडून जातो तो आहे भारतातील एकमेव खाजगी रेल्वेचा. शकुंतला रेल्वे.
               अचलपूरच्या नगरकोटाचाच एक भाग असलेले समरसपुऱ्यातील नवाबांचे कबरस्तान (बेबहा बाग) हा पुढचा टप्पा होता. खरं तर कबरस्तान काही बघण्यासारखी जागा थोडीच असते? पण हे नवाब, शाही लोकांचे होते त्यामुळे कबरस्तान सुद्धा शाही असेच आहे. त्याच्या प्रवेशस्थानी सुंदर नक्षीकाम असलेला मजबूत दरवाजा असून त्यात लाकडी दार आहे. वरती मध्यभागी फारसीमध्ये लेख लिहिलेला असून दरवाजावरती मोर आणि इतर काही प्राणी कोरलेले आहेत. दरवाजा शेजारी घुमट असलेली एक इमारत असून त्याच्या आतमध्येही एक लेख कोरलेला आहे. आतमध्ये एक विहिरही आहे.

अचलपूरचे भव्य आणि मजबूत दरवाजे
               आता मात्र बघायचा होता मुख्य किल्ला, एलीचपुर अर्थात अचलपूरचा. अचलपूर हे जवळ जवळ 100 वर्ष वऱ्हाड प्रांताची राजधानी होते, त्यावरूनच ह्या किल्ल्याचे महत्व लक्षात येईल. हे नगर वसवले ते जैन धर्मीय "ईल" नावाच्या राजाने, म्हणून "एलीचपुर" आणि पुढे अचलपूर. कित्येक सत्ता ह्या नगराने अनुभवल्या. हा किल्ला म्हणजे पूर्ण नगर असल्याने त्यात 50 च्या वर वस्त्या होत्या. आजही इथे 35 एक "पुरे" आहेत. परकोट हा तब्बल 5 किमी लांबीचा असून किल्ला फिरणे म्हणजे गाव फिरणेच आहे. ह्याला 6 मोठे, महत्वाचे दरवाजे असून त्यातून रस्ते काढून रोजची वाहतूक सुरु आहे. 

वेगेवगळ्या बांधणीचे अप्रतिम बुरुज
               प्रत्येक दरवाजाचे बांधकाम अप्रतिम असून बुरुज तर खास वेळ काढून बघावेत असेच आहेत. एक दरवाजा तर जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रवेशद्वार आहे. 4 दरवाजांना तर दोन्ही बाजूला सुंदर मजबूत बुरुज असून लाल किल्ल्याची आठवण नक्कीच होते. दूल्हा, बुंदेलपुरा, जीवनपुरा,  खिडकी, माळीपुरा (तोंडगाव?) व हिरापुर दरवाजा अशी ह्या दरवाजाची नांवे आहेत. काही ठिकाणी पर्शियन भाषेत सुंदर लेख कोरलेले आहेत. तब्बल 30-35 शिलालेख इथे आहेत, परंतु सगळे दरवाजे, बुरुज, लेख, अवशेष बघणे हे माहितगार आणि स्वतःचे वाहन किंवा रिक्षा असल्याशिवाय शक्य नाही. आमच्या बरोबर असलेल्या मनीषमुळे आम्हाला हे पाहणे सोपे झाले. बुरुज आणि दरवाजा बरोबरच अनेक थडगी, मशिदी, लेख, पाण्याची व्यवस्था, दर्गे आणि बालाजी व श्रीरामाचे मंदिर अश्या अनेक गोष्टींनी हा किल्ला समृद्ध आहे. बुरुज तर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्या आणि पाकळ्यांमुळे खास असेच आहेत.
               दुर्दैव एकच, कि अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या ह्या किल्ल्याबरोबरच इतरही कलाकृतींची जपणूक मात्र नीट झालेली नाही. काही स्थानिक लोकांना त्याची किंमत आणि काळजी असल्याचे जाणवले तरीही बहुतांशी लोकांना अनास्था असल्याने ह्या कलाकृतींचा ऱ्हास होत आहे.
               आजचा पुढचा आणि ज्याची खूप उत्सुकता होती तो टप्पा म्हणजे वऱ्हाडच्या राजधानीचा हा दुर्गराज.... गाविलगड!!!
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Sunday, January 6, 2019

विदर्भीय भटकंती - किल्ले बाळापुर

         आजच्या दिवसाचा दुसरा टप्पा होता अकोला जिल्ह्यातला बाळापुर किल्ला. पण त्या आधी मिर्झा राजे जयसिंग यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली (कि जसवंतसिंहाने बांधलेली?) एक छत्री पहिली.

मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली एक छत्री
         काळ्या दगडात सुंदर कलाकुसर असलेली ही छत्री आवर्जून पहावी अशी आहे. मध्यभागी एक मोठा घुमट असून बाजूला चार लहान लहान घुमट आहेत. छत्रीच्या मागच्या बाजूने डावीकडे बाळापुर किल्ला तर उजवीकडे मन नदीवर बांधलेले धरण दिसते.
         बाळापुर किल्ला हा अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील शहर नावाच्या भागात आहे. हा भुईकोट किल्ला असून किल्ल्याच्या एका बाजूने मनतर दुसर्या बाजूने म्हैस/महिषीनद्या वाहतात आणि पुढे त्यांचा संगम होतो.
         गडाच्या अगदी दरवाजापर्यंत डांबरी रस्ता जातो. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूने येणाऱ्या डांबरी रस्त्याने गेल्यास गडाची भक्कम तटबंदी दिसून येते. ही तटबंदी बघताना राजस्थानी किल्ल्यांचा भास नक्की होतो. त्याच्या उजव्या बाजूने वळसा मारून प्रवेशद्वाराकडे जाताना उजवीकडे नदीच्या काठावर एक दरवाजा दिसतो. अगदी दरवाजात पानाची टपरी असून दरवाजात भरपूर घाण आहे. मुख्य गड आणि हा दरवाजा हे आता पूर्णपणे वेगवेगळे झालेले आहेत. इथून गडाकडे जाताना डाव्या बाजूला जुन्या तटबंदीचे काही अवशेष दिसतात परंतु वाढलेली झाडी आणि लोकांनी केलेली घाण ह्यामुळे तिकडे बघवत नाही. उजवीकडेही वस्तीत गडाचे काही जुने दगड दिसतात. गडाच्या भागात शिरताना भक्कम स्थितीतील एक भक्कम दरवाजा पार करून आतमध्ये जातो. सध्या ह्या गडात तलाठी कार्यालय असल्याने गडाच्या दुसऱ्या दरवाजाच्या बाहेरच पार्किंगची सोय केलेली आहे.

गडाचा दुसरा भक्कम दरवाजा
         दगडी फरसबंदीच्या मागे असलेला हा दरवाजा अतिशय सुंदर असून शेजारची तटबंदीही उत्तम आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला मात्र सरकारी जाहिराती रंगवलेल्या आहेत. दरवाजाच्या ह्या भव्य कमानीला मोठे लाकडी दार असून त्यावरील लोखंडी पट्ट्यांना अणकुचीदार खिळे ठोकलेले आहेत. हत्तींनी डोक्याने धडक देऊ नये म्हणून असे मोठाले अणकुचीदार खिळे दरवाजाला ठोकलेले असतात, अगदी शनिवारवाड्याच्या भक्कम दरवाजातल्या खिळ्यांची आठवण हा दरवाजा बघताना नक्कीच होते. ह्या प्रचंड दाराला एक लहान दारही आहे.

नक्षीदार कमान असलेला तिसरा दरवाजा
         आतमध्ये गेल्यावर उजवीकडे तिसरा दरवाजा असून त्याचे बऱ्यापैकी बांधकाम दगडी आहे तर वरच्या बाजूना कमी जाडीच्या भाजीव विटांनी बांधकाम केलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला २-२ हत्ती कोरलेले असून डाव्या बाजूला एक घोडाही कोरलेला आहे. ह्या कमानिलाही लाकडी दार असून त्यात लहान दारही आहे. ह्या कमानीवर अप्रतिम नक्षी कोरलेली आहे. दोन्ही बाजूला फुलांच्या खवले-खवले कोरून केलेल्या फुलांच्या पाकळ्या आणि त्याचे कणसाच्या आकारातले छोटेसे मनोरे तर अतिशय सुंदर आहेत. दरवाजा समोरच्या भिंतीवर चढून ही नक्षी वेळ काढून नक्की पहावी. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर समोर सदरेची इमारत दिसते. सध्याच्या सरकारी कार्यालयाचा हा प्रवेश बनवलेला आहे.

सध्याच्या सरकारी कार्यालयाची इमारत
         दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या असून त्यावर पावसाचे पाणी आत येऊ नये यासाठी सुंदर झडपा केलेल्या आहेत. आतमध्ये गेल्यावर आजूबाजूला जुन्या इमारतीत सरकारी कार्यालये थाटलेली दिसतात. सदरेच्या इमारतीत इतिहास कालीन लाकडाची बाके सध्याचे Stamp Vendor वापरतात. ह्या इमारतीच्या पलीकडे उजवीकडे जाऊन तटबंदीवरुन फिरायला सुरुवात करायची. आम्ही प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे Clockwise फिरायला सुरुवात केली. तटबंदी सुस्थितीत असून बांधकाम चपट्या आकाराच्या भाजीव विटांचे आहे. (अवांतर: आता ह्या विटा... घरी पाडून घेतल्या आहेत, बाजारच्या नाहीत. मला फक्त बुंदी घरी पाडतात हे ठाऊक होते. असले पुलं विचार पुलंप्रेमी व्यक्तीच्या मनात आल्याखेरीज राहत नाहीत. त्यातून हा इतिहासकालीन किल्ला असल्याने इथे खरोखरच "भिंतीत चिणून मारण्यासाठी" काही सोयही केलेली असेल असा विचार नक्कीच येतो) गडाचे बुरुज तर प्रशस्त जागा असलेले भव्य असेच आहेत. तटबंदीच्या प्रशस्त अश्या फांजीवरून ह्या विटांचे सुंदर बांधकाम, जंग्या आणि चर्या पाहत तटबंदी फिरायची. तटबंदीत जुन्या मंदिरांचे दगड वापरलेले त्यावरील सुंदर नक्षीमुळे सहजपणे कळून येते. बुरुज सुस्थितीत असून गडाचा आतील भाग आणि इमारती नीटपणे न्याहाळता येतात. गडाच्या मध्यभागी उघड्यावरच एक हनुमानाची मुर्तीही आहे.

गडाचे बुरुज आणि भक्कम तटबंदी
         बाहेरच्या बाजूस डावीकडे गडापासून दूर अजून एक दरवाजा बघायला मिळतो, तसेच परकोटही (किंवा दुहेरी तटबंदीचा बाहेरचा भाग) व्यवस्थित बघता येतो. बुरुजावरुन पायऱ्यांनी खाली उतरल्यावर एक खालपासून विटांनी बांधून घेतलेली एक अतिशय सुंदर विहीर दिसते. उभ्या-आडव्या आणि तिरक्या अश्या प्रकारे विटांनी नक्षीच ह्या बांधकामात बनवलेली आहे. ह्या विहिरीला लागून एक इमारतही आहे. ह्याच इमारतीवर पाण्याचे हौदही दिसतात. पुन्हा तटबंदीवर चढून उरलेला भाग फिरताना बाहेरील बाजूस मन नदीचे पात्र आणि त्यावरचे पूल सुंदर दिसतात तसेच परकोटावरील बुरुजही दिसतात. एका बुरुजावर ध्वज तर पुढच्या बुरुजावर एक थडगे असून इथे आपली गडफेरी पूर्ण होते.

सुंदर बांधीव विहीर आणि इतर अवशेष

गडाचे इतर दरवाजे
         गडाच्या बाहेर पडल्यावर प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला अजून एक मजबूत स्थितीतील दरवाजा आणि कमान असून ह्यावरही नक्षी कोरलेली आहे. मोहल्ल्यातले लोक ह्या कमानीचा वापर बिनदिक्कतपणे मुतारी म्हणून करताना दिसतात.
         एकंदरीतच अतिशय सुंदर कलाकुसर करून केलेले हे बांधकाम सध्याच्या परिस्थितीत चुकीच्या हातात पडल्याने त्याचा अवमानच होत आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Saturday, January 5, 2019

विदर्भीय भटकंती – किल्ले रोहिलगड आणि असदगड उर्फ अकोल्याचा किल्ला


          मराठवाडा-विदर्भ म्हटले कि बीड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, गोंदिया... काय वाट्टेल ती नांवे आठवतात. ह्यातलं काय विदर्भात आणि काय मराठवाड्यात हेही नक्की सांगता येणार नाही एवढा माझा भूगोल. त्यामुळे विदर्भात किल्ले बघायचे नियोजन तसे मनातही आले नव्हते कधी. पण २२ ते २५ डिसेंबर अशी ४ दिवसांची सुट्टी बघून त्यात असे लांबचे नियोजन ठरले आणि २१ ला रात्री निघालो हा वेगळा प्रदेश फिरायला...

          भटकंती ठरली होती रोहिलगड, गाविलगड, जिल्पी अमनेर उर्फ हासीर किल्ला, नरनाळा, वारीचा भैरवगड, मैलगड  असे ६ गिरिदुर्ग, बाळापुर, असदगड उर्फ अकोल्याचा किल्ला, एलिचपूर उर्फ अचलपूरचा नगरकोट, खामगावचा नगरकोट असे ४ भुईकोट व सुलतान आणि गोंधणपूरची गढीची.

रोहिलगड
                         
          सुरुवात होती जालना जिल्ह्यातल्या रोहिलगडपासून. विनीत दाते, प्रसाद आणि नेहा परदेशी, भूषण नाडकर्णी, केतन मावळे आणि सोबत मी असे ६ जण दिमतीला टाटा सुमो घेऊन २१ तारखेला शुक्रवारी रात्री निघालो. रोहिलगड हा किल्ला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलगड गावाजवळच्या टेकडीवर आहे. रोहिलगड गावातून जालन्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून जवळच “फिरंगीमाता मंदिर” आहे. ह्या देवळाच्या पलीकडेच टेकडीवर हा किल्ला आहे. देवळापासून किल्ल्यावर जायला १५-२० मिनिटं पुरतात. ह्या किल्ल्याचा माथा बऱ्यापैकी सपाट असून त्याचा आकार साधारणपणे लंबुळक्या बदामाच्या आकाराचा आहे. फिरंगीमाता मंदिरापासून निघाल्यावर आपण ह्या किल्ल्याच्या बदामाच्या खालच्या टोकाला पोचतो. इथून खाली रोहिलगड गांव तर डावीकडे लागुनच एक किल्ल्याच्याच उंचीचा पण आकाराने जास्त पसरलेला "पालखा" नावाचा डोंगर दिसतो.          इथून डाव्या हाताने कडे-कडेने चालत गेल्यास एका बाजूला तटबंदीचे काही अवशेष दिसतात तर इथेच गडाच्या मध्यभागी जमिनीच्या आतमध्ये दहा एक खांब असलेले बाहेरून लहान वाटणारे पण प्रचंड मोठे असे टाके आहे. यातील काही खांब अखंड दिसतात तर काही अगदीच तोकडे दिसतात, कारण हे टाके समोरून आतमध्ये उतरत्या छपराचे असून आतील बाजूस मातीने भरत गेलेले आहे. ह्या टाक्याच्या जवळच आणखी एक बुजत गेलेले टाके आहे. इथून पुढे गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे जुन्या वाड्याचे काही अवशेष दिसतात. मागे फिरून ध्वज असलेल्या टोकाकडे जाताना लगेचच एक फुटके दगडी रांजण दिसते. गडाच्या उजवीकडे खाली उतरल्यावर पूर्वाभिमुख असे अजून एक मोठे टाके दगडात खोदलेले आहे. हेही टाके मोठे असून ह्यात एक तुटका खांब दिसतो तर प्रवेशालाच ३ पूर्ण खांब आहेत.

गडावरील टाकी
          इथून परत वर येऊन ध्वज असलेल्या गडाच्या सर्वोच्च टोकाकडे जायचे. इथेही काही जुन्या वास्तूचे अवशेष दिसतात तर काही जुनेच दगड गावकऱ्यांनी तटबंदीसारखे रचून ठेवलेले आहेत. आता ह्याच टोकावरून गडाच्या खाली उतरायचे. सपाटीवर आल्यावर पुन्हा पायथ्याच्या मंदिराच्या दिशेने चालत जाताना डावीकडे गडाच्या डोंगरातच दक्षिणाभिमुख म्हणजे गावाच्या दिशेने तोंड करून १०-१२ खांबी गुहा खोदलेली आहे. ह्यात बरोब्बर मध्यभागी मोठा कोनाडा असून त्यात दगडाला शेंदूर फसलेला आहे. ह्या गुहेचे मूळ प्रवेशद्वार मात्र जमिनीच्या पातळीला नसून अगदी गुहेच्या तोंडाजवळ मध्यभागी खाली उतरायला जागा केलेली आहे आणि त्यातून डावीकडे वळून परत पायऱ्या चढून गुहा-मंडपात यावे अशी सोय आहे. गुहेच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा असून ती बऱ्यापैकी बुजलेली आहे. त्यात साळींदर प्राण्याचा वावर असल्याने शक्यतो आतमध्ये जाऊ नये. संपूर्ण गडावर कोणत्याही टाक्यांत पाणी नाही.

कातळकोरीव गुहा
          इथे गडफेरी पूर्ण होते. गडावर जाऊन सगळे अवशेष निवांत पाहून २ तासांत पायथ्याला पोचता येते. गडाच्या जवळ आणखी एक मोठा पसरलेला "पालखा" जोड-डोंगर असून त्यातही गुहा/लेणी आहेत. वेळ असल्यास जरूर पाहून घ्याव्यात.
          ह्या गावातले विशाल टकले आणि त्याचे काही मित्र यांनी गडावर साफसफाई केली आहे. हा गड छोटेखानी असला तरी ह्यावरची टाकी आणि गुहा मात्र अतिशय सुंदर आहेत.

असदगड
          अलोक्यात मध्यवर्ती ठिकाणी मोरणा नदीच्या काठी असदगड किंवा अकोल्याचा किल्ला आहे. हा किल्ला अकोलसिंग ह्या राजपूत राजाने अकोला ह्या शहराबरोबर बांधला असे मानले जाते. पुढे औरंगजेबाने असदखान ह्याला अकोला गाव दिल्यावर त्याच्या देखरेखीखाली ख्वाजा अब्दुल लतीफ याने त्याची 1698 ला पुनर्बांधणी केली. हा खरं तर नगरकोट असून परकोटला चार दरवाजे आहेत. दहीहंडावेस, शिवाजी किंवा बाळापूरवेस, अगरवेस आणि गजवेस या नावांनी ते ओळखले जातात. ह्यातील अगरवेस ही गोविंद अप्पाजी यांनी 1843 ला बांधली. असद, फतेह किंवा पंचबुरुज आणि अगर बुरुज ह्या तीन बुरुजांपैकी असदबुरुज हा असदगड किंवा अकोल्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो.

शहिद स्मारक
          ह्या किल्ल्याचे आता पार्क केले गेले असून थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला हिंदीत तर उजवीकडे मराठीत गडाची आणि पुनर्निर्मितीची माहिती संगमरवरी फलकावर कोरलेली आहे. प्रवेशद्वार म्हणून "आझाद पार्क" असे नांव देऊन एक कमान बांधण्यात आलेली आहे. त्यातून आतमध्ये गेल्यावर समोरच एक कारंजे दिसते, जे इतिहासकालीन असावे. ह्याच्या पलीकडे एक "शहिद स्मारक" असून त्यावर एक सिंहाचा पुतळा आहे. ह्याच्या पायथ्याशी -
शहीदोंकी चिता ओपर।
जुडे रहेंगे हर बरस मेले।।
वतनपे मरणेवालोका।
यही निशा बाकी है।।
          असा संदेश लिहिलेला आहे. 7 मे 1957 रोजी अकोला नगरपालिकेने हे शाहिद स्मारक आणि पार्क उभारले असून त्यावेळी हे लिहिण्यात आलेले आहे.

हवामहाल
          डाव्या बाजूस एक पडकी इमारत असून ह्यास हवाखाना किंवा हवामहाल म्हटले जाते. ह्याचे 6 मोठे झरोके शिल्लक असून त्यांवर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. इथे उजव्या बाजूने खाली उतरल्यास ह्या हवा महालाच्या खालच्या बाजूस असलेला बुरुज दिसतो. हा बुरुज पूर्णपणे भाजलेल्या लाल विटांनी बांधलेला असून सुस्थितीत आहे. इथूनच गडापासून थोडा दूर असा एक बुरुज/दरवाजाही दिसतो. गडाच्या कडेनेच प्रदक्षिणा घालत गेल्यास भक्कम तटबंदी दिसते तर पुढच्या बुरुजाच्या खाली चुन्याचा घाणा दिसतो. त्याचे दगडी चाक आणि 2 हौदही दिसतात. पुन्हा प्रवेश द्वाराशी येऊन उजवीकडच्या बाजूचे राहिलेले अवशेष बघून घ्यावेत.
          पार्क म्हणून जतन केल्यानेच हा भाग तरी शिल्लक राहिलेला आहे, अन्यथा अतिक्रमणामुळे इतर किल्ला झाकोळून गेलेला आहे.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Wednesday, December 12, 2018

किल्ले मोहनदर उर्फ शिडका आणि कण्हेरगड - II

                 आम्ही नंदुरी-अथांबे वरून मोहिमेच्या दुसऱ्या भागात शिरलो. गांव: सादडविहीर. इथून 2 पोरांना आमच्याबरोबर येण्यास तयार केले, पण गाडी थांबवायच्या जागेवर आल्यावर त्यांनी माघार घेतली. त्यांना घरी काम निघाले आणि अर्थातच शेतीचे काम जास्ती महत्वाचे. पण त्यांनी गडाकडे जायची वाट दाखवून दिली.

किल्ले कण्हेरगडचा खालपासून दर्शन देणारा बुरुज
                 सादडविहीर गावाकडून पुढे जाणाऱ्या रस्त्याने साधारण 500 मीटर अंतरावर रस्त्याखालून मोरी बांधलेली आहे (पाणी जायला जागा) हीच खूण. इथून उजवीकडे बुरुजावर फडकत असलेला ध्वज दिसतो. वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. पहिला टप्पा परत डावीकडचा डोंगर आणि उजवीकडे किल्ला ह्या मधल्या खिंडीचा. इथे पोचायला आधारानं 15-20 मिनिटं लागतात. इथून डावीकडे डोंगरावरही वाट जाते. पलीकडच्या कण्हेरवाडीतून लोक इथे ससे पकडायला जातात, तसेच वर बहुतेक डोंगरदेवाचे मंदिरही आहे. आपण उजवीकडे वर बुरुजावर फडकणाऱ्या ध्वजाकडे बघत सरळ वरती जायची वाट धरायची. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. इथे आपल्याला साध्य व्यवस्थित दिसत असले तर तिथे नेणारा मार्ग सोपा नाहीये. सरळ नाकाडाने चढल्यास अगदी घसाऱ्याची वाट आहे. परंतु जरा उजवीकडची वाट पकडल्यास नाकाडाच्या कडेने पण झुडुपातून वाट वरच्या बाजूला जाते. परंतु ह्या वाटेने जाताना आपले साध्य नक्की कुठे आहे त्याचा अंदाज ठेवावा, कारण आपण जात असलेली ही कडेची वाट सरळ आपल्याला बुरुजकडे न जाता पुढे कुठेतरी घेऊन जाते. म्हणून वाटेत अंदाज घेऊन डावीकडे वरच्या बाजूला जावे लागते. इथून परत आपले साध्य म्हणजे ध्वज दिसू लागतो. आता मात्र पर्यायी रस्ता नाही. सरळ वर जायचे.

छोटेखानी पण शीण दूर करणारे नेढे
                 हा किल्ला 4 टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात पोचतानाच गडाचे अवशेष म्हणजे पायऱ्या दिसू लागतात. इथून मागे बघितल्यास उंच वाटत असलेले गडाच्या डावीकडचे डोंगर खुजे वाटू लागतात. इथे पाण्याची छोटी विश्रांती घेऊन बुरुज उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने पुढे व्हायचे. परत पायऱ्या आपल्याला बुरुजाला वळसा मारून त्याच्या वरच्या लपून बसलेल्या बुरुजावर घेऊन जातात. इथे एक पाण्याचे कोरडे टाके आहे. मागे बुरुजकडे गेल्यास दोन्ही बाजूला तटबंदी दिसते, तर मधेच मोठा चर खोदलेला दिसतो. समोरच खालच्या बुरुजवरचा ध्वज आणि समोर डोंगर दिसतो. आता मागे फिरून कोरड्या टाक्याजवळून वरच्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जायचे. सरळ टप्प्या-टप्प्यातल्या पायऱ्या आणि अगदी उंचावर अर्धवट तुटका दरवाजा सदृष अवशेष दिसतात. पुढचा पायऱ्यांचा टप्पा पार केला कि ह्या किल्ल्याचा दागिना शोभेल असे छोटेखानी पण सुंदर असे नेढे आहे. अगदी 5 फूट उंचीचे आणि 25 एक फूट लांब असे त्यात आरामात वारा खात बसावे असे वाटणारे हे नेढे आहे. त्यात बसायचा मोह तात्पुरता टाळून डावीकडच्या पायऱ्यांनी पुढच्या टप्प्याकडे जायचे. इथे वरती कातळात काही खड्डे आहेत. अजून वरच्या तुटक्या दरवाजा वाटणाऱ्या अवशेषांकडे पोचायचे. हे अवशेष दरवाजाचे वाटत नाहीत आणि मुख्य वाटही इथून नाही, तर त्याच्या डावीकडून आहे. इथे अजून काही खड्डे, गोलाकार आकार कोरलेले आहेत. इथे अजून एक कोरडे टाके आहे. आता गड माथ्यावर म्हणजे एका पठारावर पोचायचे. इथे समोरच तुळशी वृंदावन, शंकराची पिंड, नंदी वगैरे उघड्यावरच आहेत. जवळच पाण्याची टाकी, खोल्यांचे चौथरे वगैरे अवशेष आहेत. पाणी पिण्यायोग्य नाही. समोर विस्तीर्ण पठार आहे आणि पलीकडे धोडप किल्ल्याच्या माचीला जशी भलीमोठी खाच आहे, तशीच इथेही आहे. पण इथे जाता येत नाही. इथून डावीकडे गेल्यावर टाक्यांचा समूह आहे. सगळ्यात उजवीकडच्या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य असले तरी त्यात शेवाळे खूप आहे, पाणी रुमालात गाळून घ्यावे.

टाकी, गुहा आणि इतर अवशेष
                 ह्या गड माथ्यावरून सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप, कांचना हे किल्ले, तर हंड्या, बंड्या आणि इखारा हे सुळके दिसतात.
                 कडेने परतीच्या वाटेकडे येताना उजव्या बाजूला खालच्या बाजूला एक वाट जाते. इथे पूर्वाभिमुख 2 गुहा लपलेल्या आहेत. विस्तीर्ण अश्या ह्या दोन गुहा आहेत. जागा सपाट नसली तरी गरज लागल्यास पाऊस-पाण्यापासून संरक्षित आहे. ह्या गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या दिसतो. धोडपच्या डावीकडे ईखारा सुळकाही स्पष्ट दिसतो. आता गडफेरी पूर्ण होते. साधारण 10 टाकी हा किल्ला बाळगून आहे. येताना नेढ्यात निवांत बसून जेवण करावे. इथून आपण आल्या वाटेने पाऊण तासांत आपण अगदी गडाच्या पायथ्याशी पोचतो.

गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या
                 ह्या गडाचा इतिहास अंगात वीरश्री निर्माण करणारा आहे. हा फारसा प्रसिद्ध नसलेला गड आपल्या पराक्रमाने अजरामर करून ठेवलेला आहे "रामजी पांगेरा" नावाच्या मराठी रक्ताने. पावनखिंड म्हणजे वीर बाजीप्रभू, पुरंदर म्हणजे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरे असे समीकरणच आहे जणू, तसेच कण्हेरगड म्हणजे रामजी पांगेरा.
                 १६७२ च्या जानेवारी महिन्यात दिलेरखान आपली १० हजारांची भलीमोठी फौज घेऊन कण्हेरगडाच्या पायथ्याशी आला. त्याने कण्हेरगडाला वेढा घातला. त्यावेळी रामजी हे कण्हेरगडाचे किल्लेदार होते. गडावर शिबंदी होती अवघी 800 ते हजार. गडावर उपलब्ध रसद जास्त काळ पुरणार नाही हे रामजी जाणून होते. ह्या रामोश्याने आपले कपडे फाडले, दोन्ही हातात समशेरी घेऊन रामजीने मावळ्यांना आव्हान केले. 'आरं गनिम येतुया, चलाऽऽऽऽ मरायला कोन कोन तयार हाय त्येनं माज्या म्हागं यावं...' त्याचे आव्हान शब्दशः सत्य होते. हजारी सैन्यापुढे हे वेडे वीर अक्षरशः मरण्यासाठीच जात होते. ह्या वेड्याची साथ द्यायला असेच सातशे वेडे वीर तयार झाले आणि गडाचे दरवाजे अचानक उघडले. कमरेचे वस्त्र फक्त अंगावर ठेऊन उघडे बंब असे हे रामोशी हातात नागव्या तलवारी घेऊन 'हर हर महादेव' अशी गर्जना करत गनिमावर अक्षरशः कोसळत गेले. अंगावर असंख्य जखमा झाल्या. सभासद या लढाईचे वर्णन करताना लिहतो, 'टिपरी जैसी शिमग्याची दणाणते, तैसे मावळे भांडीले'. खरंच रामजी पांगेरा आणि त्याच्या मावळ्यांचा आवेश पाहून दिलेरखानाने अक्षरशः तोंडात बोटे घातली. त्याच्या डोळ्यासमोर पुरंदरच्या युद्धात उभा ठाकलेला मुरारबाजी देशपांडे आला नसेल तरच नवल. 'ये मराठे नही, भूत है' असे म्हणत दिलेरखान परत फिरला. अवघ्या सातशे मावळ्यांनी गड राखला.
                 संध्याकाळ झाली होती. थोडासा उशिर झाला होताच निघायला. घरी पोचायला साडेबारा वाजून गेले होते. सोमवार सुरूच झाला होता ऑफिस आजच होते. सह्याद्री, किल्ले, रामजी पांगेरा... सगळे तात्पुरते बाजूला ठेवले आणि 5 एक तासांची झोप मिळवायला पांघरुणात शिरलो.