Tuesday, December 19, 2023

किल्ले नाकविंदा आणि बाडगीची माची

किल्ले नाकविंदा

हम्म्.... मथळ्यात असलेली दोन्ही नावं कदाचित ओळखीची वाटत नसतील. नाही, तुमचं चुकत नाहीये. वाटणं साहजिकच आहे, कारण ही दोन्ही नांवं तशी अल्पपरिचितच.

आपल्याकडे काय झालं, की १८१८ सालानंतर बहुतांशी किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी नंतर ते मराठ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या किल्ल्यांना सुद्धा घाबरत असल्याने हे सगळे किल्ले उध्वस्त करण्याचा सपाटाच लावला. ह्यात हरिहर सारखा एखादा किल्ला मात्र नशीबवान ठरला. हरिहर किल्ल्याच्या पायऱ्यांना कॅप्टन ब्रिक्स नावाचा इंग्रज भुलला आणि ते सौंदर्य त्याने उध्वस्त होऊ दिलंन नाही. पण तसा इंग्रज सगळ्याच किल्ल्यांना लाभला नाही. उलट त्यांच्या नशिबात आला तो तोफगोळ्यांचा माराच.

शत्रूंनी तोफगोळे डागून उध्वस्त केलेले असे अनेक किल्ले सह्याद्री बाळगून आहे ते मराठ्यांच्या सहज शरण न येण्याच्या आणि शस्त्रे खाली ठेऊन हार न पत्करण्याच्या ताठ बाण्यामुळेच. अन्यथा मराठ्यांच्या राज्याचा भाग नसलेले किल्ले आपले दिखाऊ सौंदर्य आजही दिमाखात मिरवत आहेत. पण अश्या दिखाऊ सौंदर्यावर मात करत उजवं ठरतं ते मराठ्यांच्या किल्ल्यांच्या उध्वस्त अवशेषांतुन उलगडून दिसणारं मराठ्यांचं शौर्य!

असे खूप किल्ले ह्या परकीयांच्या आक्रमणात उध्वस्त झाले. हे परकीयांचे आक्रमण संपले, देश स्वतंत्र झाला, पण त्यानंतर स्वकीयांनी शत्रूची उणीव भासू दिली नाही. ह्या स्वकीयांच्या अतिक्रमणात थोडे भाग्यवान ठरले ते गिरदुर्ग. त्यावर तेवढे अतिक्रमण झाले नाही, कारण गरज भासली नसावी किंवा करताही येत नसावे. कदाचित सोयीचही ठरलं नसावं.. जे काही असेल ते. पण भुईकोट किल्ले मात्र इथे हरले. विविध वास्तूंचे दगड घराच्या बांधकामाला वापरले गेले. उभी असलेली तटबंदी काही घरांच्या भिंतीचा भाग बनली, तर काही ठिकाणी हद्द म्हणजे चक्क बुरुजातच संसार थाटले गेले.

पण परकीय आक्रमण आणि स्वकीय अतिक्रमण कशानेही म्हणा पण आपला ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू, किल्ले उध्वस्त होत राहिले आणि ऱ्हास होत गेला.

किल्ले नाकविंदा (पिंपळगांव-नाकविंदा गावातून)

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील "पिंपळगाव नाकविंदा" गावात एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालाही अश्याच प्रकारे सामना करावा लागला असणार. अगदी किल्ल्याचे अस्तित्व ओळखू न येण्याइतकी स्थिती होण्यापर्यंत, अश्याच अनेक कारणांनी हा या अवस्थेत पोचला असणार हे नक्की. इथे कदाचित हा मान इंग्रजांना द्यावा लागेल कारण उध्वस्त झालेल्या कातळकोरीव पायऱ्या.

त्यात ह्या बिचाऱ्या किल्ल्याचा उल्लेख स्पष्टपणे असा इतिहासात महत्वाच्या घटनांशी संबंधित फार सापडत नाही. त्यामुळेच हा किल्ला जणू काही काळाच्या पडद्याआड गेला. परंतु सुदैवाने दुर्गप्रेमी आणि संशोधकांच्या अभ्यासामुळे तो पुन्हा प्रकाशात आला. शिवाजी महाराजांनी पट्टा किल्ला नंतर २३ किल्ले काबीज केले त्यात ह्या किल्ल्याचा समावेश असावा. ह्याचे स्थान आणि बांधणी पाहता, ह्या किल्ल्याचा उद्देश हा टेहळणीच्या दृष्टीने असावा असं वाटतं.

थोडक्यात हा किल्ला अत्यंत दुर्लक्षित आहे. ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी ठरल्यावर नेहमीप्रमाणे पुण्याहून रात्री आमचा प्रवास चालू झाला आणि पिंपळगाव नाकविंदा गावात रात्री २ च्या सुमारास दाखल झालो. वाटेत एक गंमत घडली, त्यामुळे जरा सावधपणेच झोपलो. पहाटे उठून आवरताना नेहमी गावकऱ्यांशी बोलून, माहिती विचारायची सवय आहे. त्याने एक तर आपल्याला आपण घेऊन आलेल्या महितीपालिकडे काही नवीन माहिती मिळते आणि गावातही कल्पना राहाते की काही लोक गडावर चालले आहेत, जेणेकरून काही गरज लागली तर मदतीसाठी ते धावूनही येऊ शकतात.

इथे सकाळी चौकशी करताना मात्र एक आज्जी म्हणाल्या, की गावातील लोकांनी मिळून निर्णय घेतलेला आहे, की कोणालाही गडावर जाऊ द्यायचे नाही. आता आली पंचाईत... गडावर तर जायचं होतं. मग काहीही न बोलता ठीक आहे म्हणून तिथून निघालो. तोपर्यंत दुसऱ्या एका गावकऱ्याशी आमच्या सहकाऱ्यांनी भेटून रस्ता विचारला होता आणि सुदैवाने थोडी माहिती मिळाली होती. पण आता कोणी अडवणूक करू नये म्हणून आम्ही चटकन सगळं आवरून गडाकडे कूच केली.

आता कारण सांगतो त्या आजीने आणि गावकऱ्यांनी असं ठरावण्यामागचं. ते म्हणजे या किल्ल्यावर असलेले आग्या मोहोळ. आग्या मोहोळ म्हणजे अत्यंत रागीट आणि विषारी अशा मधमाशांची पोळी. काही वर्षांपूर्वी या किल्ल्यावर भटकंतीला गेलेल्या ३-४ मंडळींचा मधमाशांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. हेच महत्त्वाचे कारण आहे इथे प्रतिबंध घालण्यासाठी. पण आम्हालाही हे माहिती होतंच. मग किल्ला तर पहायचा आहे आणि धोकाही पत्करायचा नाही, मग त्यासाठी आमच्या दृष्टीने आम्ही सगळी तयारी केलेली होती आणि त्यामुळेच ही माहिती असून सुद्धा आम्ही या किल्ल्यावर जाण्यासाठी इथे दाखल झालो होतो.

किल्ल्याच्या वाटेवर

आम्ही या गावातील शेवटी असलेल्या हनुमंताच्या मंदिरात मुक्कामाला थांबलो होतो. इथून गावाच्या मागे पुर्व-पश्चिम पसरलेला डोंगर व त्यावरील छोटी कातळटोपी आपल्याला दिसते. हाच नाकविंदा किल्ला. ह्या डोंगरचा आकार निमुळता असुन त्याला लागुन असलेल्या दोन्ही सोंडा गावाच्या दिशेने खाली उतरतात. या दोन्ही सोंडेवरून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. यातलीच एक वाट निवडून आम्ही गडाकडे चढायला सुरुवात केली. आता इथला अभ्यास तर आम्ही करून आल्यामुळे ही कल्पना होती, की एका खड्या चढाईनंतर पुढे एक पठार लागते. त्या पठारापर्यंत काहीच धोका नाही. त्या पठाराच्या पुढे जी शेवटची कातळ टोपी आहे. त्या कातळ कड्यातच काही गुहा आहेत आणि त्या गुहांच्या वरती ही मोहोळ आहेत. त्यामुळे पठारापर्यंत आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीनेच आणि पोशाखात गेलो.

पठारावरून किल्ला आणि विरुद्ध बाजू

पठारावर पोचल्यावर एक छोटा ब्रेक घेतला तिथे आम्ही उजळणी केली, की मधमाशांचा हल्ला कशाप्रकारे होऊ शकतो आणि हल्ला झाल्यास काय करायचं. मधमाशांचा हल्ला जणू होणारच आहे अशा पद्धतीनेच आम्ही तयारी केली होती. त्या पोशाखात आम्हाला बघून चटकन तोंडावर आलं ते "ट्रेकर्स ए मुस्तफा".

ट्रेकर्स ए मुस्तफा

अशाप्रकारे आम्ही मुस्तफा त्या गडाकडे निघालो. अत्यंत सांभाळून जात कोणत्याही प्रकारचा आवाज न करत, अगदी आमचे मोबाईलही सायलेंटवर ठेवलेले असल्याने त्याचाही आवाज न होणार अशा पद्धतीनेच आम्ही निघालो.

वाटेवरील पाण्याची टाकी आणि वरती मोहोळ

सुरवात केल्यानंतर कडा उजवीकडे ठेवत त्याला बिलगून जाणाऱ्या वाटेने पाच मिनिटांतच कड्यात कोरलेल्या पाण्याच्या पहिल्या टाक्याशी पोचलो. ह्या टाक्याच्या वरच्या बाजूलाच ५-७ माणसं बसू शकतील अशी एक अर्धवट कोरलेली गुहा आहे. खरंतर या गुहेत जाण्यासाठी इथेही खाचाही कोरलेल्या आहेत अशी माहिती होती. इतर गोष्ट असती तर गुहेत जायचा प्रयत्न आम्ही केला असता नक्की. पण तिथली स्थिती वेगळी होती. त्यामुळे आम्ही त्या मुद्दलातल्या खाच्या बघण्याच्या मनस्थितीत नव्हतो, तर त्या मुद्दलावर असलेलं व्याज, म्हणजे गुहा बघण्यासाठी, खाचातून वर गुहेत जाणं तर फार लांबची गोष्ट होती. या गुहांच्या वरतीच ही आग्या मोहोळ याची पोळी आहेत.

या गुहेच्या पुढे कड्यात कोरलेली पाण्याची अजून दोन टाकी आहेत. या अत्यंत निमुळत्या वाटेवर कातळात काही खाचा कोरलेल्या दिसतात. वाट निमुळती असल्यामुळे आधार म्हणून खांब रोवता यावेत यासाठी या खाचांचा वापर करण्यात येत असे. पुढे गेल्यावर अजून एक चौथं टाकंही दिसलं. खरं सांगायचं तर वर जाताना इतक्या बारकाईने हे सगळे अवशेष दिसलेच नव्हते, म्हणजे तसं लक्षही नव्हतं.

वाटेवर

ठरल्याप्रमाणे काळजी घेत, कोणताही आवाज न करता, मध्ये मध्ये वर बघून निरखत, आजूबाजूचा अंदाज घेत आम्ही तो टप्पा पार केला. कोणताही आवाज न करता, म्हणजे अक्षरशः एकमेकांना सुद्धा हाका तर सोडाच, काहीही न सांगता, रस्ता सुद्धा खाणाखुणांच्याद्वारे आम्ही सांगत होतो. कदाचित ही काळजी कोणाला अति वाटू शकेल, पण आम्हाला धोका पत्करण्यात कोणताही रस नव्हता. "दिसली छान जागा की काढ फोटो" या संघटनेचा अध्यक्ष, म्हणजे अस्मादिक, म्हणजे मी स्वतः, आम्ही मोबाईल तर खिशातून बाहेरच काढला नव्हता.

माथ्यावर जाणारा धोकादायक कातळटप्पा

हा धोकादायक टप्पा पार केल्यानंतर थोडी रुंद जागा मिळाली. इथे एक छोटीशी खिंड आहे. म्हणजे डावीकडे एक याच डोंगराचा छोटासा भाग, मध्ये एक छोटी खिंड आणि उजवीकडे जो भाग आहे तो किल्ला. पण या किल्ल्यावर जायचा मार्ग मात्र इथे खडतर आहे. कारण इथे एक छोटा कातळ टप्पा पार करायला लागतो, जो अतिशय धोकादायक आहे.

किल्ला माथा

कुठल्याही भटकंतीत अगदी अतिशय साध्या आणि सोप्या ठिकाणी जायचं असलं, तरी काही गोष्टी आम्ही कायम जवळ बाळगत असतो. जसं प्रथमोपचाराची साधनं आणि एक छोटी प्रस्तरारोहण करण्यासाठी कामात येणारी दोरी म्हणजे रोप. अनेक ठिकाणी भटकंती करून सुद्धा आम्हाला या रोपचा कधी वापर करायची गरज पडली नव्हती, परंतु यावेळी मात्र ती दोरी बाहेर काढली. अत्यंत काळजीपूर्वक चढाई करून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो.

माथ्यावरील पाण्याचं टाकं

गडाचा माथा अत्यंत निमुळता असून आम्ही पहिल्यांदा सर्वात शेवटच्या टोकाशी गेलो. इथे फार अवशेष शिल्लक नाहीत. काही कोरडी टाकी आहेत आणि त्याचबरोबर झाडीमध्ये काही तटबंदीचे घडीव दगडही पडलेले दिसतात. अवशेष फार नसले तरी नशीब जोरावर असेल, तर वातावरण स्वच्छ असल्यास नाकविंदाच्या माथ्यावरून कळसूबाई शिखर, अलंग-मदन डोंगररांग, रतनगड, पाबरगड असे किल्ले पाहता येतात. चेमदेव डोंगर देवस्थानही इथून समोरच दिसतं.

चिंचोळ्या वाटेवरची पाण्याची टाकी

पठारावर सुखरूप परत

अवशेष पाहून पुन्हा त्याच कातळटप्प्यावरून अतिशय सावधानतेने खाली उतरलो आणि परत एकदा मुस्तफाचा वेष परिधान करून त्या गुहा, मधमाशा आणि निमुळत्या वाटेवरून पठारावर परत आलो. येताना मात्र अवशेष नीट बघितले, फोटोही जरासे काढता आले. काळजी घेत घेतंच हे केले. इथे परत आल्यानंतर मग हायसं वाटलं. धोकादायक मानला गेलेल्या स्थितीतला हा किल्ला आमच्या पदरात पडला होता. निवांतपणे खाली आलो.

किल्ले नाकविंदा (गावाच्या पलीकडील बाजूने)

खाली आल्यावर, आम्ही मुक्कामाला थांबलेल्या हनुमानाच्या मंदिराच्या मागे जी शाळा आहे, तिथल्या शिक्षकांनी वगैरे आमची चौकशी केली. मोहोळाचा काही त्रास नाही झाला याची खात्री केली आणि आम्हाला पुढे तिथे जायचे होते तिथल्या वाटेचे मार्गदर्शनही केले.

आता सांगतो की आम्ही जी काळजी घेतली मधमाशांपासून ती म्हणजे काय घेतली.
१) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जंगलात किंवा जिथे कोणत्याही वन्य प्राण्यांचा धोका असू शकतो अशा ठिकाणी अजिबात भडक रंगाचे कपडे घालायचे नाहीत. निसर्गाच्या रंगात लपून जातील अशा प्रकारचे फिक्‍या रंगाचे कपडे वापरायचे.
२) कोणत्याही प्रकारच्या वासाचे अत्तर किंवा बॉडी स्प्रे, परफ्युम, डिओ असे वापरायचे नाहीत. आपल्याला कितीही घाम येऊन त्याचा उग्र वास येत असेल तरी तो धोकादायक ठरत नाही, पण कोणत्याही वासाचं अत्तर वगैरे वापरल्यास तो वास अशा अपघातांना कारणीभूत ठरू शकतो.
३) जे काही कपडे वापरायचे ते आपलं अंग जास्तीत जास्त झाकून ठेवतील अशा पद्धतीचे वापरायचे. तसेही कोणत्याही प्रकारच्या भटकंतीला जाताना आम्ही हाफ शर्ट, हाफ पॅन्ट अशा प्रकारचे कपडे कधीच वापरत नाही. पण इथे तर खास करून पूर्ण चेहरा झाकून जाईल, डोक्यावर टोपी आणि त्यानंतरचा मानेचा जो भाग उघडा राहतो, तिथेही स्कार्फ वगैरे किंवा रुमाल अशा पद्धतीने अंग झाकून घेतले.
४) पायात कधीही चप्पल न वापरता, कायम सॉक्स आणि बूट हे तर वापरतोच. त्यातून इथे जास्तीची सुरक्षा म्हणून कितीही उकडत असलं, तरीही नेहमीच्या कपड्यांवर जर्किन, डोळ्याला गॉगल असा आमचा "मुस्तफा" पोशाख होता.
५) एवढी काळजी घेऊनही, कोणत्याही प्रकारचा आवाज होणार नाही याची दक्षता घ्यायची असते. कारण उग्र वास, आवाज, रंग हे मधमाशांना/प्राण्यांना आकर्षित करतात किंवा त्यांना धोका वाटून स्वसंरक्षणासाठी त्या चवताळून उठतात.

अशाप्रकारे काळजी घेऊन हा ट्रेक आम्ही सुरक्षित पूर्ण केला.

बाडगीची माची

मूर्तस्थान म्हणून भूगोलात एक कोपरा अडकवून बसलेले सामान्य ठिकाण अचानक नशीबवान ठरते, त्या स्थानाच्या भाग्यात एखादी असामान्य व्यक्ती येते आणि आणि मग त्याची नोंद इतिहासात घेतली जाते आणि ते स्थान तीर्थस्थान होऊन जाते. पावनखिंड हे तर सर्वांना परिचित नांव, जे बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झाले आणि त्याला इतिहासात अढळ स्थान मिळाले. तसेच एक दुसरं स्थान म्हणजे कण्हेरगड, ज्याच्या भाग्यात रामजी पांगेरा आले आणि ते इतिहासात नोंदले गेले. हे जरा कमी परिचितच, पण त्याहूनही अल्पपरिचित आणि दुर्दैवाने भटक्यांपासून सुद्धा अलिप्त राहिलेले स्थान म्हणजे "बाडगीची माची".

यापूर्वी या भागातल्या चेमदेव डोंगराला भेट दिली होती. तसंच बितनगड उर्फ बीटका हा किल्लाही पाहून झाला होता. परंतु त्याच्या शेजारी असणाऱ्या, डोंगराच्या कुशीतल्या, बाडगीच्या माचीची माहिती मात्र तेव्हा नव्हती.

"ऑक्टोबर हिट"... त्यामुळे वास्तविक नाकविंदा किल्ल्याला भेट दिल्यानंतर त्या तळपत्या उन्हात केलेल्या भटकंतीमुळे जीव अर्धा झालेला होता. त्यातच मला घरून मुलीची तब्येत बरी नसल्याचं कळलं आणि चलबिचल चालू झाली. पण घरातली स्थिती बायको सांभाळून घेत असल्याने ती काळजी मिटली आणि एवढ्या लांब आलो आहोतच तर ठरलेल्या प्रमाणे बाडगीच्या माचीला भेट देऊनच परत जाऊ असा निर्णय झाला.

कुठेही भटकंती करताना त्या ठिकाणाचा अभ्यास आम्ही करून जात असतो. वाचनाबरोबरच जर तिथे आधी जे कोणी जाऊन आलेले असतील, त्यांनी मॅप रेकॉर्ड करून ठेवलेला असेल तर त्याचीही मदत आम्ही घेत असतो. जेणेकरून वाट शोधण्यात आमचा वेळ न जाता आमची भटकंती वेळेत पूर्ण होईल आणि चुकलो तरी त्याच्या मदतीने निदान परत तरी येऊ शकू.

गावातून माची परिसर

परंतु या ठिकाणाला आधीच म्हटल्याप्रमाणे दुर्लक्षित असल्याने, ह्याचं मॅप रेकॉर्डिंग काही मिळालेलं नव्हतं. त्यामुळे विचारत-विचारत, वाट काढत तिथे पोचायचं हे ठरवूनच निघालो. गावात चौकशी केली आणि माचीचं स्थान नक्की केलं. त्यानंतर तिथे जाणारी वाट विचारून घेतली. गावातल्या लोकांना तिथल्या वाटा तोंडपाठ असतात. त्यामुळे त्यांना समोर दिसणाऱ्या असंख्य वाटांमधून बरोबर वाट कोणती ते अचूक समजतं आणि नवीन येणारा माणूस मात्र सहज गोंधळून बसतो. गावकऱ्यांनी सांगताना ही वाट सरळ जाते असं जरी सांगितलं, तरी काही वेळा पुढे गेल्यावर त्यांच्या डोक्यातही न येणारी वाट नेमकी आपल्याला दिसते आणि गोंधळ उडतो.

इथेही असंच झालं. समोरच बाडगीची माची दिसत असून सुद्धा वाटेची माहिती चौकशी करताना काहीतरी गोंधळ झाला आणि आम्ही नेमकी एक डावीकडची वाट पकडली, जी त्यांनी सोपी पडेल म्हणून सांगितली होती. परंतु ती वाट एका ठराविक ठिकाणी सोडून दुसरी वाट पकडायची हे मात्र त्या गोंधळात आम्हाला सांगणं महत्त्वाचं त्यांना वाटलं नसावं किंवा राहून गेलं असेल. पण त्यामुळे आम्ही चुकलो हे मात्र नक्की.

माचीचं टोक

अर्थात हे काही लगेच लक्षात नव्हतं आलं. त्यांनी दिलेल्या वाटेने आम्ही निघालो. वाट मळलेलीच असल्यामुळे काही चुकतंय असं आम्हाला वाटतंच नव्हतं. उजव्या बाजूला त्या माचीची सोंड आम्हाला दिसत होती, पण वाट विचारून निघालेले असल्याने हीच वाट बरोबर असणार. सरळ नाकाडाने वर न चढता, हीच वाट पुढे हळूहळू लांबून वरच्या बाजूला आम्हाला घेऊन जाईल, असा आमचा समज झाला.

वाटेने जाताना प्रचंड कारवी फुललेली आम्हाला लागली. त्यातूनच मळलेली वाट पुढे जात होती, पण काही अंतर गेल्यावर मात्र वाट अस्पष्ट होत गेली. आणि मग एका बाजूने पुढे जाऊन बघ, दुसऱ्या बाजूने पुढे जाऊन बघ... असं करत करत आमच्या लक्षात आलं, की माची फारच उजव्या बाजूला राहिली आहे आणि आम्हाला आता हळूहळू उजवीकडे जाणं भाग आहे. पण तशी वाट काही दिसत नव्हती. उजव्या बाजूला वरून येणारा एक ओढा, त्याच्या समांतर आम्ही चालत होतो. मग अशा एका जागी येऊन थांबलो की जिथून ओढा पार करणं शक्य होतं. जागा थोडी अरुंद होती.

अस्मादिक

पलीकडच्या बाजूला एक वाट दिसली आणि बऱ्यापैकी वाटायला लागलं की त्या वाटेने आपल्याला माचीवर जाता येईल. किमान योग्य वाटेवर तरी आपण पोहोचू. मग तो ओढा ओलांडला आणि थोड्याच वेळात आम्हाला योग्य वाट सापडली. मुळातच त्या उन्हामुळे नाकविंदा किल्ल्यावरून जो जीव अर्धा झाला होता त्यात नंतर वाट चुकल्यामुळे माझी तर बऱ्यापैकी तयारी झाली होती की इथूनच मागे फिरायचं. पण चिकाटी सोडली नव्हती, थोडं बघू, अजून जरा कळ काढून पाहू... अशातच योग्य वाटेला लागलो.

कारवी - पायघड्या

कारवीच कारवी चहूकडे, गं बाई, गेला ट्रेकर कुणीकडे

मग मात्र आमच्या प्रयत्नांना दाद म्हणून की काय, पण कारवीच्या चक्क पायघड्या घातलेल्या मिळाल्या... दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात फुललेली कारवी, मधून जाणारी चिंचोळी, निमुळती वाट आणि त्यावर अगदी निळ्याशाsssर कारवीच्या फुलांच्या पायघड्या! आता अशा फुलांवरून पाय देत जाणं कितीही नकोसं वाटलं, तरी वाट तीच असल्यामुळे त्याला पर्याय नव्हता. चहुबाजूने फुललेल्या कारवीचा आनंद घेत, उजवीकडची वाट पक्की धरत आम्ही माचीच्या पठारावर आलो. इथे पोचल्यावर मनावरचं आणि पाठीवरचं सगळं ओझं उतरवून ठेवलं आणि त्या ठिकाणाचा मनमुराद आनंद घेतला...

माचीच्या टोकावरून माची परिसर

भूगोलातून इतिहासात स्थान मिळवण्यासाठी या ठिकाणाच्या भाग्यात आले ते क्रांतिकारी राघोजी भांगरे. १८०५ साली राघोजी यांचा जन्म रमाबाईंच्या पोटी ह्याच अकोले तालुक्यातल्या देवगाव गावात झाला. काही आदिवासी ओव्या याबद्दल गायल्या जातात. रमाबाई जणू म्हणतात की,

रमाबाई म्हणे तो राघू, माझा तो लहान|
मावळे मुलखाचा ग राजा, होईल महान||

आणि ते खरं निघालं. वडील रामजी यांनी त्यांचे गुरु बनून आपल्या मुलाला सगळ्या विद्यात पारंगत केलं. १८२१ मध्ये त्यांना आणि गोविंद खडे/खरे यांना रतनगडच्या उठावात पकडण्यात आलं. नंतर पुढच्या ५ वर्षातच क्रांतीची नांदी झाली. राघूचा बंड.

रमाई बाई बोल, तू गं राघू माझ्या तान्ह्या|
राघू माझ्या तान्ह्या, जातो बाडगीच्या पाण्या||

या अशा ओव्या आदिवासी बांधवांमध्ये गायल्या जातात.

इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या बंडकऱ्यांचे निवासस्थान म्हणजे सोनोशी ता. इगतपुरी जि.नाशिक. हे बंडकरी क्रांतिकारी लोक इथल्या डोंगरांमधल्या गडदींमध्ये, म्हणजे गुहांमध्ये भूमिगत होण्यासाठी यायचे. या इथल्याच घनदाट जंगलात एका डोंगराच्या कुशीत आहे ही बाडगीची माची. बंडकरी क्रांतीवीर राघोजी भांगरे ह्यांच्या बंडाचं नियोजन ह्या बाडगीच्या माचीवरच्या गुहांमधून व्हायचं. इंग्रजांच्या सत्तेसाठी अतिशय पूरक असणारी सावकारी मोडून काढणं, या कार्याने या क्रांति कार्याची सुरुवात झाली. हे सावकार इथल्या आदिवासी जमातींकडून पैसे वसूल करून अत्याचार करत असत. या सावकारांचे कान आणि नाक छाटणे आणि सावकारी बंद पडण्यासाठी दहशत निर्माण करणे ही त्यांच्या क्रांतिकार्याची सुरुवात.

इथल्या या प्रदेशात एकाच ठिकाणी फक्त पूर्ण बाराही महिने पाणी साचलेलं असतं. हे पाणी ज्या कातळकोरीव आकारात साचतं, त्या आकाराचं पूर्वी स्वयंपाकाचे एक मातीचं भांडं होतं. भांड्याचं नाव बाडगी. म्हणून या माचीचं नाव बाडगीची माची. इथे भूमिगत राहून बंडाचे नियोजन करून क्रांतिकार्य करू पाहणाऱ्या क्रांतिकारकांचं पाणी पिण्याचे स्थानही कदाचित हेच असावं. ह्या क्रांतिकारकाचा शेवट १८४८ साली झाला. त्यांना ठाण्याच्या कारागृहात फाशी देण्यात आलं.

आदिवासी वीरांचा हा बालेकिल्ला, बाडगी माची नाव शोभे त्याला!
आशिर्वाद पाठी कळसुबाईचा, करू सन्मान बाडगी माचीचा!
महिमा वर्णू किती सहयाद्री खोऱ्याचा, करू सन्मान बाडगी माचीचा!

कळसुबाई जवळच असणाऱ्या ह्या अशा ऐतिहासिक ठिकाणाची भटकंती आम्ही पूर्ण केली. या भटकंतीत ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्याच्या समाधानाबरोबरच प्रचंड प्रमाणात कारवीच्या फुलांची उधळण बघायला मिळाली. अक्षरशः "कारवीच कारवी चहू गडे, ग बाई गेला ट्रेकर कुणीकडे" अशी आमची अवस्था झाली होती 😉

विनोद सोडा, पण ह्या एकदिवसीय ट्रेकने आम्हाला वेगळीच अनुभूती दिली. आग्या मोहोळाच्या धोकादायक वाटेवरून किल्ला पाहण्याचा समाधान मिळालं. कारवीचा फुलांची उधळण, पायघड्या मिळाल्या. त्यातच किल्ला बघून या माचीकडे येण्याच्या वाटेवर एके ठिकाणी तर चक्क आम्हाला नागांनी दर्शन दिलंन. हो अगदी दहाचा आकडा सुस्पष्ट दिसत असलेल्या, सुंदर फणा काढून थांबलेल्या नागाने आम्हाला दर्शन दिलंन. आणि जी सुरुवातीला उल्लेख केला ती गंमत म्हणजे... आता काय आहे, हा जो भाग आहे, परिसर आहे जुन्नरच्या आजूबाजूचा, येथे एका प्राण्याचा वावर फारच असतो. तशा बातम्या अधून मधून येत असतात. पण प्रत्यक्षात बघायला कधी मिळत नाही. परंतु त्या रात्री तो आमच्या नशिबात होता.

लहान बिबट्या

या नाकविंदा गावाकडे येण्याच्या वाटेवर एके ठिकाणी गाडीतून उतरून आम्ही पाय मोकळे करायला थांबलो होतो आणि त्यानंतर पुढे निघाल्यावर, अवघ्या पाच मिनिटांत समोरच अतिशय तुकतुकीत त्वचा, त्याच्यावर सुंदर काळे ठिपके, अशा रीतीने एका पूर्ण वाढ झालेल्या सुंदर बिबट्याने आमच्या गाडी समोरून रस्ता क्रॉस केलान.

दर्शन...

अक्षरश: थबकलो. कारण जागा निर्मनुष्य नव्हती, त्या जागी दोन्ही बाजूला घरं होती. तिथल्या लोकांनाही त्याची कदाचित कल्पना असावी, त्यामुळे त्या परिसरात कुठेही पाळीव प्राणी घराच्या बाहेर बांधलेले नव्हते. तिथून थोडं पुढे येतोच आहे, तोवर एक बिबट्या चक्क दबा धरून बसलेला होता. पण तो थोडा लहान असल्यामुळे आमची गाडी बघितल्यावर घाबरून कडेला लपायला गेला. तोवर आमचीही थोडी भीड चेपलेली होती, कारण ह्या आधी काही मिनिटांपूर्वीच सुंदर बिबट्या दिसला होता आणि आम्ही कारच्या आत मध्ये काचा बंद करून सुरक्षित होतो. त्यामुळे थोडं पुढे जाऊन सरळ मागे फिरलो. अशा दोन फेऱ्या मारल्यावर अतिशय सुंदर दर्शन त्या बिबट्याचं आम्हाला मिळालं, अगदी फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढता आला. मग मात्र त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्याला त्रास न देता मार्गस्थ झालो...

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Wednesday, December 6, 2023

विदर्भीय भटकंती - पितरांचा किल्ला - दृग

पितरांचा किल्ला - दृग

अजस्त्र किल्ला, अपरिचित किल्ला, कठीण/दुर्गम.. वगैरे वगैरे किल्ला अशी विशेषणं आपण किल्ल्यांची ऐकत असतो, पण अगागा... पितरांचा किल्ला! आता पितरांचा किल्ला म्हणजे काय, कुठे आहे वगैरे सगळं आपण नंतर पाहूच, पण आधी सांगतो की हा किल्ला, किल्ला सोडा, किल्ला असलेला हा जिल्हा पण आमच्या मूळ नियोजनात नव्हता.

नागपूर-भंडारा-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर अशी पंच-जिल्हा भटकंती करून परतताना, बुलढाण्यात देऊळगाव राजा व सिंदखेड राजा ह्या राजांना मुजरा करून परतायचं, असं मूळ नियोजन. मुळात हेच नियोजन कितपत यशस्वी होईल वगैरे धाकधूक होती. त्यापायी नियोजनात बऱ्यापैकी अधिकचा वेळ ठेवला होता. पण दिवसाच्या प्रकाशाचं नियोजन जमलं आणि तो वेळ वापरावाच लागला नाही, त्यातून तगडी साथ मिळालीच होती आणि त्यामुळे चक्क एक पूर्ण दिवस हातात पडला.

मग इतक्या लांब आलोच आहोत, तर अजून एक दिवस घालून दोन दिवसात चक्क वर्धा आणि यवतमाळ ही बघून घ्यावेत असा ठराव बहुमताने पास झाला. मागच्या लेखातले लहान लहान किल्ले जसे पाहिले, तसेच "पवनी" हा मोठा किल्ला आहे तोही पाहिला. जोडीला काही मंदिरं पण खात्यात जमा केली. "उमरेड" हा नागपूर मधला पाहिलेला शेवटचा किल्ला.

नाचणगांवची गढी व गढीचे मालक श्री देखमुख यांचे समवेत

त्यानंतर घुसलो वर्धा मध्ये. इथे बहुतांशी गढ्याच आहेत, त्यातही काहीच व्यवस्थित तर बाकी पडझड झालेल्या आणि कशाबशा तग धरून राहिलेल्या. नाचणगांवची गढी तर गढीचे मालक श्री देखमुख यांच्याकडे पाहुणचार घेऊन पहिली. "केळझर"चा गणपती, हा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपती. या गणपतीचे मंदिर हे चक्क एका किल्ल्यात आहे, तो केळझरचा किल्ला. हा गिरीदुर्ग असला तरी मंदिर असल्यामुळे इथे दारात गाडी जाते. हिंगणी, आंजी मोठी, धुळवा, पवनार, अल्लीपूर, सोनेगाव-आबाजी, नाचणगाव, विरूळ यात वर्धा संपवलं.

यवतमाळ मधीलही रावेरी, कळंब हे गढ्या-किल्ले पाहिले आणि मग ठरल्याप्रमाणे मोर्चा वळवला तो "पितरांचा किल्ला" उर्फ "दृग" उर्फ "दुरुग" उर्फ "दुर्ग" ह्या किल्ल्याकडे.

यवतमाळ जिल्ह्यातला हा एकमेव गिरीदुर्ग. पण ज्या किल्ल्याला भेट द्यायची होती, त्या किल्ल्याचे नाव मुळात दुरुग, दृग ती दुर्ग याबाबतच संभ्रम होता. महत्त्वाचं म्हणजे गुगलवर हे स्थळ मॅपही नव्हतं. त्यामुळे कळंबवरून "याला विचारू, की त्याला विचारू" करत गावात पोचलो. तिथे पोचल्यावर गावाचं आणि पर्यायाने किल्ल्याचे नांव हे दुर्ग नाही हे तरी नक्की झालं. मुळात हे "दृग" असावं आणि अपभ्रंश "दुरुग".

हनुमान मंदिर

हा किल्ला खरंच निबिड अरण्यात आहे. गांव सोडलं की लगेच इथे एक जलाशय आहे, त्यावर धरण आहे. हे दृग धरण किंवा दृग जलाशय. भारतात देव-धर्म, देवळं-मंदिरं ह्याबाबत कितीही नकारात्मक आरडाओरडा होऊ दे, या देवस्थानांमुळे त्या त्या ठिकाणांचा विकास झाला आहे, हे नाकारून चालणार नाही. अल्पपरिचित किंवा अशा दुर्गम ठिकाणी भटकंती करणारे तरी हे नक्की नाकारणार नाहीत. हा दृग किल्ला पण दुर्गम ठिकाणीच आहे. घनदाट आणि Untouched जंगल यामुळे तिथे वन्य प्राण्यांचा वावर सहज आहे. अर्थातच अशा ठिकाणी जाणं धोक्यातच असतं. पण गंमत म्हणजे त्रिभुवनात शब्दशः कुठेही पाठीशी असणाऱ्या देवतांपैकी एक, असे हनुमान इथे, ह्या अरण्यातही आपले तारणहार ठरतात. इथे असलेल्या हनुमान मंदिरामुळेच इथे रस्ता झालेला आहे. आणि सांभाळून नेल्यास इथपर्यंत चार चाकी जाऊ शकते. माझी स्विफ्ट आणि साथीदारांवर विश्वास ह्यामुळेच आम्हीही गांव ओलांडून धरणाच्या कडेने "सिनीक", पण कच्च्या रस्त्यावरून Offroading करत मंदिरापर्यंत पोहोचलो. अन्यथा गाडी धरणाजवळ ठेवून पुढे जंगलातून या मंदिरापर्यंत यायला तासभर तरी लागत असणार. आमचा हा वेळ वाचला.

श्रीपाद चितळे हे त्यांच्या विदर्भातल्या किल्ल्यांविषयी लिहिताना ह्या किल्ल्याबाबत असं नमूद करतात, की "जंगल इतके घनदाट की, सूर्यप्रकाश इथे झिरपत नाही". आता त्यांनी ज्या काळात भटकंती केली त्या काळात नक्कीच ही परिस्थिती असेल. फक्त सध्या आम्ही जात असलेल्या वेळी पानझडीमुळे म्हणा किंवा नंतर कदाचित वाढलेल्या मानवाच्या वावरामुळे म्हणा, किमान इतकी भयानक परिस्थिती नाही दिसली. हा, परंतु इथल्या जंगलाला अरण्य म्हणावं इतपत नक्कीच दाटपणा आहे, अगदी घनदाटपणा आहे. दुर्गम स्थान, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हिंस्त्र श्वापदांचा वावर, ह्यामुळे अर्थातच इकडे, चितळेंच्या भाषेत सांगायचं, तर मानवाचा चहाळ अत्यंत कमीच आहे. एकटा-दुकटा ह्या बाजूला फिरकत आला, तर श्वापदांच्या तावडीत सापडून परत जिवंत जात नसावा. त्यामुळे अर्थातच इथे भुताखेतांच्या, पितरांच्या गोष्टी जोडल्या जाणे यात नवल ते काय? म्हणूनच याला "पितरांचा किल्ला" म्हणत असावेत.

हा किल्ला १५-१६व्या शतकात बांधला असावा व माहूरच्या "उदाराम देशमुख" यांच्या अखत्यारीत येत असावा, अशी शक्यताही चितळे इथे नमूद करतात. तुरुंग सदृश अशी किल्ल्याची रचना असल्याचेही ते म्हणतात, जे स्वाभाविक वाटते ते याच्या रचनेवरून आणि स्थानावरून.

आम्ही निवडलेल्या वेळेमुळे सूर्यप्रकाश मात्र मुबलक होता. त्यामुळे अर्थातच जंगलाविषयीची भीड चेपली गेली होती. त्यात मंदिर-परिसर यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, आपल्याला सुरक्षिततेचे आश्वासक वातावरण जाणवते, हे का नाकारावे? मंदिराच्या शेजारून वाहणारा ओढा सगळं मन प्रसन्न करून गेला. वावरताना चहू बाजूला लक्ष ठेवणे क्रमप्राप्तच होते.

मंदिराजवळ सावलीत गाडी नीट लावून सरळ गडाची वाट धरली. उजवीकडची वाट गडावर घेऊन जाते तर डावीकडेही एक वाट जाते, मात्र ती जंगलातून पुढे जात असावी.

पायऱ्यामार्ग आणि दरवाजा

अवघ्या काही मिनिटातच दरवाज्यात पोचलो. म्हणजे दरवाजा असा शिल्लक नाहीये पण बहुतेक नव्याने किंवा जिर्णोद्धारित म्हणा, पण समोर असलेला पायऱ्यामार्ग पूर्वी इथेच दरवाजा असावा असं दर्शवतो.

अवशेष

किल्ल्यावर तसे फार अवशेष शिल्लक नाहीत. मुळातच दुर्गमता आणि त्यातून वापर तुरुंग म्हणून केला जात असल्याने फारसे बांधकामही केले गेले नसावे त्या काळीसुद्धा बहुदा. अर्थातच फार काही नसले तरी नैसर्गिक आणि बांधीव तटबंदी, पाण्याची व्यवस्था आणि जोडीला एखादं देवस्थान हे असतंच असतं. देवस्थानांचा फायदा हा असा, की किमान इथे येऊन पोचणारी वाट तरी रुळलेली असते. त्याप्रमाणेच आमचं लक्ष्य माहिती असल्याने ते समोर ठेवून इतरत्र अवशेष शोधत होतो. तटबंदीचे अवशेष दिसत होते आणि मंदिरामुळे वाटेत भगवे ध्वज आणि जवळपास एका वाड्याचे अवशेषही दिसले.

जगधामी मंदिर

सरळ मंदिर गाठलं. हे जगधामी मंदिर! मूळ जुन्या मंदिराचे अवशेष इथे होतेच. त्याने त्याचं स्थान आणि महत्त्व दर्शवलं जात होतं पण कालांतराने ते ढासळलं असावं. पण म्हणूनच त्यानंतर आता जिर्णोद्धारित मंदिर हे भक्तांचा आणि जुन्या देवळाचाही आसरा झालं आहे.

अवशेष

देवळाच्या मागे खालच्या बाजूला तटबंदीचे अवशेष आहेत, तर देवळाच्या समोर काही अंतरावर पाण्याची व्यवस्थाही आहे. परंतु त्याची निगा राखली न गेल्याने ते कोरडे झालेले आहे. आणि त्याचे स्थानही पक्के कळत नाही. जागोजागी वन्य प्राण्यांच्या विष्ठा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र करून देतात.

गाडीजवळ माकडंच माकडं

आल्या वाटेने किल्ला उतरून आलो. आजूबाजूला पाहिल्यावर देवळाच्या परिसरात विहीर दिसली. देवळात सामान ठेवून विहिरीतून पाणी काढलं. थंड पाणी पिऊन हातपाय धुऊन फ्रेश झालो. वळून बघितलं तर काय, गाडीजवळ माकडंच माकडं जमा झालेली होती. २०-२५ तरी असतील. आम्हाला बघून पळून जातील असं वाटलं, पण उलट आम्हाला चिडवायला सरळ गाडीवरच चढली. जाऊदे, जातील त्यांची त्यांची, असं म्हणून फार लक्ष न देता मंदिरात गेलो.

यक्षराज कपिमुखी हनुमान

हे हनुमान मंदिर, यक्षराज कपिमुखी हनुमानाचं आहे. निवांत दर्शन घेतलं. पण त्यानंतर आमच्या लक्षात आलं, की बाहेरची गाडीवर फिरणारी माकडं आता मंदिराकडे येत आहेत. आधी दरवाजा लावून घेतला, तर बाहेरून त्यांचा दरवाजा उघडायचा आटापिटा चालू झाला. मंदिराच्या छताजवळ मोकळी आणि अरुंद जागा असलेली जाळी आहे, त्यातून आत यायचा प्रयत्न चालू झाला. नंतर तर आमच्या हुसकवण्याच्या प्रयत्नांना दाद न देता ते आत घुसणार, हे लक्षात आल्यावर आम्ही सगळ्यांनी सामान घेऊन एकदम दरवाजा उघडला. आम्हीच जोरात आरडाओरडा करत बाहेर आलो आणि माकड दचकून बाजूला झाली. जरा वेळ बाजूला झाली खरी, पण आमच्या बॅगेतल्या केळ्यांचा वास त्यांना बरोबर गेला. क्षणभरही न थांबता, आम्ही सरळ सगळी केळी काढून, एका बाजूला फेकून गाडीकडे पळालो.

हुश्य... गाडीत बसलो आणि आधी गाडी बाहेर काढली. सावकाश सावकाश वळण घेत, त्या कच्च्या रस्त्यावरून परतीची वाढ धरली. थोडं अंतर जातो तर काय, समोर नीलगाईंचा कळप! थोडं मागेच थांबलो. पण ह्या नीलगाई आपल्यातल्या नांवातल्या गाईप्रमाणेच गरीबही असाव्यात, किमान आम्हाला तरी काही त्रास झाला नाही.

पुन्हा धरणाजवळच्या वाटेवरून गावात आलो. फोनला नेटवर्क आल्यावर पहिलं काम केलं, ते गुगल मॅपवर आत्तापर्यंत मॅप नसलेल्या या किल्ल्याचं स्थान चिकटवलं. जगधामी मंदिराजवळ आमचा आम्हीच Timer लावून काढलेला फोटो सुद्धा अपलोड झाला.

वर्धा-यवतमाळ मधील किल्ले पाहून झाल्यावर ही विदर्भ भटकंती सुफळ-संपूर्ण झाली. परतताना सिंदखेड राजा मध्ये किल्ला बघितला आणि जिजाऊंना मुजरा करून या भटकंतीची सांगता केली.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!