Tuesday, August 8, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले माणिकगड

किल्ले हे राज्यासाठी इतके महत्वाचे असतात की राज्यासाठी जणू ते रत्नच. म्हणून आपल्याकडे रत्नांशी निगडित नांवं किल्ल्यांना आहेत. त्यातही माणिक हे एक मोलाचे रत्न, म्हणून रायगड मधला माणिकगड, नाशिकमध्ये माणिकपुंज आणि रत्नागिरीमध्ये माणिकदुर्ग. तसेच एक माणिक-रत्न आहे चंद्रपुरात गडचांदूरजवळ “माणिकगड”!

विदर्भ मुळातच जंगल समृद्ध, अर्थातच त्यात वनदुर्गांची संख्या जास्ती असणारच. त्यातलंच हे एक माणिक रत्न – किल्ले माणिकगड. या भटकंतीत सुरुवातीला मध्यप्रदेश सीमेजवळ जाऊन, नंतर छत्तीसगडमध्ये घुसून, परत महाराष्ट्रात आलो होतोच. आता माणिकगड म्हणजे चंद्रपूरपासून खाली जायचं होतं, तेलंगण सीमेजवळ.

जंगली भागातला हा किल्ला, जिथे अस्वलांसह वाघांचाही वावर आहे, अशा ठिकाणी जायचं म्हणजे पहाट आणि संध्याकाळ टाळायची. आमच्या नियोजनात हे उत्तम जुळत होतं. चंद्रपूर पाहून दुपारीच आम्ही इथे पोचणार होतो.

“माणिकगड किल्ला” म्हटलं की “माणिकगड सिमेंट” कारखान्याचा उल्लेख करणं हे शास्त्र असतं. आता किल्ल्याच्या नावावरून जर कारखान्याचे नांव असेल तर उल्लेख होणारच आणि त्यातून गडचांदूर सोडलं, की रस्त्यातूनच वरती सिमेंट आणायची मालाची वाहतूक करणारा रोप-वे दिसतो. ह्या पाळण्यांतून सारखी मालाची ने-आण चालू असते.

किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंगमध्ये गाडी त्यातल्या त्यात सावली बघून लावली आणि सगळी आयुधं बाहेर काढून एक एक परिधान करून सिद्ध झालो. हा किल्ला वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांची चौकी गाठली आणि शुल्क भरून तिकीट घेतलं.

कच्चा रस्त्याने किल्ल्याकडे जायला सुरुवात केली. विदर्भ हा कोकणापासून महाराष्ट्राच्या विरुद्ध टोकाला असला तरी काही समानता आश्चर्यकारक आहेत. कोकणात मुख्य पीक तांदूळ, तर विदर्भात भंडारा म्हणजे “राईस सिटी”च.. तशी इकडे मातीही. कोकण्याच्या डोळ्याला सुखावणारी लाल माती!

माणिकगड दरवाजा

दुपारी बाराच्या उन्हात तर पायाखायची आधीच लाल असलेली माती अगदी ज्वलंत भासत होती. उजव्या बाजूला वरती झाडीझुडपांच्या वरतून डोकावत असणारी तटबंदी बघत गडाच्या दरवाजात पोचलो सुद्धा. इथे एक तुटकी तोफ बेवारस पडलेली आहे. नाग, हत्ती, शरभ अशी द्वारशिल्प बघत बघत दरवाजा ओलांडला.

दुसऱ्या दरवाजाकडे घेऊन जाणारी खिंडीची वाट

दुसरा दरवाजा आणि त्यातून किल्ल्यात घेऊन जाणारी खिंडीची वाट

संवर्धन केलेली तटबंदी निरखत, पायऱ्याकडून खिंडीसारख्या वाटेवरून दुसऱ्या दरवाजात पोचलो. ह्या दरवाजाची जागा भन्नाट आहे. एक तर सध्या दरवाज्यात समोरच जाड खोडाचं मस्त झाड आहे आणि दुसरं म्हणजे हा दरवाजा नंतरही आपण आत आलेलो आहे तश्याच खिंडीच्या वाटेतून आपल्याला पुढे घेऊन जातो.

शहाणे काका पुढे जाऊन माझ्यासाठी खिंडीत थांबले होते, तर महेश आणि संतोष मागून रमत-गमत फोटो काढत येत होते. वनविभागाने लावलेला गडाचा नकाशा बघत त्यांची वाट बघत थांबलो, कारण पुढे जंगल होतं. सगळ्यांनी एकत्र फिरणं चांगलं, नव्हे गरजेचंच! वनविभागाने चक्क हमरस्तेच करून ठेवलेले असल्याने चुकण्याची काही शक्यता नव्हती, पण तरीही एकत्र फिरण्यात मजाही आहेच की.

बेलाचं झाड

या बोर्डाजवळच उभा असताना मागे एक छोटं फळ पडलेलं सापडलं. बेलाचं फळ बघितलं तेव्हा लगेच नजर फिरवली, तर त्याच झाडाच्या सावलीत उभा होतो. एवढी मोठी बेलाची झाडं बघायची सवय नसल्याने मला या झाडाचं अंमळ आकर्षण आहे. हळूच फळ खिशात टाकलं.

गणपती चौक

वनविभागाने आखून ठेवलेल्या मार्गावरूनच फिरताना इथलं जंगल किती दाट आहे हे लक्षात येत नाही, पण जर चुकून धोपट मार्ग सोडून झाडीत शिरलं तर कल्पना येईल की इथे वन्य प्राण्यांचं वास्तव्य का आहे. वन्य विभागाने तयार केलेल्या गणपती चौकात गेल्यावर श्री गणेशाचं दर्शन घेऊन राणी महाल-तलावाकडे गेलो. ह्या गणपती चौकात गणपतीच्या मूर्तीशेजारी एक दगडी गोटा आणि तो ठेवायला केलेला दगडी द्रोण आहे. आपल्या हाताने आपले कान पकडून कोपरांनी हा गोटा सावकाश उचलून परत जागेवर ठेवला कि आपली सगळी पापं धुवून जातात असं मानलं जातं. अश्या सोयी बऱ्या असतात ना मध्ये मध्ये 🤣

राणीमहाल - राणीतलावाकडे जाणारा मार्ग

राणी महालात फिरून वरतून पलीकडे खाली राणी तलावाचं दृश्य सुंदर दिसतं. गंमत म्हणजे हे अवशेष जमिनीच्या पातळीला नाही आहेत. सपाटीवरून चालताना अवशेष बघायला एकदम काही पायऱ्या उतरून खालच्या पातळीला यावं लागतं. मग राणी महाल आणि त्याच्याही खालच्या पातळीला पलीकडे राणी तलाव. राणी महालाचे टप्प्याटप्प्यात असलेलं बांधकाम मस्त फिरून बघता येतं. थँक्स टू वनविभाग! त्यांनी केलेल्या स्वच्छतेमुळेच इतक्या छान पद्धतीत हे बघता येतं. नाही तर झाडीत गडप झालेले अवशेष, झाडी बाजूला करून-करून रुक्षपणे बघायला लागले असते.

राणीतलाव

राणीतलाव

राणी-तलाव मात्र बेफाट आहे. हे राजे मुळात रसिकच. एवढा मोठा प्रचंड तलाव, त्याच्या काठावर राणी महाल आणि अशा तलावात पोहता येऊ शकतं. पण खास राण्यांसाठी सुरक्षित म्हणून राणी महालाला जोडूनच, त्याच तलावात भाग करून एक छोटा प्रायव्हेट स्विमिंग पूल. तो सुद्धा मस्त रुंद फांजी आणि चर्यायुक्त तटबंधित केलेला.

हे सगळे अवशेष जमिनीच्या पातळीच्या खालच्या बाजूला आहेत. तसंच जंगल भागामुळे इथे तलावात वन्य-प्राण्यांचा वावर. म्हणूनच कदाचित, इथल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक बुरुज बांधलेला आहे. हा जमिनीच्या पातळीला आहे. ज्यावरून राणी महाल आणि पूर्ण तलावावर एका दृष्टीक्षेपात लक्ष ठेवता येतं. ह्याला “बोकड डोह नाला” म्हणतात.

इतर अवशेष

इथं पुढचं दुसरं लपलेलं प्रवेशद्वार शोधत निघालो. ह्या बाजूला तटबंदी आहे. प्रवेशद्वार लपलेलं ह्यासाठी, कि इथला दरवाजा नेमका दिसतंच नाही. बऱ्यापैकी शोधाशोध केल्यावर तो नाद सोडला. उगाच जंगलाची परीक्षा कशाला घ्या... तिथल्या प्राण्यांना आमचा त्रास नको ना उगाच! पण दरवाजाचे स्थान नक्की लक्षात येतं कुठे असू शकेल तो.

त्यानंतर वाटेत फिरताना इतर अवशेष दिसतात, ते बघितले. पण या भानगडीत बऱ्याच दाट जंगल भागात आलो होतो. किल्ल्याच्या कडेकडेच्या बाजूने जाताना तोंडावर येणाऱ्या वेली, झाडांच्या फांद्या बाजूला करतच जायला लागत होतं. डाव्या बाजूला डोंगर-कडाच होता आणि ज्याला पूर्ण तटबंदीही शाबूत असलेली दिसली.

पाताळ-विहीर

त्या नंतर मग मोर्चा ह्या किल्ल्याचं आकर्षण असणाऱ्या वास्तु-अवशेषाकडे वळवला. “पाताळ-विहीर” 😊 आता नांवावरून लक्षात येतच असेल की, एक तर ही विहीर पाताळात तरी असेल किंवा पाताळात घेऊन जाणारी तरी... कदाचित दोन्हीही म्हणता येईल, कारण राणीचा महाल जसा जमिनीच्या पातळीच्या खाली आहे, त्या सारखीच, उलट त्यापेक्षा अजूनच खाली, जणू पातळतच की-काय, अश्या ठिकाणी ही विहीर आहे. कसलं स्थळ शोधून ही विहीर खणली आहे! चारही बाजूने उंच दगडी भिंती, आणि मध्ये चौकोनी विहीर. मस्तपैकी चिऱ्यांनी बांधून काढलेली आहे. लाल माती बरोबर कोकण्याच्या डोळ्यांना सुखावणारी ही अजून एक वस्तू - जांभा दगड.

वनविभागाने इथे लोखंडी रेलिंग लावल्याने येथे वावरणं धोकादायक राहिलेलं नाही. निवांत विहीर बघून, परिसरात दाट सावलीत बसून ते ठिकाण अनुभवले आणि तेवढ्यात काही पर्यटक इथे येणाऱ्या पायऱ्या उतरताना दिसले. “आता हवं तर घाला काय तो गोंधळ घालायचा असला तर” म्हणून सुटकेचा निश्वास टाकला.

पातळ विहिरीकडून पॅगोडाकडे आलो. ही जागा सुंदर आहेच आणि पॅगोडाही सुंदर बांधलेला आहे. फक्त डागडुगीची गरज मात्र आता आहे. पुढे एक रस्ता घोड्याच्या पागेकडे जातो तर दुसरा रस्ता "टहाळकी बुरुज" नावाच्या वास्तूकडे. ह्या वास्तूसमोरच एक सुंदर सूचना लिहिली आहे, “आपण पहावे आणि दुसऱ्यांना पाहण्यास संधी द्यावी”. खरंच, लोक एखादी गोष्ट पाहून तिथेच रेंगाळत बसतात. निवांत फिरताना लक्षातही घेत नाहीत, की आपला कदाचित दुसऱ्याला त्रास होत असेल. मग अपमान करून घेतात आणि चिडतात.

सदर

असो, पण वास्तु मात्र खणखणीत आहे आणि "टहाळकी" म्हणजे टेहळणी असा अर्थ अभिप्रेत असावा. पण एकूण बांधकाम बघताना येथे सदर असणार. पण सदर जागेचा उपयोग मात्र जोडपी छानसा आडोसा म्हणून करतात. त्यांना आमचा त्रास होऊ न देता जिन्यांना चढून वर गेलो. इथून गड परिसर अप्रतिम दिसतो.

या वास्तूच्या समोर तुटकी तोफ पडलेली पाहून पुढच्या बुरूजाकडे निघालो. हा "संत्री बुरुज". हा बुरुज छोटासा, पण सुस्थितीत असल्याने बघायला छान वाटलं. वनविभागाचं कौतुक म्हणजे परिसर एकदम स्वच्छ ठेवलेला आहे. एकतर झाडी वगैरे साफ केलेली आहे. त्यात लोकांनी कचरा वगैरे टाकलेला नसावा किंवा टाकलेला असल्यास, स्वच्छ केलेला आहे. त्यामुळे अवशेष बघायलाही छान वाटतात. इथे एक सूचना मात्र गमतीशीर आहे “पर्यटकांना कुठलाही त्रास होणार नाही असे अमानुष कृत्य करू नये” आता व्याकरण-चुका सोडून दिल्या, तरी ही सूचना नक्की कोणासाठी ही गंमतच आहे. आता पर्यटकांना त्रास होण्यासारखं कृत्य कोण करणार? आणि तेही अमानुष 🤣 कदाचित इथल्या वाचता येणाऱ्या, सुशिक्षित वन्यपणासाठी असावी.

संत्री बुरुज आणि वनखात्याचा टेहळणी टॉवर

पुढे वनखात्याचा टेहळणी टॉवर लागतो. इथे शेजारी वनरक्षकांसाठी एक खोलीसुद्धा बांधलेली आहे. या जागेवर कदाचित पूर्वी बुरुज असण्याची शक्यता आहे पण सध्या तसे काही बांधकाम दिसत नाही.

आमची गडफेरी पूर्ण झाली होती. एक वनरक्षक प्राण्यांच्या माहितीसाठी लावलेले Motion-trap कॅमेरे रिकामे करण्यासाठी घेऊन जात होता, त्याला पकडलं. त्याच्या कॅमेराने त्यात अस्वलं वगैरे पकडलेली होती. मग ऐकीव माहितीची खात्री पटली.

अवशेष बघून झाले. ह्या गडाचं नांव तिच्यावरून पडलं त्या “माणिक्या” देवीचं दर्शन मात्र इथे होत नाही. तसं काही स्थानही नाहीये इथे. “राजा गहिलु” ह्याने नवव्या शतकात हा किल्ला बांधण्याची नोंद आहे आणि त्याचे चिन्हही प्रवेशद्वारा जवळ आहे. ह्यांची अग्रदेवता माणिक्या देवी. हा गड पदरात पडल्यावर आमचा परतीचा प्रवास म्हणावा असा प्रवास चालू झाला, कारण आता परत फिरून वर-वर जात जिथून सुरुवात केली त्या नागपूरकडे वाटचाल होणार होती.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!