Friday, May 26, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले प्रतापगड

किल्ले प्रतापगड

“प्रतापगड” म्हटलं की लगेच चित्रंच उभं राहतं डोळ्यासमोर. एकीकडे एक अवाढव्य राक्षस अफजलखान, दुसरीकडे त्याच्या बगलेत त्याच्यापुढे अगदीच खुजे दिसणारे शिवाजी महाराज. एकीकडे डोळ्यात कृरता, राग, भीती आणि अहंकारावर घाला घातला गेल्याचे भाव, तर दुसरीकडे करारीपणा, आत्मविश्वास असणारे तेजस्वी डोळे! “शिवप्रताप” हे नांव त्या दिवसाने दिमाखात मिरवावं अशी त्या दिवशी घडलेली, शतकांत एकमेव अशी ती घटना. आणि हा “प्रताप” ज्या गडाशी संबंधित आहे, तो “प्रतापगड”! सहाजिकच पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर आणि मनात हीच घटना येते. पण हा प्रतापगड तर साताऱ्यात आहे. मग विदर्भाच्या या लेखमालेत या “जंगलातल्या” गडाची “वाईल्ड कार्ड” इंट्री झाली की काय”?

कचारगड गुहा

नाही, नाही. आम्ही “अंबागड” या भंडाऱ्यातल्या भटकंतीनंतर शिरलो ते गोंदिया जिल्ह्यात. गोंड राजांचा, आदिवासी बहुल गोड स्वभावाच्या लोकांचा हा जिल्हा. नागपूर-भंडारा एकवेळ ठीक आहे, पण गोंदीया आणि गडचिरोली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या लोकांसाठी एकदमच वेगळा. गोंदियात शिरलो आणि कामठा हा भुईकोट किल्ला बघून नक्षलवादी भागातली “कचारगड” गुहा पाहिली. नावात “गड” असला तरी हा किल्ला नाही. कचारगड गुहा हे आदिवासी लोकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान. इथे महाराष्ट्रातले आदिवासी तर येतातच, पण आजूबाजूच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा वगैरे मधले आदिवासी भाविक पण मोठ्या संख्येने येतात. या वार्षिक उत्सवाच्या वेळी तिथे नक्षलवादी सक्रिय नसतात कारण यापैकी लोकांचेही श्रद्धास्थान असेलच की ते. इथे येण्याआधी काही ठिकाणी “आशिया खंडातली सर्वात मोठी” असा उल्लेख ऐकला होता. खरं-खोटं देव जाणे, पण ही गुहा आहे मात्र प्रचंड.

आदिवासी भाविकांबरोबर

या भेटी नंतर काही थोड्या अंतरासाठी गाडी आयुष्यात प्रथमच छत्तीसगड राज्यात घातली. परत फिरून महाराष्ट्रात आलो आणि आधी सानगडी उर्फ सहानगड किल्ला बघून दुसऱ्या दिवशी पोचलो ते प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगड गावातच. होय, गोंदिया जिल्ह्यात प्रतापगड हे गांव आहे आणि तिथेच हा किल्ला आहे. म्हणजे हा लेख आहे तो गोंदियातल्या याच प्रतापगडातल्या किल्ल्यावर. पण हाही प्रतापगड जंगलातच आहे, म्हणजे थोडक्यात “वाईल्ड कार्ड एन्ट्री” म्हणायला हरकत नाही.

असो.. तर मूळ नियोजनात इथे दुपारी येणं होणार होतं, पण आधीचे किल्ले वेळेआधी झाल्याने हाही दुपार वरून सकाळ वर आला होता. फायदा असा कि वेळेआधी असल्याने पुढील भटकंतीत हाताशी जास्तीचा वेळ असणार होता. पण याचा एक छोटासा तोटा असा झाला, की किल्ल्यावर न्यायला वाटाड्याच मिळेना. कारण एक तर सगळे कामाला चालले होते आणि या जंगलात अस्वलं आहेत, त्यामुळे जे होते ते ८ च्या आधी यायला तयार नव्हते. जंगलाची माहिती असणाऱ्या कोणालाही सहज कळेल की अशा ठिकाणी जाणं किती धोक्याचं असतं. त्यामुळे अर्थातच वाटाड्या मिळत नसला, तरीही वेळ वाचावा म्हणून स्वतःचं स्वतः जाणं आम्हाला संयुक्तिक वाटत नव्हतं. अर्थातच वाटाड्याची तजवीज होईपर्यंत प्रयत्न करत खालीच थांबणं भाग होतं.

मुळात “या” प्रतापगड विषयी माहिती आंतरजालावर तशी कुठेही सापडत नाही. एखाद-दोन पुस्तकात थोडीशी माहिती आहे. त्यांच्या वेळेला त्यां लेखकांनी बघितलेल्याप्रमाणे त्यांनी ती माहिती लिहिलेली आहे. त्यानुसार गावातून अर्धा तास चढून गेल्यावर एक “मजार” लागते असा उल्लेख आहे. सध्या या दर्ग्यापर्यंत गाडी जाते त्यामुळे आपला अर्धा तास वाचतो. हा दर्गा “ख्वाजा उस्मान गनी हरून” याचा आहे. किल्ल्याचाच हा भाग आहे. गोंड राजांच्या काळात या किल्ल्याची उभारणी झाली असून याची बांधणी सोळाव्या शतकातील असावी. नंतर तो देवगडचा राजा बख्तबुलंदचा सिवनीचा दिवाण राजखान पठाण याच्या ताब्यात आला. चंद्रपूरच्या गोंड राजांच्या उत्तरेच्या आक्रमणास रोखणारा हा किल्ला देवगडकर गोंडांनी बांधला असं नमूद केलेलं आढळतं.

दर्ग्याजवळची तटबंदी

दर्गा

वाटाड्या शोधण्यात आमचा तब्बल दीड तास गेला. दर्ग्याजवळच पोहोचायलाच साडेसात होऊन गेले. पण जंगली प्राण्यांच्या वावराची वेळ आता टाळून गेली असं धरायला हरकत नव्हती. त्यात वाटाड्या मिळाल्यावर आमची काळजी मिटली. दर्ग्याजवळचा भाग हाही किल्ल्याचाच भाग आहे हे सिद्ध करणारे जुन्या तटबंदीचे अवशेष इथे शिल्लक दिसतात.

किल्ल्याचा वाटेवरील कातळकडा

ह्या कड्यालाच मधाची पोळी आहेत

त्या घनदाट जंगलात शिरून किल्ल्याच्या अजस्त्र दिसणाऱ्या कातळ कड्याशी अवघ्या पंधरा मिनिटात येऊन पोहोलो. दाट जंगल, त्यात पहाटेची वेळ टाळून गेली असली तरी थोडीशी धाकधूक. त्यात समोरच्या अंगावर आलेल्या कातळकड्याला लगडलेली मधमाशांची पोळी. सगळे एकदम शांत झालो.

कड्यात वाघाची गुहा - किल्ल्यावर शेजारी वाटेने जाता येते

गडावर जाण्यासाठी याच कड्याला डावीकडे ठेवत याच्या जवळूनच वर जावं लागतं. इथेच एक गुहा आहे, स्थानिक त्याला वाघाची गुहा म्हणतात. इथं वाघाचं वास्तव्य असतं असं ते सांगतात.

दाट जंगलातल्या वेली

हे घनदाट जंगल अतिशय समृद्ध आहे. प्रचंड मोठे मोठे आणि औषधी वृक्ष इथे आहेत. इथल्या वेली या सकाळी सुद्धा घाबरवतात. पण हीच तर खरी वृक्ष संपदा आहे.

चौकोनी बुरुज

अवघ्या दोन मिनिटांतच गडाच्या पहिल्या बुरुजाचं दर्शन झालं. या भागातल्या बहुतेक डोंगरी किल्ल्यांचे बुरुज असेच चौकोनी आहेत. आपण या लेखमालेतील “भीमसेन कुवारा” या किल्ल्याच्या लेखात तसे पाहिले होते.

बुरुज आणि पुरातत्व खात्याच्या पाटीचे अवशेष

बुरुजावर इथे कबर आहे

बुरुजावरून खाली परकोटाचे अवशेष दिसतात

इथून पाच मिनिटांत, वर आल्यावर समोर पुरातत्व खात्याची पाटी दिसते किंवा म्हणूया की तिचेही अवशेष दिसतात. इथे असाच एक चौकोनी बुरुज असून त्यावर जाणाऱ्या पायऱ्या डावीकडून आहेत. वर एक कबर आहे. इथून खाली पाहिल्यास जंगलात दडलेले थोडके परकोटाचे अवशेष दिसतात. आपण उभा असलेला बुरुज मुख्य गडाचा भाग आहे. वर चढून गेल्यावर बालेकिल्ला आहे, तर कातळकड्यानंतर दिसलेला पहिला चौकोनी बुरुज, हा माचीचा भाग आहे.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आणि बुरुज

ह्या बुरुजाजवळून पुढे न जाता डावीकडे वरती बालेकिल्ल्याकडे जायचं, कारण बुरुजाच्या पुढे दाट जंगलाचा भाग आहे. त्यामुळे तिथे जरी शिल्लक असतील तरी अवशेष शोधणं कठीण आहे आणि जंगलाच्या भागात पाणवठे असल्याने तिथे जाणही धोक्याचं आहे.

आतील भागात वाड्यांचे अवशेष

तटबंदीतील चर्या

बालेकिल्ल्याच्या भग्न दरवाज्यातून आपण बालेकिल्ल्यात आल्यावर झाडी विरळ झालेली दिसते. इथेही तटबंदीचे भरपूर अवशेष आहेत, त्याला चर्या आहेत. पुढे जाता-जाता वाटेत वाड्यांचे चौथरे दिसतात. पुढे पोचलो ते एका गुहांपाशी.

नैसर्गिक गुहा

या गुहा नैसर्गिक आहेत. खडकाचा बाहेरील चपटा भाग मूळ खडकापासून वेगळा झाल्याने या गुहा तयार झालेल्या आहेत. इथे आत प्रचंड प्रमाणात वटवाघळं आहेत. त्यांचे आवाज वरपर्यंत येत होते. आत उतरायला अतिशय कठीण आहे. प्रस्तरारोहणाचे साहित्य आणि कौशल्य बरोबर असल्याशिवाय हा प्रयत्न करू नये. त्यातून आतमध्ये उजेड पोचतच नाही. पूर्वी ह्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे असे नमूद केलेलं आढळतं.

माथ्यावरील पश्चिमेकडील भागावर वाड्याचे अवशेष

लांबवर पसरलेलं दाट जंगल

ह्या गुहा वरूनच वाकून बघून गडाच्या मागच्या बाजूला निघालो. इकडे तटबंदी-वाड्याचे खूपसे अवशेष आहेत. ही गडाची पश्चिम बाजू. पलीकडे अतिशय दाट जंगल लांबवर पसरलेलं डोळ्यांना सुखावतं. त्यातच खाली थोड्या अंतरावर एक छोटा तलाव दिसतो. त्याला स्थानिक लोक “पांढरीचा तलाव” म्हणतात. थोडे लांबवर डावीकडे डोंगर दिसतो, जिथे शंकराचे मंदिर आहे आणि मोठी मूर्ती आहे. इथे खूप मोठ्या संख्येने भाविक लोक वार्षिक उत्सवाला येतात. तिथे जत्रा भरते. पण त्यामुळेच इथला मार्ग न विचारता किल्ल्याची वाट विचारलं की स्थानिकांना आश्चर्य वाटतं.

पश्चिमेकडची तटबंदी

पश्चिमेकडे तटबंदीचे खूप अवशेष असले तरी पूर्ण किल्ल्याला तटबंदी नाही. खरंतर तशी गरजच नसल्याने बांधलेलीच नसावी. नैसर्गिक कातळकड्याचे संरक्षण लाभलेलं आहे या किल्ल्याला.

वाड्यांचे अवशेष

दगडांची सुंदर रचना

ह्या बाजूने पुढे दक्षिणेकडे जाताना डावीकडे बऱ्यापैकी शिल्लक असे वाड्याचे अवशेष दिसले. पुढे असलेली कातळाची नैसर्गिक रचना अतिशय सुंदर दिसते. यापुढे दक्षिण टोकाजवळ पोचल्यावर एक निसर्गाचा अविष्कार बघायला मिळतो, तो म्हणजे एक छोटा दगडी पूल. दगडांखालून सतत पाणी वाहिल्याने मध्येच असा हा एक पूल तयार झालेला आहे, ज्याला स्थानिक लोक “श्रावण बाळाची कावड” म्हणतात.

श्रावणबाळाची कावड

संतोष: छ्या! ह्या पोरांना चुकूनसुद्धा गडसंवर्धनासाठी घेऊन जायला नको.

शहाणे काका: कुठे न्यायच्या लायकीची नाहीत पोरं. काय खालून वर काय, वरून खाली काय डोकावतात...

फोटोसेशन केल्यावर निवांत क्षणी

इथे फोटो तो बनते है... निवांत वेळ काढून तिथे फोटो काढून घेतले.

दक्षिणेकडील बाजू

"पाणीमाय " तलाव/टाकं

पाणीमायेत उतरणाऱ्या पायऱ्या

गडाला उलटी प्रदक्षिणा मारत बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी यायच्या आधी एक सुंदर पाण्याचं तलाव सदृश टाकं लागतं. याचं नांव "पाणीमाय". नांव नक्कीच सार्थ आहे, कारण किल्ल्यावरच्या शिबंदी आणि जनावरांच्या पाण्याची सोय बघणारी माय नाही का हि? टाक्याच्या समोर दिसणाऱ्या रचनेचं प्रयोजन मात्र नक्की लक्षात येत नाही. कारण यात मध्येच एक गडगा बांधून हे टाकं दोन भागात विभागलेलं आहे, पण अर्धवट. म्हणजे हा बांध पूर्णपणे टाक्याला दुभागत नाही. कडेकडेने या टाक्यांना लांब लांब अशा पायऱ्या आहेत. जनावरांच्या पाण्याची व्यवस्था यासाठी ही रचना असणार. या तलावाचं/टाक्याचं संवर्धन केल्यास अतिशय सुंदर टाकं नक्कीच समोर येईल.

गडफेरी इथे पूर्ण झाली. दर्ग्यापर्यंत परत यायला फक्त वीस मिनिटं लागली. खूप अवशेष असलेला, समृद्ध जंगल आजूबाजूला बाळगून असलेला हा किल्ला पदरात पडला. किल्ला बघितल्यावर आल्या मार्गाने परतीचा प्रवास नव्हता, तर “चिंचोळे” मार्गे आम्हाला कुरखेडाला बाहेर पडायचं होतं.

तिबेटी मुलं

कुरखेडाला जाणारा हा मार्ग “इतियाडोह” नावाच्या कालव्याजवळून निघतो. गंमत म्हणजे इथे तिबेटी वस्ती आहे. हे मूळ तिबेटी लोक आता आता गोंदियाकर आहेत. सकाळी वाटाड्याची वाट बघताना जिथे चहा-पोहे उडवले, तिथे काही मुलांची भेट झाली. ही मुलं इथे सुट्टीला आपल्या गावी आली होती. १९७० नंतर चीनने तिबेटी भागावर अतिक्रमण करून तो ताब्यात घेतल्यावर तिथले लोक पळून भारतात आले. त्यांना गोंदियामध्ये आश्रय दिला गेला. तिबेट सारख्या थंड प्रदेशातून महाराष्ट्रातल्या गरम गोंदिया मध्ये हे कसे जगले, ते त्यांचे त्यांनाच माहिती. पण इथे ह्या लोकांची २ गावं वसली. मुलांना पाचवी पर्यंत शाळा आहेत, त्यानंतर मात्र त्यांना कर्नाटकात जावं लागतं, तिथल्या तिबेटी कँप मध्ये. २०१४ मध्ये मात्र सरकारने पुनर्वसन धोरण सुधारित केलं त्यानंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाली. जेमतेम हजारभर शिल्लक राहिलेल्या या वस्तीत स्वच्छता मात्र वाखाणण्याजोगी आहे. त्यांनीच त्यांच्या सोयी तयार केल्या आहेत, जसं मंदिर, दवाखाने वगैरे.

तिब्बत कँप २

छोट्याशा या वस्तीतून बाहेर पडलो. भाग्यवान म्हणून प्रतापगड आणि ह्या वस्तीचंही दर्शन घडलं. पुढचा किल्ला होता नियोजनातला, तो पूर्णपणे नक्षलवादी भागाने ग्रस्त असलेल्या भागातला... महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडील किल्ला... कोणता ते, बघूया लवकरच!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!