Saturday, January 12, 2019

विदर्भीय भटकंती - एलीचपूर उर्फ अचलपूर

               दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली ती समस्त भटक्या लोकांचे दैवत गो. नि. दांडेकर यांच्या जन्मस्थानी, अमरावतीतील परतवाडा या गावी. नेहमीप्रमाणे आजचेही नियोजन अगदी tight schedule मध्ये, म्हणजे विनीत दाते styleमध्येच होते. म्हणजे ना कमी ना जास्त वेळ. त्यातून त्याला यावेळी चिले सरांच्या पुस्तकाबरोबरच, डॉ. जयंत वडतकर सर यांचेही पुस्तक आणि फोनवरून मार्गदर्शन मिळाले होते.
               आजच्या भटकंतीत सुरुवात होती अचलपूर इथल्या नगरकोट पासून. पण त्या आधी बघायचं होतं हौजकटौरा, सुलतानाची गढी आणि कबरस्तान!
               सकाळी साडेसहा वाजता चक्क आंघोळीसकट सगळं आटपून सहाही जण तयार होतो. आम्हाला आजच्या भटकंतीचा साथीदार म्हणून ते सगळं दाखवण्यासाठी लाभला होता डॉक्टर वडतकर यांच्याबरोबर ज्याने काम केलं आहे, तो मनिष ढाकुलकर. हा माणूस आमच्यासाठी चक्क साडेसहाला त्या थंडीतही हजर झाला होता. पहिला टप्पा होता सुलतानाची गढी. परतवाडा वरून अमरावतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हरम-टलवार व अचलपुर फाटा लागतो इथून उजवीकडे अचलपूरच्या बाजूला वळायचे आणि "सापन" नदी ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलावर पोहोचायचे. इथे डावीकडे थोड्या अंतरावर दोन बुरुज असलेली ही गढी दिसते. सुलतानपुराकडे जाणाऱ्या वाटेजवळच्या पायवाटेने गढीजवळ पोचायचे. बरीच पडझड झालेली असली, तरी मोठा पश्चिमाभिमुख दरवाजा चांगला शाबूत आहे. हा दरवाजा पूर्णतः लाकडी असून त्यावर अणकुचीदार खिळेही आहेत. आतमध्ये उजवीकडे एक बुरूज आहे आणि त्यापलीकडे डावीकडे प्रचंड मोठे गोलाकार मैदान आहे. आता झाडी वाढल्याने त्यावर फिरता येत नाही. समोर आणि डावीकडे मिळून "L" आकारात तटबंदी असून त्यावर जाता येते. त्याच्या पलीकडे नदी असून, पाणी वाहत असताना तिथून दिसणारे दृष्य नक्कीच मनमोहक असेल. तटबंदीवर बाहेरच्या बाजूने डावीकडे असलेल्या बुरुजावर जाता येते आणि तिथून उजवीकडचा बुरुज सुद्धा व्यवस्थितपणे बघता येऊ शकतो. या गडाचे संपूर्ण बांधकाम भाजीव विटांचे असून अत्यंत मजबूत आहे.


               पुढचा टप्पा होता "हौजकटोरा". सुलतानाची गढी बघून त्याच रस्त्याने पुढे जावे आणि रस्ता संपल्यावर उजवीकडे वळून साळेबाद किंवा खानापूर/भिनखेडा कडे जायला डावीकडे फाटा आहे तिथे वळावे. साधारण दोन-तीन किलोमीटरवर आजूबाजूला केळीच्या बागातून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यावर डावीकडे रस्त्याला लागूनच एका तळ्यात ही अष्टकोनी इमारत उभी आहे. तळे साधारणपणे कोरडे असते. इमारत तीन मजली असून तळ्यात पूर्ण पाणी भरल्यास तळमजला पूर्णपणे पाण्यातच राहील असा आहे. कदाचित त्यामुळेच तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पायर्‍या नाहीयेत. ही इमारत म्हणजे इमादशाहीत बांधण्यात आलेली एक सुंदर कलाकृती आहे. बहुतेक ही इमारत जलक्रीडा करण्यासाठी बांधलेली असावी आणि त्यावरूनच त्यांची श्रीमंती लक्षात येते. तळमजला व पहिला मजला हे पुर्णपणे दगडी बांधकाम असून असून दुसरा मजला मात्र विटांनी बांधण्यात आलेला आहे. प्रत्येक मजल्याला प्रत्येक कोनात एक, असे आठ दरवाजे असून इमारतीतील नक्षीकाम बघण्यासारखे आहे. पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला मात्र पायर्‍या आहेत.
               ह्या वास्तूंच्या मार्गावर आपण एक रेल्वेचा मार्ग ओलांडून जातो तो आहे भारतातील एकमेव खाजगी रेल्वेचा. शकुंतला रेल्वे.
               अचलपूरच्या नगरकोटाचाच एक भाग असलेले समरसपुऱ्यातील नवाबांचे कबरस्तान (बेबहा बाग) हा पुढचा टप्पा होता. खरं तर कबरस्तान काही बघण्यासारखी जागा थोडीच असते? पण हे नवाब, शाही लोकांचे होते त्यामुळे कबरस्तान सुद्धा शाही असेच आहे. त्याच्या प्रवेशस्थानी सुंदर नक्षीकाम असलेला मजबूत दरवाजा असून त्यात लाकडी दार आहे. वरती मध्यभागी फारसीमध्ये लेख लिहिलेला असून दरवाजावरती मोर आणि इतर काही प्राणी कोरलेले आहेत. दरवाजा शेजारी घुमट असलेली एक इमारत असून त्याच्या आतमध्येही एक लेख कोरलेला आहे. आतमध्ये एक विहिरही आहे.

अचलपूरचे भव्य आणि मजबूत दरवाजे
               आता मात्र बघायचा होता मुख्य किल्ला, एलीचपुर अर्थात अचलपूरचा. अचलपूर हे जवळ जवळ 100 वर्ष वऱ्हाड प्रांताची राजधानी होते, त्यावरूनच ह्या किल्ल्याचे महत्व लक्षात येईल. हे नगर वसवले ते जैन धर्मीय "ईल" नावाच्या राजाने, म्हणून "एलीचपुर" आणि पुढे अचलपूर. कित्येक सत्ता ह्या नगराने अनुभवल्या. हा किल्ला म्हणजे पूर्ण नगर असल्याने त्यात 50 च्या वर वस्त्या होत्या. आजही इथे 35 एक "पुरे" आहेत. परकोट हा तब्बल 5 किमी लांबीचा असून किल्ला फिरणे म्हणजे गाव फिरणेच आहे. ह्याला 6 मोठे, महत्वाचे दरवाजे असून त्यातून रस्ते काढून रोजची वाहतूक सुरु आहे. 

वेगेवगळ्या बांधणीचे अप्रतिम बुरुज
               प्रत्येक दरवाजाचे बांधकाम अप्रतिम असून बुरुज तर खास वेळ काढून बघावेत असेच आहेत. एक दरवाजा तर जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रवेशद्वार आहे. 4 दरवाजांना तर दोन्ही बाजूला सुंदर मजबूत बुरुज असून लाल किल्ल्याची आठवण नक्कीच होते. दूल्हा, बुंदेलपुरा, जीवनपुरा,  खिडकी, माळीपुरा (तोंडगाव?) व हिरापुर दरवाजा अशी ह्या दरवाजाची नांवे आहेत. काही ठिकाणी पर्शियन भाषेत सुंदर लेख कोरलेले आहेत. तब्बल 30-35 शिलालेख इथे आहेत, परंतु सगळे दरवाजे, बुरुज, लेख, अवशेष बघणे हे माहितगार आणि स्वतःचे वाहन किंवा रिक्षा असल्याशिवाय शक्य नाही. आमच्या बरोबर असलेल्या मनीषमुळे आम्हाला हे पाहणे सोपे झाले. बुरुज आणि दरवाजा बरोबरच अनेक थडगी, मशिदी, लेख, पाण्याची व्यवस्था, दर्गे आणि बालाजी व श्रीरामाचे मंदिर अश्या अनेक गोष्टींनी हा किल्ला समृद्ध आहे. बुरुज तर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्या आणि पाकळ्यांमुळे खास असेच आहेत.
               दुर्दैव एकच, कि अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या ह्या किल्ल्याबरोबरच इतरही कलाकृतींची जपणूक मात्र नीट झालेली नाही. काही स्थानिक लोकांना त्याची किंमत आणि काळजी असल्याचे जाणवले तरीही बहुतांशी लोकांना अनास्था असल्याने ह्या कलाकृतींचा ऱ्हास होत आहे.
               आजचा पुढचा आणि ज्याची खूप उत्सुकता होती तो टप्पा म्हणजे वऱ्हाडच्या राजधानीचा हा दुर्गराज.... गाविलगड!!!
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Sunday, January 6, 2019

विदर्भीय भटकंती - किल्ले बाळापुर

         आजच्या दिवसाचा दुसरा टप्पा होता अकोला जिल्ह्यातला बाळापुर किल्ला. पण त्या आधी मिर्झा राजे जयसिंग यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली (कि जसवंतसिंहाने बांधलेली?) एक छत्री पहिली.

मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली एक छत्री
         काळ्या दगडात सुंदर कलाकुसर असलेली ही छत्री आवर्जून पहावी अशी आहे. मध्यभागी एक मोठा घुमट असून बाजूला चार लहान लहान घुमट आहेत. छत्रीच्या मागच्या बाजूने डावीकडे बाळापुर किल्ला तर उजवीकडे मन नदीवर बांधलेले धरण दिसते.
         बाळापुर किल्ला हा अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील शहर नावाच्या भागात आहे. हा भुईकोट किल्ला असून किल्ल्याच्या एका बाजूने मनतर दुसर्या बाजूने म्हैस/महिषीनद्या वाहतात आणि पुढे त्यांचा संगम होतो.
         गडाच्या अगदी दरवाजापर्यंत डांबरी रस्ता जातो. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूने येणाऱ्या डांबरी रस्त्याने गेल्यास गडाची भक्कम तटबंदी दिसून येते. ही तटबंदी बघताना राजस्थानी किल्ल्यांचा भास नक्की होतो. त्याच्या उजव्या बाजूने वळसा मारून प्रवेशद्वाराकडे जाताना उजवीकडे नदीच्या काठावर एक दरवाजा दिसतो. अगदी दरवाजात पानाची टपरी असून दरवाजात भरपूर घाण आहे. मुख्य गड आणि हा दरवाजा हे आता पूर्णपणे वेगवेगळे झालेले आहेत. इथून गडाकडे जाताना डाव्या बाजूला जुन्या तटबंदीचे काही अवशेष दिसतात परंतु वाढलेली झाडी आणि लोकांनी केलेली घाण ह्यामुळे तिकडे बघवत नाही. उजवीकडेही वस्तीत गडाचे काही जुने दगड दिसतात. गडाच्या भागात शिरताना भक्कम स्थितीतील एक भक्कम दरवाजा पार करून आतमध्ये जातो. सध्या ह्या गडात तलाठी कार्यालय असल्याने गडाच्या दुसऱ्या दरवाजाच्या बाहेरच पार्किंगची सोय केलेली आहे.

गडाचा दुसरा भक्कम दरवाजा
         दगडी फरसबंदीच्या मागे असलेला हा दरवाजा अतिशय सुंदर असून शेजारची तटबंदीही उत्तम आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला मात्र सरकारी जाहिराती रंगवलेल्या आहेत. दरवाजाच्या ह्या भव्य कमानीला मोठे लाकडी दार असून त्यावरील लोखंडी पट्ट्यांना अणकुचीदार खिळे ठोकलेले आहेत. हत्तींनी डोक्याने धडक देऊ नये म्हणून असे मोठाले अणकुचीदार खिळे दरवाजाला ठोकलेले असतात, अगदी शनिवारवाड्याच्या भक्कम दरवाजातल्या खिळ्यांची आठवण हा दरवाजा बघताना नक्कीच होते. ह्या प्रचंड दाराला एक लहान दारही आहे.

नक्षीदार कमान असलेला तिसरा दरवाजा
         आतमध्ये गेल्यावर उजवीकडे तिसरा दरवाजा असून त्याचे बऱ्यापैकी बांधकाम दगडी आहे तर वरच्या बाजूना कमी जाडीच्या भाजीव विटांनी बांधकाम केलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला २-२ हत्ती कोरलेले असून डाव्या बाजूला एक घोडाही कोरलेला आहे. ह्या कमानिलाही लाकडी दार असून त्यात लहान दारही आहे. ह्या कमानीवर अप्रतिम नक्षी कोरलेली आहे. दोन्ही बाजूला फुलांच्या खवले-खवले कोरून केलेल्या फुलांच्या पाकळ्या आणि त्याचे कणसाच्या आकारातले छोटेसे मनोरे तर अतिशय सुंदर आहेत. दरवाजा समोरच्या भिंतीवर चढून ही नक्षी वेळ काढून नक्की पहावी. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर समोर सदरेची इमारत दिसते. सध्याच्या सरकारी कार्यालयाचा हा प्रवेश बनवलेला आहे.

सध्याच्या सरकारी कार्यालयाची इमारत
         दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या असून त्यावर पावसाचे पाणी आत येऊ नये यासाठी सुंदर झडपा केलेल्या आहेत. आतमध्ये गेल्यावर आजूबाजूला जुन्या इमारतीत सरकारी कार्यालये थाटलेली दिसतात. सदरेच्या इमारतीत इतिहास कालीन लाकडाची बाके सध्याचे Stamp Vendor वापरतात. ह्या इमारतीच्या पलीकडे उजवीकडे जाऊन तटबंदीवरुन फिरायला सुरुवात करायची. आम्ही प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे Clockwise फिरायला सुरुवात केली. तटबंदी सुस्थितीत असून बांधकाम चपट्या आकाराच्या भाजीव विटांचे आहे. (अवांतर: आता ह्या विटा... घरी पाडून घेतल्या आहेत, बाजारच्या नाहीत. मला फक्त बुंदी घरी पाडतात हे ठाऊक होते. असले पुलं विचार पुलंप्रेमी व्यक्तीच्या मनात आल्याखेरीज राहत नाहीत. त्यातून हा इतिहासकालीन किल्ला असल्याने इथे खरोखरच "भिंतीत चिणून मारण्यासाठी" काही सोयही केलेली असेल असा विचार नक्कीच येतो) गडाचे बुरुज तर प्रशस्त जागा असलेले भव्य असेच आहेत. तटबंदीच्या प्रशस्त अश्या फांजीवरून ह्या विटांचे सुंदर बांधकाम, जंग्या आणि चर्या पाहत तटबंदी फिरायची. तटबंदीत जुन्या मंदिरांचे दगड वापरलेले त्यावरील सुंदर नक्षीमुळे सहजपणे कळून येते. बुरुज सुस्थितीत असून गडाचा आतील भाग आणि इमारती नीटपणे न्याहाळता येतात. गडाच्या मध्यभागी उघड्यावरच एक हनुमानाची मुर्तीही आहे.

गडाचे बुरुज आणि भक्कम तटबंदी
         बाहेरच्या बाजूस डावीकडे गडापासून दूर अजून एक दरवाजा बघायला मिळतो, तसेच परकोटही (किंवा दुहेरी तटबंदीचा बाहेरचा भाग) व्यवस्थित बघता येतो. बुरुजावरुन पायऱ्यांनी खाली उतरल्यावर एक खालपासून विटांनी बांधून घेतलेली एक अतिशय सुंदर विहीर दिसते. उभ्या-आडव्या आणि तिरक्या अश्या प्रकारे विटांनी नक्षीच ह्या बांधकामात बनवलेली आहे. ह्या विहिरीला लागून एक इमारतही आहे. ह्याच इमारतीवर पाण्याचे हौदही दिसतात. पुन्हा तटबंदीवर चढून उरलेला भाग फिरताना बाहेरील बाजूस मन नदीचे पात्र आणि त्यावरचे पूल सुंदर दिसतात तसेच परकोटावरील बुरुजही दिसतात. एका बुरुजावर ध्वज तर पुढच्या बुरुजावर एक थडगे असून इथे आपली गडफेरी पूर्ण होते.

सुंदर बांधीव विहीर आणि इतर अवशेष

गडाचे इतर दरवाजे
         गडाच्या बाहेर पडल्यावर प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला अजून एक मजबूत स्थितीतील दरवाजा आणि कमान असून ह्यावरही नक्षी कोरलेली आहे. मोहल्ल्यातले लोक ह्या कमानीचा वापर बिनदिक्कतपणे मुतारी म्हणून करताना दिसतात.
         एकंदरीतच अतिशय सुंदर कलाकुसर करून केलेले हे बांधकाम सध्याच्या परिस्थितीत चुकीच्या हातात पडल्याने त्याचा अवमानच होत आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Saturday, January 5, 2019

विदर्भीय भटकंती – किल्ले रोहिलगड आणि असदगड उर्फ अकोल्याचा किल्ला


          मराठवाडा-विदर्भ म्हटले कि बीड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, गोंदिया... काय वाट्टेल ती नांवे आठवतात. ह्यातलं काय विदर्भात आणि काय मराठवाड्यात हेही नक्की सांगता येणार नाही एवढा माझा भूगोल. त्यामुळे विदर्भात किल्ले बघायचे नियोजन तसे मनातही आले नव्हते कधी. पण २२ ते २५ डिसेंबर अशी ४ दिवसांची सुट्टी बघून त्यात असे लांबचे नियोजन ठरले आणि २१ ला रात्री निघालो हा वेगळा प्रदेश फिरायला...

          भटकंती ठरली होती रोहिलगड, गाविलगड, जिल्पी अमनेर उर्फ हासीर किल्ला, नरनाळा, वारीचा भैरवगड, मैलगड  असे ६ गिरिदुर्ग, बाळापुर, असदगड उर्फ अकोल्याचा किल्ला, एलिचपूर उर्फ अचलपूरचा नगरकोट, खामगावचा नगरकोट असे ४ भुईकोट व सुलतान आणि गोंधणपूरची गढीची.

रोहिलगड
                         
          सुरुवात होती जालना जिल्ह्यातल्या रोहिलगडपासून. विनीत दाते, प्रसाद आणि नेहा परदेशी, भूषण नाडकर्णी, केतन मावळे आणि सोबत मी असे ६ जण दिमतीला टाटा सुमो घेऊन २१ तारखेला शुक्रवारी रात्री निघालो. रोहिलगड हा किल्ला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलगड गावाजवळच्या टेकडीवर आहे. रोहिलगड गावातून जालन्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून जवळच “फिरंगीमाता मंदिर” आहे. ह्या देवळाच्या पलीकडेच टेकडीवर हा किल्ला आहे. देवळापासून किल्ल्यावर जायला १५-२० मिनिटं पुरतात. ह्या किल्ल्याचा माथा बऱ्यापैकी सपाट असून त्याचा आकार साधारणपणे लंबुळक्या बदामाच्या आकाराचा आहे. फिरंगीमाता मंदिरापासून निघाल्यावर आपण ह्या किल्ल्याच्या बदामाच्या खालच्या टोकाला पोचतो. इथून खाली रोहिलगड गांव तर डावीकडे लागुनच एक किल्ल्याच्याच उंचीचा पण आकाराने जास्त पसरलेला "पालखा" नावाचा डोंगर दिसतो.



          इथून डाव्या हाताने कडे-कडेने चालत गेल्यास एका बाजूला तटबंदीचे काही अवशेष दिसतात तर इथेच गडाच्या मध्यभागी जमिनीच्या आतमध्ये दहा एक खांब असलेले बाहेरून लहान वाटणारे पण प्रचंड मोठे असे टाके आहे. यातील काही खांब अखंड दिसतात तर काही अगदीच तोकडे दिसतात, कारण हे टाके समोरून आतमध्ये उतरत्या छपराचे असून आतील बाजूस मातीने भरत गेलेले आहे. ह्या टाक्याच्या जवळच आणखी एक बुजत गेलेले टाके आहे. इथून पुढे गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे जुन्या वाड्याचे काही अवशेष दिसतात. मागे फिरून ध्वज असलेल्या टोकाकडे जाताना लगेचच एक फुटके दगडी रांजण दिसते. गडाच्या उजवीकडे खाली उतरल्यावर पूर्वाभिमुख असे अजून एक मोठे टाके दगडात खोदलेले आहे. हेही टाके मोठे असून ह्यात एक तुटका खांब दिसतो तर प्रवेशालाच ३ पूर्ण खांब आहेत.

गडावरील टाकी
          इथून परत वर येऊन ध्वज असलेल्या गडाच्या सर्वोच्च टोकाकडे जायचे. इथेही काही जुन्या वास्तूचे अवशेष दिसतात तर काही जुनेच दगड गावकऱ्यांनी तटबंदीसारखे रचून ठेवलेले आहेत. आता ह्याच टोकावरून गडाच्या खाली उतरायचे. सपाटीवर आल्यावर पुन्हा पायथ्याच्या मंदिराच्या दिशेने चालत जाताना डावीकडे गडाच्या डोंगरातच दक्षिणाभिमुख म्हणजे गावाच्या दिशेने तोंड करून १०-१२ खांबी गुहा खोदलेली आहे. ह्यात बरोब्बर मध्यभागी मोठा कोनाडा असून त्यात दगडाला शेंदूर फसलेला आहे. ह्या गुहेचे मूळ प्रवेशद्वार मात्र जमिनीच्या पातळीला नसून अगदी गुहेच्या तोंडाजवळ मध्यभागी खाली उतरायला जागा केलेली आहे आणि त्यातून डावीकडे वळून परत पायऱ्या चढून गुहा-मंडपात यावे अशी सोय आहे. गुहेच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा असून ती बऱ्यापैकी बुजलेली आहे. त्यात साळींदर प्राण्याचा वावर असल्याने शक्यतो आतमध्ये जाऊ नये. संपूर्ण गडावर कोणत्याही टाक्यांत पाणी नाही.

कातळकोरीव गुहा
          इथे गडफेरी पूर्ण होते. गडावर जाऊन सगळे अवशेष निवांत पाहून २ तासांत पायथ्याला पोचता येते. गडाच्या जवळ आणखी एक मोठा पसरलेला "पालखा" जोड-डोंगर असून त्यातही गुहा/लेणी आहेत. वेळ असल्यास जरूर पाहून घ्याव्यात.
          ह्या गावातले विशाल टकले आणि त्याचे काही मित्र यांनी गडावर साफसफाई केली आहे. हा गड छोटेखानी असला तरी ह्यावरची टाकी आणि गुहा मात्र अतिशय सुंदर आहेत.

असदगड
          अलोक्यात मध्यवर्ती ठिकाणी मोरणा नदीच्या काठी असदगड किंवा अकोल्याचा किल्ला आहे. हा किल्ला अकोलसिंग ह्या राजपूत राजाने अकोला ह्या शहराबरोबर बांधला असे मानले जाते. पुढे औरंगजेबाने असदखान ह्याला अकोला गाव दिल्यावर त्याच्या देखरेखीखाली ख्वाजा अब्दुल लतीफ याने त्याची 1698 ला पुनर्बांधणी केली. हा खरं तर नगरकोट असून परकोटला चार दरवाजे आहेत. दहीहंडावेस, शिवाजी किंवा बाळापूरवेस, अगरवेस आणि गजवेस या नावांनी ते ओळखले जातात. ह्यातील अगरवेस ही गोविंद अप्पाजी यांनी 1843 ला बांधली. असद, फतेह किंवा पंचबुरुज आणि अगर बुरुज ह्या तीन बुरुजांपैकी असदबुरुज हा असदगड किंवा अकोल्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो.

शहिद स्मारक
          ह्या किल्ल्याचे आता पार्क केले गेले असून थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला हिंदीत तर उजवीकडे मराठीत गडाची आणि पुनर्निर्मितीची माहिती संगमरवरी फलकावर कोरलेली आहे. प्रवेशद्वार म्हणून "आझाद पार्क" असे नांव देऊन एक कमान बांधण्यात आलेली आहे. त्यातून आतमध्ये गेल्यावर समोरच एक कारंजे दिसते, जे इतिहासकालीन असावे. ह्याच्या पलीकडे एक "शहिद स्मारक" असून त्यावर एक सिंहाचा पुतळा आहे. ह्याच्या पायथ्याशी -
शहीदोंकी चिता ओपर।
जुडे रहेंगे हर बरस मेले।।
वतनपे मरणेवालोका।
यही निशा बाकी है।।
          असा संदेश लिहिलेला आहे. 7 मे 1957 रोजी अकोला नगरपालिकेने हे शाहिद स्मारक आणि पार्क उभारले असून त्यावेळी हे लिहिण्यात आलेले आहे.

हवामहाल
          डाव्या बाजूस एक पडकी इमारत असून ह्यास हवाखाना किंवा हवामहाल म्हटले जाते. ह्याचे 6 मोठे झरोके शिल्लक असून त्यांवर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. इथे उजव्या बाजूने खाली उतरल्यास ह्या हवा महालाच्या खालच्या बाजूस असलेला बुरुज दिसतो. हा बुरुज पूर्णपणे भाजलेल्या लाल विटांनी बांधलेला असून सुस्थितीत आहे. इथूनच गडापासून थोडा दूर असा एक बुरुज/दरवाजाही दिसतो. गडाच्या कडेनेच प्रदक्षिणा घालत गेल्यास भक्कम तटबंदी दिसते तर पुढच्या बुरुजाच्या खाली चुन्याचा घाणा दिसतो. त्याचे दगडी चाक आणि 2 हौदही दिसतात. पुन्हा प्रवेश द्वाराशी येऊन उजवीकडच्या बाजूचे राहिलेले अवशेष बघून घ्यावेत.
          पार्क म्हणून जतन केल्यानेच हा भाग तरी शिल्लक राहिलेला आहे, अन्यथा अतिक्रमणामुळे इतर किल्ला झाकोळून गेलेला आहे.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!