Tuesday, October 31, 2023

विदर्भीय भटकंती - किल्ले चंदनखेडा, शेगाव, चिमूर, भिवापूर

लेखाच्या शीर्षकात १-२ नाही तर ४ नांवं? म्हणजे किल्ले केवढे असणार?

"अरे येतो शुरू होने से पहले ही खतम हो गया..."

होय, या लेखातले किल्ले असेच आहेत.

पण आता किल्ले असे असतात का मुळात? तर, शक्य तरी आहे का? एखाद्या वास्तूला किल्ला म्हटले म्हणजे अर्थातच मोठं बांधकाम असणार ना? नाहीतर घर किंवा खोलीच नसतं का म्हटलं...

पण कालांतराने त्या वास्तूचा "किल्ला" ही गोष्ट म्हणून उपयोग संपतो आणि अनेक वर्षांनी मग त्याचा उपयोग कदाचित घर म्हणून होऊ लागतो. अश्या वेळी मग त्याचा "किल्लेपणा" ढासळतो, पण किमान "घर" रुपात तरी तो तग धरून राहतो. हळूहळू घर पण ओसाड पडत जातं, भिंतीही ढासळतात आणि एकंदर वास्तू ढासळून अवशेष स्वरूपात रहात, नामशेष होत जाते. त्याच्या डागडुजीकडे लक्ष देणे बंद होते. मुळात ज्या काळी किल्ले बांधले आणि उपयोगी पडले त्या काळातही त्यावर होणाऱ्या हल्ल्यामुळे त्यांचे नुकसान आणि पडझड होतच असते. त्यावेळी थोडी डागडुजीही केली जात असते, परंतु नंतर उपयोग संपणे, दुर्लक्ष, त्यावर होणारा आणि न परवडणारा खर्च, ऐतिहासिक वारशाबद्दलची स्थानिकांची आणि सरकारी अनास्था अशा अनेक कारणांमुळे त्याची डागडुजी केली जात नाही आणि मग ह्या प्रकारचे मीम त्यावर होतील, अशा अवस्थेत ते पोचतात.

अर्थात हे काही ह्या लेखातल्या फक्त चार किल्ल्यांबाबत नाही, तर एकूणच सर्व ऐतिहासिक तत्कालीन महत्त्वाच्या किल्ले, गढी या वास्तूंबाबतही लागू होऊ शकते. त्यातलाच एक किल्ला चंदनखेडा!

मुळात हा किल्ला आमच्या नियोजनात नव्हताच. कसा असेल? ह्या नावाचा किल्ला आहे हेच मुद्दलात माहिती नव्हतं. ना खुद्द मांडे सरांच्या पुस्तकात आणि ना अनेक इतर ठिकाणी. कुठे सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख नाही, तर आम्हाला कसा माहिती असणार?

पण मग ह्या किल्ल्यावर मी लेख तरी कसा लिहतोय? कारण आम्ही तो बघितला.

कसा कळला तीही गंमत आहे. भद्रावती किल्ल्यावरच्या लेखात म्हटलंच होतं, की आमचं नियोजन मुळात तिथे थांबायचं नव्हतं तर पुढच्या किल्ल्याच्या गावात किंवा जवळपास तरी जाऊन मुक्काम करायचा म्हणजे सकाळचा वेळ वाचतो हे होतं. पण गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ऐतिहासिक स्थळं पाहण्यात तिथे वेळ घालवला आणि मुक्काम भद्रावतीत झाला.

त्यानंतर नियोजनातला पुढचा किल्ला होता "शेगाव". जास्त माहिती नंतर पाहू. हे गजानन महाराजांचे शेगाव नव्हे तर चंद्रपूर मधलं छोटसं गाव शेगाव.

भद्रावती मधून इथे जायचं, तर वाटेत जंगलाचा दाट भाग लागतो, त्यामुळेच मुक्काम भद्रावतीत केला. इथून नांदुरी-वरोरा वरून सलोरी मार्गे शेगाव गावात पोचता येतं, तर दुसऱ्या मार्गाने मांगळी-रय्यतवारीवरून चंदनखेडा मार्गे पोचता येतं. रस्त्याचा अभ्यास करताना, माहिती गोळा करताना कळलं की ज्या वाटेत चंदनखेडा लागतं तिथे एक किल्ला आहे. लगेच अभ्यासाचा रोख बदलला, माहिती मिळवली आणि लक्षात आलं की ह्याही किल्ल्याला भेट देता येऊ शकते.

चंदनखेडा

अंधार पडल्यावर जो रस्ता भयाण असेल असा विचार केला होता, तोच रस्ता सकाळी अल्हाददायक वातावरणात रिफ्रेशिंग वाटला... अर्ध्या तासात चंदनखेडा मध्ये दाखल झालो. साधारणपणे कुठेही किल्ला विचारायचा स्थानिकांना गावात पोचल्यावर, की प्रश्न पडतो की कसा विचारायचा? कारण बऱ्याच ठिकाणी किल्ला स्थानिकांना माहितीच नसतो किंवा त्याला "किल्ला" अशी ओळख नसते. वेगळ्याच कोणत्यातरी गोष्टीने तिथे तो ओळखला जात असतो. म्हणजे एखाद्या प्रसिद्ध मंदिरावरून किंवा त्यातल्या एखाद्या वास्तू वरून. पण चंदनखेडामध्ये आश्चर्य म्हणजे सगळ्यांनाच किल्ला हा किल्ला म्हणूनच माहिती आहे हे कळलं.

किल्ल्याचे प्रवेशद्वार

किल्ल्यातच मंदिर आहे, "माधव महाराज देवस्थान". अगदी दरवाजात नेऊन गाडी उभी केली. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या कमानीतून आत मंदिराचा मुख्य दरवाजा दिसला. गंमत म्हणजे या दुमजली दरवाज्यात वरच्या मजल्यावर मस्त घोड्याची मूर्ती आहे अगदी लाइफ साईज. मंदिर आणि परिसर चांगला ठेवलेला आहे सुदैवाने. त्यात चांगलं म्हणजे किल्ल्याच्या दरवाजाची कमान आणि लागून असलेल्या भिंती रंगाने रंगवलेल्या नसून मूळ काळ्या दगडात तशाच ठेवून त्याचं सौंदर्य अबाधित ठेवलेलं आहे.

मंदिर प्रवेशद्वार - वरच्या मजल्यावर Life Size घोडा-मूर्ती

आत्तापर्यंत जी काही मंदिर पाहिली होती, त्यात घोड्याला इतकं महत्त्व दिलेलं पाहिलं नव्हतं. तसं म्हटलं तर टिपागडला गुहेबाहेर घोडामूर्ती होती, पण तेवढीच. इथे चक्क प्रवेशद्वारावरच अखंड घोडा-मूर्ती.

हे मंदिर सर्वधर्म श्रद्धास्थान आहे. म्हणजे नावाजवळच ॐ, चंद्र-तारा, क्रॉस, शीख, बौद्ध अशोकचक्र अशा सर्व धर्मांची चिन्ह छापलेली आहेत. आधी परिसर पाहून मग मंदिर बघावं असं ठरवलं कारण मंदिर बंद!

अर्थात आम्ही सकाळी ६:३० ला तिथे पोचणार हे आधी थोडंच माहिती असणार गावकऱ्यांना? खुद्द आम्हालाही आधीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

मग परिसर फिरायला बाहेर पडलो. शेजारच्या मैदानात एक उभा खांब आणि त्रिशूळ आहे. महाराष्ट्रात अशीही काही मंदिर आहेत ज्याचं आजूबाजूचं बांधकाम किल्ल्यासारखं आहे, परंतु तो किल्ला नाही. म्हणून इथला परिसर बघायचा ठरवून फिरायला लागलो. जेणेकरून कळेल की हे फक्त बांधकाम किल्ल्यासारखं आहे की हा किल्लाच आहे.

जोर्णोद्धारित कमान

उध्वस्त वास्तू

मंदिरापासून उजवीकडे बघितलं तर दरवाज्याची जिर्णोद्धारित कमान आहे. त्यातून पलीकडचा सगळा परिसर दिसतो. परिसर फिरताना लक्षात आलं की इथले सगळे अवशेष उध्वस्त आहेत. आणि हा परिसर फक्त बालेकिल्ला असणार, पूर्ण किल्ला खूप मोठा असणार खरंतर. परिसरातले अवशेष जे उध्वस्त आहेत त्याच्या बाहेरच्या बाजूच्या भिंती जवळपास सहा ते सात फूट रुंद आहेत. सगळ्या वास्तू बऱ्यापैकी उध्वस्त झालेल्या असल्याने काहीही पत्ता लागत नाही, की कोणते अवशेष कोणत्या वास्तूचे आहेत.

घोडेच घोडे

सुबत कोरीव घोडा-मूर्ती

पण इथे एक गंमत बघायला मिळाली. जिकडे बघावं तिकडे घोड्याच्या मूर्ती. छोट्या-छोट्या आकारापासून अगदी मोठ्या मूर्ती. अगदी खेळण्यातल्या लहान मूर्ती पासून, दगडी मोठ्या कोरीव मूर्तीपर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या आणि कलाकुसरीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्ती असण्यामागे बहुतेक नवस आणि त्याची परतफेड ही गोष्ट असावी.

दरवाजे, उद्ध्वस्त वास्तू, भक्कम भिंत, त्यावर चर्या वगैरे किल्ला असणाऱ्या गोष्टी दिसल्या तरी महत्त्वाची गोष्ट आम्ही शोधत होतो ते म्हणजे पाण्याचा स्त्रोत. तसे फिरताना एक दोन बांधिव हौद दिसले होते, पण ते ग्राह्य धरण्यासारखे नव्हते. कारण एक तर ते अलीकडच्या काळातले दिसत होते आणि जीर्णोद्धार केलेले मानले तरी आकाराने लहान, म्हणजे किल्ल्याच्या विस्ताराच्या दृष्टीने ते पुरेसे दिसत नव्हते.

तेवढ्यात बऱ्यापैकी उजाडल्याने मंदिराची देखभाल करणारे पुजारी आले. चौकशी करताना कळलं की इथे मागे विहीर होती आणि आता ती बुजली आहे. लगेच त्या शोधात बाहेर पडलो. ते काका बरोबर आले म्हणून ती सापडली आणि मनातला प्रश्न मिटला. पाण्याचा स्त्रोत मिळाला.

मंदिरात परत जाताना लक्षात आलं की फक्त मंदिराच्या मुख्य दरवाजावर मोठी घोड्याची मूर्ती नसून, इथे खरा घोडा सुद्धा आहे. ज्याची शोभायात्रा निघते. तो मंदिराच्या इथे बांधलेला दिसला.

पुजाऱ्यांनी तोपर्यंत मंदिर उघडून झाडलोट पूर्ण केली होती. मग मंदिरात दर्शनाला गेलो. मंदिरात घोड्यावर बसलेल्या माधवराज महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीचा आकार, स्थान, रंग अगदी मापात आणि सुंदर आहे.

घोड्यावर माधवराज महाराज आणि चौकोनात गुप्त मूर्ती

मूर्ती एकदम सुबक आहे. त्यात एक सुंदर वेगळेपण इथे पाहायला मिळालं. साधारणपणे शंकराच्या मंदिरात जशी एक पूजेची मोठी पिंडी असते पण कुठेतरी एखादी गुप्तपिंडी किंवा गुप्त स्थान असते तशी इथेही गंमत आहे. समोर जी माधवराज महाराजांची मूर्ती आहे त्याच्या खाली मागच्या बाजूला छोटीशी गुहा आहे. त्यात घोड्याची दगडी मूर्ती आहे.

हे सगळं पाहत असताना मंदिरातच चक्क डॉ. प्रदीप मेश्राम यांनी संकलन केलेल्या माहितीचा छापील फलक दिसला. त्यावरून कळलं की हे ठिकाण सातवाहनकालीन असून त्याकाळचे अनेक अवशेष आणि वस्तू येथे सापडलेले आहेत. हा किल्लाही मोठा नगरकोट असून चंद्रपुरातील हे एकमेव सातवाहनकालीन पुरातत्वीय स्थळ आहे. ह्याचे तत्कालीन नाव "कपिशकट" होते. गोंड राजांच्या काळात हे उपराजधानीचे ठिकाण होते, मोठे व्यापारकेंद्र होते. हेही श्री गजानन घुमे यांनी केलेल्या किल्ल्यासंबंधीच्या माहितीच्या संकलनावरून कळलं. आणि या माहितीमुळे इथे किल्लाच होता आणि जे काही अवशेष शिल्लक आहेत तेही किल्ल्याचेच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं.

आमच्या नियोजनात नसलेला, ह्याआधी नांवही न वाचलेला, कुठेही उल्लेख असल्याचे माहिती नसलेला एक किल्ला पाहण्याचं समाधान मिळालं.

शेगाव

यानंतर मूळ नियोजनात जो शेगावचा किल्ला बघायचा होता तिथे पोचलो. गल्ल्या-गल्ल्यातून गाडी घातली आणि जागा बघून गाडी लावून उतरलो. अर्थातच आमच्याकडे आश्चर्याने बघत असलेली लोकं दिसणं अनपेक्षित नव्हतंच. किल्ला? म्हटल्यावर तोंडावर उमटणाऱ्या प्रश्नचिन्हाचंही विशेष वाटत नव्हतं. पण असा काही वेळ गेल्यावर चक्क एक इसम भेटला ज्याने त्याच्या जागेतच हा किल्ला आहे असं सांगितलंन.

शिल्लक कमानीचा दगड

गोंड समाजाची पवित्र वास्तू

त्या माणसाच्या जागेत मागच्या अंगणात पोचलो, तर झाडीत बोट दाखवून तिकडे बघा असं म्हणाला. म्हणून तिकडे बघितलं, तरीही काही दिसेना आम्हाला. जेव्हा आम्ही सगळ्यांना मांडे सरांच्या पुस्तकातला फोटो दाखवून किल्ल्याची चौकशी करत होतो, तरीही तो कोणी सांगत का नव्हतं याचा इथे पोचल्यावर उलगडा झाला. मांडे सरांच्या पुस्तकातल्या फोटोत एक शिल्लक कमान आहे. आम्ही ती कमान दाखवत होतो आणि ह्यांनी झाडीत दाखवल्यावर आता ती कमानही शिल्लक नव्हती, तिथे फक्त एक दगड दिसला. फोटो समोरच्या जागेशी पडताळून पाहिल्यावर ह्याच जागेचा तो जुना फोटो असून सध्या त्या कमानीचा फक्त दगड शिल्लक राहिलेला आहे हे दिसलं.

हा फोटो म्हणजे पूर्ण किल्ल्याचा, शेवटच्या घटका मोजत असलेला एक कमानीचा दगड.

झाले अवशेष, संपला किल्ला.

अर्थात सध्या फक्त एक दगड असला म्हणून काही किल्ल्याचे महत्त्व कमी होत नाही. आता लोकांनीच आपापली घरं बांधायला किल्ल्याचे दगड यापूर्वीच नेलेले आहेत. ह्यापुढे कोणी किल्ला बघायला गेलं तर कदाचित हा शिल्लक दगड पण कोणाच्या घराच्या भिंतीत विराजमान झालेला असू शकतो.

शेगाव किल्ला हा असा चार ओळीत लिहून संपला.

चिमूर

शेगाव नंतर बघायचा होता चिमूर किल्ला. जेव्हा या भटकंतीचं नियोजन केलं होतं, तेव्हा सगळ्या स्थानांबरोबर या ठिकाणाचाही नक्षलवाद्यांच्या दृष्टीने विचार केलेला होता. अर्थातच तशी परिस्थिती ह्या बाजूला कुठेच दिसली नाही. त्यातून गुगल मॅपवरही चिमूर किल्ला मॅप केलेला आहे आणि त्यात स्थान पाहिलं तर तिथे जे काही फोटो दिसतात तेच प्रत्यक्षातही तिथे पोहोचल्यावर दिसलं.

किल्ल्याच्या जागेवर स्मारक, सभागृह

का. ही. ही. शिल्लक नाहीये तिथे किल्ल्याचे अवशेष म्हणून... शेगावला कमानीचा एक दगड तरी शिल्लक होता, इथे तर काहीही नाहीये. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे तेवढे आहेत. हे स्मारक आणि शेजारी संत तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे आणि २००८ साली अनावरण झालेला "शहीद बालाजी रायपूरकर" यांचाही पुतळा आहे. जवळच १९७१ साली बांधलेलं हुतात्मा स्मारक आहे. ही घटना घडली १९४२ सलात, त्या दिवशी नागपंचमी होती, त्यामुळे स्मारक म्हणून पंचमुखी नागाची छत्रधारी प्रतिमा आहे. आणि या जागेवर मोठे फुले सभागृह आहे. हा सर्व परिसर एकेकाळी ह्या चिमुर किल्ल्याचा भाग असणार जे आता भुईसपाट करून किंवा झाल्यावर ह्या वास्तू आणि पुतळे तिथे उभारलेले आहेत.

एकूणच या वास्तूमुळे ह्या किल्ल्याच्या लेखात चार ओळी तरी घेता आल्या. अन्यथा एक ओळही यावर लिहिता येणार नाही अशी चिमूर किल्ल्याची आता अवस्था आहे.

भिवापूर

यानंतर याच दिवशी चांदपूर किल्ल्याची भेट होती, परंतु मांडे सरांच्या पुस्तकांतच फार काही अवशेष दिसत नसल्याने आता तर नक्कीच काही उरलेलं नसणार ह्या खात्रीने तो नियोजनातून सरळ गाळला. पुढे भिवापूर किल्ल्यालाही भेट द्यायची होती. तो मात्र बघावा असं ठरलं. प्रवास परतीचा चालू झालेलाच होता त्यामुळे चंद्रपूरातून आता नागपुरात परत घुसलो होतो. गावात पोचल्यावर किल्ला शोधण्याचे नेहमीचे सोपस्कार पूर्ण झाले आणि किल्ला म्हणून जे काही शिल्लक राहिले आहे त्या ठिकाणी पोचलो.

अनगड देव आणि पूर्वी असू शकेल अशी दरवाजाची जागा

तिथेच इतस्ततः तुकड्यात पसरलेल्या चार भिंती शिल्लक आहेत. एक थडगं, इकडे-तिकडे थोड्याशा अर्धवट भिंती, एका चौथर्यावर पांढरा रंग देऊन त्यावर लाल रंगातल्या दोन-चार अनगड मूर्ती, त्याच्या शेजारी बहुतेक वाड्याच्या भिंती, जवळच "इथे कदाचित दरवाजा असू शकतो" अशा स्वरूपातील पडके अवशेष, झाडाझुडपात हरवलेल्या भिंतींचे अवशेष अशा एकूण स्थितीत हा किल्ला म्हणून शिल्लक आहे.

शिल्लक अवशेष

केवळ पंधरा मिनिटात ते बघून निघणार तेवढ्यात चौकशी करताना "एक तिकडे जुनी विहीर आहे, पण तिकडे जाऊ नका, कोणीही जात नाही" असं कळल्यावर त्या मागचं कारण लक्षात घेतलं. नाक दाबलं, पावलं सांभाळत विहीर शोधली. हगणदारीमुळे हाही भाग संपल्यात जमा आहे. विहिर तर जरी त्यात पडलो तरी सुद्धा येथे विहीर आहे हे न करण्याच्या अवस्थेत ती पोचलेली होती.

अशा तऱ्हेने हाही किल्ला संपला. मात्र चिमूर, शेगावच्या तुलनेत खूपच म्हणता येतील इतपत अवशेष इथे पाहिले आणि शेवटच्या घटका मोजत असलेला का होईना, पण हा किल्ला पाहिल्याचे समाधान पदरात पाडून घेतले.

अशा स्वरूपातले किल्ले काही आम्ही पहिल्यांदा पाहत नव्हतो आणि नंतरही असं बघायला मिळत राहणारच आहे ही खंत मनात होतीच. पण सध्या जे आहे त्यावर समाधान मानण्यापलीकडे हातात तरी काय होतं? जो दगड शिल्लक म्हणून बघितला तो सुद्धा पुढे कोणाला बघायला मिळणार नाही याचं दुःख करायचं, की शिल्लक दगड बघायला तरी किमान मिळाला ह्यात समाधान मानायचं? आणि मुळात यानंतर अश्या जवळपास काहीच शिल्लक नसलेल्या किल्ल्यांवर लेख तरी का लिहायचा?

पण किमान शेवटच्या घटका मोजत असलेल्या भिंती, दगड, कोरडी विहीर, स्थळांच्या डागडुजी पायी केलेली दारुण अवस्था, त्यात घालवलेलं किल्लेपण आणि तरीही त्यातून डोकावणारा एखादा त्याकाळची साक्ष देत असलेला काळा दगड हे जसं आम्हाला बघायला मिळालं तसं इतरांनाही बघायला मिळावं, त्याची माहिती असावी म्हणून!

हा छोटेखानी लेख अशा किल्ल्यांसाठी...

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!