Sunday, January 28, 2024

किल्ले महिमंडणगड, पर्वत आणि चकदेव - I

महिमंडणगड

One the way...

सूर्योदय

गेल्यावेळी ना, रात्री तीन वाजता इथे पोचलो होतो. तिथे असलेल्या एकमेव हॉटेलच्या बाहेरच्या बाकड्यांवर मुक्काम केलेला. कशाला उगाच अपरात्री हॉटेलवाल्यांना उठवा, तेही तीन तासांसाठी?

यावेळी मात्र निवांत इथे पोचलो. सूर्योदय इथूनच बघितला. ज्या बाकड्यांवर गेल्या वेळी रात्री तीन वाजता झोपलो होतो, तिथे यावेळी चक्क साडेसात नंतर पोचलो.

गेल्यावेळी आधी खाणं-बीणं काही नाही, यावेळी चक्क आधी गावात जाऊन कांदेपोहे चहा झाला.

आता हे "यावेळी" आणि "गेल्यावेळी" हे पुराण म्हणजे, या आधी इथे आलो होतो. त्यावेळी आणि यावेळीही आमचं नियोजन अगदी जसाच्या तसं होतं. फक्त यावेळी पहिल्या ठिकाणी चढाईला सुरुवात केली ना, त्याच घड्याळाच्या वेळी, गेल्या वेळी आमचा ट्रेक रद्द झाला होता काही कारणाने.

त्यामुळे "गेल्यावेळी"च्या आठवणी काही जात नव्हत्या. निवांत नियोजन, पण "शुरु होने से पहले ही खतम" होतं ना, तेव्हा केवढी रुखरुख लागून राहते. एक तर असे योग असं चटकन जुळूनही येत नाहीत. तब्बल पाच वर्षांनी, हो पाच वर्षांनी हा योग आला होता. पाच वर्षांनी आम्ही त्याच ठिकाणी होतो, रद्द झालेलं नियोजन पुन्हा पूर्ण करण्यासाठी. फरक यावेळी साथीदारांचा होता. त्यावेळी असलेले प्रसाद आणि प्राजक्त हे येऊ शकले नव्हते, तर यावेळी मकरंद आणि प्रमोद होते. त्या आणि ह्या, दोन्हीवेळी मी आणि विनीत होतो.

रघुवीर घाटातून माहिमंडणगड

आता माहिती असणाऱ्यांना लक्षात आलं असेल, की आम्ही कुठे भटकंतीला चाललो होतो. बरोबर, रत्नागिरी-सातारा सीमेवर रघुवीर घाटावर लक्ष ठेवून असलेल्या महिमंडणगडावर.

सांगितलं तसं, आधी गावात जाऊन न्याहारी केली, ते गाव म्हणजे "मेट-शिंदी". नंतरच उलटं फिरून, वाटेत नुसतं "वाईच जरा येतो रे आधी गावात जाऊन", म्हणून हात करून आलेल्या महिमंडणगड किल्ल्याकडे गाडी हाकली. गांव आणि रघुवीर घाट जोडणारा रस्ता वन खात्याच्या अखत्यारित असल्याने कच्चा आहे, डांबरी करायला परवानगी नाही. लाल मातीच्या या रस्त्याने धूळ उडवत गावाकडे चाललेल्या लाल परीला टाटा करून एका विशिष्ट ठिकाणी आलो. "विशिष्ट ठिकाणी" म्हणजे तिथे असं काही लिहिलेलं नाही, की इथून चढायला सुरुवात करायची.

हा किल्ला तितकासा प्रसिद्ध नसल्याने पर्यटक तिकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे जे भटके असतात तेच इकडे वाट वळवतात. त्यातून घनदाट आणि राखीव जंगलांचा भाग असल्याने, तिथे येणं धोक्याचं आहे. माहितगार वाटाड्या, काळ-वेळ या सगळ्याचं नियोजन व्यवस्थित करणं इथे गरजेचे ठरतं.

समाधी

अपेक्षित घनदाट जंगलातून जाणाऱ्या वाटेकडे वाटचाल

चढायला सुरुवात केल्यावर अवघ्या तीन-चार मिनिटांत एका दगडी समाधी वजा वास्तूशी पोचलो. वाटाड्या बरोबर असल्याने चढायच्या मार्गाची चिंता नव्हती, पण डोळे काहीतरी वेगळं शोधत होते. हे घनदाट जंगल, यात गवे-अस्वलं हे आहेतच याची कल्पना होती. पण गंमत म्हणजे पाच वर्षात एवढा फरक पडेल असं वाटलं नव्हतं. तिथलं जंगल घनदाट वाटतच नव्हतं, वाटही प्रशस्त होती. गावकरी रोजच फिरायला येत असल्यासारखं काट्याकुट्या मारून वाट स्वच्छ. अगदी हाताने झाडाची फांदीही बाजूला करायला लागणार नाही एवढी...

अर्थात चांगलं वाटलं की वाट स्वच्छ आहे, साफ झाल्याने जंगली प्राण्यांचा धोकाही तसा कमी. पण एका कोपऱ्यातून वाईटही वाटत होतं, ती अवस्था बघून.

झाडांचा बोगदा

एके ठिकाणी वाट झाडांच्या तयार झालेल्या तीन बोगद्यानी अडवलंनी. का कोणास ठाऊक हे ओळखीचं वाटलं. बोगदा ओलांडून पुढे मात्र एकदम वाट साफ. डोक्यावरून झाडांचं छत बाजूला झालं, की एकदम सुरक्षित वाटतं. फरक फार नसतो तसा अंतरात, अगदी काही फूट. पण आधी मनात धाकधूक असते आणि अवघ्या दहा फुटांवर मोकळं आकाश. सूर्याचा प्रकाश, त्या छतामुळे आलेला अंधार दूर करताना भीतीच सावटही दूर करत जातो.

मोकळ्या वाटेवर आलो, वाट तशी अरुंद होती काही ठिकाणी. अशा ठिकाणी गवा धावत आला, तर महाकठीण काम होतं. त्यासाठीच तर स्थानिक गावकरी बरोबर पाहिजे. त्यांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त अशा प्रकारचे अंदाज असतात. अर्थात सगळे खेळ फक्त मनातच चालले होते आणि ते सुदैवाने मनातच विरले.

तटबंदी

निसर्ग उत्तम साथ देत होता. मागे दिसणारा डोंगर कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेला होता. वाट साफ आणि मळलेली असली, तरी खाली दाट जंगल वन समृद्धीची जाणीव करून देत होतं. पायाखाली त्या वाळक्या गवतातून अचानक पायऱ्यांनी डोकं वर काढलं आणि मग वेध लागले ते गडाच्या माथ्याचे. त्यात थोड्याच अंतरावर, उजव्या बाजूला चक्क तटबंदीचे अवशेष दिसले आणि गडप्रेमी सुखावला.

टाके, मागे टाके समूह आणि त्यामागे देवस्थान

देवस्थान

गडावर आलोच म्हणजे. मागच्या बाजूला रघुवीर घाटाकडे असणारे गडाचे टोक होते, तर समोर गडाचा या बाजूचा भाग. समोरच एक टाकं दिसलं आणि त्याच्या पलीकडे एक टाक्यांचा समूह. त्याच्याही पलीकडे या किल्ल्यावरचे देवस्थान. देवस्थानावर मंडपासाठी घातलेला लोखंडी सांगाडा शिल्लक होता. वाऱ्याने छप्पर उडून गेलं असेल. देव-दर्शन घेऊन पलीकडचं सातारा न्याहाळलं.

टाके समूह

टाक्यात मूर्ती

तिथला टाके-समूह अभ्यासण्यासारखा आहे. एका टाक्याच्या आतल्या भागात मूर्ती कोरलेल्या दिसल्या. टाक्यांचं उतारावरचं स्थान, जेणेकरून पावसाचं पाणी विनासायास कसं साचवता येईल, एक टाकं भरल्यावर त्यातूनच दुसरं टाकं भरण्यासाठी केलेली पन्हळ.. सगळं न्याहाळलं!

गडामाथ्यावरचं पाहिलं टाकं आणि मागे किल्ल्याचा घाटाच्या बाजूचा भाग

गेलो मग किल्ल्याच्या घाटाच्या बाजूच्या टोकावर. किल्ल्याचा हा डोंगर आणि त्याला लागून असलेला दुसरा डोंगर यातून हा घाट रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जोडतो.

घाट उतरल्यावर खाली रत्नागिरी जिल्ह्यात "खोपी" हे माझ्या आत्तेचं गांव, तर घाटाच्या वरच्या बाजूला "मेट शिंदी" हे गांव. पण हे सातारा जिल्ह्यात. आणि गंमत म्हणजे सातारा जिल्ह्याच्या इतर भागातून याचा जिल्ह्यात असणाऱ्या ह्या "शिंदी" गांवात यायचं झाल्यास, आधी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन मग रघुवीर घाट मार्गे वर उलटं चढून येण्याला पर्याय नाही. तसा सध्या एक रस्ता करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच ते पूर्णही होईल. मग मात्र साताऱ्यातून किंवा पुण्यातून या बाजूला यायला नवीन मार्ग तयार होईल आणि रत्नागिरीत जाऊन उलट याची गरज भासणार नाही. उलट इथून सरळ रत्नागिरीत जाण्यासाठीच या मार्गाचा वापर करता येईल.

टोकावरून खाली रघुवीर घाट

ह्या टोकावरून खाली दिसणारा वळणावळणाचा घाट न्याहाळत बसावा असाच आहे. सूर्योदयाला इथे पाहिजे होतो. समोर घाटाच्या उजव्या बाजूकडे असलेला डोंगर त्याचा विस्तार उलगडून दाखवत होता. दाट झाडीने भरलेला त्याचा पदर तर जंगलाचा दाटपणा स्पष्ट करत होता. पण त्यात एक नजर लागून गेली असावी कधीतरी. जोरदार भूस्खलन होऊन एक मोठा पट्टा उभा झाडं तुडवत खाली आलेला दिसला. उगाच भरल्या डोंगरावर जखमेसारखा भासला तो.

निवांतपणे निसर्ग अनुभवल्याने खाली यायला मात्र जवळपास साडेदहा वाजून गेले. इथपर्यंत सगळं छान होतं पण खरी गंमत यानंतर होती पुढे जायचं होतं पर्वतला...

पर्वत

शिंदी गावाच्या पुढे रस्ता "वळवण"कडे जातो. तिथे दोन वाड्या आहेत. आधी एक छोटीशी वाडी आहे. वाडीच्या डाव्या बाजूला लागून चकदेव, तर उजव्या बाजूला पर्वत आहे. या वाडीत आमचे चकदेवचे वाटाडे राहत असल्याने, इथेच गाडी लावली. जेवणाची व्यवस्था इथेच होती.

दुपारचे अकरा वाजून गेलेले. एक किल्ला करून आलेलो आणि समोर भुकेला जेवण हजर. मारला की सगळ्यांनी ताव त्यावर... भरल्या पोटाने डोक्यावर उन्हं असली, की पापणी जड व्हायला लागते. मग काय अंमळ पडलोच त्या मस्त सारवलेल्या अंगणात. ☺️

डोक्यावर मस्त माडाच्या झावळ्यांच्या झापांनी अच्छादलेल्या मांडवात, उताणे पडलेल्या या अवस्थेत आम्हाला पाहिल्यावर वाटाडे जंगम यांच्या घरी सगळे निवांत झाले असणार, की ही पोरं काय संध्याकाळपर्यंत उठत नाहीत. त्यांना काय, आमची अवस्था काही वेगळी होती का? इतर वेळ असती, तर कूस बदलायची सुद्धा तसदी न घेता गाढ झोपलो असतो. पण वेळ भटकंतीची होती. समोर "पर्वत" होता. इथेही दाट जंगल होतं. वेळा पाळणं गरजेचं असतं इथे.

एक वाजता उठलोच. आवरलं. रात्रीचा मुक्काम वरती. त्यामुळे अंथरूण वगैरे, स्वयंपाक या सगळ्या सामानासहित जड पाठपिशव्या पाठीवर घेतल्या. मुकाटपणे "रे पर्वत, एलो रे बाबा..." म्हणून वाटचाल चालू केली. आता पुढची वाडी "उगवती वाडी". इथपर्यंत खरा रस्ता आहे, गाडी नेता येऊ शकते. पण गाडी वाटाडे जंगम यांच्या अंगणातच लावून, दीड वाजता शेतातून आम्ही चालत सुटलो.

चोंढातली वाट

या उगवत्या वाडीकडेच यायला आम्हाला अर्धा तास लागला. खाली सुका पाचोळा आणि दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, याच्यामधून जाणाऱ्या चोंढातून चालत वरात चालली. पण तो सावलीचा आनंद जेमतेम दहा मिनिटे टिकला. पुढे पूर्ण उघडी बोडकी वाट आ वासून आमच्या समोर होती. खाणाखुणा बघत पर्वतच्या सोंडेवर चढलो.

गवत जाळून साफ केलेली वाट

पर्वतच्या पदरात दाट झाडी आहे, पण तिथे पोचेपर्यंत बिना छप्पर जाण्याला पर्याय नव्हता. वर दुपारच्या दोनचं रणरणतं ऊन डोक्यावर घेऊन चढणं भाग होतं. पर्वतवर मंदिर असल्याने गावकऱ्यांचा राबता आहे, यामुळेच वाट शोधायला फारशी अडचण येणार नव्हती इथून. त्यात वाटे जवळचं गवत जाळून वाट साफ केलेली होती. पण अर्थात त्याने उन्हाची दाहकता मात्र अजूनच जाणवायला लागली.

थोड्या थोड्या अंतरावर झाडी

मागे सुंदर डोंगर-झाडी

चला पुढच्या झुडपापर्यंत जाऊन जरा बसू, असं करत करत निघालो. पण अशी झुडपं सुद्धा तब्बल अर्ध्या-अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. पाणी-पाणी होत होतं. त्यात संत्री ऊर्जा देतात. जरा संत्री-ब्रेक घेतला. नंतर धबधब्याची जागा आली. इथे च्याऊ-म्याऊ खादंती ब्रेक घेतला. असे छोटे ब्रेक घेत, एका ठिकाणी दोन्ही बाजूंनी झाडांचं आच्छादन घेऊन आमची वाट बघत असलेल्या पायऱ्यांजवळ आम्ही पोचलो.

दोन्ही बाजूंनी झाडांचं आच्छादन असलेला पायऱ्यामार्ग

मंदिर कळस दर्शन

थोडे थोडके नाही, साडेचार वाजले होते. चढाई चालू करूनच अडीच तास झालेले. सकाळचा महिमंडण, दुपारचे जेवण आणि डोक्यावर ऊन. सगळ्याचा हा एकत्रित परिणाम होता. मग मात्र पुढच्या पंधरा मिनिटात मंदिराचं कळस दर्शन झालं. लगेचच "स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन" मंदिरात दाखल झालो.

आता निवांत वेळ होता. मंदिर पाहिलं, दर्शन घेतलं. विश्रांतीही घेतली, पण ह्यावेळी फार नाही. कारण सूर्य अस्ताला जाण्याआधी काही काम शिल्लक होतं. रात्री स्वयंपाक आणि एकूणच पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक होतं. अर्थात त्याची व्यवस्था करण्यासाठी लागणारं साहित्य आणि माहिती आमच्याकडे होती.

मंदिराच्या मागची विहीर

मंदिराच्या मागच्या बाजूला थोडंसं खाली उतरून, काही अंतरावर विहीर आहे. सगळं सामान इथेच मंदिरात ठेवून, आधी आमच्याकडच्या बाटल्या आणि मंदिरातली कळशी वगैरे घेऊन तिकडे निघालो. पाणी भरलं.

मागच्या बाजूचं टाकं

पण म्हटलं, परतण्याआधी ह्याच वाटेने पुढे जाऊन थोडा निवांत निसर्ग अनुभवावा. भरलेल्या बाटल्या तिथेच ठेवल्या. पर्वताच्या मागची, सातारा कडची बाजू कड्यावर बसून अनुभवली मग. इकडेही एक पाण्याचे टाकं आहे. पाणी घेऊन वर आलो. स्वयंपाकासाठी पाण्याबरोबरच सरपणाची ही गरज होती. झाडीच झाडी असल्याने, वाळक्या काटक्यांची कमतरता नव्हतीच. सगळी सोय झाली. सूर्य "उगवत्या वाडी"कडे मावळला.

निरभ्र आकाश आणि ओळखा बरं त्यात कोणतं हे नक्षत्र?

दुपारपासून निवांत थांबायला न मिळाल्याने ते सुख आता घेत होतो. सूर्य मावळला होता. आकाश निरभ्र होतं. शहरातल्या गजबजाटापासून, दिव्यांच्या प्रदूषणापासून खूप लांब पर्वतावर, होय शब्दशः "पर्वत"वर होतो. डोक्याखाली हात घेऊन निवांत पडायचं फक्त. ताऱ्यांकडे डोळे लावून नुसत्या डोळ्यांनी जे आकाश दिसतं, ते कॅमेरातून फोटोमध्ये उतरवायचं कसब माझ्याकडे नाही. त्यामुळे त्या ताऱ्यांची चमचम डोळ्यात भरून घेत होतो.

चूल मांडली...

मोबाईल नवीन असल्याने थोडे प्रयत्न केले, पण नंतर ते दिलं सोडून. नुसता काळोख अनुभवला. कितीही नको वाटत असलं, तरी एका क्षणाला उठावंच लागतं. चूल मांडली, साहित्य बाहेर आलं. सूप आणि जेवण. पापड, लोणचं जी काही व्यंजन होती, त्याने पान सजलं आणि जानेवारीच्या त्या थंडीत सुंदर पोट पूजा झाली. नियोजनातला एक टप्पा हा, म्हणजे एक रात्र पर्वत वर.. हे पूर्ण झालं!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!