Thursday, December 27, 2012

हडसर (पर्वतगड) -निमगिरी-चावंड (प्रसन्नगड) II

        सह्याद्रीला औरंगजेब का घाबरत होता त्याचे उदाहरण सह्याद्री देत होता. गडाच्या पाठीमागे असलेला परिसर चारही बाजूनी डोंगरांनी घेरलेला होता. ज्याच्या ताब्यात किल्ले, महाराष्ट्र त्याचा हे काही चुकीचे नव्हते. कोणत्याही गडावर पोचलो कि महाराज, त्यांचे जीवाला जीव देणारा मावळे, हेर यांच्याबरोबर गडांची ठिकाणे ठरवणारे, हेरणारे पथक यांची आठवण निघतेच निघते. कौतुक करायला शब्द पुरत नाहीत.
        गडावर तर पोचलो होतो. आता काम बाकी होते ते मुक्कामाची, जेवणाची सोय करण्याजोगे ठिकाण शोधण्याचे. गडावर बुरुज, बालेकिल्ला, माची, सदर, अंबरखाना, दारूगोळा-कोठार काहीही नाहीये. पण ३ गुहा आहेत. अगदी ५०० sq. ft. च्या 1RKआहेत. ;) पैकी २ गुहात पाणी साचलेले, अपुरी जागा, थोडक्यात राहण्यास अयोग्य. अर्थात तिसऱ्या गुहेतही फारशी चांगली परिस्तिथी नव्हती पण राहण्यासारखी जागा वाटत होती. त्यात प्रकाश मारण्यावर एक बादली दिसली. Hall मध्ये गुरे राहून गेल्याचे अवशेषही होते. कदाचित कुणी गुराखी दावणीला गुरे बांधून इथे ठेवत असावा, तशी सोय दिसत होती. संपूर्ण गडाला प्रदक्षिणा मारून झाली. पाण्याची ४-५ टाकी दिसली. २ टाक्यातले पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य होते. शेकोटी आणि चुलीसाठी मुबलक जळण होते. गडावर Open-ceiling देवळाशेजारी सुबोध आणि माष्टर शेफ समीर चूल मांडत होते. गुहेमध्ये शिरून मी पाण्याची बादली हस्तगत केलीच होती, तिथे कुण्या परोपकारी ट्रेकर/गावकऱ्याने ठेवलेली काडेपेटी  अन् रॉकेलसहित "भुत्या" (बाटलीत रॉकेल आणि तयार केलेली चिंध्यांची वात घालून केलेला दिवा), केरसुणी या वस्तू ठेवल्या होत्या. त्यांचा मान राखून त्या वस्तू वापरासाठी घेतल्या. रॉकेल आम्हीही आणले होते पण हि रेडीमेड वस्तू नक्कीच उपयोगाला येणार होती. सुबोध आणि माष्टर शेफनी चूल पेटवून चहासाठी आधणही ठेवले होते. सुबोधनी त्याच्यासाठी दूध घेतल्यावर आम्ही चहारूपी अमृत प्यायलो. अंधार पडत चालला होता. सुंदर चांदणे पडले होते. पोर्णिमा होऊन तीनच दिवस झाल्याने चांदोबाची वाट बघत होतो. आमच्या कुकनी पेशल टोमॅटो सूप बनवले. गरम-गरम सूप पोटात गेल्यावर शेफनी खिचडीही केली. एकदम मस्त. मग अर्थातच गप्पा. एव्हाना चांदोबांनीही आम्हाला पहिले होते. शेकोटी साठी आधीच हेरून ठेवलेली लाकडं गोळा केली. अपेक्षेपेक्षा थंडी कमी जाणवत होती, पण तरीही तारांगणाखाली किल्ल्यावर, चंद्रप्रकाशात शेकोटीची मजा काही औरच! शिवाय गुहेत जागा मिळाली नसल्याने बाहेरच झोपत होतो. आम्ही अतिक्रमण केले असे वाटून एखाद्या स्थानिक श्वापदाला राग येऊन आमची विचारपूस करण्यास ते येऊ नये यासाठीही शेकोटी उपयोगी पडणार होती.


        झोपायला ११ वाजलेच पण सुंदर झोप लागली. सगळेच दमले होते त्यामुळे काही permanent भोंग्यांबरोबरच बाकीचे temporary भोंगेही चालू होते.
        शेकोटी विझली होती. कोणत्याही प्रकारच्या श्वापदाने आमची चौकशी करण्याचा त्रास घेतला नव्हता थंडीत रविवारी सकाळी १० च्या आधी पांघरुणातून तोंडही बाहेर काढायचे कष्ट न घेणारेसुद्धा अशा वातावरणात लवकर उठतात. आम्ही ६लाच उठून बसलो होतो. सूर्यनारायणाच्या आधी उठून त्याचेच स्वागत करण्याचा योग फार कमी वेळा येत असतो. ;) सगळ्यांनी आपापली तोंडं घुसळून घेतली. उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने विधी आटपून घेतले. चूल पेटवली, चहा!! सूर्योदयाच्या वेळी चुलीवर केलेला चहा. मस्तच... समीर, सुबोध, प्रणव, निखिल ने गरम-गरम मॅगी , मी आणि आनंदने उपासाकारणे बटाट्याचा चिवडा नि केळ्याचे वेफर्स...
        अंघोळीची गोळी घेतली. बाटल्या भरून घेतल्या, क्लोरिनचे २-२ थेंब जलशुद्धीप्रीत्यर्थं त्यात टाकले. केरसुणी, भूत्या, बादली ई. साहित्य देवळात नीट आडोशाला ठेवले. महाराजांचा जयजयकार करून "निमगिरी" उतरायला लागलो.
        पायऱ्यांचा पहिला टप्पा झाला. आलेल्या रस्त्याने उतरणार नव्हतोच, पायऱ्या-मार्ग सोडून दिला आणि दोन डोंगरांच्या मधल्या बेचक्यातून उतरायला लागलो. समीर-प्रणव पुढे, मी-आनंद मधे आणि सुबोघ-निखिल मागे. उन फुकट घालवायचेच नाही असे ठरवलेले असल्यासारखे पूर्णपणे सावली-विरहित वाटेवरून उतरत होतो. पुढच्या आणि मागच्या दोन्ही जोडगोळ्यांचा मेळ राखत पुढे जात होतो. अचानक दगड पडत असल्याचा आवाज आला. आमच्या वाटेवरच वरून कड्याचे दगड पडत होते. समीर-प्रणव पुढे होते, त्यांच्या आणि आमच्यामधून उन्हाने तापून तडकलेले दगडाचे तुकडे धडधडत खाली निघून गेले. त्याबाजूला लक्ष ठेवत पटापट पावले पुढे टाकत होतो. मधेच मागच्या जोडगोळीला direction देत होतो. अखेर गाड्या लावलेल्या देवळाशी पोचलो. Energelयुक्त पाण्याची अख्खी बाटली सगळ्यांनी मिळून घशाखाली उतरवली. गाड्या चालू करणार तोच माझ्या गाडीची डिकी उघडी असल्याचे लक्षात आले. कुलूप तोडलेले होते. गाडीचे कागद सोडून toolkit वगैरे गायब होते. गाडीचे कागद आणि पेट्रोल शिल्लक होते हे उपकार समजून घेऊन "चावंड" च्या दिशेने निघालो.
        वाटेत "नाणेघाट" आम्हाला खुणावत होता पण तो करून मग चावंडसाठी वेळ पुरणार नव्हता. चावंडची दिशा पकडली. तलावाला वळसा घालून ३० एक किमीच्या खराब रस्त्यानंतर चावंड दिसला. एका घराजवळ गाड्या लावल्या. गावातल्याच एका घरात बॅगा सुपूर्द करून पाण्याच्या २-३ बाटल्या बरोबर ठेवून ११:५५ च्या मुहूर्तावर चावंड चढायला प्रारंभ केला. मुबलक उपलब्ध असलेल्या उन्हाचा उपभोग घेतच होतो. वर पाणी आहे कि नाही याची कल्पना नसल्याने पाणी जपून वापरत होतो. 

        जवळ-जवळ ३०-४० मिनिटांनी सावली मिळाली. दगडातल्या अत्यंत अरुंद, एक-एक पाउल मावेल अश्या पायऱ्या, त्याशेजारी ग्रील म्हणून लावलेले आणि आता मोडून पडलेले लोखंडाचे तुकडे दिसले. पायऱ्यांना लागून कातळावर मजबूत लोखंडाची तार बांधलेली होती. तारेला धरून त्या पायऱ्यांनी वर निघालो. ""जंबुरका " जातीची एक तोफ वरती पुरून ठेवलेली आहे, ती सापडली (जातीपातीतून तोफेचीही सुटका नाही तर!!!) पायऱ्या रुंद होत गेल्या. शेवटी-शेवटी तर ८-१० फूट आडव्या पायऱ्या होत्या. वर पोचताच दगडात कोरलेल्या गणरायाने आमचे स्वागत केले. २ किल्ल्यानंतर ह्यावर प्रथम गडाचा दरवाजा दिसला. जरावेळ सावलीत बसल्यावर फ्रेश वाटले. समीर-प्रणव पुढे गेलेच होते. मी आणि आनंदने स्पीड वाढवला, वर जाणाऱ्या मंदिराच्या पायवाटेने निघालो. मंदिरात पोचलो. देवाची ख्याली-खुशाली विचारून घेतली. आनंद-निखिल-सुबोध मागे होते. मी प्रणव-समीर ला शोधून काढले. आम्ही तिघे मिळून "सात टाकी सांगा कुणी पहिली..." करत हिंडू लागलो. ह्या गडावर ७ टाकी आहेत असे गावकऱ्यांनी सांगितले होते.
        शनिवार-रविवार २ दिवस सुट्टी मिळत असताना घरी तंगड्या वर करून पिक्चर बघत लोळत पडायचे सोडून मी, समीर आणि प्रणव खांद्यापर्यंत वाढलेल्या गवतातून हे नसते धंदे करत हिंडत होतो. असते एकेकाला हौस (कि खाज?)...
        वेळेचे महत्व लक्षात घेऊन दरवाजाकडे परत फिरलो, सगळे वाटच बघत होते. आम्ही उगाचच वर काहीतरी लय भारी बघितलं आणि ह्यांनी ते miss केलं असं भासवायचा प्रयत्न करून बघितला.
        पुनःश्च गणरायाला नमस्कार करून त्याचा निरोप घेतला आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली. आळीपाळीने फोटो काढून घेतले. चढायला लागलेल्या पेक्षा निम्म्या वेळात खाली आलो सुद्धा. बॅगा ठेवलेल्या घरातल्या काकांना चिवड्याची पुडी देऊन थोडं ओझं कमी केलं आणि समाधान मिळवलं. जवळच बोरिंग होतं त्याखाली डोकं घातलं. ते थंड झाल्यावर बाटल्या भरून घेतल्या, पाणी प्यायले आणि जुन्नरच्या दिशेने रवाना झालो. वाटेत थांबण्याचे कारणच नव्हते. जुन्नरच्या हॉटेलात थांबलो. त्यापुढचा stop direct पुरोहित मधे चहासाठी. नंतर थेट पुणे.
        किल्ले मुळातच आडवळणाचे not well-known, non-popular वगैरे निवडलेले होते. समीरमुळे आधीच well-planned असलेला ट्रेक सगळ्यांच्या साथीने सुंदर झाला. सिमेंटच्या जंगलापासून दूऽऽऽर चांदण्यांच्या छपराखाली शांत वातावरणात एक रात्र किल्ल्यावर अनुभवायला मिळाली. प्रत्येक ट्रेक मधे खूप काही शिकायला मिळते, ज्ञानात भर पडते, चुका समजतात. त्या होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी हेही समजते. "पन्हाळगड ते विशाळगड" सारख्या ट्रेक मधून आपण कुठे आहोत हे लक्षात येते. सोमवार ते शुक्रवार सरकत्या खुर्चीत, एसी मधे बसल्यानंतर अश्या ट्रेकमुळे आपली जागा कळते. प्रत्येक ट्रेक मधे महाराज, मावळे, इतिहास डोळ्यासमोर येतो. कधी उंच-उंच कडे, खडे कातळ तर कधी छोटासाच पण दुर्गम किल्ला.. हा सह्याद्री, आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करून देतो आणि इतिहासासमोर, महाराजांसमोर, मावळ्यांसमोर आपणहूनच आपण नतमस्तक होतो.....

हडसर (पर्वतगड) -निमगिरी-चावंड (प्रसन्नगड) I

"शनिवारी काय करतोयस?" सुबोधच्या प्रश्नावरून काहीतरी बेत शिजला असावा याची कल्पना आलीच. "हडसर-निमगिरी-चावंड मारायचाय".
"मी नक्की!" मी.
        प्रणव, निखिल, सुबोध, समीर आणि मी. आनंद पण in झाल्याने ६ जण आणि ३ गाड्या. २ दिवसाचा ट्रेक असल्याने थोडी तयारी करावी लागणार होती. डाळ-तांदूळ, गोळ्या-बिस्किटं, चिवडा, Maggie पाकिटं आणि माझी, आनंदची संकष्टी असल्याने बटाट्याचा चिवडा वगैरे खाऊ, emergencyची औषधे, अंथरून पांघरून, जेवण बनवण्यासाठी साहित्य ई.ई. तयारी सगळ्यांनी मिळून केली.
        शनिवारी ९ च्या आधी न उठणारा मी सव्वा ५ ला शनिवार वाड्याजवळ आनंदची वाट बघत होतो. नाशिक फाट्याजवळ समीर आणि प्रणव येऊन मिळाले. मोशी फाट्याजवळ सुबोध, निखिल. एकदा पेट्रोल भरायला थांबलो आणि मग थेट नारायणगांव. हात थंडीने बधीर झाले होते, गाडीच्या गरम सायलेन्सरला हात धरून ठेवला असता तरी जाणीव झाली नसती. अर्थात मिसळ-चहाला पर्यायाच नव्हता. मिसळ संपता-संपता कधीतरी चवीची जाणीव झाली, तोपर्यंत चवीकडे लक्षच गेले नव्हते. मिसळीनंतर चहा नाही घेतला तर foul धरला जातो, त्यामुळे तो ओघाओघाने झालाच. उदरंभरणं झाल्यावर जुन्नरच्या दिशेला लागलो. डाव्या बाजूला किल्ले शिवनेरी आम्हाला जुन्नर जवळ आल्याचे सांगू लागला. त्याची ख्याली-खुशाली तिथूनच पुसून महाराजांच्या पुतळ्याला मुजरा करून उजवीकडच्या रस्त्याला लागलो.
        पुण्यापासून साधारण ११० किमीवर हडसर गांव लागले. रस्ता पण ठीक ठाक होता. सव्वा १० वाजले होते. गावकऱ्यांना वाट विचारून गडाकडे कुच केली. डाव्या बाजूला हडसर काळ्या दगडाची निधडी छाती काढून दाखवत होता. आम्हीही डोक्यावर येत चाललेल्या सूर्याच्या उन्हात वाट काढत होतो. सुरुवातीलाच असलेल्या देवळाला वळसा घालून गुरं चारायला आलेल्या गावकऱ्यांकडून पायवाटेची खात्री करून घेतली आणि उगाचच इकडचे-तिकडचे फोटो काढत एका खड्या कातळाशी पोचलो. मालक (सुबोध), निखिल आणि आनंद यायचे असल्याने थोडी विश्रांती घेतली. कॅमेरांना फोटो काढावेसे वाटत होते, आम्ही त्यांना मदत केली. समोरचा काळाकभिन्न खडक आमच्याकडे बघत होता, त्याला "मस्ती" म्हणून आव्हान आम्ही देणार नव्हतो. कातळात लोखंडी पहारीचे काही तुकडे ठोकलेले होते. दुसरी कोणतीही वाट नाही ह्याची खात्री झाल्यावर त्या कातळाचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. त्यावर पाय देण्यासाठी ठराविक अंतरावर खाचा मारलेल्या होत्या. दोरीशिवाय चढणे अशक्य नसले तरी उतरणे नक्की अवघड असणार होते.

        कोणत्याही ट्रेक ला जायचे, तेही "पर्यटनस्थळ" प्रकारात न मोडणाऱ्या, म्हणजे नीट माहिती ही घ्यावीच लागते. हडसर च्या माहितीत मात्र हा खडा कातळ नवीनच होता. ढाक-भैरीची आठवण झाली नसती तरच नवल. उतरल्यावर त्यावर चर्चाही होणारच होती, इथे दोर, बांबू, काठ्या काहीही नव्हते. विचार-विनिमय झाल्यावर प्रयत्न करायचे ठरले. प्रत्येक पावलागणिक अंदाज घेतला जात होता. पहारीचे तुकडे आणि पाय ठेवायला खाचा अगदी योग्य प्रमाणात होत्या. माझ्यासारख्या कमी उंचीच्या माणसालाही अशक्य कॅटेगरीतल्या नव्हत्या. फक्त प्रयत्न थोडे जास्ती लागणार होते. हाताची पकड मजबूत असल्याशिवाय पाय उचलणे मूर्खपणाचे ठरले असते. कातळ ८५ अंशात चढायचा होता. तो पार झाल्यावर गुहा लागली. लगेच कॅमेरे सरसावले गेले. खालून येणाऱ्यांचे फोटो काढत त्यांना direction देत होतो. आम्ही हुशार असल्याने आमच्या बॅगा खाली गावातच एका घरी ठेवल्या होत्या, नाहीतर हा कातळ चढणे शक्यच नव्हते. निखीलानंद मात्र कातळावर येण्यासाठी confident वाटत नव्हते. आमच्याकडे दोर वगैरे काही नव्हते, मग निखिल गाड्यांकडे परत गेला आणि आम्ही पुढचा रस्ता बघायला लागलो. अजून एक कातळ आमच्यासमोर उभा होता पण तो कमी उंच आणि ५०-६० अंशातच होता. तो चढून गेल्यावर मात्र हनुमानाचे देऊळ, २-४ पाण्याची छोटी टाकी दिसली. एका देऊळ सदृश जागेत बैल किंवा तत्सम प्राण्याच्या हाडांचा सापळाहि दिसला. वरच्या बाजूला टेकडीवजा जागेवर गुरे दिसली आणि "खड्या कातळाबद्दल" काही का नव्हते वाचले ते लक्षात आले. गुरं होती त्याअर्थी सरळ चालत येण्याजोगी दुसरी वाटही होती. लगेच शोधकार्य सुरु झाले, खालच्या बाजूला एक ग्रुप त्या वाटेच्या दिशेने जातानाही दिसला पण ती वाट फार लांबची वाटत होती. जरा वेळाने सोप्या आणि लांबच्या वाटेपेक्षा जवळची आणि कठीण वाट बरी वाटली. मग पुनःश्च त्या कातळाकडे नाघालो. सोप्या आणि ६० अंशातल्या त्या कातळावरून उतरताना माझ्या कमरेच्या पट्ट्याला अडकवलेल्या कव्हर मधून कॅमेरा पडताना पहिला आणि तो गवतात कसा अदृश्य होतो हे बघण्यापलीकडे मी काहीही हालचाल केली नाही. तसा जर प्रयत्न केला असता तर ८५ अंशातला तो खडक उतरण्याचे कष्ट वाचले असते अन् उरलेल्या ४ जणांना मला खांद्यावरून खाली न्यावे लागले असते. एक-एक करून शांतपणे दुसराही खडक एकमेकांना direction देत उतरलो, मग मात्र कॅमेराकडे धाव घेतली. त्यातले cell पडून गेले होते आणि त्यावरचे कव्हरही गायब होते. सुदैवाने कॅमेरा आणि लेन्सचेही तुकडे झाले नव्हते ह्यात समाधान मानून झपझप हडसर उतरलो. १२:४५ झाले होते. बोअरिंग शोधून डोक्यावर पाणी मारून घेतले. दुसरे पाणी उपलब्ध असल्याने ह्या पाण्यावर "पिण्यास अयोग्य" असा शेरा मारून जेवणाची तयारी करू लागलो. तेव्हा संध्याकाळनंतर कोणते पाणी प्यावे लागणार आहे याची कल्पना नव्हती.
        पराठे वगैरे नाशवंत पदार्थांवर ताव मारला, विहिरीचे सुंदर पाणी प्यायलो. वामकुक्षी घेण्यास वेळ नव्हता म्हणून सावलीत १० मिनिटं बसून निमगिरीच्या दिशेने गाड्या हाकलल्या.
        रस्ता प्रचंड खराब होता आणि शेवटपर्यंत खराबच होत गेला. १३ किमी वर निमगिरीचा पायथा लागला. खूप वेळ शिल्लक असल्याने निमगिरी मारून चावंड वर मुक्काम करू असे विचार आम्हा वीरांच्या मनात आले, म्हणजे जड sack वर न्यायला नकोत खाली उतरल्यावर परत घेऊ असाही विचार होता. पण एक तर निमिगिरीवर जायला आणि उतरायला किती वेळ लागेल हेही माहित नव्हते. समजा, रात्र पडायच्या आत खाली आलो असतो तरी जेवण झाल्याशिवाय चावंडवर उजेडात जाणे शक्य होणारच नव्हते. Head-torch आणि चंद्राच्या प्रकाशात चावंडवर गेलोही असतो तरी वर राहायला जागा आहे कि नाही याची शाश्वती नव्हती. सरतेशेवटी sack चे ओझे वर न्यायचे नंतर वेळ आणि शक्ती यावर पुढचा बेत करायचा असे ठरले. गाड्या व्यवस्थित रस्त्याच्या बाजूला लाऊन चढाईला सुरुवात केली. उन अजिबात कमी झाले नव्हते. एका गावकरी मुलाने मार्ग दाखवला आणि झपझप पावले पडू लागली. सर्वात पुढे समीर होता आणि त्याच्या मागे सुबोध. अचानक सुबोध थांबला, समीर एका सापाजवळून पुढे गेला होता. लगेचच P510, SX40 वगैरे बाहेर आले. 
 तो छोटा अजगर असावा. नाईलाजाने त्याला गुडबाय करून पुढे चालू लागलो. सकाळपासून जरासुद्धा उन फुकट घालवलेले नव्हते. वाटेवर एखादेही सावलीचे ठिकाण नव्हते. sack चे ओझे होतेच. पुढे समीर, प्रणव, मध्ये मी, आनंद आणि मागे सुबोघ, निखिल असे चालत होतो. सावली सापडल्यावर थांबू असे मनाशी ठरवत चाललो होतो. शेवटी निमगिरी डोंगरांच्या बेचक्यात सावली दिसली. उजवीकडे किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्याही दिसल्या. १०-१५ मिनिटं सगळ्यांनी विश्रांती घेतली, Energel घालून पाणीही प्यायलो आणि परत सुरुवात केली. "पायऱ्या" हाच धोपटमार्ग असणार हा विचार पक्का असल्याने लगेचच उंच-उंच पायऱ्या चढायला सुरुवात केली. दमछाक करणाऱ्या पायऱ्या असल्या तरी अरुंद आणि धोकादायक नव्हत्या. एक भाग मात्र अवघड लागला, तो अवघड झाला होता तो पाय टिकू न देणाऱ्या सुक्या गवतामुळे आणि पाठीवरील sack मुळे. त्यात उंचीचा प्रश्न येत असल्याने मी मला सोयीस्कर वाट बघत होतो. त्यातच अडकलो आणि sack सह तो भाग पार करता येणार नाही अशी खात्री झाली. sack पुढे देऊन मी पलीकडे पोचलो. उतरताना कसरत होणार होती. पायऱ्यांचा टप्पा संपला आणि बाजूच्या निमगिरीच्या जुळ्या डोंगरावर जाण्याचा रस्ता नि पायऱ्या दिसल्या. तिकडे काहीच बघण्यासारखे नसल्याने जाणारच नव्हतो परंतु ज्या बेचक्यात सावलीसाठी बसलो होतो तिथून वर येणारी पायवाट दिसली. पायऱ्यांच्या पहिल्या टप्प्यापेक्षा बरी दिसत्ये असा विचार करून उतरतानासाठी तीच निश्चित केली. पायऱ्यांचा दुसरा टप्पा पार करून वर पोचलो.
क्रमशः

Saturday, December 22, 2012

स्मारक

कोकणातली माडा-पोफळींनी भरलेली बाग. आबुराव आणि बाबुराव दुपारचे जेवण करून चंची काढून तंबाखू मळत आहेत. समोर "संध्याकाळ", "कोंकण टाईम्स" वगैरे पेपर पडलेत.

आ.रा. (सुपारी कातरत): बाब्या, ह्ये पायलं का फेपरात?
बा.रा.: मंग तर, त्याशिवाय दिवस सुरु होत नाय आपला.
आ.रा.: चित्र नव्हं, वाचत बी जा जरा.
बा.रा.: काय हाय? त्ये होय.. शेजारच्या वाडीतून परवा लोकांना घेऊन जात होते मुंबैला, ऱ्हायाला, खायला बी देनार व्हते, (अंगठा तोंडाकडे नेत, हळू आवाजात) ह्याची पण सोय व्हती. म्हने कोनाच्या तरी मागनं "मीलालीच पायजे" एवडच वरडायचं.
आ.रा.: पल्याडच्या वाडीतली पण मुंबैला गेली व्हती, कसल्याश्या पार्कात हुभं ऱ्हायाचं व्हतं आळीपाळीनं कशाभोवती. (ओठांच्या मागे तंबाखूची गोळी सारत आ.रा. बोलले.)
बा.रा.: फुकटची मानसं निस्ती. त्ये मारू देत, ह्ये ऐकलं का? त्यो पोष्टातला गन्या सांगत व्हता, पेपरात आलंय कि इंदू मिल वर बाबासाहेबांचं कायसं बांधनार हायेत, आणि शाहू मिल वर शाहू म्हराजांचं.
आ.रा.: कायसं न्हाय रे, स्मारक. म्हायत्ये मला. (एक पिचकारी आ.रा. बोलले) मोठ्या लोकांचं बांधतात तसं. लय पैशे देऊन मोठ्ठा पुतळा करतात.
बा.रा.: मंग?
आ.रा.: मंग काय? कधीतरी लोक जातात तिथं, त्याची पूजा-बिजा करतात, हार घालतात. लय मोठी मानसं ती.
बा.रा.: आपन जायचं का बगायला?
आ.रा.: पैशे काय झाडाला लागले व्हय हिथं?
बा.रा.: वेडा का काय? (तोंडातला ऐवज पचकन थुंकत) फुकट! पल्याडच्या वाडीतली लोकं फुकट जातात कोकण रेल्वेनं. लय लोकं जातात, आरडा-ओरडा करायचा मंग ऐशीतबी मिलते जागा.
आ.रा.: ऐशी? मंग आपल्या हिथंच करू कि तसलं.. मिल हाये का आपल्या गावात?
बा.रा.: ठेल्ये बा नं. माळावर जागा हाय पाटलाच्या घराशेजारी, पन कोन जात न्हाय तिकडं म्हापुरुष येतो म्हने रातच्याला. म्या पन बगीतलाय दिवा लागलेला.
आ.रा.: लय ब्येस, सकाळच्याला नसतोय न तो, तेवाच जाऊ आनी. घाबर्तो कशाला? "घड्याळ" बरोब्बर वेळ दाखवत असताना घाबरायचं व्हय... शालेतले "एरकुंडवार" मास्तर गेले बग गुदस्ताला, त्यांचंच बांदू.
बा.रा.: अल्याड-पल्याडच्या वाडीतली सगळीच पोरं शिकत व्हती कि त्यांच्याकडं, लय पोरं येतील.
आ.रा.: ह्यातली शिकलेली पोरं मुंबैला पन हायेत, ती बी येतील. पण पैका?
बा.रा.: अरे मास्तरांनी शिकवलेली बरीच पोरं निळा, हिरवा, भगवा अन् काळा-पांडरा कोट घालून फिरतात. शिरीमंत हायेत ती. त्यांनी नाय दिला पैका तर चार-चौगात लाज जाईल त्यांची. देतीलच ते.
आ.रा.: चालल, जागाबी पडूनच हाये निस्ती. गावात रस्ते बी न्हायीत, फोन बी चालत न्हाईत. पुतळा ठेवला कि मंत्री आनु बोलावून हिथं. शेमकारांचा बन्या हाये नवं का मंत्रालयात... रस्ते व्हतील आनी फोन बी चालू व्हतील.
बा.रा.: उद्या फेपरला बातमी द्यायची मंग... "सोनवाडीत माननीय एरकुंडवार मास्तरांचे स्मारक झालेच पाहिजे" आनी त्यापायी सर्वांनी मुंबैला जायचे मोर्चा घेऊन. अल्याड-पल्याडच्या वाडीतली पोरं येतील सगली फुकटात जायचं मुंबैला म्हनून.
आ.रा.: होय होय, आत्ताच वेल हाये, गंगा व्हायला लागली कि हात धून घ्यायचे असतात.
बा.रा.: कोन म्हनतं सरकारकडं पैका नाय, स्मारकं बांधायला पैका हाय. कोन म्हनतं जमीन नाय.. हट्... मुंबैला पन जमीन हाय स्मारकासाठी फुकट वाटायला.... सगलं मीलतं, फकस्त पाटीवर मदतीचा "हात" हवा.

तोंडात तंबाखूची नवीन गोळी भरत आ.रा. आणि बा.रा. शिंपणं काढायला निघून गेले.