Saturday, November 7, 2020

किल्ले कंक्राळा

दुंधा उतरल्यावर निवांत जेवण वगैरे झालेलं, तिथून कंक्राळा किल्ला साधारणता: तास-सव्वा तासाच्या अंतरावर. वाटेत होतं रावळगांव! होय, तेच गोळ्या-चॉकलेटवालं रावळगांव.

वास्तविक रावळगांवचा कंक्राळ्याशी काही संबंध नाही, पण वाटेत हे गाव लागणार म्हणून सगळ्यांना तिथे काहीतरी खरेदी करायची इच्छा होती. गोळ्या-चॉकलेटचा पहिला अधिकृत "ब्रँड" म्हणता येईल तो "रावळगांव". ह्या गोळ्या सगळीकडेच मिळतात पण खुद्द रावळगांव गावात त्या नावाच्या गोळ्या खरेदी करायची मजा औरच. अर्थातच Mango Bite, पान पसंद गोळ्यांची लयलूट झाली..

बाकी फार वेळ नव्हता हातात. कारण अजून कंक्राळा होताच आणि अंधार पडायच्या आत खाली नको उतरायला? मग कंक्राळा पायथ्याशी दाखल झालो. उगाचच “अक्राळ-विक्राळ” नावाशी थोडं साधर्म्य असणारं हे नांव. पण फक्त नांवच असे आहे फक्त, किल्ला भयावह वगैरे अजिबात दिसत नाही. त्याच्या पायथ्याशी “गरबड” आहे. गडबड नव्हे, गरबड. हे किल्ल्याच्या पायथ्याजवळच्या वस्तीचं नांव.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे ठिकाण ओळखण्याची खूण म्हणजे “चुना फासलेला दगड”. लांबूनही अगदी सहज दिसावा एवढ्या मोठ्या खडकाला चुना फासून ठेवलेला आहे इथे.

किल्ले कंक्राळा

गाडीतून उतरलो तेव्हा पावणेतीन वाजले होते होते. अजून किल्ला चढायचा होता आणि संध्याकाळच्या आत खाली उतरून परत यायचं होतं. आणि हेच डोक्यात असल्याने उगाच वेळ जायला नको म्हणून उतरल्यावर लगेच समोर दिसणाऱ्या डोंगराकडे चालायला लागलो. दोन-तीन मिनिटंच झाली असतील, समोरच्या डोंगराच्या मधल्या खिंडीसारख्या भागाच्या वरच्या बाजूला पांढरी खुण दिसलीच. एवढ्या मोठ्या आकाराच्या खडकावर चुना मारून ठेवायचं का, कोणाच्या आणि कधी डोक्यात आलं हे कंक्राळा जाणे.

वाटेवरच्या पारावार हनुमान आणि गणेश मूर्ती

            किल्ला आणि आमच्यामध्ये एक तर उघडं माळरान. मोठ्या ताटात एकच लाडू ठेवलेला असावा आणि बाकी ताट रिकामं, असंच दिसत होतं ते. मग काय, त्याच्याकडे मुंग्यांनी धाव घ्यावी तसं आम्ही तिकडे जाऊ लागलो. दहा मिनिटातच एक पार लागला. बाभळीच्या झाडाला पार बांधावा एवढं मोठं झाड पहिल्यांदाच पाहिलं. खाली शेंदूर फसलेली हनुमानाची मूर्ती आहे. शेजारी भग्न गणपतीची मूर्ती आहे. अजूनही काही अवशेष म्हणावे असे जुन्या मंदिराचे असावेत असे दगड आहेत. एकाकी परिसरात उघड्यावर का होईना पण 2-4 उभे असलेले हे देव नक्कीच आधार देतात.

अवघ्या पाच मिनिटांत पायथा म्हणावा अशा ठिकाणी पोहोचलो, कारण इथून खरी चढाई होती. चढायला सुरुवात केली. चुना मारलेला खडक हेच Destination धरून वाट धरली. आता सीताफळांची झाडंच झाडं. सीताफळांचा मोसम असता तर काय बहार आली असती...

खिंडीने दुभागलेल्या त्या डोंगराच्या उजव्या बाजूला कातळ भिंतीत चुन्याचा खडक आणि डाव्या बाजूच्या उंचवट्यावर बुरुज स्पष्ट दिसत होता.

चुन्याचा खडक आणि शेजारील पाण्याची टाकी

कोणास ठाऊक का, पण चढायला जरा जास्त वेळ लागेल हेच डोक्यात ठेवून चढत असल्याने रमत-गमत चढत नव्हतोच. त्यामुळे अजून पंधरा मिनिटात त्यात चुन्याच्या खडकासमोर पोचलो. त्याच्या डावीकडे एक आणि उजवीकडे दोन खोबण्या स्पष्ट दिसत होत्या. पाच मिनिटात त्या पाण्याच्या टाक्यांजवळ पोचलो. त्या खांबटाक्यांचे पाणी पिण्यायोग्य आहे. ते थंडगार पाणी प्यायचा मोह न झाला तरच नवल.


कडे-कपारीत निवांत क्षण

जोडटाक्याजवळ एक त्रिशूळ त्याच्या तीन टोकांवर लिंबू घेऊन खोचून उभा होता. इथल्या कपारीत बसून डोळे मिटून शांतपणा अनुभवावा वाटला. असं खडकाची उशी करून दोन मिनिटात शांत-निवांतपणा जाणवतो. इथवर म्हणजे जवळजवळ गडावर आलोच होतो. त्यामुळे सगळे आले तरी चक्क अर्धा तास निवांतपणा उपभोगत थांबलो. इथे एकूण पाच टाकी आहेत, त्यातली दोन जोड खांब टाकी आहेत. एक तर पूर्णपणे बुजलेले असून त्यात सिताफळाचे झाड आहेच.

सीताफळांच्या झाडांनी वेढलेले भग्न प्रवेशद्वार आणि राजवाड्याचे अवशेष

आता कातळकोरीव पायऱ्यांनी वर येत भग्न प्रवेशद्वारात आलो. हे अवशेषही सीताफळांच्या झाडांनी वेढलेले होतेच.

गडफेरी उजवीकडून चालू केली. उजवीकडच्या टेकडीवर राजवाड्याचे अवशेष शिल्लक आहेत. जवळच एक जोड खांबटाकं आजूबाजूचे दगड पडून बुजायच्या मार्गावर आहे. जवळंच कातळ उतारावर एकाखाली एक असलेली २ टाक्यांची रचना ही मस्तच वाटते. ही टाकी पाण्याने भरलेली होती. वाईट हेच कि शिल्लक तटबंदी, राजवाड्याचे अवशेष सगळंच सीताफळांच्या रानात वेढलं जातंय. काही अजून पोचलेली टाकी असून त्यात साचलेल्या गाळातून सीताफळांची झाडे मात्र डोकावला लागली आहेतच.

गाड्यावरची पाण्याची टाकी

गडदेवता 

राजवाड्याच्या चौथर्‍याच्या मागेच गडदेवता आहेत. शक्ती देवता हनुमान तर आहेच आणि चक्क त्याच्यासमोर तोंड करून नंदी ठेवलेला ठेवलेला आहे. मूर्ती भंग करायचा प्रयत्न झालेला स्पष्ट दिसत असला असला तरी उर्वरित भागातून त्यांचे मूळ सौंदर्य अजिबात झाकलं गेलं नाहीये. नंदीच्या पाठीवरची झालर, त्याचे पाय, अगदी खूरही कारागिराने मन ओतून ती घडवल्याचे स्पष्टच सांगत होते. शंकराची पिंड तर अक्षरशः तो कातळ जणू काही वितळवून साच्यात ओतून घडवल्या सारखे वाटत होते. त्या पिंडीचा गोलाकार घेर बघितल्यावर मूर्ती बघितल्यावर मूर्ती “केली” असं न म्हणता “घडवली” का म्हणतात ते सहज कळतं.

बाकीचे सगळे बारीकसारीक अवशेष पाहून झाल्यावर मोकळ्या पठारावर सभोवार नजर फिरवून तज्ञ मंडळींनी पटापट डोंगर, किल्ल्यांची नांवं फेकायला सुरुवात केली. हो, फेकायलाच, कारण ते जेवढ्या वेळात नांवं सांगत होते तेवढ्या वेळात ती माझ्यासारख्याला वेचतापण येत नव्हती नोंदायला. नेहमीप्रमाणे सापडेल तेवढ्याची नोंदणी माझ्या RAMमध्ये भरत गेलो. अर्थात ती उडून जायला फार वेळ लागणार नव्हता.

अप्रतिम अश्या टाक्यांचा समूह

नंतर गडावरच्या अप्रतिम अश्या टाक्यांच्या समूहाकडे आलो. शेजारी दोन टाकी आणि काटकोनात सरळ रेषेत तीन, अशी यांची रचना आहे. याचं कोरीव काम सुंदर आहे. यातलं एकाच टाक्याचं पाणी पिण्यायोग्य वाटत होतं. एक टाकं अर्ध गाळाने भरलेलं होतं तर उरलेली दोन टक्के पाण्याने भरलेली होती, तरी त्यावर रंगीत शेवाळ्याचं आच्छादन होतं. इथे प्रत्येक जण आपापल्या रीतीने अनुभव जमा करत होता. कोणी योग करत होतं  तर कोणी डोळे मिटून निवांत. तर कोणी उघड्या डोळ्यांनी दृश्य कुठल्याशा कप्प्यात साठवत होतं.

असा निवांतपणा कोणाला नको असतो? अशा ठिकाणी कितीही वेळ घेतला तरी अजून थोडा वेळ थांबावं असा मोह होणं स्वाभाविकच. पण खूप वेळा असं शक्य नसतं. पण इथे मात्र आम्ही मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ती अवस्था अनुभवली, भोगली.

बुरुज ह्यू पॉईंट

शिल्लक गडफेरी मारताना अजून एक बुजलेलं आणि एक भरलेलं टाकं दिसलं. आता आम्ही साधारण चुन्याच्या खडकावरच्या बाजूला असू, अगदी बुरुज ह्यू पॉईंटच आहे हा. पलीकडच्या उंचवट्यावरचा बुरुज आणि वरती दाटून आलेले ढग, पलीकडे लांबवर लहान लहान डोंगर... निसर्ग जणू आपली चित्रकारी दाखवत होता, तीही प्रत्यक्ष! प्रवेशद्वारापासून निघालेली बुरूजापर्यंतची तटबंदी, त्याची घडण इथून मस्त न्याहाळता येते.

ते दृश्य डोळ्यात आणि किल्ला आठवणीत साठवून उतरणीला लागलो. वर येताना नजरेतून सुटलेल्या प्रवेशद्वाराच्या भग्न दरवाजाच्या एका खांबावरच्या नक्षीदार दगडाने लक्ष वेधून घेतले. तो दगड तर तिथे नसलेला दगडी दरवाजा कल्पनेतून डोळ्यासमोर साकारत होता. त्याच्या मूळ सौंदर्याची तो एक दगड साक्ष म्हणून शिल्लक आहे.

खाली पोचून, गाडी ज्या मंदिराजवळ लावली होती तो परिसर पाहून, अवघ्या पंचवीस मिनिटात गाडीत बसलो होतो. दिवसातल्या गडभ्रमंतीची सांगता झाली होती. गाठायचे होते मुक्कामाचे ठिकाण - गोरक्षनाथ मंदिर, गाळणा!