Friday, December 24, 2021

कन्हेरगड उर्फ बिज्जलगड उर्फ भिल्लांचा किल्ला

महाराष्ट्रात दोन कन्हेरगड आहेत. एक आहे नाशिकमध्ये तर दुसरा इथे चाळीसगाव मध्ये गौताळा अभयारण्य परिसरात.

देहेरगड आणि नंतर नस्तनापूरची गढी बघितल्यानंतर पुढे आम्हाला हा चाळीसगाव मधला कन्हेरगड बघायचा होता. हा गड गौताळा अभयारण्य परिसरात येणाऱ्या पाटणा गावात आहे. नस्तनापूर वरून इथे पोचायला आम्हाला साडे बारा वाजून गेले. मंदिर आणि गड दोन्ही अभयारण्य परिसरात असल्याने इथं परवानगीशिवाय जाता येत नाही. वाटेवरच तपासणी नाका आहे.

तपासणी नाका सूचना व माहिती

“गौताळा औट्रम घाट वन्यजीव अभयारण्य तपासणी नाका” या “वन्यजीव विभाग, औरंगाबाद” यांनी लिहिल्या बोर्डाने आमचे स्वागत केले. त्यावर पर्यटकांसाठी असलेल्या भेटीची ठिकाणं, वाहन प्रवेश, छायाचित्रण शुल्क इत्यादी माहिती दिलेली आहे. बाजूलाच एका बोर्डावर वन्य परिसरात काय काय करू नये, जे गुन्हे धरले जातील वगैरे यांचीही माहिती दिली आहे.

महादेव मंदिर दिशादर्शक फलक

या तपासणी नाक्यावर भटकंतीसाठीची वेळ, रहाणे वगैरेची चौकशी करून निघाल्यावर पुढे “हेमाडपंती महादेव मंदिर” असं लिहिलेला आणि खाली उजवीकडे जाणारा बाण असलेला बोर्ड दिसला. इथे कुठेही अजिबात न थांबता, महादेव मंदिराकडे जाणारी वाट सोडून डावीकडे पहिला मोर्चा किल्ल्याच्या वाटेकडे वळवला. मंदिर खाली आल्यावर बघणे योग्य होते, कारण किल्ला चढायला-बघायला लागणारा वेळ बघता या जंगलात उशीर होऊन चालण्यासारखे नव्हते.

गवतात लपलेला पायऱ्या मार्ग

अवघ्या काही मिनिटांत आम्ही किल्ल्याच्या वाटेला लागलो, जेमतेम एक वाजत होता.

हा किल्ला संध्याकाळच्या आधी बघावा लागतो याचे कारण म्हणजे अगदी जंगलाच्या मधोमध हा उभा आहे. चहूबाजूने लहान मोठी झाडे, वृक्ष यामुळे संध्याकाळ जवळ आली की हा भाग भयाण वाटतो. या भागातली लेणी, मंदिरं पाहता हा किल्ला फार पुरातन आहे हे लक्षात येते.

किल्ल्याची बांधणी आठव्या शतकात झालेली असल्याचे अनुमान काढले तरी १३ व्या शतकाच्या सुरुवातीला इथे “कान्हेर स्वामी” वास्तव्यास होते. त्यांच्याच नावावरून गडाचे नांव “कान्हेरगड” व पुढे “कन्हेरगड” झाले असावे. इसवी सन ११२८ ला इथे यादवांचे मांडलिक, “हेमाडी देव निकुंभ” यांचे राज्य होते. पाटणादेवी ही त्यांची राजधानी. पुढे त्यावर सत्ता फारुकी घराण्याची आली. १६०० मध्ये मोगलांनी सत्ता स्थापन केली, तर १७५२ ला नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला मराठा राजवटीत आणला. जो पुढे भिल्लांच्या ताब्यात जाऊन १८१८ ला इंग्रजांकडे गेला. काही काळ भिल्लांच्या ताब्यात किल्ला असल्याने ह्याला "भिल्लांचा डोंगर" असेही ओळखतात. "बिज्जलगड" असेही एक ह्या किल्ल्याला नांव आहे. तरी सुद्धा गावात मात्र “पाण्याची टाकी असलेला डोंगर” या नावाने ओळखला जातो.

मंदीराच्या बाजुनेच रस्ता गडाकडे जात असला, तरी वाटा जंगलातल्या असल्याने जाताना खुणा लक्षात ठेवाव्यात. सुरुवातीला सह्याद्री प्रतिष्ठानने बोर्ड लावलेले आहेतच.

दाट जंगल

दहा मिनिटात जंगलाच्या दाट झाडीतून बाहेर पडू थोडी उंची गाठली. मागे वळून बघितले तर खाली लांबवर झाडांच्या शेंड्याचे झुपके दिसायला लागले.

वाळलेल्या गवतातच कातळात पायर्‍या दिसतात. अगदी सुबक, कोरीव नसल्या तरी वाट समजण्यापुरत्या नक्कीच आहेत. या वाटेनेच अवघ्या ५ मिनिटात गुहेजवळ पोचलो. ह्या “नागार्जुन गुहा”.

नागार्जुन गुहा

समोर २ खांबी असलेल्या गुहेच्या मागे, मध्यभागी असलेल्या दरवाजावर रंगाने “श्री १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर” असं लिहिलेलं आहे. शेजारी पुरातत्व खात्याने “संरक्षित स्मारक” आणि काही सूचना लिहिलेला फलकही पडलेला होता.

नागार्जुन लेण्यांमधील मूर्ती, कोरीवकाम

नागार्जुन लेण्यांमधील मूर्ती, कोरीवकाम

दरवाजाच्या डाव्या बाजूस महादेव कोरलेले दिसतात. आतमधल्या ३ दालनांमध्ये जैन मुर्ती कोरलेल्या आहेत. अगदी फूटभर ते सहा फूट उंचीच्या अशा आकारात ह्या मूर्ती आहेत. गुहेत मध्यभागी भगवान नेमिनाथ यांची मूर्ती, बाजूला चवरीधारी सेवक, नक्षीदार खांब, डाव्या बाजूला दिगंबर तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत तर खांबाजवळ इंद्राची प्रतिमा सुद्धा आहे. खांबातच कोरलेल्या मूर्तीला चक्क जानवे सदृष्य काहितरी कोरलेले दिसते, हीच इंद्राची प्रतिमा किंवा यक्ष असावे.

या लेण्यासमोरच एक खांब आहे, त्याला सतीचा खांब म्हणतात. इथे मुल होण्यासाठी नवस बोलण्याचा प्रघात आहे.

सीतेची न्हाणी लेण्याच्या वाटेवरील पाण्याचं टाकं

सीतेची न्हाणी

पुढे सीतेची न्हाणी नावाची लेणी आहेत. वाटेत एक पाण्याचे टाके पण आहे. पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. ही लेणी जरी बाहेरून नागार्जून लेण्यासारखी दिसत असली तरी बाहेरील बाजूच्या दोन खांबांवर तसेच भिंतीवर काहीही कोरीव काम नाही. आत मध्ये काही मूर्तीही नाहीत. ह्या लेण्यांच्या व्हरांड्यातच मोठे पाण्याचे टाके आहे किंवा इथे कायम पाणी भरत असावे. कदाचित म्हणूनच ह्याला सीतेची न्हाणी नांव पडले असेल.

माथ्याकडे जाण्यासाठी हा कातळटप्पा चढावा लागतो

मळलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर पुन्हा कातळकोरीव पायऱ्या लागतात. हीच वाट सरळ एका कातळकड्यापाशी आपल्याला घेऊन येते. इथे कड्याच्या बाजूने एक वाट उजवीकडे गेलेली दिसते, ह्या बाजूला उतरताना जायचं ठरवलं. आधी किल्ल्याच्या माथ्यावरती जायचं होतं. त्यासाठी समोरच असलेला कातळकडा आपल्याला चढावा लागतो.

ह्या कड्याला मात्र कातळकोरीव पायऱ्या वगैरे कोरलेल्या दिसल्या नाहीत. कदाचित पूर्वी इथे पायऱ्या असाव्यात पण सध्या इथे कातळ बऱ्यापैकी सपाट आहे. पावसाळ्यात पाणी वाहत असताना यावर चढणं अशक्यच आहे. इथे चुन्याने काही खुणा केलेल्या दिसल्या. गावकरी किंवा सह्याद्री प्रतिष्ठान सारख्या संस्थांचा इथे पायऱ्या करण्याचा मनसुबा असू शकतो.


कडा फार मोठा नसल्याने १-२ मिनिटातच तो चढून वर आलो. वरती काही तटबंदी शिल्लक आहे. त्यावर रंगाने “कन्हेरगड” असे लिहून बाणही काढलेला आहे.

माचीवरील खांबटाकं

दहा मिनिटात गडाच्या माचीवर येऊन पोचलो. इथे एक खांब टाके आहे. हे बऱ्यापैकी गाळाने आणि पाण्याने भरलेलं दिसत असलं तरी थोडेफार उतरून वाकून पाहिल्यास आत खांबांचा वरचा भाग दिसतो. म्हणजे गाळ काढल्यास त्याची खरी खोली कळू शकेल.

वाटेवर पुढे चौथरा आणि त्यावर थडगं दिसलं. इथे तिथे उजवीकडे एक टेकडी दिसते.

कोरडा पडलेला तलाव

ह्याच पायवाटेने वाटेने पुढे जाताना टेकडीच्या पायथ्याशीच एक मोठा तलाव दिसला. जो गाळाने पूर्ण भरून बुजून गेलेला आहे. साधारण २० मिनिटांनी झाडीत लपलेलं पाण्याचं टाकं आणि पुढे थडगं दिसलं, ह्यालाही चौथरा दिसत होता जो झाडीत आणि मातीत गेलेला आहे. ह्या वाटेने पुढे गेल्यावर गडाचा अतिशय सुंदर दरवाजा आणि बुरुज दिसला.

गडाचा एकमेव असलेला शिल्लक बुरुजांसह दरवाजा

येथे उजव्या बाजूला वरती गडाचा सर्वोच्च माथा आहे. वरती जायच्या आधी एकदा दरवाजा डोळे आणि कॅमेरा भरून पाहून घेतला. हे इतके सुंदर आणि सुस्थितीत आहेत कि हे नाही पाहिले तर गड काय पाहिला? असं वाटावं.

सुंदर बुरुज आणि दरवाजा

बुरुजावर आलेल्या झाडांनी याला उध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही बाजूला बुरुज, दरवाजाच्या कमानीत देवड्या, बुरुजावर सुंदर अशा जंग्या हे सुंदर असे अवशेष आहेत.

हा दरवाजा आणि बुरुज बघितल्यावर सर्वोच्च माथ्याकडे मोर्चा वळवला. इथून वाट मळलेली नाहीये. माथा तर दिसत होता, पण नक्की कुठून वर जायचं ते समजत नव्हतं. त्यात वाळलेलं गवत आडवं पडलेलं, त्यावर पाऊल टिकत नव्हतं. थोडं तिरकं तिरकं वरच्या बाजूला दरवाजापासून मागे जात एकदाची पायवाट सापडली.

खरं तर या माथ्यावर लोक येत असतात. त्यामुळे आपण आधी खाली बघितलेल्या तलाव आणि थडग्याजवळून इथे यायला वाट आहे. पण आम्ही आधी बुरुज आणि दरवाज्याकडे गेल्याने तिकडून इकडे माथ्यावर यायला सहज वाट मळलेली नाहीये.

माथ्यावर थडगे

तर या घसाऱ्याच्या वाटेवरून सावकाश, सांभाळून पुढे गेल्यावर पंधरा मिनिटांत पायर्‍या दिसल्या. पुढच्या दोनच मिनिटांत एक थडगंही दिसलं.

बुद्धीमताम् वरिष्ठं, शक्तीची देवता हनुमान

पुढे जवळजवळ सगळ्या गडांप्रमाणेच ह्याही गडावर संरक्षक, आधार म्हणून असलेली बुद्धीमताम् वरिष्ठं अशी शक्तीची देवता हनुमान आहेच. इथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गदाधारी, शेंदूर फासून घेतलेले हे हनुमान मस्त विश्रांती घेत होते.

खाली गडाचा दरवाजा बुरुजांसह

मारुतीला नमस्कार करून पायवाटेने हा माथा न्याहाळताना एका बाजूने मगाशी आम्ही पाहून आलेला गडाचा दरवाजा बुरुजांसह दिसला. पुढे खाली लांबवर पसरलेले जंगल, असा मस्त नजारा इथून दिसतो.

अजून एक पाण्याचं टाकं

माथा बघून खाली येताना जरा चांगली वाट निवडली. म्हणजे असा आम्हाला वाटलं 😁 पण तिकडेही काही कमी घसारा नव्हता, उलट चढताना जरा बरं होतं असं वाटायला लागलं. पण या वाटेचा फायदा म्हणजे वाटेत खांबटाकं दिसलं.

क्षणभर परत खाली बुरुज-दरवाजाजवळ टेकून खालच्या वाटेला लागलो. आल्या वाटेने परत थडगे, तलाव करत-करत कातळ टप्पा ओलांडून खाली आलो. किल्ल्यावर येतांना ह्या समोरच्या कातळटप्प्याच्या वाटेने वर आलो होतो तिथे उजवीकडे एक वाट दिसली होती. आता त्या वाटेने जाऊन काय बघायला मिळतं त्याची उत्सुकता होती.

पावणे चार झाले होते. आम्ही योग्यरीतीने वेळ पाळल्याने हाताशी अजून वेळ होता, पण तरीही निवांतपणा करण्यात अर्थ नव्हता. त्या जंगलातच पूर्णपणे उजेडातच खाली उतरून बाहेर पडायचे होते.

वाट कातळकड्याखाली जंगलात जाते

गडाला डावीकडे ठेवत निमुळत्या पायवाटेने समोर दिसणाऱ्या खड्या कातळकड्याच्या कुशीत जायचं होतं. सुंदर अश्या दाट झाडीतून असं काही ठिकाणापर्यंत, तर काही ठिकाणी मळलेल्या पायवाटेने आणि पुढे गवतातूनच वाट शोधत पुढे जात होतो.

वाटेवरचं पाण्याचं टाकं

शृंगारचौरी लेणी

अखेर यश मिळालं. एक आयताकार टाकं दिसलं. त्यात पाणी होतं आणि बरोबर झाडांचा भरपूर पाला-पाचोळा देखील. पण पुढे मात्र त्या काळाच्या कुशीत असलेली अतिशय सुंदर अशी लेणी समोर आली. हीच अकराव्या शतकात कोरलेली “शृंगारचौरी लेणी”. ही पूर्णपणे हिंदू लेणी आहेत. ५-६ सुंदर नक्षीदार खांबांवर ही लेणी तोललेली आहेत.

लेण्यांवरील कोरीवकाम, देव आणि शृंगारिक चित्र

खांबांवर सुंदर गणपती आणि इतर देव कोरलेले आहेत. खालच्या बाजूला सिंह वगैरे काही प्राणी आणि शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत म्हणूनच यांना “शृंगारचौरी” लेणी म्हणत असावेत.

लेण्यांचाअप्रतिम दरवाजा

लेण्यांचा दरवाजा तर इतका अप्रतिम कोरलेला आहे की दहा मिनिटं नुसती त्यावरची मूर्ती आणि नक्षी न्याहाळाव्यात. आत मध्ये मात्र भरपूर पाणी भरलेले आहे.

पंधरा मिनिटात नागार्जुन लेण्यांजवळ आलो. परत २-४ क्लिक करून महादेव मंदिराकडे खाली निघालो. वर येताना १५ मिनिटांत इथपर्यंत चढून आलो होतो म्हणजे १० मिनिटांत परत मंदिर दिसणं अपेक्षित होतं. पण पंधरा मिनिटे झाली तरी मंदिर दिसेना, म्हणजे भलतीच पायवाट पकडून रस्ता चुकल्याचं लक्षात आलं.

कुठल्याच जंगलात रस्ता चुकणं चांगलं नसतं. पण सुदैवाने फार उशीर झालेला नव्हता, अंधार पडलेला नव्हता, पावणे पाचही वाजले नव्हते. गप्पा मारता मारता पायवाट चुकली होती एवढंच, दिशेचा अंदाज घेत, जवळपास गाडीचा आवाज आला तर त्या आवाजाने, असं करून डांबरी रस्त्याला लागलो. पण मंदिराकडे जायला कोणत्या बाजूला जायचं हेच समजेना.

एक बाजू धरून चालायला लागलो. नशिबाने काही वेळात एक गाडी दिसली, त्यांना हात करून ते विचारलं आणि आम्ही महादेव मंदिराच्या बरोबर विरुद्ध बाजूला निघालेलो असल्याचं कळलं. वन्यजीवन विभागाचा “हेमाडपंती महादेव मंदिर” बोर्ड दिसला आणि हायसं वाटलं.

हेमाडपंथी महादेव मंदिर

मंदिराचा अप्रतिम झरोका आणि इतर मूर्ती

पटापट पावलं उचलून मंदिरात पोचलो. महादेव मंदिर अतिशय सुंदर आणि प्रचंड कोरीव काम असलेलं आहे. पुरातत्त्व खात्याकडे असल्याने उत्तम स्वच्छता आहे. मंदिराचेच काही इतरत्र पडलेले नक्षीदार दगड जमा करून एकत्र ठेवलेले आहेत.

मंदिरावरील कोरीवकाम

किल्ला वेळेत बघुन झाल्याने हाती असलेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून मंदिर डोळ्यात भरून घेतलं आणि दगडी पाखडी वरुन तिथून बाहेर आलो.

पाटणादेवी मंदिर

देवीची भव्य अठरा हातांच्या मूर्तीसह इतर मूर्ती

इथून जवळच पाटणादेवीचे मंदिर आहे. हे हि मंदिर प्राचीन असून परिसर स्वच्छ आहे. मंदिराचे काही अवशेष नीट जमा करून ठेवलेले आहेत. गाभाऱ्यात देवीची भव्य अठरा हातांची मूर्ती असून वाघावर आरूढ अशी देवी पायाखाली रेडा आणि एका हाताने राक्षसाला धरून आहे. राक्षस वधाचा हा देखावा आहे. देवीच्या उजव्या हाताजवळ गणपतीची मूर्ती आहे तर इतर गाभार्‍यात अजूनही काही मूर्ती आहेत. त्यात एके ठिकाणी विष्णू तर एके ठिकाणी उजव्या सोंडेचा गणपतीही आहे.

भव्य दगडी दीपमाळा

मंदिरावरती येणाऱ्या पायर्‍यांच्या बाजूला दोन दगडी भव्य दिपमाळा आहेत. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबाबतचा शिलालेख याच परिसरात पुरातत्त्व खात्याला सापडला असून तो त्यांनी जतन करून ठेवलेला आहे.

जळगांव-बुलढाणा भटकंतीच्या पहिल्या दिवसाची सांगता सर्व बाजूने घनदाट जंगलाच्या कुशीत नांदत असलेल्या, भटक्यांकडून थोडा दुर्लक्षित अश्या कन्हेरगड आणि प्रसिद्ध पाटणादेवी मंदिराला भेट देऊन झाली.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!