Friday, July 21, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले वैरागड आणि चंद्रपूर

किल्ले वैरागड

आता टिपागडावर फरसाण वगैरे सगळं हाणल्याने गाडी सुसाट निघाली. तसही दुपारचं जेवण साग्रह-संगीत वगैरे चोचले नसल्याने तोही ब्रेक घ्यायचा नव्हताच. पण सावरगावला चहा मात्र घेतला आणि “कुलभट्टी, मुरमगाव” करत वैरागडकडे निघालो. रस्ते बऱ्यापैकी चांगलेच आहेत. त्यातून वैरागड हा अगदी गावातच आहे, भुईकोट आहे, त्यामुळे किल्ला सापडायला काही फार वेळ लागला नाही.

तरी सव्वा पाच वाजले होते. अर्थात आम्ही वेळेत होतो, कारण साधारण तासाभरापेक्षा थोडासा जास्त वेळ नक्कीच होता उजेडात किल्ला बघायला.

वैरागड दरवाजा

वैरागड हा भुईकोट आहे आणि त्यातून तो गावात आहे, त्यामुळे अर्थातच त्याची अवस्था काय असेल याचा विचार करायची गरजच नव्हती. पण आश्चर्यकारकरीत्या आम्हाला जे अपेक्षित होतं तश्या प्रकारे काही अस्वच्छ निघाला नाही किल्ला. अर्थात किल्ल्याची पडझड झालेली असणार हे साहजिक आहे. बाहेरची तटबंदी ही बऱ्यापैकी उध्वस्त आहे. तटबंदीच्या भग्न दरवाजाच्या आत डावीकडे गोल बुरूज दिसतो, हाही ढासळत चाललेला आहे. त्याला लागून तटबंदी मात्र सलग आहे. ही आतील बाजूची तटबंदी आहे. तटबंदीला डावीकडे ठेवत रस्ता मुख्य दरवाज्याकडे जातो. उजव्या बाजूला पूर्णपणे तलाव आहे. तीन चौकोनी बुरुज ओलांडल्यावर गडाचा दरवाजा येतो. इथे लोखंडी गेट लावलेलं आहे आणि ASI चा बोर्ड आहे. किल्ला पुरातत्व खात्याकडे असल्याने गेट संध्याकाळी बंद होत असेल व सकाळी ठराविक वेळीच उघडणार असणार. पण स्थानिकांची कृपा... किल्ला हे गुरांसाठीचं चरायचं ठिकाण असल्याने त्यातून मनसोक्त चरून भरल्या पोटाने गुरं बाहेर येत होती, त्यामुळे गेट उघडंच होतं.

गुरं आणि गुराखी बाहेर आल्यावर Whole वावर was our... निवांत किल्ला बघता येणार होता. सुस्थितीत असलेला मुख्य दरवाजा बघून आत गेलो. या दरवाजावर बाजूला एक गणपती कोरलेला आहे.

हत्तीचा हौद

किल्ल्यात तीन बारव आहेत. (श्रीपाद चितळे त्यांच्या पुस्तकात चार बारव असल्याचं नमूद करतात, त्यातली चौथी बारव अशी सापडली नाही. कदाचित बुजून गेलेली असू शकते किंवा शेजारील अतिक्रमणामध्ये गेलेलीही असू शकते) दरवाज्याच्या आत मध्ये गेल्यावर समोरच उजवीकडे मोठी बारव आहे, जी अष्टकोनी आहे आणि त्यात उतरायला पायऱ्याही आहेत. ह्या बारवेला “हत्तीचा हौद” म्हणतात.

बारव

दरवाजाच्या समोरच्या रस्त्याने किल्ल्याच्या आतमध्ये जाताना वाटेतच डाव्या बाजूला दुसरी बारव आहे. एक भग्न नंदी इथे ठेवलेला आहे. पुढे उजव्या बाजूला एक चौकोनी बांधीव खड्डा आहे. कदाचित चितळे सर म्हणतात ती ही बारव असू शकते, पण बुजल्यामुळे असेल कदाचित, पण तो खड्डा बारव वाटत नव्हता. इथूनच सरळ रस्त्याने शेवटपर्यंत गेल्यावर मागच्या बाजूच्या दरवाज्यात पोचलो. आता हा दरवाजा बऱ्यापैकी बुजलेला आहे.

मागच्या बाजूचा दरवाजा

आता माहिती असलेले बघायचे असे सगळे अवशेष बघून झाले, पण अजूनही असेल कि काहीतरी बघायला, म्हणून परत मुख्य दरवाजात येऊन उलट्या प्रदक्षिणा मार्गाने जायचं ठरवलं. जाताना एक बारव दिसली. आता उरलेले अवशेष बघण्यासाठी झाडीत शिरणं गरजेचं होतं. झाडीत घुसलो आणि खूप फिरल्यानंतर एका तटावर हनुमान सदृश मूर्ती दिसली. पण खूपसे अवशेष असेच दडले गेलेले आहेत.

बारव

जे शक्य होईल ते अवशेष पाहत गेलो आणि नंतर शेवटी बाहेरच्या बाजूने असलेला खंदक पाहून आमची गडफेरी संपवली तेव्हा सव्वा सहा वाजून गेले होते. अंधार पडायच्या आत सगळे अवशेष आमचे बघून झाले.

दिवसभरातली ठिकाणं ठरल्याप्रमाणे फिरून झाल्यावर आता फक्त झोपण्याची जागा शोधणे आणि झोपणे हीच कामं शिल्लक राहिली होती. हा अर्थात जेवणही राहिलं होतं, ते जाता जाताच करायचं ठरलं. रात्रीचा सदुपयोग म्हणून वैरागड मध्ये राहण्यापेक्षा सरळ चंद्रपुरातच जायचं ठरवलेलंच होतं, कारण इथे राहण्यात काहीच अर्थ नव्हता, सकाळचा वेळ प्रवासात कशाला घालवायचा? त्याप्रमाणे चंद्रपूरकडे जाताना वाटेत गडचिरोलीत जेवलो आणि चंद्रपूरकडे गाडी हाकली.

किल्ले चंद्रपूर

चंद्रपूरला निसर्गाचं एक सुंदर असं वरदान नक्की लाभलेलं आहे, ते म्हणजे जंगल! गडचिरोलीतील महामार्गाने चंद्रपूरकडे निघाल्यावर “मूळ, अय्याजपूर-रय्यतवारी सोडलं की चित्तपल्ली पासून राखीव वनविभाग चालू होतो, तो थेट “लोहारा” गावापर्यंत. हे जंगल ओलांडलं की अवघ्या पाच किलोमीटरवर आहे चंद्रपूर शहर. चंद्रपूर शहराच्या इतक्या जवळ राखीव जंगल... काय मस्त ना इथल्या लोकांना? वन्य प्राण्याचे दर्शन ही काही विशेष बाब नसेल त्यांच्यासाठी.

रात्रीचे नऊ वाजून गेले होते. २० किलोमीटरच्या आसपास रस्ता ह्यावेळी आणि तोही दोन्ही बाजूला राखीव जंगलातून... फक्त विचार काय मस्त वाटत असेल गाडी चालवायला! चंद्रपूर शहरात पोहोचायला कितीही वाजले असते तरी आम्हाला चालले असते. त्यामुळे ह्या रस्त्याचा आनंद घेत निवांत चंद्रपूर शहर गाठलं. यावेळेस शहरात पोहोचल्यावर “I ❤ चंद्रपूर” दिसलं आणि लगेच त्याच्याबरोबर फोटोही काढून घेतला. काय करणार? या विदर्भातल्या निसर्ग सौंदर्याने चंद्रपूरच काय, पूर्ण विदर्भाच्या प्रेमात पाडलंच होतं की आम्हाला 😊

चंद्रपूरचा किल्ला बघणे हे तसं दिव्यच काम आहे. कारण नगरकोट म्हटलं की आला अवाढव्य पसारा, चहू बाजूने वस्ती, वस्तीचे अतिक्रमण, त्यातच रस्ते आणि रहदारी. आता सवयीने माहिती झालेलं होतं, की जी काही बुरुज-तटबंदी शिल्लक असेल ते वस्तीने घेरलेलं असणार. अगदी कुठे बुरुजाच्या आतमध्ये तटबंदीची भिंत धरून घर उभारलेली असणार, दरवाजे हे शहराच्या मधोमध कुठेतरी, त्यात आत मधून रस्ता आणि बुरुजांवर किंवा त्यांच्या डोक्यावर जाहिरातीचे बोर्ड घेऊन ते नाईलाजाने उभे असणार. चंद्रपूर ही याला अपवाद का असेल? म्हणून पहाटे उठून रहदारी सुरू व्हायच्या आधीच जमेल तेवढे अवशेष बघून घ्यावेत असा विचार होता.

जटपुरा दरवाजा

बरोबर सव्वा सहाला आम्ही पहिला फोटो घेतला, तो जटपुरा दरवाजाचा, आणि लक्षात आलं की आमचा विचार जरी बरोबर असला, तरी सव्वा सहा ही वेळ म्हणजे उशिरच झाला होता. रहदारी आधीच सुरू झालेली होती.

या किल्ल्याला एकूण ३९ बुरुज आहेत. दरवाजे आणि खिडक्या वेगळ्याच. तब्बल १२ किलोमीटर लांब तटबंदीच आहे. आता पूर्ण शहर ज्यात सामावले आहे, तो किल्ला असणारच म्हणा असा. मग असं किती पहाटे सुरुवात करून कमी रहदारीत पाहणार होतो म्हणा किल्ला? बरं ह्यात फक्त तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि खिडक्या नाहीत तर अनेक मंदिरे, तलाव, राजवाडा वगैरे सगळं किल्ल्याचेच भाग आहे. आम्ही कसं सोडणार ह्यातलं काही?

चोर खिडकी

“चार तासांची निश्चिंती झाली बगूनाना...” म्हणून घातला सरळ मोबाईल खिशात. मस्त गरम गरम वाफाळणारे पोहे लगेचच चाणाक्ष नजरेने हेरले आणि तर्रीच्या वासाने तिकडे ओढलो गेलो. तुडुंब पोहे रिचवल्यावर चहा ढोसला आणि कामाला लागलो.

अंचलेश्वर, बिनबा, जटपुरा आणि पठाणपुरा ही चार महत्त्वाची प्रवेशद्वारं आहेत. तर अजून पाच छोटे दरवाजे आहेत, त्यामुळे त्यांना इथे खिडकी म्हणतात. “हनुमान खिडकी, बगड खिडकी, विठोबा खिडकी, चोर खिडकी आणि मसान खिडकी” हे खिडकीवजा दरवाजे सुद्धा रहदारीच्या रस्त्यांवरच आहेत.

हनुमान खिडकी

हनुमान खिडकी

इथे फिरायची तयारी करताना सरळ गुगल मॅप काढला होता. त्यावर सगळे दरवाजे, खिडकी-दरवाजे मांडून ठेवलेले होते. बरं फक्त एवढंच नाही, तर ह्या किल्ल्याचाच भाग म्हणता येईल असं महाकाली मंदिर, गणपती मंदिर, अंचलेश्वर महादेव, एकविरा देवी मंदिर ह्या वास्तूही चुकवून चालणार नव्हत्या, त्यामुळे त्याही वास्तू आधीच नकाशावर मांडून ठेवलेल्या होत्या. राजा बीरशहा, त्याची राणी गंगाई यांची स्मारक-मंदिरही बघितलीच पाहिजेत. त्यामुळे हे सगळं नकाशावर मांडून त्या ठिपक्यांची रांगोळी काढावी तसा नकाशा मांडून ठेवला होता, जेणेकरून कुठून कसं जावं हा प्रश्न आयत्यावेळी पडून वेळ वाया जाऊ नये.

त्या चंद्रपूरच्या रांगोळीचा जो चक्रव्यूह तयार करून ठेवला होता, तो एकदा डोळ्याखालून घातला आणि भरल्या पोटाने आमचा वारू सुटला.

बिनबा दरवाजा

बिनबा दरवाजा

एका मागून एक दरवाजे, खिडक्या सगळं पाहिलं. गुगलबाबाने रस्ता बिनबा दरवाजाकडून पठाणपुराकडे जायला दाखवला. आता शहरातले रस्ते कसा चुकू शकेल हा बाबा, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून गाडी घातली आणि अगदी जेमतेम शंभर मीटरवर चक्क सगळ्यांनाच खाली उतरवावं लागलं. गाडीखाली पाच ते सात इंच खडीचा थरच होता. हळूहळू गाडी मागे घेतली आणि खडीच्या थरातून बाहेर पडलो. दुसरा रस्ता धरून पठाणपुरा दरवाजा गाठला. पठाणपुरा दरवाजा काय सुंदर आहे? दोन्ही बाजूला सिंह आहेत, त्यांच्या पायाखाली हत्ती. इथे मनासारखे फोटो मिळेपर्यंत थांबलो.

पठाणपुरा दरवाजा

पठाणपुरा दरवाजा

अंचलेश्वर मंदिरही फार जुने आहे. त्याच्या शेजारीच “हडवाडा” येथे गोंड राजांच्या समाधी असलेलं मैदान आहे. गुगलवर अंचलेश्वर मंदिर शोधल्यावर बहुतेक ठिकाणी जो फोटो दिसतो ती खरी ह्या मैदानातली देखणी अशी समाधी आहे, जी चंद्रपूरचा दहावा राजा बिरशहाची आहे.

अंचलेश्वर मंदिर

ह्या मंदिराच्या उभारणीमागे कथा आहे. आज हे चंद्रपूर शहर असलेल्या जागेवर सुमारे ५०० वर्षापूर्वी सर्वत्र जंगल होते. या टापूवर गोंड राजाची सत्ता होती. त्यावेळी या राज्याचे राजधानीस्थळ “वर्धा” नदीकाठावरील बल्लाळशहा, म्हणजे आजचे बल्लारपूर, हे होते. इथे राजा “खांडक्या बल्लाळशाह” हे गादीवर बसले होते. हे नांव त्याला त्याच्या अंगावरील फोड म्हणजे “खांडकां”मुळे पडलेले होते. हा राजा आपल्या ह्या खांडकांमुळे त्रस्त होता. विविध उपचार करून ही ते जात नव्हते. त्याची राणी, “राणी हिरातानी” हिने राजाची तब्येत बरी व्हावी म्हणून त्याला शिकारीला जात जायला सांगितलं. त्याच्यासाठी जुनेजा इथे एक तलाव आणि काठाला महालही बांधला. एकदा राजा शिकारीसाठी जंगलव्याप्त या भागात झरपटनदी परिसरात आला. त्याने जंगलातील कुंडातील पाणी प्यायले आणि त्या पाण्याने आपले अंग पुसले. सकाळी त्याच्या खांडकांना आराम पडल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि या पाण्याच्या चमत्कारीत गुणामुळे राजाची श्रद्धा या ठिकाणावर बसली. त्याने त्या ठिकाणी एक मंदिर बांधलं, हेच पुढे अंचलेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

अंचलेश्वर दरवाजा

अंचलेश्वर दरवाजा

याच मंदिरात दर्शन घेऊन एकदा राजा परत जात असताना त्याला शिकारी कुत्र्याच्या मागे ससा लागलेला दिसला. नंतर कुत्र्याने सश्याची शिकार केली खरी, पण हा प्रकार आश्चर्यकारक होता. त्यामुळे त्याने राणीच्या सल्ल्यानुसार पुढे जंगल साफ करून किल्ला बांधून गाव वसवले. चंद्रपूर असे नाव गावाला देवून बल्लारपूरची राजधानी चंद्रपूर येथे हलविण्यात आली.

समाधी स्मारक परिसर दरवाजा

मंदिराशेजारच्या मैदानाला चहूबाजूने तटबंदी आहे आणि त्याला बुरुजही आहेत. हे सकाळी नऊ-दहाला उघडतं. पण महादेवाची कृपा. त्यादिवशी डागडुगीच्या कामासाठी साडेआठच्या आधीच उघडलं होतं, त्यामुळे आम्हाला वाट बघायला लागली नाही. लगेच बघायला आत घुसलो आणि ते सुद्धा निर्मनुष्य बघता आलं. निवांत फोटो काढले, बाहेर दरवाजावर मात्र फोटो आणि व्हिडिओसाठी बंदी लिहिलेली आहे. कदाचित कॅमेरातून एखादा देव किंवा तिथलं सौंदर्य कोणीतरी पळवून तर नाही ना नेणार अशी त्यांची भीती असावी. याच मैदानात एक सुंदर बारवही आहे.

समाधी स्मारक परिसर दरवाजा

बारव

इथे असलेल्या समाधीपैकी जी सगळ्यात सुंदर दिसते ती राजा बिरशहाची समाधी, जी त्याची राणी गंगाई हिने बांधली. ह्या राजाला अवघ्या विसाव्या वर्षी गादीवर बसावं लागलं आणि फक्त ८ वर्षाच्या कालखंडानंतर त्याचा खून झाला. त्यानंतर राणी गंगाई हिने पुढील १५ वर्ष राज्यकारभार सांभाळला. तिने बांधलेल्या ह्या समाधीपुढे नंतर भोसले यांनी सभामंडप उभारले. ह्या समाधीपुढेच ह्या राणीचेही स्मारक आहे.

ह्याप्पी बड्डे सल्लुभाई, शेजारी "डिटर्जंट पावडर - नवीन पॅक तीच चव 😉"

बगाड खिडकी

पुढचा दरवाजा, नव्हे खिडकी-दरवाजा बघताना सल्लू भाईला त्याच्या पंख्याने जाहीर शुभेच्छा दिलेल्या बघायला मिळाल्या. बगाड-खिडकी. इथे बुरुजावर गेल्यावर समोर सुंदर तलाव दिसतो. हा “रामाळा” तलाव. राजा रामशाह याच्या नावावरून ह्या तलावाला हे नांव पडले.

शहरात राजा हिरशहाने बांधलेला बालेकिल्ला बघायला गेलो पण मात्र त्यात सध्या तुरुंग असल्याने बाहेरूनच तो बघायला मिळतो. एकूणच ज्या ज्या दरवाजे-खिडकीमधून कार जाऊ शकते तिकडून फिरवून झाली. जिथून जात नाही, तिथे चालत भटकून झालं.

त्यानंतर बाबूपेठ नावाच्या भागात गेलो. इथे आम्हाला बघायचं होतं, “अपूर्ण देवालय”. इथे आम्ही गमतीशीर रस्त्याने पोचलो. गल्ल्या-गल्ल्यातून कशीतरी गाडी घातली. पलीकडून रस्ता आहे की नाही ह्या विचारात, कडेने बघत-बघतच चिंचोळ्या गल्लीतून कसेबसे पोचलो. आता गुगलबाबांनी अश्या रस्त्याने आम्हाला मुद्दाम नेले, कि हाच रस्ता आहे हे गुगललाच माहिती. पण पोचलो. आता गमतीशीर रस्त्याने पोचलेल्या ह्या ठिकाणामागची कथा सुद्धा रंजकच असणार कि...

बाबूपेठ परिसरातील बाभळीचे जंगल कापून गोंडराजांनी वसाहत उभारली. त्यामुळे यास बाबूपेठ असे नाव पडले. लागूनच भिवापूर पेठ वसवली. गोंडराजे धुंड्या रामशहा यांच्या कार्यकाळात सोळाव्या शतकात बाबूपेठेत राहणाऱ्या रायप्पा कोमटी-वैश्य यांनी भव्य शिवमंदिराची उभारणी करण्यासाठी अनेक मूर्तींची निर्मिती केली. ह्यासाठी त्यांनी डोंगरातून मोठमोठ्या शिळा आणल्या.

एकाच दगडात व रेतीच्या दगडात कोरलेल्या अनेक मूर्ती कोरल्या. प्रत्येक मूर्तीचा आकार भव्य ठेवला. सर्व मूर्तीचे काम पूर्ण झाल्यावर एक शिवमंदिर बांधून त्यात शंकराच्या पिंडीची स्थापना करावी व आजूबाजूला इतर मूर्ती ठेवायच्या असा त्यांचा विचार असावा. दशमुखी दुर्गेसह महिषासुरमर्दिनी, विष्णूचे मत्स्यावतार, कूर्मावतार, शिवलिंग, नंदी, हत्ती, गणेश, हनुमान, कालभैरव, दोन नागिणींसह शेषशायी चतुर्भुज शंकर, दिगंबर शिव, गरुड, द्वारपाल असा एकूण पंधरा मूर्तींचा समूह तेथे बांधला. मात्र, शिवालयाचे कार्य प्रगतीपथावर असतानाच रायप्पा वैश्यचा मृत्यू झाला आणि काम कायमचे थांबले. ते अपूर्णच राहिले, त्यामुळे या परिसराला 'अपूर्ण देवालय' असे म्हणतात.

दशानन दुर्गादेवी (फोटो आंतरजालावरून साभार )

दुर्गादेवीची मूर्ती चारशे वर्षे पुरातन आहे, जी २३ फूट लांब आणि १८ फूट रुंद अशी एकपाषाणी विशाल दहा तोंडे असलेली आहे. ह्या दशभुजाधारी मूर्तीच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे. दहा तोंडे असल्यामुळे अनेक लोक या मूर्तीला रावण समजून विजयादशमीच्या दिवशी दगड मारायचे. त्याने मूर्तीचं थोडं नुकसानही झालेलं आहे. परंतु, नंतर संशोधकांनी मूर्तीला खरी ओळख मिळवून दिली. ती मूर्ती देवीची असल्याची माहिती पुढे आल्यानंतर लोकांमधील गैरसमज दूर झाला आणि दगड मारण्याची परंपरा बंद झाली.

मत्स्यअवतार आणि हत्तीसह शिवलिंग

येथील एक वैशिष्ठ्यपूर्ण मूर्ती म्हणजे शिवलिंग आणि समोर हत्ती. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगावरील पाणी हत्तीच्या पाठीवर पडते. हत्तीच्या पाठीवरून हे पाणी वाहून जाण्यासाठी सुरेख वाहिका तयारी केलेली आहे. बहुतेक मंदिरांत गोमुखातून पाणी जाण्याची व्यवस्था असते तसा इथे हत्तीचा वापर केलेला प्रथमच दिसून येतो.

चंद्रपुरात आलेल्या पर्यटकांनी हे ठिकाण अजिबात चुकवू नये असे आहे. सगळ्या मूर्ती अत्यंत सुबक आहेत. पण हे देवालय बिचारे पर्यटकांच्या प्रतीक्षेत एकटे पडून आहे किंवा कदाचित आमची वेळ चांगली जुळली असल्याने इथे लोक नसतील. पण त्यामुळे गाडी लावायला जागा पण मस्त मिळाली आणि जणू काही प्रत्येक मूर्तीची जवळ घेऊन चौकशी करावी अशा प्रकारे निवांत फेरफटकाही मारायला मिळाला.

आमचे चंद्रपूर शहर भटकून झालं. आता शहरा-बाहेर जायचं होतं म्हणजे चंद्रपुरातून थोडं दक्षिणेला ते पुढच्या किल्ल्याकडे.. बघूया पुढे माणिकगड!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!