Saturday, March 25, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले भीमसेन कुँवारा उर्फ भिवगड

किल्ले भीमसेन कुँवारा उर्फ भिवगड

विदर्भाच्या या भटकंतीचे नियोजन केल्यापासूनच या नांवाचं फार आकर्षण होतं. “भिवगड” हे नाव विशेष वाटत नाही पण “कुँवारा भीमसेन” हे नांव मात्र उत्सुकता वाढवून जातं. ह्यामागे नक्कीच काहीतरी रंजक कथा असणार आणि जी त्या स्थानी जाऊन जाणून घ्यायला उत्सुक होतो.

देव कुँवारा भिमसेन मंदिर आणि मूर्ती

हा किल्ला नागपूर जिल्ह्यात “पारशिवनी” या तालुक्यात येणाऱ्या पेंच धरणाच्या बॅकवॉटरला लागून आहे. नागपूरवासीयांसाठी एक दिवसीय भटकंतीचे हे पर्यटन स्थळ आहे, जिथे “कुँवारा भीमसेन” यांचे मंदिर आहे आणि शेजारी या मंदिराजवळच हा किल्ला आहे. बहुसंख्य ठिकाणी डोंगरावर मूळ देवस्थान तर खाली नवीन देवस्थान, असा प्रकार इथेही आहे.

सकाळीच सकाळी सगळ्यात पहिला हाच किल्ला पाहून दिवसाच्या भटकंतीची सुरुवात करायची होती. कारण, आधी इथे जो राणी महाल पाण्यात आहे तो सूर्योदयाच्या वेळी मस्त बोटीत बसून बघायचा आणि मग किल्ला असा मस्त प्लॅन होता. पण हे कुठे माहिती होतं की तो बघण्यासाठीच्या बोटी चालू होतात त्या इतक्या लवकर होत नाहीत? पण तरीही नशीब जोरावर असल्याने एका नावाड्याचा संपर्क मिळालेला होता.

सकाळी सात वाजताच या मंदिराजवळ दाखल झालो. कोवळ्या उन्हातच मस्त बोटिंग करून आधी राणी महाल पाहून घ्यायचा असल्याने आधी आमच्या नावाड्याला झोपेतून उठून आणलं आणि बोट पाण्यात ढकलली.

राणीमहाल

ही राणी महाल नावाची वास्तू बघण्यासाठी पाण्यात बोटीतून जावं लागतं. पण तिथे उतरता येत नाही, कारण बोट लावायला धक्का नाही. पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात इथे पाणी आटल्यावर तरी चालत जाता येत असे असं म्हणतात. आता बाराही महिने पाणी असल्याने फक्त बोटीतून त्याला प्रदक्षिणा मारत ही वास्तू पाहता येते. आमच्या सुदैवाने पाण्याची उंची फार नसल्यामुळे वरचा दीड मजला आम्हाला बघता आला, तोही सूर्य पाण्यात कोवळी किरणे टाकून स्वतःचं रूप पाहून घेत असतानाच्या प्रसन्न वेळी!

किल्ले भिवगड आणि राणी महाल

या राणीमहाला जवळच दाट झाडीने भरलेला डोंगर आहे, हाच भिवगड/भीमगड उर्फ कुँवारा भीमसेन/भिवसेन किल्ला.

“मोहभट्टा” राज्याचे राजा “सयमल मडावी” याचे पुत्र “भुराभगत” व सून “मा कोतमा राणी”. या दोघांना बारा मुलं. त्यात ७ भाऊ आणि ५ बहिणी. ही सगळी बहिण-भाऊ एक-एक कौशल्य राखून होती. एक जण कृषीतज्ञ होता, तर दुसरा रस्ते बांधण्यात कुशल. एक बहिण धान्य-जेवण व्यवस्था याच्यात हुशार तर दुसरी बहीण वैद्य. एक भाऊ ग्रामविकासात निपुण तर दुसरा जलव्यवस्था तज्ञ. असे अनेक विविध गुण हे सगळे राखून होते. त्या बाराही मुलांमध्ये भीमसेन हे सर्वात मोठे, जे धर्मकारण, राजकारण, समाजकारण तसेच मल्लविद्या, धनुर्विद्या अशा अनेक विद्यांमध्ये निपुण होते. या सर्व मुलांनी अविवाहित म्हणजेच कुँवारा राहून समाजकार्य करायचे ठरवले. यांचा मामा “राजा सेवता उईका” याच्या मुलीही यांच्या समाजकार्याला जोडल्या गेल्या. त्यातल्या “बमलाई” यांचं “बंबलेश्वरी देवी” या नावाने मंदिर आहे तर “समलाई (तिलकाई)” यांना “कोराडी की देवी” या नावाने ओळखले जाते.

“भीमसेन कुँवारा मंदिर” हे मंदिर असलेल्या या स्थळाला गोंड समाजाच्या धार्मिक स्थळात फार मोठे महत्त्व आहे. “नांदपूर” राज्याचे राजा “उईका” यांच्या सुपुत्रि “कजला राणी करंगु मसराम” यांचा हा राणी महाल आहे. कथेनुसार भीमसेन यांना चोर समजून या राजाने कैदेत टाकले होते आणि नंतर त्यांना ओळखून सोडून दिले आणि त्यांचे भक्त झाले. तेव्हा भीमसेन इथे येऊन राहिले, डोंगरावर. त्यांची भक्ती करताना येण्या-जाण्यास त्रास होऊ नये त्यामुळे राणीच्या गरोदरपणाच्या वेळी इथे हा महाल बांधला गेला. हा महाल तीन मजले उंच आहे.

पायऱ्या

पहिला बुरुज

त्याच्यानंतर आम्ही वळलो ते किल्ल्याकडे. किल्ल्याच्या वर जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. दाट जंगलातूनच ही वाट वर जाते. वाटेत आधी एक वाजता प-ह्या लागतो. स्वच्छ पाण्याचा हा प-ह्या ओलांडून वर जाताना पायऱ्या लागतात. दहा मिनिटातच आपण एका बुरूजाजवळ पोचतो. हा बुरुज एकावर एक दगड असे नुसते रचून बांधलेला आहे.

गुहा

इथे एक लहान गुहा सुद्धा आहे. कुँवारा भीमसेन इथेच ध्यानाला बसत असत असं कथेनुसार समजतं. ह्या गुहा लहान असूनच आत मध्ये भाविकांनी वाहिलेले हळद-कुंकू वगैरे दिसते.

दुसरा बुरुज

या बुरुजाच्या वर गेल्यानंतर अजून एक बुरुज दिसतो तोही चपट्या दगडी शिळा एकावर एक रचून अशाच पद्धतीने बांधलेला आहे. इथेच जुनं प्रवेशद्वार असावं असं लक्षात येतं. याच्यावर पोचल्यानंतर समोरच एक पत्र्याची शेड दिसते.

गडावरचे देवस्थान

हे कुँवारा भीमसेन यांचे डोंगरावरचे स्थान. राणीला गरोदरपणातील नवव्या महिन्यात दर्शनासाठी त्रास होऊ नये यासाठी दर्शन देण्यासाठी ते तीन पावलात खाली गेले त्यातले पहिले पाउल इथेच ठेवले असं म्हणतात. इथे शेंदूर वगैरेने पूजा केलेली दिसते. इथे एक शिवपिंडी सुद्धा आहे. शेजारी भारताच्या झेंड्या सहित गोंड समाजाचा “जय सेवा” झेंडा तसेच भगवा ध्वजही आहे.

मागच्या बाजूच्या बुरुजावरून खाली पाण्यामध्ये राणीमहाल

हे स्थान अतिशय सुंदर असून चहू बाजूला लांबवर दिसणाऱ्या निसर्ग समृद्धीचा आनंद घेता येतो. धरणाचे बॅकवॉटर, पेंच अभयारण्यातली दाट झाडी असे सुंदर, मन प्रसन्न करणारे दृश्य इथून दिसते. त्यानंतर मागे पलीकडच्या बाजूला आम्ही गेलो. जिथे गेल्यावर पाण्याच्या बाजूला खाली राणी महाल दिसतो, जवळच एक बेटही दिसतं जे झाडीने भरलेलं आहे. मग लक्षात आलं की जिथून हे आम्ही सर्व बघत होतो, तो एक बुरुज आहे. हा बुरुज बराचसा ढासळला असला, तरी कडेच्या बाजूने नीट दिसतो. जवळच एका दगडात अजून एक शिवलिंगही आहे.

चौकोनी बुरुज आणि तटबंदी

यानंतर प्रदक्षिणा मार्गाने गडाच्या या उंचवट्याला फेरी मारताना मागे अजून एक बुरुज दिसला. चुना, सिमेंट वगैरे असलं काहीही न वापरता हे बुरुज बांधलेले आहेत. फक्त एकावर एक चपटे दगड ठेवून. या बुरुजाचा आकार चौकोनी आहे. इथे खाली उतरलो फक्त फोटो काढायला म्हणून आणि लक्षात आलं की तिथे दरवाजा असणार कारण त्याच्याबरोबर शेजारच्या बाजूला अजून एक बुरुज दिसतो जो बऱ्यापैकी उध्वस्त झालेला आहे पण पहिला बुरुज मात्र उत्तम स्थितीत आहे. तसंच या बुरुजाला लागून चक्क लांब वर तटबंदी दिसली, ज्यात अजूनही काही बुरुज आहेत. आतील बाजूने हे सगळे मातीने भरून गेल्यामुळे ते आतल्या बाजूने लक्षात येत नाहीत.

वर आलो आणि लक्षात आलं की असे तटबंदीचे एकापुढे एक असे किमान दोन ते तीन लेअर आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने असं आर्किटेक्चर इथे उभारलेलं आहे. गडफेरी पूर्ण करून पहिल्या बुरूजाजवळ परत आलो. खाली परत येताना लक्षात आलं की वाटेवर वर चढताना साग, उंबर, ऐन, अर्जुनाच्या वृक्षांकडे लक्ष गेलं होतं पण वाटेच्या दोन्ही बाजूला लागून असलेली मुरुड-शेंगेची झाडं लक्षातच आली नव्हती.

प-ह्या पार करून परत मंदिराजवळ आलो. दिवसाची सुरुवात तर अशा नयनरम्य ठिकाणी असलेल्या या किल्ल्याच्या भटकंतीमुळे अतिशय जबरदस्त झाली होती. नवीन मिळालेल्या माहितीनुसार आमच्या मूळ नियोजनात थोडासा बदल करून या किल्ल्यानंतर आम्हाला बघायचा होता तो आधी नगरधन किल्ला, मग रामटेक आणि नंतर मनसरचा किल्ला.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!