Sunday, October 25, 2020

किल्ले अजमेरा आणि किल्ले दुंधा

किल्ले अजमेरा

पायथ्याशी पहाडेश्वर आणि मागे किल्ले अजमेरा

मुळातच नाशिक ही ट्रेकर्सची पंढरी. त्यात बागलाण हा प्रांत माझ्यासाठी म्हणजे खुद्द जिथला आहे ते कोकण सोडून इतर प्रांतांपैकी ओळख झालेला पहिला प्रांत. नाही एकही नातेवाईक तिकडचा नव्हता, ना शाळेतून ओळख, ना कधी फिरायला गेलो... ते सोडाच, नकाशावर सुद्धा पाहिलेला नाही, पण ह्या प्रांताची ओळख होण्याचे कारण माझे आजोबा. ते सरकारी नोकरीत सर्कल इंस्पेक्टर होते आणि त्यांच्या नोकरीचा काही काळ या भागात गेलाय. त्यात बागलाण गावात नव्हे तर जंगली आदिवासी भागात. त्यावेळी आदिवासी राजा सुद्धा असायचा. लहानपणापासून त्यांच्या गोष्टी, गमती-जमती, शिकारी सगळे ऐकले होते.

५-६ वर्षांपूर्वी ह्याच प्रांतातले साल्हेर-मुल्हेर बघितले होते तेव्हा कोण घाई झाली होती मला आजोबांना “त्यांच्या” भागात जाऊन आलेलो सांगायची. आणि गेल्या वर्षी याच भागात थोड्या अपरिचित किल्ल्यांना भेट देण्याचा योग आला. त्यातला पहिला किल्ला अजमेरा. अजमेर-सौंदाणे ते ब्राह्मणगाव रस्त्यावरून थोडी वाट वाकडी केली, की आपल्याला पहाडेश्वर गाव लागते. गावात याच नावाचे मंदिरही आहे. आमची पलटण येथे सकाळी सातच्या सुमारास दाखल झाली. पलटणच... कारण ह्यावेळी आम्ही चक्क पंधरा-सोळा होतो “पुणे ट्रेक ग्रुप”चे.

आधी दर्शन किल्लेश्वराचं आणि नंतर पहाडेश्वराचं या नियमाने आम्ही आधी किल्ल्याकडे चालू लागलो. किल्ल्याकडे वाट याच मंदिराच्या मागून जाते. किल्ल्याचा माथा मंदिराजवळूनच दिसत असला, तरी तिथे जाण्यासाठी गडाच्या पाठीमागच्या बाजूने वळसा मारून जाणाऱ्या वाटेने जावे लागते. वाटेत एक चौथरा बांधून, त्यावर पत्रा टाकून, मंदिर बांधण्याच्या उद्देशाने केलेले बांधकाम आहे. एका खांबावर भगवा ध्वज आहे. पण त्यात मूर्ती नाहीत तर वरुन दरड पडलेला एक थोरला दगड आहे. उलट या दगडासाठीच हे बांधकाम केलेले जाणवते. कारण या दगडावर खूप ठिकाणी शेंदूर लावलेला आहे.

तटबंदीचे अवशेष

गडाकडे जाणारी वाट तशी मळलेली आहे. या किल्ले-डोंगराला डावीकडे ठेवत एका खिंडीत वीस एक मिनिटाच्या चढाईनंतर येऊन पोहोचतो. हे माथ्याच्या जवळपासचे पठार. येथे तटबंदीचे अवशेष आजही दिसतात. अजून अवघ्या पाच मिनिटातच गडाच्या माथ्यावर आपण दाखल होतो. येथे शंकराची पिंड, त्यावर शेजारील दगडांचा आधार घेऊन ठेवलेले अभिषेक पात्र, दिवा विझू नये यासाठी आजूबाजूच्या दगडांपासूनच केलेली एक छोटीशी आडोशाची जागा, समोर ध्वज आणि नंदी अशी “देवस्थानाची” रचना केलेली आहे. शेजारी सौरऊर्जेवर चालणारा दिवा. त्यासाठी खांबावर पॅनेल वगैरेही आहे. सहाजिकच महाशिवरात्री, श्रावण वगैरे मध्ये इथे उत्सव होत असेल हे लक्षात येते. हे पहाडेश्वराचे मूळ देवस्थान.

जोडटाकं

८:२० झाले होते, पावसाळी मोसम असल्याने सूर्याचा पत्ता नव्हता. वर काळोखी दाटलेली होती. त्यात  पाऊस पडून गेलेला असल्याने सगळीकडे हिरवाई होती. खड्डेन खड्डे पाण्याने भरलेले होते. मंदिराजवळचा तलावही भरलेला होता. आजुबाजूला जुन्या बांधकामांच्या चौथर्‍याचे अवशेष दिसतात. पायथ्याच्या पहाडेश्वराच्या मंदिराचा दिशेला चालू लागल्यास उजवीकडे अगदी कडेला कातळात चौकोनी खड्डे मारलेले दिसतात. इथून  खाली गाव तर दूरवर अनेक किल्ले, डोंगर दिसतात. पुढे एक जोडटाकं आहे त्यापैकी एक पाण्याने पूर्ण भरलेलं होतं, दुसरं गाळाने. टोकाला मोठाले खडक आहेत ज्यावर एक भगवा ध्वजही उभारलेला आहे. जे आपल्याला पायथ्याजवळून दिसत असतेच. अवशेष पाहून झाल्याने या खडकांवर फोटोसेशन केलं.

गडफेरी पूर्ण झाल्याने आल्या वाटेने खाली उतरून पहाडेश्वराचं दर्शन घेतलं. थोडी पोटपूजा करून तिथून निरोप घेतला.

 

 किल्ले दुंधा

अजमेरा हा किल्ला “दुंधेश्वर” डोंगररांगेत येतो. या रांगेत याच नावाचा किल्ला आहे – किल्ले दुंधा. हा किल्ला तसा अपरिचितच.

पायथ्याशी आश्रम आणि मागे किल्ले दुंधा

दुंधा नावाचे एक गाव अजमेर-सौंदाणे पुढे असणाऱ्या देवळाणे जवळ आहे. पण हे गाव गडाच्या पायथ्याचे गाव नव्हे. गडाच्या पायथ्याचे गाव आहे दुंधा-तळवडे. हे लखमापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. To be specific दुंधेश्वर महाराजांचा आश्रम हे खरे पायथ्याचे ठिकाण.

तिथे पोहोचायला आम्हाला साधारण अकरा वाजले होते. पण वातावरणामुळे त्याचा पत्ता लागत नव्हता. जराही उन नव्हते. समजा सूर्याने जरी ढगाआडून डोकं काढायचा प्रयत्न केलान तरी इथे पोहोचणे त्याच्या किरणांना सहज शक्य नव्हते, कारण दाट झाडी. किल्ला, गाव आणि डोंगररांगेला पडलेले हे नांव या किल्ल्यावर कधीकाळी वास्तव्य करून राहिलेल्या दुंधेश्वर महाराजांमुळे. पायथ्याशी असलेला “दुंधेश्वर महाराज आश्रम” हा त्यांच्यासाठीच बांधला गेला होता ते डोंगरावरून खाली पायथ्याशी राहायला आल्यावर.

दाट झाडी 

ह्या मंदिरासमोरच एकाच वेळी शेकडा पान सहज उठेल एवढा मोठा मंडप बांधलेला आहे. जवळपास मंदिराच्या जुन्या बांधकामाचे खांब रोवून ठेवलेले आहेत. त्यातल्याच एका खांबाचा उपयोग विजेच्या खांबाला अर्थिंग देण्यासाठी केलेला आहे. समोरच दोन डोंगर आणि त्याच्यामधली खिंड दिसते, ह्यातला डावीकडचा दुंधा किल्ला तर उजवीकडचा “नामसौंदाणे” डोंगर. इथे एका झाडाखाली “आनंद आश्रम” असा बोर्ड आहे. इथेच डावीकडची वाट किल्ल्यावर जाते.

कातळटप्पा आणि कातळकोरीव पायऱ्या
कातळटप्पा आणि कातळकोरीव पायऱ्या

वाटेला लागताच आपण लगेच दाट झाडीत शिरतो. वाट तशी शोधावी लागत नाही. वर चढतच अवघ्या पाच मिनिटात आपण एका कातळ टप्प्याजवळ पोचतो, इथे कातळकोरीव पायऱ्या आहेत. थोडा कातळ, थोड्या पायऱ्या असं करत अजून पाच मिनिटंच चढल्यावर उजवीकडे तटबंदीचा भाग दिसतो आणि तिथून अवघ्या मिनिटाभराच्या अंतरावर “श्री क्षेत्र दुंधेश्वर” फलक दिसतो. इथे घुमटीदार दुंधेश्वराचे मंदिर आहे. ते नाविन्याने रंगवलेले दिसत होते. समोर खांबावर काही घंटा आणि ध्वज आहे. समोरचा नंदी तांब्याच्या पत्र्याने बनवलेला आहे, मंदिरातील शिवलिंगही पूर्णपणे तांब्याच्या पत्र्याने केलेले आहे. हे सर्व अर्थातच नवीन असावे. शेजारील पडवीत “श्री महंत भामेश्वर बाबा मंदिर, श्री क्षेत्र तळवडे, ता. मालेगाव” असा मोठा बोर्ड महाराजांच्या फोटोसहीत आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या तसबिरीसह इतरही काही तसबिरी आहेत. एक त्रिशू रोवलेला आहे. समोरच  होम-हवन करण्यासाठी हवनकुंडही विटांचे केलेले आहे. जवळच एक टाके आहे, त्यातून पाणी काढण्यासाठी एक काढणंही ठेवलेलं आहे. गोरखचिंचेचा प्रचंड वृक्ष शेजारी आहे. इथल्या टाक्याला देव टाके नांव आहे.

इथून पुढे कातळटप्पा चढून गेल्यावर एक चुन्याचा घाणा दिसला आणि नंतर एका कातळात कोरून काढलेल्या पाण्याचं टाकं. यातला थोडा भाग गाळाने भरलेला होता तर उरलेल्या अर्ध्या पेक्षा जास्त भागात पाणी. हे “भामटाकं” (मंदिराजवळच्या फलकावर “भीम टाकं” असा उल्लेख जरी असला तरी भामटाकं नाव संयुक्तिक वाटतं. भामेश्वर महाराज – भामटाकं.) याच टाक्याला बहुतेक आंघोळीचं टाकंही म्हणतात.

७-८ फुटांपेक्षा जास्त उंचीचा निवडुंग

७-८ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या दुतर्फा निवडुंगाच्या मधून असलेल्या वाटेने पुढे गेल्यावर एक जोडटाकं लागलं. हे खांब टाकं आहे आणि यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे अजून एक टाकं दिसलं ज्याची लांबी वरून जेवढी आहे त्याच्या अर्धाच भाग पुढे पूर्ण खोदलेला दिसतो, उरलेल्या भागाचे खोदकाम सोडून दिल्यासारखे दिसते. पाणी सगळ्यांच टाक्यांत भरलेलं होतं कारण मोसम पावसाळ्याचा होता. गडावर उंचवट्यावर एक आश्रम आहे. इतरत्र पुरातन वाड्यांचे चौथरे व काही अवशेष दिसतात.

गडाचा माथा तसा लहानच आहे पण इथूनही इतर गड-डोंगरांचे दृश्य सुंदर दिसते. गडफेरी पूर्ण झाल्याने पायऱ्या आणि दाट झाडीतून खाली उतरलो. मंडपात बसून दुपारचं जेवण उरकून घेतलं. आजच्या दिवशीच अजून एका किल्ल्याला भेट द्यायची होती – किल्ले किंक्राळा!