Sunday, June 18, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले टिपागड

टिपागड

विदर्भातल्या ह्या भागात जायचं ठरल्यावर गडचिरोलीतील किल्ल्यांच्या यादीत एक नाव आलं “टीपागड”. भटकंतीला जायचं म्हटल्यानंतर त्या त्या ठिकाणची पूर्ण माहिती घ्यायची आणि मगच नियोजन करायचं ही सवय. कारण एखादी जागा ठराविक दिवशी बंद असते किंवा जायला परवानगी नसते किंवा सगळी माहिती नसेल, नीट अभ्यास केला नसेल, तर काही अवशेष बघायचे राहून जातात.

दुर्दैवाने या किल्ल्याची माहिती ना इंटरनेटवर सापडली ना विस्तृत स्वरूपात पुस्तकात. मांडे सरांच्या पुस्तकात किल्ल्याच्या फक्त स्थानाचा उल्लेख आहे. श्रीपाद चितळे यांच्या पुस्तकात माहिती असली तरी त्यांची भटकंती फार पूर्वीची आहे, त्यामुळे सध्याची स्थिती कळायला या पुस्तकावर जास्ती अवलंबून राहता येणं शक्य नव्हतं. आणि मुळात हे पुस्तक आम्ही भटकंतीला निघायच्या आदल्या दिवशीपर्यंत माझ्याकडे नव्हतंच मुळी. इंटरनेटवरचे व्हिडिओ आहेत त्यात किल्ला म्हणून जवळपास काहीच माहिती नाही. आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ म्हणूनच याचे चित्रण जास्ती आहे. त्यातही तिथे गेलेले लोक जवळपास स्थानिकच आहेत. थोडक्यात शहरी भागातले किंवा इतर ठिकाणचे ट्रेकिंग किंवा किल्ले भटकंतीच्या उद्देशाने तिथे गेलेले असं कोणीच सापडलं नाही. मांडे सरांच्या पुस्तकात ठळक शब्दात “अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग” असा उल्लेख आहे. “टिपागड दलम” नावाची नक्षलवाद्यांची तुकडी सुद्धा आहे. थोडक्यात इथे जावं की नाही हे ठरत नव्हतं.

भटकंतीतले बघायची ठिकाणं नकाशावर पाहता, गोंदियातील प्रतापगड पाहून मग इथे जायचं असं नियोजनात बसत होतं. प्रतापगडावरून टिपागडला जायला दोन मार्ग आहेत. एक रस्ता कुरखेडा वरून मळेवाडा-कुलभट्टी-सावरगाव वरून “मोठाझोलीयाला” येतो, तर दुसरा रस्ता कुरखेडावरून कुराडा-बेडगाव-कोरोची असा कोडगूळ मार्गे “मोठाझोलीयाला” येतो. दुसरा रस्ता काही किलोमीटर अंतर छत्तीसगड राज्यातूनही जातो. आमच्या नियोजनात प्रतापगड दुपारी होणार होता. त्यामुळे टिपागडला जाताना मुक्काम कुठे करायचा हा मोठा प्रश्न होता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरत होता “नक्षलग्रस्त भाग” हाच. आम्हाला जरा सुद्धा जोखीम पत्करायची नव्हती आणि किल्ला बघायची तर फार इच्छा होती. मग त्या दृष्टीने हातावर हातात ठेवून न राहता हालचाल करायला सुरुवात केली. म्हणजे काय, तर फोन फिरवले. सुदैवाने काही संपर्क मिळाल्यानंतर त्यांच्याकडून काही माहिती मिळाली. त्यात कोरोची मार्ग निवडायचा ही महत्वाची माहिती मिळाली. मग ठरलं कि टिपागड बघायचा म्हणजे बघायचा!

लेखात किल्ल्याकडे वळण्यापूर्वी नमनाला घडाभर तेल झालं. पण ते का वाहिलं हे मात्र लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण मांडे सरांनी म्हटल्याप्रमाणे हा अतिसंवेदनशील भाग आहेच. “टिपागड दलम” आहे हे विसरून चालणार नव्हतं. आणि त्यात किल्ल्याची माहिती गुगलवर बघताना दीपागड म्हणून शोधल्यास नक्षलवादी कारवायांच्या बातम्याच जास्ती दिसतात.

फोनाफोनीत मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवला. साध्या नागरिकांना नक्षलंचा त्रास नाही असंही सगळीकडून ऐकत होतोच. मग नक्षलवाद्यांवरही वरही विश्वास ठेवला. पण आपण खरंच “साधे नागरिक” आहोत हे मात्र “सगळ्यांना” सहज समजावं अशी काळजी मात्र घेतली पाहिजे ह्याची नोंद घेतली आणि सज्ज झालो ते टिपागडला भेट द्यायला.

स्वागताची पाटी

आमचं नशीब जोरावर होतं. आधीचे किल्ले नियोजनाच्या आधीच झाल्यामुळे प्रतापगड दुपार ऐवजी सकाळला आला होता आणि त्यामुळे साहजिकच एक प्रहर वर सरकल्याने टिपागडला सकाळचा वेळ मिळाला आणि त्यामुळे रस्त्यात मुक्कामाची गरज पडणार नव्हती. बेडगाव-कोरोची जवळ थोडा रस्ता चुकत-चुकत आलो तरी दुपारी साडेबारा-पाउणच्या दरम्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला बाणाची खुण असणारी “टिपागड ९०० मीटर अशी पाटी दिसली” (खरंतर पाटी ०.९०० मीटर होती पण याचा अर्थ तीन फूटही होत नाही ही पाटीवरची गंमत आज ब्लॉग लिहिताना लक्षात आली.) “टिपागड गुरुबाबा देवस्थान” असं लिहिलेल्या बोर्डाने, मोठाझोलिया ग्रामपंचायतीने आमचं स्वागत केलं. इथून उजवीकडे वळून गेल्यावर “न्याहाकल” गाव लागतं. वाटेत जिल्हा परिषदेची शाळाही लागते.

रस्ता जिथपर्यंत जातो तिथे पर्यंत गाडी नेऊन टळटळीत उन्हात, बरोबर एकच्या सुमारास गडाकडे वाटचाल चालू केली. वाट ठळक आहे. त्यातून इथे नुकतीच जत्रा होऊन गेली होती त्यामुळे वाटाड्याची गरज सुद्धा वाटली नाही. सुरुवातीलाच एक प-ह्या लागतो, तो ओलांडून पलीकडे वाट सरळ दिसते.

समृद्ध जंगल

समृद्ध जंगल

समृद्ध जंगल

शिळा

इकडचं जंगल विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी समृद्ध आहे हे आम्हाला प-ह्या ओलांडून जंगलात शिरता शिरताच समजलं. किती प्रकारचे वृक्ष इथे असतील आणि वेली इथे असतील हे सांगणं कठीणच आहे. “टिपा” म्हणजे गोंड भाषेत “द्वीप”. अतिप्राचीन काळी हे क्षेत्र ज्वालामुखीच्या भागात येत असल्याने येथे तशा प्रकारच्या अग्निजन्य शिळा प्रचंड प्रमाणात आहेत.

तटबंदीचे पहिले दर्शन

“अखेर टिपागड” ही भावना मनात असल्याने फोटो-व्हिडिओ चालूच होते. तासाभरानंतर तटबंदी दिसली आणि पहिला विचार मनात आला तो म्हणजे हा किल्लाच आहे. तटबंदीतून रस्ता आतमध्ये जातो.

सर्पशिल्प आणि अनामिक देवता

तटबंदीतून आत जाता जाता एक ठिकाणी दगडावर सर्पशिल्प कोरलेलं दिसलं. तीन सर्प एकमेकांना विळखा घालून, फणा काढलेले दाखवलेले आहेत. त्याच्या शेजारीच शिळेवर मनुष्यरूपातील देवतेचं शिल्प आहे. पण ते नक्की कसले किंवा कोणत्या देवाचे ते समजत नाही. जवळच खाली दोन दगडात तीन-चार ध्वज खोचून ठेवलेले दिसले. यातल्या दगडात घोड्याची मूर्ती कोरलेली आहे.

२००० फुट उंचीवरील डोंगरावर विस्तीर्ण तलाव

तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर विस्तीर्ण जलाशय दिसतो. हा तलाव स्वच्छ अशा गोड्या पाण्याचा असून समुद्रीपासून जवळपास दोन हजार फूटपेक्षा जास्त उंचीवर आहे. एवढ्या उंचीवर असलेला, एवढा मोठा तलाव एकमेव म्हणावा लागेल. त्यातून आश्चर्य म्हणजे ह्या तलावाला बारमाही पाणी असतं. गंमत म्हणजे हा संपूर्ण तलाव किल्ल्याच्या आतील भागात आहे. तलावाच्या बाहेरच्या बाजूने पूर्ण तटबंदी आहे. आपल्याला संपूर्ण तटबंदी दाट जंगलामुळे फिरून बघता येत नसली तरी बऱ्यापैकी तटबंदीचा भाग आपल्याला लांबून का होईना पण दिसतो. याच तलावामधून पाणी झिरपत एका नदीचा उगम झाला आहे, तिला “टिपागडी नदी” म्हणून ओळखतात.

बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या

तलावाच्या पलीकडे बरोबर समोरच्या बाजूला एक मंदिराचे बांधकाम लांबूनच दिसलं, तर उजवीकडे सुद्धा अजून एक मंदिर दिसलं. इथून डावीकडून प्रदक्षिणा मार्गाने तलावाच्या कडेकडेने विरुद्ध बाजूस दिसलेल्या मंदिराकडे जायचं. तलावाजवळच्या ह्या मंदिराजवळ पोचलो. इथे झाडांना पार बांधलेला आहे. डावीकडची वाट गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाते. आधी बालेकिल्ला बघून घ्यायचा आणि येताना मंदिरात दर्शन घ्यायचं ठरवलं.

भवानी माता स्थान

पायथ्यापासून सुरुवात करून रमत-गमत सुद्धा येथे दीड तासात पोचलो होतो. डावीकडच्या पायऱ्यांनी बालेकिल्ल्याकडे जायला सुरुवात केली. इथे एक छोटीशी खिंड तयार झालेली आहे, त्यातून ह्या पायऱ्यावर चढतात डावीकडच्या डोंगरावर. विदर्भात बालेकिल्ला हा प्रकार सगळ्या किल्ल्यांवर आढळत नाही. इथे मात्र याचे व्यवस्थित असे अस्तित्व आहे. छोटीखानी असला, तरी अस्तित्वाच्या खुणा मात्र बाळगून आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर वाट सरळ समोर बालेकिल्ल्यावर जाते. परंतु इथे उजव्या बाजूला एक छोटेसे देवस्थान आहे. उजवीकडे जरासं उतरून इथल्या अनगड देवाचे दर्शन घेतले. बहुतेक हे भवानीमाता देवस्थान.

शिळा

पायऱ्या चढून आल्यावर लगेचच उजवीकडे हे ठिकाण आहे आणि दगडांची रचना बघता हा बुरुजाचा भाग असावा असं दिसतं. म्हणजे तिथे पाहिल्यानंतर एक मुख्य दरवाजा, एका बाजूला बुरुज घेऊन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डावीकडच्या बाजूला प्रचंड शिळा असल्याने येथे बुरुज बांधण्याची गरजच वाटत नाही. नीट बघितल्यास झाडीत दडलेली तटबंदीही दिसते.

मुख्य गुहा – गुरुदेव देवस्थान

पाच मिनिटांतच वर चढून आल्यावर समोर एक गुहा आणि त्यातून धूर येताना दिसला. ही गुहा बालेकिल्ल्याचाच एक भाग आहे. गुहेसमोरच तटबंदी स्पष्ट दिसते. तलावाच्या डावीकडच्या खिंडीतून बालेकिल्ल्याकडे येणाऱ्या पायऱ्यांच्या खालीच इथे येणारे भाविक चप्पल काढून ठेवतात.

घोड्याची मूर्ती, जटाधारी बाबा

गुहेबाहेर डावीकडे एक घोड्याची मूर्ती आहे. काळ्या-पांढऱ्या रंगाने रंगवलेली मूर्ती सुंदर सजवलेली होती. नुकतीच जत्रा होऊन गेल्याने त्याच्या खुणा सगळीकडे होत्या. गुहेसमोर एक जटाधारी बाबा बसलेले होते.

गुहेत देवस्थान

गुहेत गेलो. कोंकणात असतो तसा “गुरव” इथेही होता. भाविकांच्या मनोकामना देवापर्यंत पोहोचवायचं काम तो इमाने-इतबारे करत होता. गंमत म्हणजे आतमध्ये कोणत्याही देवाच्या मूर्ती दिसत नाहीत. एका उंचवट्याला शेंदूर लावलेला आहे आणि त्यासमोर खूपश्या उदबत्त्या. इथे काही पादुकाही दिसल्या आणि मूर्ती म्हणावी अशी एकच गोष्ट दिसली ती म्हणजे घोडा! या भागात घोड्याचे महत्त्व फार आहे. चक्क घोडा मंदिरं आहेत आणि त्यातून घोड्याची मिरवणूकही निघते. अर्थात हे नंतर एका किल्ल्याच्या दरम्याने समजलं.

बालेकिल्ल्याची तटबंदी

गुहेच्या उजव्या बाजूने वाट अजून पुढे गडाच्या सर्वोच्च भागाकडे जाते. तिकडे जायला लागल्यावर अजून तटबंदी दिसली. काही वाड्याचे चौथरेही दिसतात. आणि पुढे दिसल्या त्या प्रचंड शिळा. या शिळा किल्ल्याचे बांधलेले अवशेष अर्थातच नाहीत, पण याचाही उपयोग करून घेतला जात असावा.

गुहा

गुहा

गुहा

कोणाचाही थांग लागणार नाही अशा अनेक छोट्या गुहा ह्यामुळे इथे तयार झालेल्या आहेत. आतमध्ये कोणी लपून बसलं असेल तर सापडणं कठीणच. या गुहांना “सात-खंडा गुहा” म्हणतात असं स्थानिकांकडून कळलं. इथून गुहे-गुहेतून फिरून परत शिळांच्या सुरुवातीला येता येतं. गडाचा सर्वोच्च स्थान हेच आहे.

तळघराकडे जाण्याचा बुजलेला मार्ग

किल्ल्याचे अवशेष म्हणावं असं तळघर इथे आहे. एक छोटा मार्ग त्यासाठी दिसला. पण तो बऱ्यापैकी बुजलेला आहे. झाडीत अनेक अवशेष दडलेले आहेत. नजर फिरवली, तर बांधकामाचे अवशेष, वृंदावन, समाध्या अशा गोष्टी दिसतात.

हा किल्ला कोणी बांधला वगैरे काही ज्ञात नाही. कदाचित गोंड-पूर्व काळातीलही असावा. “पुरमशहा” हे नाव या किल्ल्याशी सर्वात जास्ती निगडित आहे. पण श्रीपाद चितळे यांच्या पुस्तकात ते नमूद करतात की त्यापूर्वी हे क्षेत्र गढामंडळाच्या संग्रामशहाच्या अखत्यारीत होते. त्याच्या अधिपत्यात ५२ गड होते. “कर्णशहा” या गौंड राजाने (ई.स. १५४७-१५५२) मध्ये टिपागड जिंकून गढमंडल्या संग्रामशहाजी सद्दी संपवली आणि त्यापुढे पुरमशहाचा काळ येतो.

पूरमशहा अत्यंत शक्तिशाली राजा होता आणि पूर्ण वैरागड परगण्यावर त्याचा ताबा होता. त्याच्याकडे तब्बल २००० पायदळ, ५ हत्ती आणि २५० अश्वदळ होतं. त्याच्या ऐश्वर्याचं छत्तीसगडातील राजांना वैषम्य वाटत असे. त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न ते सारखा करत असत. त्याची कीर्ती सर्वदूर पसरत असताना, त्याची सत्ता उलथवून लावण्यासाठी आजूबाजूच्या राजांनी “गटबंधन” केलं. (मी काहीशे वर्षापूर्वीचं वर्णन करतोय हे विसरू नका वाचता वाचता 😉)

टिपागडच्या परिसरात ही लढाई झाली. कोटगलच्या मैदानात गटबंधनाचा धुव्वा उडाला. काही ठिकाणी स्वतः पुरमशहाने तलवार हातात घेऊन लढाईत भाग घेतला. लढाईत विजय होतच होता, पण त्यात ह्या राजकुमाराच्या पायातील जोडा रणांगणात पडला. शत्रूपक्षाने त्याचा फायदा घेत ते जोडे टिपागडवर आणून राणीला “पेश केले”. राणीच्या वजीरानेच मुद्दाम असं केलं असंही काही जण मानतात तर काही ठिकाणी राजा युद्धात पुढे जात असताना मागे राहिलेल्या सैनिकांपैकी एका शिपायाला ते जोडे सापडून गैरसमजातून ते गडावर आणून दिले असेही मानतात. पण असे कुठल्यातरी मार्गाने जोडे राणीकडे आले आणि अनर्थ घडला. चुकीची बातमी आली. दुःखातिरेकाने ती राणी ती वेडी झाली. तिने सुवासिनीचा वेश धारण केला. जोडे बरोबर घेऊन बैलगाडीत (बैलजोडीच्या रथात) बसून ती तलावाजवळ आली. तिळाच्या दाण्यांनी भरलेला उजवा हात वर आकाशाकडे उंचावून तिने प्रार्थना केली की, “हे भवानी देवी, येणाऱ्या भविष्यात इथे कोणी राज्य करू नये. जोपर्यंत माझ्या हातातील मुठीत तिळाचे दाणे शिल्लक असतील, तोपर्यंत ह्या तटबंदीजवळ आमच्या शत्रूंच्या मस्तकांचा ढीग लागू दे”. तिने बैलांना सरळ तलावात जायला लावले आणि अश्या रीतीने राणी दिसेनाशी झाली. नंतर पूरमशहा मात्र विजयश्री होऊन परतला आणि तलावाजवळच ह्या बातमीने थबकला. तिच्या विरहाने कासावीस होऊन तिच्या मागोमाग, त्याच जागी त्यानेही जलसमाधी घेतली. टिपागड प्रेमाचे प्रतीक म्हणूनही त्यामुळे ओळखला जातो.

राणीची मागणी जणू मान्य झाली आणि त्यानंतर त्या ह्या टिपगडावर कोणीही राजसत्ता गाजवू शकलं नाही. हा गड ओसाड झाला आणि निबीड अरण्यात जणू दिसेनासा झाला. आजही कडे गडप्रेमींचा चहाळ कमीच आहे. भाविक आदिवासी लोक तेवढे येतात.

टिपागडचा राजा पुरमशहाच्या दुदैवी अंतानंतर या किल्ल्यातील खजिना आपल्याला मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गुरुबाबा यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला. त्याला कंटाळून गुरुबाबांनी टिपागडच्या ऐतिहासिक तलावात जलसमाधी घेतली अशी आख्यायिका टिपागड बाबत सांगितली जाते.

तलावाशेजाराची तटबंदी

बालेकिल्ला बघितल्यावर आमची गडफेरी पूर्ण झाली. आल्यावाटेने बालेकिल्ला उतरून तलावाजवळ आलो. ह्या बाजूने समोर तलाव ठेवून डावीकडे लगेचच एक बांधकाम आहे. हे भाविकांसाठी विश्रांती/जेवण/प्रसादासाठी व्यवस्था वगैरेसाठी बांधलेले आहे. पुढे डावीकडे लांबच लांब तटबंदी आहे. तलावाच्या कडेच्या बाजूला एक बांबू वगैरेनी लाकडी मंडप केलेला असून यात देवांच्या मूर्ती दिसत नसल्या तरी दिवे लाऊन पूजा मात्र केलेली दिसली.

लाकडी मंडप

गडकरी मातेचे मंदिर

ह्यालाच लागून नवीनच बांधलेले “गडकरी मातेचे” मंदिर आहे. देवीच्या उजव्या हाताला हत्ती, तर डाव्या हाताला घोड्याची मूर्ती आहे. हे मंदिर, तलाव सगळेच किल्ल्याच्या आत आहे. तटबंदीच जवळपास दोन मैल लांबीची आहे.

तलावाकाठी तहान-लाडू भूक-लाडूवर ताव

किल्ल्याचे पाहता येण्यासारखे सगळे अवशेष पाहून झाल्यावर प्रचंड आनंद झाला होता आणि मग जाणीव झाली ती भुकेची. तलावाच्या कडेला निवांत बसून आपले तहान-लाडू भूक-लाडू काढले. गडकरीमातेच्या कृपेने, जत्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांकडून इथला प्रसादही मिळाला. विदर्भाचे भटकंती नियोजन इथेच सार्थकी लागले होते. नियोजन करताना एकूणच धाकधूक जी होती, त्यानंतर आता मात्र नियोजनातला राहिलेला भाग सहज सोपा वाटायला लागला.

भटकंतीतले सहसोबती संतोष आलम, महेश दारवटकर आणि शहाणे काका यांच्यामुळेच या अनवट वाटेला येऊन अवघड असा टप्पा सहज पार करता आला. आजच्या दिवसातला आता खेळ शिल्लक राहिला होता तो माझा, गाडी हाकण्याचा! अंधार पडायच्या आधी वैरागडला नुसतं पोचायचं नव्हतं तर व्यवस्थित उजेडात पोचून कोणतेही अवशेष न चुकवता तोही किल्ला पदरात पाडून घ्यायचा होता.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!