Sunday, April 12, 2020

किल्ले चंद्रगड आणि कोंढवी

याआधीच्या मोरगिरी वरच्या ब्लॉगची सुरुवातच "जावळीतला चंद्रगड पाहिला होता" अशी केली होती. पण त्यावर लिहायचं मात्र राहूनच गेलं होतं की. तर डिसेंबरच्या सुरुवातीला म्हणजे अगदी एक तारखेलाच जावळीच्या खोऱ्यातला हा किल्ला बघायचा ठरला. या किल्ल्याविषयी तशी उत्सुकता जास्त होती, कारण एक तर आम्ही काढलेल्या माहितीत हा प्रचंड घसाऱ्याचा किल्ला आहे असं सरळ सरळ म्हटलेलं होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे स्थान! जावळीचे खोरे....
जावळीचं खोरं हे शब्दच लहानपणापासून ज्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची काही ओळख आहे त्याच्या डोक्यात कायमच बसलेले असतात. इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे अफजलखानाचा वध. ह्या अफजलखानाला सुद्धा मुद्दामहूनच जावळीच्या खोऱ्यात शिवाजी महाराजांनी इथे म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत ओढून आणलंनी होतं आणि याच जावळीच्या खोऱ्याचे त्याधीचे अधिपती, सम्राट होते ते चंद्राराव मोरे. त्यांनी तर चक्क महाराजांनाच सूचनावजा धमकी दिलेली होती “येता जावळी, जाता गोवळी”. हे सगळं पहिल्यापासूनच ऐकून असलेल्या आम्हाला हे प्रचंड घनदाट जंगल कसं असेल, तिथे प्रत्यक्षात काय असेल अशी उत्सुकता कशी नसणार? त्यामुळे प्रत्यक्ष या खोर्‍यात घुसून हा किल्ला बघायचा म्हणजे जणू काही आपण काहीतरी मोठं साहस करायला चाललोय अशी एक धारणा मनात होती. अर्थात प्रत्यक्षात तसं काही असणार नव्हतंच. ना आपण शिवकाळात आहोत, ना तिकडे चंद्रराव मोरे किंवा इतर लोक आहेत.
तसं याचं नियोजन ठरल्यापासून जे चार जण ठरले होते त्यातला भूषण रद्द झाला, पण विराग तयार झाला. नंतर तोही रद्द झाला. असं शेवटपर्यंत नक्की कोण आहे आणि कोण नाही हेच माहिती नव्हतं. ३० नोव्हेंबरला रात्री साडे अकराच्या दरम्यान वडगाव पुलाजवळ मी विनीतला जॉईन झालो. ह्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे ढवळगाव. तर या चंद्रगड उर्फ ढवळगडला जाण्यासाठी आम्हाला महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून खाली कोकणात उतरायचे होते. साडे अकराला सिंहगडरोड पासून निघाल्यावर आंबेनळी घाट ओलांडायचा ती वेळ म्हणजे मध्यरात्रीची. काय मजा येते अशा मध्यरात्री त्या घाटातून जायला... चहूबाजूला दाट जंगल. सगळं जावळीचाच भाग. विनीत जरी गाडी चालवत होता तरी बाकी आम्ही झोपलो नव्हतो. अशी मजा थोडीच परत मिळणार होती J 
महाबळेश्वर सोडल्यानंतर रस्ता ओलसर दिसायला लागला. ह्यावेळी चक्क डिसेंबर महिन्यात थोडा पाऊस पडून गेला होता. महाबळेश्वर मधून पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एके ठिकाणी उजवीकडे फाटा जातो, तो उमरठ मार्गे ढवळे गावात जातो. ढवळे गावात किंवा त्याच्या आधीच कुठेतरी मंदिर होते जिथे आम्हाला मुक्काम करायचा होता. पण वाटेतले उमरठ गाव हे नरवीर तानाजी मालुसरे यांचे गाव.
तानाजी मालुसरे समाधी
आम्ही उमरठे गावात पोचलो तिथे तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे. ह्या स्मारकाजवळ पोचलो ती वेळ लक्षात घेतली. पुढे तसेही मंदिराचे नेमके ठिकाण माहिती नव्हते आणि गावातला रस्ता, अंतर, वस्ती ह्या गोष्टी लक्षात घेता राहण्यासाठी हे स्मारक-स्थळ आम्हाला चांगलंच वाटलं. अर्थात नाही म्हणायला थोडी थंडी होतीच. तसे ते थंडीचे दिवस होते. त्यामुळे बाहेर तंबूत चार जण आणि एकाने गाडीतच झोपायचं ठरलं. यावेळी गाडीत मी झोपलो. स्मारक स्वच्छ ठेवलेले दिसत होते. झाडलोट करून, तंबू टाकून रात्रीचा मुक्काम झाला. नेहमीप्रमाणे तसं सकाळ व्हायच्या आधीच आम्ही उठलो आणि आमच्या महत्त्वाच्या कामासाठी जागा शोधायला लागलो. आता गंमत अशी की आजूबाजूला खूप वस्ती आणि लोकांची शेतं. कुठे अशी जागाच दिसेना, सगळं स्वच्छ. पण सरतेशेवटी थोडसं आत जाऊन जागा शोधून काढली आणि आम्ही हलकं झालो. तोंड वगैरे धुवून ढवळे गावाकडे निघालो.
ढवळे गावात पोचलो. तिथे शाळेजवळ गाडी लावायला मस्त जागा मिळाली. ह्या गडावर जायचं म्हणजे वाटाड्या बरोबर हवाच. कारण कुठल्याही जंगलातल्या वाटेने आणि त्यातून अपरिचित वाटेने उगाचच वाटाड्या नसताना जायचं धाडस करण्यात काही अर्थ नसतो. एक तर अशा दाट जंगलात तिथलं वन्यजीवन आपल्याला परिचयाचं नसतं, त्यातून वाट चुकल्यावर आपला वेळही वाया जातो आणि जीवालाही धोका. त्यातून हे तर जावळीचं खोरं. पप्पू कदम हे वाटाड्या म्हणून आमच्याबरोबर यायला तयार झाले. पण त्यांना शोधून, घेऊन निघेपर्यंत आठ वाजत आले होते. खऱ्या चढाईच्या रस्त्यापर्यंत पोचायला तसा वेळच आहे. त्याच्या आधी शेतातून वाट काढत, शेलारवाडी ओलांडून जंगलात मग घुसावं लागतं.
चंद्रगड दर्शन
जवळपास सव्वा आठच्या सुमारास चंद्रगडने आम्हाला पहिलं दर्शन दिलंन. इथे खरं गाव संपून ट्रेकची सुरुवात होते. याच ठिकाणाच्या इथे वाट चुकायची पहिली आणि मोठी शक्यता आहे. इथे एका ठिकाणी समोरची पायवाट सोडून उजवीकडे वळावं लागतं, जे माहिती नसल्यास कळूच शकत नाही. तर तिथून आम्ही योग्य वाटेने झाडीत शिरलो. इथून मात्र मोकळं आकाश दिसणं दुरापास्तच होतं, पूर्ण दाड जंगलच. साधारण १५-२० मिनिटांनी आम्हाला एका झाडावर “ॐ नमः शिवाय” अशी पाटी लिहिलेली दिसली. गावकऱ्यांनी अश्या पाट्या मध्ये मध्ये लिहिलेल्या आहेत, ज्या आपल्याला आपण बरोबर वाटेवर आहोत याची खात्री देतात.
ॐ नमः शिवाय
त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच आम्ही ओढ्या जवळ पोचलो. आता दाट झाडी संपली होती, आमची थोडीशी दमछाक झाली होती. इथे आम्ही पहिली विश्रांती घ्यायला थांबलो. इथे एक मोठा ओढा आहे जो आता कोरडा झाला होता. कुठे कुठे खड्ड्यात पाणी शिल्लक होतं. इथपर्यंत आलो, हा तसं म्हटलं तर पहिला टप्पा. गावातून निघाल्यानंतर इथपर्यंत यायला साधारणपणे अर्धा तास लागला होता नंतर आम्हाला आमचं बूड टेकायला मिळालं होतं.
चंद्रगड दर्शन फलक
इथून गडाच्या दिशेने बघितलं तर पूर्ण जंगल आणि झाडी दिसते. गडाचं तसं दर्शनही होत नाही. मात्र इथे ढवळे गावाच्या ग्रामस्थांनी “चंद्रगड दर्शन” नावाचा फलक लिहून ठेवलेला आहे.
म्हसोबाच्या खिंडीला समांतर जागा
पण आता तर प्रसिद्ध खडा चढ चालू होणार होता आणि आता सावली ही आमची साथ सोडणार होती. मोठे वृक्ष नसले तरी झाडी मात्र प्रचंड होती. गवतही सुकलेलं होतं, वाढलेलं होतं. खारवी, इतर गवत आणि झाडी ह्यातून वाट काढत-काढत ओढ्यापासून म्हसोबाच्या खिंडीत यायला साधारणपणे पाऊण तास लागला होता.
खडा चढ
चांगलीच दमछाक झाली होती. ऊन काही कमी होत नव्हतं. कमी कसं होईल? आता तर फक्त साडे नऊ झाले होते. खरं तसं म्हटलं तर ही म्हसोबाची खिंड नव्हे. म्हसोबाच्या खिंडीत आपण जातच नाही. त्याला समांतर अशा ठिकाणी ट्रॅव्हर्स मारून आपण आलेलो असतो. खडा चढ मात्र काही संपलेला नसतो.
झाडांची चौकी
साधारण दहा मिनिटातच आम्ही एका ठिकाणी पोचलो जिथे दोन झाडं होती आणि त्यामुळे टेकायला थोडीशी सावली पण मिळाली होती. यालाच बहुतेक झाडांची चौकी म्हणतात. फक्त डोकं घुसवून मेंदू जरा गारव्यात घेता येईल एवढीच सावली. तेवढीच का होईना, पण सावली मिळण्याचे हे एकमेव ठिकाण. त्यानंतर परत खडा चढ आमची वाट बघतच होता. त्यातून सुकलेले गवत, त्याच्यावरून पाय घसरत होते. त्यामुळे हे गवत सोडून जिथे कातळाचा भाग मिळेल तेवढ्यावरच पाय ठेवून पुढे जाणे सोयीस्कर होते. मागे वळून पाहिलं तर आपण कितीतरी उंची गाठल्याचं दिसत होतंच. प्रचंड मोठी मोठी वाटणारी झाडं लहान दिसायला लागली होती.
पायऱ्या
पावणे दहा वाजले होते पायर्‍या दिसल्या. कातळकोरीव पायऱ्या दिसल्यावर एक प्रकारचा दिलासाच मिळतो जणू काही. आता आपण गडावर आलोच अगदी ही सुखद भावना फक्त. गड माथ्यावर नसलो तरी आता तो काही फार दूर नव्हता. पण समोरच्या त्या पायऱ्यांवर मात्र गवत आलेलं होतं. पाय सटकायची खूपच भीती होती.
गाव सोडल्यानंतर दोन तास होत आले होते आता आम्ही साधारणपणे खिंडीत पोचलो होतो म्हणजे तिच्या वरच्या भागात आम्ही होतो. पण आता जागा मोकळी होती. खडा चढ संपला होता आणि आता समोर चंद्रगड तर मागच्या बाजूला एक तसाच डोंगर याच्या मध्ये आलो होतो. इथे कातळटप्पा लागतो. हा टप्पा पार करून आपण जवळजवळ गडाच्या माथ्यावर पोचतो.

गडमाथा
इथून अप्रतिम दृश्य दिसते. आपण खूप उंचीवर असल्यामुळे आजूबाजूला रौद्र वाटणारे डोंगर-कडे चहूबाजूने आपल्याला दिसतात. त्यातून आकाशही जवळजवळ निरभ्र होतं, मध्येच काही ढग डोकावत होते. असं एकूण दृश्य खूपच छान होतं. इथे थोडं थोडं फोटोसेशन केलं.
नंदी आणि पिंड
इथे जागा प्रशस्त अशी नाहीये आणि समोर लगेचच अवशेष दिसायला लागतात. एक खोदलेला दगड, त्याच्या पुढेच एक नंदी. तिथे गावकऱ्यांनी आणून ठेवलेल्या काही घंटा पडलेल्या आहेत आणि “ॐ नमः शिवाय” लिहिलेली पाटीही आहे. त्याच्यासमोरच एका खोदलेल्या कातळामध्ये मध्ये एक शिवपिंडी ठेवलेली आहे. हा ढवळेश्वर महादेव. आपण या ठिकाणी ट्रेक म्हणून येतो पण अशा ठिकाणच्या देवांचे भाविक मात्र काहीही उत्तम प्रतीचे बूट वगैरे साधनं नसताना महाशिवरात्री वगैरेसारख्या ठिकाणी इथे फक्त भक्तिभव म्हणून येतात. ही शिवपिंडीची मूळ जागा असेल असं वाटत नाही. ते पाण्याचे टाकं वाटतं कदाचित नंतर कधीतरी शिवपिंडी तिथे ठेवली गेली असेल.ढवळेश्वर महादेव” यावरूनच या गडाचं नाव ढवळगड होतं. महाराजांनी गड जिंकल्यानंतर त्याचं नाव चंद्रगड ठेवलं. एका ठिकाणी या किल्ल्याचे नाव “गहनगड” असं ठेवल्याचं नमूद केलेलं आहे.
लपलेलं टाकं
बालेकिल्ल्याकडे
इथून पुढे चालायला लागल्यावर डावीकडे खालच्या बाजूला झाडीमध्ये लपलेलं एक पाण्याचं टाकं दिसतं, जिथे आपल्याला जाणं शक्य नाही, जे वरूनच बघायला लागतं. गडाच्या माथ्यावर तसा मोठा, रुंद परिसर नाहीच. एका सरळ रेषेत हा गडाचा माथा पसरलेला आहे. त्यामुळे आलो तसेच पुढे पुढे चालत गेल्यावर समोरच उंच असा रस्ता बालेकिल्ल्याकडे जाताना दिसतो.
कातळकोरीव टाकं
हा टप्पा चढून गेला की जणू आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजातून वर येतो. आजुबाजुला थोडी तटबंदी आणि काही अवशेष दिसतात. चहूबाजूला सह्याद्री आपल्याला भरभरून दर्शन देत असतो. इथे पुन्हा कातळकोरीव पाण्याचं टाकं आहे, त्यात पाणी होतं. मात्र हे पिण्यायोग्य वाटलं नाही किंवा आमच्याकडे पुरेसं पाणी असल्यामुळे आम्ही त्या दृष्टीने बघितलं नाही.
कमळजा देवी आणि पिंड
इथे आपण एका चौथर्‍याच्या मागच्या बाजूने त्यावर प्रवेश करतो. वळून पाहिल्यावर त्याच्यावर ठेवलेली कमळजा देवीची मूर्ती दिसली. त्याच्या शेजारी एक शंकराची पिंड आहे. त्यावर साळुंखा नाहीये पण मध्यभागी असलेल्या गोल भागात एक दगड आहे. मला तरी तो दगड तो मूळ पिंडीचा भाग वाटलाच नाही उलट तो बहुतेक तोफेचा गोळा असावा असं वाटलं.
पुढे चालल्यावर अजून काही अवशेष आणि चौथरा दिसतो. हे अवशेष जवळच आहेत पण बहुतेक सगळे अवशेष हे वाढलेल्या गवतामुळे थोडेसे दडलेले होते. डावीकडच्या बाजूने काही तटबंदी शिल्लक होती. तसंच पुढे पुढे चालत गेल्यावर आपण गडाच्या शेवटच्या टोकावर येतो. इथून बघायला गेलं तर गड संपल्यासारखा वाटला पण एक चिंचोळी वाट खाली उतरताना दिसली. तिथून आम्ही खाली गेलो. इथे टेकायला थोडीशी सावली मिळाली. हे मात्र गडाचं शेवटचं टोक आहे.


गडाचं शेवटचं टोक आणि तटबंदी, टाकं
इथपर्यंत असलेले गडावरचे सगळे अवशेष बघून झाले होते. गड एका सरळ रेषेत आहे त्यामुळे येता येता वाटेवरच सगळे अवशेष बघायला मिळाले होते. आता हे टाक आणि इथे असलेले अवशेष बघायच्या आधी आम्ही पोटपुजा करायचे ठरवले. घेऊन आलेलं सगळं सामान बाहेर पडलं. लाडू, पराठे, चिवडा, चकली जे जे काही आणलं होतं ते सगळं बाहेर आलं. कारण जरी सव्वा दहाच वाजले होते तरी साधारणपणे आठला सुरुवात केलेला हा गड चांगलाच दमछाक करणारा आणि खडा चढ असल्यामुळे प्रचंड भूक लागली होती.

सह्याद्री
पोटपूजा झाल्यानंतर मग फोटोसाठी अँगल दिसायला लागले. या शेवटच्या टोकावर काही तटबंदी भक्कम दिसते तर त्याला लागुनच आतील बाजूला टाकं आहे. ह्यात पाणी भरलेलं होतं आणि पिण्यायोग्यही आहे. ह्या टाक्याच्या पुढेही एक टाकं आहे, त्यातही पाणी होतं पण ते पिण्यायोग्य नाही. इथे जाताना जरा सांभाळूनच. तिथल्या टाक्यांचे फोटो काढून झाले, टाक्यांबरोबर फोटो काढून झाले. इथून जो सह्याद्री दिसतो ते सह्याद्रिचा कणखर रूपच.
Drone View
परतीच्या प्रवासाला लागलो. अवशेष तर बघून झाले होते त्यामुळे आता बाकी होतं फक्त फोटोसेशन. त्यात प्रवीणनी ड्रोन आणलं होतं. मग काय ड्रोन वरून एरियल फोटो शूट, व्हिडिओ शूट केलं.
झपाझप गड उतरायला लागलो. उतरणे काय सोपे आणि आरामदायी नाहीच आहे उलट ओढ्यापर्यंतचा सगळा भाग घसाऱ्याचा आहे. त्यामुळे खूप सांभाळून उतरायला लागतो.


ओढ्यात पसरलेला मी
येताना परत त्या ओढ्याच्या जागी छोटीशी विश्रांती घेतली. विश्रांती म्हणजे नुसते बसलो नाही तर पसरलोच अगदी.
पावणे बाराला उतरायला सुरुवात केली आणि जिथून आम्हाला पहिल्यांदी चंद्रगड दर्शन झालेलं होतं तिथपर्यंत यायला चक्क दीड वाजत आला होता. म्हणजे उतरायला सुद्धा आम्ही जवळजवळ पावणेदोन तास घेतले होते.
जावळीच्या खोऱ्यातून आम्ही बाहेर पडलो होतो
याच गावात तानाजी मालुसरे यांचे समाधी होती ती बघितल्याशिवाय आम्ही कसं बाहेर पडू? त्या समाधीच्या समोरच गावकर्‍यांचा कुठलातरी एक सण-उत्सव चालला होता. उत्सव म्हणजे काय तर चक्क Bull-Fight. लोक बैलाला आपल्या अंगावर घेत होते आणि त्याच्या पासून वाचवून घेऊन पळत होते. समाधी मात्र जिर्णोद्धाराचं काम चालू असल्यामुळे तशी बघण्याच्या अवस्थेत नव्हती. जसं मिळालं तसंच दर्शन घेतलं.
दुपारचे तीन वाजले होते अर्थातच आम्ही एवढ्यावरच समाधान मानून पुण्याकडे परत निघणार नव्हतो. आम्हाला बघायचा होता कोंढवीचा.
चंद्रगड बघितल्यानंतर ढवळे गावातून उमरठ्यापर्यंत आम्ही आलोच होतो, त्या उमरठ्या पुन्हा पोलादपूर मार्गावर गेल्यानंतर पोलादपूर वरून डावीकडे वळलो. हा रस्ता पुढे कशेडी घाट मार्गे खेड कडे जातो. ह्या रस्त्याला लागायचं आणि साधारण पाचेक किलोमीटरच्या अंतरावर डावीकडे कोंढवी नावाच्या गावात हा रस्ता जातो. वाटेत धामणदेवी नावाचं गाव आहे. हे कोंढवी गाव किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे.
कोंढवी गावात खाली किल्ल्याची माहिती विचारली आणि आता गाडीच सरळ किल्ल्याच्या माथ्यावर जाते हे कळलं. मग काय सरळ गाडी घेऊनच किल्ल्यावर पोहोचलो. चढाई करावीच लागली नाही.
आधी वाचलेल्या माहितीप्रमाणे या गडाचे गडपण दाखवणारे तसे अवशेष म्हणजे तटबंदी, दरवाजा, तोफा काहीही ह्या गडावर नाही. त्यातून आम्ही आधी वाचल्याप्रमाणे बघायला गेलो तर वस्तू ज्या ठिकाणी आहेत असं वाचलं होतं, त्या ठिकाणावर आता नाहीयेत. बर्‍यापैकी वस्तू गावकऱ्यांनी मंदिराजवळ आणून ठेवलेल्या आहेत.

भैरवनाथ मंदिर
आम्ही आमची गाडी सरळ मंदिराजवळ जाऊन लावली. हे दिसणारे मंदिर जीर्णोद्धार केल्यानंतरचे आहे पण मूळ मंदिर प्राचीन असून त्या मंदिराचे काही दगड आसपास ठेवण्यात आलेले आहेत.
या मंदिरावर “श्री भैरवनाथ मंदिर, आठगाव, कोंढवी” असे लिहिलेला फलक आहे. कोंढवी, तळ्याची वाडी, फणसकोंड, गांजण, खडपी, धामणदेवी कातली, खडकवणे व गोलदरा अशा आजूबाजूच्या वसलेल्या आठ गावांचे श्रद्धास्थान, म्हणून हे आठगाव कोंढवी मंदिर. हे मंदिर राहण्यासाठी अतिशय चांगलं आहे. परंतु सध्या ते कुलूप लावून बंद केलेले असते.
वाचलेल्या माहितीनुसार आम्हाला काही नक्षीदार दगड, वीरगळ अशा गोष्टी शोधायच्या होत्या. त्याप्रमाणे मंदिराला प्रदक्षिणा मार्गे फेरी मारली तेव्हा मंदिराच्या पलीकडे तो कोरडा तलाव दिसला. त्याच्या शेजारी एक नंदीची मूर्ती ठेवलेली आहे तसेच शेजारी शंकराची पिंडही आहे. अजूनही काही अवशेष तिथे दडलेले असावेत, ते शोधायचा प्रयत्न केला. पण त्या प्रचंड वाढलेल्या गवतात अजून काही सापडले नाही.

कोरडा तलाव आणि चाफा
मात्र त्या कोरड्या तलावाच्या शेजारी चाफ्याचं झाड दिसलं. ही तशी महत्त्वाची खूण आहे. त्यामुळे कमीत कमी आम्ही योग्य ठिकाणीच अवशेष शोधत होतो याची आम्हाला खात्री झाली. या तलावाच्या दुसर्‍या बाजूला एक वडाचे झाड आहे.
तुळशी वृंदावन, पिंड
मंदिराच्या समोरच आपल्याला काही जुने दगड, मूर्ती दिसतात. त्यात एक नव्याने बांधलेलं तुळशीवृंदावनही आहे. त्याच्या शेजारी असलेली शंकराची पिंड सुंदर आहे. अतिशय छान नक्षीदार असलेली ही पिंड एका चौरंगासारखी आहे. मध्यभागी एक कमळ ही कोरलेलं आहे.
हनुमान मंदिर
यानंतर परत फिरून गावातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर थोडं मागच्या बाजूला गेलो. तिकडे मारुतीचे मंदिर. त्या मंदिरात जाणाऱ्या वाटेवर जुन्या अवशेषांचे काही भाग दिसत होते. ते वाड्याचे अवशेष वाटत होते. या मार्गावर जुन्या पायऱ्यांचे काही अवशेषही आहेत. इथे एक मूर्ती हनुमंताची आहे तर त्याच्या शेजारची छोटी मूर्तीही हनुमंता सारखीच वाटते.
नवनाथ मंदिरातल्या शाडूच्या मूर्ती
भैरवनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला रस्त्याच्या विरुद्ध दिशेस नवनाथांचे मंदिर आहे. याच्या आत मध्ये नवनाथांच्या शाडूच्या मूर्ती आहेत. या पैकी आठ मूर्ती अतिशय सुस्थितीत असून एक मूर्ती भग्न झालेली दिसते. कदाचित त्यामुळेच त्याला कुलूप लावून बंद केलेले आहे. हे मंदिर ही पुरातन आहे. हे मंदिर मुस्लिम स्थापत्य शैलीचे आहे.
नक्षीदार दगड
आजूबाजूला फिरल्यावर आपल्याला अजूनही काही अवशेष बघायला मिळतात. त्याच्यातच एक अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेला दगड बघायला मिळतो.
या मंदिराच्या आजूबाजूला दिसणारा परिसर आणि या गडाचे स्थान लक्षात घेतले तर कोकणात उतरणारा कशेडी घाटाचा मार्ग आणि परिसर यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला नक्कीच महत्वाची कामगिरी बजावत असावा.


स्वच्छ पाण्यात डुंबणारे आम्ही
गडाच्या वरपर्यंत गाडी आल्यामुळे आमचा खूप वेळ वाचला होता. किल्ल्याचे अवशेष बघायला अर्धा तास पुरतो. साडेचारच वाजले होते, त्यामुळे वाटेत हेरून ठेवलेल्या एका नदीच्या किनारी आम्ही गेलो. आधीच पाण्यात डुंबायची हौस, त्यात समोर स्वच्छ पाणी. मग काय? झाली अंघोळ.
एका दिवसात जावळीच्या खोऱ्यातला चांगलीच दमछाक करणारा चंद्रगड उर्फ ढवळगड आणि त्याच्याबरोबर अत्यंत सोपा, कारण वरपर्यंत गाडी जाणारा कोंढवीचा किल्ला पदरात पाडून घेतला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधीही बघायला मिळाली आणि स्मारकही. श्रमपरिहार म्हणून स्वच्छ पाण्यात डुंबायला मिळालं. अजून काय पाहिजे होतं आम्हाला...

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका...
.

Wednesday, April 1, 2020

पुण्याजवळचा, पण काहीसा दुर्लक्षित – मोरगिरी


मोरगिरी
तसं बघायला गेलं तर दोन आठवड्यांपूर्वीच जावळीतला चंद्रगड पाहिला होता. पण होता डिसेंबर महिना. पावसाळा संपल्यावर हिवाळ्यातला एक-एक विकांत हा महत्त्वाचा असतो, तो वाया गेला तर भटका माणूस हळहळतो.
विनीतला फोन केला. जवळपासचा आणि पूर्ण दिवस न घालवणारा एखादा किल्ला पटकन पाहून घेऊ असा विचार होता. विनीतने “मोरगिरी”चा ऑप्शन ठेवलान. पुण्याला हा मोरगिरी जवळचाच. तुंगला बऱ्यापैकी भटके जातात, तिकोणा-विसापूर-लोहगड तर जवळजवळ पर्यटन स्थळ झालेले आहेत. पण यांच्या जवळ असणारा मोरगिरी तसा दुर्लक्षितच. अर्थातच माझी काही हरकत नव्हती. एकतर ट्रेकचा सराव म्हणून कुठेही भटकंती चालली असती, त्यातून मोरगिरी मी पाहिलाही नव्हता. असा दुर्लक्षित किल्ला बघायचा म्हणजे दुधात साखरच. फार इकडे तिकडे न करता टू व्हीलर वरूनच पटकन जायचं ठरलं.
मी आणि विनीत आपापल्या दुचाकीवरून पिरंगुटला भेटलो. त्याच्याबरोबर अजून एक मित्र होता. सकाळीच मस्त वडापाव-चहा वगैरे करुन “मोरवे”कडे निघालो. तसं मोरगिरीला जायला दोन रस्ते आहेत. एक धोपटमार्ग आहे, लोणावळामार्गे तुंगवाडीला जाताना, वाटेत जांभुळवाडी गाव लागते. तिथून सह्याद्री प्रतिष्ठानने मार्ग केलेला आहे. दुसरा मार्ग पौड वरून कोळवण, हडशी वरून जवण-तुंग रस्त्यावरच्या मोरवे गावाजवळून. आता विनीत ह्या मार्गाने आधी जाऊन आलेला असल्याने आम्ही इकडूनच जायचे ठरवले होते. त्याप्रमाणेच दुचाकी हाणल्या.
रस्ता तसा खराबच आहे. दुचाकीवर तर जास्तच जाणवतो. त्यातून माझी गाडी फक्त 13 वर्षांची, त्यामुळे मी जरा जपूनच असतो. त्यातून ती सुझुकी, म्हणजे त्याचे पार्ट मिळण्याच्या दृष्टीने शिमगाच. पण अजून गाडीने कधी धोका नाही दिलेला मला त्रास होईल असा. तर विनीत पुढे आणि मागून गाडी हाकत होतो. म्हणजे विनीत गाडी दामटवत होता आणि मी चालवत होतो. एका ठिकाणी शंका आली. स्पीड कमी करून बाजूला थांबवली, तर ती शंका खरी ठरली. पंक्चर... पण ह्या वेळीही धोका नाही दिलान गाडीने. पौड सोडल्यानंतर या संपूर्ण रस्त्यावर एकच पेट्रोल पंप, तो सुद्धा अगदी फक्त शंभर पावलं पुढे होता आणि त्यातच पंक्चरचे दुकान. विनीतला फोन करून सांगितलं. तो पुढे गेला होता, पण मागे आला. चांगला अर्धा-पाऊण तास खर्च झाला आणि मग परत रस्त्याला लागलो.
कोळवण नंतर हडशी सोडल्यावर तिकोणा किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर, तिकोणाच्या जराशा अलीकडेच डावीकडे रस्ता जवण नंतर चवसार वरून मोरवेकडे जातो. हा डावीकडे जाणारा रस्ता धरला की उजवीकडे पावना जलाशयाचं पाणी लांबवर दिसायला लागतं. तसंच त्याच्या पलीकडे तुंग किल्ला दिसायला लागतो. तसा मुळातच तुंग किल्ला दिसायला सुंदर, त्यातून ह्या बाजूने त्याचा View आधी पाहिलेला नव्हता. तुंगला भेट देऊन साधारण नऊ वर्ष झाली असतील, त्यामुळे तो लक्षातही येत नव्हता. ह्या बाजूने काय सुंदर दिसत होता तो.
मोरवे गाव ओलांडल्यावर एके ठिकाणी डावीकडे फाटा आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी, तो पटकन लक्षात येत नाही. दाते साहेब डावीकडे वळले आणि त्याच्यामागून मीही वळलो. आता रस्ता संपला आणि गाडी जंगलाकडे जायला लागली. चार चाकीचा रस्ता एका फार्म हाऊस पर्यंतच जातो, पण आमच्याकडे दुचाक्या होत्या त्यामुळे अजून पुढे दामटल्या. रस्ता म्हणजे जंगलातली पायवाटच होती.

Trek: Starting Point
थोडं पुढे जाऊन जंगलातच गाड्या लावल्या आणि पायवाटेने चढाई सुरू केली. ह्या बाजूने आधी बुलडोजर आणून वाट करण्याचा प्रयत्न केलेला होता पण तो निसर्गाने हाणून पाडलान होता. म्हणजे दरड कोसळून-कोसळून तो रस्ता शेवटी पूर्ण झालाच नाही म्हणे. तसं बघायला गेलं तर रस्ता असा दिसत नव्हताच, एक वाट होती पण तीही फार मोडलेली दिसत नव्हती. जांभूळवाडीतून रस्ता झाल्याने ह्या बाजूने किल्ल्यावर कदाचित कोणीच येत नाही. पाण्याची वाट आणि त्यातून वाहत कोसळत आलेली वरची दरड. जणू नळीची वाट तयार झाल्यासारखी.
किल्ला तसा इथून दिसतच नाही. त्याआधीचे पठार आहे, तिथे पोचायचे लक्ष ठेवून त्याप्रमाणे ह्या वाटेने वर जात होतो. बऱ्यापैकी मोठाले दगड चढून गेल्यावर समोर थोडं मोकळं-मोकळं दिसायला लागलं आणि दिसला तो मानवनिर्मित कातळात खोदलेला रस्ता.
कातळात खोदलेला हा रस्ता जुन्या काळातला नाही तर अलीकडेच तो बुलडोजरने खोदलेला आहे. एक-दोन वळणं घेतली तर चक्क रुंद खोदाई केलेला रस्ता. इथून अगदी पाचच मिनिटात आलो त्या पठारावर. उजवीकडे होता मोकळा परिसर तर डावीकडे हिरवीगार टेकडीवजा डोंगर आणि त्याच्यामागून डोकावणारा मोरगिरी किल्ला. म्हणजे आम्ही एक टप्पा पार केला होता. पण अजून मोरगिरीचा प्रसिद्ध चढ, जो एकदम निसरडा, घसरगुंडी सारखा आहे तो बाकी होता. म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचं सुद्धा होतं अजून आम्हाला.

पठारावरून झाडीतली वाट शोधताना
उंच इथली कारवी
दातेंच्या म्हणण्यानुसार ह्याच डावीकडच्या झाडीतून कुठेतरी डावीकडे जात-जात गडावर जाणाऱ्या पायवाटेला लागता येतं. पण यावर्षी पाऊस लांबल्याने झाडी दाट आणि उंच होती. नेमकी अशी वाट लक्षात येत नव्हती. जरा इकडे जाऊन बघ, तिकडे जाऊन बघ असं झाल्यावर ती वाट सापडली. हि वाट मात्र मळलेली होती. इकडे गुराखी आणि त्याच्या गुरांचा चांगलाच वावर असावा. चांगली उंच कारवी, त्यातून जाणारी पायवाट. त्यामुळे मस्त सावली. मगाशी अगदी ऊन-ऊन लागत होतं, पण आता दाट झाडीतून ते जाणवतच नव्हतं. सावली आणि गारवा सुद्धा. दहा मिनिटातच ती दाट झाडी संपून पुढे विस्तीर्ण पठार लागले, अगदी झाड विरहित! पण आम्हाला तिकडे न जाता झाडीला धरूनच जायचं होतं. मग तसंच कडेकडेने अजून चालल्यावर अवघ्या पाच मिनिटात एका झाडावर सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला बोर्ड दिसला. मात्र तो बोर्ड आमच्या जाणाऱ्या वाटेवर नव्हता, तर आमच्याकडे येणार्‍या वाटेवर होता, म्हणजे उलटा. कारण आम्ही धोपट मार्गाने आलो नव्हतो. धोपटमार्गाने आल्यावर गडाकडे जाणारी वाट डावीकडे होती त्यामुळे आमच्यासाठी ती उजवीकडे.

दाट जंगल आणि घसाऱ्याच्या वाटेची सुरुवात
मोकळे आकाश सोडून आम्ही परत जंगलात शिरलो. उंच उंच वृक्ष, त्यातून चढाव. पण दाट सावली. ऊन खालपर्यंत पोचतच नव्हतं. मोठी झाडं संपल्यावर कारवी. तशी इथे कारवी कमीच असते, पण ह्यावर्षी पावसाच्या कृपेने तशी बर्‍यापैकी आधार म्हणून कारवी तिथे होती तरी, नाहीतर प्रचंड घसरगुंडीच आहे इथे.

उघडा आणि घसाऱ्याचे पॅच
दहा मिनिटात ना जंगल, ना कारवी असा उघडा पॅच. मागे दरी आणि खाली घसरला तर कष्टाने चढून आलेलं अंतर घसरत जाऊन सरळ कारवीत, नाहीतर जंगलातच परत जायचं. म्हणजे सापशिडी खेळताना अगदी ८० पर्यंत पोचून सापाच्या तोंडातून परत दहावर जाण्यासारखं. इथे एक पॅच अगदी सांभाळून, म्हणजे अगदी तंगड्या फाकून चढायचा असा. एक होल्ड एकदम डावीकडे, तर पुढचा एकदम उजवीकडे. बरं मातीवर पाय ठेवायची सोय नाही, नाहीतर पुन्हा सापाच्या तोंडातून खालीच.

विस्तीर्ण पठार आणि पलीकडे तर डोंगरच डोंगर
तर असं अजून पंधरा मिनिटं गेल्यावर समोर कातळकडा आणि पुन्हा उजवीकडे दरी. पण इथून ते जंगलाच्या आधीचे पठार काय सुंदर दिसतं. विस्तीर्ण! पलीकडे तर डोंगरच डोंगर.
अतिशय सांभाळूनच दरी आणि कातळकड्याकडे लक्ष ठेवूनच अरुंद वाटेने पुढे गेल्यावर परत एक ढासळलेला भाग आहे. दरीचा धोका ध्यानात ठेवून तो टप्पा सावधपणे पार केला की मात्र निवांत.
पिण्यायोग्य पाण्याचे टाके
जाखमातेचे देवस्थान
इंद्रव्रज
इथे कातळात कोरलेले पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. तशी पुढे दिसणारी कातळाला लावलेली एक शिडी लांबूनच आपल्याला दिसलेली असते. तिथे पोचताना डावीकडे कातळात एक गुहा आहे. हे जाखमातेचे देवस्थान. येथे देवीची अनगड मूर्ती, तांदळा आहे. देव कुठेही असो, भाविक रस्ता काढतातच. इथे उदबत्ती, घंटा, एक निरांजन, शेजारी तेल ठेवलेले होते. एवढेच काय तर त्या देवीच्या तांदळाला साडीही नेसवलेली आहे. आजूबाजूला बर्‍याच ठिकणी शेंदूर फासलेला आहे. या गुहेतच एक पाण्याचं टाकं आहे, त्याच्यावरती कातळावर पांढऱ्या रंगात “जाखमाता” असे लिहिलेलं आहे. एक पडलेला लोखंडी बोर्ड आणि पोल गुहेतच आडवा करून ठेवलेला आहे. त्या टाक्यात वाकून बघताना सूर्यदेवाच्या कृपेने नेमकं आपल्याच डोक्याभोवती इंद्रव्रज दिसतं.

शिडी, पलीकडे तुंगकिल्ला आणि देवघर डोंगर
गुहेच्या पलीकडे लागूनच एक मस्त मजबूत शिडी उभी केलेली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी शिडी आहे कारण उजवीकडे दरी आहे. शिडीमुळे इथे आता रोपची गरज लागत नाही. इथून पलीकडे तुंग किल्ला डोकं वर काढून आपल्याकडे बघत असलेला दिसतो. त्याच्या आधी एक पसरलेला डोंगर दिसतो त्याचं नाव देवघर डोंगर.

पाण्याने ओतप्रोत भरलेलं, एकदम कातळकोरीव आणि निटंस टाकं
शिडी चढून गेल्यावर कातळकोरीव पायऱ्या दिसायला लागल्या म्हणजे आता जवळजवळ शेवटचा टप्पा. पायऱ्या चढून डावीकडे वळण घेत गडाच्या सर्वोच्च टोकावर आम्ही पोचलो. इथे पोचल्यावर काय नजारा दिसला... जरासं खालच्या बाजूला एक पाण्याचं टाकं. तेही पाण्याने ओतप्रोत भरलेलं, एकदम कातळकोरीव आणि निटंस. आणि पलीकडे एकदम मोठी डोंगररांग. काय सुंदर दृश्य होते ते.

नजारा
इथे डावीकडे एक ध्वजही आहे आणि त्याच्या बरोबर मागे दिसत होता आता देवघर डोंगर आणि तुंग किल्ला. देवघर डोंगर थोडा खाली गेल्यामुळे त्याच्यावरच सपाट पठार एकदम छान वाटत होतं तर त्याच्या मागून तुंग मात्र त्याची उंची दाखवत ढगाला भिडवून उभा होता. त्या पाण्याच्या टाक्याजवळ गेलो. त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. त्याच्या खालच्या बाजुला अजुन एक टाकं होतं, ते मात्र कोरड होतं.
इथून चहूबाजूला फारच सुंदर दृश्य दिसतं. त्या ध्वजाच्या पलीकडे दिसणारे तुंग किल्ल्याच्या डावीकडे पवना जलाशय, पुढे बऱ्यापैकी अंतरावर लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात तर आपल्या मागच्या बाजूला अजून भरपूर डोंगररांगा. त्यांची नावं मला तरी माहिती नाहीत.

दगडांची घळ
गडावर अजून पाहण्यासारखे अवशेष नाहीत. पण हे जसं लक्षात आलं तसं मग भुकेची जाणीव झाली. त्यात बारा वाजत आले होते. पण वर उन्हात बसून खाण्यापेक्षा खाली उतरून खायचं ठरलं. त्यातही जाखमातेच्या गुहेजवळ न बसता थोडं पुढे जाऊन एक दगडांची घळ, जी आम्ही आधीच हेरून ठेवली होती, तिथे बसायचं ठरलं. वरती माकडांची चाहूल लागली पण या ठिकाणी येणं त्यांना शक्य दिसत नव्हतं. तरी जराशी जपूनच पोटपुजा केली, लगेच फोटोसेशन केलं.
सगळं मनासारखं झाल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो. पुन्हा त्या घसाऱ्याच्या मार्गाला भिडलो. एखादा रस्ता वर चढताना जर घाबरवत असेल, तर उतरताना अजूनच कठीण वाटतो. चढताना लागलेले दोन कठीण टप्पे पार कडून कारवी सापडेपर्यंत धास्ती होती. पण एकदा कारवी आणि ती सुद्धा आमच्यापेक्षा उंच अशी. ती लागल्यावर काळजी मिटली. पुढचं जंगल ओलांडून आल्या वाटेने परत सुरुवातीच्या विस्तीर्ण पठारावर आलो.
इथून मागे पाहिल्यावर किल्ला पूर्ण दिसत होता. तिथून आत्ताच आल्यामुळे सगळी वाट, शिडीची जागा (हो जागाच फक्त, कारण शिडी कातळामागे दडली होती), अगदी वर पर्यंतचा रस्ता आणि ध्वजही व्यवस्थित दिसत होता.

सुरुवात केली धडाधड उतरायला ते मोठमोठाले दगड
आता वेळ हातात असल्यामुळे ते पठार उगाचच तुडवलं आणि मगच उतरायला लागलो. आता काय? पाण्याच्या वाटेने कसंही उतरायचं होतं, एक-दोन जागा लक्षात ठेवल्या की झालं! मग काय, सुरुवात केली धडाधड उतरायला ते मोठमोठाले दगड.
आणि झाली की गंमत त्यात... चुकलो ना एका ठिकाणी. उजवीकडे जायचं सोडून गेलो पाण्याच्या वाटेने डावीकडून खाली. पण फार वेळ जायच्या आधीच ते लक्षात आलं. चढताना न लागलेलं झाड, आमच्या उंची पेक्षा जास्त उंच दाट झाडी. त्यामुळे लगेच कळलं. इथे अर्थातच मोबाईलला रेंज नाही. पण एक होतं, आम्ही तिघंही एकत्र होतो. बुद्धीला चालना देऊन, मागच्या डोंगराचा अंदाज घेत मोकळा भाग शोधून काढला. थोडं हायसं वाटलं. झाडीच्या उंचीमुळे चालताना तोंडावर येणारी जळमट मात्र उगाचच भीती निर्माण करत होती. थोडी धडधड वाढली पण तोपर्यंतच एकाकी ठिकाणी आमच्या दुचाकी आमची वाट बघत असलेल्या दिसल्या.
फार नाही एक पंधरा-वीस मिनिटं जास्त गेली असतील. पण रस्ता सापडत नसेल तर त्या वेळी दोन-दोन मिनिटंसुद्धा जास्तच वाटतात. गाडी जंगलातून बाहेर काढत मार्गाला लागलो आणि यावेळी आल्या मार्गाने येता तिकोणा-पेठ जवळून पवनानगर-कामशेत रस्त्याने हायवेला लागलो. रावेतजवळच मिसळ हाणली आणि संध्याकाळच्या चहाला घरी पोहोलो.


सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!