Monday, October 30, 2017

जत्रा ढुकढुक गाड्यांची

जत्रा
ढुकढुक गाडी म्हणजे "ढुक, ढुक, ढुक, ढुक" असा आवाज करत जाणारी गाडी. जसं बुलेट, Harley-Davidson etc...
वेग कमी-आवाज जास्त, भलतीच गडगड-पाऊस रिमझिम फक्त वगैरे वगैरे...
सध्या परदेशी आहे ना, म्हणून फक्त Harley बघू. Wollongong (NSW, Australia) भागात तशी जत्रा भरली होती harley वाल्यांची!

ह्या ढुकढुक गाडीची एक गंमत आहे. काही नियम असावेत ही बाळगण्यासाठी.
एक तर मालकाचं वजन 100 किलो तरी असावं. कपडे चुकूनही फॉर्मल, साधा Tshirt वगैरे असू नये.
पूर्ण बाह्यांचा TShirt बहुतेक विकतच नसावेत ह्या लोकांना कोणी, तो अर्ध्या बाह्यांचाच पाहिजे, आणि त्यावर Harley-Davidson तरी लिहिलेलं पाहिजे नाहीतर त्यांचा लोगो तरी, Harley चं चित्र.. अगदीच तसलं काही नसेल तर गेला बाजार एखादी कवटी वगैरे तरी...

मी काढलेला नाहीये हा फोटो, मी फक्त गाड्यांचे काढलेत.(लक्ष फक्त जॅकेटकडे असू द्या!)
ह्या गाड्या विकणाऱ्याचंच ते टॅटू गोंदण्याचीही टपरी असावी. हॉटेलच्या बाहेर नाही का पानाची टपरी असते त्याच नावाची. कारण ही गाडी घेतली की accessories मध्ये टॅटू गोंदवून देत असावेत. त्याशिवाय रस्त्यावर न्यायला बंदी. अंगभर गोंदवून घेतला तर पहिला नंबर! नाहीतर हात, छाती वगैरे. किमानपक्षी बाह्या सोडल्यास उरलेल्या हातावर बंधनकारक.
म्हणजे सर्वांगावर टॅटू, Harley चा Tshirt, Harleyचंच जर्किन, हेल्मेट Harleyचंच आणि उतरल्यावर हेल्मेट काढलं की घालायला टोपीपण Harleyचीच. चड्ड्या काय दिसल्या नाहीत त्यांच्या. (ते टॅटूवाले पण फोटो घेतले नाहीत मी)
शक्यतो दोन्ही बाजूला 1-1 मोठी डिकी असावी, कितीही किराणा घेतला तरी ठेवायची चिंता नाही. पाठीमागे एखादी आडवी डिकी असल्यास उत्तम. (Pizza वाल्यांच्या मागे असते तशी किंवा पाववाल्यांच्या मागे)
बरं कुठेही फिरायला जावं तर एकटे-दुकटे फारसे हे भटकत नाहीत, थवेच्या थवे! सुट्टीचा दिवस असला कि आपल्याच जातीची गाडी ज्यांच्याकडे आहे असे भरपूर जण एकत्र हिंडायला निघतात.
आता गाडी stand वर लावणे ही तशी just formality आहे, जरासा support उगाच. तशी ही गाडी स्वतःची स्वतः उभी राहण्यास समर्थ आहे.
गाडी stand वरून काढून घेऊन जाणे हीही एक वेगळी गोष्ट असते. सामान्य माणूस गाडी stand वरून काढून घेऊन जायची असेल तर हेल्मेट वगैरे जे असेल ते घालतो, गाडीवर बसतो, किक मारली किंवा बटन दाबून चालू केली कि निघाला...
पण ढुकढुक वाले सामान्य थोडीच असतात, सर्वप्रथम गाडीजवळ आल्यावर आपलीच गाडी नावीन्याने बघत असल्यासारखी चारही बाजूंनी फिरून बघणे हि पहिली गोष्ट. त्यात ते काय बघतात देव जाणे? एखाद्या वेळी हवा वगैरे बघावी लागणे ठीक, पण प्रत्येक वेळी काय बघायचे? बरं इथे Australiaत रस्त्यावर कुत्रे पण फिरत नाहीत, लाईटचे खांब पण नाहीत, कुत्र्यांना गाडी खांब वाटावी अशीही शक्यता नाही. ते जे काही असेल ते निरखून झाल्यावर डिकी उघडून संसार बाहेर काढावा, हेल्मेट, जॅकेट, ग्लोव्ह्ज . हे सगळं अंगावर चढवण्याआधी गाडी सुरु करणे महत्वाचे. आपल्याकडे नाही का टमटम/डुगडुगी वाले दोरी ओढून टमटम चालू करून ठेवतात, मग ती दिवसभर बंदच करत नाहीत, निसता रॉकेलचा धूर!
हा, तर ते धूड पाहिलं सुरु करून ठेवायचं, गाडी अजून standवरच हा, आणि Nutralवर. नुसता आवाज झाला पाहिजे १० मिनिट ढुग-ढुग-ढुग... मग साज शृंगार करत ती सगळी आयुधं अंगावर चढवायची. गाडी Stand वरून सरतेशेवटी काढायची, पण जायचं नाही बरं का अजून, किमान ३ मिनिट त्यावर  बसून पेट्रोल जाळायचं. मग असा काही आवाज करायचा कि जणू काही पुढच्या ३ सेकंदात २०० किमी/तास वेगाने "मौत का कुवां" मधेच जायचंय. आणि मग गाडी चालू करून, पायाने ढकलत ढकलत ५ च्या वेगाने गाडी पार्किंगच्या बाहेर काढायची.
पुढचं मग ठरलेलंच, ढुग-ढुग-ढुग-ढुग-ढुग आवाज करत जात राहायचं. अगदी बुलेटसारखंच.
पण एक फरक आहे हा, इथे ते लोक ४० पेक्षा जास्त, अगदी १५० पर्यंत वेगाने जातात. बुलेटचा वेग तेवढा जातच नसावा, एखाद-दोन बुलेट बघितल्या होत्या मी, ८० च्या वेगाने जाताना भारतात. सगळा रस्ता अडवत २० च्या वेगाने माजात जाण्याची प्रथा आपल्याकडे फक्त. इथे १०० च्या वेगाने सुद्धा ते रस्त्याच्या डाव्या बाजूने जातात. रस्त्यावरच्या सगळ्यांना "मी आssssssलो, मी निघाsssssलो" असं गाडीच्या आवाजाद्वारे सांगितलंच पाहिजे असा ह्यांचाही आग्रह असतो बुलेटवाल्यांसारखा. ते नाही का Ice-cream ची गाडी आली कि प्रत्येक वेळी सांगायची गरज भासू नये म्हणून घंटा लावलेली असते त्याला, किंवा बैलाच्या गेल्या नाही का खुळखुळा बांधतात किंवा ... हा तसंच काहीसं असेल बुआ हे आवाजाचं प्रकरण!

काही गाड्यांची सीट म्हणजे पूर्ण खुर्ची

डिकीत माझ्यासारखा माणूस सहज बसेल

पण एक आहे हा, ह्या Harley मध्ये ना, टेकायला आधार, बूड नव्हे हा, पाठ. ट्रकला गरज भासल्यास गाडीचा काढून लावता येईल एवढा जाड टायर. ४-५ वेगवेगळे Speedometer, त्यात काय वेग, MRP, दोन्ही चाकातलं हवेचं प्रमाण, टाकीतलं पेट्रोल आणि फुगलेल्या छातीचा घेर पण मोजतात काय harley जाणे. किंवा Davidson. अजून जोडीला earphones लावायला जागा, एखाद २ स्पीकर सुद्धा! तीर्थाच्या बाटल्या ठेवायलाही जागा असावी एखादी.
काही गाड्यांना सीट एकच, पण डिकीत माझ्यासारखा माणूस सहज बसेल. तर काही गाड्यांची सीट म्हणजे पूर्ण खुर्ची!

तर असा, skydive झाल्यानंतरचा वेळ मी ह्या लोकांना अलविदा करण्यात घालवला.
इति Harley-Davidson पुराणं समाप्तं!

अरे हो...
गडगड/कडकड नाही पण सुsssss असा आवाज करत काहीही समजायच्या आत पावसाची जोरात सर येऊन काहीही समजायच्या आत झुमकन निघून जावी, तशी जाणारी हि गाडी मात्र नेत्रसुख देऊन गेली मला. हि आपली लाडाची हायाबुसा!
हायाबुसा


-- ॐ रत्नांग्रीकर

Sunday, July 16, 2017

अंधारबन


शुक्रवारी संध्याकाळी एका कामासाठी सुबोधला फोन केलेल्या फोनवर "रविवारी अंधारबनल येणारेस का? फास्टाट रेकी मारून यायचंय, ३-४ जण फक्त". अशी मोहीम ठरली. दुपारी २ पर्यंत परत यायचे नियोजन असल्याने फार वेळ न घेता जायचे ठरवून टाकले. २-३ आठवड्यापूर्वी तांदुळवाडी-आसावा-काळदुर्ग मोहिमेत Action Trek बुटांनी ६ वर्षाच्या पायपिटीला कंटाळून सोल, त्याखालचा मुळचा सोल आणि आतले प्लास्टिकचे कसलेतरी भागही बाहेर टाकले होते, ते सगळे फेवीक्विकने जोडून पूर्ववत केले. गु-मॅपवर ७० किमीच्या आसपास अंतर आहे हे बघून ठेवले. बाकी काहीच बघितले नव्हते, सध्या ते एक कुंभमेळ्याचे एक ठिकाण झाल्याने फार कष्ट घ्यायची गरज नव्हती. ताम्हिणी घाटात उजवीकडे कैलासगडचा बोर्ड बघून त्याच रस्त्याला उजवीकडे जायचे होते. सुशांत आणि सुबोध एका गाडीवर, तर मी एकटाच माझ्या सुझुकीवर. तो बोर्ड काही दिसला नाही आणि मी १०-१२ किमी नियोजित ठिकाणापासून पुढे "मुंबई स्वागत करत आहे" असल्या कमानीजवळ पोचलो. तिथे रेंज आली, आपला वेंधळेपणा आणि ठिकाण नीट समजून घेतले आणि परत मागे फिरून त्या निर्जन रस्त्यावरून "प्रींपरीचा पूल सांगा कुणी पहिला" करत सुबोध/सुशांतला शोधून काढले. तोपर्यंत त्यांनी तिथल्या टपरीवाल्या गावावाल्यांशी मैत्री केलनी होती. अत्यंत खराब रस्त्यावरून कुंभमेळ्याच्या ठिकाणी दाखल झालो. खुपश्या गाड्या/बसेस आधीपासूनच पोचलेल्या दिसत असल्याने दर्शनाला फार रांग असेल हे सांगायची गरज नव्हती. पण पब्लिक डबकी, "झरना" हाच शब्द पुरेल असला धबधबा, धरण सदृश बंधारा ह्यातच शाही स्नानाचा आनंद लुटत असल्याने फार त्रास होणार नव्हता. अंधारबनला ५० रुपये एन्ट्री फी लावलेली आहे. अधिकृत की अनधिकृत हा भाग वेगळा, पण आधीच टपरीवाल्या गाववाल्याशी ओळख झाल्याने तिघांचे मिळून १५० रुपये तिथेच वाचले होते.







वाट चुकण्याचा एक कार्यक्रम सुरुवातीलाच उरकून घेतला. आता आमच्यावर भरवसा ठेऊन मागचेही आमच्यामागे आले आणि त्यांनाही तो अनुभव फुकटात अनुभवायला मिळाला. मग बरोबर वाटेला लागल्यावर धुकं, लहान-सहन धबधबे असा रस्ता पार करून मोठ्या धबधब्याच्या जवळ आलो. हातांची साखळी करून एक ग्रुप त्यांच्या मेंबरना पलीकडे नेत होता. एकंदरीत पाणी बघता थोडी ओढ जास्ती असली तरी रोपची गरज वाटली नाही. मधेच ओळखीचे लोक भेटत असतातच, तोही कार्यक्रम पार पडला. पाऊस सकाळपासूनच भिजवत असल्याने आता ओलाव्याची भीती वाटत नव्हती, बिनधास्त पाणी उडवत वाट काढत होतो. फोटो काढण्यासाठी मात्र मोबाईल/कॅमेरा सांभाळून काढत होतो. शेवटचा मोठा धबधबा पार केला, जिथे काही लोकांना रोप लागेल असले काही मुद्दे डोक्यात मांडून ठेवले. वेळेची मर्यादा बघून परत फिरलो. "अंधार"बन नांव सार्थ करत असलेल्या त्या जंगलातून गेल्या वाटेने परत आलो. वाटेत भेटलेल्यांना माहिती देत होतो. ३-४ टाळक्यांच्या हातात बाटल्यांचा आवाज ऐकून "खूप कठीण आहे, जाऊ नका" असा मोलाचा सल्लाही दिला. तरीही ते लोक धबधब्याजवळ पोचून खळखळ आवाजात बाटल्या डोक्यात चढवून घेणार ही खात्री होतीच, असो!

अंधाssssरबन
पाण्याचा थेंबही घेतला नव्हता सकाळी घरातून निघाल्यापासून. ट्रेक म्हणावे असे हायकिंग झाले होते. परतीला लागल्यावर मिसळ शोधतच काही अंतर कापले आणि भज्यांवर समाधान मानून घेतले. चहा मारला. २-२:३० वाजले होते. घरी काय वाढून ठेवलेय ते समोरच दिवसा ताऱ्यांच्या स्वरुपात दिसत होते. तरी रस्ता तास-दीड तासाचाच होता, रमत-गमत गेले तरी ४ ला पोचू, फार उशीर नाही होणार म्हणून स्वतःलाच धीर देत होतो. अचानक भगवे ध्वज गाड्यांना बांधून काही "महाराजांचे मावळे" म्हणवून घेणाऱ्या ३०-४० लोकांचा एक ग्रुप सायलेन्सर फाटक्या गाड्या (त्यांना बुलेट म्हणायची पद्धत आहे) उडवत, महाराजांचे नांव अक्षरशः धुळीला किंवा चिखलात लोळवत आला आणि "स्वतःच्या बापाच्या" रस्त्यावर गोंधळ घालत चुणूक दाखवत निघूनही गेला. अत्यंत सहानुभूतीदर्शक तुच्छतेने त्यांच्याकडे बघत परतीचा प्रवास परत चालू केला.

फुटक्या सायलेन्सरच्या बुलेट नावाच्या गाड्या घेऊन कार्यकर्ते
मुळात ट्रेकला येण्याचे पातक होऊन चुकले होते, पण वेळेवर पोचून त्याचे किमान क्षालन तरी घडावे हा विचार देवाला मान्य नसावा. स्वतःची नाही झाली तरी चालेल, पण आमची पूजा नीssट व्हावी याची तजवीज विधात्याने घडवून आणलेली समोर ४-५ किमी तरी लांब दिसत होती. सकाळी पाऊस बघून बघून चारचाकी आणली असती तर बरं झालं असतं हा विचार किती मूर्खपणाचा होता हे लगेच जाणवलं. चारचाकीवाल्यांना डोक्याला हात लावलेला बघत त्यांना तसंच सोडून दुचाक्या हाकत वाट काढत जमेल तसे पुढे आलो. वाटेत आमचा प्रवास रटाळ होऊ नये यासाठी खास जन्माला आलेले प्राणी आपापल्या दुचाक्यांवरून सर्कस करत, शर्ट उडवत उघडे-बोडके आपापल्या परीने आमचे मनोरंजन करत होते. लायकी नसताना दैवकृपेने पैसे हातात आल्याने घेतलेल्या चारचाकीतूनही काही लोक आमचे जमेल तसे मनोरंजन करतच होते. गाडीच्या टपावर बसून पावसाचा आनंद घेत होते आणि त्यासाठी अर्थातच अडथळा  आलेले कपडे झुगारून देणे क्रमप्राप्तच होते. काही गाड्यांच्या टपाला पण दरवाजा असतो, त्यातून बाहेर येऊन बोंबा मारणे आता जुने झाले. गाड्यांच्या चारही दरवाजातून चौघांनी फुल फुलतं तसं बाहेर येऊन आरडा-ओरडा करायची नवीन पद्धत कालबाह्य झालेली नाही हे मात्र दिसत होते. ज्यांना त्या पावसाची (किंवा इतरही कसली external असेल) नशा जास्त झाल्याने अर्धेच शरीर का गाडीबाहेर, म्हणून सरळ टपावर चढून चालत्या गाडीवर enjoy करणे पसंत होते. काही उत्साही कार्यकर्ते सरळ बॉनेट वर वायपरवर पार्श्वभाग ठेऊन बनियन आणि त्यातले थुलथुलीत शरीर दाखवत होते. एक जण तर असं बसल्यावर कदाचित गाडीतली "बेस" असलेली गाणी ऐकू येत नसतील म्हणून मांडीवर फणस सांभाळून एष्टीत बसावं तसं 2 फूट उंच स्पीकर घेऊन बसला होता, दुसऱ्या हातातला मोबाईल त्याला connect करायचा प्रयत्नही चालू होता. "ब्रह्मानंदी टाळी" लागली की फक्त नश्वर जगाची तमा न बाळगता असे कृत्य करता येत असेल. दुचाकीवर मागच्याने नाचत नाचत उभे राहून विड्या फुंकणे आता तोच-तोचपणा आल्याने बंद झाले असले तरी सेल्फिचा काळ आलाय. गाडी चालवताना एका हाताने गाडी सावरत दुसऱ्या हाताने सेल्फी दंडुक्याला टांगलेल्या मोबाईलने सेल्फी घेण्याची मजा काही औरच! आता एकाग्रतापूर्वक सेल्फी घेतल्याने गाडी थोडी भरकटणारच ना! बरं पूर्वी बायको मागे बसलेली असली की काही गोष्टी करण्यावर बंधन यायचे, आताही बायको मागे असेल तर पुरुष गाडी चालवताना सेल्फी घेत नव्हते. मग ती कमी स्वतः बायका भरून काढत होत्या. नवऱ्याच्या बरोब्बर तोंडासमोर सेल्फी दंडुका येईल अश्या कुशलतेने गाडीवर सेल्फी घेत होत्या.
एकंदरीत तो भागच पर्यटनाचा असल्याने रस्त्यातही सुंदर अशी डबकी बांधून ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तेवढा त्रास सहन करायला नको का! कोकणात भात-शेती. भरपूर पाणी, मधूनच काढलेला पाट. आता काही निरागस लोक धबधबा समजून त्याखाली भिजून मोठ्या धबधब्याची तहान त्या गढूळ पाण्याच्या प्रवाहावर भागवत होते. आमची भटकंती अंग दुखावणारी नव्हती, अगदी पायाचे बोटही दुखावले गेले नव्हते. पण हे मनोरंजक असले तरी भयानक ट्राफिक आणि त्या तलावसदृश खड्यांनी भरलेल्या रस्त्यातून वाट काढणे कंबरडे मोडणारे होते. दोन्ही हात खांद्यापासून दुखायला लागले होते. मोबाईलवर आलेले फोन सोडाच, हातातले घड्याळही बघता येत नव्हते. पोचायला होणारा संभावित उशीर डोळ्यासमोर तारे चमकवत होता, त्यातूनच वाट काढत सुझुकीच्या कृपेने सव्वा-पाचला घरी पोचलो. ७० किमीच्या प्रवासाला अतिशय रॅश गडी चालवूनही ३ तासापेक्षा जास्ती वेळ लागला होता. २ वडापाव, ३-४ भजी आणि चहा हे केव्हाच जिरून गेले होते. उशीर व्हायचा तो टळला नव्हता. मुकाट्याने ओले कचकचीत समान आवरले. गरम पाणी डोक्यावरून ओतत अंग शेकले.
अंधारबनची अचानक ठरलेली यात्रा मात्र सुफळ-संपूर्ण झाली होती!

Tuesday, June 13, 2017

संप विद्यार्थ्यांचा!

परिसर: महाराष्ट्र शिकवणी केंद्र, अर्थात शाळा
मुख्याध्यापक: फडणवीस मास्तर
काळ: विद्यार्थी संपकाळ
विद्यार्थ्यांनी समस्त शिक्षणमंडळाविरुद्ध संप केलेला आहे. परीक्षेत पेपर व्यवस्थित तपासले जात नसल्याने समस्त विद्यार्थी नाराज आहेत. तर अभ्यास करायचा कंटाळा म्हणून नापास होणारे विद्यार्थी परीक्षेच्याच विरोधात.

अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मागण्या:
१. पेपर व्यवस्थित तपासले जावेत
२. योग्य मूल्य आकारून अभ्यासिका उपलब्ध करून दिली जावी.
३. शालेय बसची व्यवस्था रास्त दरात करावी.
४. पेपर तज्ञ लोकांकडून तपासून योग्य उत्तरला बरोबर गुण मिळावेत. उत्तर योग्य असूनही गुण कमी मिळत आहेत त्यात सुधारणा हवी.
५. ज्या वर्षी पेपर फारच कठीण निघाला असेल तर ४-५ गुणांची सुट मिळावी.

अभ्यासू विद्यार्थ्यांच्या नाराजीच्या तव्यावर पोळ्या भाजण्यासाठी तयार संघटना:
१. पवार आगलावे: म्होरक्या प्रचंड हुशार. डोक्यात किडेच किडे. काही काळापूर्वी मुख्याध्यापक म्हणूनही काम केलेले. पण विद्यापीठाचा कुलुगुरू होण्याची दुर्दम्य इच्छा केवळ गांधी परदेसवाले यांनी "हात" मधे घातल्याने पूर्ण झालेली नाही, त्यामुळे रात्रंदिवस तळमळ.
आग लावण्यात हातोटी. बुद्धीकौशल्यावर मुर्ख, अडाणी लोकांची मजबूत उभारलेली संघटना. सध्याच्या शिक्षण मंडळावर डूख. नाना तऱ्हेने मुख्याध्यापक फडणवीस यांना पाडण्यासाठी डाव रचण्यात सध्याचा काळ जात आहे.
२. आढाव मर्कट संघटना: संघटना कौशल्यापोटी माकडांची टोळी जमा करून भुरटेगिरी करण्यात हातखंडा. सुपाऱ्या घेऊन संप, विध्वंसक कामे करणे यात हातोटी. स्वतःची विचार-बैठक नसल्याने आगलावी संघटनेकडून मिळणाऱ्या सुपाऱ्यावर पोट.
जोडीला उद्धव बाण Manufacturing, शेट्टी विद्यार्थी संघटना, खेडेकर-कोकाटे हिंसा-अश्लीलता-विध्वंस कोचिंग क्लासेस अश्या अनेक संस्था-संघटना, काही चांगल्या विद्यार्थी संघटना ज्यांना वैचारिक बैठक नाही त्यामुळे शिक्षण मंडळाविरोधात विद्यार्थी कल्याणाच्या दृष्टीने सामील.
बाकी आगलावी, मर्कट अश्या अनेक संघटनांना ना विद्यार्थ्यांची चिंता, ना शिक्षकांची, ना विद्यार्थ्यांच्या ज्ञानामुळे समाजाला होणाऱ्या फायद्याची चिंता. उद्देश फक्त मुख्याध्यापकाला पाडण्याचा. जेणेकरून शाळेसाठी मिळणारा पैसा खाता येईल. त्यामुळे ह्या संघटनांचा उनाड/फुकट्या विध्यार्थ्यांना पाठींबा. वास्तविक आगलावी संघटनेचा म्होरक्या मुख्याध्यापक होऊन गेलेला. शिक्षण खात्याचा प्रचंड अनुभव. पण सगळी हयात पैसे खाण्यात, घोटाळे करण्यात गेलेली आणि समाज काय, विद्यार्थ्यांकडेपण दुर्लक्ष. पण याचा सध्या सोयीस्कर विसर पाडून ठेवलेला. रड नुसती सध्याचे शिक्षण मंडळ काही करत नाही ह्याचीच. गेले ६० वर्ष शिक्षण खाते "हातात" असूनही आपण काहीही केलेले नाही ह्याचा समाजाला पाडलेला विसर.
वेळोवेळी विद्यार्थ्यांना किती भयानक अभ्यास करावा लागतो, गुण मिळतच नाहीत, बसच खराब, पेपरच कठीण नाहीतर पुस्तकेच दिसायला चांगली नाहीत वगैरे अनेक समस्या मीठ-मसाला लाऊन समाजात जाणीवपूर्वक अश्या पसरवलेल्या की विद्यार्थी हे एकटेच काय ते समाजात जगण्यास लायक आणि बाकी सगळे त्यांच्या जीवावर जगणारे फुकटे अशी भावना करून दिलेली.
अर्थातच विद्यार्थ्यांकडे जराही बोट दाखवायची सोय नाही. बरं ह्या सगळ्या विद्यार्थांत ८०% विध्यार्थी खरच अभ्यासू, मेहनती आणि परीक्षेत चांगले गुण मिळवून स्वतःची आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाने समाजाची प्रगती करायची मनीषा बाळगून असणारे. त्यामुळे समाज कृतज्ञ. पण २०% विद्यार्थी टवाळक्या करणारे, भाई-गुंड लोक, आधीच श्रीमंत आणि उपद्रवी. हेच विद्यार्थी अभ्यासाच्या नावाखाली नुसता शाळेत गोंधळ घालण्यासाठी येणारे आणि ना उरलेल्या विद्यार्थ्यांना सुखाने जगू देणारे ना शिक्षकांना.
अभ्यासू-मेहनती विद्यार्थी मात्र ह्या सगळ्यात गोंधळलेले, शाळेत शिकायचे असल्याने फुकट्या विद्यार्थ्यांनी आणि संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभागी. त्यापैकी काहींनी मेहनतीने लिहिलेले पेपर संपाच्या नावाखाली फुकट्या लोकांनी रस्त्यात फाडून टाकलेले, फक्त सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने.
खरं तर अभ्यासू विद्यार्थ्यांचे ह्यात नुकसानच. त्यांना परत अभ्यास करावा लागणार, परीक्षा द्यावी लागणार! पण पेपर फाडण्याने सगळीकडे सहानुभूती मिळालेली, नेते लोक पेपरला आग लावणे, फाडणे ह्यात दंग. त्यांचे सेल्फी फेमस.
अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त. त्यावर मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळ चर्चेने तोडगा काढायला तयार. पण फुकट्या विद्यार्थ्यांना परीक्षाच नकोत, वर अधिक कोरेच ठेवलेल्या पेपरमध्ये सुद्धा पास करावे अशी मागणी. अभ्यासिका, स्कूल-बस सगळे फुकट हवे. आणि त्यातही शाळेत येऊन अभ्यास न करता हे लोक गोंधळच घालणार! वर मग परत रडायला तयार, परीक्षा लिहिता येत नाही म्हणून. काही ठिकाणी तर अभ्यासू विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर बळजबरीने फाडतानाचाही पुरावा जाहीर, पण तिकडे कानाडोळा.
मुख्याधापाकांना तर शाळेची चिंता. दुसरा लायक मुख्याध्यापकही नाही. त्यांना तर विध्यार्थी सांभाळायला हवेत पण परीक्षा रद्दच करणं हा मार्ग चुकीचाच ह्यावर कसा तोडगा काढायचा ह्याची चिंता.
तातडीने बैठक झाली, दिवस गेला, रात्र गेली परीक्षा रद्द करण्याचे सोडून बाकी सगळ्या मागण्या मान्य केल्या गेल्या. गुण भरघोस देण्याचे आश्वासन गेले. अभ्यासिका, स्कूल-बस योग्य दरात दिली. विद्यार्थी अभ्यासू असतील तर पास करण्याचेही ठरले. अभ्यासू विद्यार्थी खुश झाले, संप मिटल्याचे जाहीर झाले.
पण फुकटे नाराज, त्यांना अभ्यास करायचाच नव्हता. परीक्षाच रद्द करा हा हट्ट, प्रचंड मनुष्य बळावर पुन्हा संप. ह्यावेळी नाईलाजाने हीही मागणी मान्य करावी लागली. मग संप संपल्याचे जाहीर झाले. समाजाचा जीव भांड्यात पडला.
पण आगलावी संघटनेचा म्होरक्या कुठे होता? कुठे होती सगळी संप घडवून आणणारी डोकी? ती विध्वंसक डोकी तर केव्हाच पुढच्या हालचालीला लागली होती.
तयारी चालू झाली होती पुढच्या संपाची!!!

टीप: वरील गोष्ट पूर्णपणे काल्पनिक असून त्यातल्या कोणत्याही नावाचा, संघटनेचा कसलाही कोणताही कशाशीही संबंध नाही. जर काही जुळून आल्यास समाजात असे विध्वंसक लोक खरच आहेत असे समजावे, उगाच माझ्या गोष्टीला जबाबदार धरू नये. जाब त्यांना विचारावा, मला नाही.