Sunday, July 29, 2012

माझी भ्रमंती - किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड (भाग २)

            गजर लावला किंवा mobile वर reminder लावला कि 5 मिनिट आधीपासून तो वाजायची वाट बघायची आणि वाजताच बंद करायचा हि नेहमीची सवय. शनिवारी सकाळी सुद्धा हेच, ५:५५ उठून बसलो. मुखशुद्धी करून होतेय तोच चहा हजर झाला. फोडणीचा भात खाऊन आणि फक्कड चहा मारून गडी सज्ज झाले आणि पावणे नऊला दुस-या दिवसाची सुरुवात झाली. पहिले लक्ष होते "आंबेवाडी". अपेक्षेपेक्षा आंबेवाडी लवकरच आली. कळकवाडी पण सापडली. रस्ता तर काय विचारता असा होता. दोन वाड्यांच्या मधे जंगल आणि वाडीत भात-लावणीची कामं चालू असल्याने पूर्ण शूज सहज आत घुसून राहील असा चिखल. मळेवाडी लागली. ह्यानंतर समीरने एकदा साष्टांग नमस्कार घातला. आता पाटेवाडीकडे चालू लागलो. पाटेवाडीही सापडली. शूज ६-६ इंच रुतत होते. जमेल तसा बुटाचा चिखल उतरवत जात होतो. त्यात एक सुंदर प-ह्या लागला. प्रत्येकाच्या शूजबरोबर किलो-दीडकिलो चिखल सहज असेल चोख शूज-socks काढले अन् पाण्यातच बसलो. 

सिद्धार्थच्या रक्ताचा आस्वाद घेत असलेली जळू

जमेल तेवढा चिखल दान करून निघणार इतक्यात सिद्धार्थ "जळू" म्हणून ओरडला. त्याच्या पायाला कधीतरी जळू लागली होती आणि ती रक्त पिऊन टम्म फुगली होती. पोट भरलेले नसल्याने तिचे रक्त-प्राशन चालूच होते. आम्ही पहिल्यांदी कॅमेरा आणि नंतर तंबाखू काढला. बागड्याने तो मळायचा प्रयत्न करून तो जळवेला खाऊ घातला. तिने त्याला काही दाद दिली नाही. मग लायटर काढून तिला चटका दिल्यावर मात्र न राहवून तिने सिद्धार्थचा पाय सोडला. आम्ही मग लगेच स्वतःचे पाय चेक केले. संशयास्पद काहीही आढळले नाही. पाटेवाडी सोडली. जवळ-जवळ साडे बारा वाजले होते. भूका लागल्या होत्या. "सुकामाचा धनगरवाडा" भोजनासाठी fix केला होता. पाऊस अजिबात थांबत नव्हता. सॅकने पाण्याने गच्च ओली झाल्याने पाठीवरचे वजन वाढवले होते. अखेर सगळ्यांनी एका सुंदर पठारावर सॅक खाली टाकल्याच. पाऊसही विश्रांतीच्या मूडमधे दिसत होता. "न पडणा-या" पावसाची आज्ञा मानून भोजनास प्रारंभ केला. उतक्याने पाकाताला रायआवळा आणला होता. पराठे, साध्या पु-या, तिखट-मिठाच्या पु-या, साटोरे, गोड पोळ्या, गुळाच्या पोळ्या असा पंचपक्वान्नाचा बेत केला. सगळे त्यावर तुटून पडले. उतक्याने ओवा-मिश्रित बडीशोप आणली होती, त्याच्या आग्रहाखातर प्रत्येकाने ती घेतली. तेवढ्यात पाचकाची पुडी बाहेर आली. सुबोध आणि सिद्धार्थ ने त्यासाठी थोडी लढाई करून घटकाभर आमचे मनोरंजन केले. सगळ्यांच्या तोंडात आवळ्याचे ते पाचक गेले आणि पुढे कूच केली. थोड्या वेळाने लक्षात आले कि सुकामाचा धनगरवाडाच आत्ता आम्ही सोडून पुढे आलो होतो. आता "म्हसवडे" शोधू लागलो.
            शुक्रवारी आम्हाला चांगली माणसं भेटली. शनिवार मात्र जरा बिनसला होता. तसं आंबेवाडीपासून एक वाटसरू कळकवाडी पर्यंत लाभला होता. नंतर मळेवाडी शोधताना वाटेत एक म्हैसही आमच्या मागे लागली होती पण तिच्या गुराख्याने तिला पिटाळले होते.  पण एकदा कापरेवाडी-आंबेवाडी सोडल्यावर पोरं-बाळं गोळ्या-चॉकलेट मागायला अक्षरशः मागे लागत होती. सुरुवातीला कौतुकाने दिली पण नंतर उपद्रव वाढतच चालला. एक-दोघांनी तर पेनसुद्धा मागून बघितले. लहान पोरंच नव्हे तर शेतात काम करणारे मोठे लोकही गोळ्या-चॉकलेट मागत होते. एकाने तर तुमची "प्यायची" सोय खाली गावात होईल असे सांगून आत्ता काही आहे का "प्यायला" असेही विचारून बघितले.
            मजल-दरमजल करत एका वाडीत येऊन पोचलो. बहुतेक म्हसवडे असावे. साधारण ३ वाजत आले होते. आमच्याकडच्या नकाशावर नसलेल्या ३-४ वाड्या मधे लागून गेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वाडीत पुढचे गांव विचारत जाणे क्रमप्राप्तच होते. या "बहुतेक" म्हसवड्यातल्या एका माणसाने आम्हाला पावनखिंड २० किमी आहे अजून म्हणून सांगितले.. आम्ही चालतच होतो. त्याचा किमी मधला अंदाज चुकत असावा असे मानसिक समाधान करत होतो. आता मात्र एक डांबरी रोड लागला. त्यावरून वाटचाल सुरु झाली. आता पाय दुखायला लागले होते आणि डांबरी रोड वर तर पाय जास्तच दुखतात म्हणून मिळेल तिथे गवतातून, मातीतून जात होतो. दिसणा-या प्रत्येकाला पावनखिंडीचे अंतर विचारत होतो. काहीही अंतर सांगत होते. एका शेळीवाल्या धनगराने मात्र पावनखिंड ४० किमी सांगितल्यावर  सगळ्यांनीच विचार करायला सुरुवात केली. sat-sun तंगड्या वर करून पडायचे सोडून इकडे यायची आपल्यालाच मस्ती हे प्रत्येकजण गमतीत का होईना पण बोलून दाखवू लागला.
        पाण्याने कपडे आणि सॅक चे वजन वाढले होते, सगळ्यांनी सॅक खाली ठेवल्या. बागड्याच्या फाटक्या शूज मुळे तो सर्वात मागे होता. अलक्या आणि उतक्या तसे त्याच्या बरोबर होतेच. चाल मंदावली असली तरी सगळे चालत होते. ४० किमी ऐकल्यावर मात्र धीर सुटायला लागला होता. आधीच सकाळपासून साधारणपणे ३०-३२ किमी अंतर तोडले होते. "पांढरपाणी" गांव काही लागायला तयार नव्हते. आम्ही टेकलो असलो तरी बागड्या मात्र हळू हळू मागून येऊन पुढे गेला.. जेमतेम एका वळणानंतर "वाडी आली रे कोणतीतरी" म्हणून ओरडला. लगेच सगळे उठून चालू लागलो. २००-३०० मीटर वरच घरं दिसायला लागली. १० मिनिटातच उजवीकडे जाणारा डांबरी रोड दिसला आणि चक्क बोर्ड "पावनखिंड ६ किमी"!! तो बोर्ड दिसल्यावर सगळे अत्यानंदाने अक्षरशः ओरडले. मीठ-मोहरी असती तर त्या बोर्डाची नक्की दृष्ट काढली असती. त्यावेळी मात्र त्या उत्साहवर्धक बोर्डाजवळ सगळ्यांनी आपापले फोटो काढून घेतले. ४ वाजून गेले होते. "पांढरपाणी" सापडले होते. म्हसवडे का कोणत्याशा वाडीत आणि नंतर भेटलेल्या चुकीचा रस्ता सांगणा-यांना मनसोक्त शिव्या घालून प्रचंड उत्साहात पावनखिंडीकडे वाटचाल सुरु केली. त्या बोर्डाने एवढा उत्साह आणला कि सगळे नव्या दमाने पावलं टाकायला लागले. पाऊण तासाने साडेपाचच्या सुमारास "पावनखिंड" लिहिलेला बाजीप्रभूंच्या चित्रासहीत एक बोर्ड उजवीकडे बघितला. थोड्याच अंतरावर २ जीप थांबलेल्या दिसल्या. "पावनखिंड" बघायला आलेल्या "पर्यटकांना" फिरवणा-या होत्या त्या.
            नुकतेच पावनखिंड बघून एक कुटुंब येत होते. त्यांनी अजून १६३ पाय-या आहेत असे सांगितले. जवळ-जवळ ३६-३७ किमी दिवसभरात तुडवल्यावर १६३ पाय-यांचे काहीच कौतुक नव्हते. २-४ फोटो काढून पावनखिंडीकडे निघालो. ६ वाजता पोचलो आणि शूज, सॅक सगळे उतरवून बाजींच्या समाधीवर डोके ठेवले.

धन्य जाहलो त्या समाधीवर डोके ठेऊन

            याचसाठी केला होता अट्टाहास.... धन्य जाहलो! वाचलेले, ऐकलेले इतिहासाचे वर्णन डोळ्यासमोरून झरझर सरकत होते. खिंडीत पन्नास एक फूट खोल धबधबा कोसळत होता. सिद्दी मसूद कुठून आला असेल, बाजी कुठून लढत असतील, मावळे कसे गनिमाला कापत असतील.. कल्पनाशक्ती सगळं डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करत होती. साधारणपणे १०-१२ तास बाजी लढले होते. आम्ही ते सगळे डोळ्यासमोरून नेले. पावणे सात वाजले होते. दिवस मावळतीला लागला होता. आम्ही पुढच्या गावाच्या दिशेने निघालो. पाय हलत नव्हता, बाजींना कल्पनाशक्तीने का होईना पण त्या कोसळत्या धबधब्याच्या आवाजांत बघायचे होते. जड अंतःकरणाने सहका-यांना निरोप देणारे महाराज बघायचे होते. पण निघालो. "भाततळी" नावाच्या गावात पोहोचलो. बागड्या आणि अलक्याला पण "जळू" ने रक्तदान करायला लावले होते. गावाच्या पाटीलांचे घर सापडले. शाळेच्या नवीन चाललेल्या बांधकामामुळे तिथे राहायची सोय होईल असे त्यांनी सांगितले. आम्ही शाळेत पोचल्या-पोचल्या "कुठे जळू नाही ना हो चिकटली राया" म्हणून सगळे चेक केले. नाही. कपडे बदलून खाद्यपदार्थ आणि पाणी आणण्यासाठी मी आणि प्रणव बाहेर पडणार इतक्यात सगळ्यांना माझ्या डाव्या पायावर रक्त दिसले. जळू रक्त पिऊन पडून गेली होती. मला पत्ताच लागला नव्हता!
            पाटीलांकडे जेवणाची व्यवस्था होण्याची चिन्ह नसल्याने त्यांच्या दुकानातून फरसाण विकत घेतले आणि पाण्याच्या बाटल्यात फुकट पाणी मिळवले. कोणीतरी कांदा आणलाच होता, मस्तपैकी भेळ केली. थोडी शिदोरी शिल्लक होतीच. भरपेट जेवलो आणि स्लीपिंग बॅग, मॅट पसरल्या. मी आडवा पडलो मात्र आणि एक जळू माझ्या पॅट वरून वर सरकत होती. तिची विल्हेवाट लावली. बाबासाहेब पुरंदरेंचे "शिवचरित्र" बागड्याचे ब-यापैकी तोंडपाठ होते. त्याने पावनखिंडीचा भाग म्हणून दाखवला. नंतर मात्र गाढ झोप लागली. मधेच जाग येत होती. बाहेर सोसाट्याच्या वारा होता. क्षणभरही वारा आणि पाऊस थांबत नव्हता. वाळत घातलेल्या जर्किन आणि कपड्यांची चिंता डोकावत होती पण कुणीही उठण्याच्या मनस्थितीतही नव्हते. २ दिवसांत अदमासे ६५ किमी अंतर तुडवले होते. सर्वांना शांत झोप लागली.
             रविवारी फक्त विशाळगड बघायचा होता. आमच्या दृष्टीने "ट्रेक" संपला होता कारण पुढचा प्रवास संपूर्ण डांबरी रस्ता असल्याने बस, जीप जे मिळेल त्या वाहनाने करायचा होता. ९ ची पहिली बस होती. सगळ्यांना साडेआठलाच बस आहे म्हणून सांगितल्याने थोडा अतिरिक्त वेळ मिळाला होता. सगळे समान आवरले . बसनेही फार वाट पाहायला लावली नाही. बसमध्ये घुसून विशाळगडाच्या वाटेला लागलो. कंडक्टरच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. Stop च्या पुढे गेल्यावर थांबवण्यासाठी कोणीतरी सांगितल्याने ***** अशी कचकचीत आईवरून शिवी त्याला घालून तेवढ्यावरच न थांबता "त्या मुर्खासारखे आणखी कोणी उतरायचे शिल्लक आहे का?" या अर्थाचे जे वाक्य बोलला त्यात कर्ता-कर्म-क्रियापद म्हणून एकेका नातेवाईकावरून शिवी होती. गांव अनुभवत साधारण तासाभरात १० च्या सुमारास विशाळगडाच्या पायथ्याशी पोचलो. विशाळगड चढायला १५-२० मिनिटंच लागतात असे कळले होते. उतक्याचा पाय प्रचंड दुखत असल्याने तो खालीच थांबणार होता, त्याच्या गुडघ्याजवळची शीर सरकली होती. वाटलं होतं तशी चढाई वगैरे काहीच करायची नव्हती. सरकारी कृपेने वरपर्यंत लोखंडी शिडीच होती. विशाळगडावर पोचलो मात्र आणि सुंदर भेळ खाल्ल्यावर शेवटचा शेंगदाणा नेमका खवट निघावा तसे झाले. विशाळगडाच्या आजूबाजूला सुंदर वातावरण असताना गडावर मात्र घाण होती.
             असो... सगळेच परत फिरलो, बसचीही वाट बघत बसलो नाही. वडापने मलकापूरला गेलो तिथून कोल्हापूर आणि मग पुणे. शिवाजीमहाराजांसाठी महत्वाचा ऐतिहासिक गड यापलीकडे विशाळगडाची आठवण काढवत नव्हती. सगळे मन व्यापले होते ते पावनखिंडीने... बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि प्राण आपल्या राजासाठी प्राण पणास लावणा-या त्या मावळ्यांनी... मन अजूनही पावनखिंडीतच होतं...
            "हरितात्या" जर आम्हाला पावनखिंडीत भेटले असते तर त्यांनी लढाईचे वर्णन केले असते... "अरे हे बाजीप्रभू महाराजांना म्हणाले कि 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे.. असे अनेक बाजी निर्माण होतील, महाराज नाही! थांबू नका, असे विशाळगडावर जा आणि विजयाची तोफ डागा. आम्ही या गनिमाला घोडखिंडीतून पुढे येऊ देत नाही.. महाराजांना हा अखेरचा मुजरा' आमच्या डोळ्यात पाणी होते, आम्ही महाराजांना मुजरा घातला आणि काय... तो सिद्दी फुल्या फुल्या आलाच अंगावर. आम्ही लढत होतो. गनीम मरत होता. बाजीची ढाल फुटली, ते दोन्ही हातात तलवारी घेऊन लढत होते. विजय समीप आला, पण घात झाला. गनिमाचा वार बाजींना लागला. आम्ही बाजींना उचलायला धावलो आणि काय सांगू तूला.. बाजी उठले आणि तलवारी सपासप चालू लागल्या. महाराजांच्या तोफेचा आवाज ऐकला आणि मगच बाजींनी प्राण सोडला..." पुराव्याने शाबित करेन!!!

माझी भ्रमंती - किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड (भाग १)

            अदमासे १६६०, मार्च ची सुरुवात. सिद्धी जौहर, फाजलखान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे यांनी पन्हाळ्याला वेढा दिला. फिरंगीही त्यांना मिळाले. तब्बल ४ महिन्यानंतर गंगाधरपंत सिद्दी जौहरकडे महाराजांचे "सपशेल शरणागतीचे" पत्र घेऊन गेले.
            पत्राची शाईपण वाळायची होती, १२ मार्च १६६०, पौर्णिमेच्या रात्री महाराज निघाले, सिद्दीच्या कचाट्यातून सुटून.. वीस कोसांवर असलेल्या विशाळगडाकडे. गजापूरची घोडखिंड आली, तीनशे मावळे त्या खिंडीत गनिमाला अडवून धरायला उभे राहिले. सिद्दी मसूद बाजींच्या सैन्याला भिडला तर आपलेच लोक, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव खाशा महाराजांच्याच मार्गात उभे राहिले.
           लढाईचे वर्णन केवळ अशक्य! महाराज सुर्व्यांची कोंडी फोडून गडावर पोचले आणि तोफ डागली. हातातली ढाल शत्रूच्या वारांनी फुटल्यावरही दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणा-या बाजीप्रभूंवर शत्रूचा घाव झाला. बाजी पडले... त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली...
               महाराजांना विशाळगडाकडे पोचायला ७ प्रहर लागले, म्हणजे २१ तास...
        इतिहासातील सोन्याचे पान ठरलेल्या या घटनेच्या मार्गावर आम्ही ८ जण (गम्मत म्हणूनही मावळे म्हणायचे धाडस मला होत नाहीये.) जाणार होतो. सगळी 'रसद' बरोबर घेऊन, कोणाशीही लुटूपुटूचीही लढाई न लढता, फक्त वाचलेले/ऐकलेले वर्णन कल्पनाशक्तीच्या जोरावर डोळ्यासमोर आणण्यासाठी, शिवराय, बाजीप्रभू अन् मावळे यांना मुजरा करण्यासाठी.. त्या पंढरीची वारी करण्यासाठी!
            भावना खरोखर इतक्या प्रखर असल्या तरी मर्यादा ओळखून असण्यामुळे आम्ही आमच्या level वर तयारी सुरु केली, sack, शिदोरी, नकाशे जय्यत तयारी केली. तारीख ठरली होती, २०-२१-२२ जुलै. पैकी २० ला शुक्रवार होता, हापिसाचे कामकाज डोक्यावर होतेच. जय्यत तयारीचाच भाग म्हणून हापीस-मित्राला आम्ही शुक्रवारी आजारी असल्याचा मेलही टाकायला सांगायला विसरलो नाही.
पन्हाळ्यावरील दाट धुक्यातील बाजींचा पुतळा 
            गुरुवारी रात्री समीर, सुबोध, प्रणव, मी, सुजय (बागड्या), अलोक (अलक्या), उत्कर्ष (उतक्या) आणि सिद्धार्थ असे ८ जण सह्याद्री एक्सप्रेस ने पुण्याहून निघालो. ओझे उतरवून ठेवल्यावर आमच्या कंपार्टमेंट मध्ये एकच माणूस वेगळा सापडला होता त्याला seat adjust करायची विनंती केली. पडत्या फळाची आज्ञा समजून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. गाडी बरोबर ६ वाजता कोल्हापूरला पोचली. दंतमार्जन वगैरे गाडीतच उरकून घेतलेले असल्याने चहारूपी अमृताचा आस्वाद घेतला आणि "पन्हाळ्याला कुणी आम्हा नेणार का?" असे विचारात वाहनाच्या शोधार्थ निघालो. वडापच्या कृपेने सव्वा ८ वाजता दोन्ही हातात तलवारी घेतलेल्या बाजींच्या पुतळ्याचे दर्शन झाले. आणि पुसाटी बुरुजावरून आम्ही सुरुवात केली. सुरुवात अर्थातच नेहमीपेक्षा वेगळी नव्हती. चाल झपाझप होती. दाट धुके आणि त्यामुळे सुंदर वातावरण असल्याने फोटो अपरिहार्य होतेच.
प्रवासातील पहिला मित्र

            नकाशावरचा पहिला टप्पा होता "मसाई देवीचे पठार". म्हाळुंगे गांव लगेचच गाठून ८:४० ला पठाराच्या दिशेने सुरुवात केली. पठारावर वातावरण अतिशयच सुंदर होते. हलकासा पाऊस, दाऽऽट धुके, हिरवगार गवत... त्यातच अनपेक्षितरित्या एका मित्राने दर्शन दिले. बहुतेक मण्यार असावी. तिनेही मला ४-५ फोटो घेऊ दिले. मग तिला सोडून आम्ही "मसाई देवीच्या" शोधार्थ चालू लागलो. पहिले देऊळ लागले. दुसरेही लागले. तिथे लोकांना पावनखिंड, विशाळगडला चाललो आहोत असे म्हटल्यावर "मग बस ने जायचे कि" असे म्हणून पूर्णपणे मुर्खात काढणारा कटाक्ष टाकला आणि "खोतवाडी" कडे जायचा रस्ता सांगितला.
        "हे कसे काय चालत जाणार पावनखिंडीत" असे प्रश्नार्थक भाव त्यांच्या चेह-यावर तसेच ठेऊन ठेऊन आम्ही निघालो. त्या धुक्यात ५-५० वाटांत चुकीची बरोब्बर पकडली. पण आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने सापडेल त्याला वाट विचारायची ठरलेलेच होते. गाई-गुरांमागे धावणा-या गावक-याला अत्यंत कष्टाने उतक्याने पकडले आणि मग आम्ही कसे भरकटलो, मग परत पन्हाळ्याच्या दिशेलाच कसे लागलो वगैरे वदल्यावर त्याने वाट सांगितली. त्याला मोबदला अपेक्षित होता याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याने वाट दाखवून, शिव्या घालून आणि खाऊन मोबदला मिळवला. वाट चुकल्याने मात्र अनपेक्षितरीत्या पांडवकालीन (?) लेण्यांचे दर्शन मात्र झाले.
            खोतवाडीच्या दिशेला लागल्यावर थोड्यावेळाने "कुंभारवाडा" लागला. मग खोतवाडी सापडली. दुपारचा एक-दीड वाजून गेला होता. सगळेच दमलो होतो. एका घराच्या बाहेर जरा वाईच टेकलो आणि मागे राहिलेल्या ३ साथीदारांची वाट बघू लागलो. प्रणव दादांनी गोळ्या-चॉकलेट बाहेर काढल्यावर तिथली एक चिमुरडी "गोळी गंऽऽऽ गोळी" हे इतके गोड म्हणाली कि कोणी-ना-कोणीतरी बाकीच्यांना ऐकवून दाखवत होते. जेवणासाठी "ओली नसलेली जागा" एवढ्याच अपेक्षित असलेल्या आम्हाला अनपेक्षित धक्का मिळाला. "गवळी" नावाचा एक इसम भेटला. त्यांनी त्यांच्या घरात जेवायला बसायची व्यवस्था केली. आमच्या बरोबरचा शिधा काढून जेवायला सुरुवात केली. आम्ही चक्क "अॅनाकोंडा" नावाचा इंग्लिश चित्रपट पाहत जेवलो. त्यावर न विचारता चहा, तो पण घरच्या म्हशीच्या दुधाचा... पठारावर भेटलेल्या माणसाच्या एकदम विरुद्ध हा माणूस. देऊ केलेले पैसे घ्यायलाच तयार नाही! वामकुक्षी साठी आम्हालाच वेळ नव्हता म्हणून नाहीतर त्यांने तीही सोय केली असती.
            ते सुख अनुभवून ३ वाजता "केळेवाडीच्या" रस्त्याला लागलो. वेग वाढला. धड डांबरी रस्ताही नाही आणि धड पायवाटही नाही अश्या अत्यंत वाईट, मोठ्ठी खडी (दगडच ते!) आणि चिखल अशा रस्त्यावरून केळेवाडीकडे पावलं पडत होती. त्यातच सुजय (म्हणजे बागडे) साहेबांचा शूज फाटल्याने त्याला वेळ लागत होता आणि अर्थात त्रासही होत होता. तसे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन वर उतरल्या-उतरल्याच सुबोधच्या सॅकचा बंद जखमी झाला होता. मसाईच्या पठारावरून उतरायच्या आधीच समीरच्या सॅकच्या एका बंदाने दम तोडल्याने सुई-दोरा काढावा लागला होता. पण सुईत दोरा ओवायलाच इतका वेळ लागला कि समीरने कशीतरी सॅक वापरण्याजोगी करून टाकली. बगड्याच्या सॅकने तर घरातून निघतानाच मान टाकल्याने दुस-या सॅकचा सहारा घ्यावा लागला होता. आणि त्यातच शूज फाटला... पण तसेच आम्ही केळेवाडीला येऊन पोचलो. त्या दिवसाचे साध्य होते "कापरेवाडी"! ते साध्य करण्यासाठी वाटेत १० जणांना विचारत विचारत चाललो होतो. त्यात मंडलाईवाडी आली, धनगरवाडी पण आली आणि पन्हाळ्यापासून जवळ-जवळ ३० किमी वर कापरेवाडी सापडली आणि तिथली शाळाही सापडली. ५ वाजता आम्ही कधीच शाळेत न जायला मिळाल्यासारखे त्या शाळेत घुसलो.
            नखशिखांत ओले होतो. सॅक चे वजन पाण्याने वाढले होते. अगदी सुरुवातीला चिखल चुकवत-चुकवत Socks मधे पाणी न शिरू द्यायच्या इराद्याने कसरत करत जाणारे आम्ही नंतर वाट्टेल तसे चिखल तुडवत चाललो होतो. एका वाडीतून ८-१० किलो चिखल दुस-या वाडीत पोचव, मग तिथे शूज साफ करून  त्या वाडीतला चिखल पुढच्या वाडीत असे करत-करत कापरेवाडीत पोचलो होतो. त्यामुळे कपडे बदलून स्लीपिंग मॅट शाळेत पसरून बसकण मारली. सर्वांचे वेगवेगळे भाग दुखत होते. पाय आणि सॅकमुळे खांदे common होते. माझी सॅक तर थोडी मोठी असती तर मी त्यात बसू शकलो असतो अशी होती. सर्वांगाला थोडा-थोडा वेळ जमिनीवर टेकू दिले. मग बरे वाटले. गावातल्याच "साळुंखे" नी आमच्या जेवणाची सोय करायचे कबुल केले. सुंदर चहाही प्यायलो. जेवणाचा बेत न्यारा होता. भात, तांदूळाची भाकरी आणि त्या गावात कसलीही भाजी नसताना घरी असलेला कांदा, वांगी आणि ३-४ कडधान्ये मिळून केलेली मस्त भाजी.. आमच्या बरोबर लोणचे होतेच. उत्तम जेवण झाल्यावर सकाळच्या चहाची आणि उरलेल्या भातामुळे फोडणीच्या भाताची व्यवस्था साळुंखेंकडेच लावून ढाराढूर झोपलो.