Tuesday, October 25, 2016

पिंपळा आणि धोडप II

धोडपकडे आता कूच करायचे होते. पण आता सगळा संसार वर घेऊन जाणे भाग होते, तंबू सकट. वेळ न घालवता गडाकडे सुरुवात केली. इथेही एक तळं लागलं. धोडप आडवा शंकराच्या पिंडी सारखा छान दिसत होता. पिंपळाची जसं “नेढं” ही खासियत, तशी धोडपची “डाईक”. डाईक म्हणजे लाव्हारसाने तयार झालेली बेसॉल्ट खडकापासुनाची भिंत. त्यात तयार झालेली नैसर्गिक खाच ही तर ह्या डाईकचे सौंदर्य अजूनच वाढवते. तळ्याच्या डावीकडून निघालो. धोडपची वाट पूर्ण मळलेली आहे आणि त्यातून हर्षल, निलेश आणि सुनील या आधी येऊन गेलेले होते. तसंही आम्हाला वर राहायचे होते, पोचायला अंधार होणार होता. वाटाड्या घेण्यात काहीच अर्थ नव्हता. पिंपळाने अर्धा-अधिक जीव शोषून घेतला होता त्यामुळे धोडप दमछाक करत होता. तरी जवळ जवळ पूर्ण सावलीतूनच चढत होतो. वेग चांगला होता तरी पाठीवरचं ओझं दमवत होतं. आज फक्त वर पोचायचं होतं, किल्ला उद्याच बघायचा होता. झपझप पावलं पडत होती. हर्षलचा खुणेचा दगड आला. इथून डावीकडचा रस्ता थोडा चढा आणि जवळचा आहे, तर उजवीकडे जाणारा रस्ता तुलनेने सोपा पण वळसा घालून जाणारा आहे. आम्ही डावीकडून जाणार होतो. दोन्ही रस्ते सोनारमाचीकडेच जातात.

हट्टी गावातून दिसणारा धोडप
५ वाजले होते. मागे हट्टी, धोडांबे गांव आणि परिसर सुंदर दिसत होता. वरती देवीचे दर्शन घ्यायला गेलेले गावकरी परतत होते. धोडप तसा offbeat किल्ला आहे, फक्त ट्रेकर आणि गावकरीच येतात. गावकरी आमची चौकशी करत होते, पुण्याहून खास इथे आलो ह्याचे आश्चर्य ते लपवत नव्हते. आता तशी सवयही झाली आहे, असे आश्चर्य बघायची. थोडा चढ, मग rock patch, परत जरा चढ, परत छोटा rock patch असं करत सोनारमाची वरच्या पहिल्या तळ्याजवळ आलो. इथे गणपतीची शेंदूर लावलेली मूर्तीही आहे. पाणी खळखळत होते. बाटलीत पाणी भरून घेतले. ते थंड पाणी प्यायले. सगळे मागेच होते. थोडं चढून गेल्यावर शासकीय विश्रामगृह आहे, लेबर शेड. हा किल्ला कळवण वनक्षेत्राच्या अखत्यारीत येतो. तिथेच सॅक टाकून उजवीकडे वाट न्याहाळायला गेलो तर चक्क २-४ लोक म्हशी घेऊन होते, धार काढायला तो बसतच होता. चक्क धारोष्ण दूध मिळणार होते, कोजागिरी मसाला दुधाने साजरी होणार होती. फुकट मागतोय की काय असे वाटून तो दुधाला नाही म्हणत होता, पण आम्ही विकत घेणार म्हटल्यावर तयार झाला. परत सॅकजवळ आलो तर पराग पोचतच होता. सगळे आले मग. कॅशियर हर्षल दूध आणायला गेला आणि आम्ही गडाकडे वर निघालो. डावीकडच्या सुदर अश्या दुमजली विहिरीत फोटोही काढले. सूर्य पलीकडे हळू हळू गायब होताना दिसत होता. त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. तर मागच्या बाजूला इखारा सुळक्यामागून कोजागिरीचा चंद्र डोकावू लागला होता. Rock Patch जवळ आलो तेव्हा ६ वाजून गेले होते. आता हा patch सुसह्य करण्यासाठी शिड्या बांधल्या आहेत. सूर्य बऱ्यापैकी गायब झाला होता तर चंद्र लालबुंद होत होता. कोजागिरीच्या चाहुलीने लाजलाही असावा ;)

इखारा सुळक्यामागून कोजागिरीचा चंद्र डोकावू लागला
शिडीकडून उजवीकडे पहिला दरवाजा गाठला. विराग आणि सुनील शिडीजवळ होते, तर हर्षल आणि निलेश दूध आणायला थांबल्याने अजून यायचे होते. मी आणि पराग पुढे चालत राहिलो, रस्ता साफ आणि स्पष्ट होता. पायऱ्या लागल्या, त्या सुंदर कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर फारसी भाषेतला एक शिलालेख बघायला मिळाला (भाषा काही फारशी कळली नाही! :P) लगेचच “L” आकाराचा दरवाजा लागला, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम रचना असलेला हा दरवाजा आहे. वर जाऊन बाकीच्यांची वाट बघू लागलो. अंधार झाला, Torch बाहेर काढली पण खालून काहीच हालचाल दिसत नव्हती. १५-२० मिनिटांनी ४ Torch दिसल्या सगळे वर आल्यावर जिथे मुक्काम करायचा होता तिकडे निघालो. आता पूर्ण अंधार झाला होता. चंद्राचा प्रकाश वाट दाखवत होता आणि डोक्यावरच्या torch चा प्रकाशझोत पायाखाली काही येत नाही न याची खात्री करून देत होता. नेहमी जी सुकलेली टाकी असे उल्लेख सापडतात ती सगळीच टाकी पाण्याने भरलेली दिसत होती. वाड्यांचे अवशेषही दिसत होते, पण हे सगळे उद्या बघायचे होते. आता गडाच्या डाव्या बाजूला सुरक्षा railing बांधलेले आहे. तिथून सरळ २-३ गुहा ओलांडून मुख्य गुहेजवळ आलो. तिथे आतमध्ये मंदिर आहे, गावकरी येतात आणि तिथे एक बुवाही राहतात म्हणून स्वच्छताही चांगली आहे. इथे शिव-पिंड, नंदी, पाण्याचे टाके, यज्ञकुंड गुहेबाहेर आहे, तर आतमध्ये देवीचे मंदिर, थोडी भांडी, झोपायची जागा वगैरे आहे. बुवा मात्र गायब होते आज. ८ वाजले असावेत. स्वयंपाक करायचा होता. पण त्यासाठी म्हणून साहित्य काढायला घेतले आणि सगळ्यांनी जे मिळेल ते खायला सुरुवात केली. पिंपळा वरून येताना १० एक भाकऱ्या आणल्या होत्या १-२ वगळता त्यांचा फडशा उडवला. लोणचं-सॉस आमच्याकडे होताच, पण चक्क भाकरी-फरसाणही आम्ही खाल्लं. पोटातली धगधगती आग शांत झाली आणि मग टेंट-चूल ह्या गोष्टींकडे वळलो. गुहेबाहेरच तंबू टाकावेत असे सुंदर वातावरण होते. पौर्णिमेचा चंद्र, मोकळा परिसर दूरवर दिसणारे शहर आणि झगझगणारे दिवे आम्हाला मोहात पडत होते पण या आधी निलेश-हर्षलला गुहेला लागूनच असलेल्या टाक्यांजवळ विंचवांचा अनुभव असल्याने तंबू गुहेमध्ये टाकले, इथेही उंदरांचा त्रास होतो असे ऐकून होतो. जागा ऐस-पैस होती. गुहेत साधारण ३०-४० जण राहू शकतील. त्यात बुवांनी झोपायला मस्त मातीचा पलंग करून ठेवला होता. शेजारीच गोलाकार लाकडं पेटवायला कुंडही केलेले आहे. गुहेतच आणखी एक खोली आहे. पण ह्यात बरीच पडझड झालेली असल्याने राहण्यायोग्य जागा नाही. पण चूल पेटवायला मस्त जागा आहे. देवघर म्हणजे मंदिर व्यवस्थित मोठे आहे. त्यात यथासांग पूजा झालेली देवीची मूर्ती होती आणि समोरच छानसे एक यज्ञकुंड.

एका बाजूला चुलही पेटली होती
गुहेबाहेर आता एका बाजूला चुलही पेटली होती, तीवर तांदूळ शिजत ठेवले. वारा बऱ्यापैकी असला तरी मोठ्या दगडाच्या आडोश्याने आमचा बिरबलाचा भात शिजत होता. तो झाल्यावर पिठल्याची सामुग्री बाहेर आली. पिठलं उत्तम तयार झालं. मध्येच चुलीत ४ कांदे भाजून घेतले. चुलीवरच छानपैकी पापड भाजले आणि सगळ्यांचा जठराग्नी परत पेटला. सगळ्याचा नैवेद्य दाखवला, देवीला नारळ वाढवला. पिठलं-भात, शिलकीतल्या भाकऱ्या, पापड, लोणचं, खवा-पोळी असा नामी बेत बघून त्यावर तुटून पडलो. खरपूस भाजून घेतलेला कांदा तर अप्रतिम. आता जठराग्नी शांत झाला. थोडी विश्रांती घेतली. विराग दादांनी आधीच जरा पडी मारून घेतलेली असल्याने दूध आटवायची धुरा ते सांभाळत होते. बाकी आम्ही पाठ टेकून घेतली. साडे अकराच्या सुमारास दूध तयार झाले. सुनील आणि निलेश तर पाठ टेकायला गेलेले पार साखर झोपेत गेले. बाकी आम्ही मसाला दूध पिऊन गुडूप झालो.

मसाला दूध
सकाळी ५ च्या आधीच जाग आली, पण कोणीच उठले नसल्याने पडून राहिलो. ५ ला दोन गजर वाजले आणि मी बाहेर पडलो. गजर वाजवणारे तो बंद करून परत झोपले पण आता शिकारीची वेळ होती. आधी विको वज्रदंती काढून तोंड खंगाळून घेतले. ताजं पाणी भरून शिकारीला गेलो. सूर्योदयाला वेळ होता, वाघ मारून आरामात परत आलो, कॅमेरा घेऊन इखाराच्या मागून वर येत असलेला तांबूस रंग टिपायला वाड्यांच्या अवशेषांजवळ गेलो. मनसोक्त फोटो काढून परत गुहेजवळ आलो तर सगळे शिकारीच्या मूडमध्ये होते. मी तंबू वगैरे आवरून सॅक तयार करून ठेवली. माझ्या समोरच माकडांनी गुहेबाहेर ठेवलेले कांदे वगैरे पळवलनी. आता पोर्टेबल स्टोव्ह पेटवून दूध गरम करायला ठेवले. सगळ्याच दुधात मसाला टाकलेला असल्याने चहा ऐवजी मसाला दूधच झाले. सगळी आवरा-आवरी करून डाईकच्या प्रसिद्ध खाचेकडे निघालो. सूर्य ढगाआड लपला होता. मनसोक्त फोटोसेशन झाले. आता सुभेदार हर्षल पुढे सरसावले. ॐ केशवाय नाम:, नारायणाय नाम: च्या उत्साहात त्याने सुरुवात केली. हा अचला, पसरलेला अहिवंत, सप्तशृंगी, समोर मार्कंड्या, अलीकडे रवळ्या-जावळ्या, कांचना, राजदेहेर, इंद्राई, कोल्देहेर, चांदवड, इकडे चौल्हेर, मोहनदरी, साल्हेर, सालोटा, कान्हेर, प्रेमागिरी... इखारा तर आमच्या समोरच होता. नाशिकचं ते चौफेर उधळलेलं सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात टिपून उतरवायला सुरुवात केली. अजून सोनारमाची बघायची होती. आणि आलेल्या shortcut ने न उतरता इखारा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने उतरायचे होते. सोनारमाचीवर १५ मिनिटांचा power break घेतला. सॅक तिथेच ठेवली. सुनीलच्या ligament ने दगा दिल्याने तो रखवालदार म्हणून तिथे थांबला. आम्ही रवळ्या-जावळ्या कडे जाणाऱ्या वाटेने गणपती मंदिराकडे निघालो. गणपतीचे छोटेसे मंदिर आहे, त्यात शेंदूर लावलेली मूर्ती आहे. पुढे झाडाखाली विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत, दत्ताचीही मूर्ती आहे, समोरच पादुकाही आहेत. डावीकडेच काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलेल्या शंकराच्या मंदिराची परत पडझड झाली आहे. शंकराची पिंड, नंदी बघितला. त्यामागेच एक पाण्याचे टाकेही आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही. आमच्यासमोर चक्क लहान-लहान ओढे वाहत असताना बाटली किंवा टाक्यातलं पाणी का प्या?

१.५-२ फूट डोकं उचलून तो आपला अजस्त्र देह लकबीने नागमोडी वळवत घेऊन जाऊ लागला
आम्हाला पुढे असलेला शेवटचा दरवाजा बघायचा होता. हीच वाट पुढे रवळ्या-जावळ्याकडे जाते. आमचं दैव जोरदार होतं. वाटेच्या उजव्या बाजूला लागूनच ८-९ फुटी “जनावर” संपूर्ण देह उलगडून उन खात पडलं होतं. आम्ही जवळून पुढे जातच होतो. “अजगर”! शब्द माझ्या तोंडून बाहेर पडताक्षणी सगळे थबकले. ते त्याचं रूप कॅमेरात साठवून घेण्याचा मोह कोणाला नाही आवरणार... माझ्या कॅमेराने नेमकी मान टाकली होती. म्हणून मोबाईल वर काम भागवत होतो. विराग आणि हर्षलने सुंदर फोटो टिपले. आमच्या हालचालीने त्याच्या साधनेत व्यत्यय आला. त्याने मान १८० अंशात वळवली, आम्हाला बघून घेतले. शेपटीचं टोक नागमोडी केलं. फोटोच्या नादात मी त्याच्या २-३ फुटांवर आलो होतो. अलगद ४ पावलं मागे आलो. अजगर थोडा शांत असतो, चटकन हल्ला करत नाही. पण तरीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यानेही हळू हळू पूर्ण शरीर १८० अंशात मागे वळवलं आणि घराकडे जाऊ लागला. १.५-२ फूट डोकं उचलून अजस्त्र देह लकबीने नागमोडी वळवत घेऊन जाऊ लागला. मी मस्त शुटींग घेतलं, पण दुर्दैव (वेंधळेपणा म्हणा किंवा नवीनच असलेल्या मोबाईलबद्दलचे अज्ञान) शुटींग बंद करायला गेलो तेव्हा खरं recording चालू झालं. मोबाईलच कपाळावर मारून घेणे बाकी होते.
८-९ फुटांचा तो अजस्त्र अजगर, Indian Rock Python, आम्ही मोकळ्या जंगलात प्रथमच पहात होतो. धोडपने surprise gift दिले होते. ट्रेक सार्थकी लागला होता.
आता शेवटचा दरवाजा बघितला, बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. तिथे २ गावकरी भेटले, त्यांना फोटो दाखवल्यावर धन्य झाले, साक्षात देवानेच दर्शन दिले आणि आमच्यामुळे त्यांनाही बघायला मिळाले म्हणून कृतकृत्य भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. आता उलट पावली सोनार माचीवर परत आलो. बॅगा घेतल्या आणि इखाराच्या रस्त्याला लागलो. वाटेत १-२ विहिरी लागल्या, त्यात अजून एका लहान सापाने निलेशला दर्शन दिले. पुढे कळवण दरवाज्यापाशी पोचलो. तिथे देवनागरीत शिलालेख कोरलेला आहे. दरवाजापासून पुढे १०० पावलं अंतरावरच उजवीकडे खाली उतरायला वाट आहे. ती लक्षात न येऊन तसेच पुढे गेले तर ही वाट एका आश्रमाकडे आणि इखाराकडे घेऊन जाते. आम्ही उजवीकडच्या वाटेने उतरणीला लागलो. धोपटमार्गच होता तो. झपझप खाली आलो. वाटेत टोमॅटोचं शेत लागलं, त्या काकांकडून काही ताजे टोमॅटो घेतले. ते नाकारत असले तरी त्याच्या हातावर पैसे टेकवले. गोळ्या-बिस्किटं घेऊन मुलांचा चेहरा चांगलाच खुलला. आता गाडीकडे परत आलो.
गावात “परदेशी” आडनावाची वस्ती आहे. सगळे मूळ राजस्थानी. मातृभाषा म्हणून हिंदी, पण पिढ्यान-पिढ्या इथेच स्थाईक म्हणून मराठीही उत्तम. शिवाजी महाराजांच्या काळापासून ह्यांचे पूर्वज इथे स्थिरावले. राजस्थान म्हणजे परदेशातून आलेले म्हणून परदेशी आडनाव लागले. ह्यांची भुईमुग, टोमॅटो, मका अशी बरीच शेती आहे.त्यांनी प्रेमाने दिलेला शेतातला ताजा मेवा नाकारता आला नाही. २ वाजत आले होते, अजून जेवणही बाकी होते. तडक निघून पहिला थांबा ठक्करबाजार, नाशिक. इथे सुनील बस साठी निघून गेला. “हेमंत पोखरणकर” उर्फ “हेम” ह्या वल्लीची इथे भेट झाली. पुढे नाशकातून बाहेर पडता पडता “संजय अमृतकर” उर्फ नाना ह्याही अशाच एका मोठ्या व्यक्तीमत्वाची भेट झाली. नाशिक-पुणे ह्या अत्यंत सुखदायक रस्त्याचा अनुभव घेत नागमोडी रीतीने आम्ही पुण्याकडे निघालो. इथे गडी चालवताना ड्रायव्हरचाही ट्रेक झाला असेल असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांना त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी सोडून हर्षलकडे पोचलो तेव्हा साडे बारा झाले होते. घरी यायला १ वाजला. सगळं समान तसंच ठेऊन झोपी गेलो.
             एक आठवडा कसातरी ढकलल्यावर पुढचा शनी-रवी अलिबाग. खांदेरी-उंदेरी जलदुर्ग माझी वाट बघत होते.

पिंपळा आणि धोडप I

“धोडप”... हा शब्द ऐकून समोरच्यांच्या तोंडून “काय?” असा प्रतिप्रश्न आला नाही तरच नवल! सिंहगड, राजगड ई. ई. प्रसिद्ध आहेत, पण धोडप? मुळात हा शब्दच सुधरत नाही. मग तो किल्ला आहे का गाव की अजून काही हे माहित असणे दूरच. पण हेच नांव इतिहासकारांना १६ व्या शतकात निजामशाहीत घेऊन जाते. मराठ्यांना हा किल्ला शिवाजींच्या कालखंडात घेता आला नव्हता, तो नानासाहेब पेशवे आणि निजाम यांच्या तहात स्वराज्यात मराठ्यांच्या ताब्यात आला. राघोबादादा यांच्यावर राजकीय आणि गृह-कलहातून माधवराव पेशव्यांनी हल्ला केला तो ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी. १८१८ साली इंग्रजांनी मराठा साम्राज्य बुडवलं आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पण हेच नांव ऐकून ट्रेकर एक तर हळहळतो, “अरे राहिलंय रे अजून तिकडे जायचं, जमलं नाही रे अजून...” किंवा त्यावरच्या जुन्या मोहिमेच्या आठवणीत सुखावतो. “अहाहा, काय दिसतो रे मस्त!” हे आपणहून बाहेर पडतेच आणि मग डोळ्यासमोर अवघा धोडप उभा राहतो, ते त्याचं देखणं रूप, “इखारा” सुळक्याच्यामागून पाहिलेला सूर्योदय किंवा मार्कंड्या (मार्कंडेय), रवळ्या-जावळ्याच्या मागे लुप्त होणारं लालबुंद सूर्यबिंब त्याला परत धोडप वर घेऊन जातं.
गेल्या महिन्यात नाशिकचे सुभेदार (निव्वळ मराठ्यांचं राज्य बुडून सध्या लोकशाही आल्याने हा IT कंपनीत मजुरी करणारा, नाहीतर नाशिकच्या सुभेदारीचा प्रबळ दावेदार), श्री श्री हर्षल कुलकर्णी ह्याने धोडपचा प्लान करतोय म्हणून सांगितलंन आणि मी तारखा मनात पक्क्या केल्या. सध्या मोकळा वळू असल्याने October चा एकही शनी-रवी वाया घालवायचा नाही म्हणून ठरवलंच होतं. १५-१६ October मनात पक्की झाली. असा कोजागिरीचा मुहूर्त वर्षातून एकदाच येतो आणि तो क्षुल्लक कारणासाठी मी फुकट नक्कीच घालवणार नव्हतो. ७ जण ठरले. अगदी निघेपर्यंत धाकधूक असतेच तसंच ४ दिवस आधी एक मेंबर गळाला. पण लगेच दुसऱ्या ट्रेकरने ही संधी साधलीन आणि १४ च्या रात्री धोडपसाठी सज्ज झालो. दसऱ्यापर्यंत पावसाने वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावूनही वेळेवर विश्रांती घेतलेली होती.
नेहमीप्रमाणे ठरलेले समान घेऊन मी रात्री ९ ला हर्षलकडे पोचलो. तवेरा हजर झाल्यावर लगेचच “मोsssरया” चा गजर करून निलेश, विराग, पराग आणि अजय यांना जमवत नाशिककडे मार्गस्थ झालो. नाशिकला सुनील येऊन मिळाला आणि ७ च्या दरम्याने सावरपाडा गावात दाखल झालो. रमेश स्वागतासाठी हजर होताच. त्याच्याकडेच पोहे झाले. ह्यावेळी त्याला यायला जमणार नव्हते पण त्यानेच एका गावकरी मामांची वाटाड्या म्हणून सोय लावून दिली होती. गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे बाकीचं समान गाडीतच ठेऊन, पाणी आणि थोडा चकणा घेऊन गडाकडे निघालो. मामा एकदम उत्साहात माहिती देत होते. अवघ्या १० मिनिटातच पिंपळाने नेत्रदीपक दर्शन दिले.

पिंपळाचे पाण्यातले अप्रतिम रूप
तलावाच्या डावीकडून मळलेल्या पायवाटेने लहानसा बंधारा, मग ओढा पार करून आवश्यक थांबे घेत तासाभरात पठारावर येऊन पोचलो. १०-१५ मिनिटांच्या रस्त्यात डोक्यावर घोंघावणाऱ्या माशांनी अक्षरशः वेडं केलं होतं. पिंपळा गावातूनही इथे वाट येते, पण ती मळलेली नाहीये. सावरपाडातून आम्ही आलेली वाट मात्र मळलेली होती. इथपर्यंत वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही पण पुढे मात्र मळलेली वाट शोधायला लागते, कारण अचानक वाट गायबही होते. २ वाटा नेढ्याकडे नेतात, समोरची वाट सरळ वर नेणारी पण घसरड आहे तर दुसरी थोडासा वळसा घालून मागच्या बाजूने वर नेणारी आहे. आम्ही दुसऱ्या वाटेने चाललो. वाट मधेच लुप्त होत होती, पण वाटाड्या मामा आम्हाला परत जागेवर आणत होते. वाढलेल्या गवतातून, झाडांच्या नैसर्गिक बोगद्यातून वाट काढत वर चढत होतो. वाट घाम काढत होती. Dehydration होऊ नये यासाठी थोडं-थोडं पाणी प्यावं लागत होतं. मागच्या बाजूला आता टकारा, साल्हेर-सालोटा स्पष्ट दिसत होते. मोठ्या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आसपास काही किल्ले बांधले जात असत, त्यांना प्रभावळीतले किल्ले म्हणत. पिंपळा हा साल्हेरच्या प्रभावळीतला किल्ला आहे. साल्हेर आपला परशुराम टोकावरून मान ताठ करून आमच्याकडे पाहत होता. आम्ही लक्ष परत पिंपळाकडे वळवलं. ते प्रसिद्ध नेढं दिसलं. गुहाही दिसली. झपाझप नेढ्यात पोचलो. शंभर-सव्वाशे पान सहज उठेल एवढ्या प्रचंड आकाराचं ते नेढं होतं. आणि शेजारी तेवढ्याच आकाराची गुहा. सह्याद्रीतली २ मोठी नेढी नाशिक बाळगून आहे. एक येताना दिसलेलं “मोहनदरीचं” नेढं आणि ज्यात आम्ही उभं होतो ते सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं पिंपळावरचं नेढं!

आम्ही उभं होतो ते सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं पिंपळावरचं नेढं!

साल्हेरवरचं परशुराम मंदिर अगदी स्पष्ट दिसत होतं. गेल्याच वर्षी साल्हेर वर गेलो होतो तेव्हा ऐकलेली कथा आठवली. साल्हेरवरून भगवान परशुरामांनी जेव्हा समुद्र मागे हटवून जमीन निर्माण करण्यासाठी बाण मारला तेव्हा एका डोंगराला मोठं खिंडार करून तो आरपार गेला. तो डोंगर म्हणजे आम्ही उभे असलेला पिंपळा किल्ला आणि ते खिंडार म्हणजे सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं नेढं, ही भगवान परशुरामांची कृपाच!
नेढ्याच्या डावीकडून घळीतून वरती लहानसा Rock Patch पार केला की टाकी असलेल्या टोकावर पोचतो. ह्या टाक्यांना जिवंत झरे नाहीत. बहुतांशी लोकांना कोरडीच बघायला मिळणारी ही टाकी पूर्णपणे भरलेली होती, यंदा पाऊसच जोरदार झाला होता. सभोवार नजर टाकली तर नाशिक आपलं सौंदर्य उधळत होता. मागच्या बाजूने टकारा, साल्हेर-सालोटा, मागे हनुमान डोंगर, आडवाच्या आडवा हरगड, शेजारीच मुल्हेर-मोरा, मांगी-तुंगी ची टोकं, दीर-भावजय (होय, ही नांवं आहेत डोंगरांची, सुभेदार हर्षलची कृपा!), चौल्हेर, कोथमीऱ्या तर दुसऱ्या बाजूला कांचना, हंड्या, लेकुरवाळी, इखारा, धोडप, रवळ्या-जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी, मोहनदर, अहिवंत, अचला.... हर्षल नुसती नांवं फेकत होता, आम्ही पटापट समोरचा डोंगर आणि नांव घोळवत होतो. त्याच्या बिल्डींग जवळच्या ४ बिल्डींगची नावंही तो सांगू शकणार नाही ह्याची खात्री आहे मला पण नाशिकच्या प्रेमात हा पडला होता आणि आम्हालाही खेचत होता. आम्हीही खेचलो गेलोच होतो. पुण्या-मुंबई जवळचे ४ किल्ले फिरल्यावर ट्रेकर म्हणवून घेणारा नुसती नावंच ऐकून खाली बसेल नाशिकातली.
तर.. फोटो वगैरे झाले. लवकर खाली उतरणे भाग होते म्हणून पटकन गुहा बघायला उतरलो.एके ठिकाणी वरच्या बाजूला ४-५ फूट भुयार खोदलेले आहे, त्याचा उद्देश समजत नाही. ते आरपार नाही. गुहेच्या बाहेरच्या बाजूला एक भुयार आहे, ते मात्र आरपार आहे.

पठार आणि मागे पिंपळा
आता झपाझप खाली उतरू लागलो. वाट चुकण्याची थोडी शक्यता आहेच पठारापर्यंत तरी. वाटेत एक छोटासा ब्रेक झाला तोंडात टाकण्यासाठी, मग खाली उतरलो. १ वाजला होता. रमेश आमची वाटच बघत होता. जेवण तयार होते. त्यांची स्वतःचीच कांद्याची शेती, मिरच्या, बाजरी, भात. सगळं शेतातलं ताजं अन्न आमच्यासमोर होतं. सगळ्यांनीच ताव मारला. रात्रीच्या स्वयंपाकासाठी त्यांच्याकडूनच थोडे कांदे घेऊन “हट्टी” गावाकडे निघालो.
तरी २ वाजून गेले निघायलाच. वाटेत एक छोटे संगमनेर लागते. हे संगमनेर वेगळे. हट्टी गावात पोचायलाच सव्वा ४ झाले. इथल्या गावकऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने दुधाची सोय झाली नव्हती. वाटेतही मिळाले नव्हते, त्यामुळे कोजागिरीला मसाला दूध नाही म्हणून जरा Mood-off झालाच. अगदीच दूध-पावडर होतीच वेळेला-केळं म्हणून.

Wednesday, August 31, 2016

किल्ले सोनगिरी आणि सोंडाई - II

४ वाजले होते, सोंडेवाडी गवत पोचलो. सोनगिरी उतरण्यातच सगळा वेळ निघून गेला होता त्यामुळे अंधार पडायला थोडाच वेळ शिल्लक होता. तसाही सकाळपासून सूर्य दिसलाच नव्हता. सोंडाई खूप लहान असल्याने तासाभरात वर पोचणे अपेक्षित होते. पण आता वाट चुकणे परवडणारे नव्हते. माहिती वाचलेली असली तरी रिस्क नको म्हणून वाटाड्या घ्यावे असे सर्वांच्याच मनात होते. त्यातून सोंडेवाडीत एकूणच कोणी वाट सांगेल असे वाटत नव्हते. कारण वाटाड्या पाहिजे का असे विचारत एक म्हतारबुआ आले. दारूचा वास येतंच होता. त्यांचा मुलगाही तेच विचारत आला, दारूचा भपकारा घेऊनच. त्याचा १०-१२ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरही तोच प्रश्न दिसत होता, मात्र त्याने प्यायलेली दिसत नव्हती एवढंच.. तेवढ्यात एक गृप गडावरून खाली येताना दिसला, तेही सगळे भिजले होते. त्यांच्यातल्या मुलींना कपडे बदलायला जागा देण्याचेही ते म्हातारा आणि मुलगा पैसे मागत होते. एकंदरीतच गावकरी पैसे काढू दिसत होते. गाडीवर लक्ष ठेवण्याचेही ते पैसे मागू लागले. त्या गृपने वर वाट चुकण्याची जराशी शक्यता असल्याचे संगीतलनी. सव्वा चार झालेच होते. नाईलाज होता, वाटाड्या म्हणून त्या माणसाला बरोबर घ्यावे लागले. त्याचा १०-१२ वर्षाचा पोरगाही बरोबर आला.
कातळात खोदलेली २ पाण्याची जोडटाकं

गावातून जी धोपटवाट गडाकडे जाण्यासाठी निघते, ती वाट तशीच पुढे चांगेवाडीला जाते. तिथे एका ठिकाणी गडाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते... चुकण्याची ही पहिली आणि सुरुवात केल्यापासून ५ मिनिटावरची जागा. तिथून उजवीकडे वळल्यावर १० मिनिटांत समोर, उजवी आणि डावीकडे परत वाटा लागतात. धोपट वाट सरळ जाते, पण गडाकडे जाण्यासाठी डावीकडे वळावे. तिथे एका झाडावर तसा बोर्डही आहे. ही चुकण्याची दुसरी जागा. गावापासून जेमतेम १० मिनिटात ह्या दोन्ही जागांवर न चुकता गडाकडे लागले की पुढे मात्र चुकण्यासारख्या जागा नाहीत. वाट रुळलेली आहे. गावाची सोंडाई देवीच गडावर असल्याने गावकरी नेमाने जात असावेत. दसऱ्याच्या दरम्याने उत्सवही असतो वरती. वर एक पठार लागले जिथे वावर्ली गावातून येणारा रस्ता मिळतो. इथून वर जाणाऱ्या पायऱ्या दुसऱ्या पठाराकडे घेऊन जातात. इथे कातळात खोदलेली २ पाण्याची जोडटाकं आहेत. शेजारूनच वर जाणाऱ्या पायऱ्याही लागल्या. त्या चढून गेल्यावर रॉकपॅच आहे. त्यात चढण्यासाठी व्यवस्थित खोबणी आहेत, त्याला शेंदुरही लागलेला आहे. इथून पुढे चप्पल/बूट काढून पुढे जावे, गावकऱ्यांची तशी श्रद्धा आहे. दारू डोक्यात असूनही त्याने ते न विसरता सांगितलेन. तो पॅच चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहेतर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. पूर्वी हाही रॉकपॅच चढून जावे लागत असे परंतु नंतर तो ढासळला आणि शिडी इथे बसवली गेली. शिडी चढल्यावर उजव्या बाजूला पाण्याचं टाकं आहे, त्यात कोरलेले २ दगडी खांबही आहेत. ह्या सगळ्या टप्प्यात आमचे काही गडी सावकाशपणे आले, उंचीचीही भीती होती आणि थोडे नाही म्हटलं तरी थकलेलेही होतोच. पण सुरक्षा महत्वाची होती.

रॉकपॅच


लोखंडी शिडी

पाण्याच्या टाक्यावरून पुढे चढून आले की लगेच सोंडाई देवीच्या मूर्ती आहेत. घंटा, समई वगैरेही आहेच. गडमाथा आला होता. बाकी ह्याही गडावर काही नाही. पलीकडे एक दरवाजा आहे पण पावसाळ्यात तिथे जाता येणार नव्हते. प्रयत्न करून पहावा तर तसेही पायात चपला/बूट काहीही नव्हते म्हणून परत फिरलो. देवीला नमस्कार करून दारू पिऊन इथे कोणी येणे चांगले नाहीहे आडून सुचवल्यावर आमची देवी चांगली आहे, पिऊन आलेले चालतेहे उत्तर आले :D मुकाट्याने शिडी, रॉकपॅच परत सावधपणे, इथे पाय ठेव, तिकडे जोर देऊ नको वगैरे करत उतरलो. बुटातले पाणी काढून टाकले, मोजेही पिळून घेतले, ते पायांत सरकवून उतरणीला लागलो. लहान धबधबे आमचे पाय धूत होते. वाट सोपी होती. खुणा लक्षात ठेवत पायथ्याशी आलो. संजुभाई गाडीजवळच थांबले होते. आम्हाला बघून त्यांना हायसं वाटलं कारण म्हातारा-म्हातारीने त्यांना चांगलंच सतावलं होतं. गाडीकडे लक्ष ठेवण्याचे पैसे मागत वर गाडी फोडण्याचीही भाषा त्यांच्या तोंडी होती. संजूभाईचे आकारमान बघता प्रत्यक्षात ते शक्य झाले नसते पण तरीही ही भाषा तोंडी असणे चांगले हिमतीचे होते, कदाचित दारू ती हिम्मत देत असावी. पैशासाठी गावकरी किती सरावलेले आहेत हे दिसत होते. कदाचित सगळे तसे नसतीलही पण ह्या कुटुंबाला आवरायला मात्र कोणीच येत नव्हते. त्यामुळे गावच बदनाम झाले. ह्या किल्ल्यावर वाटाड्याची काहीच गरज नाही पण पहिल्या २ चुका होण्याच्या जागा लक्षात ठेवाव्यात.

संध्याकाळी ७ वाजता दुपाराजे जेवण हाणताना

दुपारचे जेवण-खाण काहीच झाले नव्हते. उडूप्याच्या इडल्यांवरच तग धरून होतो आणि खाकरा. गावातून लवकर सटकायचं होतं. ओलेतेच गाडीत बसलो. वाटेत मोरबे धरणाचा जलाशय लागतो त्या ठिकाणी गाडी थांबली. पोळ्या, ठेचा, सॉस, पराठा, चटणी सगळे बाहेर आले. गाडीच्या बॉनेटवरच त्याचा सगळ्यांनी अक्षरशः फडशा पडला. सॉस, चटणी चाटून पुसून साफ! सुकामेवाही उडवला. फक्त चहासाठी ब्रेक घ्यायचा ठरवून गाडी दामटली. चौकला जाऊन हायवेला जाणे बरे पडले असते असे वाटायला लागले कारण हालगावाकडून खोपोलीकडे जाणारा हा रस्ता खरोखरच हालहाल करणारा होता. सफारी होती म्हणून तग धरला, लहान-सहान गाड्यांचे ते काम नव्हतेच. सरळ घाटात येऊन चहा-वडापावच्या गाडीजवळ येऊन थांबलो. तो बंदच करत होता पण सुदैवाने आमची तहान भागवण्यापुरता थांबला. मग मात्र सुसाट लागलो. (पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर हल्ली ६० चा वेगही सुसाटच म्हणावा लागतो.) आकुर्डीत भाईंच्या घरी चहा झाला आणि आशिष कडे पोचलो. माझी सुझुकी वाटच बघत होती, तिच्या बरोबर घरी परत आलो तेव्हा साडे अकरा वाजून गेले होते.
जवळ जवळ १४-१५ तास वागवत असलेले ओले चिंब कपडे बदलले आणि मस्त पांघरुणात शिरलो. एक आठवडा कसाबसा ढकलायचा आणि पुढच्या विकेंडला रत्नागिरीला माझ्या घरी गणपती माझी वाट बघतोय ह्या विचारानेच पटकन झोप लागली!!!

किल्ले सोनगिरी आणि सोंडाई - I

गेले बरेच दिवस भटकंती बंदच ठेवली होती. २७ ऑगस्ट, शनिवार हा दिवस मोकळा मिळण्याची चाहूल लागताच तो सत्कारणी लावायच्या प्रयत्नात होतो. पूर्वी ट्रेक म्हटलं की ठराविक, मर्यादित मंडळी डोळ्यासमोर यायची. पण आता खूप गृप झालेत. २ गृप तर नोंदणीकृत झालेत आणि मित्रमंडळी आहेतच... २७ ला नंबर लागता तो आशिष, संजुभाई, केतकी, रव्या ह्या ग्रुपचा. ह्यावेळी आणखी २ नवीन मित्रही होते, मृण्मयी आणि अनुप.
१-२ लोकांचे रद्द होणे वगैरे नेहमीच्या गोष्टी झाल्यावर आशिष साहेब आजारी पडले. ट्रेकला जायचं असलं की अश्यावेळी घरचे जेवढी काळजी करत नाहीत तेवढी गृप मधली इतर मंडळी करतात. पण सगळ्यांवर मात करत शुक्रवारी रात्री ११ नंतर प्लान नक्की झाला आणि ठरल्याप्रमाणे आशिषकडे सकाळी सव्वापाचला पोचलो. रव्या, अनुप, केतकी ६ पर्यंत पोचले आणि वाटेत मृण्मयीला घेऊन संजुभाईकडे आकुर्डीला पोचलो. सफारी आमची वाटच बघत होती. समान रचले आणि जुन्या पुणे-मुंबई हायवेला लागलो. गाडीलाही आता सवय झाली आहे, परंपरा असल्याप्रमाणे उडुपी हॉटेल शेजारी गाडी मंदावते. पोटातून आवाज यायला सुरुवात होते. भूका भागवण्याबरोबर लोकांना फोटोही काढल्याशिवाय चैन पडत नाही किंबहुना फोटोशिवाय खाणे किमान शनिवार-रविवारचे तरी होत नाही ह्याची आता तिथल्या वाढप्यांना सवय लागून गेली असेल कारण चहा घेऊन ट्रे तसाच हातात धरून तोंडावर छद्मी हास्य घेऊन तो वाढपी तसाच फोटो काढून व्हायची वाट बघत थांबला होता. आमच्या विचित्र मागण्या त्याने बरोबर लक्षात ठेऊन ईडली, मेदुवडा बरोबर पुढ्यात आणून ठेवलेन. कपमधून ते अमृत पोटात गेल्यावर सफारी पुन्हा खोपोली रस्त्याला लागली. पुण्यातून निघायला उशीर झाल्याची चुटपुट मनात होतीच. पावसाळा असल्याने उन्हाची काळजी तरी नव्हती. खोपोली-कर्जत आणि मग दहिवली रस्त्याने श्रीराम पुलावरून उल्हास नदी ओलांडून अवळस, नेवाली गावात आलो. खरं तर पुढे मोहिली गावात येऊन पोचलो होतो, तिथे मोहिली मिडो रेसोर्ट जवळूनही एक वाट सोनगिरी किल्ल्यावर जाते. ह्या किल्ल्यावर तसे पळसधरी रेल्वे स्टेशन वर उतरून बोगद्याच्या बाजूने केबिन जवळूनही जाता येते. पण गडाच्या पायथ्याचे गाव “नेवाली” आहे. रस्त्यांची माहिती गावकऱ्यांना विचारावी म्हणून थांबलो. एका गोठ्यातून शेण-गोठा करून गावकरी डोकावत होता त्याला माहिती विचारल्यावर “तुम्ही जाणार? किल्ल्यावर? इतक्या लांब? जमेल का जायला?” असे ४-५ प्रश्न तोंडावर फेकून त्याने रेसोर्टजवळून जाणाऱ्या रस्त्यपेक्षा नेवाली गावातून जवळ पडेल असे सांगितलेन. आम्ही वरपर्यंत जाणार हे त्याच्या पचनी पडतच नव्हते हे त्याने ज्या रीतीने हातातला शेणाचा पो गोठ्यात आपटलान त्यावरून लक्षात आले. “करतो प्रयत्न जायचा” असे त्याला सांगून हिय्या करून आम्ही नेवाली गावातून गडाकडे जायला निघालो.
संततधार पाऊस, वाढलेले गवत अश्यातून गावकऱ्यांनी ४ वेळा वाट दाखवलनी. “नक्की कोणती वाट” असे विचारत जरी होतो तरी मुळात एकही वाट दिसत नसल्याने “कोणती वाट धरायची” हा प्रश्नच चुकीचा ठरत होता. ९:३० वाजले होते तरी पूर्ण धुकं, त्यात २० फुटावरचंही काही दिसेना. वर गडाकडे लक्ष ठेऊन चालत रहायचं म्हटलं तरी किल्लाच काय, वर काहीच दिसत नव्हतं. पायवाटे सदृश काही दिसत होतं त्यावरून चढाईला सुरुवात केली तर दर १० फुटांवर कबरीसाठी खणतात तेवढ्या आकाराचा खड्डा लागत होता. तरीही तीच वाट धरून निघालो. वाटेत खेकडेच खेकडे होते. पाण्याच्या बाटल्या फक्त बरोबर घेतल्या होत्या पण पाण्याची गरजच भासत नव्हती जास्त. पाऊस चालूच होता, आम्ही भिजत होतो, तहान लागतच नव्हती. मातीचा रंग लालसर दिसत होता, तो रंगच मला सुखावत होता. कोकणातली लाल माती! रत्नागिरी एवढी लाल आणि तशी नसली तरी ही चिकणमाती नक्कीच नव्हती. त्यामुळे चिखलाने पाय भरायची भीती नव्हती, पण बुटात केव्हाच पाणी शिरले होते आणि वजन पाव-पाव किलोने वाढले होते. जागोजागी सायाची (सागवान) झाडं दिसत होती, पायाशी टाकळा, आघाडा आणि पावसाळी फुलझाडं घुटमळत होती. काढलेल्या माहितीवरून २ टेकड्या पार करून एक पठार आणि मग तास-सव्वा तासात कातळकडा लागणे अपेक्षित होते. पण पठार लागायलाच तास होऊन गेला होता.

पठार लागायलाच तास होऊन गेला होता. (फोटो: आशिष)

धुक्यात गडप झालेला किल्ला/डोंगर/टेकडी काहीतरी दिसत होते, दिशा तरी बरोबर होती.  पायवाट तिकडेच घेऊन जात होती. लहान लहान ओहोळ आमचे पाय धुवून जात होते. बूट पाण्याने भरत होते परत मातीत जात होते. कचऱ्याची फुलं आता खूप दिसायला लागली. हे झाड अगदी हळदी सारखे दिसते, फुल सुद्धा!

कातळ उजवीकडे ठेवून कडेने घळीतून जाणारी वाट
आता एकपेक्षा जास्त वाटा दिसत होत्या आणि कोणती वाट कुठे जाते ह्याचा काहीच अंदाज लागत नव्हता. साधारण वरच्या बाजूला नेणारी वाट पकडून जात होतो आणि अचानक एक कातळ समोर आला. डावीकडे आणि उजवीकडे, दोन्हीकडे वाट दिसत होती. उजवीकडची वाट जास्त ठळक दिसत होती पण वाचून आल्या प्रमाणे कातळकडा उजवीकडे ठेऊन डावीकडची वाट धरली. आता घळीतून वर जायचे होते म्हणजे डोंगर आणि गडाच्या बेचक्यात पोचणार होतो. पावणे २ तास झाले होते. ५ मिनिटातच “Y” वाय आकाराचा रस्ता लागला वाय च्या उजवीकडे एक कडा दिसत होता, चढता येईल असं वाटत असल्यानं मी आणि रव्या तिकडे प्रयत्न करायला गेलो. बाकीच्यांना थांबवून ठेवलं होतं. मी ८०% कडा चढून गेलो आणि डावीकडच्या हाताने धरलेलं गवत उपटलं गेलं, पाय घसरला, अजून वर शक्य नाही हे लक्षात घेऊन खाली उतरू लागलो. वाय च्या डावीकडे मृण्मयीला जाऊन बघायला सांगितले आणि रव्या, आशिष उजवीकडे असलेल्या कड्यावर प्रयत्न करू लागले. ते थोडे चढून गेलेही पण पुढे रस्ताच नसल्याचे पक्के समजले. मृण्मयीही डाव्या बाजूला थोडी वाट आहे पण पुढे दगड पडून रस्ता संपलाय असे सांगत आली. आशिष आणि रव्या यांनी खाली उतरायचे ठरवले आणि  मी डावीकडे परत एकदा बघायला गेलो कारण दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. डावीकडे वाट सापडायलाच हवी होती. पडलेले दगड ओलांडून पलीकडे गेलो. असलीच तर वरच्या बाजूला एक वाट असू शकते असे दिसत होते, पण खात्री नव्हती. वर जाऊनच खात्री करायला पाहिजे होती पण आवाजाच्या अंतरावर बाकीच्यांना बोलावणे गरजेचे होते. कोणी एकाने येऊन ह्या जागी थांबून चालणार होते पण त्यांना वाट सापडली असे पुसटसे ऐकू गेल्याने सगळेच आले. हळू हळू आवाजाच्या अंतरावर सगळ्यांनी रहात वर चढू लागलो. कित्येक दिवसांत कोणी फिरकले नसावे, गवत वाढले होते, बाजुलाही सारलेले दिसत नव्हते त्यामुळे अजूनही वाट आहे की नाही ह्याची खात्री नव्हती. नुसताच अंदाज बांधत पुढे जात होतो. एका क्षणी “सापडली वाट” तर लगेच “संपली, ही वाट नव्हतीच बहुतेक” अशी परिस्तिथी होत होती. एक थर्माकोलची पांढरी डिश दिसली आणि नेहमी ज्या गोष्टीचा राग येतो त्या कोणाच्या तरी कचरा फेकण्याच्या प्रवृत्तीचा थोडासा फायदा झाल्याचा आनंदही झाला. पण तरीही डिश त्या ठिकाणी वरून हवेतून उडूनही आलेली असू शकते म्हणून वाट नक्की होत नव्हती. समोर बेचके असल्याचे वाटत होते पण आता चक्क मला कंटाळा आला होता. एक उंच पायरी असावी असा दगड होता. मला २ ढांगा लागल्या असत्या तो पार करायला, पण सरळ मला कंटाळा आल्याचे सांगून आशिष जरा उंच असल्याने त्याला जायला सांगितले. अंदाज खरा ठरला होता. तो बेचक्यात पोचला होता. वाट सापडली होती, खात्रीची. पण खूप निसरड्या वाटेवरून सावकाश एकेकाला मी थांबलेल्या जागेपर्यंत येऊ दिले. १२ वाजले होते. घड्याळात! आमचे तसे आधीच वाजले होते म्हणायला हरकत नव्हती. पण खरे तीन-तेरा तर नंतर वाजायचे होते ह्याची काही कल्पनाच नव्हती. डावीकडे डोंगराकडे जाणारी वाट आणि उजवीकडे चक्क पायऱ्या (म्हणजे पायऱ्या सदृश वाट) बघून आनंद झाला होता.

बेचक्यातून उजवीकडे गड-माथ्यावर जाणारी वाट
समोर एक उतरणारी वाट दिसत होती. उतरताना तिकडून उतरू असे ठरवून उजवीकडे गड-माथ्यावर जाण्यासाठी निघालो. एक टाकं दिसलं, पाणी पिण्यायोग्य दिसत नव्हतं. वाट मात्र चांगली मळलेली दिसत होती. उंच गवतातून जाणारी ती वाट आम्हाला ध्वजाकडे घेऊन गेली. गडावर बघायला एवढेच दिसत होते, अजून जागाच नव्हती आणि वाटही. अडीच तास चढून फक्त एक ध्वज आणि १-२ टाकी दिसली होती. इथे असणारे वाड्यांचे चौथरे गवतात बुडून गेले होते. इथून बोरघाटाचे दृश्य आम्ही फक्त कल्पनेत बघत होतो. राजमाची, ढाक, भिवगड, प्रबळगड दिसतात हे फक्त वाचले होते, दिसत होते ते फक्त धुके. फोटो काढणार तरी कशाचे... परत उतरून बेचक्यात आलो. पलीकडच्या डोंगरावर चढूनही गेलो, पण बरेच अंतर जाऊनही दिसला झाडावर बांधलेला एक ध्वज आणि धुक्यातून हरवणारी एक वाट!!
आता बेचक्यातून नवीन वाटेने उतरायचं ठरवलं. थोडे खाली गेलोही पण वाट गुरांची दिसत होती. आणि असलीच तरी ती दुसऱ्याच गावात उतरणारीही असू शकत होती. किंवा पळसदरी वरून वर येणाऱ्या वाटेलाही मिळण्याची शक्यता होती. परत आल्या वाटेनेच उतरायचे ठरवले. येताना मुद्दामच वाटेतली झाडे बाजूला दाबून ठेवत, गवत मोडत आलो होतो त्याने जाताना वाट सापडायला अडचण आली नाही. कातळकड्यापर्यंत येऊन पोचलोही. माणसांचा आवाज ऐकू यायला लागला म्हणून कानोसा घेतला तर कातळकड्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाटेकडून २ जण आले. ते मुंबईहून पळसदरीवरून आले होते. २ तास चालत येऊन इथे पोचले होते. आम्ही गवत बाजूला सारून साफ केलेल्या वाटेचा त्यांना फायदा होणार होता, तसंच त्यांना वाटही नीट समजावून सांगितली. आल्या वाटेने आम्ही उतरायला चालू केले. खुणा सापडत होत्या. अचानक एके ठिकाणी २ वाटा दिसल्या. एक वाट यु टर्न घेऊन उजवीकडे जात होती आणि एक सरळ. दोन्ही ओळखीच्या वाटत नव्हत्या. सरळ वाटेने जायचे ठरवले. पुढे एक धबधबा लागला जो अजिबातच ओळखीचा वाटत नव्हता. परत फिरलो. यु टर्न जवळ येऊन दुसऱ्या वाटेला लागलो. आता अजून २ वाटा फुटल्या. डावीकडच्या वाटेला लागलो तर एक खड्डा आणि वाट संपली. परत फिरून उजवीकडच्या वाटेला लागलो. ही वाट खालच्या बाजूला जात होती पण गाव काही दिसत नव्हते, खड्डे दिसत होते पण ओळखीचे वाटत नव्हते. रेल्वेचे रूळ दिसायला लागले, बोगदाही दिसला. वाट नक्कीच गावाकडे न जाता गेलीच तर रुळांकडे घेऊन जाणार होती. खाली एक पूल दिसला तिथे २-४ पोरही दिसली पण आवाज ऐकू जाणे शक्य नव्हते, प्रयत्न करून बघितल्यावर तो सोडून दिला. रस्ता चुकल्याचे केव्हाच नक्की झाले होते. उजवीकडे एक गाव दिसत होते, कोणते ते कळायला मार्ग नव्हता. वाट तर अगदी संपलीच होती, ना रुळाकडे घेऊन जात होती ना कोणत्याही गावाकडे. वाटा फक्त खड्डे खणायला तात्पुरत्या केल्या असाव्यात असे दिसत होते. आता कोणत्याही गावात का होईना पण पोचले पाहिजे हे लक्षात आले. सव्वादोन वाजून गेले होते. असंख्य वाटा दिसत होत्या. पण त्या खड्डयापर्यंत नेऊन गायब होत होत्या. चढताना खुण म्हणून चांगले वाटणारे खड्डे आता चांगलेच त्रासदायक ठरायला लागले होते. फक्त वाटा, खड्डे आणि काहीच नाही अशी अवस्था आल्यावर चांगलेच अडकल्याचे कळत होते. परत फिरायचे हे नक्की झाले, पर्यायच नव्हता. सरळ सगळे एके ठिकाणी येऊन दिशांचा अंदाज घ्यायला लागलो. अनुभवी डोकी विचार करायला लागली. उलटे फिरलोच होतो, डावीकडची दिशा पकडायची हे नक्की झाले. पण आता blindly जाऊन चालणार नव्हते. दर १० फुटांवर २ वाटा फुटत होत्या. काहीही ओळखीच्या खुणा दिसत नव्हत्या. पण वाट नक्की होती, कुठे जाणार होती ते पुढे गेल्याशिवाय समजणार नव्हते. वाट खाली उतरू लागली. कोणत्यातरी गावात पोचणार हे नक्की झाले. सव्वा तीन वाजले होते अजून सोंडाई करायचा होता. पोटातली ईडली केव्हाच जिरली होती पण लक्ष पोटापेक्षा घड्याळाकडे होते.
अचानक खाली घरं दिसायला लागली. वाटा ओळखीच्या वाटत नसल्या तरी हायसे वाटले. चक्क जिथून चढायला सुरुवात केली तिकडेच उतरणार असल्याचे नक्की लक्षात आले. मागे वळून बघितल्यावर आम्ही चांगलेच चुकून दुसऱ्याच डोंगरावर गेल्याचे पण वेळेवर परत फिरून जागेवर आल्याचे लक्षात आले. अखेर ओळखीची दारं, खिडक्या, वाट आणि पांढरी सफारी दिसली. आता पाणी प्यायले. इथे आदिवासी, कातकरी समाजाचे लोक राहतात.
ओलेचिंब झालो होतो. जिकडे जाऊन आलो तिकडचा फोटो काढावा तर फक्त पांढरे धुके येणार फोटोत. कॅमेरासकट नखशिखांत भिजलो होतो. बूट काढलेच नाहीत तसंच गाडीत बसून सोंडाईच्या वाटेला लागलो. भूका जाणवत होत्याच पण भरल्या पोटाने सोंडाई कसा पटापट होणार म्हणून जेवायची तयारी नव्हती. खाकरा बाहेर काढला, वास्तविक खाकऱ्याचा सगळ्यांनाच कंटाळा होता, प्रत्येक ट्रेक ला खाकरा घरी परत जातो असा अनुभव होता, पण आज सगळा खाकरा संपला. बाकरवड्या पुरवून खाल्ल्या. सोंडेवाडी १८ किमी होते सोनगिरीपासून गुगल बाबांच्या सांगण्यानुसार.

Monday, February 8, 2016

लिंगाणा भाग II

रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर, नगारखाना (60x Optical zoom)
वातावरण बदललं, फोटो सुरु झाले. कॅमेरा बरोबरच पराठे, खाकरा, चिक्की, गोळ्या असे ऐवज बाहेर आले... सगळेजण आनंदात होते. लिंगाण्याने साथ दिली होती. आम्ही मनसोक्त बागडत होतो. मनात हिशोब झाला, वर यायला ३ तास, मग फोटो-जेवण याला १ तास आणि परत उतरायला ३ तास धरले तरी २ पर्यंत खाली पोचू की... पण प्रसादचा अंदाज ४-५ तरी वाजतील असा होता, त्याचेही बरोबर होते. त्याला सगळ्यांना घेऊन उतरायचे होते, त्यात थोडे घाबरलेले, दमलेले, अति उत्साही सगळ्या प्रकारचे लोक असतीलच की... उतरायला सुरुवात केली. इथे Rappelling करायला सपाट असा कातळच नव्हता. पायाखाली सरणारी माती, दगड-गोटे आणि वर उन. ४० फुटाचा एक भाग उतरलो. आता पुढचा २० फुटाचा तुलनेने सोपा होता. आत्मविश्वास वाढवणारा होता तो. सूचना चालूच होत्या. डावीकडे जा, उजवीकडे नको. पाठीमागे लोड द्या. उजवीकडे दगड दिसत असताना डावीकडे का जायचे हा प्रश्न पडत असला तरी ते करायचे होते. आता १८० फुटाचा भाग होता. एकच वेळी २ लोकांना उतरता यावे ह्यासाठी २ रोप लावल्या होत्या. काही लोकांना बिले द्यायला लागत होता. १८० फूट उतरल्यावर विश्रांती होती. टाक्यातून पाणी भरून घेतले. गुहेत जाऊन गप्पा सुरु झाल्या. अजून बरेच जण उतरायचे होते. आमच्याकडे खूप वेळ होता. परत खाद्य पदार्थ बाहेर आले, एकमेकांच्या आठवणीही बाहेर आल्या. फोटोही झाले. काही सुखी लोकांनी चक्क झोपही काढून घेतली. 
जवळ जवळ दीड तास विश्रांती झाली. २:३० वाजून गेले होते बहुतेक परत rappelling साठी सज्ज झालो. १०० फुटाचा एक भाग झाला, लगेचच ७० फुटाचा एक. तो झाल्यावर मात्र वरून येणाऱ्यांची वाट बघायची होती. विनायक आधी गेला, मग निलेश. मग श्री गेला. आता शेवटचा पॅच होता, पण सगळ्यात मोठा. वरून दगड येत होते, आवाजही येत होता watch out चा. प्रसादने हेल्मेट घातल्या घातल्या साधारण लिंबाएवढा मोठा दगड हेल्मेटवर येऊन आपटला. वाचला! एक दगड माझ्या हाताला लागला, एक पायाला. आम्ही मोठ्या कातळाआड लपून वरून येणाऱ्यांची वाट बघत होतो. दगडांपासून स्वतःला वाचवत होतो. शेवटचा पॅच होता, पण तो ३२५ फूट! म्हटला तर सोपा, म्हटला तर कठीण. वाळलेले गवत, सरकणारी माती, त्यावर न टिकणारे पाय. Rappelling ही सरळ खाली नव्हते. आधी एकदम उजवीकडे जाऊन मग दगडाला वळसा मारून परत उजवीकडे, आणि मग सरळ.. असा विचित्र मार्ग होता. त्यात २ रोप लावलेले होते २ जणांसाठी. ते मधे एकमेकाला क्रॉस होत होते.
हा किल्ला शिवाजींच्या काळात शत्रुसाठी तुरुंग म्हणून वापरत होता म्हणतात. असेलच! कोणाला सोडून दिले तरी तो जाणार कुठून? त्यापेक्षा तुरुंग बरा, किमान टेकायला जागा तरी असते तिथे..
३२५ फुटाचा तो पॅच उतरलो, शेवटचा पॅच.. विनायक, निलेश, श्री असे वाट बघतच बसले होते. मी आणि ब्रम्हा पण त्यांना सामील झालो. सारखं सारखं वर बघायचा मोह आवरत नव्हता. लिंगाणा उतरलो होतो, इथे बसायला जागा होती. कॅमेरा बाहेर आला. संपूर्ण लिंगाणा त्यात सामावून घेतला. सकाळी जे आम्ही चढलो होतो ते आत्ता दिसत होते. वरून आमचे उर्वरित मावळे उतरताना दिसत होते, लिंगाण्याच्या ढेपीवरून खाली उतरणाऱ्या मुंग्या!
विनायक ओरडतच होता, अरे डावीकडे-उजवीकडे, आता अँकर बदलून घे, दोरी पायाखालून घ्या. आम्हीही त्याला सामील झालो, पाठीमागे लोड द्या रे, पाय सरळ ठेव... आता आम्ही उतरलो होतो त्यामुळे सात जन्म rappelling करत असल्याच्या थाटात वरून येणाऱ्यांना सांगत होतो. सूचना देत होतो. एक-एक करून सगळे आले. शेवटी इंद्रा-प्रसाद वगैरे मंडळी पण रोप वगैरे गोळा करून येताना दिसली आणि आम्ही मोर्चा बोराट्याच्या नाळीकडे वळवला. आम्हाला फक्त आपापले समान घेऊन जायचे होते, रोप घेण्यासाठी गावातल्या दोघांना कामगिरी दिलेली होती. 

लिंगाणा, रोप आणि उतरणारे मावळे
ब्रम्हाला आता कंठ फुटला होता, वेगवेगळी गाणी बाहेर पडत होती. आम्ही सपसप पावलं टाकत होतो. दमत होतो पण पाणी पिण्यासाठी थांबत नव्हतो. न जाणो मधेच पाणी प्यायले नी पोटात दुखले म्हणजे... नाळीची खडी चढण आल्यावर लिंगाण्याचा वळून एकदा निरोप घेतला. अँकर टाकून २ पॅच पार करून आलो होतो, आता एक अशी वाट नव्हती. जिथून सोपे वाटेल तिथून नाळ चढून वर जायचे होते, रायलिंग पठारावर! मी आणि श्री झपझप जात होतो. एक पाउल थकु देत नव्हता म्हणून दुसराही. असे करत करत पठार गाठलेच... योगिता आणि पूजा वर होत्याच. टेंटच्या जागेवर पोचलो तेव्हा टेंट गुंडाळले गेले होते, सामान आमची वाट पहात होते. रायलिंग पठाराच्या पलीकडून लिंगाणा काळजीपोटी डोकावून लेकरं सुखरूप पोचल्येत ना याची खात्री करून घेत होता. सूर्य कालसारखाच ह्यावेळी जगदीश्वराला भेटायला उत्सुक होता.
सामान उचलले. पाणी पिऊन ताजे तवाने झालेले मावळे बस उभी असलेल्या ठिकाणी निघाले. ही वाट मात्र लांब वाटत होती, संपतच नव्हती. दिवसभर केलेले प्रताप दोन्ही मांड्यातून जाणवायला लागले होते. अंधार पडायच्या आत बसजवळ पोचलो. सामान ठेवले. दागिने अजूनही अंगावरच मिरवत आणले होते. ते उतरवले आणि फ्रेश झालो. एक-एक करत सगळे परत आले. चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. नाचणीची भाकरी, भाजी, लोणचे, पापड, भात वरण असा फक्कड बेत होता, सोबत मिरचीचा ठेचाही! त्यावर ताव मारून बसमधे चक्क झोपलो! रात्र झाली होती पुण्यात परतलो होतो. लिंगाण्याचे स्वप्न पूर्ण करून एक ट्रेकर झोपला, सकाळी IT वाला मजूर म्हणून उठण्यासाठी!

लिंगाणा भाग I

लिंगाणा
अरे रवळ्या-जावळ्याला जाऊन आलो, २ दिवसांत साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा आणि हरगड पण केला. धोडप रेंज केल्ये का? न्हावी-रतनगड राहिला रे, SRT (सिंहगड-राजगड-तोरणा) केला २ दिवसांत.. बोराट्याची नाळ, सिंगापूरची नाळ अश्या गोष्टी कानावर पडत होत्या. असले विचित्र वाटणारे शब्द बोलणारा हा अर्थातच हा कबिला सिंहगड किंवा राजगडला पिकनिकला निघाला नव्हता किंवा आपापल्या KTM/ढुगढुगगाड्या (बुलेट) काढून फाटक्या सायलेन्सरचे आवाज करत कामशेतकडेही निघालेला नव्हता. हा कबिला निघाला होता लिंगाण्याला! बहुतांशी दुर्लक्षित किल्ल्यांवर किल्ले-सदृश काहीच अवशेष राहिले नाहीयेत त्यातलाच हाही एक किल्ला, नव्हे प्रचंड सुळकाच!
एका हाताला तोरणा, एका बाजूला रायगड, असा मधेच दिमाखात उभा हा लिंगाणा... WTA ग्रुप बरोबर ह्या सुळक्यावर जायचे होते. Climbing/Rapelling चा अनुभव Must होता. सगळे गडी expert आणि मी त्यात फ्रेशर भासत होतो. पाबे घाटातून गाडी वेल्ह्याकडे लागली. राजगड-तोरणा त्यांच्या आठवणी जाग्या करत होते. वेल्हे आले. आता जेवणासाठी ब्रेक होता. इथे एक तरुण भेटला, शुक्रवारी तोरणा करून शनी-रवि आमच्याबरोबर लिंगाण्याला येत होता. साधारण १३५ किल्ल्यांची धूळ मस्तकी बाळगून होता. ५१ वर्षाचा तरुण होता तो! तसे गाडीतले माझ्या वयाचे काही जण १०० चा बिल्ला बाळगून होतेच. मी आपला उद्याचा विचार करत होतो. १००० फूट Climbing & Rapelling... चेष्टा नाही. AMK केला होता. पण... AMK केल्यावरही “पण” येतो तो लिंगाण्याला...
चिंता कसली होती? WTA चा म्होरक्या प्रसाद कसलेला गडी होता. १७ वेळा लिंगाण्याबरोबर खेळून १८ व्यांदा आम्हाला घेऊन आला होता. इंद्रा, शेखर हेही गडीही जोरदार होतेच की. ते पर्वतीवर फिरायला आल्यासारखे आले होते. चिंता जेवणाचीही नव्हती. योगिता आणि पूजा यांच्या अनुभवी हातात त्याची धुरा होती. चिंता होती ती माझ्यासारख्या नवख्या लेकराला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळायला देईल का? आम्हाला त्याच्यावर बागडायचे होते, चढाई करून विजयोन्मादाने मस्तकी पाय ठेऊन चीत्कारायचे नव्हते. आठवणींच्या भात्यात अजून एक मोलाची आठवण खोचायची होती.
एका खडतर रस्त्यावरून “मोहरी” गावात पोचलो. तिथे पाण्याची व्यवस्था होती. रिकाम्या झालेल्या बाटल्या भरून घेतल्या, उद्या लिंगाण्यावरच्या टाक्यातले पाणी मिळेस्तोवर हेच पुरवायचे होते. आज शनिवारी फक्त रायलिंग पठारावर जाऊन फोटो, जेवणे, झोपणे हाच कार्यक्रम होता. हार्नेस, डिसेंडर, कॅरॅबिनर वगैरे दागिने वाटप झालं आणि रायलिंग पठाराकडे निघालो. सामान टेंट लावायच्या जागी ठेऊन कॅमेरा फक्त घेतला. प्रशस्त पठार, समोर लिंगाण्याचा सुळका, ज्याच्या अर्ध्या उंचीपर्यंत आत्ताच आम्ही होतो. त्याच्यामागे रायगड. त्यावर समाधी, जगदीश्वराचे मंदिर आणि त्यामागे होणारा सूर्यास्त... कितीतरी वेळ हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवत होतो. कॅमेरात काही फोटो टिपून टेंटच्या जागेवर परतलो. टेंट तयार होते. स्वयंपाकाची तयारीही चालू झाली होती. सुगरणी कामाला लागल्या होत्या. प्रसादाने वाटलेले दागिने घालून कसे सजायचे ते सांगितले. समोर लिंगाणा आहे हे विसरून चालणार नव्हते. १७ मोहिमांचे साक्षीदार गंभीरपणे सांगत होते. काही जणांचा धीर सुटलाही असेल, माझ्या मनात मात्र लिंगाणा पक्का होत होता. भेटायचेच होते उद्या त्याला... नक्की!

रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि सूर्यास्त
टोमॅटो सुपचा वास यायला लागला होता. आपापल्या टेंटमधे समान ठेऊन सूप, मग बिर्याणी आणि बरोबर संगीताचा आस्वाद घेतला. टेंटमधे घुसून झोपलोही. जेमतेम १० - १०:३० वाजले असतील. पण सकाळी (?) ३ ला उठायचे होते. गजर होण्याआधीच उठून तो होण्याची वाट बघायची परंपरा कायम ठेवत ३ च्या आधीच जाग आली होती. बाहेर चिडीचूप होती. कोणीही जागे झाले नव्हते. परत टेंटमधे घुसलो. स्लीपिंग बॅग वर १५-२० मिनिट लोळल्यावर मात्र विको घेऊन बाहेर आलो. तोंड धुवून घेतले. पाणी प्यायले. वाघ मारण्यासाठी निघालो पण पहाटे ३ ला चंद्रप्रकाशात वाघ येणार कुठून? प्रयत्नांती परमेश्वर! विजयी मुद्रेने परतलो. डोक्यावरच्या टॉर्च पेटवून सगळे शिकारी वाघ मारायला जात होते. चहा घेतला. दागिने घालून सजून बसलो. मॅगी हाणून ४:१५ च्या दरम्याने बोराट्याची नाळ उतरायला सुरुवात केली. डोक्यावरच्या टॉर्चच्या प्रकाशात जेवढा भाग दिसत होता तेवढाच. बाकी प्रसादच्या मागून गप्पा मारत चाललो होतो. गाणी मात्र ठेवणीतली काढली होती त्यांनं... २ ठिकाणी अँकर लावला आणि ५:३० च्या आतच घळीत पोचलो. काल ज्या रायलिंग पठारावर आम्ही होतो, ते आता पाठीशी उंच झाले होते. समोर लिंगाणा बोलावत होता.

बोराट्याची नाळ उतरताना पहाटे ५ वाजता
प्रसादने कामगिरी सुरु केली होती. इंद्रा, शेखर, विनायक, निलेश वगैरे गडीही कामाला लागले. दोर लावत होते. ५:४५ च्या दरम्याने आम्हीही चढाईला सुरुवात केली. समोरच्याच्या मागून जात होतो, गरजेपेक्षा जास्त काही दिसतच नव्हते. कधी दोर धरत होतो तर कधी दगड धरून चढत होतो. अँकर पक्का असल्याची खात्री करूनच चाललो होतो. साधारण ५ पॅच असणार होते. पहिलाच overhang होता. त्याचा प्रत्यय लवकरच आला. एका ठिकाणी माझ्यासमोर असलेला हर्षल घळीत अडकला. त्याच्या उंचीच्या जोरावर तो वर पोचला. मी प्रयत्न सुरु केला, पण वरच्या Hold पर्यंत हातच पोचत नव्हता. जोर करून दोन्ही हात दोरीला धरून स्वतःला अक्षरशः वर खेचून घेतले. घळीतून वर पोचलो होतो. पॅच अर्थातच साधा नव्हता. मधेच watch-out आवाज आणि मागून एखादा दगड येई. असेच अँकर change over करत करत जवळ जवळ ५०० फूट चढून गेलो. डाव्या बाजूला पाण्याचे टाके होते. दुपारी उतरून इथे परत येईपर्यंत पाणी पुरवायचे होते. तांबडे फुटायला लागले होते. सूर्य तोरण्याच्या मागून डोकावू लागला होता. कॅमेरा बॅगेतच होता. परत चढाईला सुरुवात केली. आता उन आले होते, छान दिसू लागले होते. सूचनाही पॅच प्रमाणे बदलत होत्या. कुठे पाय ठेवायचा, कुठे नाही, कुठला दगड ठिसूळ झालाय हे एकमेकांना सांगत वर-वर जात होतो. आता तोरण्याच्या मागे धुसर राजगडही दिसत होता. आपण किती उंचीवर आलो हेही आता दिसत होते. उन्हं तापायाच्या आत वर पोचायचे होते.


उंचीची मर्यादा लक्षात घेऊन चढत असलो तरी वेग कमी होऊ दिला नव्हता. कधी कधी सुरक्षेसाठी असलेल्या अँकरचाही त्रास होत होता, मधेच पायात येत होता. पण तो काढायची परवानगी नव्हती. मीही आगावूपणा करणार नव्हतो. कधी दोर पकडून तर कधी फक्त हातावर जोर देऊन वर चढत होतो. पायातून दगड सुटणार नाही याचीही काळजी घेत होतो. सेफ जागा सापडली की फोटो काढायचा मोहही आवरत नव्हता. मोबाईलमधून फोटो काढत होतो. ९ च्या आत आम्ही ६ जण शिखरावर होतो. थोड्या वेळातच सगळे वर पोचले. समोर रायगडावर जगदीश्वराचे मंदिर स्पष्ट होते. मागे रायालिंग पठार आणि त्या शिखरावर आम्ही साधारण १८ जण!