Saturday, April 15, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले अंबागड

किल्ले अंबागड

भंडारा जिल्ह्यातला अंबागड किल्ला हाही राखीव वनक्षेत्रात येतो. देवळापार किल्ल्यावरून गुगल मॅप चालू केला तर अंबागडला जाणारा रस्ता “हिवरा बाजार” वरून “मांगर्ली” मार्गे अंबागड किल्ल्यापाशी असा तडक दिसतो. पण एकतर हा रस्ता राखीव वनक्षेत्रात, त्यातून सुनसान आणि संध्याकाळ नंतर तर धोकादायकच. आणि गंमत म्हणजे, त्यातून ह्या रस्त्याने जे पायथ्याचे ठिकाण दिसते तिथून खरच या गडावर वाट जाते की नाही हा प्रश्नच आहे. मग अर्थातच मोर्चा वळवला, तुमसरकडे.

अंबागड जवळचे मोठे ठिकाण म्हणजे तुमसर. “Welcome To Rice City – Tumsar” असं आपलं स्वागत होतं. इथे मुक्काम करायचा आम्ही ठरवलं आणि सकाळी “अंबागड” या पायथ्याच्या गावात जाऊन किल्ल्यावर जायचं असं ठरवलं. तुमसर वरूनही “अंबागड किल्ला” असा गुगल मॅप लावला तरी रस्ता मेहगाव-मिटेवाणी-बघेडा मार्गे त्याच पायथ्याशी जाताना दिसतो जिथे गुगल मॅप देवळापार वरून घेऊन येतो. आपण मात्र मेहगाव नंतर मिटेवाणीच्या पुढे डावीकडे वळून अंबागड गावात जायचं. तिथून चौकशी करायची ती किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिराची. सहज चुकू शकू असे कच्चे रस्ते पकडत मंदिरापाशी जायचं.

हनुमान मंदिर, मुर्त्या आणि परिसर

गडावर जाणाऱ्या पायऱ्या

मंदिराचा परिसर स्वच्छ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर आहे. फक्त माकडांचा वावर खूप असल्याने योग्य ती काळजी घ्यायची. तसेही कायम एखादी काठी जवळ बाळगणे हे केव्हाही उत्तमच फिरस्तीच्या वेळी. किल्ल्यावर चढायचा मार्ग म्हणजे अगदी मंदिरापासून किल्ल्याच्या दरवाजापर्यंत बांधलेल्या पायऱ्या. बहुतेक पाचशे-एक पायऱ्या असतील किल्ल्याच्या दरवाजापर्यंत.

बुरुज आणि गोमुखी दरवाजा

ह्या पायऱ्या चढून आलो आणि समोर अनपेक्षित असा बलाढ्य बुरुज असलेला दरवाजा आला. दरवाज्याची रचना गोमुखी असल्याने सरळ दरवाजा न दिसता खरंतर दोन बलाढ्य बुरुज आणि मध्ये भिंत हेच दिसलं. आणि त्यात तिरकस अशा जाणाऱ्या पायऱ्या गेलेल्या दिसल्या.

पुरातत्व विभागाने इथे संवर्धन केलेलं असून किल्ल्याची माहिती असलेला फलकही लावलेला आहे. इसवी सन १६९० ते १७०० च्या सुमारास हा किल्ला गोंड राजा “बख्त बुलंद” यांच्या कारकिर्दीत त्यांच्या आदेशाने शिवनी येथील “राज खान” नावाच्या पठाण सुभेदाराने उभारलान. इकडच्या इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला नंतर नागपूरकर भोसल्यांकडे आला. तुरुंगासारखा उपयोग होत असलेल्या या किल्ल्यातल्या विहिरीचे खराब पाणी पिऊन कैदी मरत असत असेही हि माहिती सांगते. इंग्रजांनी ठेवलेल्या कैदेत नागपूरचे पराक्रमी योद्धा मनभट उपाध्ये यांचा पण तिथेच कैदेत मृत्यू झाला अशीही नोंद आहे.

महादरवाजा

दिलेल्या माहितीत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचे नाव महादरवाजा आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याच दरवाजासमोर आम्ही उभे होतो. खालून वर आम्ही अवघ्या दहा मिनिटात आलो. पण हा दरवाजा निरखून बघण्यातच वीस मिनिटे निघून गेली. दरवाजा कसा देखणा असेल याची यावरूनच कल्पना येईल. गोंडवनाचे गोंड राजे बख्त बुलंदशहा उईके यांचा हा किल्ला. त्यांची निशाणी असलेल्या चवऱ्या या दरवाजावर कोरलेल्या आहेत. त्या पण साध्या सुद्धा नसून थ्रीडी आहेत. कमळ आहेत, दोन्ही बाजूला एका खाली एक असे चार-चार कोनाडे आहेत. कोनाड्यात मात्र कोणतीही नक्षी, मूर्ती नाही.

दरवाजाच्या आत – देवड्या

दरवाजातून आत शिरताच डावीकडे पहारेकऱ्यांसाठी उत्तम देवड्या आहेत. आम्ही उजवीकडे वळून आधी किल्ला बघायला आत शिरलो. इथे एक फार मोठा खड्डा आहे. हा खड्डा नक्की कसला असेल ते कळलं नाही, पण खूप मोठा घेर आणि खोलही असल्याने बाजूला संरक्षण कठडा मात्र बांधलेला आहे. डावीकडे एक पाण्याचं टाकं आहे त्यातलं पाणी खूप खराब होतं. इथूनच प्रदक्षिणा मार्गाने गडफेरीला सुरुवात केली. किल्ल्याच्या मधल्या भागात खूप झाडी असल्याने तटबंदीवरून सुरुवात केली. संवर्धन केलं गेलेलं असल्याने तटबंदी वरून निवांत फिरता येतं. प्रशस्त फांजी आहे, जंग्या, चर्या आहेत, गोलाकार बुरुज आहेत. तटबंदी मधल्या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी जागा आहे, जिथे तोफ ठेवून अगदी ३६०° अंशात फिरवता येईल.

तलाव आणि बालेकिल्ला

पूर्ण तटबंदीत मिळून असे एकूण नऊ बुरुज आहेत. तटबंदीवरूनच पुढे एका सपाट जागेवर आलो. या चौथऱ्यावर उजवीकडे चौकोनी आकाराचा मोठा बांधीव तलाव आहे. तलावाच्या मागे वरती आपल्याला बालेकिल्ला दिसतो. तलावाजवळूनच इथं वर जाता येतं. वरून तलावाचा व्ह्यू चांगला मिळेल म्हणून इथल्या दरवाज्याच्यावर चढून तलावाचे फोटो काढले.

तलाव

कैद्यांशी संबंधित वर्णन केलेली ती ही विहीर हीच असावी का? कारण ह्यातलंही पाणी अजिबात पिण्यायोग्य नाही. आत उतरायला मात्र पायऱ्या आहेत. दरवाजा वरून मी परत खाली आलो, कारण मला तटबंदीवरूनच प्रदक्षिणा मारायची होती. बाकी सगळे मात्र इथून बालेकिल्ल्याकडे वर गेले. मी तटबंदीवर येऊन प्रदक्षिणा मार्गाला लागलो.

दारूगोळा कोठार

उजवीकडे बालेकिल्ला आणि त्यातला बुरुज दिसला. बालेकिल्ल्याच्या तटबंदीलाही दोन बुरुज आहेत. किल्ल्याच्या तटबंदी वरून कोपऱ्यावरच्या बुरुजावर आलो. तटबंदीतच भग्न असं दारूगोळा कोठार आहे. इथून पुढे मात्र तटबंदीचा मार्ग बंद झालेला आहे.

उजवीकडे असणाऱ्या बालेकिल्ल्यावर जायला एक घसाऱ्याची वाट आहे. धोपटमार्ग तलावाच्या मागून आहे पण अतिशय सावधपणे इथूनही वर जाता येतं. इथूनच वर बालेकिल्ल्यावर आलो. इथे अवशेष खूप आहेत, पण पायाखाली सांभाळून फिरायचं कारण जवळच एक खड्डा दिसला ज्याच्यात आत मध्ये पाणी होतं. संरक्षणासाठी इथे काही नाही, पण एका झाडाची फांदी एक आडवी कोणीतरी टाकून ठेवलेली असल्याने त्याकडे लक्ष गेलं आणि वाचलो.

बालेकिल्ल्यावरील अवशेष

ही खरंतर राजवाड्याची इमारत आहे. ही दोन मजली असून मागच्या बाजूने आल्याने आपण सरळ दुसऱ्या मजल्यावरच येतो. इथे खालच्या मजल्यावर जायला पायऱ्याही दिसल्या. पण खालचा मजला आणि खोल्या पूर्णपणे पाण्याने भरलेला असल्याने उतरता आलं नाही. खोल्या, कोनाडे, झरोके असं बघून मी इतर भिडूंच्या दिशेने बालेकिल्ल्याच्या पलीकडे गेलो, जिथून ते वर येत होते.

विहीर आणि मेघडंबरी

इथे मात्र एक विहीर आहे, ती ठार कोरडी होती. कदाचित ही सुद्धा ती कैद्यांशी संबंधित विहीर असू शकेल. काठावर एक सुंदर मेघडंबरी आहे.

घुमटी, चुन्याचा घाणा आणि सुंदर फुललेलं झाड

बालेकिल्ला उतरून तलावाजवळून परत दरवाज्याशी आलो. इथे एक डावीकडे घुमटी आहे ज्याच्यात शेंदूर धारण केलेला अनगड देव आहे. याच्या शेजारी चुन्याचा घाणा आहे. त्याचं तुटलेलं चाकही आहे. इथे एक झाड मात्र पांढरी शुभ्र कांती आणि पानगळती झाल्याने टोकाटोकांवर असलेली केशरी फुलं घेऊन ती मिरवत असलेलं छान दिसलं. असंच झाड आधी तलावाजवळही होतं.

महादरवाजा शेजारच्या देवड्यांमधून वर जायला वाट आहे त्यातून वरती बुरुजावर फिरून आलो. इथून लांबवरचा प्रदेश सुंदर दिसतो. समोरच बघेडा धरणाचं बॅक वॉटरही त्याच्यात उठून दिसतं. किल्ला उतरताना जसं भीमसेन कुंवारा किल्ल्याच्या वाटेवर होतं, तसंच दोन्ही बाजूला मुरुड शेंगेचं रान दिसलं. किल्ला उतरून आल्यावर आधी गाडीकडे धावत जात गाडीवर चढून असलेल्या माकडांना हाकलून लावलं. बूट काढले आणि हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. मंदिरात एक बाबा राहतात. त्यांच्याशी गप्पा मारून भंडारा जिल्ह्यातील एकमेव अशा गिरीदुर्ग अंबागड किल्ल्याच्या भेटीनंतर मार्गस्थ झालो. पुढचा जिल्हा – गोंदिया!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!