Sunday, April 10, 2022

किल्ले चौगाव उर्फ त्रिवेणीगड

आजच्या दिवसात तशा गढ्या, भुईकोट किल्ले आणि नगरकोट होते. डोंगर चढायचे नव्हते. नाही म्हणायला तसा थाळनेर हा गिरीदुर्ग आहे. पण उंच वगैरे नाही आणि त्यातून पायर्‍यांपर्यंत गाडी जाते. म्हणजे आता फक्त नावालाच गिरीदुर्ग.

किल्ले विचखेडे

एकलकोंडा बुरुज

दुपारी पावणे बाराला पोचलो “बोरी” नदीच्या काठी असलेल्या या गढीवजा किल्ल्यात - “किल्ले विचखेडे”. पारोळा किल्ल्यापासून अवघ्या दहा मिनिटांवर हा किल्ला आहे. पारोळाकडून धुळ्याकडे जाताना “बोरी” नदी वरचा पूल लागतो. हा मुंबई-नागपूर महामार्ग. पुलाच्या जरा अलीकडेच उजवीकडे एकलकोंडा बुरुज दिसतो. हा या किल्ल्याचा सुस्थितीत असलेला अवशेष. कारण शेजारी वस्ती नाही. उरलेले अवशेष पुलाच्या डाव्या बाजूला आहेत. राष्ट्रीय महामार्ग या किल्ल्यातूनच गेलेला आहे, या किल्ल्याला दुभागत. किल्ल्याची चांगलीच दुरावस्था झालेली असली तरी अजूनही एका बाजूची तटबंदी तग धरून उभी आहे.

बुरुज, तटबंदी असे अवशेष

या बाजूला काही बुरुज, पुरातन महादेव मंदिर, समोर दीपमाळ, कबर, भुयारी मार्ग, बुरुजावर पीराचे स्थान, नाग मंदिर, सात पैकी दोन शिल्लक चौकोनी विहिरी... असा तब्बल २५ एकराचा भाग हा किल्ला व्यापून आहे. पण एकतर किल्ल्यात वस्ती असल्याने खूप असे अवशेष नष्ट झाले आहेत, झाडीत गेलेले आहेत. तर काही सापडत नाहीत. आम्ही थोडक्यात अवशेष बघून निघालो अमळनेरकडे.

किल्ले बहादरपूर

किल्ले बहादरपूर - एकमेव शिल्लक अभेद्य बुरुज

जानेवारी २०१८ मध्ये आम्ही सहकुटुंब शेगावला जात असताना अचानक बहादरपूर किल्ला पदरात पडला होता. त्यावेळी आडवाटेवरचा किल्ला बघून ब्लॉग लिहिताना म्हटलं होतं, की “परत कधीही इथे याची सुतराम शक्यता नसताना पंधरा मिनिटात धावत-पळत किल्ला बघायला मिळाला”. पण दोन वर्ष पुर्णही झाली नाहीत आणि आज परत या किल्ल्यात होतो. फक्त मी यावेळी उगाच छाती पुढे काढून वाटाड्या असल्यासारखा सगळ्यांना किल्ल्यात घेऊन गेलो.

कबर, वाडे असे इतर अवशेष

गेल्यावेळी बघायचे राहिलेले अजून शिल्लक असे अवशेष बघितले. इथे एका शेतात काही कबरी आहेत. या राजघराण्यातील व्यक्तींच्या असल्याचे सांगतात. त्या बघितल्या, जुन्या काळातले वाडे, त्यावर ते सुंदर नक्षीकाम यावेळी बघता आलं.

किल्ले अंमळनेर

भव्य दरवाजा आणि बुरुज

अंमळनेर मध्ये पोचलो तेव्हा दोन वाजत आले होते. अंमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमि. अंमळनेर हा खरा नगरकोट, पण शहराच्या वाढत्या विस्ताराने हा नष्ट होत गेला. सध्या इथे भव्य असा वीस फुटी दरवाजा दोन्ही बाजूंना बुरुजांसह शहरात उभा आहे.

शिल्लक तटबंदी आणि अवशेष

नदी पात्राच्या बाजूने संरक्षणासाठी तटबंदी उभारलेली होती, ती आजही “संत सखाराम महाराज” मंदिराकडे जाताना नदीपात्रात बघायला मिळते. चाळीस फूट लांब असलेल्या या तटबंदीवर आता घरं आहेत. त्यातही मशीदी सारखे छोटे मिनार असलेला दरवाजा कसाबसा तग धरुन आहे. काही बुरुजही नष्ट होण्याची वाट बघत तिथे लपलेले आहेत. खूप जुनी मंदिरं या तटबंदीवर बांधलेल्या घरांच्या मध्ये आहेत. बांधकाम जुने असल्याने घरांवर नक्षीदार कमानी आहेत. हे जुनं लाकडी सुतारकाम मजबूत आहे. तटबंदीतल्या दरवाजाच्या बाहेर लागूनच तीन सार्वजनिक संडास आहेत. अर्थातच त्यांना कुलपं होती. इथे एकूणच असल्या गोष्टींचा वापर करण्याची गरज कोणाला वाटत असेल असं दिसत नव्हतं.

किल्ले गांधली

अंमळनेर पासून दहा किलोमीटरवर गांधली गांव आहे. या गावालाही कोट आहे. गावात पोचून कोट कुठे आहे अशी विचारणा करण्याआधीच रस्त्याच्या डाव्या बाजूला बुरुज, तटबंदी असे अवशेष दिसायला लागले. पूर्ण गावच कोटात वसलेलं असल्यानं याचे अवशेष असे ठरवून बघता येत नाहीत. स्थानिकांच्या मदतीने ते शोधावे लागतात. चालताना मध्येच दोन घरांच्या मध्ये एखादा बुरुज दिसतो, कुठेतरी तटबंदीचा जरासा शिल्लक भाग दिसतो.

पूर्वाभिमुख देवड्यांसह आणि पश्चिमेकडील दरवाजा

दोन दरवाजे मात्र आपल्या दोन्ही बाजूला बुरुज घेऊन उभे आहेत. मध्ये-मध्ये सहा असे एकूण दहा बुरूज बघता येतात. बुरुजांना प्रचंड मोठ्या भेगा पडलेल्या असून, कधीपर्यंत हे उभे राहतील हा प्रश्नच आहे. त्यातून तटबंदी व बुरुजांचे दगड स्थानिक घर बांधायला घेऊन जातात.

पूर्वाभिमुख ह्या दरवाजात देवड्या वगैरे अजून तरी शिल्लक आहेत. कमान मात्र गायब आहे. इथे याला लागूनच घरं आहेत, गुरं बांधलेली आहेत. दुसरा दरवाजा मात्र जरा श्वास घेत उभा आहे, हा पश्चिम दरवाजा. त्याला लागून फक्त एक हनुमान मंदिर आहे.

जैन मंदिर परिसरातील अवशेष

आत मध्ये इथे एक जैन मंदिर आहे. त्यालाही तटबंदी व बुरुज आहेत. इथे असलेल्या कोटात खूप काही दडलेलं आहे. आम्हाला कोट दाखवायला आलेल्या मामांनी गवत बाजूला करून एक सरळ तळघर दाखवलं. म्हणजे आम्ही जमिनीच्या पातळीला फिरत असलो, तरी पायाखाली चार खोल्या होत्या. त्या संपूर्ण तटबंदीच्या आत प्रदक्षिणा मार्गावर दोन विहिरी आहेत, त्यावर चढण्यासाठी पायर्‍याही आहेत. एकंदरीत हा कोट शेवटचे श्वास घेत अस्तित्व कसे तरी राखून आहे. इथेच बसस्थानकासमोर ३ कमान असलेली बारंवही आहे.

किल्ले थाळनेर

केळी वेफर्स On The Road...

लहानपणापासून जळगाव म्हटलं की इथली केळी प्रसिद्ध असं वाचलं होतं. आम्हाला थाळनेरकडे जाताना रस्तोरस्ती केळ्यांचे लोंगरच्या लोंगर घेऊन, तिथेच जमिनीतली चूल मांडून वेफर्स तळत असलेले अनेक जण दिसले. ते गरम-गरम वेफर्स बघून खायचा मोह आवरला नाही. तसंही अशा भ्रमंतीत दुपारचं जेवण फारसं विचारात घेत नव्हतो आम्ही, त्यामुळे त्या वेफर्सवर ताव मारला.

संध्याकाळी पाचच्या सुमारास या किल्ल्यावर घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांजवळ आम्ही दाखल झालो. हा किल्ला तापी नदीकाठावर आहे. इथून जेमतेम ४५ किलोमीटरवर मध्य प्रदेश सीमा आहे. किल्ल्याचे स्थानच अतिशय सुंदर आहे. किल्ला उंचावर असल्याने खाली तापी नदीचं खोरं लांबवर दिसतं. इथे ती इंग्रजी “U” आकारात वळण घेत असल्याने हे दृश्य अजूनच सुंदर भासतं. त्याहून सुंदर म्हणजे समोरच पश्चिम दिशा. म्हणजे नदी पलीकडे सूर्य मावळतो आणि आम्ही त्याच सुमारास इथे किल्ल्यावर होतो. काय सुरेख दृश्य होतं हे. आमचे कॅमेरे मात्र हे दृश्य साठवण्यास सक्षम नव्हते.

थाळनेर किल्ला नवे-जुने अवशेष आणि वरून दिसणारे विहंगम दृश्य

किल्ल्यावर अवशेष फारसे नाहीत. तीन-चार फूट उंचीची तटबंदी नव्याने बांधून काढलेली आहे आणि संध्याकाळी निवांत येऊन बसायच्या दृष्टीने हे ठिकाण विकसित केलेलं आहे. वरती सप्तश्रुंगी मातेचं छोटसं मंदिर आहे. अजून एक जुनं मंदिर आहे. काही पडके वाडे, त्यातल्या खोल्या, काही तळघर असं शोधल्यास सापडतात. नव्याने बांधलेल्या तटबंदी बाहेर जुनी तटबंदी आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने बुरुजही आहेत.

अवशेष फारसे नसल्याने समोर तापी नदी, त्यामागचा मावळतीचा सूर्य, अशा दृश्याचा आनंद घेतला. खाली उतरून रस्ता “पाताळेश्वर महादेव” मंदिरावरून गावात “जमादार हवेली”कडे जातो. ही हवेली राहती, जागती आहे.

जमादार हवेली

हवेलीला लागून आता सिमेंटचे बांधकाम असलं तरी हवेलीचं सौंदर्य काही कमी होत नाही. भव्य असा दरवाजा, त्यावर खूप कलाकुसर केलेलं लाकूडकाम. जमिनीपासून सहा फुटापर्यंत दगडी तर वरती अजून दहा-पंधरा फूट विटेचं बांधकाम, अशी ही हवेली आहे. एका बाजूला सुंदर आणि अजूनही सुस्थितीत असलेला बुरुज आहे. त्यात खिडकीही आहे.

ही हवेली बघताना अंधार पडण्याच्या आत काही थडगी बघायची असल्याने आवरतं घेतलं. “थडगं” म्हटल्यावर डोळ्यासमोर येत असेल त्यापेक्षा वेगळंच काहीतरी हे बघायला मिळालं. ताजमहाल हेही एक थडगंच आहे हे लक्षात घ्यायचं. राजदरबारातील लोकांची थडगी अशीच सौंदर्यपूर्ण असतात. “थडगी काय बघायची” असा विचार असल्यास आल्यास इथली अशी थडगी बघितल्यावर हे विचार झटकले जातात.

कबरी - अप्रतिम नक्षीकाम आणि शिलालेख

प्रचंड कलाकुसर, जागोजागी नक्षी, दरवाजांवर ओळीच्या ओळी फारसी भाषेतील शिलालेख, असा खरोखर सौंदर्याचा उत्तम असा हा नमुना आहे. लवकरच अंधार पडणार होता, मग काही बघता येत नाही, फोटो तर लांबच, म्हणून थडगं हा शब्द डोक्यातून काढून त्यातूनच नाचत-नाचत इथलं सगळी कलाकारी डोळ्यात भरून घेतली. अर्थात फोटो आलेच की.

हाती असलेल्या वेळेचं योग्य नियोजन केलं, की अशा गोष्टी आपल्याकडच्या मर्यादित वेळातही नीट बघून होतात, याचं आजचा दिवस हे एक उदाहरण होतं. नगरदेवळा, पारोळा, विचखेडे, बहादरपूर, अंमळनेर, गांधली आणि थाळनेर हे किल्ले बघून, वर जमादार हवेली आणि ही थडगी एवढ्या गोष्टी बघितल्या. नुसत्या बघितल्या नव्हे, तर फोटोही काढले आणि अवशेष शोधून शोधून बघीतले. मग रात्री मुक्कामाला पोहोचलो चौगाव गावात.

किल्ले चौगाव उर्फ त्रिवेणीगड

ब्लॉगचं नांव हे इथल्या किल्ल्याचं असलं, तरी पारोळा नंतरचा इथे येईपर्यंत त्याचा प्रवास हा थोडक्यात मांडताना नमनाला घडाभर, नाही, अगदी दोन घडे तेल, असाच झाला.

रात्री “चौगाव” गावात पोचल्यावर पहिल्यांदी राहायची सोय बघायची होती. सुदैवाने आपल्याकडे मंदिरांना तोटा नाही. इथे ही एक शंकराचे मस्त मंदिर आहे. २६ डिसेंबर, म्हणजे चांगलेच थंडीचे दिवस. उघड्यावर झोपायची सोय नाही. पण नशिबाने या मंदिराच भाग असलेल्या खोलीत आमची झोपायची व्यवस्था झाली. सकाळी वाटाड्याची तजवीज करून सगळे गुडुप झालो.

शेकोटी

पहाटे लवकर उठून छानशी जागा बघून मोकळा झाल्यावर आटपून तयार झालो. सहा वाजता बरोबर येतो म्हणालेला आमचा वाटाड्या भाऊ उगवायला तयार नव्हता. त्याची वाट बघता बघता शेजार जागा व्हायला लागला. इथे एके ठिकाणी मस्त शेकोटी तयार करून लोक बसले होते. मीही त्याचा लगेच फायदा घेतला. जरा अंग गरम झाल्यावर त्यांना आमचा वाटाड्या मित्राचा पत्ता विचारला. सरळ घरी गेलो तर साहेबांना त्यांच्या आईने उठवावं लागलं. त्याला घेऊनच परत आलो. तोपर्यंत बाकीचेही वाट बघत थांबले होतेच.

त्रिवेणी संगम, महादेव मंदिर आणि मागे चौगाव किल्ला

आता वेळ न काढता गडाच्या वाटेला लागलो. सुरुवातीचं काही अंतर गाडी नेता येते. तसा रस्ता नाहीच आहे, पण त्या कच्च्या रस्त्यावरून गाडी काही अंतरापर्यंत जाते. पुढे पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर त्रिवेणी संगम लागतो. इथे तीन ओढे एकत्र येतात, म्हणून त्रिवेणी संगम. त्यामुळे या किल्ल्याला “त्रिवेणीगड” असेही नांव आहे. अजून एक नांव “विजयगड”. पण एक तर या नावाचे फारसे संदर्भ उपलब्ध नाहीत आणि त्यातून रत्नागिरीमध्ये विजयदुर्ग आणि विजयगड दोन्ही किल्ले असल्याने गोंधळ नको म्हणून हा उल्लेख टाळू.

तर या संगमावर जवळ यायला सात वाजून गेले होते. इथे महादेवाचे मंदिर आहे. परत येताना हे बघणार होतोच. सध्या बाहेरूनच नमस्कार करून, संगमाचे पाणी ओलांडून, गडाच्या वाटेला लागलो. हा भाग “बडा बाजार” म्हणून इतिहासात ओळखला जात असे. तसा गड आपल्याला आधीपासूनच दिसत असतो. या “त्रिवेणी संगमाजवळच्या” महादेव मंदिरापासून गडाचा पायथा अजून पंधरा मिनिटावर आहे.

खांबटाकी

पायथ्याशी पोचल्यावर प्रत्यक्ष चढाईला सुरुवात होते. चढाई फारशी नाहीये. अवघ्या अर्ध्या तासात जरा वरती गडाचा दरवाजा दिसला. पण आधी वर न जाता डावीकडे जायचं. तिथे पाण्याची टाकी आहेत. एक कोरडं आहे. एकाच पाणी आहे पण त्यात जाण्यासारखी जागा नाही आणि पाणीही पिण्यासारखे नाही. एका जमिनीच्या खालच्या पातळीत असलेल्या दुसर्‍या खांबटाक्यात पाणी आहे. पाणी पिण्यायोग्य नाही, पण हे टाकं प्रशस्त आहे. काही प्रमाणात गाळाने भरलेलं असलं तरी चार-पाच खांब पाण्यावरती व्यवस्थित आहेत.

पूर्वाभिमुख दरवाजा

पुढे फक्त पाच-सात मिनिटात आपण दरवाजा जवळ पोचतो. दरवाजा पुर्वाभिमुख असल्याने उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात न्हाऊन निघाला होता. दरवाजा पलीकडे गेल्यावर एक पायवाट दिसते, पण इथे झाडी असल्याने वाटा कळायला वाटाड्या हवा. इकडे एका बाजूला एक कोरडा तलाव आहे.

दुर्गामाता मंदिर

पुढे काही चौथरे आपल्याला दिसतात, इथे एक मंदिर आहे. हे दुर्गा मातेचे मंदिर. इथल्या उध्वस्त वास्तूचे दगड गोळा करून हे दुर्गा मातेचे मंदिर गावकऱ्यांनी बांधलेलं आहे. त्याला लाकडाने सुंदर मंडप उभारलेला आहे आणि साड्यांनी छान पैकी आच्छादून घेतलेलं आहे. देवीची मूर्ती हा तांदळा असून त्याला साडी नेसवून मुकुट वगैरे घातलेला आहे. या मंदिरात आवर्जून बघावा असा एक दुमजली दगडी दिवा आहे.

उत्तरेकडील लपलेले प्रवेशद्वार

बाजुला तटबंदीचे अवशेष आजही दिसतात. झाडाझुडपात लपलेले तटबंदीचे अवशेष बघता बघता आम्ही एका दरवाज्याजवळ पोचलो. या दरवाजाची कमान अगदी सुबक आणि रेखीव आहे. गडाच्या उत्तरेकडेचं हे प्रवेशद्वार अतिशय सुंदर जागी असून दोन्ही बाजूला उंच भाग तर द्वार मधल्या, जराशा खालच्या बाजूला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याचं स्थान उत्तम योजलेलं आहे.

हा दरवाजा पाहून आम्ही ह्या गडाच्या मुख्य अवशेषाजवळ जवळ आलो. हा इथला राजवाडा. याला “गवळी राजाचा राजप्रासाद” म्हणून ओळखतात. या वाड्याचे चुना आणि दगडात असलेले बांधकाम खूप मजबूत आहे, कारण या भिंती अजूनही उत्तम स्थितीत उभ्या असलेल्या दिसतात.

गवळी राजा राजप्रासाद - प्रवेशद्वार आणि अप्रतिम नक्षी

बाहेरून या भिंती निरखून मग आत मध्ये प्रवेश केला. पूर्वेकडच्या भागात हे प्रवेशद्वार आहे. पाच फुटांवरचा भाग हा मात्र फोडल्या सारखा वाटतो. म्हणजे मूळ प्रवेशद्वार नक्की किती उंचीचं असावं व त्याची कमान कशी असावी हे प्रश्न आपल्याला पडतात. पण हे प्रश्न नंतर पडतात. त्या आधी आपल्याला थक्क करते ती वाड्याच्या या भिंतीवर असलेली विटांची दुमजली नक्षी. पत्त्यांचा बंगला आपण बांधत जातो तशी विटांची नक्षी केलेली आढळते. इतकी अप्रतिम नक्षी दुसरीकडे बघायला मिळत नाही.

प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच साधारण तीन फूट उंच व सात-आठ फूट लांब अशी एक भिंत मधोमध आहे. भिंतीची पडझड झाल्यासारखं वाटत नाही. आजूबाजूलाही काही नाही, त्यामुळे हिचं नक्की प्रयोजन कळत नाही. कदाचित संरक्षण व्यवस्थेचा हा भाग असावा.

प्रासादाचे प्रवेशद्वार आतील बाजूने, समोर भिंत. मागच्या बाजूला टाक्यांचे उंचावरून दर्शन

चुन्याने लिंपलेल्या भिंतीच्या आतल्या बाजूस खूपसे कोनाडे आहेत. हे एका ठराविक अंतरावर असल्याने, कदाचित प्रत्येक खोलीत एक, अशा प्रमाणे इथे खोल्या असाव्यात असं वाटतं. वाडा आतमध्ये चांगलाच लांब आहे. साधारण २५० फुट X ८० फुट असा प्रशस्त असा हा राजवाडा आहे. पण आतल्या सगळ्या भागात सायाच्या झाडांनी गर्दी केलेली आहे.

हे बघून वाड्याच्या बाहेर आलो आणि एका बाजूला मगाशी आम्ही बघितलेलं दुर्गामातेचे मंदिर दिसलं. शेजारी एक उंच ध्वजही दिसला. तिथून इथे यायला सरळ वाट आहे, पण आम्हाला उत्तरेकडचा दरवाजा दाखवण्यासाठी वाटाड्या मित्राने दुसऱ्या वाटेने इथे आणलंन होतं. वाड्याच्या समोर मोकळ्या जागेत १९७७ साली सहा फूट लांबीच्या चार तोफा सापडल्या. त्या आता चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.

मंदिराकडे न जाता त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भागाकडे आम्ही निघालो. जरा खालच्या बाजूला चार टाक्यांचा एक सुंदर समूह आम्हाला दिसला. त्यामुळे उत्साह अजून वाढला आणि उड्या मारतच अवघ्या दोन मिनिटात या समूहासमोर दाखल झालो.

पाण्याने तुडुंब भरलेली टाकी

एक मोठा आयताकार भाग. त्याला मधोमध अधिकच्या चिन्हात विभागून त्याचं चार टाक्यांत रूपांतर केलेलं आहे. त्याला लागूनच चार-पाच कमानयुक्त गुहा आहेत. पाणी तुडुंब भरलेला असल्याने इतर टाक्यातही काही खांब-गुहा वगैरे आहेत का हे समजू शकलं नाही. त्या अधिकच्या चिन्हाच्या बरोबर मध्ये जाऊन फोटो काढायचा मोह आमच्यापैकी कोणालाही आवरला नाही.

झेंडा बुरुज अवशेष

इथून अवघ्या तीन-चार मिनिटांत दुर्गामाता मंदिराजवळ परत येता येतं. परत येऊन मंदिराजवळ असलेल्या, मगाशी वरून दिसलेल्या त्या उंच झेंड्याजवळ गेलो. हा झेंडा बुरुज. इथली तटबंदी उत्तम स्थितीत असून त्यात शिबंदीची घरटी आपल्याला दिसतात.

इथून आजूबाजूच्या परिसरातील डोंगरही दिसतात. काली टेकडी, लेभागा डोंगर, बांदरा डोंगर, धाकला चिपाट्या डोंगर अशा नावाचे काही डोंगर येथे आहेत. हा चौगाव उर्फ त्रिवेणीगड किल्ला प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात (नेमाड) आत जाणाऱ्या “भिराम घाट” या डोंगरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला होता. हा किल्ला सातपुडा डोंगर रांगेत येतो.

सोनेरी किरणांत चमकणारा डिंक

पावणेदहा वाजले होते आमची गडफेरी पुर्ण झाली होती. उतरताना काही झाडांना डिंक आलेला दिसला. त्या सूर्यकिरणात हा सुंदर दिसत असल्याने, फोटोचा मोह आवरला नाही.

त्रिवेणी संगम मंदिर - महादेव, पंचमुखी हनुमान

जेमतेम वीस ते पंचवीस मिनिटात त्रिवेणी संगमाजवळ परत आलो. वर जाताना बघितलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मुख्य मंदिर महादेवाचं असून गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला गणपती आहेत. मंदिराचा मंडप मोठा असून त्यात पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. संगम मंदिर आणि आजूबाजूचा परिसर वनखात्याच्या अखत्यारित येत असून येथे वनविभागाचे कर्मचारी तैनात असतात. इथे मुक्कामाला परवानगी नाही. मोहीमेतल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात या गिरीदुर्गापासून झाली. यानंतर बघायचा होता एक अत्यल्प परिचित गिरिदुर्ग.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Saturday, April 9, 2022

किल्ले नगरदेवळा आणि पारोळा

किल्ले नगरदेवळा

दुसऱ्या दिवशीचं पहिलं ठिकाण होतं नगरदेवळा. पहिल्या दिवशी कन्हेरगड पाहून झाल्यावर आमचा मुक्काम चाळीसगाव गावातच होता. इथून साधारण तीस किलोमीटर अंतरावर हे नगरदेवळा गाव आहे. “देवळांचे नगर” म्हणून नगरदेवळा. अशी ओळख असलेले गाव “अग्नावंती” नदीकाठी आहे. गावाजवळच अग्नावंती धरणही आहे. या गढीचे मालक असलेले पवार घराणे हे “धार” घराण्याचे आहेत.

मूळ धार प्रांतातील “परमार” घराण्याचे वंशज “साबूसिंग पवार” हे या घराण्याचे मूळ पुरुष म्हणून ओळखले जातात. हे शिवाजी महाराजांच्या कल्याण स्वारी वेळी स्वतः त्यांच्याबरोबर होते. त्यांचेच वंशज पुढे राजाराम महाराज यांच्या बरोबर होते तर पुढील वंशज पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या बरोबरही होते. स्वराज्य स्थापनेपासूनच मराठा साम्राज्याच्या इमानीत असलेले हे घराणे स्वतंत्र भारतात संस्थाने खालसा होईपर्यंत आपला अंमल इथे राखून होते. अजूनही या घराण्याचे वंशज इथे राहतात.

“देवळांचे नगर” - नगरदेवळा

सकाळी साडेसातच्या सुमारास इथे आम्ही दाखल होतानाच “नगरदेवळा” नावाचा प्रत्यय आला. अगदी खरंच इथे लहान-मोठी अशी मंदिरच मंदिर आहेत. नगरदेवळा ही गढी असली तरी ह्याचे स्वरूप साधारण नगरकोटा सारखेच होते. हा नगरकोट साधारण बारा एकर मध्ये पसरलेला होता तर आत मध्ये तीन एकरात गढी आणि त्यात खासे पवार यांचा वाडा असे ह्याचे स्वरूप होते.

देवळं बघत-बघत गढीकडे निघालो तर एक बुरुज दिसला. नगरकोटाच्या पाच बुरूजांपैकी शिल्लक हा एकमेव बुरुज – “फत्ते बुरूज”.

फत्ते बुरूज

नगरकोट म्हटलं म्हणजे त्यात राहती घरे आलीच. ह्या बुरुजाला लागून पण घरं आहेत. लागूनच गोठ्यासारखी गुरांसाठी जागा केलेली दिसली आणि तिथे दावणीला बांधलेल्या म्हशींशेजारून वाट काढत बुरुजावर पोचलो. बुरुजाच्या आतमधून छान पिंपळाचं झाड डोकं वर काढून उभं होतं आणि बुरुजाच्या भिंतीवर या झाडाच्या सावलीत एक कबरही दिसली. इथून समोरच पाण्यासाठी बांधलेली भिंत दिसते त्याला “नगरदुर्ग बंधारा” असे म्हणतात. बुरुजावरुन पलीकडे खालच्या बाजूला नजर गेलीआणि जरासं वाईट वाटलं. इथे ती स्कीम नाहीये ना की, “करणाऱ्याला” शंभर रुपये दंड आणि सांगणाऱ्याला पन्नास रुपये बक्षीस! वाईट यासाठी की इथे आमचं दोन चारशे रूपयाचं नुकसान झालं. सहज कमाई झाली असती. असो...

गणेश दरवाजा

तर नंतर पहिला दरवाजा आम्हाला दिसला. हा “गणेश दरवाजा”. दरवाजाची मोठी बांधीव कमान आता सिमेंटने प्लॅस्टर वगैरे केलेली आहे. रंगकामही झालेले आहे. पण त्या पुढची, आतली दरवाजाची लाकडी कमान मात्र शाबूत आहे. कमानीवर नक्षीही कोरलेली आहे.

भडगाव दरवाजा

त्यानंतर जो दरवाजा दिसला तो “भडगाव दरवाजा”. हाही आता रंगवलेला असून एका बाजूला श्रीराम, तर दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज यांचे पोस्टर चिकटवलेले दिसले. याच्यातली लाकडी कमान मात्र बऱ्यापैकी तुटलेली आहे.

झेंडा बुरुज

दरवाजे बघून गढीकडे जात असताना, घरांच्या रांगेत मध्येच उभा अतिशय सुंदर बुरुज दिसला, जो “झेंडा बुरुज”. बुरूजावरचा झेंडा याचं नाव जणू अधोरेखित करत होता. याला अतिशय सुंदर झरोके असून त्याच्यावरच्या कमानी रेखीव आहेत. साधारण शेजारची घरं ज्या उंचीची आहेत, म्हणजे साधारण १५ फुटापर्यंत, तिथला भाग दगडात बांधलेला आहे तर वरचा भाग हा भाजीव विटांत आहे. दगडी बांधकाम मजबूत असलं तरी वरच्या विटांच्या भागात आलेले वडाचे झाड आता या बुरुजाला धोकादायक आहे. बुरुजाला लागून असलेली गढीची तटबंदी मात्र शाबूत आहे.

मारुती बुरुज

पुढे उंचीने थोड्या लहान बुरुजात मारुतीराय संरक्षणासाठी सज्ज दिसले. ह्याही बुरुजाची रचना झेंडा बुरुजा सारखीच आहे, फक्त उंची थोडी कमी आणि कमानी नक्षीदार नाहीत. बुरूजावरचा हनुमान ह्या बुरूजाचं नांव स्पष्ट करत होता - “मारुती बुरुज”!


गढीचा पुर्वाभिमुख दरवाजा

दरवाजावर नगारखाना, वर जायला पायऱ्या, सुरक्षिततेसाठी कठडा

बुरुज ओलांडून पुढे गढीतल्या पवार वाड्यात शिरताना वाड्याचा शाबूत असलेला दरवाजा लागतो. हा दरवाजा पुर्वाभिमुख असून भक्कम आहे. कमान नक्षीदार आहे. दरवाजावरील नगारखाना आजही सुस्थितीत असून त्याला तीन कमानीदार खिडक्या आहेत. हा दरवाजा पाहण्यासारखा आहे. उंचीला फार मोठा वगैरे नसला तरी भिंत चांगलीच रुंद असून आत मध्ये घोड्याच्या पागा आहेत. आतल्या बाजूने वरच्या नगारखान्यात जायला पायऱ्या आहेत. या नगारखान्याच्या बाहेरून बुरुजावरच दरवाजाच्या बाजूला सुरक्षिततेसाठी कठडा केलेला आहे, जो नक्षीदार आहे.

घरांचा सामाईक चौथरा, नक्षीदार खांब

हे बघत बघत घरांच्या रांगेजवळून जाताना दिसले की, सगळ्या घरांचा चौथरा सामाईक आहे. जो दगडात आहे. त्यावर नक्षीदार दगड देखील आहेत. त्यावर चढायला पायर्‍या दगडी आहेत, तर घरासमोरचे खांब लाकडी असून तरी त्यालाही खाली मजबूत दगडी बैठक आहे. सर्व लाकडी खांबांवर नक्षी आणि अतिशय बारीक, सुंदर अशी कलाकुसर आहे. इतरत्र नक्षीदार दगडही पडलेले दिसतात. पुढे एक विहीरही आहे, जी अजूनही वापरात आहे.

मुख्य वाडा

खांबावरच्या नक्षी

मुख्य वाड्यासमोर पोचलो. या वाड्यात त्यांनी विद्यार्थी वसतीगृह केलेलं असून खांब आणि भिंतींना रंगरंगोटी केलेली आहे. खांबावरच्या नक्षी तर आपण टाळूच शकत नाही. थांबून निरीक्षण केल्याशिवाय इथून पुढे जाणं शक्य होत नाही.

नक्षीदार दरवाजे

सध्या इथे दीपक पवार साहेब राहतात, ज्यांनी आम्हाला उत्साहाने सगळा वाडा दाखवला. आतील दरवाजे बारीक कलाकुसरीने भरलेले आहेत. आत मध्ये सुंदर तुळशीवृंदावन आहे. हे बघून झाल्यावर ते आम्हाला बाहेरील परिसर दाखवायला आले. वाड्यासमोरील भागातच एक कबर आहे.

झेंडा बुरुज

आम्ही इथून झेंडा बुरुजाकडे गेलो. गढीच्या बाहेरून येताना हा बुरुज बघितला होताच. पण आतील बाजूने बघताना बुरुजावर जाण्यासाठी असलेला रस्ता लक्षात आला. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. लहानश्या उंचीच्या दरवाजातून या गोलाकार पायर्‍या आपल्याला बुरुजावर घेऊन जातात.

बुरुजावर जाण्यासाठी गोलाकार पायर्‍या

या बुरुजावर बळी द्यायची प्रथा पूर्वापार होती. सन २०१२ पासून बंद केली गेली आहे. बळी देण्यासाठी खास जागाच आहे ह्या बुरुजावर. हा बुरुज सर्वात उंच असून गढीचा सगळा परिसर डोळ्याखालून घालता येतो.

महिलांचे शृंगार साहित्य

कट्यार

तलवारी

पूर्वजांच्या पराक्रमाच्या खुणा, अशी काही हत्यारं या घराण्याकडे आहेत. कट्यार, नाणी, तलवारी, गंजिफा, भांडी या वस्तूंबरोबर दुर्मिळ अशी विष्णूचे दशावतार कोरलेली एक तलवारही आहे. जे सगळं सध्या त्यांनी “जळगांव विद्यापीठाला” संग्रहालयात ठेवण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे पूर्वजांच्या पराक्रमाची खुणा असलेला हत्यारांचा ठेवा आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही. पण तरीही धैर्यशील पवार साहेब यांनी आम्हाला फोटोतून हे समाधान दिले आणि फोटो ब्लॉग वर वापरायची परवानगी दिली.

ग्रासलं जात असलेलं चंद्रासमान भासणारे सूर्यबिंब

नऊ वाजले होते. पूर्ण गढी बघून पवार साहेबांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. दिनांक २६ डिसेंबर २०१९. त्या दिवशी होते सूर्यग्रहण. नेहमी तेज:पुंज असलेले सूर्यबिंब, ज्याच्याकडे या वेळी डोळ्यांनी बघताही येऊ शकले नसते ते ग्रासले जात असल्याने चंद्रासारखे भासत होते. अर्थात नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पहायचे नसते, परंतु कॅमेरात बघणे मात्र शक्य होते आणि एक सुंदर फोटोही निघाला. नगरदेवळाला निरोप देऊन निघालो ते “किल्ले पारोळा”कडे!

किल्ले पारोळा

पारोळा हे गाव धुळे आणि जळगाव यांच्यामध्ये येतं. हे गाव धुळे शहरापासून साधारण ४० किलोमीटर तर जळगाव पासून ३५ किलोमीटरच्या आसपास मध्ये आहे. नगरदेवळा पासूनही साधारण ४० किलोमीटर. आम्ही इथे साधारण साडेदहाच्या सुमारास दाखल झालो. हा भुईकोट किल्ला अगदी भर बाजारपेठेत आहे.

इतिहासात डोकावलं तर “जहागीरदार हरी सदाशिव दामोदर” यांनी हा किल्ला १७२७ मध्ये बांधल्यानंतर किल्लेदारांनी व्यापार्‍यांना मुक्त आश्रय दिल्याने इथे व्यापारवृद्धी झाली. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर भारतातली सर्वात मोठी बाजारपेठ झाली.

आता हा काळ सरला असला, बाजारपेठ तेवढी मोठी राहिली नसली, तरीही या भागात चांगली भरगच्च बाजारपेठ अजूनही आहे. विविध दुकानं आहेतच, पण मोह आवरावा लागतो तो हातगाड्यांवरच्या ताज्या भाज्या बघून. भाज्या, फळं अशी ताजी रसरशीत दिसत होती, की इथेच बाजार उरकावा. पण एक तर घरी परत जायला अजून दोन ते तीन दिवस होते आणि मुख्य म्हणजे इथे आलो होतो आम्ही किल्ला बघायला.

तर भर बाजारपेठेतला हा किल्ला अगदी जवळपास चौरस आकारात आहे. ४८० X ५८० फूट अशी साधारण परिमिती. या भागाला फार पूर्वीपासून बहुतेक सरळ रेषेत राहायची सवय असावी. म्हणजे हे गावंच अशा स्वरुपात वसलेले आहे कि रस्ते पण सरळ रेषेत लांब. या रस्त्यांवर मध्ये-मध्ये पिंपळाचे व देवतांचे लहान-लहान पार एका रांगेत बांधलेले दिसतात. सरळ रस्त्यांमुळे हे पार एका ओळीत दिसतात. म्हणजे “पारांच्या या ओळी” म्हणजे “पारोळी”. त्याचा अपभ्रंश “पारोळा”. (माहिती आंतरजालावरून साभार)

जुना लाकडी दरवाजा चोरदरवाजासह

आम्हाला गाडी लावायला लांबच जागा शोधावी लागली आणि मगच बाजारात शिरलो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा बरोबर उत्तराभिमुख आहे. गडाच्या या प्रवेशद्वारावरची बांधीव कमान आता पुनर्बांधणीत सिमेंटची झालेली दिसली. पण शेजारचा भाग मात्र जुनाच, दगडी बांधणीत आहे. तटाची भिंत धरूनच (नशिबाने दरवाजा सोडून) सगळी दुकानंच दुकानं बांधलेली आहेत. आश्चर्य म्हणजे कमानीतला जुना लाकडी दरवाजा मात्र सुस्थितीत आहे. अगदी त्यावरच्या लोखंडी पट्ट्या आणि त्यातल्या चोरदरवाजासह. मोठा दरवाजा बंदच असतो ये-जा करायला, छोटासा दरवाजा उघडा असतो. आम्ही त्यातूनच गेलो.

गदुहेरी तटबंदी आणि ह्यातले खणखणीत बुरुज

किल्ल्याच्या ह्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे त्यातली आमच्या समोर आता दुसरी तटबंदी दिसली. या तटबंदीत खणखणीत बुरुज अजूनही उभे आहेत. जमिनीपासून जेमतेम पाच-सात फूट दगडी बांधकाम असावे. वरती सगळेच भाजीव विटांचे बांधकाम. बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या आणि वरती कमानीदार चर्या. त्यातही बंदुकीच्या माऱ्यासाठी जागा ठेवलेल्या. बाहेरील या तटबंदीत जवळपास १० तरी बुरूज आहेत. चौरसाच्या चार कोपऱ्यांवरचे चार मोठे बुरुज, तर मध्ये-मध्ये सहा-सात लहान बुरुज.

बालेकिल्ल्याचा दरवाजा

दुहेरी तटबंदी सोडून आत शिरल्यावर समोर दिसतो तो बालेकिल्ला. बालेकिल्ल्याच्या चार कोपऱ्यांवर एक-एक असे चार बुरुज आहेत, ज्यांची आता बरीच पडझड झालेली आहे.

काही अवशेष - चौकोनी विहीर, कमानी

किल्ल्यात बघायला असंख्य अवशेष आहेत, पण दुर्दैवाने कशाचीही निगा राखली न गेल्याने, इथे वाढलेल्या झाडीत लपलेले आहेत. वाढलेल्या झुडुपांनी त्यांना गिळंकृत करायलाही सुरुवात केलेली आहे. तिकडे फिरताना बरेच छोटे-छोटे वाडे, भिंती दिसतात. बऱ्यापैकी कमानी दिसतात. एका कमानीजवळ चौकोनी विहीरही आहे. पण अर्थातच खूप कचरा ह्या पाण्यात आहे. तटबंदीवर जायला पायऱ्याही दिसतात.

काही छोटेखानी मंदिरं

आतल्या परिसरात काही छोटेखानी मंदिरंही दिसून येतात. पहलं दिसलं ते “श्री सद्गुरू दादा महाराज मंदिर” पुढे सुंदर हनुमान मूर्ती असलेलं “हनुमान मंदिर” दिसलं. एका झाडाखाली नंदी आणि शिवपिंडी उघड्यावरच दिसली, तर पुढच्या झाडाखाली मंदिरावर दत्तगुरु फरशीवर आणि आत मध्ये साईबाबा फोटोत दिसले. या झाडामागे एक चोर दरवाजा असावा. तटबंदीच्या पलीकडे असलेले पाणी इथून आठ डोकावत होते, पण तरंगणारे प्लास्टिक, बाटल्या आणि पिशव्या असा कचरा घेऊनच.

श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर

जमिनीच्या पातळी खालचे महादेव मंदिर

इथे जे मंदिर आहे ते “श्री हरीहरेश्वर महादेव मंदिर” हे मंदिर खरतर जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. तरी वरच्या बाजूला पण एक नंदी आणि शिवपिंडी आहे आणि तसाच नंदी पायऱ्या उतरून गेल्यावर खाली आहे. त्याच्या बरोबर समोर हे मंदिर आहे. ज्याचा कळस जमिनीच्या पातळीच्या वरती आहे.

तटबंदी बाहेरचा तलाव

संपूर्ण किल्ला फिरताना अजूनही खूप अवशेष दिसतात. तटबंदीवर चढून फिरताना पारोळा गावही दिसते. किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या तटबंदी बाहेर मोठा तलाव आहे. तलावाच्या बाहेरील बाजूने पूर्ण दुकानांचा वेढा आहे.

बालेकिल्ल्यातील काही अवशेष

बालेकिल्ला फिरताना खूपसे उध्वस्त अवशेष दिसतात. साफसफाई केली तर खूप अवशेष उत्तम स्वरूपात समोर येतील. काही अवशेषांचे संवर्धन करण्याचा प्रयत्नही झालेला दिसतो.

दगडी दरवाजा आणि बालेकिल्ल्याचा उध्वस्त बुरुज

एक मजबूत दगडी दरवाजा पूर्णपणे शाबूत आहे. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा. त्यावर दगडी नक्षीही आहे.

बुरुज आणि लागून असलेलं पिराचं स्थान

दरवाजातून पलीकडे गेल्यावर काही कौलारू घरं दिसली. या पूर्वी कचेऱ्या होत्या. एका बुरुजाला लागून एक पिराचं स्थानही आहे.

गणपती मंदिर आणि विहिर

या शेवटच्या टप्प्यात एक विहीर दिसली. विहिरीचा कठडा गोलाकार बांधून काढलेला आहे. विहिरीवर रहाट वगैरेही बसवलेला आहे. संवर्धन करताना या विहिरीची विशेष काळजी घेतलेली दिसते.

एका चौकोनी बुरुजाच्या खाली एक गणपती मंदिर आहे आणि त्यावर पत्र्याची शेडही बांधलेली आहे.

अवशेष खूप होते. काही उध्वस्त, तर काही उध्वस्त होण्याची वाट बघत, थोडेसे ढासळलेले. तटबंदीतून तलावात उतरण्यासाठी काही मार्गही आहेत. त्यातला एक हरिहरेश्‍वर मंदिरासमोर आहे. उरलेले काहीसे लुप्त झालेले आहेत. नामशेष होण्याची वाट बघत असतील कदाचित... महादेव मंदिराजवळ एक भुयारही आहे. पूर्वी हे भुयार इतकं मोठं होतं, की त्यातून घोडेस्वार जात असे. असे स्थानिकांनी सांगितल्याचे मी वाचलं होतं. याच भुयाराचा वापर करून राणी लक्ष्मीबाई पारोळ्यातुन बाहेर पडल्या होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांचे वंशज आजही पारोळ्यात राहतात. (माहिती आंतरजालावरून साभार)

किल्ले पाहताना, आठवताना असा इतिहासात आपण रमत जातो. जणू त्या काळात जातो. पण काही वेळातच भानावर येऊन सध्याच्या जगात परतावं लागतं.

आपल्या असंख्य शिल्लक, उध्वस्त, नामशेष होण्याची वाट बघत असलेल्या अवशेषांची सहल घडवून आणलेल्या या किल्ल्याला, आम्ही त्या लाकडी महादरवाज्याच्या छोट्याशा दरवाजातून बाहेर पडत निरोप दिला. त्या गजबजलेल्या बाजारात परत आलो.

पुढचं लक्ष होतं “विचखेडे गढी”.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!