Monday, June 13, 2022

किल्ले खंडरगड उर्फ “सत्रासेनचा किल्ला”, किल्ले यावल आणि पाल

खंडरगड उर्फ “सत्रासेनचा किल्ला”

किल्ले खंडरगड

चौगाव हा तसा कमी परिचित किल्ला पाहून झाल्यावर त्यापेक्षा अतिशय कमी परिचित असणारा एक किल्ला बघायचा होता. तो “किल्ले खंडरगड उर्फ सत्रासेनचा किल्ला”. सुदैवाने चौगावचा किल्ला “त्रिवेणीगड” दाखवायला आलेला मित्राचे काही मित्र खंडरगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावचे होते, त्यामुळे हा किल्लाही बघायचा मार्ग सोपा होणार होता.

चोपडा तालुक्यातील ह्या गावाचं नाव सत्रासेन. त्यामुळे हा किल्ल्याला सत्रासेनचा किल्ला म्हणून पण ओळखतात. हा भाग मध्यप्रदेश सीमेवर येतो, अवघ्या बारा किलोमीटरवर मध्यप्रदेश मधले वरला गाव आहे. त्यामुळे इथे हिंदी भाषेचाही प्रभाव आहे. किल्ल्याच्या नांवातच हे दिसून येतं. “पडीक अवशेष” म्हणजे म्हणजे “खंडहर” आणि एक “खंडहर असलेला किल्ला” म्हणजे “खंडरगड”. आता मुळात किल्ल्याच्या नावातच जर खंडहर असतील तर हेच अवशेष पडीक व्ह्यायच्या आधी म्हणजे किती जुना असेल हा किल्ला... म्हणूनच हा किल्ला अतिप्राचीन म्हणावा लागेल.

हा किल्लाही चौगाव किल्ल्याप्रमाणे “भिराम घाट” या डोंगरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता.

नदीपात्राकडे जाणारा रस्ता

तर, या सत्रासेन गावात दुपारी ११-११:१५ सुमारास पोचलो असू आम्ही. आमचा मित्र तयारच होता. गाडी एका ठिकाणी लावून त्याच्या दुचाकीवरून दोघेजण कच्च्या रस्त्याला लागले. आम्ही ११ नंबरची गाडी पकडून मागून निघालो.

गाडी नदीपार - गांवकऱ्यांसाठी नेहमीचेच

गावातून एक कच्चा रस्ता नदीपात्रापर्यंत जातो. हा रस्ता चांगलाच कच्चा आहे. म्हणजे तो खरा तर ट्रॅक्टर्सचा रस्ता आहे. साधारण दोन किलोमीटर ओलांडल्यावर नदीपात्रात रस्ता येऊन थांबतो. पलीकडे वस्ती असल्याने गावकरी नदीतूनच गाड्या घालतात.

बूट काढून नदी पार

मित्रांनी दुचाकी तिथेच लावली. बूट काढून नदी पार केली. किल्ल्याचा डोंगर शोधायला लागत नाही, समोरच दिसतो. भर दुपारी पावणेबाराच्या सुमारास पायथ्यापासून सुरुवात केली. डोंगर समोरच असला तरी इथे कोणी फारसे येत नसल्याने वाटाड्या बरोबर हवा. तरच नीटपणे वरती पोचता येईल आणि वरचे अवशेष पाहता येतील.

आई तुळजाभवानी मंदिर

निवांत चालत १५ मिनिटात एका छोटेखानी मंदिराजवळ आपण येतो. हे “आई तुळजाभवानी मंदिर”. मंदिरातल्या मूर्तीवर झालर लावलेली वस्त्रे आहेत जी आपल्याला उत्तर भारतीय पद्धतीची आठवण करून देतात. देवीची मूर्ती सजवायची पद्धत अगदी चित्रपटात बघितल्याप्रमाणे “जय मातादी” म्हटलं समोर येते, तशी शेरवाली वगैरे पद्धतीने सजवलेली मुर्ती. हे मंदिर मात्र चित्रपटात दाखवतात तसले मोठे वगैरे नाहीये. पुढे एक कबरही दिसली.

"अनेर" नदीकाठी खंडरगड स्थान

इथून मागे वळून पाहिलं तर या गडाचं स्थान किती अप्रतिम आहे हे लक्षात येतं. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला सामायिक “अनेर” नदीकाठी हा किल्ला आहे. या नदीवर महाराष्ट्र हद्दीत “अनेर धरण” सुद्धा आहे. म.प्र. मधून वाहत येणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ, ह्या धरणाचं बॅकवॉटर सुरू व्हायच्या आधी नदी अतिशय सुंदर उलट्या S आकाराचे वळण घेते. अगदी त्याच वळणावर हा किल्ला आहे. किल्ल्यावरून घेतलेल्या फोटोमध्ये हे स्थान कळणार नाही म्हणून गुगल मॅपवरचा हा स्नॅप देत आहे.

नदी पार करावी लागत असल्याने पावसाळ्यात इथे येणे थोडे जिकिरीचे आहे.

शिल्लक तटबंदी

पाण्याचं खांबटाकं बुजत आलेलं

पाण्याच्या टाक्यातले खांब

तुळजाभवानी मंदिरा पासून गडावर जाणारा रस्ता हा झाडी-झाडीतून आहे. १०-१२ मिनिटांत आपल्याला गडाची तटबंदी दिसते. इथेच पहिलं पाण्याचं टाकं दिसलं. हे खांब टाकं असून बऱ्यापैकी प्रवेश बुजलेला असला, तरी वाकून पाहिल्यास आत मध्ये ४ खांब दिसतात. पुढे गडाची तटबंदी ढासळलेली दिसली. अशी असली तरी गडाचे अस्तित्व दाखवण्यापुरती नक्कीच शिल्लक आहे.

आदिवासी देवस्थान

पुढे एके ठिकाणी मंदिराचे जुने दगड दिसून येतात. तिथे लाकडाची काहीतरी कामासाठी उभारलेली कमान दिसली. इथे आदिवासींची देवता आहे आणि त्यासंबंधीच काहीतरी हे काहीतरी आहे असं गावकऱ्यांकडून कळलं. या ठिकाणी वर्षातून एकदा गडदेवतेची जत्रा भरते व तेव्हा बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे असं आंतरजालावरून मिळालेल्या माहितीत वाचलं होतं. पण प्रत्यक्षात गावकर्‍यांना विचारले असता असा कोणताही बळी इथे दिला जात नाही असं कळलं. कदाचित खूप पूर्वी ही प्रथा असूही शकेल जी नंतर बंद झाली असावी आणि सध्याच्या पिढीला माहितीही नसावी.

लेणी - खांबच खांब

जवळच लांबलचक सात-आठ खांबी अशी लेणी दिसून येतात. ही लेणी अतिप्राचीन असून यात सुबकता नाही. “सुबकता नाही” याचं कारण म्हणजे लेणी बांधायच्या सुरुवातीच्या काळातली ही लेणी आहेत. त्यामुळे “अतिप्राचीन” म्हणावी लागतील. आणि त्यामुळेच सुबकता जरी नसली तरी त्यावर घेतलेले परिश्रम दिसून येतात. इथेच घडलेल्या ह्या परिश्रमातूनच आपल्याला इतरत्र महाराष्ट्रात खूप ठिकाणी नंतर घडवलेली अतिशय सुबक लेणी बघायला मिळतात.

लेण्यांचे ओबडधोबड कोरलेले खांब

ओबडधोबड खांब: मेहनत

इथल्या लेणींमध्ये आत मध्ये कशाचीही मूर्ती वगैरे नाहीये पण जर लेणी पूर्ण झालेली असती तर प्रचंड सुंदर कलाकृती नक्की बघायला मिळाली असती. कारण कोरीव कामासाठी घेतलेला भाग छोटेखानी नाही तर चांगलाच एक पन्नास एक फूट लांब आहे आणि तसाच पंचवीस-तीस फूट रुंद.

लांबलचक भागात लेणी

लेण्यातील खोल्या

इथे अशी एकच नाही तर अजूनही काही ठिकाणी लेणी कोरलेली आढळतात. एका लेण्यांमध्ये खांबाच्या मागे भिंतीत चौकोनी मोठे कोनाडे कोरलेले दिसले. कदाचित ध्यानाला बसण्यासाठी वगैरे ही जागा केलेली असावी. इथे ध्यान लावून बसणे आम्हाला शक्य नसले तरी त्यात बसून फोटो वगैरे काढले. भूक मात्र लागली होती आणि दुपारचा एक वाजत असल्याने पोटात काहीतरी ढकलणे भाग होते. जेवणाचा तसाही नक्की असा बेत नसल्याने पाठपिशवीतले तहानलाडू-भूकलाडू खाऊन घेतले.

झेंडा निशाण आणि झोपडी देवस्थान

अनगड देव

लेण्यांचे हे अवशेष बघून पुढच्या पाच मिनिटांत लांबूनच दिसलेले एक झेंड्याचे निशाण आणि शेजारी बांधलेल्या झोपडीवजा मंदिरात दाखल झालो. ह्या मंदिरात देव असा नसून एका जुन्या मंदिराचे काही दगड देव म्हणून ठेवलेले आहेत. शेजारीच एक त्रिशूळ उभा करून ठेवलेला आहे. त्यावर सगळीकडे जरीपटका वाली वस्त्रं ठेवलेली आहेत.

उध्वस्त मंदिरासमोर दोन तलावही आहेत ह्याला झरे वगैरे नसल्याने ते कोरडे दिसले. गडाच्या पश्चिम टोकाकडे जवळच एक डोंगर आहे, जो मुद्दाम गडापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा करण्यात आलेला आहे.

भुयाराचा प्रवेशमार्ग

येताना वाटेवरील भुयार बघितलं, त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी एक लाकूड ठेवलेलं आहे. हे भुयार आत मध्ये दीडशे फूट तरी असल्याचं समजलं. पण त्यात बघण्यासारखं काही नाही, आत मध्ये वटवाघळं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे असलेला मर्यादित वेळ, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आत मध्ये जाण्याचे टाळले.

श्रमपरिहार

अर्ध्या तासात नदीपर्यंत परत आलो आणि इथे मात्र नदीत डुंबण्याचा मोह कोणालाही आवरला नाही. नाही म्हटलं तरी दुपारचे दोन वाजले होते, म्हणजे दुपारी बारा ते दोन ह्या टळटळीत उन्हात किल्ला बघितला होता. त्यामुळे असा श्रमपरिहार तो बनता है!

अशाप्रकारे अत्यल्प परिचित असा, भटक्यांकडून दुर्लक्षित आणि अतिशय कमी भेट दिला जाणारा किल्ला पाहून झाला.

किल्ले चोपडा

खंडरगड बघून सत्रासेन मधून दुपारी निघालो ते सरळ पोचलो चोपडा गावात. चोपडा किल्ला म्हणजे खरातर नगरकोट. आंतरजालावरुन मिळालेल्या माहितीनुसार ह्या नगरकोटाच्या तटबंदीत सहा दरवाजे होते.

प्रत्यक्षात या सहापैकी दोनच दरवाजे शिल्लक असून तेही जीर्णोद्धारामुळे नष्ट होता होता वाचलेले आहेत. पण त्यामुळे त्यांचे मूळ स्वरूप पूर्णपणे नष्ट झालेले आहे. नष्ट झालेल्या ह्या दरवाजांच्या मूळ स्थानावर अस्तित्वाची खूण म्हणून आधुनिक स्वरूपात कसेबसे हे टिकून आहेत हेच नशीब.

पाटील दरवाजा

टिकून जरी असले तरी अगदीच नावापुरते. एक “पाटील दरवाजा” तर दुसरा “ठाण दरवाजा”. तटबंदी पूर्णपणे उध्वस्त करून लोकवस्तीने हातपाय पसरलेले आहेतच. दरवाजावर सुद्धा अतिक्रमण आहे. आणि ते इतकं, कि गुगलवर पाटील दरवाजा लिहिलं तर “पाटील दरवाजा सार्वजनिक शौचालय” असं येतं. दरवाजाला लागून बिल्डिंग, दुकाने आहेत. दक्षिण वेशीत असलेल्या ह्या दरवाजावर नांव मात्र ठसठशीत आहे.

ठाण दरवाजा

ठाण दरवाजा हा पश्चिम तटबंदीत, “सिद्धार्थनगर” परिसरात शिरपूरच्या दिशेला आहे. ह्या दरवाजाची रचना पाटील दरवाजापेक्षा वेगळी आहे. या दरवाजाच्या दोन बुरुजात खुप अंतर आहे आणि दरवाजा जरासा मागे आहे. त्यात देवड्याही आहेत. देवडीत एक घरही बांधले आहे.

तिरंगी भेळ भत्ता

प्रत्येक शहरात तिथला स्थानिक एक खास पदार्थ असतो तसा इथला कदाचित सुखी भेळ असावा. एका पिशवीत चुरमुरे, वर चणाडाळ आणि त्याच्यावर शेव अशी तिरंगी भेळ बांधून आकर्षक आकारात जागोजागी दिसत होती. खायचा मोह टाळून निघालो ते किल्ले “यावल”कडे, संध्याकाळच्या आत तोही बघायचा होता.

 

किल्ले यावल

चोपडा हे मध्य प्रदेश सीमेपासून फक्त २० किमीवर, तसंच यावलसुद्धा. गंमत म्हणजे यावल गांव जरी महाराष्ट्रात असलं, तरी यावल अभयारण्याचा बऱ्यापैकी भाग मध्यप्रदेश मध्ये येतो. यावलचा भुईकोट किल्ला यावल नगरपरिषदेजवळ आहे. साधारण ३५०x२५० फुट अश्या भागात चौकोनी स्वरूपात हा किल्ला आहे. हा किल्ला “सूर” नदीच्या काठावर, निंबाळकर राजे यांचा आहे.

उंच आणि सुंदर बुरुज

या किल्ल्याला लहान-मोठे ९ बुरुज आहेत असं जरी वाचलेलं असलं तरी एकूणच अवस्था कठीण असल्याचं दिसलं. त्यामुळे सगळेच बुरुज व्यवस्थित असे दिसत नाहीत. त्यातच काही ढासळलेले आहेत. आत मध्ये बऱ्यापैकी झाडी माजलेली आहे.

छोटा पण रुंद आणि अरुंद पण उंच बुरुज

किल्ल्याच्या बाहेर तटबंदीला लागून सरकारी कार्यालयं आहेत. बाजूला रुंदीने लहान-मोठे असे बुरुज आहेत. किल्ल्याचे रुंदीला कमी असलेले बुरूज अतिशय सुंदर व उंच आहेत. तटबंदीवर माजलेली झाडी यांना पुढे उध्वस्त करून टाकेल हे नक्की.

अरुंद बुरुज

रुंद बुरुज

बुरुजातील जंग्या

आतील बाजूने तटबंदी वरून फिरताना बुरुजावर असलेल्या जंग्या-झरोके सुस्थितीत दिसतात, पण आत मधल्या भागातल्या वास्तूंचे अवशेष उध्वस्त झालेले आहेत. किल्ल्याच्या बाहेर जाऊन नदीपात्रातून पाहिल्यास बुरुज अतिशय सुंदर दिसले. बुरुजांची रुंदी एकसारखी नाही तटबंदीच्या मधले अरुंद तर कोपऱ्यावरचे बुरुज जास्ती रुंद आहेत.

बुरुज, नदीपात्रातून

किल्ल्यातील रिकामा आणि पाणी असलेला असे हौद

या किल्ल्यात पाण्याचे हौद असून त्यातल्या एकात पाणीही दिसलं. एके ठिकाणी एक खोल विहीरही आहे.

आंतरजालावरील माहितीतून इतिहासात डोकावताना या परिसरावर धार-पवार, निंबाळकर, शिंदे, झांबरे-देशमुख यांचा ताबा असल्याचं कळतं. सरतेशेवटी इतर गड-किल्ल्यांप्रमाणे याचाही ताबा इंग्रजांकडे गेला.

महर्षी व्यास मंदिर प्रवेशमार्ग महर्षी व्यास मुती

यावल ही “महर्षी व्यास” यांची भूमी. संपूर्ण भारतात व्यास मुनींची दोन मंदिरं आहेत. त्यातलं एक यावल मध्ये आहे. अर्थातच त्याचे दर्शन घेतल्याशिवाय इथून कसं जाणार? त्यामुळे वेळेत किल्ला बघून अंधार पडायच्या आत मंदिरात जाऊन दर्शनही घेतले.

किल्ले पाल

जळगांव या तापमानाच्या बाबतीत उच्च ठिकाणी असणाऱ्या खानदेशातल्या भागात एक थंड हवेचे ठिकाण आहे, ते म्हणजे पाल. पाल हे गांव यावल अभयारण्याच्या क्षेत्रात येते, जे “सुखी” नदीच्या काठी वसलेले आहे. मध्यप्रदेशातून वाहत येणाऱ्या नदीवर या सुखी नदीच्या प्रवाहावर पालच्या पुढे “गरबल्डी” किंवा “गर्बर्डी” नावाचे धरण सुद्धा आहे.

आधी बघितलेल्या यावल या किल्ल्याचे किल्लेदार निंबाळकर यांनी “कॅप्टन ब्रेग्ज” या इंग्रजाच्या मदतीने पाल हे गाव वसवण्याचा प्रयत्न केला, जे मुगल काळानंतर पूर्णपणे उध्वस्त झाले होते, पण ते प्रयत्न वाया गेले. परंतु काही वर्षांनी “सी एस जेम्स” या इंग्रज अधिकाऱ्याने स्थानिक आदिवासींच्या मदतीने हे गांव उभे केले असे म्हणतात.

पर्यटकांसाठी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पाल मध्ये एक किल्ला आहे. आता “होता” असं आपण म्हणू.

यावलचे व्यास मंदिर पाहिल्यावर पालला येऊन मुक्काम करायचा होता. इथून पाल साधारण ४५ ते ५० किलोमीटरच्या आसपास आहे. रात्री उशिरा, या रस्त्याने निर्मनुष्य असल्याने जाणे धोक्याचे आहे, लुटालूट होण्याची शक्यता असते असे ऐकिवात होते. पण आम्हाला आमच्या वेळापत्रकानुसार इथं येऊन राहायचं होतं. आणि पन्नास किलोमीटर म्हणजे दीड-दोन तासांचं काम. त्यामुळे नियोजन न बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला. रात्री नीट असं काही समजत नव्हतं, पण पाल फार लांब राहिलं नसेल, रस्त्यात गेट म्हणजे लोखंडाचा पोल आडवा करून रस्ता बंद केलेला दिसला. मनात “पाल” चुकचुकली. सापळा तर नसावा? कारण वनखात्याचा असेल तर गेटला लागूनच चौकी आणि लक्ष ठेवायला अधिकारी हवा. तसं काही नसल्याने गाडी थांबवणं धोक्याचं होतं आणि गेट उघडायला उतरणं त्याहून. पण पर्याय नव्हता. गाडी थांबवली आणि आपल्याबरोबर अजून चार जण आहेत आपण एकटे नाही अश्या आधाराने धडधडतच खाली उतरलो. गेट उघडले, गाडी पलीकडे गेल्यावर पटकन गाडीत बसलो. गेट वनखात्याचे होते म्हणजे 😊

तर पालच्या “रेंज वन खात्याच्या” कार्यालयात दाखल झालो. इतर ठिकाण असतं तर गावाबाहेरचं कोणतेही मंदिर, मोकळी जागा बघून कुठेही झोपलो असतो. पण हे थंड हवेचं ठिकाण, त्यात आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिथे. बाहेर उघड्यावर काकडून गेलो असतो नक्की. पर्यटकांसाठी असलेल्या खोल्या शिल्लक नव्हत्या पण थोडे प्रयत्न केल्यावर आणि “गांधीजींच्या” मदतीने कुठलीतरी एक खोली मिळाली. थंडी अडवायला छप्पर आणि ४ भिंती महत्वाच्या. सकाळी उठून आटपून सगळा भाग फिरलो.

पाल “किल्ला” म्हणावा अशा फक्त दोनच गोष्टी शिल्लक आहेत, त्या म्हणजे “गडाचा दरवाजा” आणि एक “उध्वस्त बुरुज”. त्यात किल्ल्याचा भाग म्हणून जर चिकटवायचं म्हटलं तर मशीद आणि हत्तीखाना.

पाल किल्ला दरवाजा

गडाचा हा दरवाजा जुन्या काळात भक्कम असणार हे त्याच्या आकारावरून नक्कीच लक्षात येतं. जसा दरवाजा, त्यामानाने गडाची तटबंदी असणारच. पण जी शिल्लकच नव्हती. गडाचा दरवाजा वनखात्याने संवर्धन करून जतन केलेला असला तरी त्याचा जीर्णोद्धार करताना मूळ स्वरूप पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. नवीन रंगाने त्याचं सौंदर्यही गेल्यात जमा असंच म्हणावं लागेल.

पालचा एकमेव शिल्लक बुरुज

ह्या दरवाजाच्या शेजारी वनखात्यानेच एक उद्यान केलेले आहे. त्यातच दरवाज्याच्या डाव्या बाजूला एक बुरुज शिल्लक राहिलेला आहे. जवळपास उध्वस्त झालेला हा बुरुज मात्र आहे त्या स्थितीत सुरक्षित ठेवलेला आहे.

पालची मशीद

तसं म्हटलं तर हा एवढा किल्ला बघायला पाच मिनिटं पुरेशी होतात. किल्ल्याच्या बाहेर येऊन मशीद बघायचा प्रयत्न केला पण चपला काढून, हात-पाय धुऊन जरी आत मध्ये जायची परवानगी मागितली तरी ती मिळत नाही. फोटो तर लांबच. कदाचित एखादं मूळ मंदिर तोडून मशीद बांधल्याची खुण आम्हाला दिसेल या भीतीने प्रवेश नाकारला जातो कि काय अल्ला जाणे!

हत्तीखाना

मशिदीच्या मागे मोठ्या चौरस आकारात जुनी भिंत आहे, त्याला स्थानिक लोक “हत्तीखाना” म्हणतात. हा चौरस २००x२०० फुट आहे. या दरवाजाची कमान शाबूत असून एका बाजूच्या देवड्याही शाबूत आहेत. एका बाजूच्या भिंतीत “इदगाह” निर्माण झालेला आहेच आणि मशिदी मागच्या लागून असलेल्या भागात मोठे बांधकाम हे चालू होतं. (निर्माण झालेला म्हणण्याचं कारण म्हणजे, हा जर हत्तीखाना असेल तर तिथे नमाज पढायला जागा कशाला केलेली असेल ना?)

असो... हे सगळं बघून झाल्यावर पाल मधून बाहेर पडलो ते रसलपुरची सराई बघण्यासाठी.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!