Thursday, September 28, 2023

विदर्भीय भटकंती - किल्ले बल्लारशहा आणि किल्ले भद्रावती उर्फ भांदक

किल्ले बल्लारशहा

महाराष्ट्राच्या सिमांजवळ फिरून आता परत नागपूरकडे प्रवास सुरू झाला.

“खांडक्या बल्लारशाह” राजाने अंकलेश्वर मंदिर बांधले, चंद्रपूरला किल्ला बांधून आपली राजधानी तिकडे नेली, हे चंद्रपूरवरच्या लेखात आपण सविस्तर बघितलंच. त्यामागच्या कथाही बघितल्या. पण राजधानी चंद्रपूरला हलवण्याआधी “बल्लारपूर” हेच राजधानीचं ठिकाण जवळपास १८० वर्ष होतं. इथला हा भुईकोट किल्ला “बल्लारपूर” किंवा “बल्लारशाह” म्हणून ओळखला जातो तो या खांडक्या-बल्लारशाह राजाच्या नावामुळे.

बल्लारपूर ही सध्या उद्योग-नगरी आहे. इथे खाणकाम हा मोठा उद्योग आहे, तर इथली “बल्लारपूर पेपर मिल”ही प्रसिद्ध आहे. बल्लारपूर उर्फ बल्लारशाह हा भुईकोट किल्ला वर्धा नदीच्या काठी आहे. चौकोनी आकारातत्या ह्या किल्ल्याच्या दरवाजाची संरक्षण रचना मात्र, चौकोनालगत बुरुजांसह एक छोटा चौकोन अशी आहे.

माणिकगडकरून बल्लारपूरच्या दिशेने निघालो, तेव्हा आधी वाचलेल्या आणि ऐकलेल्या माहितीवरून हा किल्ला सरकार आणि स्थानिकांच्या अनास्थ्येमुळे अत्यंत बकाल अवस्थेकडे वाटचाल करत असून, सध्या नशेडी मंडळी आणि कपल अड्डा बनला असल्याचं माहिती होतं. आमच्या बालमनावर पुढे होऊ घातलेल्या आघातांची मानसिक तयारी ठेवूनच बल्लारपूर गाठलं.

भद्रावती हे शहर प्राचीन असल्याने आणि त्यातून हे एकेकाळची राजधानी असल्याने त्या काळच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.

किल्ल्याचे पहिले द्वार

गाडी तडक किल्ल्याच्या दरवाजात नेऊन उभी केली. दरवाजा बाहेरची छोट्याशा चौकोनी आकाराची संरक्षण रचना आता ढासळत चाललेली आहे. बुरुज पडलेले आहेत. दरवाजा मात्र लाल-पिवळ्या दगडातलं असं सुंदर बांधकाम आहे. दरवाजावरती दोन बाजूला आता थोडेसे भग्न झालेले पण ओळखू येत असलेले, पायात हत्ती धरून असलेले शरभ आपलं स्वागत करतात. इथे लोखंडी गेट बसवलेलं आहे. ज्याचं छोटं दार मात्र आमच्यासाठी उघड होतं.

किल्ल्याचे आतमधील द्वार

आतमध्ये डावीकडे मुख्य किल्ल्याच्या तटबंदीवरचा दरवाजा आहे. त्यावरही शरभ-शिल्प आणि कमळं आहेत. दोन्ही दरवाजाच्या आतील बाहेरील बाजूस अशीच शिल्पे आहेत. आतील बाजूस सुद्धा अशीच शिल्प कमी ठिकाणी बघायला मिळतात.

गंमत म्हणजे इतके सुंदर आणि मजबूत दरवाजे असणाऱ्या किल्ल्यात डोक्यावल्यावर समोर चक्क मोठं पटांगण दिसतं. एकतर कोणत्याही अवशेषाशिवाय असं पटांगण पटत नाही. इथले अवशेष गायब असणार हे नक्की. आणि त्यातून तेही स्वच्छ होतं, म्हणजे आमच्या ऐकीव माहितीत न जुळणारं.

विविध आकारातील बुरुज

पलीकडच्या तटबंदीला चिकटून मात्र अवशेष दिसत होते. तिकडे जायला निघायच्या आधी दरवाजाशेजारच्या पायऱ्यांनी वर चढलो. चहूबाजूला नजर टाकली. बहुतेक भूईकोटांप्रमाणे ह्याचीही कथा वेगळी नाही. किल्ला बाहेरच्या बाजूने घरांनी वेढला गेलेला आहे. वरून बुरुज बघताना लक्षात आलं की, सगळेच बुरुज एकसारखे नाहीयेत. काही गोल आहेत तर काही अष्टकोनी.

अरे हो, एक सांगायचं राहूनच गेलं की, दरवाजात आतमध्ये उजव्या बाजूला भारताचा ध्वज मस्त फडकत होता. किल्ल्यातलं मोकळं स्वच्छ पटांगण, हे नुकतीच होऊन गेलेली २६ जानेवारी आणि या ध्वजाची कमाल असावी.

तटबंदी

आता खाली उतरून पटांगणातून मागच्या बाजूला जाण्याऐवजी तटबंदीवरूनच जावं, म्हणून कडेकडेने निघालो. काही ठिकाणी जागा एकदम चिंचोळी आहे.

घोड्याची पागा

सुंदर तटबंदीवरून मागच्या महत्त्वाच्या अवशेषांकडे आलो. इथे घोड्याची पागा आहे. नदीकिनारी ही पागा मुद्दाम ठेवली गेली, जेणेकरून घोड्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे सोयीचे होईल, असं ऐकलं. परंतु या वास्तूची रचना पाहता, ही वास्तू म्हणजे घोड्यांची पागा नसून धान्य-कोठार असण्याची शक्यता जास्त वाटते.

या वास्तुत शिरताना परत धाकधूक होती, पण चक्क इथे कोणीच नव्हतं. कदाचित आम्ही योग्य वेळी इथे असल्याने, इतर नको ते लोक इथे सापडले नसावेत. नाहीतर आक्षेपार्ह गोष्टींसाठी इथे पूरक वातावरण आणि जागा असल्याने त्यासाठीच हे कुप्रसिद्ध आहे.

पश्चिमेकडील दरवाजा

ह्या वास्तूत एक चोर दरवाजा देखील आहे. नियमाप्रमाणे इथे वास्तूत एक क्लिक केला आणि बाहेर पडलो. लागूनच असलेल्या पायऱ्यांनी नदीकिनाऱ्याच्या बाजूच्या असलेल्या दरवाजाने मागच्या, म्हणजे पश्चिमेच्या बाजूला येता येते. अर्थातच लगेच तिकडे गेलो. चार-सव्वाचारची वेळ, म्हणजे सूर्य तिकडूनच प्रकाश फेकत, तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दरवाजा वगैरे सगळंच उजळवून टाकत होता. त्याचा अपमान कसा करायचा? लगेच पायऱ्यांवर फोटो काढला.

पश्चिमेकडील तटबंदी आणि बुरुज

गंमत वगळा, पण सुदैवाने झाडे तोडून सफाई केलेली होती आणि त्यात शेजारीच नदी. तटबंदी फुफ्फुसं भरून श्वास घेत असल्यासारखी बघून मात्र बरं वाटलं.

राणीमहाल

पुन्हा किल्ल्याच्या आतील भागात आलो. पुढची वास्तू आहे राणी महाल. महालाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूने छतावर जायला पायऱ्या आहेत.

राणीमहालातून परिसर-दर्शन

आतमध्ये असलेली रचना अतिशय सुंदर आहे. अतिशय सुंदर कमानी, देवळ्या, अशी छान रचना आहे. गेल्या काही वर्षातल्या, नाविन्याने कोरलेल्या प्रियकर-प्रेयसीच्या नावांच्या शिलालेखांकडे मात्र दुर्लक्ष करायचं. नदीच्या बाजूच्या भिंतीत सुंदर कमानी आहेत, त्या प्रत्येकातून वेगवेगळं दृश्य दिसतं. थोडेसे फोटो घेऊन बाहेर पडलो.

पायऱ्यांनी वर जाऊन चहू बाजूचं दर्शन घेतलं. वर जणू काही आपल्यासाठीच विसावा घेण्याच्या दृष्टीने म्हणून मोठ्या दगडांची बाकडी केलेली आहेत. संध्याकाळच्या वेळी मावळतीला चाललेला सूर्य, नदीकिनारी किल्ला, त्यावरच्या सर्वोच्च ठिकाणी निवांत बाकडी आणि अशा नयनरम्य ठिकाणातून निघायची इच्छा कशी होईल? पण निघालो.

इथल्या भिंतीत काही भुयारं आहेत, त्यातून पलीकडे मार्ग दिसत नसल्याने नीटसं काही समजत नाही. आणि म्हणूनच ह्याला काही कथा आहेत. त्यापैकीच एक तर चक्क ह्यातलं एक भुयार इथून चंद्रपूर जिल्ह्यात जातं अशी आहे. थोडक्यात या किल्ल्यात अभ्यासपूर्ण उत्खनन आणि संशोधन गरजेचे आहे.

बारव आणि पाणी उसपण्यासाठीची रचना

किल्ल्याच्या अंतर्भागात फिरताना अजून काही वास्तू दिसतात. जवळच एक सुंदर बारव आहे. शेजारी पाणी उपसण्यासाठीची योजनाही आहे. संवर्धन करताना मात्र लागलेलं काही सामान यातच टाकल्यासारखं वाटलं. असं नसतं तर ही बारव अजूनच छान दिसली असती. इथूनही एक दरवाजा नादीकिनारी जातो.

किल्ल्याचा आतला परिसर

किल्ला मोकळाच असल्याने अवशेष शोधावे लागत नाहीत, पण ह्या मोकळ्या भागात मात्र खूप काही दडलेलं नक्कीच असणार आहे.

किल्ले भद्रावती उर्फ भांदक

आमच्या नव्या सुधारित वेळापत्रकानुसार सगळं व्यवस्थित चाललं होतं. दिवस मोठा होत असल्याचा फायदा आम्ही व्यवस्थित करून घेत होतो. त्यामुळेच बल्लारपूर मध्येच साडेचार वाजून सुद्धा पुढचा किल्ला आजच्याच यादीत होता. लगेचच आमच्या सारथ्यानी, म्हणजे अस्मादिक हो, आमचा विदर्भ-भ्रमण रथ, म्हणजे स्विफ्ट, हातात घेतला. चंद्रपूर ओलांडून भद्रावतीत तासाभराच्या आताच दाखल झालो.

भद्रावती उर्फ भांदक किल्ला हाही भुईकोट आहे. बऱ्यापैकी चौरस आकारातला किल्ला मध्यवस्तीतच आहे. किल्ला पुरातत्व खात्याकडे असल्याने फाटक बंद असण्याची शक्यता होतीच आणि झालेही तसंच. त्यासाठीच आमच्याकडे backup plan तयार होता. पण त्याची गरजच पडली नाही. सुदैवाने ज्यांच्याकडे किल्ली असते तेच भेटले आणि आम्ही किल्ल्यात शिरलो.

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार

प्रवेशद्वार सुबकच आहे. बल्लारपूर प्रमाणेच येथे वापरलेले दगडही लाल-पिवळ्या रंगातले असल्याने त्याला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे.

सध्याचे द्वारपाल

द्वारपाल म्हणून भरगच्च आयाळ असलेलं सिंह-शिल्प येथे दरवाजात दोन्ही बाजूला आहे. अर्थात हे मूळ इथलं नसून दुसरीकडून आणून इथे शोभेसाठी ठेवलेलं असणार असं लक्षात येतं.

बारव आणि उतरायचे मार्ग

आतमध्ये शिरून आधी या किल्ल्याचा उत्तम अवशेष, म्हणजे तीन मजली बारव बघायला गेलो. वास्तविक दरवाजातून आत शिरल्या-शिरल्या उजवी आणि डावीकडे आपापली जागा घेऊन बसलेल्या सुबक मुर्ती आम्हाला खुणावत होत्या, पण सूर्याच्या किरणांची कृपादृष्टी त्यांच्यावर जास्त वेळ राहणार होती म्हणून “वाईच तेवढी बारव बघून येतो आधी” म्हणून आतमध्ये आलो.

३ मजली बारव

ह्या बारवेचा आकार मात्र वेगळाच आहे. चक्क तीन बाजूने यात उतरायची सोय आहे. प्रत्येक मजल्याच्या दरवाजांच्या कमानीवरून पाणी पडायला गोमुख आहे. ह्या दरवाज्यात पायऱ्यांनी जाण्याची सोय आहे. असं सगळं पाहण्याजोगं आर्किटेक्चर आहे या बारावेचं.

किल्ल्याची तटबंदी आतून न्याहाळत आतील भागातले उध्वस्त अवशेष नजरेखालून घातले.

मुख्यद्वार आणि देवड्यातील संग्रहालय

हे गाव ऐतिहासिक असून अनेक प्राचीन मंदिरे इथे आहेत. अनेक मूर्ती काही ठिकाणी, कधीकाळी, कोणत्यातरी मंदिरात स्थानापन्न असतील, पण कालांतराने काही कारणाने इतस्ततः पसरल्या गेलेल्या वगैरे मिळाल्याने त्या व्यवस्थित आणून या किल्ल्यात ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या व डाव्या बाजूला असलेल्या पहारेकरांच्या देवड्या म्हणजे मिनी म्युझियम झालेलं आहे. अतिशय वैविध्यपूर्ण असलेल्या मुर्त्या, अतिशय सुबक असून त्यावर बारकाईने कोरीव काम केलेलं आहे.

शिरच्छेद झालेली गणपती मूर्ती आणि जैन मूर्ती

तीस-पस्तीसच्या आसपास तरी असतील मुर्त्या, पण दुर्दैवाने धर्मावर हल्ला करण्याच्या काळात ह्या मुर्त्यांची विटंबना केली गेलेली दिसते. कोणाचा हात, कोणाचा पाय तर कोणाचे शीरच गायब आहे.

मातृका आणि मानव-घोडा युद्ध मूर्ती

नृसिंह आणि वराह अवतार

महिषासुर-मर्दिनी आणि हनुमान

गणपती, देवी, शंकर-पार्वती, विष्णू, स्वर्ग-अप्सरा, वराह, नृसिंह आदी अवतार, महिषासुरमर्दिनी, यक्ष आणि विशेष म्हणजे एक माणसावर हल्ला करत असलेला घोडा अशी विचित्र वाटणारी, जिचा काही अर्थ, प्रयोजन कळत नाही अश्या मूर्ती आहेत. ह्यात हिंदू मूर्तींबरोबर जैन तीर्थंकर यांच्याही मूर्ती आहेत. अर्थातच त्याही धर्मांधांच्या विटंबनेतून वाचलेल्या नाहीत.

निरोप सुर्यानारायणाला

हे संग्रहालय पाहून, शेजारच्या पायऱ्यांनी वर चढून, किल्ल्याचा भाग परत न्याहाळला. वरूनच बारवेच्या मागच्या तटबंदी मागे लपत असलेला सूर्याला निरोप दिला आणि किल्ल्याबाहेर पडलो.

लांबून लांबून लोक आपल्या गावात येतात काहीतरी बघायला, म्हणून स्थानिकांना कौतुक असतं आणि जिथे जिथे जातो तिथली लोक अतिशय आग्रहाने आणि आपुलकीने आपल्याला आपल्या गावाचं कौतुक सांगतात. जे जे चांगलं आणि अभिमान वाटण्याजोगं आहे, ते ते इतरांनी बघावं म्हणून झटत असतात.

वाकाटक कालीन दगडी पूल

त्यात या भद्रावती गावात तर खूप काही बघण्यासारखं आहे. किल्ला, देवस्थानं आहेतच. लेणी, गुहा-मंदिर आणि बरोबरच विशेष आकर्षण म्हणजे इथल्या “डोलारा” तलावातील दगडी पूल.

मंदिर अवशेष

किल्ल्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हा “डोलारा” नावाचा तलाव आहे. ह्या तलावाच्या मध्ये एक छोटसं बेट आहे. ह्या टेकडीवजा बेटाला इथे हुडकी म्हणतात. यावर दोन झाडं आहेत आणि प्राचीन मंदिराचे अवशेष त्याच्या छायेत विसावलेले आहेत. यात खूप मूर्ती आहेत. गणपती, नंदी, एक छोटीशी शंकराची पिंडी आहे. पूर्वी इथे उमा-महेश प्रतिमा होती असं सांगतात, जी सध्या गायब आहे.

इथे पोहोचण्यासाठी म्हणून या तलावाच्या आजूबाजूला असलेल्या वस्तीमधून एक पूल वाकाटक काळात बांधण्यात आला आहे. अखंड दगडी तुळया वापरून आणि सतरा x दोन अश्या ३४ खांबांचा हा पूल आहे.

वेळात वेळ काढून इथे गल्ल्या-गल्ल्यातून निमुळत्या रस्त्यावरून नक्की येऊन बघावं असं हे ठिकाण आहे.

किल्ला बघून निघायचं म्हटल्यानंतर चहाचा आग्रह झाला आणि “चला भवानी देवीचं गुहा-मंदिर बघूया” म्हणून झालेला आग्रह मोडता येत नसल्याने तिथे गेलो.

भरवस्तीत असलेलं हे मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. या मंदिराच्या शोधाची कहाणी आश्चर्यकारक आहे आणि ती प्राचीन वगैरे नाही तर अगदीच अलीकडच्या म्हणजे १९९० च्या काळातली आहे.

१९८८ मध्ये बोरकरांकडे मंदाताई लग्न होऊन आल्या. त्यांना देवीने दृष्टांत दिला आणि “माझे द्वार खुले कर” असा आदेश दिला. त्यानुसार ह्याजागी १९९२ रोजी खोदकामाला सुरुवात झाली. त्यात देवीची मूर्ती दिसली, जी गळ्यापर्यंत गाळाने भरलेली होती. देवीच्या आदेशावरून मंदाताई तिथे गेल्या आणि मूर्तीला हात लावताच ती गाळाची माती गळून पडली.

बौद्ध/जैन गुहा आणि मूर्ती

मंदिर पाहून पुढे आजच प्रवास करावा असा विचार होता. पण स्थानिकांचा आग्रह मोडवेना. बौद्धगुहा दाखवण्यासाठी आम्हाला ते आग्रहाने घेऊन गेले. पुरातत्व खात्याकडे असल्याने त्याची वेळ संपून त्या केव्हाच बंद झाल्या होत्या. तरीही त्यांनी रखवालदाराला बोलवून, त्या उघडायला लावून आम्हाला त्यांनी दाखवल्या. यांना बौद्धगुहा म्हणत जरी असले तरी त्यातल्या मूर्ती जैनही असू शकतात, कारण तिथल्या मूर्तीची नक्की ओळख पटत नाही. पण ह्या भांदक नगरीत काही जैन मंदिरं पण आहेत, त्यामुळे जैन-गुंफांची शक्यता जास्त वाटते.

हे सर्व बघून होईपर्यंत मात्र खूप उशीर झाला होता. त्यातून पुढे जायचा वाटेतला रस्ता हा राखीव जंगलातून जात असल्याने इथेच भांदक नगरीत मुक्काम करायचा ठरवला. वेळापत्रकात हा अचानक केलेला बदल होता. पण होतं हे भल्यासाठीच. पुढे होणारा अनपेक्षित फायदा तेव्हा माहिती नव्हता. मुक्कामाची सोय बघून निवांत पाठ टाकली.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!