Sunday, July 21, 2019

वैदर्भीय भटकंती – किल्ले जिल्पी आमनेर


जिल्पी आमनेर
मेळघाटाच्या त्या घनदाट गर्द जंगलातली सेमाडोह, मांगिया, हरिसल अशी गावं ओलांडून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या धारणी गावात पोचलो. रहायची सोय झाल्याने तंबू बाहेर पडलेच नाहीत.
लवकर उठून धारणेतून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास सुरू झाला. हा रस्ता बुऱ्हाणपूर आणि खंडवा या मध्यप्रदेशातल्या शहरांकडे जाणारा सामायिक रस्ता आहे. धारणेतून साधारण १३ किलोमीटर गेल्यावर भोकरबर्डी हे महाराष्ट्रातील सीमा लगतचे गाव आहे. इथून उजवीकडे जाणारा रस्ता साधारण दोन अडीच किलोमीटर नंतर शेतातल्या वाटेने (उजवीकडची बाजू धरून गेल्यावर) तापी नदीपात्रातच घेऊन जातो. हा रस्ता गुगल मॅप मध्ये पूर्णपणे दिसत नाही. आपण उभा असलेला महाराष्ट्र आणि समोर दिसणारा मध्यप्रदेश, यांची सीमारेषा अशीही तापी नदी आहे. डिसेंबर महिना असल्याने नदीचे पात्र बर्‍यापैकी रिकामे होते. अक्षरशः नदीच्या पात्रातच आम्ही उभे होतो. उजवीकडे एका टेकाडावर उभा होता “जिल्पी आमनेर”.

उगवत्या आणि मावळत्या चंद्र-सूर्यबिंबांचा खेळ

हा इंग्रजी वाटावं असं नाव धारण केलेला किल्ला अतिशय म्हणजे अतिशयच सुंदर ठिकाणी उभा आहे. एका बाजूने वाहणारी तापी सारखी मोठी नदी, तर दुसऱ्या बाजूने तिला येऊन मिळणारी गडगा नदी. अगदी दोन्ही नद्या दोन बाजूनी जिथे येऊन एकमेकींच्या खांद्यावर सहज हात टाकून गप्पा मारत पुढे जाव्यात अशा देखण्या संगमाच्या जणू नाक्यावर हा किल्ला त्यांना निरखत उभा आहे. हा किल्ला जवळपास असलेल्या झिल्पी आणि आमनेर या गावांच्या नावावरून पडलेले नाव धारण करून आहे. याला “हासिर”चा किल्ला म्हणुनही ओळखले जाते. नुकतेच सकाळचे सात वाजून गेले होते त्यामुळे गडगा नदीच्या दिशेकडून वर येणारा लालबुंद सूर्य त्या संगमाचे विलोभनीय दृश्य आणखीनच सुशोभित करत होता. तर तापी नदीच्या पात्रापलीकडे मध्यप्रदेश भूमीवर मावळता पांढरा शुभ्र चंद्र जणू उगवत्या सूर्याला “चला आता माझी ड्युटी संपली, तुझे काम सुरु” असे म्हणत निरोप घेत होता. त्या देखाव्याला जसंच्या तसं बंद करून ठेवणं काही माझ्या कॅमेर्‍याला जमलं नाही.



नदीपात्रातल्या रंगछटा
वेळ इतकी मस्त होती की गडगा नदीचं बहुतांशी कोरडं असलेलं पात्र, तरीही अगदी झुळूझुळू म्हणावं असं थोडसं वाहतं पाणी, उगवतं सूर्यबिंब पात्रातल्या दगडांचे एकेक रंग उलगडून दाखवत होतं. किल्ला याच पायावर उभा असल्याने किल्ल्यालाच त्या रंगछटा जणू लाभलेल्या होत्या.

गडगा नदीपात्र आणि किल्ला

सुंदर बांधकाम असलेला पण भग्न बुरुज
नदीपात्र ओलांडताना किल्ल्याच्या बुरुजावर पडलेले प्रकाश-किरण त्या वास्तूचे सौंदर्य दाखवत होते. पूर्वेकडील असलेला बुरुज प्रथमदर्शनी जरी पूर्ण दिसत असला तरी त्याकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यावर पलीकडच्या बाजूने तो भग्न झालेला दिसतो. किल्ल्यावर जाणारी वाट याच बाजूने जाते. वाट मळलेली आहे परंतु किल्ल्याची ही मूळ वाट नाही. तटबंदीच्या तुटलेल्या भागातून ही वाट किल्ल्यात जाते. हा टप्पा थोडा निसरडा आहे, पण इथे असलेल्या झुडपांचा उपयोग आधारासाठी नक्की होतो. तटबंदी संपूर्णपणे बाहेरून झुडपांनी वेढलेली आहे. ज्या त्या बांधकामास नक्कीच धोकादायक आहेत. तटबंदीतून आत शिरल्यावर आकाराने लहान असलेल्या किल्ल्याचे संपूर्ण आवारच आपल्या दृष्टीक्षेपात येते. या भागातल्या इतर किल्ल्यांप्रमाणे याचेही बांधकाम भाजीव विटांमध्ये केलेले आहे.

हनुमान मंदिर

इंग्रजांनी केलेल्या “किल्ले विध्वंस” उपक्रमांतर्गत याही किल्ल्याचे नुकसान करण्यात आलेले आहे. शिल्लक तटबंदी वगळता मध्यभागी एक हनुमान मंदिर सोडल्यास काहीच अवशेष दिसत नसल्याने प्रदक्षिणा मार्गाने त्या तटबंदीवरुन फेरी चालू केली. प्रथम बाहेरून भक्कम दिसणाऱ्या परंतु दुर्दैवी भग्न अशा पूर्वेकडील बुरुजावर आलो. बुरुजाला पडलेल्या भेगेतून सूर्योदय कॅमेरात टिपण्याचा अयशस्वी प्रयत्न करून गडगा नदीला समांतर पण ढासळलेल्या तटबंदी वरून संगमाच्या कोपऱ्याकडच्या बुरूजाकडे तटबंदी वरूनच निघालो.

तटबंदी आणि काही अवशेष

या बुरुजाच्या अगदी जवळची तटबंदीची भिंत बऱ्यापैकी तुटलेली आहे पण आतील बाजूस चांगलीच झाडी असल्याने सांभाळून ह्यावरूनच बुरुजावर पोहोचावे. किल्ल्याचा हा बुरुज म्हणजे खास तयार केलेला जणू “संगम View Point”च! बुरुजावर तंबू टाकावा अशी प्रशस्त जागा असून तिथे वेगवेगळ्या कोनातून स्वतःचे आणि बुरुजाचेही फोटो घ्यायचे टाळू नये. तापी नदीला थोडे पाणी असले तरी गडगा नदी बहुतांशी कोरडीच होती. तरीही हे संगम दृश्य अप्रतिम होते. पावसाळ्यात दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असताना काय बहार येत असेल... वा! गडावर राबता असताना ह्या बुरुजावरची पहारेकरी मिळवण्यासाठी वशिले तर लावले जात नसतील?  असो...

तटबंदी आणि अवशेष
“संगम View” बुरुजाच्या बाहेरून दिसणाऱ्या पाकळ्या
अगदी मनसोक्त फोटो घेऊन तटबंदीवरुन निघालो. काही भागात तटबंदीच्या चर्या, जंग्या आणि झरोके शाबूत आहेत. मध्ये मध्ये काही खोलीला केलेले कोनाडे असावेत अशी रचनाही दिसते. पुढच्या बुरुजाकडे जाताना तटबंदीच्या आतील बाजूस खाली वाटेत एक दरवाजा आणि एक वाटही दिसली. इथून तापी नदीकडच्या बाजूला उतरता येते. परंतु झाडी खूप असल्याने पलीकडे गेलो नाही. बाहेर डोकावून “संगम View” बुरुजाकडे बघितल्यावर त्याच्या पाकळ्याही दिसतात. हा बुरुज अचलपूर किल्ल्याच्या बुरूजाप्रमाणे प्रमाणे किमान तीन-चार पाकळी बुरूज असावा. त्याच्या दोनच पाकळ्या शिल्लक राहिलेल्या दिसतात. पुन्हा आत येऊन तटबंदी पाहताना चर्या, झरोके उत्तम दिसतात. पुढच्या सर्व बुरुजांच्या खालच्या भागात दरवाजे दिसतात जे बहुतेक पूर्णपणे बुजत आलेले आहेत.

समोर तापी नदी आणि पलीकडे मध्यप्रदेश
ऊन खात असलेले पाणपक्षी
ह्या तटबंदीवरून समोर तापी नदी, पलीकडे मध्यप्रदेशची भूमी असे सुंदर दृश्य दिसते. पुढे तटबंदी जोडलेली नसल्याने खाली उतरून उरलेल्या भागाकडे जायचे होते. त्या झाडीतुन वाट काढताना शेंदूर फासलेले हनुमानाचे मंदिर दिसले. जवळील आतील भागात एक भुयार किंवा तळघर आहे, पण ते सुस्थितीत नसल्याने त्यात शिरायचा प्रयत्न करणे धोकादायक आहे.

तळघर/भुयार
या किल्ल्याला सुस्थितीत असलेले, ढासळलेले काही, तर पूर्णपणे नष्ट झालेला एक, असे धरून सात बुरुज आहेत. बहुतांशी वास्तू, बुरुज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर शिल्लक असलेली तटबंदीचा भाग कधी कोसळेल ते सांगता येणार नाही. हा छोटेखानी किल्ला हे सात बुरूज, जंग्या-चर्या युक्त तटबंदी, एके ठिकाणी फांजीवर लहानसा पाण्याचा हौद, तळघर, मंदिर असे अवशेष बाळगून आहे.
आमची गडफेरी पूर्ण झाली होती. उतरताना लक्षात आले की इथे खाजकुयलीचे वेलही आहेत. उतरताना आधार म्हणून झुडपे धरताना योग्य ती काळजी घ्यावी.
भगवान चिले यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे “गाईड चिखलदा” या नेल्सन संपादित १९२ सालच्या पुस्तकाचा. त्या पुस्तकात या किल्ल्याचा “झिल्पी आमनेर” या नावासकट उल्लेख आहे, तर १५७२ च्या सुमारास असलेला “आमनेर चर्वी” अशा नावाचा उल्लेखही ते उद्धृत करतात. इंग्रजांनी किल्ल्याच्या विध्वंसक कामासाठी १३८२ रुपये आणि ३ आणे खर्च केल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. इतरत्र मिळालेल्या माहितीनुसार १७२७ ला पहिले बाजीराव, तर १८१८ ला दुसरे बाजीराव यांचा या किल्ल्याच्या आसपास येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. किल्ले विध्वंसाच्या वेळी या किल्ल्यातील चार तोफा इंग्रजांनी नेलेल्याही लिहिलेले सापडते.
उतरल्यावर नदीच्या पात्रात पुन्हा फोटोग्राफी केली. परतताना वाटेवर डाव्या बाजूला असलेले एक पुरातन हनुमानाचे मंदिर आहे तेही पाहिले. पुढचा टप्पा होता या भटकंतीचा “Most Awaited ” किल्ला, दुर्ग चक्रवर्ती किल्ले नरनाळा!!!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!