Sunday, January 12, 2020

किल्ले चांदवड आणि मेसणा

राजधेर-कोळधेर बघून राजधेरवाडीतल्या त्या खोलीत फारच चांगली झोप लागली. ती अत्यंत गरजेची झोप झाल्यावर मात्र आदल्या दिवशी सारखा सुरुवातीला झालेला उशीर टाळून त्या दिवशी सुरुवात मात्र साडेसहाला केली. अजून तांबडं फुटलं नव्हतं, इतक्या लवकर सुरुवात करूनही आमच्या बरोबरच्या म्होरक्या मामांनी मात्र “थोडी लवकर सुरुवात केली असती तर कदाचित बिबट्या बघायला मिळाला असता” असं ऐकवलंनी. किमान मला तरी उलट ती वेळ टळून गेल्याचं बरंच वाटलं.
दिवसाची सुरुवात करून प्रथम दर्शन घेतलं इंद्राईचं! ज्याच्या नावातच साक्षात इंद्राचा उल्लेख आहे, असा विस्तारानेही प्रचंड किल्ला. ह्या किल्ल्यावर काय नाही? कातळकोरीव गुहा, पायऱ्या. नुसत्याच “कातळकोरीव पायऱ्या” म्हणणे म्हणजे त्या कारागिरांचा अपमानच ठरेल, अशी चक्क बाजूने २० फूट उंचीचा कातळ कोरून घडवलेल्या तो पायऱ्यांचा महामार्गच. शिलालेख, पाण्याची टाकी, तळघरे, नक्षीदार खांबांवर तोललेली सलग २० गुहा दालने, तलाव, शिवमंदिर... हुssश्श! असा अवशेष  समृद्ध किल्ला पाहिल्यावर वरून जे दृश्य दिसते त्याला तोड नाही. लांबवर दिसते चांदवड शहर, त्याच्या अलीकडे दिसतात ते तीन पूर्ण आणि एक अर्धवट कापलेला वाटणारा अर्धा, असे साडे तीन डोंगर, म्हणजेच साडेतीन रोडगा!
चांदवड आणि साडेतीन रोडगा नावांची व्युत्पत्ती मनोरंजक आहे, जी आधीपासूनच प्रसिद्ध असली तरी इथे उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. अगस्ति ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेले हे चांदवड गाव. एकदा स्वतःसाठी भाजलेल्या चार रोडग्यांवर तूप घेण्यासाठी ते या गावात तूप मागत फिरले. तूप कोणीही न दिल्याने चार पैकी अर्धा रोडगा गाईला खायला घालून, उरलेले साडेतीन रोडगे त्यांनी फेकून दिलंनी आणि गावाला चांडाळनगरी असा शाप देऊन निघून गेले. ते साडेतीन रोडगे म्हणजेच साडेतीन रोडगा डोंगर आणि ते चांडाळ नगरी वरून अपभ्रंश होत झालेले चांदवड! याविषयी आणखी एक अख्यायिका म्हणजे इथे असलेल्या वडांच्या झाडाची ख्याती चंद्रापर्यंत पोचलेली आहे, असे चांदवड. चांडाळपूर, चंद्रपूर आणि चांदवड काही म्हणा, पण या गावचा आणि चंद्राचा काही संबंध आहे नक्की, कारण इथल्या डोंगरावर असलेले चंद्रेश्वराचे मंदिर.

चांदवड किल्ला तलावाजवळून
इंद्राई वरून चांदवडकडे निघालो तेव्हा आकर्षण होते ते चांदवड वरच्या कातळटप्पा म्हणजे Rock Patchचे. राजधेर प्रमाणे इथेही शिडी आहे, पण ती अपुरी आहे. एकूण ४० पैकी शेवटचा २५ फूट कडा मात्र क्लाइंबिंग करून चढावा लागतो, पण हे राहिलं पुढचं. चांदवडला डोंगरावर जिथे चंद्रेश्वराचे मंदिर आहे तो पठाराचा सगळा भाग ही चांदवडच्या किल्ल्याची माची. या माचीवर जायला आता चंद्रेश्वर मंदिरापर्यंत सरळ गाड्यांसाठी डांबरी रस्ता आहे. याच रस्त्याने आम्ही वाटेत असणाऱ्या तलावापर्यंत गेलो. तलावाजवळ गाडी लावली आणि चांदवडच्या त्या कातळकड्याकडे पाहिले.
आपण उभे असलेले पठार, पुढे थोडासा चढ, मग परत बहुतेक सपाटी, परत थोडा चढ सरळ कातळाला जाउन भिडलेला आणि पुढे अभेद्य काळाकभिन्न कडा. दुपारचा बरोबर एक वाजला होता, सूर्य डोक्यावर होता. सरळ चढायला सुरुवात केली. एका दमात सगळे चढ चढून वरच्या छोट्या पठारावर वीस मिनिटात पोचलो.
  
टांकसाळ आणि मागे चांदवड किल्ला
समोरच एक मोठा वाड्याचा भक्कम चौथरा, खुपशा ढासळलेल्या पण त्यातही काही तग धरून असलेल्या भिंती, त्यातच मजबूत बांधणीची दरवाजाची कमान असे एका मोठ्या इमारतीचे अवशेष दिसतात. हीच ती चांदवडची प्रसिद्ध टांकसाळ! खूपशा किल्ल्यांवर गुप्तधनाच्या आशेने लोकांनी प्रचंड खोदाखोद करून ठेवलेली आहेच, ही इमारत म्हणजे तर चक्क टांकसाळ. साक्षात नाणी पाडण्याचा कारखानाच! इथे तर खोदकाम म्हणजे विचारता सोय नाही, जागोजागी खोदकाम...  चक्क भुयारं वाटावीत एवढाले मोठे खड्डे करून ठेवलंनी आहेत. जमीन तर सोडाच, भिंतीही उकरून ठेवलंनी आहेत.
ही टांकसाळ इसवी सन १७७२ मध्ये थोरल्या माधवराव पेशवे यांच्या आज्ञेने तुकोजी होळकर यांच्या कारकीर्दीत सुरू करण्यात आली. त्यात शुद्ध चांदीचा “चांदोरी” रुपया पाडला जात असे त्याला “चांदवडी तुर्रा” म्हटले जाते. हा रुपया अगदी पेशवाई नंतरच्या कालखंडातही वापरात होता. तो त्या टांकसाळेत दरमहा एक लाख एवढ्या प्रमाणात पाडण्यात येत असे. टांकसाळ ही या किल्ल्याची एक ओळखच. टांकसाळी सगळीकडे बांधल्या जात नसत, त्यामुळे हिचे वर्णन न चुकता करणे गरजेचे ठरते. तर ही टांकसाळ बराच वेळ खर्चून पाहून घेतली. काही भाग भाजीव विटांत, तर काही दगडात बांधून काढलेला आहे. या इमारतीत खूप खोल्या असाव्यात, तसेच दरवाजे आणि खिडक्याही.

डावीकडे शिडी, मध्ये वरती शिलालेख आणि उजवीकडे गुहा आणि टाके
 टांकसाळ मागे ठेवून कातळकड्याकडे निघालो. जिथून गडावर प्रवेश करायचा तो टप्पा गडाच्या उजव्या बाजूला आहे, त्यामुळे थोडे उजव्या हाताने चालत, वाटेत अजून बरेच वाड्याचे अवशेष पहात त्याच्या बरोबर खाली येऊन पोचलो. इथे काही गुहा आहेत. डाव्या बाजूला वर जाण्यासाठी ती १५ फुटी शिडी आहे. गुहांच्या अजून उजव्या बाजूला गेल्यास पाण्याचे कोरडे टाके आहे आणि काही अंतर राखून वरच्या बाजूला एक गुहा किंवा टाके आहे. इथेच डावीकडे वरती भिंतीवर फारसी भाषेतला शिलालेखही आहे. दोन दिवसात चार किल्ल्यांवर मिळून दिसलेला हा तिसरा शिलालेख. इतरांप्रमाणे हाही अलावर्दीखानाने किल्ला जिंकून घेतल्याचा आहे. यात हा किल्ला १४ मार्च १६३६ साली जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. पण खरंतर हे गुहा, टाके आणि शिलालेख हे सगळे अवशेष निवांतपणे आम्ही उतरताना बघितले, कारण एकतर दोन वाजले होते, सूर्य पलीकडे असल्याने पुरेसा उजेड त्यावर पडला नव्हता आणि प्रथम उत्सुकता होती ती कातळटप्पा चढून जाण्याची.

चांदवड कातळटप्पा
 जाधव मामांनी तो टप्पा चढून दोर लावलानी. मग आम्ही पाच जण एकेक करत सांभाळून तो चढून गेलो. हा टप्पा चढून गेल्यावर गडावर जायचा मार्ग, म्हणजे आपण ज्याने जाणारे तो सध्याचा मार्ग, दिसायला लागतो. कारण गडाचा हा मूळ प्रवेशमार्ग नाही. तो अजून उजव्या बाजूला, साधारण शिलालेख पहिला त्या बाजूला होता, जो इंग्रजांनी पेशवाई संपल्यानंतर किल्ल्यांची जी नासाधून चालवलंनी, त्यात उध्वस्थ केला.

सध्याच्या प्रवेशमार्गावरच्या पायऱ्या आणि जवळचे टाके
 कातळकोरीव पायऱ्या जिथे दिसतात, तिथे उजव्या बाजूला गुहा आहेत. त्या पहारेकर्‍यांच्या देवड्या असाव्यात. तर डावीकडे एक पाण्याचे टाके दिसते. पायर्‍या चढून गेल्यावर आपण थोड्या सपाटीवर येतो. आपल्याला येथे चौथरा आणि वाड्याचे अवशेष दिसतात.

उतारावरचे लपलेले खांब टाके

जोडटाके
नेहमीप्रमाणे प्रदक्षिणा मार्गाने गडफेरीस सुरुवात केली. कातळात खालच्या बाजूला बऱ्यापैकी बुजत आलेलं पाण्याचे टाकं दिसलं. जवळच खालच्या बाजूला एक खांब टाकं आहे, यातलं पाणी पिण्यायोग्य नाही. थोड्या वरच्या बाजूस असलेल्या जोड टाक्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य वाटलं. इथे जवळच एक गोमुख ठेवलेले आहे. तिकडे डाव्या हातास एक बुरूज आहे त्याला ढालकिणीचा बुरूज म्हणतात.
  
डोळ्यांना सुखावणारा हिरवागार तलाव
 नंतर ह्या पुढच्या, म्हणजे गडाच्या शेवटच्या व सर्वोच्च टप्प्यावर, म्हणजे पठारावर, आम्ही पोचलो तेव्हा वातावरण स्वच्छ होते. तिथेच राजवाड्याचा चौथरा आहे. बऱ्यापैकी उध्वस्त असलेला हा चौथरा आहे. दगडी खांबांचे नक्षीदार दगड इतस्ततः पसरलेले दिसतात. एक गोलाकार भोक असलेला एक भग्न दगडही इथे दिसला. तिथे हिरव्यागार पाण्याचे तळे दिसले, त्यात बाजूबाजूने खूप शेवाळे धरलेले आहे. पण तीन वाजून गेले असल्याने ते हिरवंगार पाणी डोळ्यांना सुखावत होतं.

सुंदर दृष्य चांदवड वरून
 इथून जो लांबवरचा परिसर दिसतो तो काय वर्णू? आपण ज्या बाजूने गडावर प्रवेश केला त्या बाजूला तर अप्रतिम दृश्य दिसले. समोरच साडेतीन रोडग्यांचे डोंगर, त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला खालपासून वर येतानाच खुणावत असलेल्या एक डोंगर, ज्याच्या टोकावर एक शिवमंदिर आहे. हे रासलिंग महादेव मंदिर. साडेतीन रोडग्यांच्यामागे अजस्त्र पसरलेला इंद्राईच्या किल्ला, त्याच्या उजवीकडून डोकावणारा राजधेर, कोळधेर मात्र इंद्राईच्या मागे लपलेला असल्याने तो दिसला नाही. फक्त त्याच दिशेला नव्हे तर चहूबाजूला अत्यंत अप्रतिम दृश्य आम्हाला दिसले. टेहळणीच्या दृष्टीने तर हा किल्ला अगदी मोक्याच्या जागी होता.

गडावरचा मित्र, शिक्रा
 हे दृश्य पाहून परतीला लागलो, तर खाली पायाजवळच गवतात एक ससाणा पक्षाची आठवण व्हावी असा भेदक डोळ्यांचा पक्षी बसलेला होता. बहुतेक शिक्रा नावाचा हा पक्षी आहे. त्याच्या पायात एखादे भक्ष असावे. आमच्याकडे नजर रोखून बघत होता. त्याच्या धीटपणामुळे त्याचे खूप फोटो आम्ही काढून त्याच्या जवळूनच परतीच्या वाटेला लागलो. वाटेत एक अजून कातळकोरीव खांब टाके लागले. पाणी तरी इतकेच थंडगार आणि अप्रतिम!

खांबटाक्यात डोकावून निरीक्षण करणारा आमच्या सह्यमित्र

चांदवड वरून टांकसाळ आणि मागे सुंदर दृष्य
 साडे तीन वाजून गेले होते, सूर्यबिंब मावळतीकडे कलले होते. परतीच्या मार्गावर सूर्यकिरण झळाळत होते. Rock Patch जवळ सगळे आलो. एकेक करून तो पॅच उतरला. खाली परत येताना काही राहिलेले चौथरे आणि अवशेष बघून घेतले. गाडी जवळून तलावाच्या मागे डोंगर आणि मागून मावळतीचा सूर्य, असे दृश्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवून घेतल्यावर चंद्रेश्वराचे दर्शन घेतले. जुने काळ्या पाषाणातील अप्रतिम मंदिर, सिमेंटचे लेप लावून, पांढर्‍या रंगात कितीही चांगले करायचा जीर्णोद्धार नावाखाली प्रयत्न केला असला तरी माझ्यासारख्याला ते विद्रुपच दिसते. त्या मंदिराची नक्षी, त्यातुन डोकावणारे विविध देव, नर्तक, पशुपक्षी केविलवाण्या नजरेने आपल्याकडे पहात आहेत, असा भास होतो. त्या नवीन रंगात मढवलेल्या जुन्या कोरीव कलाकृती पेक्षा एक पायाखाली आलेला, बेवारशी कोणी लक्ष न दिल्याने, रंग न लाभलेला नक्षीदार दगड मात्र नजरेला नजर देत जुन्या काळाची सौंदर्याची साक्ष देत असल्यासारखा वाटला.
गाडी घेऊन परतीच्या प्रवासात, वाटेवरच अहिल्याबाई होळकर यांनी १७४० मध्ये जीर्णोध्दार केलेल्या रेणुकामातेच्या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. दिवसभराची भटकंती पूर्ण झाली होती. रात्रीचे जेवण करुन मुक्कामाला गेलो ते मेसणखेडे गावात.
मेसणखेडे गाव तसे आडवाटेवरचं गाव. चांदवडवरून मनमाडकडे जाताना, वाटेत डाव्या हाताला शिंगवे गावाकडे जाणारा रस्ता लागतो, तिथूनच शिंगवे गाव ओलांडून मेसणखेड्यात जायचे. शिंगवे गावात शिरताना मात्र उजव्या हाताला डोंगरावर एक मंदिर दिसले. जीर्णोद्धार केलेले, वर छान लाईट वगैरे असलेले दत्ताचे मंदिर आहे. अंधार झाल्याने रस्ता शोधत शोधत कच्च्या-पक्क्या रस्त्याने शिंगवे गाव ओलांडून निघालो. आधी एक ग्रामस्थ भेटले, नंतर ते मेसणखेडे गाव आणि तिथले हनुमान मंदिरही मिळाले. निवाऱ्याची सोय झाली. यातले एक गावकरी, बिभीषण, सकाळी हा किल्ला दाखवायलाही तयार झाले. थंडीचा चटका दोन दिवसांपूर्वीच सोसून झाल्याने मंदिराच्या आतमध्ये तंबू लावला. फार वेळ न लावता त्यात स्लीपिंग बॅग घेऊन गुडुप झालो.
ठरलेल्या वेळेत सकाळी उठून तयार झालो. हनुमानाचे दर्शन घेऊन मंदिराच्या आजूबाजूला असलेले काही देवही बघितले. बाजूलाच एका कठड्यावर एक दगडी घोडा आणि त्यावर एक बसलेले जोडपे असे शिल्प आहे. मूळ काळ्या दगडातल्या शिल्पाला नंतर रंग दिलेला आहे. दुसऱ्या कठड्यावर दगडी वाघ आणि त्यावर देवी, असेही एक शिल्प आहे. आसपास दोन-चार वीरगळीही ठेवलेल्या आहेत. आवराआवरी करुन सरळ बिभीषण यांना बरोबर घेऊन गडाकडे निघालो. गावापासून किल्ल्याकडे जाताना वाटेत शेवटची वस्ती लागते. दहा मिनिटातच आम्हाला मेसण्याचे दर्शन झाले.

मेसणा किल्ला
 वरवर पाहता नुसताच डोंगर वाटावा असा हा किल्ला आहे. किल्ल्याचा डोंगर समोर ठेवून उजवीकडच्या बाजूला जाण्यासाठी चढाई सुरु करायची. डोंगर डाव्या हाताला ठेवत एकदम उजवीकडच्या टप्प्याला आम्ही येऊन पोचलो. तिथून गडावर जायला वाट काट्याकुट्यातून, झाडीतून जाते. खालून निघाल्यापासून अवघ्या अर्ध्या तासात आम्ही कातळकोरीव पायऱ्या पर्यंत येउन पोचलो होतो. एके ठिकाणी उजव्या बाजूला एक भुयार दिसले. पूर्वी त्यात जाता येत असं बिभीषण यांनी सांगितलंनी. पण सध्या तिथे खूपच गाळ दिसला. ते बहुतांशी बुजलेल्या अवस्थेत असून, अशा रीतीने ते बंद होऊन जाणार आहे. काही मिनिटांतच तटबंदीचे अवशेष दिसले. सगळीकडे खुपच झाडी वाढल्याने हे अवशेष त्यात लपून गेले आहेत. दगडांच्या लांब घडीव तुकड्यांनी ही तटबंदी बांधलेली आहे.

गडावरची टाकी
 गडाच्या पठारावर यायला फार वेळ लागत नाही. इकडे गावातले लोक त्यांचे पशुधन घेऊन येतात आणि काही दिवसासाठी चरण्यासाठी इथेच सोडतात. उजव्या बाजूने पठारावर शिरताना एक जोड टाके दिसले. त्यातले एक पूर्णपणे बुजलेले आहे, तर दुसऱ्यात चांगले पाणी आहे. त्यापुढे आणखी एक जोड टाके दिसले, त्यातही गाळ भरलेला आहे. जवळपास अजून एक टाके दिसले, त्यातही फक्त गाळ आणि इतर वनस्पती होत्या. एके ठिकाणी मात्र पाण्याची टाकी खोदण्याची सुरुवात करून अर्धवट सोडलेले दिसले. कदाचित तो कातळ मनासारखा मिळाला नसावा.

अर्धवट सोडलेले टाके
पठारावर इतर काही अवशेष नसल्याने सरळ गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेलो. इथे एका पीराचे थडगे आहे. खरंतर नविनच एका दगडाचाच पांढरा रंग आणि शेजारी हिरवा झेंडा लावून हे स्थान बनवलेले दिसत आहे. असो... इथून नजारा मात्र सुंदरच दिसतो. चहुबाजूला डोंगरच डोंगर, एका बाजूला चांदवड किल्ला, हे अप्रतिम दृश्य साठवून अर्ध्यातासातच खाली उतरलो.
अगदी सकाळी साडेनऊलाच परतीचा प्रवास चालू केला. एवढ्या कमी वेळात एक आडवाटेवरचा अत्यल्प-परिचित असा किल्ला मात्र पदरात पाडून घेतला होता. वर्षाचा समारोप असा आधीच्या आठवड्यात वैदर्भीय आणि आत्ता या पंचरत्नांनी असा दमदार झाला होता.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Wednesday, January 1, 2020

किल्ले राजधेर आणि कोळधेर

कोळधेर
वैदर्भीय भटकंती होऊन जरा ऑफिसात तोंड दाखवतो आहेत तोच परत शनिवार-रविवार जोडून ट्रेक-योग कॅलेंडर दाखवत होता. असे सलग ट्रेक-योग क्वचितच असतात, त्यामुळे अगोदरपासूनच हेरून ठेवलेला हा योग सत्कारणी लागलाच पाहिजे ह्याचं नियोजन विदर्भातून परत येतानाच करून ठेवलेलं होतं. भिडु तर आधीपासूनच तयार होते. यावेळी विदर्भाइतकं लांब जायचं नसलं, तरी मनमाड जवळपास म्हणजे पुण्यापासून तीनशे किलोमीटरच्या आसपास जायचं होतं. त्यामुळे रात्रीचा प्रवास करून कुठेतरी डेरा टाकायचा आणि सकाळच गडाच्यावर पोचून त्याला सरप्राईज द्यायचं असं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे ब्राह्ममुहूर्तावर राजधेर वाडीतल्या मंदिरात देवाला दर्शन दिलं. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात असलं काहीतरी करायची आमच्या अंगात जणू मस्ती होती. अर्थातच थंडीने आपला तडाखा आम्हाला दाखवायला सुरुवात वाडीत शिरता शिरताच केली होतीन. बहुतेक सगळी हाडं आतल्या-आत थंडीने खुळखुळ्यासारखी वाजत असावीत. मंदिराच्या आतमध्ये झोपायचं असूनसुद्धा आम्ही तंबू टाकला आणि त्यातही स्लीपिंग बॅग घेऊन त्याच्या आतमध्ये शिरलो. पण थंडीला हे सगळे अडथळे अगदीच साधे होते त्यामुळे अगदी अंगा-प्रत्यांगात ती शिरली होती. सकाळी सहाला उठताना प्रत्येकालाच घरी मस्त पांघरुणात गुरगुटुन झोपायचं सोडून इथे काकडत झोपणे आणि डोंगरावर उंडगत फिरणे असले डोहाळे लागण्यामागे आपल्या अंगातली मस्तीच कारणीभूत आहे याची सारखी जाणीव होत होती. पण मस्तीला पर्याय नव्हता, ध्येय तर समोर होतंच.
वेळेवर उठून, आटपून थोडं हलकं होऊन तरंगत जाधव मामांच्या घरी पोचलो. आज आणि उद्यासाठी ते आमचे म्होरक्या म्हणून धुरा वाहणार होते. आता राजधेरवाडीतून सरळ राजधेर बघायचा आणि निघायचं हे साधं सोपं गणित आम्ही सोडलं. कारण? मस्ती! ती कुठं कमी होती अंगात? आम्ही कोळधेर पण करायचं ठरवलं होतं. इथे येऊन राजधेर करून जाणारे खूप जण आहेत पण कोळधेरच्या वाटेला फार कमी जण जातात. पण कोळधेरला आमचे पाय लागायचे हे विधिलिखित होतं. कोळधेरला जायच्या दोन वाटा आहेत - एक तांगडी गावातून, तर दुसरी आम्ही जात होतो ती, म्हणजे राजधेरवाडीतून.
राजधेरवाडीतून उजव्या हाताला आपल्याला राजधेर कायम दिसत असतो तर डाव्या हाताला बघितल्यावर इंद्राई दिसतो. जिथे जायचं तो कोळधेर मात्र कुठूनच दिसत नाही. तो एका डोंगराच्या मागे लपलेला आहे. वाडीतून राजधेर किल्ला उजव्या हाताला ठेवत गावाच्या कडेकडेने बकऱ्या चारायला लोक नेतात त्या वाटेने समोरच्या पठाराकडे जात राहायचे. या पठारावरून जाताना वाटेत एक हनुमानाचे मंदिर दिसते, तिथे एक झेंडा पण रोवलेला आहे. त्याच्या मागे आपल्याला एका डोंगराचं टोक दिसायला लागतं. पण हाही कोळधेर नाही. हा डोंगर म्हणजे कोल्ह्याचा डोंगर. मात्र त्याला समोर ठेवूनच जात राहिल्यावर, पठार संपल्यावर, उजवीकडे आपल्याला कोळधेर डोकावताना दिसतो. जसं पठार संपत जातं तसतसा त्याचा अजस्त्र अवतार आपल्याला दिसायला लागतो. पण ह्या कोळधेरकडे जाताना वाट सरळ नाहीये. एका दरीला पूर्ण वळसा मारून आपल्याला त्याच्या पायथ्यापर्यंत पोचावं लागतं. इथपर्यंत यायला वाडीतून आपल्याला साधारण दीड तास लागतो.

कोळधेरच्या खिंडीतला मारुती - मागे राजधेर आणि इंद्राई

इथे खिंडीत आल्यानंतर गडाचा खरा पायथा लागतो. इथे एक मारुतीची मूर्ती उघड्यावरच ठेवलेली आहे आणि शेजारी भगवा  लावलेला आहे. इथपर्यंत आपण पहिला टप्पा पार केलेला असतो. पुढे गडाकडे वर जाणाऱ्या मार्गावर पंधरा मिनिटानंतर डावीकडे आडव्या जाणाऱ्या पायऱ्या दिसायला लागतात. तिथेच पुढे वर जाणाऱ्या दोन-चार पायऱ्या ओलांडल्यावर एक पाण्याचं टाकं लागतं. हे कोरडंच होतं. इथे येण्यासाठी ठराविक अशी मळलेली पायवाट नाहीये. अंदाज काढत काढतच इथपर्यंत पोहोचला लागतं. इथून मागे बघितल्यावर आपल्याला राजधेर आणि पसरलेला इंद्राई दिसतो. पुढे आपल्याला पायऱ्या लागतात, त्या चढून गेल्यावर एक कातळकडा आहे. जो गडाचा शेवटचा टप्पा आहे. यावर आपल्याला प्रस्तरारोहणाच्या साहित्याशिवाय जाता येणं शक्यच नाही. पण गडाचे जवळ जवळ सगळेच अवशेष ह्या कड्याला लागुनच आहेत. त्यामुळे हे अवशेष बघायला सुरुवात करायची.

पहिली गुहा - मागे इंद्राईचा विस्तार

गुहेच्या छताला असलेले पोपयाच्या बियांसारखे दिसणारे किडे/अंडी

दुसरी गुहा - दुभागणारी भिंत आणि त्यात देवळी
आम्ही अवशेष पाहण्यासाठी त्या कड्याला प्रदक्षिणा मार्गाने सुरुवात केली. इथे पहिली गुहा लागली. गुहेच्या छताच्या भागाला बघितलं तर पपईच्या बिया दिसतात तशी कुठल्यातरी किड्यांची अंडी किंवा तसंच काहीतरी पूर्ण छताला आत मधून दिसलं. प्रदक्षिणा चालू ठेवली आणि इथे वाटेत एक-दोन छोट्या-मोठ्या गुहा आणि कोरडी टाकी दिसली. एका गुहेत मात्र ती गुहा दुभागाणारी एक भिंत शाबूत आहे. त्या भिंतीत एक देवळीही आहे, हि गुहा ओलांडून तसंच पुढे आल्यानंतर कोळधेर आमच्या बरोबर मागे राहिला आणि त्याच्या पलीकडे राजधेर. या टोकावरून जे दृश्य दिसतं ते म्हणजे अहाहा...
समोरच पहिला कोल्ह्याचा डोंगर, त्याच्या धारेवरून पलीकडे उतरणारा एक मार्ग. तो दुभागून त्याच्या जणू पोटातून उजव्या बाजूला आलेला गाड्यांचा महामार्ग. पलीकडे कांचन-मंचन, इखारा सुळका, हंड्या-बंड्या, धोडप असं अप्रतिम दृश्य ह्या टोकावरुन दिसलं. इथे आम्ही मनसोक्त फोटो काढले.

कोळधेर वरून अद्भुत नजारा

एवढा प्रचंड नजारा इथून दिसतो याचाच अर्थ टेहळणीच्या दृष्टीने कोळधेर हे खूप महत्त्वाचे ठिकाण असावे, किंबहुना हा टेहाळणीसाठीच बांधलेला किल्ला असावा.

शंकराची पिंड, त्यावर नैसर्गिक अभिषेक

प्रदक्षिणा पुढे चालू ठेवली. एक शंकराची पिंड लागली. या पिंडीवर कातळामध्ये एक कपार आहे तिथून कायम जलाभिषेक होत असतो. गावकर्‍यांनी इथे एक ध्वज आणि घंटा लावून ठेवलेली आहे. इथेच आजुबाजूला किल्ल्यावरच्या वाड्यांचे किंवा इतर असे घडवलेले दगड पडलेले आहेत. प्रदक्षिणा पुढे चालू ठेवताना असाच एक शेंदूर फासलेला अनगड देव लागतो. असे फिरत फिरत आपण परत राजधेरच्या बाजूला येऊन पोचतो. इथून राजधेरचे किती फोटो काढू आणि किती नको असं होतं. आता आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करून आलो होतो. इथून खाली उतरायला सुरुवात केली आणि वाट वाकडी करून थोडं उजव्या बाजूला गेलो ते एक टाकं बघण्यासाठी. याच्यात मात्र पाणी शिल्लक होतं. इथून कोळधेरचा कातळ कडा फारच चांगला दिसतो. आमचा कोळधेर बघून झाला होता. आता राजधेर बघायचा होता.

पायथ्याचंं टाकं आणि गडाचा कातळकडा
  
राजधेरवर जाण्यासाठी परत दोन पर्याय शिल्लक होते, एक म्हणजे सरळ राजधेरवाडीत परत जायचं आणि तिथून सोप्या मार्गाने राजधेर गाठायचा. नाहीतर कोळधेरवरून पूर्ण ट्रॅव्हर्स मारून राजधेरच्या पायथ्याशी जायचं. आम्ही दोन्ही वाटा बघायला मिळाव्यात म्हणून सरळ राजधेरवाडीत न जाता ट्रॅव्हर्स मारून राजधेरच्या पायथ्यापर्यंत निघालो. इथे जाण्यासाठी परत आपण कोळधेरला येताना जो वळसा मारून आलो तो जसाच्या तसा परत मारून पठारावर जावं लागतं. इथून वाट वेगळी फुटते जी राजधेरकडे जाते. सकाळची थंडी केव्हाच मागे पडली होती आणि उन भयंकर लागत होतं. आता राजधेरच्या खिंडीत आलो तेव्हाच पावणेबारा झाले झाले होते, वाटेत जराशी विश्रांती घेत तब्बल तासाभराने आम्हाला राजधेरच्या पायथ्याशी एक पत्रा दिसायला लागला, इथे एका दगडाला शेंदूर फासलेला आहे आणि शेजारी त्रिशूळ व घंटा असं लावून पद्धतशीर मंदिर तयार केलेले आहे. हा झाला राजधेरचा पायथा. आता खडी चढण चढून आम्हाला राजधेरच्या शिडीपर्यंत पोचायचं होतं, साधारण अर्ध्या तासाने एक मोठ्ठ्या पठारावर आम्ही आलो. समोर राजधेर दिसत होताच, पण आता डावीकडे नजारा होता तो म्हणजे मगाशी पाहिलेले सगळे डोंगर-सुळके आणि कोळधेर.

आम्ही गेलो ती डुगडुगणारी शिडी आणि सध्या असलेला नवीन जिना

इथे फार वेळ न घालवता राजधेरकडे जायला लागलो आणि काही वेळातच आम्हाला लांबवर ती प्रसिद्ध शिडी दिसायला लागली. झप-झप पावले उचलली आणि लगेच शिडीजवळ पोहोचलो, इथे शिडी नसती तर दोर आणि प्रस्तरारोहण याशिवाय काही पर्याय नव्हता. पण शिडी लावून इथलं महत्त्वाचं काम लोकांनी केलेलं आहे. शिडीची अवस्था थोडी वाईट झालेली होती. आधीच ती डगमगत होती, त्यात काही पायऱ्या लोखंडाच्या पडून तिथे लाकूड बांधलेलं होतं, तर काही पायऱ्या शिल्लक राहिल्याच नव्हत्या. अशा डगमगत्या शिडीवरून एकेक करत सगळे जण गडाच्या पहिल्या दरवाजात दाखल झालो. इथे मात्र सरळ पायऱ्या वर जाताना दिसतात, भिंतीवर एक फारसी भाषेतला लेख लिहिलेला आहे, ह्या लेखामध्ये अलवर्दी खानाने इंद्राई व चांदवड सोबत राजधेरचा हा किल्ला देखील जिंकला असं लिहिलेलं आहे. पूर्वी गावकऱ्यांमध्ये अशी समजूत होती कि ह्या किल्ल्यावर प्रचंड धन दडवलेले असून ह्या गूढ अक्षरातील लेखात त्याची माहिती दिलेली आहे.

फारसी भाषेतील शिलालेख

आम्ही गेलो तेव्हा आणि आत्ता ब्लॉग लिहित असलेला ह्यात गेलेला वेळ, ह्या काळात येथे ती डगमगती शिडी बाजूला करून चांगला पक्का अगदी एखाद्या घराच्या गच्चीवर जायला असतो तसल्या प्रकारचा जिना लावलेला आहे आणि राजधेरवाडीतून चांगला रस्ताही केलेला आहे.

गडावरच्या पायऱ्या

उजव्या बाजूला दिसणाऱ्या पायऱ्यांवरून आपण गड बघायला सुरुवात करायची. तिथे पुढे आम्हाला एक गुहा दिसली, या गुहेत भिंतीत चक्क बसायला आणि टेकायला बाकडं असावं असं काहीतरी स्ट्रक्चर बनवलेलं आहे. या गुहेतून बरोबर समोर इंद्राईचा प्रचंड पसरलेला नजारा आपल्याला दिसतो.

भग्न दरवाजाचे कसेबसे तग धरून असलेले अवशेष

पायर्‍यांनी वर चालू लागल्यावर जिथे पायर्‍या संपतात, म्हणजे स्पष्ट आणि व्यवस्थित असलेल्या पायऱ्या संपतात, तिथे आपण एका दरवाजात शिरतो. त्या भग्न दरवाजाचे अवशेष आणि शेजारची तटबंदी शिल्लक आहे, उरल्यासुरल्या दगडांवर निवडुंगाचे फड वाढलेले आहेत. डाव्या बाजूने अवशेष बघायला सुरुवात करत एका मोठ्या कातळभागावर आम्ही येऊन पोचलो. त्या कातळावर चढल्यावर डाव्या बाजूला खालच्या बाजूला एक थडगं दिसलं. या थडग्याला पांढरा रंग लावून ठेवलेला आहे. मागे वळून बघितलं तर आम्ही ज्या बाजूला आलो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला एक काहीतरी वास्तू दिसत होती, पण हे आम्हाला नंतर बघायचे होते. सध्या आमची फेरी डावीकडून तिथे येणार होती. आम्ही ज्या कातळावर होतो त्या कातळावर वरतीच एक गोलाकार घुमट असलेली वास्तू आहे, ते नेमकं काय आहे हे मात्र लक्षात आलं नाही.

कोठारसदृष गुहा

या वास्तूच्या आधीच उजव्या हाताला दगडात खालच्या बाजूला कोरलेल्या दोन कोठ्या आहेत. ह्या कोठ्या दुभागणारी एक दगडी भिंत मध्ये आहे आणि याच्या आत उतरण्यासाठी एक लाकडाची शिडी ठेवण्यात आलेली आहे. तिथे सध्या तरी कोणी दिसत नव्हतं, पण आधी एक कोणीतरी योगीपुरुष तिथे राहत होते किंवा अजूनही राहतात. ह्यांनीच गावकऱ्यांच्या मदतीने हि लाकडी आणि खालची 40 फुटाची लोखंडी शिडी केलेली आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली. आत त्यांना झोपण्यासाठी म्हणून व्यवस्थित बाज वगैरे आणून ठेवलेला आहे.
या कातळ टप्प्यावरच काही पायऱ्या खोदलेल्या दिसतात. इथून पुढे एक आम्हाला टाकं दिसलं ज्याच्यात अतिशय स्वच्छ पाणी होतंह्या खांबटाक्याला लागुनच एक छोटं टाकंही आहे. ते मात्र कोरड होतं. पुढे जाताना डाव्या बाजूला एक प्रचंड मोठा तलाव लागला ज्यात भरपूर पाणी होतं.

तलावाजवळचे शंकराचे मंदिर
तलाव आणि मागे इंद्राईचा प्रचंड विस्तार

जवळच चार-पाच कातळ्यातल्या पायऱ्या दिसल्या, जिथुन गेल्यावर पुढे एक शंकराचं मंदिर लागलं. या मंदिराचे बांधकाम विटांनी केलेलं आहे. इथून मागे तलाव आणि पलीकडे इंद्राईचा विस्तार असं दृश्य फार मोहक दिसतं.

पाण्याची टाकी

पुढे फिरताना वाटेत काही चौथरे दिसतात, तर अजून एक दोन कोरडी टाकी दिसतात. त्या पुढचं टाकं दिसलं त्यात मात्र अतिशय स्वच्छ पाणी होतं. आधी कितीही पाणी प्यायलेलं असलं तरी असं नितळ, स्वच्छ टाकं दिसल्यानंतर त्यातलं पाणी प्यायचा मोह आवरत नाही.

T-Shaped टाकं - ज्याचा पूर्ण फोटोही घेता येत नाही

हे टाकं पाहून झाल्यानंतर जे आम्हाला टाकं दिसलं ते म्हणजे या राजधेर किल्ल्याची ओळख म्हणता येईल. सगळ्याच किल्ल्यांवर बरीच टाकी असतात, अतिशय सुंदर-सुंदर खांबटाकीही असतात. या किल्ल्यावरही टाकी आहेत, पण ह्या टाक्याची बात काही औरच. इंग्रजी T अक्षराच्या आकारातील हे टाकं नेमकं कशासाठी अशाप्रकारे बनवलं असावं ते काही कळत नाही पण त्याचं सौंदर्य मात्र जबरदस्त. T मधली उभी रेषा म्हणजे इतकी लांब आणि उंच कि त्याच्यातनं आपण सहज चालत जाऊ शकतो आणि वरून कोणाला दिसणारही नाही. त्याच्यानंतर T ची वरची आडवी रेषा म्हणजे टाकं. त्याच्यात खांब आणि पाणी आपल्याला दिसतं.
पुढे फिरताना आम्हाला अजून एक टाकं लागलं जे खूप सुंदर होतं. एकदम परफेक्ट आयताकृती टाक पाण्याने ओतप्रोत भरलेलं होतं. त्यापुढे वाड्याचे अवशेष असणारी एक भिंत दिसली. ज्याच्या डावीकडे अजून एक टाकं होतं ते पाण्याने भरलेलं होतं आणि आतमध्ये एक खांब होता.
आम्ही परत त्या घुमटाकार वास्तूच्या इथे आलो होतो. किल्ल्यावरचे सगळ्यात वरच्या टप्प्यातले सगळे अवशेष बघून झाले होते. पण गडाच्या माचीवरची एक वास्तू बघायची आम्ही ठेवलेली होती, ती म्हणजे या राजदरबारातील सदर. जी आम्हाला आधीपासूनच वरून दिसत होती. हि सदर म्हणजे एक मोगल स्थापत्यकलेचा सुंदर नमुनाच आहे.

गडाची अप्रतिम कलाकुसरयुक्त सदर

गडाच्या माचीवर हा एकमेव अवशेष शिल्लक आहे. गावातले लोक याला किल्लेदाराचा वाडा असे म्हणतात. या वास्तूच्या दर्शनी बाजूस तीन कमानी आहेत ज्या कमानी उत्तम प्रकारच्या नक्षीदारीसह घडवलेल्या आहेत. कमानीच्या मधले दोन्ही आणि बाजूच्या भिंतीतले दोन असे खांब उत्तम प्रकारे घडवलेले आहेत, तर मधल्या कमानीच्या वरती एक कमळ कोरलेलं आहे. मधल्या कमानीच्या बरोबर मागे आत मध्ये भिंतीत अजून एक कमान कोरलेली आहे, ही कमानही नक्षीदार आहे तर बाजूस असलेल्या कमानी मात्र सुबक असल्या तरी नक्षीदार नाहीत.
पाच वाजून गेले होते. परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली होती. आल्यावाटेने पायऱ्यांनी परत शिडीजवळच्या दरवाजावर पोहोचलो. आता मात्र शिडी उतरताना निवांतपणा असल्याने त्यात डगमगत्या शिडीचा थरार अनुभवत फोटोही काढून घेतले. गावकर्‍यांनी त्या शिडीच्या पायथ्याशी काही गुरं चारायला आणलेली होती. काहीच दिवसांपूर्वी बिबट्याने इथे बैल किंवा तत्सम जनावर मारल्याचे त्यांनी आम्हाला सांगितलं. इथेच गडाच्या कातळकड्यात डाव्या हाताला एक पाण्याचे टाकं किंवा गुहा आहे. यात तीन कमानी आहेत आणि टाक्यात पाणी आहे. याच्यापुढे आणखीन एक कोरडं जोडटाकं दिसलं. आता मात्र गडाचे सगळे अवशेष व्यवस्थित पाहून झाले होते.

राजधेर आणि मावळतीचा सूर्य

राजधेर किल्ला पाठीमागे ठेवून राजधेरवाडीकडे उतरताना समोरच इंद्राईच्या पायथ्याशी तलाव आणि मावळतीच्या सुर्याचे  किरण अप्रतिम दिसत होते. मागे वळून पाहिलं तर राजधेरची लांबवर पसरलेली भिंत दिसत होती. डाव्या बाजूला हळूहळू डोंगराच्या खाली जात सूर्याने आमचा निरोप घेतला.
गावात खाली पोहोचलो. तिथे ठेवलेल्या काही स्मृतीशिळा बघितल्या. रात्रीचे जेवण जाधव मामांकडेच होतं. आज मात्र झोपायची सोय गावकऱ्यांनीच आमच्यासारख्या पाहुण्यांसाठी केलेल्या एका खोलीत झाली होती. त्यासाठी भाडं लाऊन उत्पन्नाची सोयही ग्रामपंचायतीने केलेली आहे. अर्थात ती सत्कारणी लागल्याचे आम्हाला लगेच दिसले. उरलेल्या वेळात इतरत्र फिरलो तर गाव कमालीचं स्वच्छ ठेवलेलं आम्हाला दिसलं. अंधार पडल्यावर फार वेळ न काढता जाधव मामांकडच्या जेवणावर आडवा हात मारून आमचीच वाट बघत असलेल्या त्या खोलीत थंडीची काळजी न करता पांघरुणात गुडूप झालो.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!