किल्ले मालखेड
गुलबर्गा अर्थात कलबुर्गी किल्ल्यापासून सुमारे ४१ किलोमीटरवर “सेदाम” रस्त्यावर “कगिना” नदीच्या काठी हा किल्ला आहे. कलबुर्गीसारखा किल्ला सोडल्यास इकडच्या भागातल्या कोणत्याही किल्ल्यावर जाताना गाव येईपर्यंत गुगल काकूंच्या सांगण्याप्रमाणे जावं. नंतर नम्रपणे त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून गावातच रस्ता विचारून त्याप्रमाणे जावं. नाहीतर आपली गाडी एखाद्या घराच्या दरवाज्यात जाऊन अडकण्याची शक्यता आहे.
तर, मालखेड किल्ल्यावर जाण्यासाठी ह्या गुगल काकू, “कगिना” नदीचा पूल ओलांडला की लगेच उजवीकडे वळायला सांगतात. पण तसं न करता पुढे जाऊन मुख्य चौकातून उजवीकडे वळावं. पुढे गल्लीबोळातून विचारतच गाडी घालावी.
आम्ही एकूण आठ जण, त्यामुळे ४-४ जणांच्या २ गाड्या. अश्यावेळी दोन्ही गाड्यांचा ताळमेळ ठेवावा लागतो. मुळ नियोजनानुसार कलबुर्गी नंतर मार्तूर किल्ला ठरला होता, पण तो वेळेअभावी रद्द करायला लागल्यामुळे मार्तूर-शाहबादकडून मालखेडकडे न जाता, आधी मालखेडकडे जायचं ठरलं. पण या गोंधळात दुसरी गाडी मार्तूर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागली होती. त्यांना अर्ध्या वाटेतून परत बोलवावं लागलं. तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन मालखेड किल्ल्याचा रस्ता, आत जायची जागा बघून, त्यांनाही कळवलं.
हाही भुईकोट असल्याने अतिक्रमणामुळे म्हणा किंवा वडिलोपार्जित जागा मिळाल्यामुळे म्हणा, प्रचंड वस्ती आहे आणि त्यामुळे खूप वास्तू नामशेष झालेल्या आहेत. ह्या किल्ल्याचे अवशेष गावात आजूबाजूला दिसतात पण ते बऱ्यापैकी नष्ट झाल्यामुळे फक्त मुख्य किल्ला शिल्लक राहिलेला आहे. ह्या किल्ल्यात जाईपर्यंत चिंचोळ्या वस्तीतून जाताना वाटेत जुन्या मिळालेल्या हिंदू देवता कशाही कुठेही कोपऱ्यात पडलेल्या दिसतात. त्या मूर्तींवर कचरा वगैरे न पडता एका बाजूला स्वच्छ जागी उभ्या आहेत एवढंच समाधान.
![]() |
पहिले प्रवेशद्वार |
![]() |
दुसरे प्रवेशद्वार |
गडाचे मुख्य प्रवेशद्वार असे जे आहे, तिथे जाऊन गाडी लावली. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. आत मध्येही दोन बुरुज असून दुसऱ्या प्रवेशद्वाराची कमान आहे. सुदैवाने सगळं शाबुत आहे आणि गंमत म्हणजे सगळं शहाबादी दगडात बनवलेलं आहे. पण इथेच बाजूला बैलगाडी-ट्रॅक्टर वगैरे उभं केलेलं आहे, कचरा तर सगळीकडेच आहे. बुरुजांवर असलेली झाडं ते बांधकाम पाडून टाकणारच आहेत हे मात्र नक्की.
![]() |
दुसऱ्या प्रवेशद्वारा मागील कमानी |
![]() |
बुरुजावरून दिसणारी प्रवेशद्वारांची रचना |
![]() |
तटबंदीच्या भिंतीला लागून असणारे दर्गे |
![]() |
मस्त शहाबादी दगडातील पिवळसर पांढऱ्या रंगातले बुरुज |
येथून आत गेल्यावर समोरच एक दर्गा आहे. शेजारी थडगं आहे. अजून एक दोम्ही बाजूला बुरुज असलेलं प्रवेशद्वार ओलांडून गेलो आणि समोरच मुलं क्रिकेट खेळताना दिसली. इथे आतल्या बाजूला थडगी आहेत, जी नंतर आणून ठेवलेली असावीत. उजव्या बाजूला आठ एकामागून एक अशा कमानी आहेत हे बांधकाम कसले आहे ते नक्की सांगता येत नाही. कमानींच्या आधी उजवीकडे वर जायला दरवाजा आहे. त्या दरवाजातून वर गेलो. बुरूजावरून प्रवेशद्वारासमोरचा दर्गा, प्रवेशद्वाराची रचना वगैरे सगळं स्पष्ट दिसायला लागलं. तटबंदीला चिकटून असलेला अजून एक दर्गा दिसला. प्रशस्त फांजीवरून चालत, त्या बाभळीच्या काट्यातून वाट काढत, मी कोपर्यातल्या बुरुजापर्यंत जाऊन आलो. तिथे एक थडगं आहे. आजूबाजूला सगळी वस्ती दिसत होती किल्ल्याच्या आत मधल्या बाजूला. इथले लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. एक तर हे किल्ले कोण येतंय बघायला? मुळात ह्यात काही कोणी बघायला येण्यासारखं काय आहे हाच त्यांना प्रश्न पडत असावा. त्यामुळे कोपऱ्यातल्या बुरुजावर येणाऱ्या माझ्याकडे तसे बघणारच. तर, असेच एका विचित्र नजरेने बघणाऱ्या मुलाला “तुम्हाला घर यहा पे है क्या?” वगैरे सहज विचारल्यावर “तो? ये सब हमाराही तो है!” असं उत्तर मिळालं. वास्तविक तिथली एकूण अवस्था बघता तो भाग कोणाचा असणारे हे वेगळे सांगायची गरज नव्हती. असो... इथे सगळीकडे बाभळीची झाडी वाढली आहे त्यातूनच सांभाळून परत दरवाजाजवळ आलो.
![]() |
काली मशीद |
![]() |
काली मशीद |
इथे इंग्रजी “Y” सारखा भाग आहे, जिथे उजवीकडच्या रस्त्याने वस्तीकडे जाता येतं, तर डावीकडचा रस्ता “काली मस्जिद” कडे जातो. ही “काली मस्जिद” एक पडकं बांधकाम आहे. त्याच्या आधी एक भव्य बुरुज आहे. बुरूजावर सगळे गवत आणि बाभळी माजलेल्या आहेत. आधी ती मशीद बघायला गेलो. ही वास्तू बर्यापैकी उद्ध्वस्त झालेली आहे, ढासळलेली आहे. पण जे शिल्लक आहे त्यावरचे नक्षीकाम काम मात्र बघण्यासारखे आहे. समोरच तीन कमानी, त्या कमानींवर नक्षीकाम, वर घुमट असं नेहमीसारखं अगदी टिपिकल बांधकाम आहे.
![]() |
बुरुजाचा दरवाजा: नक्षी, भगवान पार्श्वनाथ आणि शिलालेख |
हे सगळ बघुन उलट बुरुजाजवळ आलो. वर जायचा दरवाजा एकदम अप्रतिम आहे. त्याच्या कमानीवर तीनही बाजूंना नक्षीकाम आहे. पायाशी दोन्ही बाजूला कोरलेल्या मूर्ती आहेत. तर कमानीच्या बरोबर मध्ये वरती “भगवान पार्श्वनाथ” यांची मूर्ती आहे. त्याच्याहीवर फारसीतला एक शिलालेख कोरलेला आहे.
|
|
वर जाणाऱ्या पायऱ्यांचे सौंदर्य काय आहे... जेमतेम १५-२० असतील पायऱ्या. पण असं गोलाकार बांधकाम आहे. मस्त. इथे वर जाऊन बऱ्यापैकी किल्ला दृष्टीक्षेपात येतो. एका बाजूला वस्ती, एका बाजूला नदी, एका बाजुला दाट झाडी. वस्तीच्या बाजूला आणखी एक दर्गा दिसला आणि बांधकामाचे अवशेष. तिकडे नंतर जायचं ठरवलं. आधी मशिदीच्या मागची वास्तू बघायला गेलो.
![]() |
जीर्णोध्दारीत १२ खांबी वास्तू |
ही वास्तू जीर्णोद्धारात बांधली असावी. जुने खांब शाबूत असल्याने ते तसेच वापरलेले आहेत. ही वास्तू १२ खांबी आहे. इथे डाव्या बाजूला जुन्या मंदिराचे अवशेष पडलेले दिसतात. येथून सरळ जाणारी वाट ही “अंजनेय” हनुमान मंदिराकडे जाते. मंदिराचे ठिकाण आणि तिथून दिसणारं “कगिना” नदीचं दृश्य अप्रतिम असणार हे नक्की. पण बाभळी प्रचंड वाढल्यामुळे तो भाग आमच्या नशिबात नव्हता.
![]() |
किल्ल्यातील आणि बाहेरील इतस्ततः पडलेल्या मूर्ती |
त्यामुळे उलट मागे फिरून परत Y शी आलो. येथे उजवीकडच्या रस्त्याने वस्तीकडे गेलो. तो समोर दर्ग्याबाहेरच वीरगळ, सतीचा हात, हिंदू देवतांच्या मूर्ती आणि विना मुंडक्याचा नंदी एका झाडाखाली बेवारशी पडलेला दिसला. समोर उध्वस्त वाडे दिसले. एक बुरुज आणि निळ्या रंगाने रंगवलेला दरवाजा होता. तिथून आत मात्र गेलो नाही कारण सगळीकडे वस्तीच वस्ती होती. तसंही बघायला काही मिळणार नव्हतं, उलट लोकांच्या विचित्र नजरा मात्र दिसल्या असत्या. किल्ल्यातून बाहेर आलो आणि गावातून बाहेर पडताना जुन्या सापडलेल्या मूर्ती ठेवलेल्या दिसल्या. जिथे मूर्ती ठेवलेल्या दिसल्या तिथे स्वच्छता होती. असणारच म्हणा! Its but obvious. पाच वाजलेच होते. मार्तूर किल्ल्यावर पाणी सोडायला लागलं असलं तरी शहाबाद किल्ला मात्र चुकवायचा नव्हता.
किल्ले शहाबाद
शहाबाद हा किल्ला “जुने शहाबाद” या भागात आहे. मालखेड वरून जसजसा जुना शहाबाद भाग जवळ यायला लागला, तसतशी सगळी घरं, दुकानं शहाबादी दगडात दिसायला लागली. त्या-त्या भागात मिळणाऱ्या दगडाने तशी बांधकामं केलेली असतात. सर्वसाधारणपणे सगळीकडे लाल विटांची बांधकामं असतात. मराठवाडा-खानदेश भागात काळ्या दगडांची तर कोकणात लाल चीऱ्यांची असतात. तशी ह्या बाजूला सगळी शहाबादी फरशांची, म्हणजेच दगडांची. येताना वाटेत ह्याच दगडाची खाण आणि फरशांचा कारखानाही दिसला होता. इकडे फिरायला येताना लहान कार ऐवजी सरळ ट्रक घेऊन आलो असतो, तर हव्या तेवढ्या शहाबादी फारश्या भरून नेता आल्या असत्या. Joke Guys...
![]() |
प्रवेशद्वार |
गावात आलो तेव्हा जवळजवळ पावणे ६ वाजत आले होते. सुर्यास्त लवकरच होणार होता. त्यातून हिंदू-मुसलमान बाबतीत हा भाग जास्तीच नाजूक आहे असं ऐकिवात होतं. त्यामुळे किल्ल्याची वाट शोधण्यापासून आत मध्ये जायला मिळेल की नाही अशी मनात साशंकताच होती. पण तिथे पोचल्यावर हा प्रश्न सरकारने आधीच सोडवून ठेवलेला दिसला. गडाचे प्रवेशद्वार चक्क सिमेंटने बंद करून ठेवलेलं आहे. शेजारी “अशोक चौक, जुने शहाबाद” असा बोर्ड आहे.
ऐकीव माहितीवर शिक्कामोर्तब
लगेच झालं. फोटो काढताना मध्ये दरवाजात लावलेली मारुती ८०० गाडी मध्ये येत होती, ती काढायला तेवढ्यात त्यातली लोकं आली. गाडी बाहेर काढल्यानंतर फोटो चांगला मिळेल म्हणून त्यासाठी आम्ही सज्ज झालो, पण आम्हाला हातात मोबाईल फोटो काढायला धरलेला बघून सरळ बघून त्यांनी गाडी बाजूला काढायचं रद्द केलं. उलट आम्हाला दहा प्रश्न विचारले. तशी चूक म्हणता नाही येणार, कदाचित तिथली परिस्तिथी तशी असावी!
दरवाजा जरी बंद केलेला असला तरी त्याची कमान, त्यावरचे नक्षीकाम सगळं बघता येत होतं. दरवाजाच्या कमानीवर ती एक झरोका आहे, त्यातून आता झाडं झुडपं डोकावत होती. त्यावर बुरुजांच्या नक्षीकामाला जोडून असं नक्षीकाम आणि त्याच्या वरती ही बुरुजांच्या वरच्या भागाला जोडणारी भिंत. भिंतीवरही नक्षीकाम आहेच. भिंतीच्या एकदम वरती कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे पाकळी बांधकाम आहे.
संपूर्ण शहाबादी दगडात असलेले हे बांधकाम मजबूत आहे आणि टिकून आहे. पण या सगळ्यावर वाढलेली झाडी, पायाशी पडलेला कचरा, लोखंड, ट्रॅक्टरचे भाग.. हे सर्व बांधकामाला नक्की धोका पोहोचणार आहेत. त्यात जोडीला लोकांची आणि सरकारची अनास्था! असो..
![]() |
किल्ल्यात आतमध्ये जात येईल असे एकमेव प्रवेशद्वार |
किल्ल्याच्या आतमध्ये जाता येणार नसल्याने आता समोर एकच मार्ग होता तो म्हणजे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा मारायची. तशी सुरुवात केल्यावर पुढच्या उजवीकडच्या भिंतीत आकाशी रंगाने रंगवलेलं किल्ल्यात आतमध्ये जात येईल असे एकमेव प्रवेशद्वार दिसलं. या दरवाज्याच्या खांबांवरची नक्षी इथे मंदिरच आहे हे ओरडून सांगत होतं. कमानीच्या दोन्ही बाजूला वरती लाकडात घडवलेली घोड्यांची तोंडं आहेत. ही वास्तू काय आहे ह्या चर्चेला पूर्णविराम मिळत होता ते आतमध्ये सुरुवातीलाच असलेलं तुळशी वृंदावन बघून. तरीही आम्हाला आत जाऊ दिलं गेलं नाही.
![]() |
सुदर बांधकाम आणि दुरावस्था |
![]() |
मागील बाजूचे प्रवेशद्वार |
![]() |
बजावलेली २ लहान प्रवेशद्वारं |
पुढच्या तटबंदीच्या भिंतीवर शेणाच्या गोवऱ्या थापून ठेवलेल्या दिसल्या. वर बुरुजाची नक्षीदार कमान, बांधकाम आणि खाली कचरा आणि त्यात बागडणारी डुकरं. पुढे गेल्यावर गडाच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार दिसलं. हे पण सिमेंटने बंद करून ठेवलेलं होतं. अर्धे नक्षीदार खांब, शहाबादीत केलेलं बांधकाम त्यावेळी मजबूत असलं तरी आता ढासळत चाललेलं आहे. पुढील भिंतीत दोन लहान प्रवेशद्वारं, अर्थातच बुजवलेली. पण त्यावरच भिंतीतच प्रचंड वाढलेले दोन पिंपळवृक्ष मात्र इथं मोठं प्रवेशद्वार
लवकरच निर्माण करून ठेवणार आहेत हे नक्की. त्यानंतर अजून एक बुरुज बघून परत मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो.
मारुती ८०० कार निघून गेलेली होती. जेवढा जमेल तेवढा किल्ला बघून झाला होता. आजच्या दिवसाची किल्ले भ्रमंती झालेली होती.
प्रमोदकृपेने ओळखीने राहण्याची सोय झाली होती “एकदंडगी” मठाच्या जागेत. चक्क त्या मंदिरात आमची राहायची सोय त्यांनी करून दिली. हा सध्या “श्रीनिवास” स्वामींचा मठ. हे मुळचे विजयनगर साम्राज्याच्या वेळपासून आध्यात्मिक कार्य करतात. ते साम्राज्य खालसा झाल्यानंतर हे सगळे स्वामी इतस्ततः विखुरले. या स्वामींचे वडील इथे यादगीर मध्ये येऊन राहिले. त्यांचे उत्तराधिकारी हे श्रीनिवास स्वामी. इथे आमची राहायची आणि अंघोळीची सोय झाली होती. इथे राहायचे होते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी यादगीरचा किल्ला बघायला सोयीचा जाणार होता.
![]() |
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteकृपया अभिप्राय खाली आपले नांव लिहा :)
This comment has been removed by the author.
ReplyDelete