पहिल्या दिवशी ३ किल्ले पाहून झाल्यावर यादगिर
शहरात मुक्कामी आलो. इथे सोय स्वामींच्या मठात झाल्याने राहण्याबरोबर अंघोळीचाही
प्रश्न सुटला. फक्त पाणी मात्र थंsssड! थंड पाण्याला उपाय एकच, गाणं! स्तोत्र
म्हणत पाणी अंगावर घ्यायचं, कि संस्कृत जड शब्दांचा संधी-विग्रह आपोआप होतो. चक्क
थंडीच्या दिवसांत पहाटे पाच-साडेपाचला अंघोळ, तेही ट्रेक/किल्ले भटकंतीत...
अश्यावेळी १२ अंघोळींचं पुण्य लाभतं म्हणतात.
हा किल्ला “राहूदे, सोडून देऊ” प्रकारातला
नव्हता. त्यामुळे वेळ बघता यक्षप्रश्न निर्माण झाला. किमान बंद दरवजापर्यंत जाऊ
आणि बघू तिथे कोणी असेल तर असा विचार झाला.
महादरवाजा |
मस्तपैकी जाळीचा दरवाजा आणि व्यवस्थित लावलेलं
कुलूप. काहीच पर्याय दिसेना. शेजारी कन्नडमधली पाटी. त्यावर किल्ला उघडायची वेळ १०
आणि खाली २ मोबाईल नंबर. नशीब...
पण त्या नंबरने काहीच होईना. तेवढ्यात एक दादा हातात किल्ली घेऊनच आले. वर येताना ज्या ताई भेटल्या होत्या त्यांची कृपा असावी. मोडक्या तोडक्या हिंदीत संभाषण झाले. त्यांना किल्लीसकट बघून आमच्या तोंडावरून ओसंडून वाहणारा आनंद त्यांनी बघितला, इतका कि आमच्या आभार प्रदर्शनाने ते लाजले. 😤
सकाळच्या वेळी सूर्यप्रकाश असा असतो कि फोटो
काढायला अतिशय योग्य. डोक्याला कमी त्रास होतो आणि अवशेष बघणेही सोपे जाते.
हा बंद असलेला दरवाजा म्हणजे महादरवाजा. हा
ओलांडून आत आल्यावर प्रशस्त जागा आहे. दोन्ही बाजूला कमानीयुक्त देवड्या आहेत.
अजून एक दरवाजा |
पुढे अजून एक दरवाजा, पूर्ण तटबंदी असलेला आहे.
जीर्णोद्धारात आधार दिलेला दरवाजा |
काही पायऱ्या चढून गेल्यावर नागमोडी वळणानंतर
अजून एक दरवाजा आहे. जीर्णोद्धारात ह्याला चांगला आधार दिलेला आहे. हे दरवाजे
परकोटाचे म्हणता येतील. कारण अशी ही दरवाजांची साखळी आहे. इथून पुढे मुख्य
किल्ल्यात प्रवेश होतो. इकडे डाव्या बाजूला एक मोठा कोरडा तलाव आहे. त्याची
साफसफाई केलेली नाही. ह्या सगळ्या बाजूलाच बऱ्यापैकी झाडी आहे. त्यामुळेच इकडून
सुरवंटाची झालेली फुलपाखरे म्हणा, नाहीतर गारुडी म्हणा, ते खाली जाताना दिसायला लागले. पण
ह्याचाच अर्थ इकडूनही वर गावकऱ्यांना यायला जागा आहे हे कळलं. पण त्या वाटेसाठी
मुळात गावात घुसावे लागेल.. हरे राम!
इथे डावीकडचा दरवाजा किल्ल्यात घेऊन जातो.
दरवाजात वरती असणारं बहुतांशी ठिकाणी आढळणारं कमळ-कोरीव छत खाली पडलेलं आहे. ते
तसंच देवड्यांत ठेवलेलं आहे. आता किल्ल्यातल्या बांधकामाचे अवशेष दिसायला सुरुवात
झाली. ३ कमानीयुक्त एक बांधकाम वरच्या बाजूला दिसले.
एका बाजूला मोठे नैसर्गिक खडक, त्यावर थोडसंच
करावं लागलेलं तटबंदीचं बांधकाम, तर डाव्या बाजूना जमिनीपासून वर बांधीव तटबंदी, अश्या मधून पायऱ्यांवरून अजून एका दरवाजात आलो. इथेही खूप झाडी माजलेली आहे. समोरच
सूर्योदय होताना दिसत होता.
“U” आकाराचे वळण घेऊन उजवीकडे असलेल्या
पायऱ्यांनी वर जाताना वळून बघितल्यावर खाली यादगिर शहर, जलाशय दिसले. प्रचंड
वस्ती, मागे डोंगराआडून वर आलेला सूर्य हे विस्तार दाखवत होतं. यापुढचा कामानीदार
दरवाजा ओलांडला तेव्हा मात्र डावीकडच्या भिंतीत चक्क फारसी शिलालेख.
तब्बल ५ दरवाजे ओलांडून वर आल्यावर किल्ल्याच्या मुख्य भागात आलो होतो. दरवाजांची ही साखळी पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्ती विचार केलेला दिसत होता. साहजिकच ह्या किल्ल्याचे महत्व खूप असणार हे नक्की.
मुळात हा किल्ला साधारण ८५० मीटर लांब आणि ५०० मीटर
रुंद आहे. या किल्ल्यालाही कल्याण चालुक्य, यादव, चौल, बहामनी सुलतान, आदिलशाही,
निजामशाही एवढ्यांंचे स्वामित्व लाभलेले आहे. दाराशी असलेल्या शिलालेखानुसार शहापूरमधल्या
सागर नावाच्या गावातल्या “जगन्नाथ” नावाच्या व्यक्तीने हा किल्ला बांधल्याचे कळते.
पुढे वेगवेगळ्या राजसत्तेने त्याचा, विस्तार, डागडुजी आणि नवीन बांधकाम केले.
तालावामागून सूर्योदय |
तर किल्ल्याच्या मुख्य भागात आल्यावर डाव्या
बाजूला जसा खाली दिसलेला तसा, किंबहुना जास्तीच सुंदर आणि खुपच मोठा तलाव आहे. ही पूर्वेकडची बाजू असल्याने मागून होत असलेला सूर्योदय कोरड्या तालावालाही सौंदर्य
बहाल करत होता. तलाव भरलेला असताना काय सुंदर दिसत असेल हे सुर्योदयाचे दृश्य!
इथे उजव्या बाजूला काही बांधकाम दिसलं जे बऱ्यापैकी पडलं होतं. ह्यात जाणारा दरवाजा आतल्या बाजूने आलेल्या राडारोड्यामुळे भरून गेलेला असला तरी आतमध्ये जवळपास ४ तरी कमानी दिसत होत्या. बांधकामाच्या उजव्या बाजुलाजून एक पाडकाम बांधकाम आहे, तिकडे जाऊ म्हटलं तर काय, आतमध्ये “L” आकाराचं मोठं टाकं. टाकं कसलं, तलाव सुद्धा म्हणता येईल त्याला.
मध्ये असलेली मोठी वस्तू म्हणजे वाडे असावेत.
कारण आतमध्ये बरंच नक्षीदार कमानीयुक्त बांधकाम आहे. ह्या बांधकामासाठी सरळ वर
जाणारा मार्ग सोडून उजव्या बाजूला आलो होतो, जिथे पायऱ्यांचा धोपटमार्ग चढून सरळ
जातो.
आता परत मागे फिरून त्या पायऱ्यांवरून पुढे गेलो.
खाली जमीन अशी नाहीयेच इथे. मोठमोठाले खडक सगळे, त्यावर जे असेल ते बांधकाम.
गोल बुरुज आणि कडेच्या बाजूला अर्धगोल बुरुज, त्यात एक तोफ |
इथे आजूबाजूला असे पडके बांधकाम खूप आहे. त्यातल्याच एका बांधकामावर चढून डावीकडे खाली पाहिल्यास वर येताना दिसलेला तलाव पूर्ण दिसतो. खाली मध्ये मध्ये ३-४ गोल बुरुज दिसतात तर एकदम कडेच्या बाजूला अर्धगोल बुरुज दिसला, त्यात एक तोफही दिसली. म्हणजे तोफा दिसायला सुरुवात तर झाली. वरच्या बाजूला एका मोठ्या बुरुजावर एक ध्वज फडकताना दिसला, पण तो भगवा नव्हता. इकडे भगवे नाही फडकत, तर हे अर्धे पिवळे तर अर्धे लाल रंगातले असतात. हा कर्नाटक राज्याचा म्हणून त्यांनी ठरवलेला ध्वज असावा.
जमीन नाहीच, खडक आणि त्यावर बांधकाम |
दुमजली पडकं बांधकाम |
मी ज्या बांधकामावर उभा होतो त्याच्या आणि सर्वात
उंच जागेवरच्या बुरुजाच्या मध्ये अजूनही काही वाडे दिसले, तर उजवीकडे मोठमोठाल्या
खडकांच्या जमिनीनंतर दुमजली पडकं बांधकाम दिसलं. डोक्यात फोटोफ्रेम सेट झाल्या,
विनीत, प्रमोद आणि मी जवळजवळ पळतच तिकडे गेलो.
एकाकी झालेली एक कमान - खास फोटोफ्रेम |
इकडून खाली यादगीर गांव पसरलेले दिसले, शेजारचं
बांधकाम पडल्याने एकाकी झालेली एक कमान, खास फोटोफ्रेम होती.
खडक फोडण्यासाठी वापरलं गेलेलं तंत्र |
हे वेगळ्याच प्रकारचे असलेले खडक फोडण्यासाठी
वापरलं गेलेलं तंत्र तिथे असलेले चौकोनी आकारातले दगडातले असलेले खड्डे उलगडून
दाखवतात. मध्ये साधारण ५-५ सेमीचे अंतर राखून १०-१५ सेमी बाजूचे चौरस आकारातले ते
घाव होते. अश्याप्रकारे दगडाला फोडून ठेवले जात असे आणि नंतर आपोआप त्याचे त्या
रेषेत तुकडे होत असत.
एक टाकं, त्याच्या बरोब्बर मागे एक मंदिर |
पुरेसे फोटो झाल्यावर पुढे जाताना मध्ये एक टाकं
दिसलं. ज्यात पाणी शिल्लक होतं पण पिण्यासाठी अयोग्य वाटलं. त्याच्या बरोब्बर मागे
एक मंदिर असावं असं जाणवलं.
मंदिर |
समोर एक शहाबादी फारशी घालून केलेले अंगण.
मध्यभागी जुन्या मंदिराचा खांब असावा, तो उभा केलेला. त्याच्या पुढे एक लहानगा
नंदी. त्यावर चक्क ४ खांबांवर तोललेले लहानगे छत. बाजूच्या भिंतीत हनुमान,
नागदेवता तर नंदीच्या बरोबर समोर शंकराचं मंदिर. डाव्या बाजूला छोटेखानी मंदिरात
एक देवी असावी. त्याला मात्र पूर्णपणे लोखंडी जाळीचा पिंजरा होता. असं का ते गाव
जाणे.
अधांतरी असलेल्या दगडाच्या पायऱ्यांचा जीना |
इथल्या एका बांधकामावर आमची मंडळी गेली होती. वर
जायला अधांतरी असलेल्या दगडाच्या पायऱ्यांचा जीना. वर जाऊन पुन्हा एकदा किल्ल्याचे
अवशेष हेरून ठेवले जे अजून बघायचे होते. मगाशी खाली बुरुजावर दिसलेली तोफ अजूनही
खुणावत होती. तिकडे जाऊन तीही बघून आलो. इथे मध्येच असलेला एक छोटासा पण पूर्ण
गोलाकार बुरुज मस्त आहे.
पडके वाडे/बांधकामं, मागे सर्वोच्च ठिकाणाचा बुरुज आणि आमची भटकी मंडळी |
खूप पडके वाडे/बांधकामं होती. उगाचच जरासं आवडलं
कि त्याच्या दरवाजात घुसून फोटो काढ, वर चढून फोटो काढ असं चाललेलं होतंच.
आता सरळ एकदम वर उंच ठिकाणी असलेल्या बुरुजाच्या
वाटेला मी आणि नाना लागलो.
इथून मागे बघितल्यावर इतर बांधकामाबरोबर त्याच्या
मागच्या बाजूला असलेलं, पण काहीतरी वेगळं जाणवावं असं बांधकाम दिसलं, जे नंतर बघू
ठरवून बुरुजावर गेलो. बुरुजाच्या भिंतीत खालीच एक लहान दरवाजा आहे. आतमध्ये पूर्ण
बुजलेला आहे हा भाग. इथेही नानांचे त्यांच्या "ईष्टाईल" मध्ये आणि माझे आपले
नेहमीसारखेच फोटो झाले.
सर्वोच्च ठिकाणच्या बुरुजावरची तोफ |
वर बुरुजावर मस्तपैकी मोठी तोफ लपलेली आहे, जी
खालून दिसणे शक्यच नव्हते. ही आम्हाला दिसलेली दुसरी तोफ. आत पूर्ण दगड-मातीने तोफ
बुजून गेलेली आहे. पण तोफेवाराच्या कड्या मस्तच एकदम.
सर्वोच्च ठिकाणच्या बुरुजावरची दुर्लक्षित तोफ |
इथे बाजूला अजून एक तोफ बेवारशी पडलेली आहे. हिला
कड्या नसल्याने आणि दुसऱ्या तोफेईतकी मोठी नसल्याने तिला महत्व मिळालेले नाहीये,
म्हणून बिचारी एकाकी पडून आहे.
हा ह्या किल्ल्यावरचा सर्वात उंच बुरुज आहे.
इकडून यादगीर शहराची पलीकडली बाजू दिसली. इकडे जलाशय, दूरवर पसरलेली वस्ती आणि
किल्ल्याचा अजून बघायचा राहिलेला इकडचा भाग दिसला.
मुळात इथवर आलेलाच भाग अवघ्या तास-सव्वा तासांत पहिला होता, म्हणजे ८ वाजून गेले होते आणि ह्या किल्ल्यासाठी वेळ ठरवली होती ८:३० पर्यंतची. ह्या सर्वात उंच असलेल्या बुरुजावर आलो म्हणजे किल्ला संपला असेल, असा असलेला भ्रमाचा भोपळा इकडून दिसत असलेल्या विस्तीर्ण तटबंदीने फोडलान. अर्थातच वेळेकडे बघितले तरी किल्ल्याचे राहिलेले अवशेष बघायचे आम्ही सोडणार नव्हतो. उलट उजवीकडे एका बाजूला पलीकडे मोठमोठाले खडक सोडून एक बुरुज आणि त्यावरची यादगीर शहराकडे तोंड करून उभी असलेली तोफ हेरून आधी तिथेच जायचं ठरवलं होतं.
मंदिरासाठी विशेष दगड वापरला गेलाय |
बुरुज उतरून, पाहिलं आधी डोक्यात असलेल्या
बांधकामाकडे गेलो जे इतर बांधकामापेक्षा मोठ्या आकाराच्या दगडातलं होतं. इथे चक्क
३ मंदिरं निघाली. ह्या मंदिरात आतमध्ये काहीच नसलं तरी दरवाजावरच्या कमानीवरची नक्षी छान होती. आतमध्ये सफाई-संवर्धन गरजेचं आहे, जे आतमध्ये मूर्ती
नसल्याने केलं गेलं नसावं.
आजुबाजुचं बांधकाम ढासळून गेलेलं असलं तरी
मंदिरासाठी वापरलेले दगड विशेष आणि मोठे असल्याने हे बांधकाम मात्र तसंच उभं आहे.
आता निघालो किल्ल्याच्या वरच्या भागातल्या
बघायच्या राहिलेल्या शेवटच्या अवशेषाकडे, म्हणजे त्या एकलकोंड्या बुरुजाकडे. एका
मोठ्या खडकाचा उंचवटा चढून, थोडासा उतरून, परत दुसरा खडक चढल्यावर, समोरच बुरुज आहे.
इथून खाली डाव्या बाजूला गडाचा आम्ही अजून भेट न दिलेला भाग दिसला, तर उजव्या
बाजूला यादगीर शहर. डाव्या बाजूच्या काही बुरुज, पाण्याचे टाके/तलाव अश्या गोष्टी
अजून न पाहिलेल्या गोष्टी आणि भागाचा विस्तार पाहता, आम्ही बघून झालेला भाग हा ७५%
म्हणता येईल, अजून २५% शिल्लक होता म्हणजे.
किल्ल्याच्या उंचावरच्या भागातला शेवटचा बुरुज |
तर आम्ही उभा असलेला हा बुरुज, किल्ल्याच्या उंचावरच्या
भागातला शेवटचा बुरुज. ह्यावर यादगीर शहराच्या विरुद्ध दिशेने तोंड करून एक तोफ
ठेवलेली आहे. ही तोफही उत्तम स्थितीत आहे. फोटो वगैरे झाल्यावर परत फिरून, जिथून
वरच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या बुरुजाकडे वाट जाते, तिथे आलो. वरती आधीच जाऊन
आल्याने, आता गडाचा वरचा सगळा भाग बघून झाला होता. इथून चोर दरवाजातून खाली उतरून
उरलेला भाग बघायला निघालो.
चोर दरवाजातून खाली उतरलो |
ह्या दरवाजातून खाली उतरलो तर वरच्या बाजूची
तटबंदी दिसायला लागली. जी नैसर्गिकरीत्या त्याच जागी वर्षानुवर्षे असलेल्या
मोठाल्या खडकांवर बांधलेली आहे.
ते पिवळसर पांढरे खडक, मध्ये पडलेल्या भेगा हे
Combination मस्त दिसत असल्याने कुठेही उभं राहून फोटो घ्यायचा मोह होत होता.
खडकावर एक बुरुज आणि त्यावर एक झाड |
डावीकडे खाली अर्धगोल बुरुज, तटबंदी दिसते. अजून
एक छोटासा सुंदर चोर-दरवाजा ओलांडून पलीकडे आलो, तर उजवीकडे एका खडकावर एक बुरुज
आणि त्यावर एक झाड.
ह्या मोठ्या खडकांचा वापर उत्तम करून घेतलेला
होता बुरुज आणि तटबंदी बांधायला त्याकाळच्या स्थापत्य विशारदांनी. त्यामुळे एकूणच
ते सगळं सुंदर दिसतं. इथे दगडाला लागून आणखी एक चोरदरवाजा आहे, तिकडे जायचं
नव्हतं, कारण एक तर त्यातून वर गडावर जायला वाट असावी, जो भाग आधीच फिरून आलो होतो
आम्ही आणि ती वाटही झाडा-झुडुपांनी भरून गेलेली आहे.
जिकडून आलेलो तो सगळा भाग नेमका प्रकाशाच्या
विरुद्ध बाजूला साल्याने फोटो धड घेता येत नव्हते.
इथून उजवीकडे जी वाट जाते ती मंदिराकडे जाते जे
वरती खडकांत आहे. आम्ही सरळ खाली जाणाऱ्या वाटेने ह्याबाजुचे अवशेष पाहण्यासाठी
गेलो.
बांधीव तलाव |
इथे डावीकडे एक तलाव आहे. हा तलाव बांधीव असावा
कारण आतील बाजूस धड्सळत चाललेले बांधकाम दिसले.
समोरच एक पडके बांधकाम आहे. ह्यावर जाण्यासाठी
अधांतरी पायऱ्या असलेला जीना आहे, परंतु शेवटचा भाग ढासळल्याने वरती जाण्यासाठी
कसरत करावी लागू शकते.
आयताकार तटबंदी - मजबूत जीना, छोटासा बुरुज आणि त्यावर तोफ |
डावीकडच्या वाटेने ह्याबाजुच्या तटबंदीवर गेलो.
ह्या आयताकार बांधकामावर बरीच दुरवस्था दिसत असली वर जाण्यासाठी बांधलेला दगडी
जीना इतका भक्कम आहे कि त्याचा एकही दगड हललेला दिसला नाही. आयताकार आकाराच्या
मध्येच एक पलीकडे जाण्यासाठी दरवाजा आहे. तर उजवीकडे वरती एक बुरुज आणखी एक तोफ.
आधी हे सर्व पाहून आलो आणि मग त्या दरवाजातून
पलीकडे गेलो. हे आयताकार बंधाकन नुसतीच तटबंदी नाहीये तर बाहेरच्या बाजूने दोन्ही
बाजूला एक-एक भक्कम बुरुज आहेत ह्याला. बुरुजांचा घेर खूप मोठा आहे. पलीकडे
गेल्यावरच हे दिसले, आधी लक्षात येण्याजोगे हे नाही.
भले मोठे बुरुज |
समोरच तटबंदी आणि त्यातून पलीकडे जाण्यासाठी
लहानसा दरवाजा आहे. बुरुज आणि हि तटबंदी ह्यात अंतर खूप कमी असल्याने आधीच मोठे
असलेले हे बुरुज अगदी अंगावर आल्यासारखे जाणवतात.
२ पूर्ण गोलाकार बुरुज |
तटबंदीवर चढून पलिकडे खाली थोड्याच अंतरावर अजून
२ बुरुज पूर्ण गोलाकार आहेत आणि त्यामधील त्यांना जोडणाऱ्या तटबंदीत एक लहानसा
दरवाजा.
आता ह्या भागातले सगळे भाग बघून झाले होते. वर
बुरुजावर असताना हे सर्व अवशेष दिसल्यावर, घड्याळाकडे बघितल्यावर विचार येऊन गेला
होता, कि हे अवशेष राहून जातात कि काय भेट द्यायचे. But we had our priorities
set. किल्ला प्रथम आणि सुरक्षितपणे पाहता येतील त्या सगळ्या अवशेषांसह!
त्यामुळे हे सगळे अवशेष पाहून झाल्यावर समाधान
पदरात पडलं होतं.
२ तोफा आणि शेजारी हनुमान |
इकडच्या बाजूला तालावाकडून डावीकडे येणाऱ्या
वाटेने आलो होतो, तेव्हा समोर दिसणाऱ्या बांधकामाच्या मागे लपून बसलेला एक बुरुज
कुकुक करून दाखवत होता. आधी त्याच्याकडे गेलो. इथे चक्क २ तोफा... एक बिचारी खाली
पडलेली आणि एक बुरुजावर विराजमान. बुरुजाच्या बाजूला अगदी व्यवस्थित रंगवलेला हनुमान आणि एक नक्षीदार दगड ठेवलेला आहे.
मागे वळून पाहिल्यावर खडकांत भिंतीच्या मध्यभागी उंचीवर असलेले मंदिर दिसले. वर एक बुरुज, ज्यावर तोफ आहे, जे आम्हाला गडाचं शेवटचं टोक वाटलं होतं, त्याच्या बुरुजाच्या खाली असलेल्या खडकाच्या भिंतीत हे मंदिर आहे. वरून तशी पुसटशी सुद्धा कल्पना आली नव्हती. मागून येणारा सूर्याचा प्रकाश प्रखर झाल्याने फोटो काही घेऊन देत नव्हता तो.
खडकांत भिंतीच्या मध्यभागी उंचीवर असलेले मंदिर |
मंदिराजवळ गेलो. मंदिर खडकांत उजवीकडे आहे तर
त्यावर जाण्यासाठी पायऱ्या डावीकडून फिरून खडकाच्या भिंतीला चिकटून मंदिरात जातात.
इथे पांढऱ्या रंगात हे सगळं रंगवलेलं, नाही, मढवलेलं आहे. पण त्यामुळे त्या
पायऱ्या आणि जीना, जुनं बांधकाम आहे कि नवीन हेही कळत नाही. खालपासून अगदी
मंदिरापर्यंत पूर्णपणे लोखंडी रेलिंग लावलेले असल्याने वाट एकदम सुरक्षित आहे.
गड मुळात १० ला उघडतो आणि आम्ही गड फिरून इथे ९
वाजता होतो. मंदिर उघडायला कोणीच आलं नव्हतं. हरकत नाही, गड बघायला मिळाला हेही
नसे थोडके.
जेवढं फिरायला ४ तास तरी लागले असते तेवढं २
तासांत, तरीही सगळं नीट पहिल्याने, नाही म्हटलं तरी शीण आला होता. (मुख्य म्हणजे पोटात
काही ढकलायला वेळ न मिळाल्याने आतले कावळेही भुकेने व्याकुळ झाले होते)
इथे खालच्या तलावातून प्यायला पाणी आणून टाकी
बांधून सोय केलेली आहे. तोंड धुवून, पाणी पिऊन पूर्ण ताजेतवाने झालो.
उतरायला लागलो तर उजव्या बाजूच्या खडकांत एक
अर्धगोलाकार गुहा आणि त्यावर लोखंडी जाळी.
भगवान नेमिनाथ, भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावीर |
या जैन मुर्त्या आहेत. सर्वात उजवी आणि डावीकडे यक्ष-यक्षिणी आहेत तर मध्ये भगवान नेमिनाथ, भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावीर यांच्या आहेत.
खाली जाताना डावीकडे तटबंदी दिसत होती. ह्या
खालच्या बाजूला असलेल्या तटबंदीत एका बुरुजावर एक तोफही दिसली.
खाली किल्ल्याच्या दरवाजाजवळ आलो तेव्हा
डावीकडच्या बाजूला एका बुरुजावर लपून बसलेली एक तोफ दिसली, जी सकाळी आम्हाला वर जाताना दिसली
नव्हती. तब्बल ९ तोफा आम्हाला दिसल्या.
८:३० ची वेळ ठरली होती. पण अपेक्षेपेक्षा जास्त
मोठा आणि अवशेष निघाल्याने खाली उतरायला ९:३० झाले, तेही खूप जास्ती दगदग केल्याने
तेवढ्या वेळेत पाहता आले. पण त्यामुळे खाली उतरलो तेव्हा रुखरुख नव्हती तर समाधान
होते.
एके ठिकाणी मी त्याच्या आतमध्ये सहज बसू शकेन
एवढ्या आकाराच्या इडली-कुकर मधून इडल्या जणू आमच्यासाठीच पटापट बाहेर येत होत्या.
मग अर्थातच सगळेजण त्यावर तुटून पडलो.
इडल्या, मेदूवडे आणि बरोबर सुशीला, ह्यावर जोरदार
हात मारला आणि वाटेत दिसलेल्या एका “गांव-दरवाजा"चा फोटो पटकन गाडीतूनच घेऊन “मिनी
विधान सौधा” ओलांडून यादगीर सोडले.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
मस्त फोटो आणि वर्णन!
ReplyDeleteधन्यवाद विनीत 😊
Deleteव्यासंग, असावा तर असा...!
ReplyDeleteधन्यवाद मित्रा!
Delete