Sunday, February 18, 2024

किल्ले महिमंडणगड, पर्वत आणि चकदेव - II

पर्वत - सूर्योदय रंगछटा

रात्रीचा काळोख जसा अनुभवावा, तशीच पहाटही अनुभवावी. रात्रीच्या काळोखात गंभीरता असते तर पहाटेमध्ये प्रसन्नता! सूर्यास्ताच्या वेळी शेवटचं अंतर सूर्य जसा झपकन कापतो, तसंच पहाटे परत येताना सुद्धा आगमनाचे संकेत देतो आणि मग एकदा डोकावल्यावर असा झरझर वर येतो की मिनिटांत डोळे दिपून जातात. फोटोसाठी ट्रायपॉड लावला, की आपण मोकळे होतो ते उगवते, केशरी सूर्यबिंब डोळ्यात भरून घेण्यासाठी... दोन्ही साध्य होतं!

सूर्योदय

सकाळच्या वेळी प्रसन्न मंदिर परिसर

बघता बघता सगळं उजळून गेलं. मंदिर प्रकाशात न्हालं. पाणी आणण्याचा कार्यक्रम परत झाला, परत चुल पेटली. क्या बताये, फक्कड पोहे-चहा अशी न्याहारी पण झाली.

काल चढलेला पर्वत आता उतरायचा होता. सकाळी उन्हं चढायच्या आधी आणि त्यातून उतरायचं म्हणजे अगदीच सोपं काम. पण म्हणून उगाचच वेळ काढला, तर चढणारं ऊन उतरल्यावर पुढच्या नियोजनाला मात्र त्रास देणार हे नक्की होतं.

पर्वत - निसर्ग समृद्धता

साडेआठला मंदिर सोडलं. धबधब्यापर्यंत यायला फक्त पाऊण तास लागला. काल चढताना जवळपास दुप्पट वेळ लागला होता. उतरत असल्याने तिथे जास्त थांबलो नाही. पण काल चढताना मात्र इथे खादंती ब्रेक घेतला होता. त्यावेळी दमलो तर होतोच, वरती ऊनही तापलेलं होतं.

निसर्ग आनंद

उन्हं असली तरी अंगातली मस्ती पण तशीच होती. त्यामुळे जरा पोटात पडल्यावर, बरोबरच्या बाटल्यांत पाणी शिल्लक असतानाही इथे मिळणारं ताजं पाणी, तेही दगडातून-झाडातून झिरपणारं, हातात घेऊन प्यायचा मोह आवरला नाही. धडपडत तिथे पोचून ते पाणी प्यायलं होतं. वर बाटलीतही भरून घेतलं होतं. त्यावर न थांबता, जरा आजूबाजूला झाडं-वेली उगाचच निरखत असताना मस्त एक वेलीचा झोपाळा मिळाला, तिथे झोपून झोकेही घेतले... पण हे काल.

आज मात्र फक्त बाटलीत पाणी घेतलं आणि झरझर खाली आलो. गाडी जवळ आलो, जरा पाण्यासाठी थांबलो असू फक्त. आज मात्र दुपारी दोनचं ऊन अंगावर घ्यायची इच्छा नसल्याने, पाण्याचा साठा घेऊन, लगोलग, अकरा - सव्वा अकराला पुनश्च ते घर सोडून चकदेव कडे निघालो.

चकदेव

जंगम यांचे घर वरती चकदेववरही आहे. खरंतर इथल्या लोकांचं मूळ घर वरती डोंगरावरच, पण येण्या-जाण्याच्या दुर्गमतेमुळे आता खाली जागा घेऊन इथेही हे लोक राहत आहेत.

त्यांचा मुलगा आमच्याबरोबरच वर येत होता. आम्ही त्याच्याच घरी मुक्काम करणार होतो आणि तोही वरती थांबणार होता. चकदेववरती अजूनही नांदती वस्ती असल्यामुळे गावकऱ्यांनी वरती जाण्यासाठी रस्ता करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात तो अपूर्णच आहे, पण काही अंतरापर्यंत धडपडत दुचाकी तरी नेता येऊ शकते.

मागे पसरलेला पर्वत

अर्धा तास चढून गेल्यानंतर मागे लक्ष केले आणि प्रचंड पसरलेला पर्वत दिसला. फोटोत तर मावतच नव्हता. अगदी वाईड-अल्ट्रावाइड कशातच.

हनुमंताचं ठाणं

बारा वाजून गेल्याने सूर्य त्याचे रंग दाखवत होता. वाटेत जिथे एक हनुमंताचं ठाणं आहे, तिथे पोचलो. आता इथे पोचलो म्हणजे बऱ्यापैकी पोचलो असा अर्थ होता.

दुपारी दोनचं ऊन डोक्यावर घ्यायचं नाही आणि जेवायला वरती पोचायचं, असं नियोजन होतं. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत पोचलो पण. नुसतं पोचलो नाही, तर दीड वाजताच गरमागरम भरलं ताट समोर घेऊन बसलो होतो.

आता काळजी नव्हती. चेपून जेवा, कुठेही पर्वत, काय साधा डोंगर सुद्धा चढायचा नव्हता. तुडुंब जेवलो आणि ढेकर देतानाच समोर चक्क पातेलं भरून ताक. अहाहा... काय ताक प्यायलोय!

जे झोपलो ताणून, ते सरळ चार वाजता बळंच उठलो. कारण चढायचं नसलं, तरी डोंगर फिरायचा होता. सूर्य आमच्यासाठी थोडीच थांबणार होता?

चकदेव महादेव मंदिर

चकदेवरच्या शंकराच्या मंदिराबाहेरुनच सध्या नमस्कार केला. "वाईच जरा येतोच फिरून" असं महादेवाला सांगून, सगळ्यात आधी चकदेवच्या एकदम मागच्या टोकाकडे निघालो. वाटाड्या बरोबर असल्याने वाटेची काळजी नव्हती. थोडी काळजी होती ती गव्यांची. ह्या डोंगरावर भरपूर गवे आहेत. इतके, की इथे राहणाऱ्या लोकांना शेती सुद्धा करून देत नाहीत. झुंडच्या झुंड शेतात घुसली की सत्यनाश.

गवे शक्यतो मुद्दामून अंगावर येत नाहीत म्हणा. पण त्यांचं काय हो, शेकडो किलोचं ते धूड. तो नुसता फिरायला जरी कुठे जात असेल आणि जाता जाता चुकून धक्का लागला, तरी आपल्याला तो सॉरी म्हणालेला ऐकायला आपण ढगात असणार की...

कानोसा घेत घेत पुढे जात होतो. काही पाणवठे आले. इकडे फार पाणवठे नसल्याने जे काही उरलं-सुरलं पाणी आहे, ते पिण्यासाठी येऊ शकतं की कोणी. पण सुदैवाने कोणाला तहान लागलेली नसावी.

राकट सह्याद्री

एका झाडी मधून चिंचोळ्या वाटेवरून पुढे पोचलो. जवळच आलं होतं डोंगराचं टोक. इथून पलीकडचा सह्याद्री त्याचे राकट दर्शन देत होता. जरा फोटो काढू, म्हणून कड्याजवळ गेलो. आमच्या उजवीकडे याच डोंगरावरचा एक भाग थोडं अंतर राखून पुढे आलेला होता. मध्ये दरी होती. त्यामुळे तो सरळ जोडलेला नव्हता आणि तिकडे लक्ष गेलं, तर तिकडून गवे महाराज आमच्याकडेच बघत होते की...

गवा महाराज

हायला... चारही पायात गुडघ्यापर्यंत पांढरे मोजे घातल्यासारखे पाय. शिंगं तर अगदी राजा-सर्जा वगैरे नाव शोभावं अशी मस्त गोल. आणि ते धूड आमच्याकडे पाहत होतं की! पण धोका दिसत नव्हता, उलट "कोण आलेत धडधडायला काय माहिती? सुखाने चारा पण खाऊ देत नाहीत हे कुडमुडे लोक" असेच भाव दिसले त्याच्या तोंडावर. तरी नशीब आमचं, की हे कोण क्षुद्र प्राणी तडमडायला आले एवढेच भाव होते आणि मुख्य म्हणजे त्याच्या आणि आमच्या डोंगराच्या भागात मध्ये असलेली दरी.

पंक्तीला आपण शांतपणे जेवताना मध्ये-मध्ये बडबड करत शेजारी कोणी येऊन बसला, की कसं, आपण आपलं ताट घेऊन मुकाटपणे दुसरीकडे जाऊन बसतो, तसाच चक्क तोंड फिरवून तोही आमच्या बाजूला पार्श्वभाग करून, त्यावरून शेपट फिरवत गेला निघून.

कड्यावरून पलीकडे दिसणारी डोंगर-रांग

हायसं वाटलं. पण काळजीही होती, की आम्हाला आल्या वाटेनेच परत जायचं होतं ना... पण सध्या तो विचार झटकला. आम्हाला जे फोटो घ्यायचे होते ते घेऊन निघालो.

घाट आणि कोंकण जोडणाऱ्या वाटेवर शिडी

इकडे खालच्या बाजूला कोकणातलं आंबिवली गांव. खालून गावातून इथे वरती यायला वाट आहे. ह्या वाटेच्या एका टप्प्यावर एक शिडी बसवलेली आहे. ट्रेक करताना आंबिवली गावातून वर शिडीच्या बाजूने चकदेववर येऊन शिंदी गावात उतरून किंवा बरोबर उलट, म्हणजे शिंदी गावातून वर येऊन खाली शिडीने आंबिवलीला उतरतात. पण आमचं नियोजन निवांत होतं, आम्हाला पर्वत आणि चकदेव, दोन्हींवर मुक्काम करून इथून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायचा होता. त्यामुळे आंबिवलीत न उतरता, शिडी पाहून परत वस्तीला वर जायचं होतं.

शिडीच्या वरच्या टोकाला गणपती

शिडीच्या वरच्या टोकाला काही पायऱ्या आहेत. इथे दगडावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. त्याचं दर्शन घेऊन शिडी जवळ आलो. शिडी उतरून खाली आलो, फोटो वगैरे काढले आणि जरा वेळ थांबून परत चढून वर गेलो.

इथल्या गणपतीचा निरोप घेतला. आल्या वाटेने परतताना, चहूबाजूला त्या गायब झालेल्या गव्याचा कानोसा घेत होतो. तो कुठेतरी जात असताना आम्ही त्याच्या मार्गातला स्पीड ब्रेकर होऊन, आम्हाला तो धडकून पडू नये एवढीच इच्छा होती आमची. पोचलो मंदिरापर्यंत. पण अजून सूर्यास्त बघायला खास ठिकाणी जायचं होतं.

सूर्यास्त पाहण्यासाठी खास जागा

मंदिराच्या मागच्या बाजूला, डोंगराकडच्या टोकाला एक दीपमाळ-वजा स्तंभ आहे. खास चकदेववरचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी इथे ठिय्या मांडला. परत ट्रायपॉड बाहेर काढला. मोबाईलला त्याचं काम करू दे, म्हणून आपण सूर्याकडे डोळे लावले.

चकदेव - सूर्यास्त

सुर्यानेही आम्हाला फार वेळ वाट बघायला लावलंन नाही. त्यालाही परतायची घाई असावी. अथांग डोंगरांच्या मागे क्षितिजाआड तो दडून गेला.

मुक्कामाचे ठिकाण हे शेजारीच असतं, तर इथेच बसलो असतो. इथून हलायची इच्छा कोणाला होणार म्हणा. पण अजून असलेला अंधार आणि गवे ह्या दोन्ही गोष्टी आणि त्याचं होऊ शकणारं डेडली कॉम्बिनेशन तर अजूनही परवडणार नव्हतं. तरीही सूर्याच्या मागून सगळी आवराआवर झाली ना, ह्याची खात्री करत जाणारा त्याचा सोनेरी प्रकाश अंधुक होईपर्यंत काही हललो नाही.

मग मात्र पटापट परत येत मंदिरात आलो. इथे पोचलो म्हणजे आपल्या गल्लीत आलो होतो. मंदिरात निवांतपणा होता. त्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर परतून स्वयंपाक आम्हाला करायचा नव्हता. थोडा वेळ देवाला द्यावा म्हणून, छे हो... देवाला काय द्यायचा? हे तर कारण फक्त. खरं तर त्या निमित्ताने देवाचाच वेळ आपल्यासाठी मागून घ्यावा आणि वरती त्याच्याकडेच काहीतरी मागायचं हो! माणूस शेवटी स्वार्थी.

असो... पण काही का कारणाने म्हणा, तिथे बसलो. काही म्हणा, शहरातली मंदिरं आणि इथे फरक पडणारच. नेहमीच्या शहर-गावांच्या गजबजाटापासून दूर डोंगराच्या माथ्यावरच्या मंदिरात काही मिनिटं ध्यान लागलं ना, की प्रचंड प्रसन्न वाटतं. ती प्रसन्नता भरभरून घेतली आणि ह्या महादेवानंतर वस्तीतल्या हनुमानाला आणि खंडोबालाही रामराम करत परतलो.

चकदेव वरून दृश्य

फार छान झोप लागली. परत पहाटे उठून, आवरून, पाठीवर सामान घेऊन सूर्योदय बघायला मंडळी सज्ज. आता मात्र वाटाड्या बरोबर नव्हता. वाटाड्या आणि कुटुंबियांना टाटा करून, दुसऱ्याच वाटेने निघालो. ही वाट सरळ शिंदी गावात पोचते. डोंगर दोन वाटांनी फिरल्याचं समाधान.

चकदेव - सूर्योदय

वेळेवर निघालो होतो. थोड्या वेळात सूर्य डोकवायला लागलाच. ही वाटही काही जवळची नव्हती. डोंगर सपाटीवरून चालत चालतच तास निघून गेला आणि मग सरळ उतार. पण ही वाट तर आम्ही वर आलो त्यापेक्षा मस्त निघाली. काय ते डोंगर, काय ते झाडी वगैरे...

चकदेव वरून शिंदी गावात उतरणाऱ्या ह्या वाटेवरचे दृश्य

आलो की झपाझप खाली. थोडसं कंटाळवाणं काम म्हणजे, ह्या शिंदी गावात जिथे उतरलो, तिथपासून ज्या वाडीत जंगमांच्या घरात आम्ही गाडी लावली होती, तिथपर्यंत रस्त्यावरून चालत जायचं. पण हरकत नव्हती. घाई नव्हती. निवांत गप्पा मारत पोचलो आम्ही.

पाच वर्षांपूर्वी ठरवलेलं नियोजन पूर्णत्वास आलं होतं. त्यावेळी असं नियोजन होऊन, तसा वेळ मिळून सुद्धा काही कारणाने ते रद्द करावं लागलं होतं. रद्द झालेल्या नियोजनाची रुखरुख किती काळ मनात असावी? पण पाच वर्षांनी का होईना, तो योग आला आणि उत्तम अनुभवलाही. दरवेळी एका दिवसात दोन-दोन तर कधीकधी तीन-तीन ठिकाणं बघायच्या झपाट्यात निवांतपणा मिळत नाही. नाही, आवडत नाही असं अजिबात नाही. पण वेळेच्या बंधनापोटी करावं लागतं. म्हणून हे निवांत नियोजन कधीतरी होतं.

ठरल्याप्रमाणे पर्वत आणि चकदेव, दोन्ही वरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता आला. डोळ्यात भरून घेता आला. निरभ्र आकाशातलं चांदणं, डोक्यावर त्याचंच छप्पर घेऊन, डोळे भरून घेता आलं. मस्त थंडीत डोंगराच्या माथ्यावर जेवता आलं. सूर्योदय, तोही हातात गरम चहाचा वापरता कफ घेऊन पाहिला. त्या उन्हातून डोंगर चढताना, सावलीत विसावा घेत, संथ ओढ्यातलं, कपारीतून झिरपणारं पाणी डोळ्याला लागलं. ओंजळ करून त्या पाण्याचा घोट घेता आला... दिवस सार्थकी लागले!!!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!