Sunday, November 6, 2011

शिणेमा-शिणेमा I

काल सकाळी एका मित्राने एका भयपटाचे वर्णन केले. तो आणि त्याचा मित्र यांवर त्या चित्रपटाचा चांगला प्रभाव पडला होता. तो भयपट पाहून त्याच्या मित्र multiplex च्या parking मध्ये जायला घाबरला, दोघेही घाबरूनच रुमवर आले, मग त्याच्या मित्राला घरी एकट्याने जायची भीती वाटल्याने तो रूम वरच राहिला. ई. ई. कवतिक ऐकल्याने आमची तो भयपट पाहण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. पण तेवढ्याच review वर पैसे लावण्याची घाई मी करणार नव्हतो. त्यामुळे लगेच youtube वर सिनेमाच्या पहिल्या २ भागांचे promo, trailers वगैरे पहिले, त्यात लोक हा सिनेमा थेटरात बघताना कसे घाबरत होते याचे चित्रण सिनेमागृहात कॅमेरे लावून केलेले दिसले. मी कधी एकटा विहिरीत उडी मारत नाही. एका तरी मित्राला बरोबर घेतोच. म्हणजे बुडालो तरी दोघे बुडणार आणि पोहलो तर त्या आनंदाचे श्रेय मी लाटणार. त्यामुळे मी ओमकार जोग या प्राण्याला फोन केला. त्याला तयार करणे तसे कठीण नव्हते. कारण त्याने नुकताच रा.वन पहिला होता, त्याचे दुखः विसरण्यासाठी तरी का होईना, तो येईलच अशी खात्री होती. मी लगेच २ तिकिटं बुक केली.
सिनेमा: Paranormal Activity 3
थेटर: E-Square, गणेशखिंड.
वेळ: ११:००
तो पिंपरीवरून तडक थेटरात येणार असल्याने त्याला शोधावे लागणार होते. पण "No Parking" खाली लावलेली MH-08 बघितली आणि जोग सापडले. तिकिटं मिळवून आम्ही तिथले रात्रीच्या शो चे public आणि आमच्या "श्रीराम, राधाकृष्ण, लता" चे public यावर चर्चा चालू केली. तिथे प्रियांका चोप्राचे दोन हिरोंच्या खांद्यावर हात ठेवलेले कोणत्यातरी सिनेमाचे पोष्टर लावलेले होते. मुलांच्या एका ग्रुप मधले दोघे त्या हिरोंना replace करून स्वतःचा फोटो काढून घेत होते. ब-याचश्या मुली भारीतले जर्किन आणि लहान भावाचे कपडे घालून आपापल्या BF बरोबर फिरत होत्या. तेवढ्यात आम्ही ज्यासाठी दमड्या मोजून आलो होतो, त्याचे दार उघडले. आम्ही आत शिरलो. माझ्या रत्नागिरीतल्या घराचे स्वयंपाकघर आणि hall एकत्र केला तर जेवढी जागा होईल तेवढ्याच जागेएवढे ते थिएटर असल्याने जागाही लगेच सापडली. सिनेमाच्या आधी रीतसर राष्ट्रगीत वगैरे लावून सिनेमा सुरु झाला. Vicco ची जाहिरात नव्हती, आदिवासी लोक केळीच्या पानात कोणालातरी गुंडाळून औषध लावत आहेत असे काहीच नव्हते. गेला बाजार संतूरची पण ad नव्हती. असले काहीच न दाखवता चित्रपट सुरु झाला.
साधारणपणे सिनेमाची थीम मला माहिती होती. सिनेमातल्या कुटुंबाला आपल्या घरी काहीतरी विचित्र घडत्ये अशी जाणीव असल्याने त्यांनी स्वतःच्याच घरी रात्री कॅमेरे लावून ठेवलेले असतात. त्यांनी केलेले चित्रण म्हणजे सिनेमा. त्यामुळे आपण चुकीच्या Screen ला आलेलो नाही हे मी ओमकार ला सांगितले. सिनेमातला कॅमेरा वाला, म्हणजे कुटुंबप्रमुख, गावभर कॅमेरा घेऊन फिरत होता. तो काय वाट्टेल ते record करत होता आणि आम्ही बघत होतो. आता काहीतरी घाबरण्यासारखे दिसेल म्हणून १-२ दिवसांचे recording बघितले. एकदा त्यांच्याकडे भूकंप झाला आणि एका भुताच्या अंगावर वाळू पडल्याने त्याचे दर्शन झाले. तरी पाहिलंच भूत, बोहोनी तर झाली, आता दिसतील हळू हळू म्हणून सावरून बसलो. माझ्या शेजारी एक सुबक ठेंगणी आणि तिचे वडील कि boyfriend अश्या संभ्रमात मला टाकून एक पाजी (मराठीतला नव्हे, 'सरदारजी' वाला.) तिच्या शेजारी बसला होता. तो तिचा boyfriend निघाला आणि तोहि विषय सोडला. त्या भूकंपाच्या recording नंतर थोडं सकाळचं recording, मग रात्रीचं, असं चालू होतं. फक्त माणसं आणि रिकामे घर आम्ही बघत होतो. त्या लोकांना रात्री अपरात्री भुका लागत होत्या, ते रात्री हादडत होते. डोक्याशी तांब्या घेऊन झोपायची सवय नसल्याने सारखं स्वयंपाक घरात जाऊन कोणी ना कोणीतरी पाणी पीत होतं. भुतांना जरासुद्धा मोकळीक दिली नव्हती. एक तर त्या हिरोची सासू कि आई कोणीतरी १-२ वेळा घरी येऊन गेली होती. तिला बघूनच भूतं बाहेर यायला घाबरत असावेत असेही वाटत होते. त्या लहान पोरींना मात्र त्या कॅमे-याची मजा वाटत होती. त्यातली एक पोरगी उगाच कॅमे-यात बघून 'भॉक' करत होती. तिची लहान बहिण मात्र तिच्या खेळण्याशी गप्पा मारायची. ते खेळण्यातलं कुत्रं काही शेवटपर्यंत बोलताना, हलताना वगैरे दाखवलं नाही. ती त्याला teddy म्हणत होती. हे सकाळ-रात्र recording करत-बघत ५-७ दिवस निघून गेले. त्यानंतर त्या पोरींची मावशी घरी राहायला आली. त्या मावशीनेही एकदा कॅमे-यात बघून 'भॉक' केलं, सुरुवातीला त्या पोरीच्या आईनेही कॅमे-यात बघून 'भॉक' करून नाव-याला घाबरवले होते. पण भूत काही 'भॉक' करायला तयार नव्हते. तोपर्यंत हिरोने एक शक्कल लढवून table fan च्या जागी कॅमेरा लावून फिरते recording करायची सुविधा निर्माण केली होती. तो कॅमेरा स्वयंपाकघर आणि hall cover करत होता. त्या मावशीलाही रात्री तहान लागत होती. त्यात तिला लेख लिहायला सुचल्याने स्वयंपाकघरातच ती लेख लिहीत बसली. फिरत्या कॅमे-यात डाव्या बाजूला एक मानव-सदृश्य आकृती दिसली. जोगांचं लक्ष भलतीकडे असल्याने ते त्यांच्या नजरेतून सुटले. मग ते भूत मांजरपाट, बेडशीट असे काहीतरी घेऊन त्या मावशीच्या मागे येऊन उभे राहिले. आमच्या आशा परत पल्लवीत झाल्या. पण त्या मावशीने संशयाने मागे वळून बघताच ते भूत बेडशीट तसेच टाकून पळून गेले. हे मात्र ओमकार सकट सगळ्यांनी बघितले, पण मावशीला ते न दिसल्याने तिने शहाण्या मुलीसारखे ते बेडशीट उचलले आणि माळ्यावर पोरींच्या खोलीत झोपायला निघाली. त्या खोलीतल्या कॅमे-यात ती आता डाव्या बाजूने जीना चढून येताना दिसायला लागली. जोग मात्र उजव्या बाजूच्या fish tank मधले मासे बघत होते. पण तिथेही काही झाले नाही. शेवटी मावशी पण निघून गेली. त्या पोरीचं खेळण्यातलं कुत्रं (टेडी) आता जरा भीड चेपल्यानं करामती करत होतं, कॅमे-यात मात्र काहीच दिसत नव्हतं. पण १३-१४ व्या रात्री मात्र त्यानं मोठ्या बहिणीला त्रास द्यायला सुरुवात केली. पण ते लहान बहिणीच्या आज्ञेबाहेर नसल्याने तिने 'सोड' म्हणताच मोठ्या बहिणीला त्यानं मुकाट्यानं सोडून दिलं. हिरोने त्याच्या मित्राला घरी बोलावून घेतले. त्या पोरीतली मोठी बहिण ह्या काकांना गम्मत दाखवायला आरश्या समोर घेऊन गेली. लाईट बंद करून ३ वेळा 'bloody mery' म्हटले कि भूत अवतीर्ण होते अशी ती गम्मत होती. पण भूत काही आले नाही, भूकंप मात्र झाला परत. त्यांचे घर कोणत्या भूकंपप्रवण क्षेत्रात होते कोण जाणे. तिथे भूत आले नाही पण त्यांच्या आई समोर भुताने स्वयंपाकघर साफ करून सगळ्या वस्तू छताला टेकवून खाली आणून आपटून दाखवल्या. मग मात्र ती आई २ पोरी आणि नव-याला घेऊन सगळं चंबूगबाळं आवरून तिच्या आई कडे राहायला गेली. त्या पोरींनी ते कुत्रं पण बरोबर नेलं होतं. तिथे मात्र ते सक्रीय झालं आणि हिरो, हिरोईन दोघांना यमसदनाला धाडलं. हे मात्र चांगलं घेतलं आहे. मग त्या पोरी आपल्या आज्जी बरोबर सुखाने राहू लागल्या. ते कुत्रं पण न्यायला ती पोरगी विसरली नाही.
आणि सिनेमा संपला. हल्ली 'The End' असे दाखवत नसल्याने कॅमेरा बंद पडला असे आम्हाला वाटून आम्ही पुढे काय होतेय त्याची वाट बघत होतो, पण नावं सुरु झाली आणि आम्ही निघालो. E-Square च्या नावाने दीड-दीडशे रुपये ओवाळून आम्ही रूम वर येऊन झोपलो.

Sunday, September 11, 2011

झिंग...

Office ची कटकट, विचित्र traffic, signals, वळताना signal न देता वळलेले गाडीवाले, मधूनच धडपडत आणि धडपडवत चाललेले सायकल वाले, बुधवार असेल तर जुना बाजार, त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाळवलेली दुहेरी वाहतूक, त्यातच मासे घेऊन बसलेल्या मासेवाल्या बायका, त्याच्याजवळील (आणि त्यावर घोंघावणा-या)  माश्यांमुळे सुटलेला सुगंध, वेड्यावाकड्या चाललेल्या रिक्षा, सगळं सहन करत, या सगळ्यातून वाट काढत, लिखित आणि अ-लिखित नियम मोडून जाणा-यांना मनोमन लाखोल्या वाहत जुना बाजार ओलांडून शनिवार वाड्याकडे येऊन शिवाजी रोड ला लागतो. रोजच येतो, कालही आलो. गेले २ दिवस संध्याकाळी शिवाजी रोड बंद ठेवत आहेत. अजून २ दिवस ठेवणारच. गणेशोत्सव चालू आहे, शेवटचे ३-४ दिवस असताना तर लोकांचा महापूर आलेला, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड बंद असणारच. मानाच्या ५ गणपतींपैकी ४ गणपती, दगडूशेठ, बाबू गेनू, मंडई शिवाजी रोड लगतच, त्यातून परवा दिल्लीत बॉम्ब-स्फोट झालेला त्या पार्श्वभूमीवर security वाढलेली, मुकाट्याने Corporation Bridge कडे वळलो. तिथे One-Way केलेला असल्याने पटकन जाता आले. लोक इतस्ततः पसरले होते. Traffic भरपूर असल्यावर 2-wheeler, सायकल वाले Footpath वरून जातात ना, त्याचा सूड घेत असल्यासारखे लोक रस्त्यावरून वाहत होते. त्यातच tyapical Activa वगैरे गाडीवाले भर रस्त्यात जागा अडवून सावकाश चालले होते. या सगळ्यांवर मनामध्येच तोंडसुख घेत वळसा मारून corporation ला आलो. परवा तिथून उजवीकडे गाडी मारून बालगंधर्व पुलावरून रूम पर्यन्त पोचलो होतो. पण काल शिवाजी पुलावरून यायची बुद्धी झाली. वाट काढत काढत सरकत होतो. गणपती बघायला आलेले लोक कोणालाही जुमानत नव्हते. गाडीवालेही देखाव्या जवळ गाडी slow करून देखावे बघत-बघत जात होते. गणेशोत्सवात जाऊ दे, मी रोजच अश्या लोकांना ओव्या वाहतच असतो. स्वतःही जात नाहीत आणि "मी पण road-tax भरतो, मी कितीही हळू गाडी चालवीन भर रस्त्यात" अश्या अविर्भावात दुस-याला जाऊ देत नाहीत अशी हजारो लोक माझी स्तुतीसुमने झेलत असतात. पूर्वी मनातल्या मनात उधळायचो हल्ली मुक्तकंठे मोठ्याने उधळतो. पुण्याची हवाच संसर्गजन्य आहे. गुण लागायचाच... :P सरकत सरकत पत्र्या मारुती पर्यंत आलो. रस्त्यात मंडप अर्ध्यापेक्षा जास्त आलेला, त्यात scooty, scooter वर पोरा-टोरांच्या लवाजम्या-सोबत आई-वडील रस्त्यातच गाड्या उभ्या करून मुंजाबाचा बोळ ने उभा केलेला "ऋतासुर राक्षसाचा जन्म व वध" बघत होते. मग रिक्षावाले आधी तोंड आणि मग पृष्ठभाग असे traffic मध्ये घुसवून वाहतूक-कोंडी वाढवत होते. अश्या सगळ्यांवर श्लोक उधळत लक्ष्मी रोड cross केला. नागनाथ पराच्या ऋद्धी-सिद्धी गणपतीला गाडीवरूनच नमस्कार करत रूम पर्यंत आलो. आरती संपत आलेलीच होती, मंत्रपुष्पांजली म्हणून उदरं-भरणं साठी बादशाहीची वाट धरली.
Office मधून निघताना office, त्यातले राजकारण आणि इतर फालतुगिरी डोक्यात असते TL, Offshore PM, Onsite PM ... सहस्त्रनामावली म्हणत नगर रोडला लागलेलो असतो पण एकदा पेठेत शिरलो कि हापीस लांऽऽऽऽब फाट्यावर... त्यातून काल शुक्रवार होता "आता २ दिवस हापीस गेले उंउंउंउंउं" असं म्हणून पेठांच्या मोहजालात घुसलो. ह्या मोहजालाची जादू वेगळीच आहे. त्यातून गणेशोत्सव... केसरी वाडा, कसबा, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, गुरुजी तालीम हे मनाचे ५ गणपती, मंडई, बाबू गेनू, दगडूशेठ, हिराबाग, नातूबाग, चिमण्या गणपती, खजिना विहीर, हत्ती गणपती, जिलब्या मारुती मंडळ, नागनाथ पार.... असंख्य गणपती मंडळे पुण्याचे नांव वेगळ्याच उंचीवर ठेवतात. प्रबोधनपर देखाव्यापासून धांगडधिंगा type सगळे देखावे असतात. जागोजागी मोठमोठ्याने आरत्या, अथर्वशीर्ष याचे आवाज येत असतात. इथे प्रत्येक सोसायटीचा एक आणि प्रत्येक चौकात किमान २ या संख्येने गणपती मंडळे आहेत. प्रत्येक गणपती मंडळात छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक फोटोतून उपस्थित असतात. सकाळी आणि संध्याकाळी षोडशोपचार पूजा, आरती होत असते. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी असते. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत असते. तरीही अत्यंत मोहक, प्रेमात पडावी अशी लोभस मूर्ती असते. नुसते दर्शन झाल्यावर डोळे मिटून हात जोडले जावे असे रूप असते.
अर्थातच अशा गणेशोत्सवाला लोक सहकुटुंब येत असतात. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यावर मुठा नामक नाल्याची नदी होते न, तसा लोकांचा महापूर पुण्यात गणेशोत्सवाला येतो. 'एवढी लोकं येतात तरी कुठून' असा प्रश्न पडावा इतके लोक जमतात. गर्दीतून वाहत वाहत पोरा-टोरांना घेऊन सगळे देखावे बघत हिंडत असतात. तुळशीबागेतले रस्ते तर एवढे रुंद आहेत हे फक्त याच वेळेला तिथली दुकाने बंद असल्याने कळतात, एरवी संध्याकाळी फिरायला जागाच नसते तिथे. 
मुंबईतला गणेशोत्सव काही प्रत्यक्ष पहिला नाही. T.V. वर मोठमोठाले गणपती, प्रचंड गर्दी आणि विसर्जनाच्या वेळी निघालेले मूर्तीचे धिंडवडे बघितलेत. त्यामानाने पुणं फारच छोटं पण गणेशोत्सवातले दिवस पेठ फुलून निघतात इथल्यासारखे देखावे कुठेच दिसत नाहीत, उगाचच stage वर लहान मोठ्या पोरांचे record dance नाहीत, काही नाही. इतर कुठले गणपती बघायला लांब-लांबून लोक गेलेले मला माहित नाहीत पण पुण्यातले गणपती बघायला मात्र मुंबईतून लोक येतात, परदेशातूनही येतात. हि पेठांची जादू आहे, पुणेकरांची जादू आहे. बंद रस्ते, बेशिस्त traffic काहीही असो, पेठेत शिरायचे... झिंग चढते शनिवार, नारायण आणि सदाशिव पेठेची.. पुण्याची...

Monday, July 4, 2011

(Dis)connecting India...

"भारत संचार निगम लिमिटेड" चे "भेदभाव संचार निगम लिमिटेड" झाले, महत्वाचे पाउल उचलले गेले.चांगली गोष्ट आहे. सरकार जाती-भेदासाठी फार महत्वाची पावले उचलत आहे. BSNL ने OBC to OBC Free अशी सुविधा उपलब्ध केली आहे. थांबा, सविस्तर देतो.

http://www.esakal.com/esakal/20110704/4700594298586467547.htm
अशी आहे योजना
ओबीसींमधील व्यक्‍तीला बीएसएनएलचे एक सीमकार्ड मोफत दिले जाईल व त्यांचा समावेश विशिष्ट ग्रुपमध्ये केला जाईल. या ग्रुपमधील लोकांना ग्रुपअंतर्गत (सीयूजी) कॉल मोफत असेल. तसेच प्रतिमहा 90 रुपये रिचार्ज केल्यानंतर 100 मिनिटे बीएसएनएल नेटवर्कसाठी; तर 200 मिनिटे इतर कंपन्यांच्या नेटवर्कसाठी "फ्री टॉकटाइम' मिळणार आहे. महिनाभरात 250 एसएमएस मोफत व 100 एमबी जीपीआरएस सेवा मोफत मिळणार आहे.
-ई-सकाळ

हे पाउल महत्वाचे आहेच, पण मी या पुढची अपेक्षा करतो आहे. BSNL ने या सुविधेत "रंगारी, भावसार, शिंपी, साळी, तेली, परीट, नाभिक, सुतार, लोहार, आतार, बागवान, कासार, झुल्लीया, माळी, कोळी, धनगर, बंजारा, वंजारी, गुरव, गवळी, जैन, कोष्टी आदींसह 357" जातीचा समावेश केला आहे. यामुळे हेतू पूर्ण साध्य होणार नाही. त्यपेक्षा थोडी सुधारणा करून या जाती-जातींना वेगवेगळ्या योजना द्याव्यात.
जाती-ग्रुप अंतर्गत फुकट फोन, तर ग्रुप-ग्रुप मध्ये २-२ रुपये calling rates ठेवावेत. यांत म्हणे ३५७ जाती आहेत. आम्हाला तर कल्पनाही नव्हती कि हिंदू धर्मात एवढ्या जाती आहेत.प्रथम सरकारचे मनोमन आभार कि त्यांनी हि माहिती पुरवली.
हो, अजून एक. मराठा आणि ब्राह्मण यांचा यात नक्कीच समावेश असणार नाही. तर मराठा-ब्राह्मण, ब्राह्मण-ब्राह्मण आणि मराठा-मराठा याच्यांत calling ३-३ रुपये एका मिनिटाला, तर मराठा, ब्राह्मण यांना जर OBC ना call लावायचा असेल तर ५-५ रुपये ठेवावेत. जेणेकरून हेतू लवकर सध्या होईल. आणि तरीही जे मित्र जाती बाहेर आपापसांत call करतील त्यांच्यामुळे तिजोरीत पैसे जमा होऊन अजूनही काही योजना आखता येतील.

BSNL नंतर इतर सगळ्या कंपन्यांनीही हे पाउल लवकरच उचलावे. फोन पुरत्या या योजना मर्यादित न राहता इतरही त्या राबवाव्यात. त्याचीही नितांत गरज आहे.
माझ्या डोक्यात काही आयडियाच्या कल्पना आहेत...
१. दुकान - ब्राह्मण-मराठ्यांना BC, OBC, NT वगैरेंच्या दुकानात चढ्या भावाने वस्तू विकल्या जाव्यात.
२. पेट्रोल - पेट्रोल चे दरही वेगवेगळे असावेत.
३. सार्वजनिक सेवा - बस, पोष्ट यांतही काही योजना राबवाव्यात.
४. खेळ - आपले माननीय रामदासरावजी आठवले साहेब यांनी क्रिकेट खेळामध्ये आरक्षणाची अभिनव योजना मांडली होती (असे ऐकिवात आहे.), दुर्दैवाने ती पुढे गेली नाही. तसा प्रयत्न इतर खेळांसाठीही केला पाहिजे.
५. खाजगी कंपन्या - इथे मोठ्ठ्या प्रमाणात जात-निर्मुलन होत आहे. इथे एकाच Cubicle मध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक बसतात, एकत्र काम करतात. अहो, एवढेच काय जेवायलाही एकत्र जातात, हे कमी म्हणून कि काय एकमेकांच्या डब्यातलेहि खातात यामुळे जाती-भेद खुपच कमी होत आहे... हरे राम!!!
सावरकर आदि मंडळींच्या जाती-भेद निर्मूलनाच्या प्रयत्नांना यश येणार कि काय? नाही, पण देव बघतो आहे. त्याने आपल्याला उत्तम सरकार नेमून दिले आहे, ते "जातीने" प्रयत्न करत आहेत. ते जाती-भेद निर्मूलनाचा दुष्ट प्रयत्न नक्कीच साध्य होऊ देणार नाहीत. आता मात्र वेळ आली आहे सगळी कडे आरक्षणाची, वेगवेगळ्या जातीनिहाय योजनांची हे सरकारने ताडले आहे असे दिसत आहे... सरकार जोरदार प्रय्तन करत आहे आणि त्यांना यश हे येणारच यांत शंका नाही.

एक महत्वाची गोष्ट राहिलीच. सार्वजनिक स्वच्छतागृहे. तिथे तर जात विचारतही नाहीत भेद तर सोडाच... त्याहीपेक्षा महत्वाचे, कुठेही कसले संकट आले कि सगळे लोक जाती-धर्माचा विचार न करता जातात वेड्यासारखे मदतीला. यामुळे जाती-भेद कमी होत आहे.
असो, माझ्याकडे खूप योजना आहेत, सरकार त्या राबवू शकते.

सध्या थांबतो. फक्त एकच, हि नवी "OBC to OBC Free" योजना फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे असे वाचले, तरी ती इतर राज्यातही सुरु करावी असा सल्ला. आणि खूप खूप शुभेच्छा!!!

Wednesday, June 1, 2011

खेळ नामांतराचा...

सध्या "नामांतर-नामांतर" खेळ जोरात सुरु आहे. हा खेळ सोपा आहे, पण त्यासाठी तुमचे स्थान मात्र उच्च असायला हवे.
तुम्ही साहेब आहात का? दादा आहात का? तुमच्या मागे "हाताचा पंजा" तरी आहे का? आशीर्वादासाठी...
"काका मला वाचवा" म्हटल्यावर वाचवायला एखादे काका आहेत का तुम्हाला?
तुमच्याकडे एखादे घड्याळ आहे का? धनुष्य-बाणा सारखे एखादे शस्त्र? काहीतरी पाहिजेच या खेळासाठी.
साध्या सुध्या माणसाने या खेळात भाग घेऊ नये. त्याला कोणी विचारणार नाही....
वरच्यापैकी काहीही असले तरी चालेल, मग तयारीला लागा...
साधारणपणे एखादा पूल, एखादे रेल्वे स्थानक, शहर, गांव, विद्यापीठ असे काहीतरी शोधा. असे काही नाही मिळाले तर एखादे कार्यालय, नाट्यमंदिर गेला बाजार एखादी भाजी मंडई सुद्धा चालेल.
नवीन असल्यास उत्तम, नाहीतर मग थोडे कठीण पडेल. नाहीतर सरळ एखादे विद्यापीठ उभारा आणि ते वापरा.

ठीक, आता तुम्ही निवडलेली वस्तू कुठे आहे ते ठिकाण बघा, आसपासचा परिसर लक्षात घ्या...
खेळात आपल्याबरोबरचे खेळाडू आपल्याबरोबर राहिले पाहिजेत हे हि ध्यानात असू द्या, ते विसरून अजिबात चालायचे नाही. त्यांचे मन दुखावले तर ते दुस-या संघातून खेळायला जाण्याची शक्यता असते.
दुस-या संघातून आपल्या संघात खेळाडू मिळवण्यासाठी वेगवेगळे डाव टाकावे लागतात. ते महत्वाचे आहे.
आता तुमचा गणवेश निश्चित करा. म्हणजे त्याचा रंग. म्हणजे बघा....
आपल्याकडे महत्वाचे रंग आहेत भगवा, निळा, हिरवा आणि पांढरा... पांढरा रंग यासाठी कि तो पाहिजे तेव्हा कोणत्याही रंगाशी जवळीक साधू शकतो.
खेळताना हे लक्षात घ्या कि राज्य आपल्याकडे ठेवण्यासाठी खेळायचे आहे. रंगासाठी नाही...
रंग काय, गणवेश बदलला कि बदलतो. पण हे लोकांना लक्षात येऊ द्यायचे नाही. मात्र संघात खेळाडू निवडताना त्यांचे आपल्या रंगाशी इमान असायला हवे याकडे लक्ष द्यावे.

खेळ खेळायच्या आधी खेळाडू, team building, खेळाचा उद्देश हे सगळे लक्षात घ्या, खेळायची घाई करू नका. सगळे व्यवस्थित पार पडले कि आयुष्यभर हा खेळ पुरतो. तुम्ही एकदा नीट सुरु केलात खेळ कि तो तुमचा मुलगा, मुलगी (सासरी गेली तरीही), नातू, पणतू, भाचा कोणालाही खेळायला सोपे पडते हे ध्यानात ठेऊन संघ तयार करा...

हां, तर, रंगाशी इमान... हा थोडा घोळात टाकणारा विषय आहे. आपल्याला इमान राखायचे आहे असे गृहीत धरून चालू, ते सुरुवातीला सोपे पडेल.
तर...
आपला रंग कोणता यानुसार खेळाडू जमवायला सुरुवात करा.
तुमचा रंग भगवा आहे का? मग लक्षात घ्या तुमच्या साठी फार मोठी माणसे पूर्वी होऊन गेली आहेत त्यांचा वापर करा.
भगवा रंग असेल तर तुमची जवाबदारी फार मोठी आहे, तुमच्या मागे फार खेळाडू जमा होऊ शकतात, फक्त त्यासाठी योग्य समीकरणे आखली गेली पाहिजेत.
या रंगात फुट पडण्याची दाट शक्यता असते ते गृहीत धरून संघ एकवटून ठेवण्याकडे लक्ष द्या.
जर तुमचा रंग निळा असेल तर सोप्पे आहे, आपल्या मागे खेळाडू कमी येणार आहेत, पण ते निष्ठावंत असणारेत हे नक्की, त्यामुळे अश्मयुगीन काळात भगव्या लोकांनी आपल्याला दगड मारले होते हे सारखे-सारखे आपल्या खेळाडूंना सांगत रहा. भगव्या रंगाच्या संघातून बरेच लोक आपल्याला मिळू शकतात, त्यामुळे त्यातील काही लोकांनाहि त्यांना त्यांच्याच रंगातील काही लोकांनी दगड मारल्याच्या थापा मारून फितवायचा प्रयत्न चालू ठेवा. १०० लोकांतील १० तरी आपल्याकडे येणारच याची खात्री बाळगा.
रंग हिरवा असेल तर सावधानी बाळगा. भगवे-निळे कितीही एकत्र झाले तरी ते तात्पुरते आहेत हे आपल्या सर्व खेळाडूंना सांगत रहा. आपण आपल्या रंगासाठी खेळतो आहोत, त्याचे साधन हे "खेळातील राज्य" आहे, साध्य नव्हे, हे मनावर ठसवून घ्या .
रंग पांढरा असल्यास सदरा खाकी ठेवावा, डोक्यावर टोपी हि हवीच. त्याशिवाय दुस-यांना टोप्या घालता येणार नाहीत.
हा गणवेश हीच आपली शक्ती आहे, त्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत याची जाणीव असल्याशिवाय तुम्ही या संघात आलेले नाहीत हे सगळ्यांना माहित असतेच.
आपले आडनांव काहीही असले तरी शेवटी एकाच अडनावाशी इमान राखायचे आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आपल्याला नियम, कायदे काहीही बदलायची गरज नाही आणि त्याचा हक्कही नाही हे कायम लक्षात ठेवा... सगळा हक्क हा एकट्या Madam चा आहे, त्याशी प्रतारणा करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला डावलले जाऊ शकते अथवा संघातून काढलेही जाऊ शकते हे पक्के लक्षात असू द्या, तुम्ही कोणत्याही प्रदेशातून आलेले असा, कोकणातून आलेले असले तरी!

असो, आपली -% तयारी झालेली आहे. अजून खुप शिल्लक आहे, ती सध्यापुरती राहू द्यात.
तरी, या खेळासाठी "महापुरुष" category तले लोक शोधून ठेवा. त्यावेळी अजिबात लाज बाळगू नका, आपल्याला त्यांच्या नावाखेरीज काहीही माहिती नाही हे विसरून जा.
त्यांनी केलेले कार्य आपण पुढे चालवणे सोडाच पण किमान त्याचा अर्थही नीट समजून घेतलेला नाही हे हि मनाला लावून घेऊ नका.
तुमच्या संघानुसार हा खेळ ठरतो, उगीच काहीही बडबडून चालत नाही, नाहीतर संघातील लोक चिडतात.
निळ्या संघाने कोणते नांव पुढे करायचे, भगव्याने कोणते हे ठरलेले आहे. हिरव्याने कोणालातरी पाठींबा द्यायचा फक्त. आपले खेळच मैदान म्हणजे आपला इलाखा, त्याबाहेर कोणी विचारणार नाही.
पांढ-याला choice नाही, आडनाव ठरलेले, फक्त नांव आपण चिठ्ठ्या टाकून ठरवले तरी चालते.

आपण - नामांतर करून दाखवली कि आता खेळाच्या उद्देशावर लक्ष द्या, "खेळातील राज्य"!!!
राज्य हे महत्वाचे असल्याने त्यासाठी खेळाडू, त्यांच्या भावना, रंग हे सगळे गौण आहे हे मनाशी नक्की करा.
आता कोणत्या रंगाशी "युती" करावी लागेल ह्याची जुळवणी करा...

उदाहरणार्थ....
समजा आपला रंग भगवा आहे आणि काही कारणाने आपल्याला निळ्या रंगाशी युती करायची आहे, तर त्यांच्याही भावना लक्षात घेऊन हा खेळ खेळावा लागतो...
प्रथमतः आपण निवडलेली वस्तू (पूल, शहर .) हे आपले स्वतःचे अथवा आपल्या तीर्थरुपांचे असून खेळाचे संघ सोडल्यास कोणाचाही त्यावर हक्क नाही हे समजावे किंबहुन तसले विचारही डोक्यात आणू नयेत.
आता एखादा "महापुरुष" निवडा, निळ्या रंगाचा, मग त्या वस्तूला त्याचे नांव द्यावे यासाठी लढा सुरु करा...
महापुरुष निवडताना त्याने केलेले कार्य, यापेक्षा त्याची प्रसिद्धी हा महत्वाचा निकष असू द्या. मग त्यासाठी खूप मोठे महापुरुष डावलले गेले तरी लक्ष देऊ नका. आपलेच गाडे पुढे रेटत रहा.
(पांढ-या रंगाच्या खेळाडूंना तोही निकष नाही. आधी नामांतर, मग प्रसिद्धी आहेच हे तत्व बाळगा, तसा दुसरा पर्यायही नाहीच!!)
आता अजून एखादा महापुरुष निवडा, त्याच रंगाचा (दुसरा सापडत नसल्यास repetition चालेल), मग दुसरी कोणतीतरी वस्तू शोधून त्या वस्तूला त्याचे नाव देण्याचा आग्रह... स्वतः धरू नका, तो पांढरट रंगाच्या घड्याळधारी संघाच्या खेळाडूला सांगा...
त्यालाही आव्हान द्या... गोंधळात पडू नका. याला "पाहुण्याच्या काठीने साप मारणे" म्हणतात.

असो, तर असा हा "नामांतर-नामांतर" खेळ आहे, त्यात वस्तू भरपूर असल्याने खेळायला मजा येते. महापुरुष काय, तेच तेच वापरता येतात.
आपणच कित्ती मोठे आणि सामान्य लोक आपल्याकडे अगतिक होऊन पाहतात हे पाहून आनंद होतो. त्यातून राज्यही मिळण्याची शक्यता असते.
असे अनेक फायदे असल्याने या खेळाला सध्या खूपच प्रसिद्धी लाभली आहे.