वर्षभर सह्याद्रीत भटकंती तशी चालूच असते, त्यामुळे वर्षाच्या शेवटी मोठी सुट्टी काढून जरा लांबवरची भटकंती करायची असा प्रघात जणू गेले ३ वर्ष पडून गेलाय. ह्यावर्षी “मरहट्टा” प्रदेश सोडून जरासे दक्षिणेकडे म्हणजे “कन्नड” प्रांतात भटकायला जायचं ठरवलं होतं. बेळगांव जवळपासची भटकंती आधीच झालेली असल्याने ह्यावेळी भाग निवडला तो कलबुर्गी (गुलबर्गा), यादगीर आणि रायचूर जिल्हा.
भटकंती झाल्यानंतर जेव्हा याबद्दल लिहायचा विचार केला, तेव्हा ठरवून टाकलं की जे आधीच प्रसिद्ध आणि पूर्णपणे परिचित किल्ले आहेत त्याबाबत न लिहिता, अपरिचित किल्ल्यांवर जास्त प्रकाश टाकायचा. परंतु वाचकांच्या भटकंतीला उपयोग होईल म्हणून भटकंतीत भेट दिलेले सगळे किल्ले थोडक्यात का होईना पण घेत आहे. थोडी माहिती आणि महत्वाचे फोटो एवढाच भाग ब्लॉग मध्ये.
तर मुळात यावर्षी कोरोनाने धुडगूस घातल्याने ही भटकंती जमेल की नाही? नंतर मग कधी जमेल? पासून २९ डिसेंबरला रात्री निघू पर्यंत नियोजन झालं. भटके लोक ठरले पण अचानक रात्रीची संचारबंदी आली आणि २९ला रात्री निघायचे रद्द करायला लागले. त्याऐवजी ३० तारखेला सकाळी निघायचं निश्चित झालं. नियोजनानुसार म्हणजे “पलान के मुताबिक” रात्री दहाला लिहून निदान सहा-सात तास तरी प्रवास करून, मग कुठेतरी जराशी विश्रांती घेऊन, सकाळी लवकरच कलबुर्गी पासून श्रीगणेशा करायचा असं होतं. पण ते आता ते सकाळवर आल्याने प्रवासाचा वेळ हा सकाळी खर्च होणार होता.
तोपर्यंत संचारबंदीचं गाडं जमावबंदी वर आलं आणि चार किंवा कमी लोकांना एकत्र फिरायची परवानगी मिळाली. त्यामुळे मी सकाळी साडेचारला घरातून निघून चिंचवडला जाणं एकटाच असल्यामुळे चालणार होतं. मग विनीतच्या घरी जाऊन गाडी लावली. विनीत तोपर्यंत नाना आणि प्रमोद यांना घेऊन आलाच. मापारी सर पण यायचे ठरल्यामुळे शेडबाळे सर त्यांच्या गाडीत गेले. त्यामुळे आमच्या गाडीत आम्ही ४ जण आणि मापारी सरांच्या गाडीत ते ४ जण.
विनीतकडे पोहोचून सामानाची बांधाबांध करून निघालो तेव्हा ५:२० झाले होते म्हणजे उठून दीड तास होऊन गेल्यामुळे माझ्या पोटातून आवाज यायला लागले होते. किल्ल्यांना खूप वेळ होता, त्यामुळे सध्या पोहे, इडली कुठे मिळेल त्यादृष्टीने
डोळे सगळं scan करायला लागले. सोलापूर रस्त्याला लागल.ो पुण्याच्या बाहेर तरी पडू म्हणून करत करत बहुतेक यवत जवळ आलो. तिथे एकेठिकाणी गरम-गरम पोहे आणि वर सांबार चापलं. जीवात जीव आला. तर मापारी सरांची गाडी मात्र न्याहारीला थांबलीच नव्हती. दुपारच्या जेवणापर्यंतची निश्चिती झाली बगूनानाssss असं म्हणेपर्यंत दुसऱ्या गाडीला भूक लागल्यामुळे सोलापूरच्याआधी
परत एकदा न्याहारीला गाड्या थांबल्या. आता इतरांपेक्षा वेगळे राहायचा प्रमाद नको या एकाच कारणामुळे मलाही ते खावे लागले. तिथे मिसळ, इडली, मेदूवडे, कडकण्या (ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीचा वाळवून केलेला प्रकार) असा सगळ्यावर ताव मारल्याने दुपारच्या जेवणाला आज मुहूर्त लागणार नाही हे निश्चित झालं. मुळातच रात्री ऐवजी सकाळी होत असलेल्या प्रवासाला गेलेला वेळ भरून काढायचा होता. एकूणच आजच्या दिवसातले ठरलेले सगळे किल्ले होणार नाहीत हे माहिती होतं, पण जेवढे जमतील तेवढे तरी बघू असा सुज्ञ विचार यामागे होता.
कलबुर्गी किल्ल्याचे प्रवेशद्वार |
अशा तऱ्हेने कलबुर्गी शहरात किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर
दाखल झालो ते बरोबर पाउण वाजता. हा किल्ला भुईकोट असून खूप प्रसिद्ध किल्ला आहे. जिल्ह्याचे नांव आणि किल्ल्याचे नांव एकच आहे – कलबुर्गी. आधीचे नाव गुलबर्गा. कलबुर्गी हे मूळ नाव असल्यामुळे मधल्या राजवटीत त्याचे झालेले गुलबर्गा नाव बदलून आता परत ते कलबुर्गी करण्यात आले आहे. १३४७ मध्ये राजा गुलचंद द्वारे बांधला गेलेला हा किल्ला १४२४ पर्यंत बहामनी सत्तेची राजधानी होता, म्हणजे २३ वर्ष. नंतर तो मान बिदर किल्ल्याला मिळाला.
कलबुर्गी किल्ला Google Map Satellite View |
या किल्ल्याला महत्त्वाचे दोन दरवाजे असून जवळपास पंधरा उंच बुरुज आहेत. तटबंदी दुहेरी असून बाहेरील बाजूस खंदक आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या या किल्ल्याला कोणतेही संरक्षण मिळालेले नसल्यामुळे खंदक आणि परकोट, तटबंदी असं बांधून हा किल्ला संरक्षित केला गेलेला आहे. जवळपास ७५ एकरांमध्ये पसरलेल्या या अवाढव्य किल्ल्यात एक प्रचंड मोठा आयताकृती बुरुज आहे, ज्यावर जवळपास पंधरा फूट लांबीच्या तीन तोफा आहेत. पश्चिमेकडील बुरुजावर एक तोफ आहे जी तब्बल २९ फूट लांब असून ती जगातील सर्वात लांब असल्याचे एके ठिकाणी नमूद केलेले आहे. ख्वाजा बंदेनवाज याचं थडगं पण याच किल्ल्यात आहे.
हा किल्ला राजा गुलचंद याने १३४७ ला बांधला (काही ठिकाणी उल-उद-दिन याने बांधल्याचे पण म्हटले आहे) नंतर या किल्ल्याला राष्ट्रकूट, चालुक्य, कल्याणचे कलाचुरी, देवगिरीचे यादव, हळेबीडुचे होयसाळस, काकतीय (वरंगलचे राजे), दिल्ली सल्तनत, विजयनगर साम्राज्य, बहामनी, आदिलशाही, मुघल आणि शेवटी इंग्रज, एवढ्या सत्तांचे स्वामित्व लाभलेले आहे.
किल्ल्याची प्रवेशद्वाराजवळची दुहेरी तटबंदी, खंदक आणि तिथे जाण्यासाठी असलेला भुयारी दरवाजा |
तर दरवाजा बघितल्यावर तिथून फोटोंचा धडाका लावला. आतून-बाहेरून दरवाजा, त्याच्या देवड्या, बाजूचा खंदक, मग परकोटात शिरून.. असे सगळे फोटो झाले. पण त्या ठिकाणी थांबल्यास मोकळ्या हवेतच गुदमरून मरू अशी अवस्था दिसली आणि गप-गुमाने गाडी सरळ आतमध्ये जामा मशिदीजवळ नेऊन लावली.
आशिया खंडातली २ऱ्या क्रमांकाची मोठी जामा मशीद |
ही जामा मशिद १३६७ झाली बांधली आहे, म्हणजे किल्ला बांधल्यानंतर अवघ्या २० वर्षांत आणि ही आशिया खंडातली क्रमांक दोनची मोठी जामा मशीद आहे. जवळजवळ ३८,००० स्क्वे. फूट एवढ्या मोठ्या भूभागावर ही मशीद आहे. सध्या फक्त नमाज पडण्यासाठीच जाता येते त्यामुळे आमची ती संधी हुकली. बाहेरूनच फोटो घेऊन आम्ही पुढच्या बुरुजाच्या दिशेने निघालो.
शिलालेख आणि नक्षीदार दगड |
या बुरुजाच्या समोर आल्यानंतर एक मोठा लोखंडी दरवाजा आणि त्याला लावलेले कुलूप दिसलं, कोरोनामुळेच म्हणून कदाचित. हा बुरुजावर जाणारा एकमेव लोखंडी दरवाजा बंद आहे पण कोणीतरी (आमच्यासाठी भल्या माणसाने) त्यातील दोन गज तोडून-वाकवून चोरदरवाजा तयार करून ठेवलेला आहे. आतमध्ये पायऱ्यांशेजारीच एका कोनाड्यात एक शिलालेख आहे. बुरुजावर गेलो तर मस्त पैकी २९ फूट बारागज तोफ आमचीच वाट बघत होती.
२९ फुटीतोफ |
येथून किल्ल्याचा चांगला View मिळत होता. जामा मशीद, मधला मोठा आयताकार बुरुज, तटबंदी, पराकोट बाहेरील वस्ती.. सगळा भाग डोळ्याखालून
घातला. ही तोफ २९ फुट लांब असून पंचधातूची बनवलेली आहे. जाडीच तब्बल सात इंच असून व्यास दोन फूट आहे.
झुलती तोफ |
किल्ल्यातले काही दर्गे, थडगी |
सध्या वस्तीचा भाग असलेले जुने बांधकाम |
इथून समोरच असणाऱ्या किल्ल्याच्या या भागात पूर्ण वस्ती आहे. अर्थातच हे सगळं अनधिकृत असणार किंवा पूर्वजांकडून मिळालेलंही असू शकेल. किल्ल्याचा भाग म्हणून मुळातच इकडे राहण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत आणि तिथेच सध्या वस्ती आहे, म्हणजे बांधायची पण गरज नाही असं मिळालेलं घर. तिकडे कोपऱ्यात बुरुज बघायला गेलो. तिथे एक दर्गा आणि थडगं आहे. या बुरुजावर एक झुलती तोफ आहे असं मला आधीच एका काकांनी सांगितलंनी होतं. झुलती म्हणजे काय तर त्याला खाली दिलेला आधार हा असल्यामुळे ती “See-Saw” सारखी झाली आहे, त्यामुळे ती हलते.
दरवाजांची रचना आणि खंदक-तटबंदीची अवस्था |
काही दरवाजे |
किल्ला खात असलेली वस्ती |
इथून खाली सगळी वस्ती आणि किल्ला बांधतेवेळी अतिशय विचारपूर्वकरित्या बनवलेली दरवाजे आणि त्यांची रचना दिसते. खाली उतरून ह्या भागात फेरफटका मारला. ही रचना संरक्षणाच्या दृष्टीने एकदम उत्तम आहे. परंतु बांधकाम ढासळत चालले असून इथली वस्ती हे सर्व खाऊन टाकत आहे. जुन्या काळातले नक्षीदार खांब-कमानी आता कुठेतरी त्याच्या भवतालच्या बांधकामामुळे
लपून गेले आहेत. ह्यातलं जे काही पाहता आलं ते पाहून तिथून निघालो.
आता बघायचा राहिला होता ह्या किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज. जो खरं तर मुख्य प्रवेशद्वारानंतर
समोरच दिसतो पण आम्ही प्रदक्षिणामार्ग
धरून फिरत आल्यामुळे हा बुरुज शेवटी बघून बाहेर पडणार होतो. कोरोनामुळे इकडचेही सिक्युरिटी गार्ड सगळीकडची कुलुपं लावून गायब झालेले होते. त्यामुळे या बुरुजाचाही वर जायचा एकमेव दरवाजा बंद होता. इथे कोणी भल्या (!) माणसाने त्यातले गज वाकवून अपमाच्यासाठी मार्ग करून ठेवलेला नव्हता. पण किल्ल्यात शिरलो होतो तेव्हा इथे वरती २ जण पहिले होते, म्हणजे वर जायला कुठून तरी मार्ग आहे किवा तेच गार्ड असतील आणि आम्हला कुलूप उघडून देतील म्हणून तसा शोध चालू झाला. मग त्या बुरुजाच्या सगळ्या बाजूने फिरून मागच्या बाजूने जिथून वर जायला जागा आहे, तिथे जाऊन बघून आलो. पण ही वाट एकदम वर जात नाहीच. आणि इकडे काहीही नाही बघायला, त्यामुळे अर्थातच इथे आमच्याशिवाय कोणीही येत नसतील ह्याची खात्री होती. पण शेवटी इच्छापोटी मार्ग निघाला आणि सर्वात वरती जायला जागा मिळाली, म्हणजे काढली.
सर्वात मोठ्या आयताकृती बुरुजावरच्या ३ तोफा |
इथे वर तीन १५ फुटी तोफा आहेत आणि प्रत्येकाला स्वतंत्र जागा आहे. ह्याचा Top-View किती सुंदर दिसेल, पण त्यासाठी ड्रोन पाहिजे. ते नसल्यामुळे सध्या गुगल Satellite View चा फायदा घेऊन तो बघू.
आयताकृती बुरुज |
आयताकृती बुरुज - Google Map Satellite View |
इथून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. पावणे दोन तास झाले होते, अजून बारीकसारीक अवशेष बघून गाडीत बसलो. वेळेअभावी मार्तूर किल्ला सोडून द्यावा लागणार होता आणि मालखेडचा किल्ला आधी बघायचा ठरला कारण तो मोठा असल्याचं वाचलं होतं.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
खूप छान भटकंती, लेखन आणि फोटो
ReplyDeleteधन्यवाद :)
Deleteफारच छान👌👌
ReplyDeleteधन्यवाद :)
Deleteसुंदर...👌👌
ReplyDeleteधन्यवाद :)
Deleteओमकार तू भटकंती करतोस पण अनुभव खूप छान लिहितोस.त्यामुळे आम्हालाही आनंद मिळततो.फोटो ही खूप छान.लवकरच पुस्तक रुपात अवतरु दे.मराठी भाषेत असल्याने ओघवत्या शैलीत वाचल्याचा आनंद वेगळाच अनुभवायला मिळतो.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteपुस्तक लिहिण्याएवढी माझी भटकंती आणि पोच नाही, तेवढे अनुभव जमले तर प्रयत्न करू नक्की :)
अप्रतिम भटकंती आणि लेखनही. खूपच छान
ReplyDeleteधन्यवाद! :)
Deleteओंकार, खूप दिवसांनी तुझा भटकंतीचा ब्लॉग वाचला.नेहमीप्रमाणे छान फोटो व सुंदर वर्णन.भविष्यात पुस्तकरूपात वाचायला मिळेल,अशी आशा बाळगतो.
ReplyDelete