काही किल्ल्यांवर सुंदर पाकळीदार बुरुज असतात, तर
काही गडांची तटबंदी रेखीव असते. कुठे एखादी रेखीव घुमटीदार मशिद, कुठे नक्षी,
बांधणीने नटलेले मंदिर, कुठे चर्च, तर कुठे पाण्याची कातळकोरीव टाकी. एखादा गड
खांद्यावर तोफा मिरवीत असतो तर कोणी गड कपाळी कोणा मराठा किंवा मुसलमानी सरदाराने
कोरलेला शिलालेख बाळगून असतो. हनुमान मंदिर मात्र सगळीकडे असतंच असतं. काही किल्ले
बिचारे उघडेबोडके असतात. कोणाला इंग्रजांनी उध्वस्थ केलेलं असतं, तर काहींना कफल्लक
करण्यास जबाबदार आपलेच असतात. याही परिस्थितीत काही गड नशीब काढतात आणि वर्षानुवर्ष
अवशेष संपन्न राहतात. असाच एक नशीबवान किल्ला - किल्ले गाळणा.
किल्ले गाळणा |
गाळणा हा बागलाण मधला महत्वाचा डोंगरी दुर्ग.
त्यामुळे बागलाणवर सत्ता असण्यासाठी ह्याच्यावर ताबा असणे गरजेचे असावे, कारण बागुल
राजाच्या कालखंडात त्याचे वर्चस्व मोडून काढणे बहामनी व निजामशाहीला जमले नव्हते.
अर्थातच गाळणा ताब्यात येत नव्हता. परंतु नंतर निजामशाहीत जो आला तो बहामनी राजा बहिर्जी याने परत जिंकून घेतलान.
नंतर निजामांनी तो मिळवलानी, जो खेळीने मुघलांनी मराठ्यांकडे (शहाजी महाराज) जाऊ न देता आपल्या ताब्यात
घेतला. शेवटी मराठ्यांनी (पेशवे) निजामाकडून किल्ला घेऊन होळकरांकडे दिला. जो पुढे
१८०४ मध्ये इंग्रजांनी जिंकून घेतलानी.
तर किल्ले कंक्राळा बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच गाळण्याला भेट द्यायची होती. म्हणून मुक्कामाला आलो गाळण्याच्या पायथ्याशी असलेल्या “श्री गुरु गोरक्षनाथ पंचायतन मंदिरात”.
रहायची, जेवायची व्यवस्था एकदम उत्तम झाली आमची.
भक्तनिवासातल्या खोल्या आणि त्यांच्या खान्देशी जेवणाचा पाहुणचार. भाकरी आणि बरोबर
पातोड्याची आमटी असा बेत उत्तम झाला होता.
चहा... |
लवकर उठून मंदिराच्या मागे असणाऱ्या गाळण्याचे
दोन-चार फोटो काढून घेऊन शोध सुरू झाला चहाचा. मंदिराच्या बाहेर पडल्यावर जवळच चहा
आधण ठेवलेला दिसला. ज्याप्रमाणे लोहाराकडे एक विशिष्ठ प्रकारचा भाता असतो
त्याप्रमाणे ह्या चहाच्या दुकानात हाताने फिरवायचा भाता होता. वर गरम गरम चहा उकळत
होता. सगळ्यांनी मनसोक्त चहा ढोसल्यावर ;) मगच किल्ल्याची वाट धरली.
गाळणा हा दुर्ग काही अपरिचित, दुर्गम वगैरे नाहीये.
उलट बऱ्यापैकी प्रसिद्ध असल्यामुळे खालपासून दरवाजांपर्यंत सरळ पायऱ्याच आहेत. ठळक
अवशेषांच्या फोटोसहीत थोडक्यात माहितीचा फलक वाटेवर लावलेलाही आहे.
परकोट म्हणजेच जिबीचा किंवा चौकशीचा दरवाजा |
या फलकापासून पायऱ्या चढत गेल्यावर अवघ्या तीन चार मिनिटात गडाचा पहिला दरवाजा लागतो. ह्याच्या कमानीवरचे फक्त उजव्या बाजूचे कोरलेले कमळ शाबूत आहे. दरवाजामागच्या देवड्यांच्या खिडक्यांना सुंदर तिहेरी कमान आहे. हा परकोट दरवाजा. यालाच जिबीचा म्हणजेच चौकशी दरवाजा असेही म्हणतात. दरवाजा ओलांडून पुढे आल्यावर गाळणा आपले एक एक दागिने “पेश” करायला सुरुवात करतो. खालूनच लक्ष वेधून घेतो उजवीकडच्या तटबंदीतून डोकावत असलेला खिडकीचा नक्षीदार सज्जा. तर समोर दिसतो तो एकाकी कमान/दरवाजा सदृश्य अवशेष.
वर येताना डावीकडे दोन टाकी |
लोखंडी दरवाजा |
पर्शियन भाषेतील शिलालेख |
मनोमन ह्या दोन्ही ठिकाणांवर फोटो घेण्यासाठी फ्रेम तयार
झाल्या. वर येताना डावीकडे दोन टाकी दिसली जी जवळपास बुजत आली आहेत. वळणदार
रस्त्याने वर आल्यावर लपलेला दरवाजा समोर आला. हा दुसरा दरवाजा. या दरवाजाला
पूर्वी लोखंडी पत्र्याचे आच्छादन होते म्हणून ह्याचे नाव लोखंडी दरवाजा. कमानीवरची
दोन्ही बाजूला असलेली रेखीव दुहेरी कमळ सुदैवाने शाबूत आहेत. दरवाजाला लागून
असलेली तटबंदी मजबूत आहे आणि वर बरोबर मध्ये असलेल्या चर्येवर पर्शियन भाषेतील
शिलालेख आहे. दरवाजामागे प्रशस्त देवड्या आहेत. पर्शियन शिलालेखाचा अर्थ असा –
अफलातुनखानाने या गाळणा किल्ल्याची तटबंदी बांधली, यात त्याने दगडी बुरुज बांधले ते असे, कि बाहेरच्या
जगाला ते दिसु शकणार नाहीत. तो (किल्ला)
आकाशातील गोलापेक्षा मोठा आहे म्हणूनच
त्यापेक्षा पुरातन आहे. हिजरी
वर्ष ९७४ (इ.स. १५६६-६७) या साली काम सुरु झाले. हे
रचनाकार आणि लिहीणारा ‘हुशी
शिराजी'.
फारसी भाषेतील शिलालेख आणि दिंडी दरवाजा |
इथे डावीकडे एक वाट जाते तिकडे उंच दगड आहे त्यावर
एक शिलालेख कोरलेला आहे. हा फारसी भाषेत आहे. याचा अर्थ असा -
या अल्लाह, मुराद
बुरुज संरक्षणासाठी व प्रतिष्ठेसाठी बांधण्यात आला. जर
तुम्हाला आवडला असेल तर त्याला विजयाचा व समृध्दीचा आशिर्वाद द्या. गाळणा किल्ल्यावर
मुराद नावाचा राजवाडा देखील बांधावा. लोक या
मंगलदायक राजवाड्यातून मदत देखील घेउ शकतात. आधी जो
बुरुज बांधला तो मजबुत नव्हता म्हणून तो
बुरुज पुन्हा दगडाने बांधून मजबुत केला. किल्ल्यावर
बांधलेला राजवाडा खुप प्रसिध्द झाला, तो फक्त
विजयी राजासाठी पुर्ण केला, म्हणून हा
सुंदर बुरुज बांधला, तो असाच
प्रसिध्द राहिल. हा
हबितखान याने बांधलान, सय्यद
माना हुसेन याचा मुलगा सैय्यद ईस्माईल याने हा लेख लिहीला, रबी
महिन्याच्या पहिल्या तारखेला, आ.: ९८७
(इ.स. १५८९)
लेखासाठी निवडलेल्या दगडाचा वरचा ७०% भाग
वापरलेला आहे तर खालचा ३०% भाग पाटी
कोरी करकरीत. असं शक्यतो बघण्यात येत नाही. किमान आत्तापर्यंत बघितलेले शिलालेख हे
तरी जेवढ्यास तेवढ्या दगडात कोरलेले होते किंवा कदाचित उरलेला भाग कापून टाकण्यात
आला असावा. पण इथे तसं नव्हतं. इथून पुढे गेलो तर एक दरवाजा लागतो जो मुख्य
दरवाजांपैकी नाही. याला दिंडी दरवाजा म्हणतात. इथून पुढे वाट बांधलेली नाही, पण
पुढे टाकं दिसतं ज्यातलं पाणी पिण्यायोग्य नाही आणि तसाही इथे माकडांचा वावर फार
आहे त्यामुळे हे त्यांचे नेहमीचे ठिकाण असेलच पाणी प्यायचे.
पण... पण हे सगळं मी तेव्हा पहिलेच नाही. उतरताना
पाहिलं. वर जाताना तर फोटोसाठी ज्या फ्रेम बघितल्या होत्या तिथे आधी जायचं होतं.
पुढे पोहोचलो ते तिसरा दरवाजात. हा कोतवाल पीर
दरवाजा. दरवाजाच्या वरती उजव्या बाजूला होती माझ्या एका फोटो फ्रेमची जागा तर
डावीकडे दुसरी.
ह्या दरवाजावर किल्ला बांधणाऱ्यांनी काही लिहून
ठेवलेले नाही पण ती उणीव बघायला येणाऱ्या लोकांनी मात्र “आसिफ, आफ्री, शिव, मराठा,
समीर, सपना” वगैरे खूप काही लिहून भरून काढलेली आहे आणि आपल्या नतद्रष्टपणाचे
पुरावेही ठेवले आहेत.
लाखा दरवाजा |
प्रशस्त देवड्या |
पुढचा दरवाजा हा चौथा दरवाजा - लाखा दरवाजा.
पुरातत्व खात्याला हा दरवाजा बहुतेक पूर्णच बांधून काढायला लागलेला असावा असं दिसत
होतं. याच्या कमानीवरची दोन्ही बाजूची कमळं रेखीव आणि तिहेरी आहेत तर दरवाजाची
कमान महिरपी आहे. ह्याच्या देवड्याही प्रशस्त असून जीर्णोद्धारात ह्याला लाकडी
खांब उभारलेले आहेत. यांनी त्याचे नष्ट झालेले मूळ रूप दिसत नसले तरी जिवंतपणा
नक्कीच आला आहे. यासाठी पुरातत्व खात्याचे नक्कीच कौतुक आहे.
खालून येणारी वाट |
दरवाज्यातून वर आल्यावर माझ्या दोन्ही फोटो फ्रेम
जवळच होत्या. साकेत आणि मी एकमेकांचे फोटो काढतच हे अवशेष बघत होतो. खाली दिसणारी
दरवाजांची रचना, वळणदार
वाट निश्चितच सुंदर चित्र उभं करतात. ह्या दरवाजातून उजवीकडे वळल्यावर पहिली फ्रेम म्हणजे
ती नक्षीदार कमानी सदृश जागा. खरं तर इथे यानंतर पुढे असणाऱ्या दुसऱ्या सज्जा
सारखा सज्जाच असावा आणि उरलेला सगळा भाग ढासळून जाऊन फक्त हा कमानीचा अवशेष शिल्लक
असावा. असं जरी असलं तरी हा शिल्लक भाग मात्र वेगळ्याच प्रकारचं सौंदर्य आहे.
एका पाठोपाठ एक अशा पाच गुहा |
लाखा दरवाजातून सरळ वर गेलं तर आपण गडावर जातो पण
आम्ही या सज्जाच्या मोहापायी उजवीकडची वाट पकडून आलो होतो. डोक्यात जी फ्रेम असते
तसे फोटो कायम शक्य होतातच असं नाही, पण ते सौंदर्य अनुभवायला मिळणे हेही नसे
थोडके. त्यातून इथे पुढे तर लांबच लांब तटबंदी दिसली. ती उजव्या बाजूला ठेवत सरळ
पुढे अजून काही अवशेष दिसतील म्हणून निघालो. पुढे एका पाठोपाठ एक अशा पाच गुहा
दिसल्या. पैकी तिसरी गुहा हे मंदिरच आहे. इथे उजवीकडे हनुमानाची मूर्ती आहे तर
मधोमध दगडात शंकराची पिंडी कोरलेली आहे आणि पुढे लहानगा नंदी आहे, तर पाठी मागच्या
भिंतीत गणपती कोरलेला आहे.
गाळणेश्वर महादेव |
या महादेवालाच गाळणेश्वर महादेव म्हणतात, ज्याच्यावरून
किल्ल्याचे नाव गाळणा पडलेले आहे. गडाचा त्याआधीचा उल्लेख “केळणा” असाही आहे.
फारसी भाषेतील शिलालेख आणि त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला शरभ |
हे खरं तर गाळणेश्वराचं मूळ मंदिर नसावे. ते गडावर
वर होते. गुहेच्या बाहेरच्या बाजूने चक्क कातळातच भिंतीला धरून कळस कोरलेला आहे. या
तटबंदीच्या फांजीवरून चालताना एका ठिकाणी एक शिलालेख दिसला हा फारसी भाषेतील
शिलालेख आहे आणि त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला शरभ आहेत. शिलालेखाचा अर्थ असा –
तो आहे, गाळणा
किल्ल्यावरील भरभक्कम बुरुजाचा पाया फौलादखान काझी याने घातला आहे, शहा-ई-मर्दान
(अली) याच्या मर्जीने हा पुर्ण केला, कदाचित
कायमस्वरुपी आणि वापरण्यास योग्य, हा
लिहीणारा गरीब व्यक्ती ‘झहीर
मुंहमद’ इहिदे
तिसैन तिसमय्या (रबी आ - ९९१ = मार्च १५८३)
चोर दरवाजा |
या फांजीवरून वरूनच पुढे चालत गेल्यावर शेवटी एक चोर
दरवाजा लागतो. इथे खाली पाण्याचे टाकेही आहे. ह्या चोर दरवाजातून वाट परकोट किंवा
लोखंडी दरवाजाकडे जाते असे वाचले होते, परंतु एक तर वाट ढासळलेली आहे आणि आम्हाला
अजून किल्ला बघायचा होता, त्यामुळे परत मागे फिरून लाखा दरवाजाजवळ आलो.
गाळणेश्वराचं मूळ मंदिर उद्ध्वस्त करून बांधलेली मशीद |
खाली दरवाजे आणि पायथ्याला श्री गुरु गोरक्षनाथ पंचायतन मंदिर |
सरळ वर जाणारी वाट गडावर जाते. इथे एक मशीद आहे जी
खालपासून आपल्याला दिसत असते. हे खरं तर गाळणेश्वराचं मूळ मंदिर. ई.स. १५२६ ला
अहमदनगर चा बादशहा बुरहान (बुऱ्हाण?) निजामशहा ने हे मंदिर पाडून मशीद उभारली. आणि
असा उल्लेखच “बुरहाने मासिन” ग्रंथात नोंदवून ठेवलेला आहे. एकूणच मुसलमानी राजवटीत
मंदिरं पाडून त्यावर मशिदी उभारून त्याचे उल्लेख अभिमानाने (माज?) करून ठेवलेले
दिसतात. त्यामुळे ह्या वास्तूबद्दल तशी आत्मीयता असायचं काहीच कारण नव्हतं,
सौंदर्याचं म्हटलं तर ह्यापेक्षा कित्येक पटीने अधिक उत्कृष्ट मशिदी काही ठिकाणी
आहेतच. तरी इथे आलोच आहोत तर “मंदिर उद्ध्वस्त करून बांधलेली मशीद” म्हणून तिथले
काही फोटो घेतले एवढंच. जुन्या पाहिलेल्या फोटोत मशिदीचा रंग पांढरा होता तर सध्या
रंग आकाशी-निळसर आहे. नेमाने रंग वगैरे दिला जातोय म्हणजे स्थान जिवंत आहे हे उघड आहे.
जर मंदिर पाडून मशीद बांधल्याचे दुःख/पश्चाताप कोणालाच नसेल, अगदी सरकारला सुद्धा,
तर ही शोकांतिकाच. असो... जिथे स्वराज्यात राहूनच स्वराज्याच्या शत्रूची – अफझलखानाची
कबर पुजली जाते तिथे ह्याची काय कथा. आणि कौतुकाने शेजारी फलक सुद्धा आहे ज्यात साधारणपणे
असं लिहिलंय कि “इथे गावात हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. धार्मिक स्थळ आहे. तंटा
करू नये” वगैरे... फलक मराठीत लिहिलेला आहे आणि कदाचित महाराष्ट्रीय असून सुद्धा
काही जणांना मराठी समजत नसेल (किंवा वाचवत नसेल) म्हणून त्या लोकांसाठी उर्दूमध्ये
लिहिलेला आहे. मशिदीत आत मध्ये खांबांवर कुराणाचे आयत लिहिलेले आहेत. शेजारच्या
जिन्याने मशिदीच्या वर जाता येतं जिथून समोर कंक्राळा, लालिंग, भामेर वगैरे
किल्ल्याचे दर्शन होते.
पाण्याचा हौद |
अंबरखाना |
जुन्या वाड्यांचे अवशेष आणि झरोक्यांच्या रेखीव कमानी |
वनविभागाने आच्छादन करून खाली बाकडी बांधून बसायची केलेली सोय |
मशिदीच्या बाजूला पाण्याचा हौद आहे, उतरण्यासाठी
पायऱ्या वगैरे आहेत. बाजूला आजूबाजूला जुन्या वाड्यांचे बरेचसे अवशेष आहेत ह्यात
अंबरखाना सुद्धा आहे, गडाची सदर आहे. इथल्या भिंतीतल्या देवळ्याही शाबूत आहेत. वाड्याची
कड्याच्या बाजूची भिंत आणि त्यातल्या झरोक्यांच्या कमानी शाबूत आहेत. इथून खाली पायऱ्यांची
वाट, पंचायतन मंदिर आणि गाव सुंदर दिसतं. इथं वनविभागाने आच्छादन करून खाली बाकडी
बांधून बसायची सोय केलेली आहे त्याचा मान ठेवून आपापल्या पिशव्या सोडून खादंती
केली.
आजूबाजूला खूप अवशेष असून ते नीट बघावेत. एके ठिकाणी
सुंदर कमळ ही कोरलेलं आहे जसे खालच्या
दरवाज्यांजवळ दिसतं. मशिदीच्या मागच्या बाजूला गेल्यास रंगमहाल आहे. समोर नक्षीदार
हौद आहे. रंगमहालाच्या भिंतीवर महिरपी कोनाडे आहेत. पुरातत्व खात्याने ह्याच्या छपरांना
लाकडी खांबाचा आधार दिलेले आहेत.
रंगमहाल आणि लिंबू टाके |
समोरच्या कुंडाला लिंबू टाके म्हणतात. येथून पार
लळिंग, मालेगाव पर्यंत भुयारी रस्ता असून वरून लिंबू टाकल्यास तिकडे पोचेल अशी
कल्पना सांगितली जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी चामड्यात संदेश लिहून तो यामार्गे
खाली पोचवून वेढा/लढाईच्या वेळी रसद मागण्यासाठी ती व्यवस्था होती असं सांगितलं
जातं. पण बहुतांशी या सर्व कल्पना असाव्यात.
इथल्या सगळ्या अवशेषांचे वर्णन करू तेवढे कमी आहे.
प्रत्यक्षात खूप बारकावे आणि गोष्टी आहेत इथे.
मशिदीजवळून प्रदक्षणा मार्गाने तटबंदीकडेने बघायला
सुरुवात केल्यास खाली गुप्त दरवाजे, परकोटाची तटबंदी, पाण्याची टाकी अशा गोष्टी
दिसतात. एके ठिकाणी एक थडगेही आहे. सध्या ते उघड्यावर असलं तरी पुढे त्याला हळूहळू
पत्रा वगैरे होऊन महत्त्वाचे ठिकाण बनेल हे साहजिक आहे.
तटबंदी |
तटबंदीतून जमेल तिथे खाली वाकून तटबंदीची बाहेरची बाजू
बघता येते, बुरुज बाहेरून निरखता येतात. तटबंदीत एक शिलालेख आणि व्याल असल्याचं
चिले सरांच्या पुस्तकात वाचलं होतं त्यामुळे ते शोधत होतो तटबंदीवरून फिरताना. एका
प्रशस्त बुरुजावर बरोबर मध्यभागी हे शिल्प सापडलं. तोफांच्या/बंदुकांच्या माऱ्यासाठी चर्यांमध्ये जागोजागी तशी व्यवस्था ठेवलेली आहे.
पर्शियन भाषेतला शिलालेख आणि व्याल |
पर्शियन भाषेतील शिलालेख आणि पूर्ण देवनागरी लिपीतील शिलालेख |
बुरुजाच्या मधोमध असलेला हा शिलालेख पर्शियन भाषेतला
आहे. त्याच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला व्याल कोरलेले आहेत. अजून एक
शिलालेख हा गडाच्या डाव्या टोकावरील बुरुजावर आहे. हाही पर्शियन भाषेतील आहे.
त्याच्याही शेजारी व्याल आहेत आणि ह्यावर कडेला चक्क देवनागरीत ही काही लिहिल्याचं
दिसतं. गडाच्या उत्तरेकडे असलेल्या बुरुजावर चक्क पूर्ण शिलालेख देवनागरीत लिहिलेला
आहे. जो १५८० सालचा असून त्याखाली मोहम्मद अलीखानच्या नावाचा लेख १५८३ सालचा आहे.
थडगी आणि इंग्रजीतील शिलालेख |
एका बुरुजावर तोफ फिरवण्याचा रॉड दिसतो. गडाच्या
मध्यभागी टेकडीवजा उंचवटा आहे. इथे वरती काही थडगी आहेत. ह्यावरची नक्षी आणि
चिन्हे पाहता ती थडगी राजघराण्यातील लोकांची असावीत हे स्पष्ट होते. त्यावर फारसी/पर्शियन
भाषेत काही मजकूर आहे, जे स्वाभाविक आहे. परंतु एके ठिकाणी चक्क इंग्रजीत मजकूर कोरलेला
आहे. हि एका इंग्रज अधिकाऱ्याची आहे. त्याची कथा अशी कि एकदा हा तरुण इंग्रज अधिकारी
शिकारीसाठी गाळणा किल्ल्यावर आला होता. त्याला एका
झाडामागे अस्वल असल्याचा भास होऊन त्याने गोळी झाडलीन, मात्र ती
गोळी तिथे असलेल्या एका म्हाताऱ्या बाईला लागून तीचा मृत्यु झाला. आपल्यावर
ब्रिटीश कायद्याप्रमाणे खटला चालून शिक्षा होईल या भितीने त्याने आत्महत्या केलीन.
चोर दरवाजे |
चोर दरवाजे |
काही पाण्याची टाकी |
गडमाथा पूर्ण बघून झाल्यावर परत लाखा दरवाजाजवळ आलो.
खालून वर येताना उजवीकडच्या वाटेने, सज्जा, महादेव वगैरे बघून आलो होतो आणि नंतर सरळ
वर येणाऱ्या वाटेने माथ्यावर आलो होतो. पण डावीकडची वाट बघायची राहून गेली होती.
तिकडून पुढे गेल्यावर अजून काही पाण्याची टाकी लागली. काही बुरुज, त्यातले चोर
दरवाजे असे अनेक अवशेष बघायला मिळाले. बहुतांशी लोक इकडे येत नसावेत त्यामुळे
तिकडे संवर्धनाचे काम तितकेसे झाले नाहीत. (किंवा उलट) तिथल्या खांबटाक्यातले खांब
आता दिसेनासे होत आलेले आहेत कारण पूर्ण टाके गाळाने बुजतेय.
किती पाहू आणि किती लिहू असे अनेक अवशेष बघून झाले
होते. कोपऱ्या-कोपऱ्यात असणारे दिंडी/चोर दरवाजेही पाहून झाले होते. टाकी शोधून
शोधून बघितली होती. बघताना तर काय लिहिताना पण थकायला होते इतक्या अवशेषांनी हा
दुर्ग संपन्न आहे, हे सुदैवच. अर्थात तो राबत्या काळी नक्कीच महत्त्वाचा असणार हे
सांगायला अजून वेगळ्या अभ्यासाची गरज वाटत नाही.
ही आमची दोन दिवसांची बागलाण गड-भ्रमंती येथे संपन्न
झाली होती. खाली उतरलो तेव्हा जवळच्या दुकानात चहा वगैरे सगळ्या गोष्टी रीतिरिवाजाप्रमाणे
होऊन सूर्यफुलाच्या बिया तोंडात टाकत घराची वाट धरली.
अरे हो.. जाता जाता बोनस म्हणून “देवळाणे” चे शिवमंदिर
आणि भूमिज शैलीतले अत्यंत सुंदर “माणकेश्वर” मंदिरही बघितले.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
वा खूप छान अनुभव लिहीतोस असेच लिहीता लिहीता एक दिवस तुझे पुस्तक हाती येऊदे.
ReplyDeleteधन्यवाद . पुस्तक म्हणजे जरा जास्तच आहे :)
Deleteएवढी माझी भटकंती नाही.
कृपया आपले नांवही लिहावे कमेंट खाली.
सूंदर.. अभ्यासपूर्ण लेख !
ReplyDeleteधन्यवाद समीर :)
Delete