यादगिर किल्ला बघून झाल्यावर इडली-वडे सगळ्यावर ज्यापद्धतीने तुटून पडलो होतो, ते बघता दुपारच्या जेवणाची लवकर आठवण होणारच नव्हती. एकूणच कर्नाटकामध्ये कुठल्याशा निवडणुकांचे वारे वाहत होते, त्यामुळे यादगिर मधून पण लांबच्या रस्त्याने बाहेर पडायला लागले. शहापूर किल्ल्याच्या पायथ्याशी यायला सव्वा अकरा झाले होते. या किल्ल्याचा पायथा म्हणजे श्री सिद्धलिंगेश्वर मंदिर. शहापूर गावाच्या बाजूने या डोंगरावर सरळ डांबरी रस्ता केलेला आहे. गुगल सरळ हाच रस्ता दाखवतो.
तसा डोंगराच्या गावाकडच्या बाजूने एखादा रस्ता नक्कीच वर येत असेल, पण आम्हाला धोपटमार्ग पाहिजे होता आणि गावात त्या गर्दीत गाडी घालण्यात काहीच अर्थ नव्हता.
सिद्धलिंगेश्वर मंदिर शिवपिंडीच्या आकारात बांधलेले आहे. आवारात प्रचंड वटवृक्ष आहे, ज्याचा विस्तार डोळ्यांना नक्कीच सुखावतो. मंदिराच्या जागेत गाड्या पार्क केल्या. किल्ला समोरच दिसत होता. कुठूनही गेलं तरी वाटेत झाडी दिसत नसल्यामुळे वाट न सापडण्याचा प्रश्न येणार नव्हता. पण उगाचच धोपटमार्ग का सोडा, म्हणून प्रशस्त असा जो मार्ग दिसला, त्यावरूनच निघालो
रस्ता थोडासा वळसा मारून आहे. सपाटीवरून चालत होतो. उजवीकडे काही अंतरावर एक मंदिर दिसलं. त्या खालच्या सिद्धलिंगेश्वर मंदिरातून, या मंदिरात सरळ पायवाट नक्कीच येत असेल, पण आम्ही उगाचच प्रशस्त रस्ता पकडू म्हणून वळसा मारून आलो होतो. समोर दिसत असलेल्या किल्ल्याच्या डोंगराला डावीकडे ठेवत, एकदम उजव्या टोकाला आलो, जिथे दुसऱ्या मंदिराकडून सरळच रस्ता येत होता.
समोरच्या डोंगरावर सुद्धा गडाचे अवशेष दिसले, हा या किल्ल्याचाच भाग. शहापूर हा जोड किल्ला आहे, शेजार-शेजारच्या दोन डोंगरांवर मिळून.
आम्हाला आधी मुख्य भागात जायचं होतं, म्हणजे जो डोंगर डावीकडे ठेवला होता त्यावर.
तसं बघायला गेलं तर डाव्या बाजूला वर बघितल्यावर दरवाजा किंवा किल्ल्यात शिरता येईल असा आकार दिसत होता. पण एक तर हा प्रदेश नवीन, मोठमोठाले प्रचंड खडक अस्ताव्यस्त पडलेले, उगाच कुठल्यातरी मार्गाने जाऊन समोर एकदम खड्डा यायचा, त्यापेक्षा कशाला धोपटमार्ग सोडा? त्यातून आम्ही धरलेल्या प्रशस्त रस्त्याच्या बाजूला सरळ बाण काढलेले रंगाने.
अवघ्या दोन मिनिटांत एक पाण्याचा बांधीव टाकं लागलं. ते अगदीच कोरडं नव्हतं, पण पाणी पिण्यायोग्य नव्हतं. वरच्या बाजूला तटबंदी सुद्धा दिसली. जर असंच पुढे गेलो तर दगडी पायऱ्या, आणि उजवीकडे वळलो तर एक दरवाजा आहे. दरवाजाची पूर्ण कमान नक्षीदार आहे. वरती मधोमध एक दगड आहे, ज्याच्यावर मध्ये गणपती, आणि त्याच्यावर दोन्ही बाजूला सोंडेने अभिषेक घालत असलेले हत्ती आणि मोर असे कोरलेले आहे. दरवाजाला प्रशस्त देवड्या असून त्याला सुंदर कमानी आहेत.
दरवाजा ओलांडल्यावर मुख्य किल्ल्याचा भाग असलेल्या डोंगरावरची तटबंदी डावीकडे वरती दिसायला लागली. याचा अर्थ आम्ही डोंगराच्या पलीकडच्या बाजूने कडेकडेने चाललो होतो. म्हणजे वर जाणारा रस्ता वळसा मारून असावा. कारण चालत असलेला मुख्य रस्ता आम्ही सोडलाच नव्हता. म्हणजे इथूनच कुठूनतरी वर जाणारा रस्ता असणार होता.
आम्ही हीच कन्नड अक्षरं आणि बाण दिशादर्शक म्हणून मानत होतो |
डोंगराच्या कडेला लागून दाट बाभळीची झाडी, तर आम्ही जात असलेला रस्ता स्वच्छ आणि साफ केलेला. पुढे मात्र वाट थोडी दाट झाडीत शिरली. पण सावलीत चालायला छान वाटत होतं. त्यातून कन्नड मध्ये बोर्ड आणि बाण. मी आणि प्रमोद पुढे होतो. डावीकडे डोंगराच्या कड्याची उंची वाढत चाललेली समजत होती. वर जायची वाट काही येत नव्हती, पण आम्ही चाललेली पायवाट अतिशय चांगली मळलेली, साथीला कन्नड बोर्ड आणि तोही बाणा सकट. अर्थात किल्ल्यावरच्याच कुठल्याश्या मंदिरात जाण्यासाठी बाण काढलेले असणार ना...
पुढे चालत राहिल्यावर एक पडका दरवाजा. त्यात प्रशस्त देवड्या वगैरे. दरवाजा ओलांडला, तर जंगल साफ एकदम. तरी पण एक कळलं होतं, किल्ल्यावर जायची वाट सोडून या कन्नड बोर्डाने भलतीकडेच कुठे तरी आणलं होतंन. आम्ही मध्ये मध्ये मागचे लोक लोक हाकेच्या अंतरावरच आहेत ना हे पाहत होतोच.
आता सरळ मागे फिरून त्यांची वाट बघितली. सगळ्यांना आपण रस्ता चुकल्याचं सांगितलं. आधी सगळे एकत्र जमा झालो. थोडी चर्चा झाल्यावर शेडबाळे सर एकीकडे, तर प्रभाकर आणि मापारी सर दुसरीकडे जायचं ठरवून निघाले. उरलेले आम्ही, यांची वाट बघत मध्ये थांबलो.
शेजारच्या डोंगरामुळे आम्ही कुठे आलो आहे हे माझ्या लक्षात येत होतं. तसंही आम्ही किल्ल्याच्या मुख्य डोंगराला लागूनच होतो. फक्त एकदम मागच्या, म्हणजे गावाकडच्या बाजूला आलेलो. इथून वरती जायला नक्की जागा असणार होती. गुगलप्रमाणे तिकडे एक दर्गा असायला हवा होता एकदम डाव्या बाजूला. गडाचा मॅप बघणे आणि गाडीमध्ये तरी नेव्हीगेटर मीच, त्यातून सर्वात पुढे चालत येऊन मागच्या सर्वांना ह्या चुकलेल्या रस्त्यावर मीच घेऊन आलो, ही चुटपुट लागलेली. मुद्दामच आणखी रस्ता शोधा च्या भानगडीत पडलो नाही.
आणि एक तर शेडबाळ सर एकीकडे, तिकडे प्रभाकर आणि मापारी सर दुसरीकडे गेलेले, त्यात मला तिसरीकडे जाऊन अजून गोंधळ वाढवायचं नव्हता.
"श्री जिव्हेश्वर" मंदिर |
प्रभाकर आणि मापारी सरांना एक मंदिर सापडलं जे गुहेत होतं. वाटेत ते बोर्डावर वाचत (म्हणजे आम्ही नुसती कन्नड अक्षर बघत आलेलो) ते हेच "श्री जिव्हेश्वर" मंदिर. हा शोध पूर्ण कर्नाटक भ्रमंती नंतर आज हा ब्लॉग लिहिताना, माझ्या मामीला तो बोर्ड वाचायला दिला त्यावरून बोध झाला.
आता एवढं सगळं वाचल्यावर सांगतो की "इथे यायचं नाSSSSही". उलट फिरून "इथे डाव्या बाजूला दरवाजा किंवा किल्ल्यात शिरायला योग्य अशा प्रकारचे बांधकाम दिसलं. तिकडे न जाता धोपट मार्गाने पुढे आलो" असं जिथे लिहिलं होतं ना? तिथपर्यंत मागे जायचं (म्हणजे वाचताना, प्रत्यक्षात नव्हे) आणि तिथेच डावीकडे वर दिसणाऱ्या बांधकामात घुसल्यावर सरळ किल्ल्यात जातो आपण. 😝😝😝
पण सध्यातरी आम्ही इकडे श्री जिव्हेश्वर मंदिराजवळ आलो होतो. त्यात शेडबाळे सर सोडून आम्ही एकत्र होतो. आता त्यांची शोधमोहीम सुरू झाली. बराच वेळ ते रस्ता बघून तिथेच परत येतील अशी वाट बघितली. तशी लक्षणं न दिसल्याने मागे फिरून सरांच्या नावाने हाका मारत सुटलो.
आता किल्ल्याचा मुख्य डोंगर उजवीकडे होता तर दुसरा डोंगर समोरच होता. किंबहुना आम्ही त्याच्या आतमध्ये इथुनच कुठून तरी शिरू शकू म्हणतानाच तटबंदी दिसली. आधी वाट चुकताना मीच आघाडीवर असलो, तरी इथे तटबंदी दिसल्यावर परत आधी धाव घेतली गेली. दरवाजा सापडला, तो सुद्धा अगदी कमानीवर तीन कमळ वगैरे सह.
मी कसाही, कुठेही आणि सगळ्यात आधी शिरत असलो तरी एक नियम कधीच मोडला नव्हता, आपल्या मागचा माणूस हाकेच्या अंतरावर आहे ना याची खात्री करत राहायचा. त्यामुळे किमान मला शोधत राहायची वेळ कोणावर येणार नव्हती.
तर, माझ्या मागचे कायम हाकेच्या अंतरावर आहेत ना याची खात्री करत, म्हणजे मध्ये मध्ये हाका मारत, किल्ल्याच्या या भागात शिरलो.
इकडे तर चहूबाजूला तटबंदी. किल्ल्याच्या मुख्य डोंगराच्या बाजूला पाहिले, तर त्यावरचे बुरुज वगैरे बांधकाम इकडूनच दिसायला लागले.
खुद्द मी ज्या किल्ल्यात उभा होतो, तिथे डोंगराचा सर्वात उंच भाग आणि खाली जमिनीच्या पातळीवर एक मंदिर. सर्व बाजूंची तटबंदी निरखताना शेडबाळे सरांच्या नावांचा जप चालूच होता, तर दुसरीकडे मागे विनीत प्रमोद वगैरे यांच्या नावाने हाका.
तेवढ्यात उजवीकडच्या एका तटबंदीतून सर डोकावताना दिसले. ते निवांत तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने फिरत फिरत इथे येऊन आत मध्ये घुसले होते.
सगळे एकत्र आल्यावर मग, तुमचा फोन लागला नाही, आमचा फोन बिझी होता, किती हाका मारल्या... वगैरे सुखसंवाद झाला, हा सुखसंवाद जिथे झाला, तिथे एक मोठा तलाव होता. डावीकडच्या बुरुजातून शेडबाळे सर अवतरले होते, तर उजवीकडे आम्ही पूर्ण टोकापर्यंत जाऊनही काहीच न पाहिलेला शहापूर किल्ल्याचा मुख्य डोंगर होता.
रस्ते आणि सगळे भिडू सापडल्यावर लक्ष पुन्हा घड्याळाकडे गेलं. गेली ३०-४० मिनिटे फिरूनही किल्ला मात्र बघितलाच नव्हता. शेजारच्या बुरुजावरून पलीकडे बघितले तर किल्ल्याच्या तटबंदीची बाहेरची रेखीव बाजू व बुरुज दिसले.
समोर एक प्रचंड तलाव, शेजारी मस्त हिरवीगार हिरवळ आणि एका बाजूला किल्ल्याच्या तटबंदीची बाहेरची गोलाई. त्यात दिसणार्या कमानीदार पाकळ्या, आणि त्यात बंदुकीच्या माऱ्यासाठी ठेवलेल्या जंग्या.
"मंदाकिनी अंजनेय स्वामी" मंदिर |
किल्ल्याच्या आतल्या बाजूला तलावाजवळच्या मंदिराजवळ आलो. हे "मंदाकिनी अंजनेय स्वामी" मंदिर आहे. आत मध्ये हनुमानाची मुर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला मी गेलो. तिथे शंकराच्या पिंडीसारखा आकार असला तरी त्यात साळुंका नाही तर तीन खड्डे आहेत.
आम्हाला इथल्या लहानग्या उंचवट्यावर चढायचे होते. बाकी सगळे मंदिराच्या पुढच्या बाजूने वर निघाले, तर मी जिथे होतो तिकडून, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूने सुरुवात केली. तिकडून किल्ल्याच्या मुख्य डोंगरावरचे जवळजवळ सगळेच अवशेष दिसत होते. अर्थातच अजून तिकडे आमचे जायचे शिल्लक होते. मी चढत होतो ती वाट पावसाळ्यात अगदीच अशक्य आहे. एवढंच काय तर पाणी येत असेल तर पावसाळा वगळता इतर कधीही न जावं अशी सुद्धा. वर पोचलो तर एक पडकं बांधकाम आहे आणि जागोजागी पाणी साठून नंतर कोरडे पडलेले खड्डे. मी आणि नाना पुढे पुढे आलो होतो, तर इतर सगळे कदाचित खालीच असावेत अजून.
नेहमीप्रमाणे मी आणि नानांनी इकडच्या दगडांबरोबर, पाण्याबरोबर फोटो काढून घेतले.
खाली बघितलं तर प्रचंड जलाशय किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला.
एका बुरुजाच्या चोर दरवाजातून सगळे आज शिरताना दिसले. त्यांना वरून हात केला आणि आम्ही वर तिथेच वाट बघत थांबतो असं सांगितलं.
इथे कातळकोरीव वाटावेत असे काही खळगे होते. त्यात पाणी साचलेलं होतं, पण ती टाकी नसावीत. ते नैसर्गिकरित्या झालेलं वाटत होतं.
इथे माथ्यावर बघायला तसं काहीच नव्हतं. वरून किल्ल्याच्या दोन्ही डोंगरांचा view मात्र उत्तम दिसतो. एकदा चुकामूक होऊन गेली होती म्हणून सगळे येईपर्यंत मी आणि नाना तिथे थांबलो.
वरून किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बघून ठेवला होताच. सगळ्यांना त्या बाजूने उतरून दोन डोंगरांच्या मधल्या दरवाजात जाता येईल हे सांगितलं.
सर्वात आधी रस्ता चुकला तेव्हा सगळ्यात पुढे मीच होतो, तरी सगळ्यांना मी सांगत असलेला रस्ता तिथे घेऊन जाऊ शकेल की नाही यावर शंका आली नाही हे नशीब. 😄
तिथून खाली उतरताना, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला येणारा रस्ता एकदम निसरडा आहे. त्यावर पाणी असेल तर अजिबात येण्यासारखा नाही. एका चोर दरवाजातून खाली उतरून दोन डोंगरांच्या मधल्या भागात आलो. म्हणजे सगळ्यात आधी पाहिलेला हा दरवाजा, जिथे आम्ही सुरुवातीला येऊन तसेच पुढे मंदिराकडे गेलो होतो. नक्षीदार कमानीयुक्त, मध्ये दोन हत्ती गणपतीवर अभिषेक करत असलेला दरवाजा तो हाच.
एक चोर दरवाजा, जो आधीच्या डोंगरावरूनच हेरून ठेवला होता या महत्त्वाच्या किल्ल्यात जाण्यासाठी, तिथे आलो, चोरदरवाजे साधारणपणे ज्या उंचीचे असतात, तसाच हाही बेताच्या उंचीचाच. पण ह्याला एका बाजूला गोलाकार खांब आहे. दरवाजा ओलांडून गेल्यानंतर आत मध्ये मात्र चांगलीच झाडी आहे. झाडीच्या पलिकडे अजून एक चोरदरवाजा ओलांडावा लागतो.
इकडे खरंतर दरवाजांची अतिशय चांगली शृंखला असणार, जी आता पडझड झाल्याने नेमकी कशी असावी हे लक्षात येत नाही.
पुढे अजून काही बुरुज आणि त्यात दगड मातींनी बुजलेल्या दरवाजे दिसले. त्यात अर्थातच जागा आणि वाट शिल्लक राहिलेली नव्हती.
त्यात पूर्ण तटबंदीत फक्त उजवीकडेच, तो सुद्धा पडझड झाल्याने जायला रस्ता असल्याचं दिसलं. इथले सगळे दगड पावसाळ्यात अतिशय धोकादायक आहेत. सध्या कडकडीत ऊन आणि पाण्याचा थेंबही वर नसलेल्या दगडावरून सुद्धा आम्हाला पावलं तिरकी टाकत टाकत सांभाळून जावं लागलं.
मागे वळून बघितल्यावर आधी ज्या डोंगरावर गेलो होतो तिथली तटबंदी चांगली दिसत होती.
प्रत्यंचा अकारण ताणून धरलेल्या धनुष्याकृती आकाराचा तलाव |
तटबंदीतून आत आलो, तर समोरच त्रिकोणी आकाराचा तलाव दिसला. त्यात बऱ्यापैकी पाणी होते, अर्थात एकदम शेवाळ युक्त हिरवे हिरवे, अजिबात पिण्यायोग्य नसलेले. तलाव बांधताना दोन बाजूच्या नैसर्गिक दगडांच्या दोन बाजू धरून, म्हणजे त्या आकर्ण ताणून धरलेल्या धनुष्याची प्रत्यंचा मानल्या, तर वरच्या आणि खालच्या दोन बाजूची टोके ओढल्या गेलेल्या धनुष्याचा भाग, म्हणजे ही बाजू, पूर्ण बांधून काढलेली आहे. (परत एकदा वाचा वाक्य हवं तर आणि चित्राची मदत घ्या 😀)
इथे डावीकडे असलेल्या दोन बुरुजांच्या मध्ये असलेल्या दरवाजातून पलीकडे जाता येते.
आत मधे शिरल्यावर डावीकडच्या टोकापासून अगदी सरळ जिथपर्यंत दिसत होतं, तिथपर्यंत तटबंदी बांधून काढलेली दिसत होती. नैसर्गिक दगडांचा वापर करून जमेल तिथे टाकी बांधून काढलेली आहेत या तटबंदीला लागून. त्यात पाणीही बर्यापैकी दिसत होते. वाटेत तयार झालेल्या नैसर्गिक खड्ड्यात पाणी जमा झालेलं होतं ते वेगळंच. हे खड्डे म्हणजे जणू काही रांजणखळगेच आहेत.
डावीकडच्या तटबंदीला धरून पुढे शेवटी दिसत असलेल्या बांधकामांकडे निघालो. वाटेत खूप ठिकाणी दगड फोडण्याचे प्रयत्न केलेले दिसत होते. कदाचित मनासारख्या जागा न मिळाल्याने ते प्रयत्न अर्धवट सोडून दिल्यासारखेही वाटत होते.
समोर दिसणाऱ्या बांधकामांमध्ये चोर दरवाजा, मोठा दरवाजा आणि खूप गोष्टी दिसत होत्या. पण तिथे सरळ जायला जागा नव्हती. मधली बांधकाम ढासळलेली होती, मोठ मोठाले खड्डे किंवा तलाव म्हणता येईल अशा जागा इथे तयार झालेल्या आहेत.
मधोमध चौकोनी बांधकाम दिसलं, ती ह्या बाजूने तरी मशीद वाटत होती. तिथे जाऊन सावलीत बसायचं आणि थोडी पोटपूजा करायची असा मी विचार केला.
एक वाजून गेला होता. सूर्य चांगलाच तळपत होता. सुरुवातीला वाट चुकून नंतर सापडलेल्या किल्ल्याचा एक डोंगर बघून या महत्त्वाच्या डोंगरावर आलेलो. पाणी शरीरातील जणू तो सूर्य ओढून घेत होता. सुदैवाने आमच्याकडे पाण्याचा मुबलक साठा होता. वाट बघत होतो ती निवांत सावलीची.
बांधकामाच्या इथे पोचण्यासाठी वाट उजवीकडून असेल असं वाटत राहतं, पण तसं नाहीये. मध्ये तळं आहे. डावीकडच्या तटबंदीला धरूनच तिकडे पोचावं लागतं. त्यात वाटेत बाभळीचे काटे, ते सांभाळत बांधकामाजवळ पोचलो.
मशिदीचे बांधकाम सर्वसाधारणपणे असतं तसंच आहे. वर कमानी, नक्षी. चार बाजूला नसले तरी दोन बाजूंना पूर्वी मिनार असावेत, जे आता पडून गेलेले आहेत. आत मध्ये मध्यभागी मोठा कमानयुक्त कोनाडा, तर शेजारी दोन थोडे लहान लहान पण असेच कमानयुक्त कोनाडे.
आत मध्ये सावली तर होती, पण जागा बसण्यायोग्य नव्हती. थोडी खोदाखोद केलेलीही दिसत होती. मग परत बाहेर येऊन त्याच मशिदीच्या सावलीत दगडांवर ठिय्या मांडला.
शरीरातलं पाणी आटत चाललं होतं. त्यात नानांनी संत्री काढली. सगळे जणू ह्यासाठी थांबले होते अशाप्रकारे सगळ्यांनी ती संत्री उडवलंनी. उन्हातून फिरल्यावर संत्री-मोसंबी सारखा उत्तम उतारा नाही. शरीर जणू सी जीवनसत्व पाहिजे म्हणून मागणी करत असतं.
शरीर आणि मन प्रसन्न झाल्यावर तिथून उठलो आणि किल्ल्याचा शेवटचा राहिलेला भाग बघायला सुरुवात केली.
दुमजली बुरुज आणि तोफ क्र. १ |
इथे येताना जी डाव्या बाजूची तटबंदी धरून आलो होतो, त्यात असलेले बुरुज इथून स्पष्ट दिसत होते. ते बुरुज दुमजली होते, जणू एकावर एक ठेवल्यासारखे. त्यावर चक्क एक तोफही दिसली. ह्या किल्ल्यावरची आम्हाला दिसलेली पहिली तोफ. त्यानंतर बांधकामात डोकावून बघताना अजून एक तोफ दिसली, मात्र ती अशीच बेवारशी झाडीत पडलेली आहे.
या बाजूने किल्ल्याचे खरे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे, कारण संरक्षणाच्या दृष्टीने बुरुज आणि दरवाजांची रचना ह्याच बाजूला दिसते.
इथे गोलाकार बुरुज आणि मधून दरवाजा. पुढे जराशा अंतरावर मोठा दरवाजा, त्यात देवड्या अशी रचना या बाजूला आहे.
किल्ल्याच्या इकडच्या भागात खाली एक दृष्टी टाकल्यास, तटबंदीचे जरा जराशा अंतरावरचे दोन तीन लेअर दिसतात. ह्या बाजूने मोठ्या भागात किल्ल्याला असलेला एक्सेस या सर्व बांधकामांनी संरक्षित केलेला आहे.
दोन मोठे गोल बुरुज, त्यावर जायला अधांतरी केलेल्या गोलाकार रचनेच्या पायर्या इकडे आहेत. या बुरुजांच्या मध्ये अतिशय चिंचोळ्या भागातून किल्ल्यात यायला मार्ग आहे. तिथे पायऱ्या आहेत.
इथे मी एकटाच आलो आलो होतो म्हणून धावत मागे गेलो. सगळ्यांना शोधून काढलं. त्यांनी एकदम उजवीकडच्या भागात असलेले अवशेष बघायला सुरुवात केलंनी होती.
इथे एक आयताकृती बांधकाम आहे, ज्याला लहानसा दरवाजाही आहे आणि उजवीकडे बुरुज. बांधकामावर जायला बुरुजाला अधांतरी पायऱ्यांची गोलाकार रचना, तर समोरच्या भिंतीवर सुद्धा पायऱ्या आहेत. हे धान्याचे कोठार वाटते, कारण आत मध्ये खोल मोठ्या दोन तीन खोल्या आहेत.
विचित्र रचना - शेजारी शेजारी २ पूर्ण गोलाकार बुरुज |
या बुरुजावर जाऊन खाली पाहिले तर मगाशी मी जाऊन आलेला आणि तिथून दिसलेला सगळा भाग अधिक उंचीवरून दिसला. जे चिंचोळी वाट बसलेले बुरुज दिसले ते वरून पाहिल्यावर अजूनच विचित्र रचना वाटली ती. असे बांधकाम करण्यामागचा उद्देश कळण्यासाठी आजूबाजूचे बांधकाम शाबूत पाहिजे होते. ह्या बाजूला प्रचंड झाडी वाढली आहे.
बुरुजांवर येणाऱ्या पायऱ्यांची रचना इतकी सुंदर आहे कि तिथे फोटो काढायचा मोह आवरला नाही. या बुरुजातच एक कोनाडा आहे.
उजवीकडचे अवशेष बघताना ढासळलेली तटबंदी दिसली. नैसर्गिक दगडांचा वापर करून त्याचा आधार घेऊन बांधलेले पण सध्या ढासळलेल्या अवस्थेत असलेले बुरुज दिसले.
आम्ही वाट चुकून मंदिराच्या बाजूला आलेला भाग हा इथेच खाली असणार हे नक्की.
तोफ क्रमांक ३ |
इथल्या एका बुरुजावर एक तोफ दिसली. ही तोफ बर्यापैकी मोठी आहे.
इथे आमची गडफेरी पूर्ण झाली झाली. वाट चुकल्याने किल्ल्याचा न बघितला जाणारा भागही आमचा बघून झाला होता. म्हणजे शोधून शोधून सगळेच अवशेष बघून झाले होते.
पावणे दोन झाले होते, आता पटापट खाली उतरायला हरकत नव्हती.
"श्री मंदाकिनी महालक्ष्मी" मंदिर |
आल्यामार्गे पटापट खाली उतरलो. खाली उतरून मंदिरात अवघ्या पंधरा मिनिटात आलो. हे मंदिर "श्री मंदाकिनी महालक्ष्मी" देवीचं आहे.
किल्ल्याचा मुख्य डोंगर |
येथून किल्ल्याच्या डोंगरावरच्या भागाचा चांगला व्ह्यू मिळाला. इथून जवळ दिसणाऱ्या पायवाटेने सिद्धलिंगेश्वर मंदिराकडे येताना हनुमानाचे पण छोटेसे ठिकाण आहे.
सिद्धलिंगेश्वर शिवलिंगाकृती मंदिर |
सिद्धलिंगेश्वर शिवलिंगाकृती मंदिराचे फोटो काढून निघालो तेव्हा दोन वाजून गेले होते. आज अजून दोन किल्ले बघायचे होते. त्यातला पुढचा किल्ला होता वनदुर्ग.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
Wow mast
ReplyDeleteGood information
Thanks.
DeleteIt will be really good if you include your name as well below comment :)
खूप मस्त 👌
ReplyDeleteधन्यवाद मित्रा!
Delete