किल्ले वनदुर्ग
शहापूर सोडून वनदुर्गला पोचायला तीन वाजत आले होते. तरी दिवसातला हा शेवटचा किल्ला नव्हता, त्यामुळे
निवांत किंवा वाया घालवायला वेळच नव्हता. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर झाडाचा पार
आहे, अगदी तिथपर्यंत गाडी
जाते.
अगदी बरोब्बर आयताकार किल्ला |
हा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचा आकार बघितला तर अगदी परफेक्ट चौकोन आहे. अगदी पट्टीने आखून बांधल्यासारखा. आकार २२५ मी * २१४ मी. गडाला एकच प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक-एक शिलालेख कोरलेला असून पांढऱ्या रंगाने रंगवलेला तो विद्रूप वाटतो. हे शिलालेख संस्कृत भाषेत आहेत. प्रवेशद्वाराच्या बाबतीत या किल्ल्याच्या आर्किटेक्टचं खास कौतुक केलं पाहिजे.
गडाचा फसवा दरवाजा |
दरवाजाच्या आतली रचना, देवड्या वगैरे |
आयताकृती किल्ल्याच्या परकोटाच्या एका बाजूच्या तटबंदीतून बाहेर, हे प्रवेशद्वार आहे. तेसुद्धा गोलाकार रचनेत. ह्या रचनेच्या एका बाजूला हे प्रवेशद्वार आहे, आणि त्यातून लगेच किल्ल्यात प्रवेश होतच नाही. आतमध्ये पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. ह्याला छान पैकी खांब आहेत. इथे डावीकडे वळावे लागते, म्हणजे शत्रूने तडक प्रवेश मिळवू नये. मग अजून एका भागात आपण येतो, तरीही किल्ल्यात प्रवेश नाही. इथे डावीकडे वळून पाहिल्यास “अप्रतिम” असे शब्द बाहेर न पडले तरच नवल!
अप्रतिम असे परकोटाचे प्रवेशद्वार |
इथेही किल्ल्याचे वाडे वगैरे
नाहीत तर आहे परकोटाचे प्रवेशद्वार, आणि तेही दोन
बाजूला भरभक्कम बुरुज घेऊन. दरवाजाच्या कमानीवर आकृत्या आहेत, ज्या
नीटश्या समजल्या नाहीत. पण सर्वात डावीकडे
बहुतेक कमळ असावे, तर सर्वात उजवीकडे चंद्रकोर ओळखता आली. हे प्रवेशद्वार बुरुजांसह भक्कम आहे. जुने दरवाजाचे लाकडी दार तुटक्या अवस्थेत का होईना
पण शिल्लक आहे, त्याला संरक्षणासाठी असलेल्या लोखंडाच्या
खिळ्यांसह.
इथून आत येतो ते परकोटाच्या आत मध्ये. इथे स्वच्छता असल्याने किल्ल्यात राहणाऱ्या मुलांनी हेच क्रिकेटचे मैदान मानले आहे. समोरच मुख्य किल्ल्याची भिंत दिसते. सर्वात उजवीकडे एक बुरुज आहे आणि त्याला लागूनच खाली कसलेतरी मंदिर. आधी मुख्य किल्ल्यात जाऊन मग इकडे यावे म्हणून डावीकडे दिसणाऱ्या प्रवेशदाराजवळ गेलो.
मुख्य प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी भोवताली गोलाकार रचना |
तिथेही मुख्य
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत. संरक्षणासाठी
भोवताली गोलाकार रचना आहे. दरवाजाच्या कमानीवर मधोमध कमळ असून इतर आकृत्या पुसल्या गेल्या आहेत. दरवाजाच्या मागील बाजूस आत मध्ये एक शिलालेख
किंवा काही चिन्ह असलेला दगड आहे. पण ह्याच्यावरच्या गोष्टी धड समजत नाहीत. हा प्रकार नेहमीपेक्षा
वेगळा आहे. साधारण ११-१२ आडव्या रेषा (Rows) तर त्याला छेदणाऱ्या आठ उभ्या रेषा (Columns). आडव्या-उभ्या रेषा छेदून झालेल्या चौकोनात
(Cell) मध्ये कसलीतरी चिन्हं किंवा अक्षरं कोरलेली. मुख्य किल्ल्यात आधी जायचं रद्द करून किल्ल्याला बाहेरून प्रदक्षिणा
मारावी म्हणून मागे फिरलो.
बुरुज आणि त्यात हनुमानाची मूर्ती |
सर्वात उजवीकडे असलेल्या बुरुजाला लागून खाली असलेल्या मंदिराकडे गेलो. तिथे बुरूजाच्याच एका दगडात हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. मूर्ती दिसायला अत्यंत सुंदर आहे. किल्ल्याला उलटी प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. आमच्या उजव्या बाजूला परकोटाची भिंत तर डाव्या बाजूला कायमच किल्ल्याची भिंत असणार होती, प्रदक्षिणा संपेपर्यंत.
परकोटाच्या आतील बाजूस भिंतीला धरून खंदक |
परकोटाच्या आतील
बाजूस भिंतीला धरून खंदक आहे. त्यात तुडुंब पाणी भरलेलं होतं. हे पाणी ह्याच पातळीत वर्षाचे बाराही महिने असतं असं म्हणतात. आतमध्ये
जिवंत झरे आहेत. किल्ल्याच्या
आतमध्ये जी कुटुंब राहतात, त्यांच्यासाठी हाच पाण्याचा स्त्रोत आहे. किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराकडची बाजू सोडल्यास उरलेल्या तीनही बाजू खंदकाने संरक्षित केलेल्या आहेत.
बुरुज आणि त्यावर वाढलेली झाडी |
किल्ल्याच्या आयताकृती बांधकामाच्या चार कोपऱ्यांवर एक-एक मोठे बुरुज, तर मध्ये दोन-दोन बुरुज असे एकूण बारा एकूण बुरुज या
किल्ल्याला आहेत. बहुतेक सर्व बुरुज अत्यंत उत्तम
अवस्थेत आहेत. बुरुजांवर झाडी वाढल्याने भविष्यात
मात्र धोका नक्कीच आहे.
इथे आजूबाजूला झाडी असण्यात वेगळं असं काहीच नाही. ह्या किल्ल्याचे बांधकाम शोरपूर/सुरपूर साम्राज्याचे कृष्णप्पा नायक
यांनी जेव्हा केले, तेव्हा सर्व बाजू जंगलाने वेढलेल्या
होत्या. म्हणून तर
किल्ल्याचे नांव वनदुर्ग पडले. परंतु त्या वेळी आजूबाजूला जंगल असेल, तर
बांधकामावर अर्थातच झाडे-झुडपे ठेवलेली नसणार. सध्या मात्र एकदम
उलटी स्थिती आहे, “वनदुर्ग” म्हणावे असे सोडाच, पण साधे
जंगलही आजूबाजूला नाही. उलट बांधकामावर झाडी
वाढलेली आहे. किल्ल्याच्या
आतमधल्या भागात राहणारी कुटुंबं तर आतमध्ये चक्क शेती करतात.
प्रदक्षिणा मारताना एका बाजूला
पाण्याने भरलेला खंदक, बाहेरची तटबंदी, तर आतल्या बाजूला
किल्ल्याची भिंत, बुरूज, हे बघतच
किल्ल्याच्या तिसर्या बाजूला आलो.
प्रदक्षिणा मार्ग
इथे बंद झालेला आहे तो वाढलेल्या प्रचंड झाडी मुळे. त्यामुळे जिथून प्रदक्षिणा सुरू केली, तिथपर्यंत परत येता येत नाही. पण इथे किल्ल्यात प्रवेश करायला एक चोर दरवाजा आहे. किंबहुना इथे चोरदरवाजा असल्यामुळे पुढची झाडी स्वच्छ
करायच्या भानगडीत कोणी पडलेले नसावे.
चोरदरवाजा |
दरवाज्याच्या आतल्या
बाजूला खांबांवर असलेले नक्षीकाम बघण्यासारखे आहे. आखीव-रेखीव आणि
अतिशय पॉलिश, फाईन असे काम आहे हे. गडाच्या आतमध्ये प्रवेश
केल्यावर काही जुनी बांधकामं दिसतात. इथे वस्ती आहे. त्यांचा सगळा संसार, शेळ्या-बकऱ्यांसह इथे आहे.
मुख्य किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराजवळ आतील भागातच मोठे हनुमानाचे मंदिर आहे. आमची गडफेरी
इथे संपली होती. सगळे फोटो काढत निवांत फिरूनही
अवघ्या ३५ मिनिटांत किल्ला
पूर्ण भरून झाला होता.
अजून एक किल्ला
बघायचा शिल्लक होता आमचा या दिवसाच्या वेळापत्रकातला, त्यामुळे भुकेची जाणीव फारशी होतच नव्हती. लक्ष सूर्याकडे लागले होते. तो जिथवर साथ देईल, तोपर्यंत जे काही बघायचे ते बघता येणार होतं. कोणाला तरी भुकेची
जाणीव झाली आणि प्रवेशद्वारासमोरच्या झाडाच्या पारावर आम्ही पंगत मांडली. दही-पराठे वगैरे
जे काही होतं त्याचा फडशा पाडला.
इथून निघाल्यानंतर
आम्ही शिरपूर गावातूनच जाणार होतो, त्यामुळे सुरपूर उर्फ कुंबारपेठ किल्लाही बघायचं नियोजन सुरुवातीला होतं. पण शिल्लक वेळ, एकूणच वाहत असलेले निवडणुकांचे वारे आणि त्यामुळे होत असलेली गर्दी लक्षात घेता जर अंत:करणाने तो वगळावा लागला
होता. नाहीतर
त्याच्या पुढचा किल्ला आजच्या दिवसात करणे शक्य नव्हते आणि मग सगळं वेळापत्रकच
बिघडलं असतं.
शिरपूर/कुंबारपेठ/सुरपूर किल्ल्याचा दक्षिणेकडील दरवाजा |
ह्या किल्ल्याचे अवशेष गावात आहेत आणि जवळील टेकडीवरच पण आहेत असं वाचलं होतं. गावात तर “राज-दरबार” म्हणून वास्तू आहे. ह्या सगळ्यावर पाणी सोडून आम्ही आमच्या रस्त्याला लागलो होतो. सुरपूर गांव ओलांडून गावाच्या दक्षिणेकडच्या बाजूला आलो तर रस्त्याच्या एका वळणावर, उजव्या बाजूला किल्ल्याचा एक दरवाजा दिसला. आम्ही गाडी तशीच पुढे कशी नेणार? थांबलो अर्थातच.
दरवाजा आणि त्यातल्या दगडांवरील नक्षी |
एवढा भरभक्कम दरवाजा बघितल्यावर आमच्या
उड्याच पडल्या. दरवाजा प्रचंड
मजबूत असून आतमध्ये तर चांगलाच लांब आहे. दोन्ही बाजूला ३-३ अश्या ६ देवड्या आहेत. वरती एकूण चार कमानी आहेत. दरवाजावरील काही दगडांवर हत्ती, साप, वेगवेगळ्या प्रकारची माणसे, कमळ अशा आकृत्या
कोरलेल्या आहेत. ज्यावर कुणीतरी सध्या पिवळाधमक रंग पासून ठेवलेला आहे, जणू Highlighter.
दरवाजाची मागची बाजू |
दरवाजातून पलीकडच्या बाजूला बाहेर पडलो, तर ह्या बाजूला असलेले २ भक्कम बुरुज
दिसले. हा दरवाजा अप्रतिमच
आहे. कमानीवर ७ आकृत्या असून दोन्ही बाजूला लोखंडी कड्या शिल्लक आहेत.
मोजून दहा
मिनिटांपेक्षा कमी वेळात शिरपूर/कुंबारपेठ किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग पदरात
पाडून घेतला आणि दुःख थोडं हलकं झालं.
जराही न थांबता पुढे
कूच केली “वागनगेरा” किल्ल्याकडे.
किल्ले वागनगेरा
शिरपूर/कुंबारपेठ
किल्ल्याचा एकच दरवाजा आम्ही बघितला, हा किल्ला पूर्वी मोठा असावा. कारण हा किल्ला नायकांचं मुख्यालय होता आणि नंतर राजधानी पण. पण हा किल्ला राजधानीचे केंद्र व्हायच्या आधी नायकांच्या राजधानीचे केंद्र
होता तो किल्ले “वागनगेरा”.
वागनगेरा युद्ध होऊन उद्धवस्त
झाला तो १७०४ साली. हि लढाई झाली ती मुघल आणि रामोशी पेड्डा नायक यांच्यात. रामोशींचे सैन्य होते ९०००, तर मोगल झुल्फिकार खान यांचे ४०,०००. तरीही तीन महिने प्रतिकार करून मग शेवटी पैसे व सोनं घेऊन रामोशींनी पळ काढला व मराठ्यांना येऊन मिळाले.
मोगलांनी नंतर वागनगेराचं नामकरण करून ते “रहमान बक्ष
किल्ला” असं केलं.
गडावर नेणाऱ्या पायऱ्या |
समोरच्या टेकडीवरील अवशेष |
गाडी अगदी पायऱ्यांपर्यंत पोचते. येथे उजव्या बाजूला एक तलाव आहे, “वागनगेरा तलाव”. आमच्यापुढे मुख्य किल्ल्यावर जाणारा पायरी
रस्ता होता, तर मागच्या बाजूला एक टेकडी होती, त्यावर काही अवशेष आणि बांधकाम ही दिसत होते. हा किल्ला तीन
टेकड्यांवर आहे. आम्हाला इथे गडपायथ्याशी पोचायलाच सव्वा पाच झाले होते. वेळ संपलेली नसली, तरी भरपूर असा वेळ हातात नव्हता. त्यामुळे आम्ही सरळ मुख्य किल्ल्याचा मार्ग धरला.
पायऱ्यांची सुरुवात होताच
डावीकडे एक बुरुज सदृष बांधकाम दिसते. “L” आकारात हा पायरी मार्ग आहे, जो आपल्याला
मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातो.
वाटेत चार खांबांवर तोललेली, एक मंडप सदृष वास्तू आहे. मूळ बांधकाम पडल्याने, नव्याने ते पूर्वीसारखेच बांधल्यासारखे दिसत होते. समोर असलेल्या झाडीतून दोन बुरुज डोकं वर काढून असलेले दिसले.
बुरुजांजवळ पोचल्यावर मधले प्रवेशद्वार दिसले. इथले बांधकाम ढासळत चालले असून कमानीचा बऱ्यापैकी भाग ढासळलेला आहे. दरवाजा आणि बुरुजावरच्या चर्यांचे काम बघण्यासारखे आहे.
तलाव आणि शेजारील तटबंदी |
दरवाजातून आत गेलो
तर समोरच एक बर्यापैकी मोठा चौकोनी तलाव आहे. हा बांधीव आहे. त्यात
उतरायला दोन बाजूंनी पायर्या आहेत. त्यात असलेले पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. प्रचंड पाला-पाचोळा आणि शेवाळं याने ते झाकलं गेलेलं आहे.
“वेणुगोपाल स्वामी” मंदिर |
इथे डाव्या बाजूला जी वाट जाते, ती आपल्याला या किल्ल्यावरच्या सध्याच्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत सुंदर
मंदिरात घेऊन जाते. या मंदिरात जे देवाचे चित्र आहे ते बालाजीच्या चित्रासारखे दिसते. परंतु एके ठिकाणी वाचल्यानुसार ते “वेणुगोपाल स्वामी” मंदिर आहे. हे तिथेच उभ्या असलेल्या दगडांच्या प्रचंड शिळांच्या आधाराने बांधलेले आहे.
उद्ध्वस्त “भूतनाथ मंदिर” |
मंदिरातील नक्षीकाम केलेले दगड |
या मंदिराच्या
बाजूला दुसऱ्या एका उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष पडलेले आहेत. हे मंदिर म्हणजे “भूतनाथ मंदिर” असं एके ठिकाणी वाचलं. ह्या अवशेषांत खूपसे नक्षीदार दगड आहेत. यात कितीतरी
वेगवेगळ्या आकृत्या असून, कमळ, घोड्यावर बसलेले, उभे, सिंहासनाधीश, असे अनेक रूपातले देव आहेत. मधोमध एक मोठा चौकोनी दगड आणि त्यावर
गोलाकार आकार कोरलेला आहे. हे सर्व दगड इतके सुंदर कलाकुसर केलेले
आहेत, की त्यांची अशी
अवस्था नकोशी वाटते.
मोठ्या वेणुगोपाल
स्वामी मंदिराच्या समोर एक लहानसे मंदिर आहे, तर बाजूला आणखी एक
मंदिर असावे. पण त्यात
सध्या देवमुर्ती दिसत नाही. याच परिसरात काही थडगी असून, त्यातले एक
औरंगजेबाच्या मुलाचे मानले जाते.
आता किल्ल्याच्या आतल्या भागातले अवशेष बघायला
सुरुवात केली. आतमध्ये एक पाण्याचे टाके आहे, ज्यात उतरायला पायऱ्या आहेत. टाकं पाण्याने नाही तर बाभळीच्या झाडीने पूर्णपणे भरून गेलेलं आहे.
तटबंदी जी शाबूत आहे, त्यावर
जायला पायऱ्या आहेत. त्यातल्या चर्या आणि त्यामधली रचना सुंदर
आहे, बाभळींनी किल्ल्याचा खूप भाग व्यापलेला आहे.
चंदेरी झाडं |
किल्ल्याच्या
मागच्या भागात जाताना वाटेत चक्क चंदेरी रंगाने रंगवलेली झाडं दिसली. त्यावर बरीच
चर्चा झाल्यावर ती रंगवलेली नसून झाडांची एक नैसर्गिक अवस्था आहे हे लक्षात आले.
झाडी, अवशेष आणि सूर्य |
प्रदक्षिणा मारत मारत परत
येताना वाटेत अनेक अवशेष दिसत होते. एकदम मागच्या भागाच्या कोपऱ्यात एक
बुरुजही आहे. ह्या बाजूच्या तटबंदीची बरीच पडझड झालेली आहे आणि आतमध्ये खूप झाडी वाढलेली आहे.
बाभळीच्या झाडांच्या रंगछटा |
वाटेतल्या बाभळीच्या
झाडांच्या रंगछटा बाभळीतही सौंदर्य दाखवत होत्या. हे सगळे न्याहाळत एका टोकाला आलो. इथे बोटीच्या टोकासारखा एक दगड पुढे आलेला असून त्याच्याच वर एक बुरुज उभारलेला आहे. आणि याच
दगडाचा आधार घेऊन एक तटबंदीही बांधलेली आहे.
आधी या अतिशय सुंदर
रचनेवर फोटोशूट झाले. एकूण संरचना पाहता हे अपरिहार्य होते.
लांबच लांब तटबंदी |
या बुरुजावर गेलो तर
गडाची या बाजूची पूर्ण तटबंदी दिसायला लागली. अशी लांबच लांब तटबंदी बघून डोळे खरंच सुखावले. तटबंदीमध्ये असलेले बुरुज, मध्ये मध्ये
तटबंदीवर चढण्यासाठी असलेला पायरी मार्ग तर या तटबंदीचे सौंदर्य आणखीनच खुलवतो.
बाहेरच्या बाजूला नजर टाकली, तर पाण्याने भरलेली शेतं |
गावाकडच्या आणि
एकूणच किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला नजर टाकली, तर पाण्याने भरलेली
शेतं दिसली. अरे हो... ते सांगायचं राहूनच गेलं. यावेळी इकडच्या खुपश्या भागांत भाताची शेती चालू होती. डिसेंबर महिन्यात भातशेती म्हणजे
पाणी किती मुबलक प्रमाणात असेल तिकडे? पाण्याचे हे नियोजन
महाराष्ट्राने कर्नाटककडून शिकण्यासारखे आहे. असो...
तिकडून दोन
टेकड्यांवरचे किल्ल्याचे उरलेले अवशेष दिसत होते, पण ते अगदीच थोडके
आहेत. होतो तिथूनच
त्यांचे फोटो काढले. परत फिरून प्रवेशद्वारापाशी यायला निघालो. वाटेत परत
चंदेरी चमचमणाऱ्या फांद्या घेऊन मिरवणारी झाडं, जुन्या वाड्यांचे
अस्तित्व दाखवत, अजूनही तग धरून असलेले शिल्लक अवशेष हे
दिसत होतेच.
प्रवेशद्वाराजवळच्या मोठ्या तलावाजवळ आलो आणि उलट्या
प्रदक्षिणा मार्गाने आमची गडफेरी पूर्ण झाली. खाली उतरलो तेव्हा
सहा वाजत आले होते. म्हणजे वेळेमध्ये ठरल्याप्रमाणे किल्ला बघून झाला होता.
रात्री मुक्काम करायचा होता
रायचूर मध्ये आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी सकाळी बघणार
होतो “रायचूर” किल्ला.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
Sundar Likhan Mitra!!!
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteकृपया अभिप्राय खाली आपले नांव लिहा :)
दक्षिण मोहीम यशस्वी अभिनंदन
ReplyDeleteधन्यवाद भाई!
Delete