किल्ले रौडकोंडा
मुक्कुंदा
किल्ल्यापासून साधारण पंधरा किलोमीटरवर रौडकोंडा गांव आहे. गुगल मॅपवर जरी रस्ता
सापडला आणि दिसतही असला तरीही वस्ती, पायथ्याचे गांव जवळ आल्यावर लोकांना
विचारल्याशिवाय खरा रस्ता सापडत नाही, हे आता आमच्या लक्षात आलं होतं. गांवाजवळ पोचताना
लांबूनच, रस्त्यावर समोर, एका उंच टेकडीवर एक मंदिर असल्यासारखे दिसायला लागले.
त्याच्या डावीकडे एका टेकडीवर किल्ल्याचा बुरुज लांबूनही दिसला. चला, म्हणजे आमचे लक्ष्य
तरी आम्हाला दिसलं.
दिसलेलं मंदिर हे
मल्लीकर्जून मंदिर. या वेळी आमची दुसरी गाडी पुढे होती, तर आम्ही मागे होतो.
त्यामुळे पुढे जाऊन ते किल्ल्याची वाट शोधून ठेवतील आणि मग आम्हाला काही त्रास
होणार नाही ही आशा होती. पण झालं भलतंच. त्यांचा गांवकऱ्यांमुळे काहीतरी गोंधळ झाला आणि ते
किल्ल्याकडे जाणार्या रस्त्याकडे न वळता, पुढे टेकडीवर असलेल्या मल्लिकार्जुन
मंदिराच्या वाटेला लागले. अर्थात इथल्या किल्ल्यावर कोण कशाला येईल असा
गावकऱ्यांचा समज असावा, त्यामुळे ते आम्हालाही किल्ल्या शेजारच्या टेकडीवरच्या मंदिराचा
रस्ता दाखवत होते. त्यांनाही तसेच केलं असावं. परंतु आम्ही खूप वेळा किल्ल्यावरच जायचंय, असं सांगितल्यावर कसाबसा रस्ता कळला.
आमच्याकडे सगळेजण
आम्ही जणू परग्रहावरून आलोय असंच बघत होते. आम्हाला हेही आता नवीन राहिले नव्हते. त्यांना
मुळात किल्ल्याचा रस्ता दाखवायची इच्छाच दिसत नव्हती. अर्थात तसं का ते आम्हाला
पुढं कळणारच होतं. तूर्त तरी तो विचार करायला आमच्याकडे वेळ नव्हता. पाच वाजून
गेले होते. सूर्यास्त होऊन अंधार पडायच्या आत खाली परतायचे होते, त्यामुळे इतरांची
थोडाच वेळ वाट बघून सरळ किल्ल्याचा मार्ग धरला. त्यांनीही मल्लीकर्जून मंदिर
रस्त्याला लागलोच आहोत तर ते बघायचं ठरवलं, त्यामुळे आम्ही सरळ किल्ल्याच्या
वाटेला लागलो.
|
पूर्णपणे घसरड्या दगडांचा चढ |
|
नुसते चढ-उतार असलेले दगड, माती नाहीच |
जशी वस्ती संपली,
तसा लोकांच्या वागण्याचा अर्थ समजला. इथेही पाय टाकताना चुकला की संपलं, अशी
अवस्था होती. यावेळी चूक न करता नीट उड्या मारत निघालो. वर जाणारी वाट म्हणजे
पूर्णपणे घसरड्या दगडांचा चढ आहे. मातीची जमीन नाहीच. पाय सरकायला पूर्ण वाव. त्यातून
गावकऱ्यांनी टाकलेला सडा. पण थोडा चढ चढलो आणि त्या हिरवळीतून आमची सुटका झाली.
|
मोठमोठाले दगड आणि त्याला फासून ठेवलेला रंग |
|
मोठमोठ्या दगडी शिळांमधून डोकं वर काढणारा बुरुज |
दगडांची ही रचना
पाण्याने झालेली असावी. पंधरा मिनिटात आम्ही तो दगडी टप्पा पार करून वर पोचलो.
मोठ-मोठ्या पडलेल्या दगडांमधून वर जायची वाट शोधली. वर दिसला तो मोठमोठ्या दगडी शिळांमधून
डोकं वर काढणारा बुरुज.
किल्ल्याचा हा
एकमेव अवशेष शिल्लक आहे, बाकी काहीही या किल्ल्यावर शिल्लक नाही. ना तटबंदी, ना
टाके. काही प्रचंड शिळांच्या मागून तिथे जायला वाट शोधली आणि दाखल झालो त्या
बुरुजाच्या प्रवेशद्वारापाशी. प्रवेशद्वार जमिनीपासून चार-एक फूट तरी वरती आहे आणि
पायर्याही नाहीत. दरवाजाची उंचीही जेमतेम चार फूट आहे. कमानीवरती गणपती कोरलेला
आहे. इथे सगळ्यांनी फोटो काढून घेतले, कारण सुर्यास्ताच्या आधी आणि त्यातून वाट
शोधत शोधत वर पोचल्याचा आनंद नक्कीच झाला होता.
|
आतला चिंचोळा रस्ता आणि वर जायला पायऱ्या |
|
बुरुज- आतील बाजू, झरोका आणि खांब |
नंतर त्या
दरवाजातून आतमध्ये वरती जायला पायऱ्या आहेत हे कळलं. जरा भीतभीतच शिरलो. वरती छत
खांबांवर तोललेलं आहे. पडझडही बरीच झालेली दिसत होती. बहुतेक वटवाघुळं असावित.
त्यामुळे आम्ही फार आवाज न करता वावरत होतो.
|
एका चिंचोळ्या जागेतून बुरुजावर येताना नाना |
|
खाली गांव |
|
पलिकडे टेकडीवर जाणारा पांढऱ्या रंगाने रंगवलेला मार्ग |
इथे एक झरोका आहे. जवळच प्रकाशाचा झोत
दिसला. बुरुजाच्या वर जायला दगड रचून इथे सोय केलेली आहे, त्यावरून चिंचोळ्या
जागेतून बुरुजावर चढलो. वरतून खाली एका बाजूला रौडकोंडा गांव, तर दुसऱ्या बाजूला शेजारची उंच
टेकडी दिसली. त्यावर जाणारा मार्ग पांढऱ्या रंगाने रंगवलेलाही दिसला.
|
रंगीबेरंगी काटे कोरांटी (कोरंटक्की) |
आमची “टीम बी”
मल्लीकर्जून मंदिरातच रमली असावी. पावणेसहा होऊन गेले होते. अंधार पडायच्या आत
खाली जायचे असल्याने लगेच निघालो. इथे रानटी कोरंटक्कीची झाडेही खूप आहेत, त्यांवर
वेगवेगळ्या रंगाची फुलं फुललेली होती.
|
उतार |
दगडी शिळा पार
करून आता उतारावर आलो. पाण्याने तयार झालेल्या ह्या लेअर्स वरून सावकाश उतरावं
लागत होतं. त्यात दगड गुळगुळीत झालेले. सरळ उतरताच येत नव्हतं. पाऊल आडवं टाकत-टाकतच
उतरत होतो. तेवढ्यात खालून “लवकर या” अर्थाचे आवाज ऐकू यायला लागले. खाली काही
गावकरी पुरुष आम्हाला खाली पटापट यायला सांगत होते. त्यांना आमची कदाचित काळजी
वाटत असावी, कारण अंधार होत होता.
|
सावकाश खाली उतरताना प्रमोद आणि विनीत |
काळजी लक्षात घेतली, तरी चार फोटो काढल्याशिवाय
खाली कसे उतरणार? त्यातून सावकाश पावले टाकली नसती तर काही सेकंदातच खाली पोचलो
असतो, फक्त गडगडत, म्हणून वेग वाढवता येत नव्हता. खालून फारच घाई होत असल्याचे
कळल्यावर मात्र वेगळाच संशय आला. खालपर्यंत आलो, तर खरा प्रकार लक्षात आला. घाई आमच्या
काळजीपोटी नव्हती, तर त्यांची वेगळीच घाई झाली होती. त्या पुरुषांच्या मागे हातात
टमरेल घेऊन बायका तयारच होत्या. हि त्यांची ठराविक वेळ असावी.
असो... आम्ही
वेळेत खाली आलो होतो म्हणजे आणि तेसुद्धा वरचा एकमेव शिल्लक अवशेष असलेला बुरुज
बघूनच. दिवस सार्थकी
लागला होता. मुक्कुंदा नंतर हा असे दोन लहानगे, पण रस्ता शोधण्यात वेळ गेलेले आणि अतिशय कमी परिचित असे
किल्ले पदरात पडले होते.
आता आजच्या
दिवसातले शिल्लक होते फक्त रात्रीचे जेवण आणि कर्नाटकातल्या ह्या दौर्यातला
शेवटचा मुक्काम मुद्गल या गावी.
किल्ले मुद्गल
किल्ले मुद्गल या
किल्ल्याबद्दल लिहायचे तर घामच फुटला. अर्धा तास तर कुठून सुरुवात करू यावरच गेला.
सगळे फोटो चार वेळा बघून झाले. हो ना, तब्बल १५५ ते १६० एकरच्या आसपास आहे हा किल्ला. सगळा किल्ला धड
फिरूनही होत नाही, तरी जेवढा बघितला तेवढा लिहायचा प्रयत्न करू.
तर रौडकोंडा बघून
मुद्गल गावात पोचायला रात्र झाली होती. राहायची सोय बघितल्यावर पोटपूजेची
व्यवस्था पाहिली. रात्री धड कळतही नव्हतं कि नक्की आपण गावाच्या कोणत्या भागात
आहोत, किल्ला नक्की किती लांब आहे.
सकाळी लवकर उठून,
आटपून, न्याहारीसाठी शोधाशोध झाली आणि चहा पिताना अचानक कळले की ती टपरी एका मराठी
माणसाची आहे. म्हणजे तो मूळ इथलाच, मुद्गल गावचा. पण जन्मापासून खूप वर्ष
महाराष्ट्रात राहिलेला, आणि तोही चक्क रत्नागिरीत. मग सकाळी साडेसहाला मुद्गल
ग्रामी एक भरत भेटीचा प्रसंग घडला.
|
परकोटाची तटबंदी |
|
परकोटाची तटबंदी |
गुगल मॅपवर
गडाच्या लोकेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गाड्या हाणल्या आणि २-४ मिनिटांतच
रस्त्याला लागूनच किल्ल्याची तटबंदी दिसायला लागली.
हा किल्ला सुद्धा
जमिनीवर आणि डोंगरावर अशा दोन्ही भागात आहे. यातले गावातले अवशेष दिसायला सुरुवात
झाली होती. दुहेरी तटबंदी, आत मध्ये मुद्गल गावाचा काही भाग आणि बाहेरून खंदक अशी
ही रचना आहे. खंदकाच्याही बाहेरून असलेल्या रस्त्यावरून आम्ही चाललो होतो.
रस्त्याच्या
कडेचा हा खंदक पाण्याने भरलेला होता. त्यात पलिकडे मस्त तटबंदी आणि त्यात बुरुज
सुंदर दृश्य होते. त्यातून सूर्योदयाची वेळ. त्या पाण्याला पण तटबंदी मागून
आलेल्या किरणांची सोनेरी किनार आलेली होती. कॅमेरा हे दृश्य टिपायला असमर्थ होता.
मी प्रयत्नही केले नाहीत. पण अस्वस्थ करत होती ती बुरूज आणि तटबंदी वर वाढलेली
प्रचंड झाडी. ही झाडी जर साफ केली तर काय अप्रतिम दिसेल हे स्थान आणि वास्तू! अगदी
राजस्थान सारखं... राणीमहाल, पुढे मस्त तलाव.
|
पराकोटाची तटबंदी आणि त्यात बुरुज, झरोके आणि चर्या |
असो, तर ही बाहेरची
तटबंदी बघितली. मोठमोठाले बुरूज आणि त्यावर चर्या, बाहेर अगदी उत्तम झरोके.
प्रत्येक बुरुज देखणा, दहा-बारा झरोके तर फक्त बाहेरच्या बाजूने दिसत होते, तेवढेच
आतमधून असतील कि. म्हणजे जवळ-जवळ २० एक झरोके असतील कि एकेका बुरुजाला.
|
झाडीने व्यापलेले आणि कचऱ्याच्या साम्राज्यात तटबंदी आणि बुरुज |
काही
ठिकाणी खंदकात पाणी आटलेलं होतं आणि त्यामुळे त्यात असलेले कचऱ्याचे साम्राज्य समोर
आले. त्यामुळे तटबंदीजवळ जायचा मोह आवरला.
|
प्रवेशद्वार आणि २ बलाढ्य बुरुज
|
|
आतून बाहेर डोकावताना |
|
प्रवेशद्वार बाहेरच्या दुसऱ्या बाजूने |
गाडीने
किल्ल्याच्या पश्चिम दरवाजात पोहोचलो. इथे २ बलाढ्य बुरुज, त्यांच्या मधूनच गाडीरस्ता
आतमधल्या वस्तीत गेला आहे. बुरुज एकदम देखणे आहेत. रस्त्याच्या कडेची एक जुनी
वास्तू नव्याने बांधून काढलेली आहे.
|
दुसरा दरवाजा आणि पलिकडे बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा |
या मधल्या दरवाजातून आत गेल्यावर अजून एक
दरवाजा आहे. आतमध्ये देवड्या आहेत. पलीकडे एक लहान दरवाजा आहे त्यातून तटबंदीबाहेर
जाता येऊ शकते.
|
वाड्यात आल्याचा भास निर्माण करणारा झरोका आणि दिवा |
वळणदार रस्त्याने
उजवीकडे अजून एका दरवाजात जाता येते. इथे एका झरोक्याखाली एक दिवा लावलेला आहे.
त्याने एका मोठ्या वाड्यात आल्याचा भास होतो. असे चार पाच दरवाजे ओलांडत
परकोटाच्या आत मध्ये प्रवेश होतो. यातीलच सुरुवातीच्या एका दरवाजाच्यावर तोफ आहे.
|
एका दरवाजावरची तोफ |
|
तोफेजवळून दिसणारे किल्ल्याचे अंतर्गत भागातील अवशेष |
|
तोफेजवळून दिसणारा मुद्गल डोंगरी किल्ला |
मागे फिरून ती तोफ बघण्यासाठी आलो. सगळ्या बुरुजांना वर चर्या आहेत आणि त्या स्थानिकांनी
घाण करून ठेवलेल्या आहेत. स्पष्टच सांगायचं झालं तर जणू काही तटबंदीवर
ह्यांच्यासाठी बांधलेले संडासच, असा वापर. फक्त दरवाजे लाऊन नाही घेतलेले ह्या
लोकांनी त्याला, नशीब.
|
किल्ल्यातून जाणारा रस्ता |
|
किल्ल्याच्या अंतर्गत रस्त्यावरील दरवाजे, देवड्या वगैरे |
तर हे सगळं बघून मुद्गलच्या
डोंगरी किल्ल्याकडे निघालो. रस्ता वस्तीतूनच जातो आणि एका मशिदीजवळ हा रस्ता संपतो.
तिथे गाडी लावली. डावीकडे उंच टेकडीवजा डोंगरावर किल्ल्याचे अवशेष इथूनच दिसले.
आता गाडी रस्ता संपला.
|
रस्ता संपला आणि दर्शन झाले ते किल्ल्यामागून डोकावणाऱ्या सूर्यनारायणाचे |
|
झाडी संपल्यावर दिसणारा पायथ्यापासूनचा डोंगरी किल्ला |
रस्ता सोडून पायवाटेने झाडीत शिरलो. आडव्या पसरलेल्या त्या
डोंगरावर डावीकडच्या टोकावर एक मिनार सदृश इमारत इथूनच दिसत होती आणि त्याच्या
पाठीमागून सूर्य वर येत होता.
|
डावीकडे तटबंदी |
झाडी संपून दगडी शिळांना
भिडलो आणि त्या टेकडीवर चढायला सुरुवात केली. ठराविक अशी वाट नव्हती, पण तटबंदी
दिसत होती आणि खालूनच टेकडीच्या डावीकडच्या टोकावर दिसत असलेली मिनारवाली वास्तू
हे लक्ष्य, असं ठरवूनच चाललो होतो.
|
वर येताना आमचे सहकारी |
|
दगडांची रचना |
डावीकडे तटबंदी होती, तर वाटेत काही काही
अवशेष दिसत होते. कशाचीही निगा न राखल्याने, प्रचंड झाडी वाढल्याने ते नेमके काय
आहे हे कळत नव्हते. दगडांची रचनाही वेगळी होती. इकडच्या बाजूंचे दगड समजत नाहीत, कि ते नैसर्गिक तसे
आहेत, की रचले गेले आहेत. वाटेत तलावही असावेत. मोठमोठ्या दगडी शिळा पडलेल्या
होत्या. त्यांची रचना पाहून सगळीकडेच फोटो काढावेसे वाटत होते.
|
वास्तूच्या वाटेवर प्रमोद |
|
वास्तूचे उरलेसुरले अवशेष |
अखेरीस त्या
इमारतीजवळ पोचलो. इमारतीचा बहुतांशी भाग ढासळून गेला असला तरी उरल्यासुरल्या
अवशेषांवरून ही पूर्णावस्थेत असताना खूप छान दिसत असेल, हे सहज लक्षात येत होतं.
या इमारतीजवळ जाऊन प्रत्येकाने फोटो काढून घेतले, तसेच इमारतीवर जायला पायऱ्या आहेत
त्यावरही जाऊन फोटो काढले. ह्या बाजूला नीट बघितल्यास एका लांब अशा दगडी शिळेवर
कन्नड भाषेत शिलालेख कोरलेला आहे, तर मारुतीची एक मूर्तीही कोरलेली आहे, जी
वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे साधारण पाच-सहा मारुती मिळून एक मारुती असा तयार
केलेला आहे. आजूबाजूला पडलेले काही दगड बघितल्यास ही जुने मंदिर पाडून नवीन
बांधलेली वास्तू आहे हे लक्षात येतं.
|
गोलाकार बुरुज |
|
बुरुजावरून वास्तू |
ह्या इमारतीच्या
पलिकडे एक मोठा गोलाकार बुरुज आहे. एका बाजूच्या ढासळलेल्या भागातून या बुरुजावर
जायला वाट शोधून काढली. वर जाऊन किल्ल्याचा खूपच मोठा भाग दृष्टीक्षेपात आला.
|
गोल बुरुजावरून पलिकडे "नवरस बुरुज" |
|
बुरुजावर प्रभाकर आणि ज्यू. प्रभाकर |
|
खाली उतरून वाट शोधताना मागे फिरून कटाक्ष |
या
बुरुजाच्या पलीकडे लांबवर मोठ्या दगडी शिळा यांच्या आधारावर बांधलेला एक बुरुज
दिसला. हा “नवरस बुरुज”. पुढचे लक्ष्य Fix झाले, पण त्यावर जायला सरळ वाट नाहीये.
मध्ये तटबंदी आणि तलाव आहे. हा बहुतांशी कोरडा आहे, म्हणून खाली उतरलो आणि त्या
तलावातून पलीकडे जायला वाट शोधून झाली. मध्ये तलावात पाणी आणि त्यात प्रचंड
वाढलेली असल्याने तिथून काही मार्ग सापडला नाही.
|
बुरुज आणि भग्न दगड शिळा |
तटबंदीच्या
कडेकडेने चालत मागे आलो आणि तिथून मात्र ह्या पलिकडच्या भागात जायला वाट सापडली.
मागे वळून बघितलं तर ज्या मोठ्या बुरुजावरून आलो तो बुरुज आणि चक्क शेजारी चक्क जणू काही सुपारी फोडून ठेवावी अशी फुटलेली एक दगडी शिळा दिसली.
|
लांबूनच बुरुज सुंदर वाटला |
वाट काढत काढत नवरस
बुरुजाजवळ पोचलो. हा बुरूज नैसर्गिक शिळांचा आधार घेऊन बनलेला आहे, की बुरुज बांधण्यासाठी
त्या शिळा जमा करून रचल्या आहेत, हे सांगणे कठीण आहे. पण साधारण तीन मजली हा बुरुज
आहे. सर्वात खालचा थर पूर्णपणे नैसर्गिक दगडी शिळा आहेत, त्यात बांधीव अवशेष काही
नाहीत. त्याच्या वरचा, म्हणजे मधला मजला हा नैसर्गिक दगडी शिळा आणि बांधीव असा
मिळून आहे, तर सर्वात वरचा पूर्णपणे बांधीव आहे.
|
जवळ आल्यावर वर जायला पायऱ्या, आणि तिमजली रचना स्पष्ट झाली
|
|
बुरुजावर येणारी पायऱ्यांची चिंचोळी वाट |
लांबूनच हा बुरुज खास वाटला होता.
ह्यावर जायला पायऱ्या ही दगडी शिळांच्या मधूनच बांधलेल्या आहेत. पायर्यांच्या आधी
डाव्या बाजूला, साधारण आठ फूट व्यासाचा परफेक्ट गोलाकार आकाराचा एक खड्डा आहे. हा
खोल नाही, जेमतेम सहा इंच खोल असावा. त्याचे प्रयोजन काही कळत नाही.
|
बुरुजावरचे अवशेष |
|
बुरुजावरची तोफ ठेवायची रचना |
दगडी शिळांमधून
असलेल्या चिंचोळ्या जागेतल्या त्या पायऱ्यांवरून वर गेलो. गडाचा खूप मोठा परिसर इथून
दिसतो आणि पलीकडे खाली मुद्गल शहर दिसते. या बुरुजांची वरची रचना पाहता पूर्वी
यावर नक्कीच तोफ असावी आणि ती फिरती ठेवण्यासाठीची व्यवस्थाही असावी हे लक्षात
येतं.
|
परतताना वाटेतले अवशेष |
|
नाना |
आमच्या दृष्टीने
शक्य तेवढं बघून झालं होतं. परत खाली येताना पुन्हा दगडी शिळा, पाणवठे इत्यादी
ओलांडत खाली आलो.
या किल्ल्याचा
विस्तार इतका प्रचंड आहे की सगळे असेच बघायचे म्हटले तर एक दिवस पुरणार नाही. दगडी
शिळांची तर काही ठिकाणी अशी रचना आहे, कि ती धड नैसर्गिक म्हणता येत नाही आणि
मानवनिर्मित असावी यावर विश्वास बसत नाही. काही शिळांमधून तर विशिष्ट पद्धतीने ठोके
दिल्यास एक नाद ऐकू येतो. पण हे अनुभवायला आणि मुळात असे दगड सापडायला स्थानिक
माहितगार बरोबर पाहिजे. किल्ल्याच्या डोंगरी भागात आणि शहरी भागातही कानडी शिलालेख
आणि देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
सारांश, किल्ला
खूप मोठा आणि अत्यंत सुंदर आहे. बघायला पुरेसा वेळ, माहितगार असणे आवश्यक आहे. अवशेष
खूप आहेत आणि किती तरी अजूनही लपून असतील. योग्य ती निगा न राखली गेल्याने
कालांतराने ते नष्ट होण्याची शक्यता आहे.
असो... तर साधारण
साडे नऊ वाजले असतील, खूप भूक लागली होती. पुन्हा एकदा इडली-डोसे हादडले.
मोठमोठ्या दगडी शिळा आणि खडकांच्या ह्या साम्राज्यात पुढचे लक्ष्य तर नावातच
उत्सुकता निर्माण करणारे होते – “जलदुर्ग”!
|
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
मस्त लिहिले आहेस ओंकार ....
ReplyDeleteधन्यवाद अजय सर :)
Deleteआपण लिहिलेल्या ब्लॉग मुळे नवीन किल्ल्याची माहिती कळली. शतशः धन्यवाद!!
ReplyDeleteधन्यवाद विश्वास सर :)
DeleteApratim omkar.
ReplyDeleteधन्यवाद कल्पेश :)
DeleteHi omkar
ReplyDeleteApal pahilech bolane
Tuza chand uttam ahe chan varnan kelays saryache.... amhi jeva hi safar karu tewha tula tras deun mahiti vichare chalel na?...but proud fill hot na he as camping kelyavar ...pudhil shodhasati khup khupshubhechha...
Shamal chavan 2000batch
धन्यवाद शामल :)
Deleteकधीही कर कि फोन, जी माहिती आहे ती सांगायला आवडेलच, सगळ्यांना माहिती मिळावी यासाठीच तर हा लेखन प्रपंच आहे.
सुंदर संकलन
ReplyDeleteधन्यवाद :)
Deleteआपले नांव कृपया कमेंटच्या खाली लिहावे.
खूपच छान... 👌
ReplyDeleteधन्यवाद :)
DeleteUttam lekhan n photos. Humpichi athavan zali :)
ReplyDeleteधन्यवाद :)
Deleteआपले नांव कृपया कमेंटच्या खाली लिहावे.
खूपच छान लिखान आहे आपलं , सर्व माहिती एकदम वाचताना डोळ्यांना दिसण्याचा भास झाला, परंतु मला असे वाटते लेख सुरू करताना चार पाच ओळींमध्ये किल्ल्याचा थोडासा इतिहास सांगितला तर आणखीन मजा येईल.
ReplyDeleteआपला मित्र ऋषिकेश काशिद उर्फ H K,आपणास पाईट कुंडेश्वर ट्रेकिंग च्या वेळी भेटलो होतो.
धन्यवाद ऋषिकेश :)
DeleteYour exploration of Roudakunda fort was much deeper than mine. You guys went into the bastion which has an interesting interior. Good job!
ReplyDeleteAs per your comment (in JaK) Roudakunda fort hill is still being used as a public toilet, disappointing to know nothing much has changed in the last decade.
Its good to see comment from you :)
DeleteReally appreciate your efforts to read thoroughly. Your blog helped us to know what we need to see before we actually visited places.