Sunday, July 11, 2021

कर्नाटकातील किल्ले - किल्ले जलदुर्ग आणि किल्ले रायनपाल्या

किल्ले जलदुर्ग

कर्नाटकातल्या ह्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मुद्गल किल्ला पाहून झाला होता. तेलंगण सीमेवर जाऊन परत महाराष्ट्राकडे वळलो होतोच. ह्या रायचूर जिल्ह्यातला शेवटचा किल्ला आम्ही बघणार होतो – जलदुर्ग!

“जलदुर्ग” हा वास्तविक किल्ले प्रकारातला एक प्रकार. पाण्यात असलेले, म्हणजे चहुबाजूंनी किंवा बहुतांशी पाण्याने वेढलेले किल्ले म्हणजे जलदुर्ग. हे बऱ्यापैकी समुद्राच्या आसपास असतात असेच डोळ्यासमोर येते. परंतु प्रचंड विस्तार असलेल्या नद्यांच्या काठावर सुद्धा जलदुर्ग असतात. समुद्र असो वा इतर जलाशय, अश्या जलमार्गांवर नियंत्रण ठेवणे आणि अधिपत्य गाजवणे यासाठी मुख्यत्वे जलदुर्गांची उभारणी होते. आम्ही होतो रायचूर जिल्ह्यात, म्हणजे कोणत्याही दिशेला शेकडो किलोमीटरवर समुद्र नाही, पण नद्या मात्र आहेत आणि त्यात आहे “कृष्णा” नावाची जणू “महानदी”च!

रायचूर जिल्ह्यात लिंगसूर नांवाचे गांव आहे. “बसवसागर” धरणातून पुढे खळाळत निघालेली कृष्णा नदी ह्या लिंगसूरजवळ एका साधारणपणे त्रिकोणी आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला येऊन धडकते आणि दुभंगून पुढे साधारण १०-१२ किमीवरच्या टोकापुढे येऊन परत मिळते. असे हे एक बेटच तयार झालेले आहे. आणि ह्या बेटावरचा, नदीच्या पाण्याने वेढलेला किल्ला म्हणून प्रकार “जलदुर्ग” आणि नांवही तेच.

परंतु जलदुर्ग ह्या नांवाची अजून एक व्युत्पत्ती सांगितली जाते. इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेल्यावर त्याचा उपयोग ते गुन्हेगार, कैदी ठेवण्यासाठी करत असत, म्हणजे हा “जेल-दुर्ग” आणि पुढे जलदुर्ग.

हा किल्ला बेटावर म्हणजे द्वीपावर आहे म्हणून याला द्वीप-दुर्ग असेही नांव असल्याचे वाचनात आले.

नांवात काय आहे म्हणता म्हणता २-३ नांवे आणि व्युत्पत्ती बघत लिंगसूर जवळ ज्या बेटावर हा किल्ला आहे त्याला जोडणाऱ्या पुलाजवळ येऊन पोचलोय. J

“जलदुर्ग कोटे रस्ता” ह्या रस्त्यावर हा पूल आहे. त्याचे नांवही जलदुर्ग पूल. (कोटे म्हणजे कन्नड मध्ये किल्ला) कृष्णेच्या दुभंगलेल्या प्रवाहाच्या तुलनेने अरुंद प्रवाहावर हा पूल आहे. पूल ओलांडून आम्ही बेटावर प्रवेश केला.

गडाचे पहिले प्रवेशद्वार

पुढे एका वस्तीतून शेतांच्या कडेकडेने रस्ता आपल्याला थेट किल्ल्यात घेऊन जातो.

किल्ल्याच्या एका दरवाजातून आत गेल्यावर गाडीरस्ता संपला. तिथे गाडी लावून आम्ही गडाच्या आत मधल्या भागाकडे निघालो.

आतील भागात नेणाऱ्या पायऱ्या

आता गडाच्या आतमधेच गाडी घेऊन गेलेले असल्याने, आजूबाजूला गडाचे अवशेष दिसायला लागलेलेच असतात. काही उध्वस्त, ढासळलेले अवशेष, तटबंदी बघत ते ओलांडून गडाच्या आत मध्ये आलो. या गडातही वस्ती आहे.

तटबंदी वरून बुरुजावर जाणारी वाट

पायर्‍या चढून वर आलो, तर वाट तटबंदीच्या कडेकडेने सरळ तो टोकावरच्या बुरुजावर जाते.

हा बुरुज ह्या बेटाच्या ज्या बाजूने कृष्णा नदी वाहत येते, त्या बाजूच्या टोकाला आहे. बुरुजाच्या वरचा भाग ढासळलेला असला, तरी जमिनीच्या पातळीच्या खालचा, म्हणजे पायाचा भाग मात्र शाबूत आहे.

या बुरुजाचे स्थान लक्षात घेतले, तर ह्या संपूर्ण भागावर लक्ष ठेवण्यासाठी हा किती महत्त्वाचा आहे ते लक्षात येते. बुरुजच काय, एकूणच किल्ल्याचे स्थान बघता, जिल्पी आमनेर किल्ल्याची आठवण येते.

बुरुजावरून पलिकडे, कृष्णा नदीचे पात्र

इथे थोडावेळ निवांत बसून परिसर न्याहाळावा, हा मोह नक्कीच होतो. जर सूर्यास्ताच्या वेळी आपण इथे असू, तर निसर्गाचे रूप न्याहाळत बसावे, निवांत क्षण अनुभवावेत असे न वाटल्यास नवल.

आम्ही टळटळीत दुपारी तिथे होतो, तरीसुद्धा कृष्णा नदी, तिचे ह्या बेटामुळे दुभंगणारे पात्र, पलीकडे जंगल, तिकडच्या भौगोलिक परिस्थितीला साजेसे असे मोठमोठाले रचलेले असल्यासारखे दगड, हे सर्व न्याहाळले.

बुरुज सोडून तटबंदीवरुन पलीकडच्या टोकाला गेलो. वाटेत गडाच्या आतल्या भागात नजर टाकली, तर किल्ल्यातील वस्ती व त्यांनी थाटलेला संसार दिसतो. बाजूला दिसते ती त्यांनी लावलेली विविध फुलझाडे, नारळाची झाडं, त्यातच लाईटचे खांब, त्यातून वर डोकावणारी टीव्हीची छत्री आणि अंगणात मुक्तपणा अनुभव असलेली गायी-गुरं. परिसर स्वच्छ ठेवलेला होता या लोकांनी.

इस्लामिक शैलीत बांधलेले मंदिर

तटबंदीला लागूनच आतल्या बाजूला एक मिनार वाली वास्तू आहे. मूळच्या दगडी बांधकामावर प्रत्येक मिनारावर धातूचे कळस बसवलेले आहेत. तिथे देवाची नियमित पूजा होत असेलच, कारण गाभाऱ्यासमोर देव पूजेसाठी लागणारे भांडी-साहित्य दिसत होते. याजवळ आणखीही काही वस्तूंचे अवशेष आहेत. ही वास्तु इस्लामिक पद्धतीची बांधीव असली, तरीही हे मंदिर आहे.

बुरुज

दुमजली वास्तू

ह्या बाजूला आणखी एक बुरूज आहे. आतील बाजूस एका उंच चौथऱ्यावर एक वास्तू दिसली. वरच्या बाजूचा भाग ढासळलेला असला तरी इतर वास्तू बऱ्यापैकी शाबूत आहे. लगेच मोर्चा तिकडे वळवला.

दरवाजे

जमिनीच्या खालच्या पातळीत दरवाजे

आत मध्ये जाऊन भाग न्याहाळला. दोन बाजूंना दरवाजे आहेत. यातील आतल्या बाजूच्या दरवाजातून, किल्ल्याचा आतील भाग पूर्ण दृष्टीक्षेपात येतो. वास्तू पूर्वी दुमजली तरी असावी, कारण एक चोरदरवाजा जमिनीच्या खालच्या बाजूला आहे. अजूनही अवशेष असावेत पण ते ढासळलेले आहेत.

इकडच्या टोकावरून कृष्णा नदीपात्र

अजून एक बुरुज आणि तटबंदीमधून जाणारी वाट

प्रदक्षिणा मार्गाने फेरी मारत, परत गडाच्या प्रवेशापाशी येता येत होते. इथे डावीकडे अजुन एक बुरुज दिसला. बुरूज आणि तटबंदीमधल्या वाटेने प्रदक्षिणा पूर्ण करत गडाच्या प्रवेशद्वारापाशी आलो.

घरी आल्यावर फोटो बघताना हा चुकून क्लिक झाला होता काय असं वाटलं,
पण त्यात एक जण माझ्याकडे बघताना दिसला.

गाड्या ह्या दरवाजाजवळ लावल्या होत्या

वरचा सगळा भाग बघून झाल्यावर गाडीजवळ आलो. आम्ही जिथे गाडी लावली होती, त्याच्या जवळच एक दरवाजा आहे. दरवाजा आणि दोन्ही बाजूचा थोडा भाग फक्त शिल्लक आहे, तर आजूबाजूचे सगळे नष्ट झालेले आहे. पण दरवाजामागे देवड्या आहेत.

चौथऱ्यावर नंदी

झाडीत लपलेली समाधी

दडलेले अवशेष

आजूबाजूला झाडीत अजूनही काही अवशेष दडलेले आहेत. त्यातच एका बाजूला एका चौथऱ्यावर एक नंदी आहे, त्याला नव्याने रंग दिलेला आहे. एक समाधीही आहे.

गडावर गाड्या लावल्या तिथे येतांना आम्ही एका दरवाजामधून आलो होतो. परत जाताना तिथे गाडी थांबवून दरवाजा न्याहाळला. या गडाच्या शिल्लक अवशेषांमध्ये हा दरवाजा एकदम उत्कृष्ट भाग आहे.

दरवाजा आणि आतील बाजूस सुंदर पाकळ्या

गडाकडे येणारा रस्ता याच दरवाजातून येत असल्याने हा व्यवस्थित राहिलेला असावा. आजूबाजूचे सगळे मात्र पडून गेलेले आहे. आतल्या बाजूस सुंदर कमळाच्या पाकळ्यांच्या सारख्या कमानी आहेत.

डिसेंबर महिन्यात तुडुंब भरलेली शेते आणि भात लावणी

या दरवाजा बरोबर जलदुर्ग पूर्णपणे बघून झाला. परतीच्या वाटेवर जलदुर्ग पुलावर थांबून नदीपात्राचे फोटो काढले. पुढे रस्त्याच्या कडेला भात लावणी होताना दिसली. डिसेंबर महिन्यात चक्क भात लावणी? म्हणजे मुबलक पाणी, वा!

पुढचा किल्ला गुगल मॅप वर मार्क नसलेला किल्ला - म्हणजे किल्ले रायनपाल्या!

 

किल्ले रायनपाल्या

तलावाच्या पलिकडे किल्ले रायनपाल्या 

कर्नाटक दौऱ्यातला शेवटचा बघायचा हा किल्ला. गुगल मॅप ह्याचे स्थान Mark केले गेले नाहीये अजून तरी आम्हाला बघायचा तर होताच.

रायचूर जिल्ह्यातून परत यादगिर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यात आलो. इकडे रायनपाल्या नावाचे गाव आहे. जलदुर्ग वरून निघाल्यावर "बसवसागर" धरणाच्या अगदी जवळून कृष्णा नदी ओलांडून नारायणपूर गावात रस्ता जातो. हाच रस्ता पुढे कोडेकल गावातून जातो. ह्या रस्त्याला “बसवेश्वर मंदिर रस्ता” असे नाव आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर एक कालवा लागतो. बसवसागर धरणातून हा कालवा वाटेतल्या सगळ्या गावांना पाणीपुरवठा करत, खूप लांब वरून वळसा मारून ह्या कोडेकल गावाच्या शेजारून पुढे जातो.

बसवेश्वर मंदिर रस्ता ह्या कालव्याजवळ सोडून उजवीकडे वळून, कालव्याच्या कडेकडेने रस्ता परत उजवीकडे वळून रायनपाल्या गावाकडे जातो. त्यापुढे वळल्यास राजन-कोलूर गाव लागते. पण या उजव्या बाजूला न वळता थोडे पुढे गेल्यावर कालव्याजवळ एक वस्ती लागते. त्या वस्तीतून जावे. गुगल मॅप वर यातील कोणतेही ठिकाण मार्क नसल्याने नीट लक्ष द्यावे लागते.

शेतांजवळून जो कच्चा रस्ता जातो, तो म्हणजे अगदी सांभाळतच जावा असा आहे. आम्ही सरळ सगळे गाडीतून उतरून गाडीचे वजन कमी केले आणि फक्त गाडी सांभाळत निघालो. आमची दुसरी गाडी तर होंडासिटी होती. ती इथे घालणे, म्हणजे खड्डा सरळ दिसत असताना त्यात उडी मारल्यासारखे होते. त्यांना अशा सूचना फोनवर दिल्या आणि वस्तीत शिरलो.

वस्तीत जुजबी चौकशी केली आणि त्यांना चेहर्‍यावर गोंधळलेल्या भावातच ठेवून वस्ती ओलांडून पुढे झाडीत, जंगलात शिरलो. रस्ता अशा गाड्यांसाठी बनवला नसावा. चूक त्यांची नव्हती. इथे कोण येणार होतं? आमच्या अंगात मस्ती म्हणूनच आम्ही इथे आलो होतो आणि त्यातून गाडी सकट.

अशा रस्त्यावरून गाडी साठी जागा करत करतच शेवटी एके ठिकाणी गाडी लावली. किल्ला दिसायला लागलाच होता. फक्त चालायचं बाकी होतं. थोडं चालल्यावर उजवीकडे मस्त तलाव लागला. तलावाच्या पलीकडे कडेलाच किल्ला आहे.

बुरुजच बुरुज आणि ३ पातळीत तटबंदी

जलाशयाच्या शेजारून, तसेच पायवाटेने पुढे गेलो. किल्ल्याचे लांबून दर्शन तर खूप मस्त होते आणि इथून समोरून त्याचे रूप तर त्याहूनही छान होते. किल्ला फार उंचावर वगैरे नव्हता. क्षेत्रफळही काही एकरात वगैरे नव्हते, पण सुरक्षितता कसली होती... तटबंदी समोरच तीन पातळीत दिसत होती.

एके ठिकाणी नागमूर्ती दिसल्या. यांच्या पूजेच्या निमित्ताने तरी गावकरी लोक इथे येत असावेत.

तटबंदी, बुरूज, सारं काही स्पष्ट डोळ्यासमोर होतं. हा किल्ला काही पुणे-मुंबई जवळचा नव्हे प्रसिद्ध असायला. प्रसिद्ध तर बाजूलाच, ट्रेकर्स आणि भटक्या मध्येही परिचित असा हा किल्ला नव्हे. उलट कर्नाटकातल्या कुठल्याश्या, कशाचाही दृष्टीने, कोणाच्या डोळ्यात न येणाऱ्या खेडेगावातला हा किल्ला. पण नुसत्या बाह्य दर्शनाने आम्ही चकीत झालो होतो. सर्वांनी एकमेकांची साथ देऊन अशा दुर्गम ठिकाणी जिद्दीने आल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होते. अर्थातच खूप फोटो काढले.

नागमूर्ती, अनगड देव आणि हनुमान!

तिथल्याच एका दगडशिळेजवळ काही देवांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसल्या. त्यात काही नागदेव, काही आकार न कळणारे अनगड, तर एक चक्क हनुमान दिसला. किल्ला कोणत्याही राजवटीखाली असो हनुमान सर्वत्र असतोच!

बुरुजाच्या मागे संरक्षित दरवाजा

दरवाजा

किल्ल्याच्या जसजसं जवळ जायला लागलो, तसा किल्ला अंतरंग उलगडून दाखवायला लागला. सुरुवातच गोमुखी दरवाजाने झाली. लांबून आणि समोरून साधासा वाटणारा बुरुज चक्क एका दरवाजाचा संरक्षक चिलखत निघाला. आत मध्ये डावीकडच्या दरवाजा समोर आलो. बांधणी कसली भक्कम आहे ह्याची... दगड, मस्त घडीव, टाकी लावलेले आहेत. पलीकडे आणखी एक दरवाजा आणि देवड्या वगैरे. देवड्या तर एवढ्या प्रशस्त, कि वाड्याचाच एक भाग वाटावा.

भरभक्कम बुरुज

त्यापुढे चक्क हत्तीने पाय रोवून उभं रहावं, असा भरभक्कम बुरुज त्या तटबंदीच्या रक्षणासाठी सज्ज होता. त्यावर जायला पायऱ्या आणि वर एक लहानसा दरवाजा.

किल्ल्याचे अंतरंग

बुरुज बघितल्यावर आजूबाजूला कुठेच लक्ष न जाता सरळ तिकडेच वळलो. पायर्‍यांवर गेलो आणि पाठीमागे नजर टाकली तर काय, किल्ल्याचे आणखी बुरुज तटबंदी, बहुतेक तो बालेकिल्ला असावा. झाडाझुडपांनी त्यावर थोडे अतिक्रमण केले असले, तरी हा अंतरंग खास दिसला. सूर्यप्रकाशात झाडे वेगवेगळ्या रंगाच्या पालवीने खुललेली, तर त्यातून मधून किल्ल्याचे बुरुज डोके वर काढून.

खूप वेळ मालिका बघतोय आणि चार अतिशय संथ भागानंतर एका भागात काहीतरी घडावं आणि नंतरचे परत चार भाग संथ असं काही नव्हतं इकडे.

इकडे बुरुज तर तिकडे तटबंदी

जरा चार पावले टाकली, की एक तर एका बाजूला बुरुज, नाहीतर तटबंदी. नाहीतर सरळ समोरच एखादा दरवाजा. कुठल्याशा भक्कम बुरुजामागून आपल्याकडेच वाकून पाहत असलेला. बरं, बुरुजही काही ढासळलेले वगैरे नाहीत. आपल्या चर्या-जंग्यांसह जणू शत्रू आला, तर कधीही लढायला सज्ज. फक्त वर मावळे दिसत नव्हते. दरवाजे पण साधे-सुधे नाहीत, देखणे!

देखणा दरवाजा

उजवीकडचा बुरुज ओलांडून, डावीकडच्या दरवाज्यात गेलो. तर समोरचा दरवाजा आपल्या दगडांच्या बाहू मधून आपली दगडी छाती काढत, डोक्यावर मुकुट घेऊन उभा! या दगडांमध्ये ना चूना, ना सिमेंट. जणू अखंड दगडाला सुरीने कमानीदार कापून, त्यात चिरा पाडून नक्षी केलेली.

नाही, गाविलगड, नरनाळा वगैरे बलाढ्य दुर्गांच्या दरवाजांशी नका तुलना करू. नाही, आपल्या सह्याद्रीतल्या दरवाज्यांशी पण. पण ह्या दुर्गम भागातल्या या किल्ल्यावर असे दरवाजेही काही कमी नाहीतबलाढ्य नाहीत, पण रेखीव.

दरवाजामधून आत मध्ये प्रवेश केला. हा किल्ल्याच्या सर्वात आतला भाग. इथे एका चौथर्‍यावर चक्क सिमेंटच्या भिंतींनी एक खोली बांधलेली आहे. म्हणजे अलीकडच्या काही वर्षांतले ते कसले तरी ऑफिस किंवा तसेच काही असावे.

सर्वोच्च स्थानावरचा बुरुज

दीड वाजून गेला होता. जेवणाचा काही विचार वगैरे नव्हताच. आधी किल्ला फिरून घ्यावा म्हणून इतर अवशेषांकडे वळलो. उजवीकडच्या टोकावर एक बुरूज आतल्या बाजूने ढासळलेला होता. मात्र बाहेरून अजूनही शत्रूसमोर लढायला पाय रोवून उभाच वाटला होता. कडेकडेने गेल्यावर बुरुजातला दरवाजा दिसला आणि त्याकडे नेणाऱ्या पायऱ्या.

गडाच्या सर्वोच्च स्थानावरून वर येणारा मार्ग

डावीकडे जलाशय

आतील बाजूस सिमेंटचे बांधकाम आणि पलिकडे मंदिर

दरवाजातून सरळ वर गेलो. किल्ल्याच्या या भागातून इथवर आलो तो भाग डोळ्याखाली घातला. खाली डाव्या हाताला ज्याच्या जवळून आलो तो तलाव. मागे आतल्या भागात सिमेंटच्या खोलीच्या मागे तीन कमानीदार एक वास्तू दिसली. पलीकडे किल्ल्याचे शेवटचे टोक, त्यावर बुरुजाच्या आतील अर्धगोल भाग.

मंदिर

खाली उतरून आधी त्या मंदिरात गेलो. कसले मंदिर आहे हे सांगता येत नव्हते. लाल पिवळ्या रंगाचे ठिपके ठिपके असे रंगवलेले होते.

सर्वात मागचा, शेवटच्या टोकावरचा बुरुज

दर्शन घेऊन, त्याच्या शेजारून मागील भागात जाणार्‍या पायऱ्यांवरून वर गेलो. पाठीमागचे बुरुजही सुस्थितीत आहेत. किल्ला पाहून त्या समाधानाने बॅग ठेवून बसलो. निवांत (?) दहा मिनिट (😂) बसून खाऊचे बकाणे भरले.

परत फिरून आल्यावाटेने किल्ल्याबाहेर पडून तलावाजवळ आलो. मागे फिरून किल्ल्याचे काही फोटो घेऊन त्याला निरोप दिला. जवळच्या झाडीतही काही बांधकामाचे अवशेष दिसले. ते सर्व पाहून, हळू हळू गाडी बाहेर काढत, भरल्या मनाने त्या गावाचाही निरोप घेतला.

कर्नाटक पाणीव्यवस्था, डिसेंबर मध्ये भातशेतीचे रहस्य

कर्नाटकच्या या दौऱ्याची अशी सांगता झाली. अडीच वाजता त्या कालव्या जवळून ते गाव सोडलं ते ह्या दौर्‍यावर ब्लॉग लिहायचा निश्चय करूनच.

प्रश्नच नाही! अतिशय प्रसिद्ध अशा गुलबर्गा/कलबुर्गी किल्ल्याने दौर्‍याची सुरुवात होऊन सांगता या अत्यल्प-परिचित रायनपाल्या किल्ल्याने झाली होती. कर्नाटकातल्या त्या कन्नड भाषेतला आपलेपणाचा ओलावा, भूक चाळवणाऱ्या इडल्यांचा सुवास आणि मन तृप्त करणारे लिंगायत मेसमधले जेवण, या सगळ्यांनी हे चार दिवस कर्नाटकमय झाले होते.

महाराष्ट्रात खेडोपाड्यात मिळणारा आपुलकीचा पाहुणचार कर्नाटकातही उपभोगायचे भाग्य आम्हाला लाभले होते. फिरलेला प्रत्येक किल्ला त्याचे स्वतःचे एक तरी वैशिष्ट्य मनात भरूनच आम्हाला निरोप देत होता, खाल्लेला प्रत्येक घास त्याची चव जिभेवर ठेवत होता, तर भेटलेला प्रत्येक माणूस त्याची आठवण आमच्याकडे ठेवूनच आम्हाला पुढे जाऊ देत होता. २०२० च डिसेंबरचे हे शेवटचे चार दिवस, तेही कोरोनाने सगळ्यांना हैराण करून सोडलेल्या काळातले आमच्या चांगलेच लक्षात राहतील.

कलबुर्गी/गुलबर्गा, मालखेड, शहाबाद, यादगिर, शहापूर, वनदुर्ग, सुरपूर उर्फ कुंभारपेठ, वागनगेरा, रायचूर, मलिआबाद हे किल्ले पाहतानाच ब्लॉगचा विचार मनात येत होता. जो पुढे मान्वि, मुक्कुंदा, रौडकोंडा, मुद्गल, जलदुर्ग आणि या सर्वांवर झालासे कळस, असा रायनपाल्या किल्ला बघितल्यावर अगदी पक्काच झाला, जो आज या ब्लॉगने आंतरजालावर उतरला!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!


2 comments:

  1. मस्त 👌👌👌
    लेखणीतून गडाचे वर्णन खूप सुंदर मांडले,
    प्रत्येक लेख वाचून गडावर जावेसे वाटतेच

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete