डावीकडे अगदी छोटासा दिसणारा मोरा-गड, पसरलेला मोठ्ठा मुल्हेर किंवा मयूरगड
"साल्हेर-मुल्हेर", अगदी "अही-मही" या थाटात म्हणावीत अशी बागलाण प्रांतातली नावे. ट्रेकिंगची आवड (आवड? वेडच ते!) नसेल तर साल्हेर-मुल्हेर असली नावे ऐकिवात असण्याची शक्यताच नाही. आणि ट्रेकर असाल तर ह्या नावांचे स्वप्न कुठेतरी रोजच्या रहाटगाडग्यात स्वस्थ बसू देत नाही. अनुक्रमे ५१४१ आणि ४२९० फूट उंची मिरवणारे हे अहिमहीच आहेत. ह्यांच्याबरोबर सालोटा आणि मोरा अशी भावंडेही दिमाखात उभी आहेत. प्रत्येक ट्रेकवेड्या मराठी स्वप्नातली ही नावे आपल्या यादीत कोरण्याची संधी ट्रेकवेडे शोधत असतात आणि अशी संधी साकेत आणि माझ्या लक्षात आली. २ ऑक्टोबर, शुकरवार बडा अच्छा दिन है आणि त्याला जोडून ३-४ ऑक्टोबर हे शनी-रविवारही आहेत. पाऊसही नाही. संधी सोडून चालणार नव्हती. तयारी जोरदार लागणार होती. कोणताच माहितगार जोडीला नव्हता, ना कोणत्या ग्रुप बरोबर जायचे होते. मनात विचार आल्यावर त्यादृष्टीने पाऊल, सॉरी, माऊस जाऊ लागला. हातात चांगले १५ दिवस होते. ब्लॉग वाचले गेले, मोहिमेची आखणी होऊ लागली.
कोणीतरी आधीच आखून ठेवलेल्या मोहिमेत जाणे आणि स्वतः आखणे ह्यात प्रचंड अंतर असते. त्यातून ह्या अहिमहींची आदरयुक्त भीतीही होतीच. नकाशे कागदावर उतरवून घेतले, मनात खुणा पक्क्या केल्या. ऑफिसला सुट्टी होतीच, घरी रजेचा अर्ज टाकला. अर्ज मान्य होत नव्हता पण तयारी सुरु होती. मुल्हेरमधे राहायची व्यवस्था मठात होऊ शकते आणि जेवण्या-खाण्याचीही ही माहिती आम्हाला मिळाली होतीच, तिकडे संपर्क साधून त्याची खात्री करून घेतली. एका बाजूला गडांची माहिती काढायची तयारी चालू होती तर दुसरीकडे मोहिमेसाठी गाडी जमवत होतो. मी आणि साकेत तर २ वर्ष भेटलोही नव्हतो. पण सह्याद्रीची एक गम्मत आहे. सह्याद्रीने एकदा जोडलेली वेडी माणसे कधी तुटत नसतात. सरळ तवेरा ठरवली. ५ फिक्स झालेच, अजून १-२ जमल्यास परवडणार होते. २ जणांचे होय नाही करतानाच ६ वा गडी ठरला आणि ७ वा २ दिवस आधी ठरून १२ तासांच्या आत रद्दही झाला. अजून २ दिवस होते, साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा करायचे पक्के होतेच त्यात जमला तर आणखी एक मारू असे डोक्यात होते. पण सगळे डळमळीत होते. आधी नक्की कोणते करायचे ते ठरत नव्हते. तो मान मुल्हेर-मोराला मिळाला कारण तिकडे राहायची सोय नाही, आणि रात्री बिबट्या येतो असे वाचलेले होते. दुसऱ्या दिवशी साल्हेरवरच राहू असे ठरवून तंबू, स्टोव्ह, रॉकेल, चहा/खिचडीचे समान ह्याची तयारी झाली, त्याही पाठीवर बाळगाव्या लागणार होत्या.
१ ऑक्टोबरची रात्र अंधारली. पाऊस नाही ह्या आनंदावर सकाळपासूनच थेंब पडू लागले होते, सगळ्यांनी साकेतकडे जमायचे होते. मला रेनकोटमधे बंदिस्त होऊनच तिकडे पोचावे लागले. पाण्याने नखशिखांत ओथंबतच त्याच्या दारात उभा राहिलो. साकेत, विवेक, अश्विनी, केतकी आणि रविंद्र माझी वाटच बघत होते, १० मिनिटात तवेराही आली. तीत सगळे समान रचून मोहिमेला निघालो. पहाटे ४ पर्यंत पोचून सकाळी मस्त २ तास झोप काढायचा विचार होता, पण त्यावर ढगांनी आधीच पाणी ओतले होते, रस्ता ओला होता, गाडी सावकाश न्यावी लागणार होती. त्यातून पूर्ण रात्रभर प्रवास असल्याने ड्रायव्हर बरोबर गप्पा मारत जावे लागणार होते, मी आणि साकेत पूर्ण वेळ बडबड करत जागत होतो त्यांच्याबरोबर. बाकी गड्यांनी थोडी थोडी झोप काढून घेतली. मनमाडनंतर रस्ता नीट बघावा लागतो. विवेकला उठवले आणि GPS चालू केले. मुख्यरस्त्याकडून डावीकडे वळल्यावर उमरणेकडे उजवीकडे रस्ता जातो, त्याने आपण नाशिक रस्त्याला येऊन मिळतो. तेथून सर्विस रस्त्याने मुख्यरस्ता धरायचा आणि देओला गाठायचे पण गुगलदादांनी कुठून वाट शोधली होती ते लॅरी पेज जाणे. मधेच चक्क गाडीतून उतरून पुढे रस्ता आहे की नाही ते बघावे लागले. त्यातून गाडीच्या गियरने काही घोळ केला होता, गाडी थांबली की सरळ बंद करून सेकंड वर उठवावी लागत होती, फर्स्ट तर पडतच नव्हता. पण सटाणा-कारंजड-ताहाराबाद करत साडे तीनशे किमीच्या आसपास प्रवास करून मुल्हेर गावात ६:३० ला पोचलो. मठात खोली आमची वाटच बघत होती. त्यात समान टाकले. शुक्ला काकांना न्याहारीची तयारी आधीच करायला सांगितली होती. सकाळची कामे उरकून खोलीला कुलूप लावून त्यांच्याकडे झकास पोहे खाल्ले, घराच्या गायीच्या दुधाचा फक्कड चहा झाला. दुपारचा डबा तयार होताच. आता मुल्हेरवाडीकडे जायचे होते, तो २ किमीचा रस्ता पायीच तुडवावा लागणार होता कारण गाडीच्या गियरच्या कामासाठी ड्रायव्हरना गाडी घेऊन लगेच सटाण्याकडे जाणे क्रमप्राप्तच होते.
८ वाजता निघालो आणि ८:३० ला मुल्हेरवाडीला गडाच्या पायथ्याशी पोचलो. इथल्या लोकांची भाषा अहिरणी आहे. बहुतांश मराठी आणि गुजराती मिश्रित. त्यांना मराठी बऱ्यापैकी समजते पण त्यांचे मराठी आपल्याला कधीकधी जड जाते. त्यांना विचारून गडांची खात्री करून घेत होतो. मुल्हेर-मोराच्या शेजारीच हरगड आहे पण आम्हाला कोणता गड कोणता हेच समजत नव्हते. गावातले लोक हरगडला औरंगजेब/औरंग्याचा किल्ला म्हणत होते, तर मोरा नक्की कोणता ते त्यांनाही धड सांगता येत नव्हते. खिशात आणि मोबाईलमधे नकाशे बाळगून असल्याने आम्ही तोऱ्यात वाटाड्या नाकारला होता. शोधायचा पहिला टप्पा होता गणेश मंदिर. पाऊण तासाच्या आतच पहिला दरवाजा लागला, २-३ मिनिटांच्या अंतरावर अजून २ दरवाजे सापडले. झाडी खुपच वाढलेली होती.
गणेश मंदिर, येथून दोन वाटा फुटतात
गणेश मंदिर त्यामानाने लवकर सापडले. तिथून गडावर कोरलेला हनुमान स्पष्ट दिसतो. फोटो घेऊन निघालो. हत्ती टाके, मोती टाकेही सापडले. पाण्यात दगड टाकला तर खाली जाताना मोत्यासारखा दिसतो म्हणून मोती टाके, पण पाणी खरच सुंदर होते. हत्ती टाकेही मोठ्ठे होते. ९:३० झाले होते, नकाशावर बघून सोमेश्वर मंदिर गाठायचे होते. सोमेश्वर मंदिरापर्यंत बिबट्या येतो म्हणून चोफेर लक्ष ठेऊन चाललो होतो. त्यात मला संशयास्पद आवाज आला, त्याकडे दुर्लक्ष केले. परत आवाज आल्यावर मात्र मागे वळून बघितले, साकेतच्या चेहऱ्यावरही तो आवाज येऊन गेल्याचे भाव होते. तडक मागे फिरलो, मोतीटाके गाठले. नकाशातून दुसरी वाट शोधू लागलो. २-४ चुकीच्या वाटा आळीपाळीने शोधून झाल्या. झाडी डोक्याच्या वर जात होती. आता अडकलो असे वाटत असतानांच वरून एक धनगर मुलगा आम्हाला ओरडून वाट सांगू लागला. ते आमच्या डोक्यात शिरत नाही हे पाहून तो झपझप खाली उतरला. आमच्या जीवात जीव आला. नकाशात कुठेच न दाखवलेल्या भुलभुलैय्या वाटेने त्याने आम्हाला व्यवस्थित वाटेवर आणून सोडले, अन्यथा आम्ही वाटेलाच लागलो असतो ;) पुढे आम्ही हनुमानाच्या कोरीव मूर्तीच्या दिशेने निघालो.
|
निकॉनच्या ६०x zoom ची कमाल, गडावर कोरलेला प्रचंड हनुमान (गणेश मंदिराजवळून) |
ह्या गडावर २ वाटांनी जाता येते, मुल्हेर-मोराच्या मध्ये असलेल्या घळीतून किंवा मुल्हेर-हरगडच्या मधल्या घळीतून. आम्ही मधल्याच वाटेने मुल्हेरच्या घळीत पोचलो होतो, थेट हनुमानाजवळ. इथे पाण्याचे टाके होते पण पाणी पिण्यायोग्य नव्हते. आम्हाला काळजी नव्हती गडावर भरपूर पाणी मिळणार होते आणि आमच्याजवळही साठा होताच. ११:३० च्या आतच गडावरच्या पाण्याच्या टाक्याजवळ पोचलो. इथे ५-६ तरी टाकी आहेत. मोठ्ठ्या टाक्यात चांगले पिण्यायोग्य पाणी आहे. जवळ पांढरे घुबड मारून पडलेले दिसले. गड फिरत फिरत असताना मोरागडाकडे जाणारा रस्ता दिसला. अप्रतिम तटबंदी आणि रेखीव पायऱ्या आणि २ सुंदर दरवाजे दिसल्यावर पावले तिकडे वळली नसती तरच नवल. मोरागड हा मुल्हेरचा दुसरा बालेकिल्लाच मानला जाऊ शकते. मुल्हेरसमोर छोटासाच भासणारा जेमतेम त्याच्या खांद्याला डोके लाऊ पाहणारा हा किल्ला मोठा रेखीव आहे.मुल्हेर-मोराची रचना इतकी अप्रतिम आहे की दरवाजासमोर कोणी तडक कोणी येउच शकत नाही. प्रत्येक दरवाजाच्या आधी मोठी भिंत लागते आणि एक दरवाजा उजवीकडे आणि दुसरा डावीकडे, म्हणजे अवघे २०-२५ जण हजारोंना थोपवू शकतात.
|
मुल्हेर वरील टाक्यांचा पॅनोरमा व्ह्यू |
वरून लहानसा दिसणारा दरवाजा पलीकडे गेल्यावर मोठ्ठा झालेला!
|
मोरा-गडावरून दिसणारा मुल्हेर आणि मोरा वर यायची वाट |
|
मुल्हेर वरून दिसणारा मोरा-गड आणि त्याच्या रेखीव पायऱ्या, सुंदर दरवाजा |
थोड्या पायऱ्या उतरल्यावर छोटासा दरवाजा आणि दरवाजावर झालेली मोठी पडझड दिसली. पलीकडे गेल्यावर हाच दरवाजा एकदम तिप्पट मोठा दिसायला लागला. ह्या दोन्ही गडांवर गावातले लोक बकऱ्या चारायला घेऊन येतात, मधेच जंगलात सोडल्या तर बिबट्याचा धोका असतो म्हणून वर आणतात. मधल्या घळीवर पाण्याचे टाके आहे. रेखीव पायऱ्या चढून आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला कोरलेले गणपती मन मोहून टाकतात. इथे अजून एक पाण्याचे टाके आहे, जवळच गुहा आहेत, तिथेही राहता येऊ शकते. आता मात्र आम्हाला न सापडलेले सोमेश्वराचे मंदिर दिसले. जातानाचा रस्ता मनात पक्का केला. दरवाजातून पलीकडे वर दिसणारा अजस्त्र हरगड, खाली दिसणारे सोमेश्वर, गणपतीचे मंदिर यांनी फोटोसाठी आम्हाला अडकवून ठेवले. आता सर्व पाहून झाले होतेच. मनसोक्त फोटो झाल्यावरच उतरायला सुरुवात केली. ट्रेकिंग करताना उत्साहात आगाऊपणा कधीच करायचा नसतो. सावधपणे उतरतच मोरा वरून अवघ्या तासाभरात सोमेश्वर मंदिरात पोचलो. मंदिर अप्रतिम आहे. समोरच नंदी आहे, पण त्यासमोरच लगेच शंकराची पिंड नाहीये, तिथे फक्त झरोका आहे, पिंड तळघरात खाली आहे. ह्या मंदिरात राहायची सोय होऊ शकते. आधीच ब्लॉगवर वाचल्याप्रमाणे इथे राहणारे साधू मुडी आहेत, आम्हाला बघितल्यावर ते मंदिरातून मागे निघून गेले. २० मिनिटांच्या ब्रेक नंतर मोतीटाके शोधार्थ निघालो, वाट विचारून घेतली, सोपी सरळ जाते वाट असे कळले. पण आम्हाला मुल्हेर-माचीचे संपूर्ण दर्शन घडण्यासाठीच की काय देव जाणे, पण रस्ताच सापडला नाही. वाट धरूनच निघालो होतो पण रस्ता साफ चुकलो होतो, झुडुपांच्या बोगद्यातून जावे लागत होते, कधी कधी गुडघ्यावर बसून जावे लागेल इतका बोगदा लहान होत होता. साधारण अंदाज घेतल्यावर कळले की आम्ही मुल्हेर-हरगडच्या घळीच्या जवळ पोचलो होतो, मोती-टाके केव्हाच मागे पडले होते. जवळपास विचारायला कोणीही नव्हते. वाटाड्या न घेतल्याचा पश्चाताप होत होता. जेमतेम २:३० वाजत होते पण संध्याकाळचे ६ वाजल्या सारखा अंधार पडला होता. जेवणापेक्षा आता खाली पोचणे जास्त महत्वाचे वाटत होते. अडकून पडल्यासारखे वाटत होते. एक एक जण जाऊन पायवाटेसदृश जे काही दिसेल तिकडे जाऊन वाट सापडत्ये का ते बघत होता, पण काही सापडेना. तेवढ्यात आम्हाला खाली कुठेतरी एक मंदिराचा कळस दिसला. असले मंदिर आम्हाला वर चढताना लागलेच नव्हते. पण आता दिशा मिळाली होती. कळसाच्या रोखाने चालत सुटलो. मंदिर सापडले, ते रामेश्वराचे होते, शेजारी टाकेही होते. आता वाट दिसत होती. ह्या वाटेने आम्हाला गणेश मंदिराच्या मागच्या बाजूला आणून सोडले. चढताना मंदिराच्या समोरच्या बाजूने सुरु झालेली प्रदक्षिणा बरोबर पूर्ण झाली होती. ३ वाजले होते, अजून जेवण झालेच नव्हते. पोळी-भाजी खाऊन घेतली आणि जास्त वेळ न काढता परतीला लागलो. आता वेळ शिल्लक असल्याने पटकन उतरून मांगी-तुंगी च्या पायथ्याला जाऊन येऊ म्हणून ड्रायव्हरना फोन केला तर सकाळी गाडी दुरुस्त करायला गेलेले अजून आलेच नव्हते, त्यांना रात्र होणार होती. मग परत रस्ता तुडवत शुक्ला काकांकडे आलो. कुटुंब चांगले होते, हक्काने चहाची मागणी केली. रात्री थोडेच जेवणाचे सांगून मठाकडे निघालो.
|
श्री देव सोमेश्वर मंदिर |
|
झुडुपांतली बोगद्याची वाट |
रस्ता चुकल्याने, जंगलात अडकल्याने धडधडत असलेलं हृदय शांत होत होतं. थकलेलं शरीर गार पाणी पडण्याची वाट बघत होतं. तेवढ्यात चिंचेच्या लटकत असलेल्या आकड्यांनी आम्हाला लहान केलं. उड्या मारून चिंचा काढल्या. झालेली सर्दी, लागलेला वारा ह्याचा विसर पडला आणि तोंडाने आवाज करत त्या चिंचांचा फाडशा पाडला. हलकं जेवण करून मठातल्या त्या खोलीत खिडकीला बांधलेल्या बैलाच्या आणि दरवाजाबाहेर बसलेल्या मांजराच्या साक्षीने स्लीपिंग बॅग मधे स्वतःला कोंडून घेतलं!