Tuesday, October 6, 2015

साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-रामशेज भाग II

डावीकडे सालोटा आणि उजवीकडे साल्हेर
ट्रेकला गेलं की रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी सकाळी ६ च्या आधी उठायचे नाही असे कितीही ठरवून झोपले आणि कितीही उशीर झाला तरी सकाळी ५:३० पर्यंत उठणे होतेच. उठून आवरून परत शुक्ला काका. न्याहारी उरकून वाघांब्याकडे निघालो. आदल्या दिवशी साल्हेर मधे पाऊस झाला होता, तिकडून एक ग्रुप सालोट्याचा रस्ता न सापडल्याने फक्त साल्हेर करून मुल्हेर गावात येऊन राहिला होता. आमचाही मुल्हेरचा अनुभव लक्षात घेऊन वाघांब्यातून साल्हेरची वाट दिसत असली तरी वाटाड्या घेऊन जायचे पक्के केले होते. पोचल्यावर अजिबात वेळ न घालवता वाटाड्या मोहिले काकांना घेऊन साल्हेरकडे निघालो. राहायला परत मुल्हेर मठात यायचे ठरवले होतेच म्हणून स्लीपिंग बॅग, स्टोव्ह वगैरे न घेताच साल्हेर-सालोट्याच्या एकमेकांशी उंचीची स्पर्धा करणाऱ्या सुळक्यांकडे कूच केली. मोहिलेकाका बरोबर असल्याने रस्ता चुकायची भीती नव्हती. पहिला टप्पा चांगलाच मारला. उन अजिबात नव्हते, दोन्ही गड सुंदर दिसत होते. खाली दिसणाऱ्या गावावर धुक्याची दुलई अंथरलेली होती. निसर्गाच्या कर्तुत्वामुळे साल्हेरपेक्षा सालोटाच उंच भासत होता. पठारावर पोचल्यावर दोन्ही किल्ल्यांमधली खिंड पाहून घेतली. धुके सगळे गांव, किल्ले अदृश्य करून पसरत होते. मधूनच किल्ल्यांची एखादी झलक पाहायला मिळत होती, परत धुक्यात गायब होत होती. एकाच फोटोत दोन्ही किल्ले मावत नसल्याने पॅनोरमा काढायचा प्रयत्न मी, साकेत आणि रविंद्र तिघेही करत होतो आणि कोणाचाच पूर्ण येत नव्हता. अखेर मिळाला आणि परत धुक्यात घुसलो. वातावरण आल्हाद-दायक असले तरी वाट थोडा थोडा दम काढत होती. सुरुवात धुक्याने केल्यावर आता कारवीची फुले स्वागतासाठी हजर होती. संपूर्ण गडावर ही चादर पसरलेली असणार हे दिसत होते. ह्या फुलांच्या पायघड्यावरूनच आम्ही चालत होतो. पायथ्यापासून बरोबर दीड तासांत म्हणजे ९:३० ला आम्ही खिंडीत पोचलो होतो. 

दीड तासांत खिंडीत पोचलो
इथे चांगली १५-२० मिनिट विश्रांती घ्यायची असे ठरवलेले होते पण धुके आम्हाला थकवाच जाणवू देत नव्हते, गार वारं अंगात अक्षरशः अंगात घुसत होतं. त्यातच साल्हेरच्या उतरत्या पायऱ्या दिसल्या आणि त्यावरून येणारे लोकही. फोटोसेशन मधेच १० मिनिट काढून पायऱ्यांच्या दिशेला लागलो. आता उत्साह दुणावला होता. सरळ वाट दिसत असतानासुद्धा मधेच Rock-Patch मारून वाट लहान करत, हौस भागवत, पायऱ्यांपर्यंत पोचलो. सालोट्याचे दृश्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवायचा मोह आवरला नाही. सालोट्यावर पोचणारी वरची पायऱ्यांची वाट दिसत होती पण मधली गायब होती. अर्ध्या तासांत साल्हेरचा पहिला दरवाजा लागला. पहिली एक भिंतच दिसली, त्यात कोण आलेय ते पाहण्यासाठी एक कोनाडा होता फक्त आणि खरा दरवाजा उजवीकडे होता. एक-एक माणूस १० जणांना थोपवून धरेल अशीच रचना. काही पायऱ्या चढून गेल्यावर आणखी एक दरवाजा लागला. त्याच्या डाव्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे. तिथून संपूर्ण सालोटा दिसत होता. 

साल्हेरच्या दरवाजातून दिसणारा सालोटा

साल्हेरच्या दरवाजातला शिलालेख
मगाशी उतरत असलेला ग्रुप आता सालोट्याची वाट शोधत होता. आम्हाला ते वाट विचारत होते ओरडून ओरडून, जेवढी वरून वाट दिसत होती तेव्हढी आम्ही सांगितली पण आम्हालाच पुढे दिसत नसल्याने जास्त सांगू शकलो नाही. परत वरच्या दरवाजाकडे निघालो. अजून २-४ गुहा सापडल्या. इथे राहण्यासाठी सुंदर जागा आहे. काही अंतरावर अजून एक दरवाजा आणि पाण्याची टाकी आहेत. गुहांच्या कडेने कपारीतून ही वाट पुढे जाते. अजून एक ग्रुप भेटला, त्यांना गुहेत राहावे लागले होते. पावसाने हैराण केले होते आणि सालोटा सोडाच, साल्हेरही फिरायला त्रास झालेला होता.

गुहा, पाण्याची टाकी आणि शेजारून जाणारी वाट
आमच्यावर निसर्ग मात्र चांगलाच प्रसन्न होता. मुल्हेर-मोरा ला पण पाऊस लागलेला नव्हता आणि इथेही. उनही लागत नव्हते, उलट धुक्याचे थेंब मधेच स्पर्शून जात होते. तिसरा दरवाजा लागला आणि थेट पठारच. ४-५ जण परशुराम मंदिरावरून उतरताना दिसले, ते मुंबईचे होते. मोहिले काकांच्या म्हणण्यानुसार आधी पाण्याच्या टाक्यांकडे आधी जायचे ठरले. ढगांनी सगळे व्यापून टाकले होते. मांगी-तुंगी त्याच्या वर डोकावत होते. सालोटा मात्र खाली गेला होता. उगाचच डोके वर काढायचा अधून-मधून निष्फळ प्रयत्न करत होता. पलीकडेच गुजरात लागते, ते पूर्ण ढगांखालीच होते.  ५ मिनिटांतच गंगासागर तलाव लागला. मोहिले काकांनी त्याच्याशेजारी असलेली २ टाकी दाखवली. त्याला गंगा-जमुना म्हणतात. लागूनच असलेल्या टाक्यातली पाण्याची चव मात्र निराळी आणि अप्रतिम होती. त्यापुढे असलेल्या दगडाखालूनच पाणी गंगासागर तलावात जात होते. गंमत म्हणजे तरीही तलावातले पाणी पिण्यायोग्य नाही असे म्हणतात. तलाव बघूनच त्यात उडी मारायचा मोह अनावर होत होता. पण बरोबर अजून कपडे घेऊन आलेलो नसल्याने तो मोह आवरला.

गंगासागर तलावात उडी मारण्याचा मोह आवरला
एकमेकांना लागूनच असलेली गंगा-जमुना टाकी, पाण्याची चव मात्र निरनिराळी. पाणवठ्यावर आलेले वाघ.

आता परशुराम मंदिराकडे जायचे होते. खडा चढ चढून जायचे असल्याने लगेच निघालो. वाटेत रेणुका मातेचे मंदिर लागले. वर गुहा लागल्या. त्यात १०० सव्वाशे पान सहज उठेल एवढ्या मोठ्या. त्यांतच हनुमानाचेही मंदिर आहे. खाली वळून बघितल्यावर गंगासागर तलाव आणि त्याच्या डावीकडे लांबवर यज्ञकुंडही दिसते. परशुराम मंदिर खुणावत होते. वेग वाढवला. मधे-मधे वेळ काढूनही खिंडीपासून अवघ्या २ तासांच्या आतच महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अश्या साल्हेर किल्ल्याच्या शिखरावर होतो. भगवान परशुरामांचे हे महाराष्ट्रातले सर्वात उंचीवरील मंदिर. येथे भगवान परशुरामांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली आणि जिंकलेली पृथ्वी/जमीन दान दिल्यावर स्वतःला राहण्यासाठी बाण मारून समुद्र मागे सारून कोंकणाची भूमी तयार केली ती इथूनच अशी कथा आहे.

रेणुका माता मंदिर

भगवान परशुराम मंदिर
गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समाजाला "कोंकणा समाज" असे ओळखतात ह्यांची भाषाही कोंकणा/कोंकणी भाषा आहे. पण ही भाषा गोव्यातल्या कोंकणीसारखी अजिबात नाही. इथल्या भाषेत अहिरणी/मराठी/गुजराथी शब्द आहेत. साल्हेर वरून कंडाणा (ह्यावर एक मोठे छिद्र आहे, परशुरामांनी मारलेल्या बाणाने ते पडले असे गावकरी मानतात), रवळ्या-जावळ्या, धोडप, मुल्हेर, मोरा, हरगड, न्हावी-रतनगड, मांगी-तुंगी असे अनेक किल्ले/सुळके दिसतात, पैकी आम्हाला फक्त थोड्याच किल्ल्यांचे दर्शन झाले, बाकीचे सगळे ढगांच्या कुशीत लपले होते. जेवायला खाली दरवाज्यात जायचे ठरले होते. फुलांतून वाट काढत भरभर उतरलो.

ढगांच्या कुशीत लपलेले किल्ले
जेवतानाच खालून आणखी एक ग्रुप आला, त्यांनाही सालोट्याची वाट सापडली नव्हती. आधीच डळमळीत असलेला सालोट्याचा विचार आणखीनच नाहीसा होत होता. पण तरी प्रयत्न करायचाच म्हणून पटकन खिंडीत परतलो.

विंचू - पण निष्प्राण!

१ वाजला होता. १५-२० मिनिट विश्रांती घेऊन सालोट्याची वाट शोधत निघालो. अजिबात वाट बंद आहे असे म्हणून तिकडे जाण्याची मनाई करणाऱ्या मोहिले काकांनाही आता जोर चढला होता. आमचा उत्साह बघून हातात काठी घेऊन रान झोडपत वाट सारखी करत होते. आमच्यानंतर आणखी एक ग्रुप येणारे हे माहित होते. त्यांना नक्कीच मदत होणार होती. कारव्यांची झाडे वाट अदृश्य करत होती. त्यांचाच बोगदा करून आम्ही त्यातून पलीकडे गेलो, पाण्याच्या वाटेने जरा पुढे गेल्यावर मात्र पायऱ्या लागल्या. आम्ही आनंदाने ओरडायचो बाकी होतो. पायात गोळे आणणाऱ्या पायऱ्या चढून वर गेलो आणि दरवाजा सापडला. पलीकडे पडलेले दगड वाट बंद करू पाहत होते पण त्यांना ओलांडल्यावर २ मिनिटातच अजून एक दरवाजा लागला पुढे पाण्याचं टाकंही. मागे वळून बघितलं तर चक्क दरवाजावरती ६-७ लोक आरामात झोपू शकतील अशी जागा. ह्या जागेला देवडी म्हणतात. पाण्याची २-४ टाकी.

दरवाजावरच्या देवडीत बसलेले त्या दिवसापुरते पहारेदार
पाण्याची टाकी, ह्यांच्या पुढे गेल्यावर फ्रिजरचे टाके आहे
दुपारी २ वाजता धुक्यात हरवलेली कपारीतून गेलेली वाट
अजून २ दरवाजे ओलांडून वर गेल्यावर एकदम वर पोचलो होतो. १० मिनिटं थांबून परतीला लागलो. पाणी भरून घेतले. बाहेर धुके आमच्या जणू अंगातूनच जात होते. बाटल्यांच्या बाहेर पाणी भरल्या-भरल्या थेंब धरत होते, फ्रीजरच! सगळ्यांच्या बाटल्या भरेपर्यंत माझा हात गोठून गेला होता. पावसाची शक्यता दिसत होती. तडक खाली उतरायचे होते पण देवडीवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फोटो काढून जेमतेम ३०-४० मिनिटांत खिंडीत येऊन पोचलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. न थांबता गावाकडे निघालो. सगळ्यांना वेगळाच जोर आला होता. पठारावर पोचून परत एकदा दोन्ही गडांना डोळ्यात साठवून घेतले. सालोटा परत साल्हेरच्या उंचीचा दिसत होता. काही सेकंदातच दोन्ही गड ढगांत गायब झाले. पाऊण तासांतच परत गाडीजवळ पोचलो सुद्धा!

३:३० लाही धुक्यात हरवलेले साल्हेर-सालोटा
या गावातले शेतकरी सधन आहेत. सोयाबीन, बाजरी सारखी पिके मुबलक होतात. मोहिले काकांच्या संपर्काची देवाण-घेवाण करून निरोप घेतला. खाली उतरतानाच आमचे वेगळेच नियोजन झाले होते. मुल्हेर मधे राहायच्या ऐवजी मांगी-तुंगीचे पायथ्याशी दर्शन घेऊन रात्रीतच रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी पोचायचे ठरले होते.
नाशिक रस्त्याला लागलो, रात्री ९:३० च्या आतच रामशेज च्या पायथ्याच्या "अशेवाडी" गावात पोचलो.गावातच हनुमानाचे मंदिर आहे, त्यात समान उतरवले. स्वयंपाकासाठी स्टोव्ह पेटवताना आम्हाला त्यातले काहीच येत नाही ह्यावर शिक्कामोर्तब झाले. अश्विनीताईंनी झकास स्टोव्ह पेटवला. त्यात नुडल्स झाले. मॅगीची भूक यीप्पीवर भागवली. पोटात अजून भूका होत्याच, आम्ही भात-प्रेमी असल्याने खिचडीचाही बेत झाला. जेवून तृप्त झालो, समान आवरले आणि पथाऱ्या पसरून त्यावर अंग टाकले, समाधानाची झोप लागली.

नुडल्स, खिचडी हाणून गडी तृप्त झाले.
नेहमीप्रमाणे गजर व्हायच्या आधीच उठून तो व्हायची वाट बघत बसलो. कंटाळून त्या आधीच उठलो. रात्रीत पाऊस पडून गेला होता. पटापट वाघ मारून आलो. चहा वगरे रद्द करून किल्ल्यावर जायचे ठरले. किल्ला छोटासाच आहे, पण सुंदरच आहे. राम वनवासात असताना इथे काही दिवस मुक्कामी होता म्हणून त्याची शेज/शय्या म्हणून रामशेज. वरती रामाचे मंदिर आहे, पाण्याचे टाके आहे. त्याच्याच उजव्या बाजूला गुहेत शंकराची पिंड आहे. पिंडीच्यावरती गुहेलाच एक  छिद्र आहे, गडावरून इथे यायला पायऱ्याही आहेत. वर पोचून घोषणा दिली आणि २० मिनिटात परत गाडीजवळ पोचलो.

रामशेज किल्ला

रामशेजवरील गुहेतली शंकराची पिंड आणि नंदी
साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा ह्या पक्वान्नांच्या भरपेट तृप्त करणाऱ्या जेवणानंतर सुंदरसा रामशेज किल्ला ही मुखशुद्धी करून दुपारी ४ च्या आत घरी पोचलोही. जणू आम्ही घरी पोचायचीच वाट बघत असल्यासारखा पाऊस आता बरसायला लागला. पण मन तर त्याआधीच चिंब भिजून गेले होते. आठवणींचे दवबिंदू त्यावर मोत्यासारखे चमकत राहणार होते...

2 comments: