शुक्रवारी संध्याकाळी एका कामासाठी सुबोधला फोन केलेल्या फोनवर "रविवारी अंधारबनल येणारेस का? फास्टाट रेकी मारून यायचंय, ३-४ जण फक्त". अशी मोहीम ठरली. दुपारी २ पर्यंत परत यायचे नियोजन असल्याने फार वेळ न घेता जायचे ठरवून टाकले. २-३ आठवड्यापूर्वी तांदुळवाडी-आसावा-काळदुर्ग मोहिमेत Action Trek बुटांनी ६ वर्षाच्या पायपिटीला कंटाळून सोल, त्याखालचा मुळचा सोल आणि आतले प्लास्टिकचे कसलेतरी भागही बाहेर टाकले होते, ते सगळे फेवीक्विकने जोडून पूर्ववत केले. गु-मॅपवर ७० किमीच्या आसपास अंतर आहे हे बघून ठेवले. बाकी काहीच बघितले नव्हते, सध्या ते एक कुंभमेळ्याचे एक ठिकाण झाल्याने फार कष्ट घ्यायची गरज नव्हती. ताम्हिणी घाटात उजवीकडे कैलासगडचा बोर्ड बघून त्याच रस्त्याला उजवीकडे जायचे होते. सुशांत आणि सुबोध एका गाडीवर, तर मी एकटाच माझ्या सुझुकीवर. तो बोर्ड काही दिसला नाही आणि मी १०-१२ किमी नियोजित ठिकाणापासून पुढे "मुंबई स्वागत करत आहे" असल्या कमानीजवळ पोचलो. तिथे रेंज आली, आपला वेंधळेपणा आणि ठिकाण नीट समजून घेतले आणि परत मागे फिरून त्या निर्जन रस्त्यावरून "प्रींपरीचा पूल सांगा कुणी पहिला" करत सुबोध/सुशांतला शोधून काढले. तोपर्यंत त्यांनी तिथल्या टपरीवाल्या गावावाल्यांशी मैत्री केलनी होती. अत्यंत खराब रस्त्यावरून कुंभमेळ्याच्या ठिकाणी दाखल झालो. खुपश्या गाड्या/बसेस आधीपासूनच पोचलेल्या दिसत असल्याने दर्शनाला फार रांग असेल हे सांगायची गरज नव्हती. पण पब्लिक डबकी, "झरना" हाच शब्द पुरेल असला धबधबा, धरण सदृश बंधारा ह्यातच शाही स्नानाचा आनंद लुटत असल्याने फार त्रास होणार नव्हता. अंधारबनला ५० रुपये एन्ट्री फी लावलेली आहे. अधिकृत की अनधिकृत हा भाग वेगळा, पण आधीच टपरीवाल्या गाववाल्याशी ओळख झाल्याने तिघांचे मिळून १५० रुपये तिथेच वाचले होते.
वाट चुकण्याचा एक कार्यक्रम सुरुवातीलाच उरकून घेतला. आता आमच्यावर भरवसा ठेऊन मागचेही आमच्यामागे आले आणि त्यांनाही तो अनुभव फुकटात अनुभवायला मिळाला. मग बरोबर वाटेला लागल्यावर धुकं, लहान-सहन धबधबे असा रस्ता पार करून मोठ्या धबधब्याच्या जवळ आलो. हातांची साखळी करून एक ग्रुप त्यांच्या मेंबरना पलीकडे नेत होता. एकंदरीत पाणी बघता थोडी ओढ जास्ती असली तरी रोपची गरज वाटली नाही. मधेच ओळखीचे लोक भेटत असतातच, तोही कार्यक्रम पार पडला. पाऊस सकाळपासूनच भिजवत असल्याने आता ओलाव्याची भीती वाटत नव्हती, बिनधास्त पाणी उडवत वाट काढत होतो. फोटो काढण्यासाठी मात्र मोबाईल/कॅमेरा सांभाळून काढत होतो. शेवटचा मोठा धबधबा पार केला, जिथे काही लोकांना रोप लागेल असले काही मुद्दे डोक्यात मांडून ठेवले. वेळेची मर्यादा बघून परत फिरलो. "अंधार"बन नांव सार्थ करत असलेल्या त्या जंगलातून गेल्या वाटेने परत आलो. वाटेत भेटलेल्यांना माहिती देत होतो. ३-४ टाळक्यांच्या हातात बाटल्यांचा आवाज ऐकून "खूप कठीण आहे, जाऊ नका" असा मोलाचा सल्लाही दिला. तरीही ते लोक धबधब्याजवळ पोचून खळखळ आवाजात बाटल्या डोक्यात चढवून घेणार ही खात्री होतीच, असो!
अंधाssssरबन |
पाण्याचा थेंबही घेतला नव्हता सकाळी घरातून निघाल्यापासून. ट्रेक म्हणावे असे हायकिंग झाले होते. परतीला लागल्यावर मिसळ शोधतच काही अंतर कापले आणि भज्यांवर समाधान मानून घेतले. चहा मारला. २-२:३० वाजले होते. घरी काय वाढून ठेवलेय ते समोरच दिवसा ताऱ्यांच्या स्वरुपात दिसत होते. तरी रस्ता तास-दीड तासाचाच होता, रमत-गमत गेले तरी ४ ला पोचू, फार उशीर नाही होणार म्हणून स्वतःलाच धीर देत होतो. अचानक भगवे ध्वज गाड्यांना बांधून काही "महाराजांचे मावळे" म्हणवून घेणाऱ्या ३०-४० लोकांचा एक ग्रुप सायलेन्सर फाटक्या गाड्या (त्यांना बुलेट म्हणायची पद्धत आहे) उडवत, महाराजांचे नांव अक्षरशः धुळीला किंवा चिखलात लोळवत आला आणि "स्वतःच्या बापाच्या" रस्त्यावर गोंधळ घालत चुणूक दाखवत निघूनही गेला. अत्यंत सहानुभूतीदर्शक तुच्छतेने त्यांच्याकडे बघत परतीचा प्रवास परत चालू केला.
फुटक्या सायलेन्सरच्या बुलेट नावाच्या गाड्या घेऊन कार्यकर्ते |
मुळात ट्रेकला येण्याचे पातक होऊन चुकले होते, पण वेळेवर पोचून त्याचे किमान क्षालन तरी घडावे हा विचार देवाला मान्य नसावा. स्वतःची नाही झाली तरी चालेल, पण आमची पूजा नीssट व्हावी याची तजवीज विधात्याने घडवून आणलेली समोर ४-५ किमी तरी लांब दिसत होती. सकाळी पाऊस बघून बघून चारचाकी आणली असती तर बरं झालं असतं हा विचार किती मूर्खपणाचा होता हे लगेच जाणवलं. चारचाकीवाल्यांना डोक्याला हात लावलेला बघत त्यांना तसंच सोडून दुचाक्या हाकत वाट काढत जमेल तसे पुढे आलो. वाटेत आमचा प्रवास रटाळ होऊ नये यासाठी खास जन्माला आलेले प्राणी आपापल्या दुचाक्यांवरून सर्कस करत, शर्ट उडवत उघडे-बोडके आपापल्या परीने आमचे मनोरंजन करत होते. लायकी नसताना दैवकृपेने पैसे हातात आल्याने घेतलेल्या चारचाकीतूनही काही लोक आमचे जमेल तसे मनोरंजन करतच होते. गाडीच्या टपावर बसून पावसाचा आनंद घेत होते आणि त्यासाठी अर्थातच अडथळा आलेले कपडे झुगारून देणे क्रमप्राप्तच होते. काही गाड्यांच्या टपाला पण दरवाजा असतो, त्यातून बाहेर येऊन बोंबा मारणे आता जुने झाले. गाड्यांच्या चारही दरवाजातून चौघांनी फुल फुलतं तसं बाहेर येऊन आरडा-ओरडा करायची नवीन पद्धत कालबाह्य झालेली नाही हे मात्र दिसत होते. ज्यांना त्या पावसाची (किंवा इतरही कसली external असेल) नशा जास्त झाल्याने अर्धेच शरीर का गाडीबाहेर, म्हणून सरळ टपावर चढून चालत्या गाडीवर enjoy करणे पसंत होते. काही उत्साही कार्यकर्ते सरळ बॉनेट वर वायपरवर पार्श्वभाग ठेऊन बनियन आणि त्यातले थुलथुलीत शरीर दाखवत होते. एक जण तर असं बसल्यावर कदाचित गाडीतली "बेस" असलेली गाणी ऐकू येत नसतील म्हणून मांडीवर फणस सांभाळून एष्टीत बसावं तसं 2 फूट उंच स्पीकर घेऊन बसला होता, दुसऱ्या हातातला मोबाईल त्याला connect करायचा प्रयत्नही चालू होता. "ब्रह्मानंदी टाळी" लागली की फक्त नश्वर जगाची तमा न बाळगता असे कृत्य करता येत असेल. दुचाकीवर मागच्याने नाचत नाचत उभे राहून विड्या फुंकणे आता तोच-तोचपणा आल्याने बंद झाले असले तरी सेल्फिचा काळ आलाय. गाडी चालवताना एका हाताने गाडी सावरत दुसऱ्या हाताने सेल्फी दंडुक्याला टांगलेल्या मोबाईलने सेल्फी घेण्याची मजा काही औरच! आता एकाग्रतापूर्वक सेल्फी घेतल्याने गाडी थोडी भरकटणारच ना! बरं पूर्वी बायको मागे बसलेली असली की काही गोष्टी करण्यावर बंधन यायचे, आताही बायको मागे असेल तर पुरुष गाडी चालवताना सेल्फी घेत नव्हते. मग ती कमी स्वतः बायका भरून काढत होत्या. नवऱ्याच्या बरोब्बर तोंडासमोर सेल्फी दंडुका येईल अश्या कुशलतेने गाडीवर सेल्फी घेत होत्या.
एकंदरीत तो भागच पर्यटनाचा असल्याने रस्त्यातही सुंदर अशी डबकी बांधून ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तेवढा त्रास सहन करायला नको का! कोकणात भात-शेती. भरपूर पाणी, मधूनच काढलेला पाट. आता काही निरागस लोक धबधबा समजून त्याखाली भिजून मोठ्या धबधब्याची तहान त्या गढूळ पाण्याच्या प्रवाहावर भागवत होते. आमची भटकंती अंग दुखावणारी नव्हती, अगदी पायाचे बोटही दुखावले गेले नव्हते. पण हे मनोरंजक असले तरी भयानक ट्राफिक आणि त्या तलावसदृश खड्यांनी भरलेल्या रस्त्यातून वाट काढणे कंबरडे मोडणारे होते. दोन्ही हात खांद्यापासून दुखायला लागले होते. मोबाईलवर आलेले फोन सोडाच, हातातले घड्याळही बघता येत नव्हते. पोचायला होणारा संभावित उशीर डोळ्यासमोर तारे चमकवत होता, त्यातूनच वाट काढत सुझुकीच्या कृपेने सव्वा-पाचला घरी पोचलो. ७० किमीच्या प्रवासाला अतिशय रॅश गडी चालवूनही ३ तासापेक्षा जास्ती वेळ लागला होता. २ वडापाव, ३-४ भजी आणि चहा हे केव्हाच जिरून गेले होते. उशीर व्हायचा तो टळला नव्हता. मुकाट्याने ओले कचकचीत समान आवरले. गरम पाणी डोक्यावरून ओतत अंग शेकले.
अंधारबनची अचानक ठरलेली यात्रा मात्र सुफळ-संपूर्ण झाली होती!
ओंकार,खूपच छान लिहीत आहेस.साप्ताहीक सकाळला फोटोसह जरूर पाठव.अभिनंदन!������
ReplyDeleteओंकार,खूपच छान लिहीत आहेस.साप्ताहीक सकाळला फोटोसह जरूर पाठव.अभिनंदन!������
ReplyDelete