किल्ले मान्वि
मान्वि गांव रायचूर शहरापासून साधारण ४५ ते ५० किमीवर आहे. हा तालुका आहे. जुनं मान्वि गांव अर्धवर्तुळाकार आकारात टेकड्या-डोंगरांनी वेढलेलं आहे, आणि ह्यातील बऱ्याच टेकड्यांवर मंदिरं आहेत.
दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या हत्तींच्या मिरवणुकीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. मुळात मान्वि हे गांव बर्याच धार्मिक लोकांसाठी ओळखलं जातं अशी माहिती उपलब्ध आहे. मध्वचार्य, श्री जगन्नाथ दास यांची ही भूमी आहे. ही झाली आंतरजालावरून मिळालेली माहिती.
ह्या किल्ल्यावर जायला वस्तीतल्या बारीक-बारीक रस्त्यांवरून लोकांना विचारतच
पायथ्याशी पोचावे लागते. वाटेत दगडी शिळांपासून रचलेल्या भिंती दिसतात. पायथ्याशी
पोचल्यावर त्या अरुंद बोळातच कशीबशी कडेला गाडी उभी केली आणि किल्ल्याकडे वळलो.
सिमेंटच्या पायर्या |
किल्ल्याची उंची फारशी नाही. खालूनच तटबंदीचे अवशेष दिसतात. मोठ मोठाले दगड-शिळा आणि शेजारी दगडी जमीन. जमीन/दगड निसरडे होत असावेत म्हणून त्यावर सिमेंटच्या
पायर्या बांधलेल्या दिसल्या. त्या जेमतेम ४०-५० पायऱ्या संपून आपली नेहमीची वाट
चालू होते.
सगळे एकाच प्रकारचे दगड आजूबाजूला पडलेले. पायऱ्याही त्याच्याच आणि तटबंदीही
त्यांचीच.
रेहमतुल्लाह अल्लाई दर्गा |
काही मिनिटांतच आपण दर्ग्याजवळ येऊन पोचतो. येथील थडग्यावर कन्नड मध्ये “रेहमतुल्लाह
अल्लाई” असं लिहिलेलं आहे. इथे मुसलमानांचा काही कार्यक्रम चालू होता. पायात बूट
असल्याने दर्ग्यात गेलो नाही.
दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेली तटबंदी |
दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेले बुरुज |
मोठमोठ्या दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेल्या तटबंदीचे अवशेष दिसत होते. पण त्यात सलगता नव्हती. आणि याच दगडांचा वापर करून नुसती तटबंदीच नाही तर चक्क बुरुजही बांधलेले आहेत. असाच एक बुरुज खालून दिसला. त्याच्याखाली तर एक प्रचंड दगड पडलेला होता. बुरुज आणि त्यानुसार शेजारील दगडाचा आकार लक्षात घेतल्यास त्याची भव्यता कळेल.
पाण्याचा मोठा तलाव |
तिथून किल्ल्यावर जायला फार वेळ गेला नाही. प्रवेश केल्यावर डावीकडे एक पाण्याचा मोठा तलाव आहे. चांगलाच खोल असलेल्या ह्या तलावाची एक बाजू अर्धगोलाकार आकारात बांधून काढलेली आहे. ह्या भागात त्याची उंची दहा-अकरा फूट तरी असणार.
सध्या या भागात थोडे पाणी शिल्लक होते. अर्थात सध्या तलावाच्या जमतेम १ टक्का एवढेच पाणी असले तरी पण पोहण्याएवढे नक्कीच होते. पोरं मस्त उद्या मारून पोहत होती. माझ्या
गळ्यात अडकवलेळा कॅमेरा बघून त्या मुलांना जास्तीच चेव आला आणि वेगवेगळ्या
पद्धतीने त्या पाण्यात उड्या मारून त्यांचे फोटो काढायला ते मला सांगू लागले.
त्यांचे काही फोटो घेऊन मी दुसरे अवशेष बघायला वळलो.
ना आगा ना पिछा - एकला बुरुज |
‘ना आगा ना पिछा’ असे मध्येच काही बुरुज बांधलेले असे इकडच्या किल्ल्यांवर
दिसतात तसाच एक बुरूज आमच्यासमोर होता. आजूबाजूला ना तटबंदी, ना वाडा, ना आणखी
काही. एकटाच बिचारा हा बुरुज.
टोकावर अजुन एक बुरुज, पलीकडे दर्गा आणि मल्लीकार्जून मंदिर |
समोर हा एकटा बुरुज तर उजवीकडे टोकावर अजुन एक बुरुज दिसला आणि पलीकडचा
डोंगरही. ह्या पलीकडच्या डोंगरांवर "हजरत सयद शाह सबजाली सत्तर कादरी साहेब दर्गा" आणि मल्लीकार्जून मंदिर आहे.
या बुरुजाचे स्थानच इतके मस्त आहे की त्याचे फोटो किती आणि कुठून काढू असं होतं.
ह्याच्या वर जायला वाट सरळ नाही. मध्ये एक मोठा कोरडा तलाव आहे, जोडीला मोठे खंदक
आणि बाभळीची झाडी. यांना वळसा मारून या बुरुजावर पोचलो.
मागे तटबंदीचे अवशेष |
काही पायऱ्या चढून गेल्यावर बुरुजावर जायला दरवाजा आहे. मागे वळून पाहिल्यास
तटबंदीचे बऱ्यापैकी अवशेष दिसतात. जी नैसर्गिक दगडांचा आधार घेऊनच बांधलेली आहे.
दरवाजातून आत गेल्यावर पायऱ्या चढून त्या बुरुजावर जाता येते. इथून
मान्वि शहराचा परिसर दिसतो. पलीकडच्या डोंगरावरचे मल्लिकार्जुन मंदिरही स्पष्ट
दिसते. इकडचे एकूणच डोंगर म्हणजे कशात तरी दगड भरून आणून तिथे ओतून ठेवल्यासारखे वाटतात.
टोकावरील बुरुजावरून किल्ल्याचा परिसर |
बुरुज जमिनीवरचा आणि सर्वोच्च स्थानावरचा |
बुरुजावरून किल्ल्याचा परिसरही न्याहाळता येतो. परिसरात मोठमोठाल्या दगडी शिळा
अशाच इतस्ततः पसरलेल्या आहेत. मध्येच एक एकटाच छोटा बुरुज तर प्रवेशद्वाराजवळ
पडलेल्या मोठा शिळांवर एक मोठा बुरुज.
किल्ल्याच्या साधारण मधोमध लहानसा तलावही आहे.
बुरुजाचा दरवाजा |
बुरुजावरून खाली येताना दरवाजा नीट न्याहाळला. दरवाजावरची कमान कसल्याही
मटेरियल शिवाय नुसतेच दगड तशा आकारात कापून नीट बसवलेले आहेत. दगडांवर कमळं
कोरलेली आहेत.
कोरीव गणपती |
परिसर न्याहाळताना एका दगडावर एक गणपती कोरलेला दिसला. हा दगड कोणत्याही
अवशेषांचा भाग दिसत नव्हता म्हणजे काहीतरी घडवत असताना कारागिरांनी ते काम अर्धवट
सोडलं असं वाटत होतं.
सर्वोच्च स्थानावरचा बुरुज (उजवीकडे). डावीकडे दगडाला टेकून प्रभाकर |
फक्त सर्वात उंचावर दिसत असलेला बुरुज पहायचा राहिला होता. सगळ्या बाजूने
फिरून त्या शिळांवर चढायचा प्रयत्न करून झाला. एका बाजूने नानांनी अर्ध्यापेक्षा
जास्त पल्ला गाठला होता, पण त्यांना मागे फिरावे लागले. दुसऱ्या बाजूने प्रभाकरने
मात्र सगळ्या प्रकारचे कौशल्य लावत तो बुरुज गाठलाच. एकूणच दुपारचा दीड वाजत आलेला
असल्याने आळशीपणा आला होता. त्यात भूक लागली होती आणि मुळात वेळेचं बंधन होतं. वर जायचा रस्ता मिळूनही एकेकाने वरपर्यंत जाणे वेळेच्या दृष्टीने परवडणारे नव्हते.
त्या शिळांखालीच सावलीत बसकण मारून बकाणे भरले. फार वेळ न लावता धडाधड खाली उतरलो.
एकूणच आजचा दिवस थोडा वेगळा होता. सकाळी रायचूरचा राहिलेला नवरंग दरवाजा, मलिआबाद
किल्ल्यातले शिव-मंदिर तर मान्वि किल्ल्यावरचा सर्वोच्च स्थानावरचा बुरुज नाही
म्हटलं थोडी तरी मनात थोडी रुखरुख ठेवून गेला.
किल्ले मुक्कुंदा
तीन वाजून गेले होते. मान्वि किल्ल्यापासून साधारण ७० किलोमीटरवर असलेल्या मुक्कुंदा गावात
पोचलो. गावात पोचल्यावर किल्ला तर दिसला, पण तिथे जायचा रस्ता सापडेना.
गावातली स्वच्छता तर काय वर्णावी... एक तर धड रस्ता कळेना,
त्यात गावातले लोक नक्की कोणत्या रस्त्याने जायचं ते सांगताना गोंधळत होते. खरंतर
त्यांनाच नक्की असं काही माहिती नसावं. मुळात सगळीकडे पडतो तसा त्यांनाही प्रश्न
पडला असावा, कि हे लोक कशाला त्या डोंगरावर जातायत! महत्प्रयासाने एका रस्त्यावर
शिक्कामोर्तब झाले.
अरारारा... तिथली अवस्था बघताच त्यात गाडी घालायची सरळ रद्दच
केले. चालत जायचे झाले तरी मध्ये मध्ये दिसणाऱ्या दगडांवरून उड्या मारत जायला
लागणार होते, तेही अलगद. न जाणो जोरात उडी पडली आणि पाय वरच नाही आला तर? पण
त्यातून नाचतच वस्तीमध्ये पोचलो.
किल्ल्याचे दर्शन |
समोर किल्ला तर दिसत होता, पण जायला चांगला रस्ताच दिसत नव्हता.
किल्ला तर अगदी छोटासा दिसत होता. साधारणपणे पुण्यातल्या एखाद्या मोठ्या सोसायटी एवढा
असेल. म्हणजे वर जायला दहा मिनिटं पुरी होतील, किल्ला बघायला पंधरा-वीस मिनिटं
पुरेत आणि खाली यायला फारतर पाच मिनिटं बास झाली. म्हणजे एकूण अर्ध्या तासात
किल्ला बघायचा कार्यक्रम आटपायला पाहिजे, अगदी फोटो धरून पावून तास. पण
प्रत्यक्षात १५ मिनिटं तर नुसतीच इकडून जाऊन बघ, तिकडून बघ करण्यात गेली. गावातली
दोन पोरं पण आमच्याबरोबर यायचा, आम्हाला रस्ता मिळवून द्यायचा प्रयत्न करत होती.
पण शेवटी आम्ही बघत होतो त्या बाजूने रस्ताच नाहीये असं एकदा ठरवून टाकलं. ४ घरं फिरल्यावर
नशिबाने एक मुलगा सापडला ज्याला वर कुठून जाता येईल याची कल्पना होती. म्हणजे तो
कधीतरी जाऊन आलेला होता. तिथून जाता येईल कि नाही ह्याबद्दल तोही साशंकच होता,
म्हणजे अर्थातच या किल्ल्यावर कधीच कोणीच येत नसणार. त्यामुळे सहज आणि साफ रस्ता
सापडायचा प्रश्नच येत नव्हता.
Actually आमच्याकडे असलेल्या माहितीत/ब्लॉगमध्ये एक वाट दिलेली होती, म्हणजे त्या लोकांना वर जायला सापडलेला मार्ग. पण तो आम्हाला सापडत नव्हता. त्यातले फोटो आणि समोर दिसत असलेल्या किल्ला यांचा मेळ राखत शोधून झालं, पण नाही... तो ब्लॉग साडेसहा वर्षापूर्वीचा होता, नंतर पडझडीमुळे आम्हाला समोर दिसणारा मार्ग बंद झालेला असावा. त्यातून तिथे झाडी प्रचंड वाढलेली होती.
पण... शेवटी आम्हाला “हनमेश” भेटला आणि वर जाता येईल अशी
शक्यता दिसली. पण तोही यायला तयार होईना. वर धड रस्ता नाही आणि खूप झाडी वाढलेली
आहे, खूप घाण आहे, असली अनेक कारणे त्यामागे होती आणि ती खरीही होती.
पण आमचा हट्ट आम्ही सोडणार नव्हतो. एक तर किल्ला छोटुसा, पण सुंदर दिसत होता. आणि आम्ही १५-२० मिनिटं चक्क पायथ्याशी फिरत होतो. डोळ्यासमोर आणि अगदी शेजारीच असलेला किल्ला सोडायचा, हे शक्यच नव्हतं. प्रमोदला कन्नड येत होतं म्हणून ठीक, नाहीतर चर्चाही शक्य नव्हती. सरळ पाणी सोडणे भाग होते, नाहीतर अगदी कठीण तरी नक्कीच होते. खूप विनवण्या झाल्यावर हनमेश प्रसन्न झाला आणि कोयता घेऊन आमच्या मदतीसाठी सिद्ध झाला.
ह्या बाजूच्या किल्ल्यांची एकूणच अवस्था बघता आमच्या दोन गाड्यांपैकी
जे आधी पायथ्याशी/गावात पोचतील त्यांनी वाट न बघता रस्ता शोधायला सुरुवात करायची
हे ठरलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आधी पोचल्याने हनमेशला प्रसन्न करून ठेवलं होतं
आणि तोपर्यंत दुसरी गाडी पोचलीही गावात.
पण एकंदरीत आम्ही पायथ्याशी असताना इथवर पोहोचलेल्या रस्त्याचे वर्णन ऐकून त्यांनी
सरळ इकडे येणे रद्दच केले. त्यातून दुपारचं जेवण ही प्रथा बंद झाल्याने पोटात काही
नव्हते. त्यांना भूकही लागली होती. आम्हालाही कदाचित लागली असावी पण आमच्या
गाडीतल्या लोकांना किल्ल्यापुढे भूक दिसतच नव्हती.
वस्तीतला दरवाजा |
दरवाजा आतील बाजूने |
तर शेवटी हनमेशला घेऊन एका दरवाजात दाखल झालो. हा दरवाजा
नक्की कसला आहे सांगणे कठीणच वाटावे, कारण हा दरवाजा पायथ्यालाच, अगदी वस्तीत आणि
किल्ल्याशी सरळ काही संबंध नसलेला होता. प्रचंड मोठ्या दगडी शिळांचा आधार घेऊन
बांधलेला आहे हा दरवाजा. कमानीतल्या सपाट आडव्या दगडावर लांब नाग कोरलेला आहे. आत
दगडांची बैठक, तर वरती दगडी शिळांचे छत. म्हणजेच किल्ला पूर्वी या वस्तीच्या
भागातही असणार, जो आता लुप्त झाला आहे.
किल्ला |
पलीकडे गेल्यावर दिसला तो अखंड किल्ला. नाहीतर इतका वेळ एका
कोनातून थोडासाच भाग दिसत होता. आता ब्लॉगमध्ये वाचलेला आणि पाहिलेला भाग समोर आला,
जो ढासळलेला होता आणि प्रचंड झाडीही त्यात वाढलेली होती. पण आम्हाला याला वळसा
मारून मागच्या बाजूला जायचं होतं. समोरच दिसणार्या किल्ल्याच्या भागात तटबंदीचा
ढासळलेला भाग, आणि त्यातून आतमधून डोकावणाऱ्या तीन खोल्या ही नक्की काय रचना असावी
हे सांगता येत नव्हतं. त्याच्या उजव्या बाजूला प्रचंड शिळेवर तटबंदीचा टोकाकडेचा
भाग आहे, टोक असल्याने तो अर्धवर्तुळाकार आकारातल्या तटबंदीचा भाग बुरुजासारखा
दिसत होता. अर्थात याला बुरुज म्हणणे शक्यच नाही. याला जर बुरुज म्हणायचं असेल तर
पूर्ण किल्ल्यालाच बुरुज म्हणावे लागेल.
किल्ला - उजवीकडून |
बाकी तटबंदी आणि एकूणच किल्ला शेजारच्या शिळांचा आधार घेऊनच
बांधलेला आहे.
वळसा मारून झाडीत घुसलो. हरे राम... गावकऱ्यांनी या किल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. उलट जुने अवशेष सांभाळत, वर नवनवीन अवशेष तयार करण्याकडे भर दिलेला आहे, हे जागोजागी.. नव्हे, तर पायाखालीच दिसत असलेल्या नवनवीन बुरुजांवरुन सहज लक्षात आले. रोज सकाळी असे सोनखत आणि पाणी मिळत असल्याने इथली झाडी फोफावली नसती तरच नवल! अरारा... पाउल चुकलं की संपलंच.
किल्ल्याची मागची बाजू |
किल्ल्याचा खोबणी प्रवेशभाग आणि त्यासमोर दगडी शिळा |
असला रस्ता पार करत आम्ही गडाच्या पलीकडच्या बाजूला भिंतीजवळ गेलो. रमेश हातातल्या कोयत्याने वाट करतच आम्हाला नेत होता तिथे. ह्या बाजूला एक जवळजवळ किल्ल्याच्या उंचीचीच एक प्रचंड शिळा उभी आहे. त्याच्या शेजारी एका खोबणीतून वर जायला वाट आहे. ही वाट काही खरी वाट नसणार. दगड पडून झालेली खोबणी ही सध्याची तात्पुरती झालेली वाट. त्यामुळे इथे पायर्या वगैरे असण्याचा संबंधच नाही. त्या खोबणीतून डोकं वर काढून सरतेशेवटी किल्ल्यावर पोचलो.
किल्ल्याचा आकार
केवढा आहे वर? लंबूळक्या आकाराचा हा किल्ला लांबीला ४०-४२ मीटर आहे आणि रुंदी तर
फक्त १५ मीटर म्हणजे अवघी
४५ फूट.
आजूबाजूचा परिसर बघता हा नुसता टेहळणी बुरुज वाटत नाही. म्हणजे टेहळणी करण्यासाठी जे स्थान आवश्यक असते असे स्थानच नाहीये ह्याचे आणि तटबंदीही पूर्ण आकारात आहे. म्हणजे हा नुसता त्यांनी टेहळणी बुरुज नसून प्रॉपर किल्ला आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांत हा सर्वात लहान आकाराचा किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही.
माथ्यावरचा एकमेव अवशेष |
वर पोचलो तर मध्ये मध्ये लांब लांब दगडी शिळा पडलेल्या आहेत.
त्यावर दगड घडवत असल्याच्या खुणाही आहेत. लंबूळक्या माथ्यावर उजवीकडच्या टोकावर ८ खांबी वास्तू
आहे. या वास्तूवर चढून बघितले तर खालच्या बाजूला लहानशी मुक्कुंदा गावातली वस्ती
दिसली. किल्ल्याची उंची मुळातच फार नसल्याने लांब वरचे दिसणे काही शक्यच नव्हते.
वास्तुवरून दिसणारा किल्ल्याचा लंबूळका आकार |
येथून किल्ल्याचा संपूर्ण लांबुळका भाग एका दृष्टीक्षेपात
बघता येतो. दुसऱ्या टोकाला आलो. तिथे एका बाजूला तटबंदी ढासळलेली आहे. हा भाग
घालून आम्ही पाहिला होता. आम्ही जिथे उभे होतो तिथे पायाखाली खरंतर एक वास्तू आहे.
आतले बहुतेक ढासळलेले असल्याने ह्या वास्तूचे कसलेच प्रयोजन कळत नाही.
मागच्या बाजूने किल्ला |
२० मिनिटांत किल्ला बघून आल्यावाटेने खोबणीतून खाली आलो.
सगळे परत निघालो पण माझ्या डोक्यात ब्लॉगमध्ये वाचलेली एक शंकराची पिंडी डोक्यात
होती आणि त्याच्या शेजारीच पडलेला असायला हवा होता एक दगडी खांब, ज्याच्यावर एक
शिलालेख आहे. हनमेशलाही ते पाहिल्याचे आठवत होते पण नेमकी जागा आठवत नव्हती. वेळ
कमी होता त्यात भयानक असं हे वावर. शोधता शोधता घाईत जे व्हायचं तेच झालं. जरा पाऊल
वाकडं पडलं आणि एक नवनिर्मित बुरुज मी तोडला. परिणाम माझी चप्पल पवित्र झाली आणि
शंकराची पिंडी वगैरे सगळं विसरावं लागलं.
वस्तीत परतल्यावर रमेशने पाण्याची व्यवस्था करून दिलीन आणि मग ते साफ करण्याचा कार्यक्रम उरकला. पटापट गाडीत बसून रवाना झालो ते रौडकोंडाला.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |