किल्ले रायचूर
रायचूर किल्ला बघून झाल्यावर मुक्कामाला जायचं होतं रायचूर जिल्ह्यात. गाडीत बसल्यावर काम चालू झालं ते राहण्यासाठी ठिकाण शोधायचं. मंदिर वगैरेंचा विचार करता करता डॉर्मेटरी विषय झाला आणि नवरंग दरवाजा रस्ता परिसरात सोय झाली.
हि डॉर्मेटरी म्हणजे चक्क एकावर एक बेड असणारी बस सारखी झोपायची व्यवस्था
असलेली निघाली. म्हणजे चक्क एसी-स्लीपर बस एका ठिकाणी रात्रभर उभी आहे असं वाटावं.
पण व्यवस्था उत्तम. प्रत्येकाला चार्जिंग पॉईंट, लाईट, बॅग ठेवायला जागा वगैरे.
अशी चक्क ३५० तरी बेड असतील तिथे. बऱ्यापैकी पुरतील
सगळ्यांना एवढी सकाळी आवरण्याची व्यवस्था, बाथरूम वगैरे. म्हणजे म्हटलं तर व्यवस्था
उत्तम झाली. गरम नसले तरी अंगावर घेण्याइतपत पाणी मिळाले. ट्रेकचा तिसरा दिवस आणि
सलग आंघोळ 😄
तिथून सामान घेऊन बाहेर आलो. ते गाडीत टाकलं आणि इडलीचा कुकर शोधला अर्थात त्यातून
गरम गरम इडल्या काढत असलेल्या मालकासकट. इडल्या चापून चहा ढोसला आणि रस्ता विचारून
लागलो तडक किल्ले रायचूरकडे.
रायचूर किल्ला तुंगभद्रा नदीकाठी आहे. सापडलेल्या शिलालेखानुसार हा किल्ला काकतिय
राणी रुद्रम्मादेवी हिच्या आदेशाने राजा विठ्ठल याने तेराव्या शतकाच्या अखेरीस
बांधला. नंतर बहामनी व आदिलशाही राजवटीत आला. त्यांनी त्याचा विस्तार केला. हा
किल्ला दोन भागात आहे. “अंदरून” आणि “बाहरून”. बाहरून म्हणजे रायचूर शहराला असलेला
जणू परकोट. ह्याला पाच दरवाजे आहेत. त्यातला “नवरंगी” दरवाजा सर्वात जास्त
प्रसिद्ध. इतर दरवाजे म्हणजे मक्का, काठी, खंदक आणि दोड्डी दरवाजा.
आधी अंदरून किल्ला बघायचे ठरले होते. अंदरून किल्ला म्हणजे या शहरातल्या
एका उंच टेकडीवर असलेला किल्ला. शहराच्या ह्या भागाचे नांव पण “अंदरून किल्ला”
असेच आहे. रायचूर बस स्टँड समोरच “काली मशीद”, कबरस्थान आणि “दर्गा हज शेख मिया”/”टाकी
वाले बाबा दर्गा” आहे. टेकडीवर असलेल्या अंदरून किल्ल्याकडे वाट तिथूनच जाते.
डाव्या बाजूला असलेली तटबंदी |
खाली दर्गा, त्याच्या पुढचं छोटंसं तळं, त्यात कारंजं |
प्रवेशद्वार आणि त्यावरील तटबंदी |
प्रवेशद्वार |
ह्या वाटेने वर निघाल्यावर उजवीकडच्या कडेच्या बाजूला तटबंदी दिसायला लागली.
मागे वळून बघितलं तर खाली दर्गा, त्याच्या पुढचं छोटंसं तळं, त्यात कारंजं आणि
नुकतीच दर्ग्यावर प्रार्थनेसाठी यायला लागलेली लोकं दिसायला लागली. थोडासा
ओबड-धोबड रस्ता पार केल्यावर पायऱ्या लागल्या. त्यावरून जाताना काही मिनिटांतच तीन
प्रचंड दगडी शिळांचं नैसर्गिकरित्या तयार
झालेलं प्रवेशद्वार लागलं. गंमत म्हणजे हेच गडाचे प्रवेशद्वार आहे. ह्या दगडांची
रचना न बदलता उलट त्यांच्याच आधाराने बाजूला तटबंदी तर वरती बुरुज बांधलेला आहे.
प्रवेशद्वारापुढील नैसर्गिक दगडी कमान (आतील बाजूने) |
दगडी पायऱ्या |
दृश्य पूर्वेकडील टोकावरून, सूर्योदय आणि आम तलाव |
ह्या नैसर्गिक दरवाजातून आत गेल्यावर आणखी एका कमानीतून पलीकडे गेलो.
आजूबाजूला मोठे दगड व शिळा. उजव्या बाजूला तटबंदीचे अवशेष. पायऱ्यांवरून चालत गेलो
तर डाव्या बाजूला एक तलाव असावा जो कोरडा पडलेला होता. किल्ल्याच्या समोरच्या
टोकावरून सूर्य वर डोकावताना दिसला. किल्ल्याच्या ह्या पूर्वेकडील टोकाला पोचलो.
खाली उजव्या बाजूला प्रचंड पसरलेला तलाव आहे, हा “आम तलाव”. किल्ल्याच्या टेकडीवर
आम्ही उभे होतो तर टेकडीवरून खालच्या बाजूला अजून तटबंदी दिसली.
या किल्ल्याला तीन लेअर मध्ये तटबंदी आहे तळापासून. बहुतांशी तटबंदी ढासळलेली
आहे.
ह्या पुर्वेकडील टोकावर उभे असताना डावीकडे पाहिले तर एक प्रवेशद्वार दिसले. ह्याच्या
बाजूची तटबंदी सुद्धा बऱ्यापैकी ढासळलेली आहे. तिथून आत मध्ये गेलो तर डावीकडे एक थडगं
दिसलं. तिथे नित्यनियमाने पूजा-अर्चा होत असावी. समोरच लक्ष वेधून घेते ती एक तीन
कमानी असलेली एक इमारत.
हा एक राहता वाडा असावा. तीन कमानी पैकी उजवीकडची कमान आता अर्धी ढासळलेली आहे.
आम्ही एका ब्लॉगवर ह्या किल्ल्याबद्दलची माहिती वाचली होती, त्यावर असलेल्या फोटोत
ह्याच इमारतीच्या तीनही कमानी सुस्थितीत होत्या. म्हणजे सध्या शिल्लक असलेल्या
अडीच कमानी कालांतराने दोन होऊ शकतात. इमारतीच्या डाव्या बाजूला एक छोटेखानी वास्तू
आहे. ह्यालाही मिनार आहेत.
एकूणच किल्ल्याचा हा सर्वोच्च माथा म्हणता येईल. याच्या मधोमध एक मोठा चौथरा
आहे, जिथे पुर्वी वाडा असावा. उजव्या हाताला एका बाजूला चौथऱ्यावर एक तोफ पडलेली
आहे. ती चांगली २१ एक फूट लांब आहे. तोफेच्या एका टोकावर पर्शियन भाषेत
लेख आहे. इथून भोवातालचे लांबपर्यंतचे दृश्य दिसते. लांबवर काही डोंगर दिसतात,
ह्याबाजुलाच मालिआबाद किल्लाही असावा. तर जवळच खालच्या बाजूला प्रचंड पसरलेला “आम
तलाव”, त्याच्या अलीकडे लहानसा “खास तलाव”. हे दृश्य बघून तीन कमानीवाल्या
इमारतीजवळ आलो.
कमानीयुक्त इमारत |
इमारत आतील बाजू - झरोके |
झरोक्यातून बाहेर दिसणारा अर्धवट कोरलेला नंदी |
इमारतीच्या बाहेर उजव्या बाजूला एक मंडप आहे. पूर्वी एखादे मंदिर इथे नक्कीच असणार
हे दर्शवणारी ही वास्तू. या मंडपाच्या छतावरील दगडांवर वेलबुट्टीची सुरेख नक्षी
कोरलेली आहे. कमानीदार इमारतीत आतमध्ये पलीकडील बाजूला चांगले झरोके आहेत. इथल्या एका
झरोक्यातून बाहेर एका दगडावर अर्धवट कोरलेला नंदीही दिसला.
ही इमारत बघून शेजारच्या मिनारवाल्या वास्तुकडे आलो. वास्तू लहान असली तरी
रेखीव आहे. दोन मिनार मात्र ढासळलेले आहेत. ह्या बाजूने खाली रायचूर शहराचा भाग
छान दिसतो. रायचूर बसस्थानक आणि पलीकडे एक मोठे मैदान येथून दिसते.
“अंदरून” किल्ल्याचे सगळे अवशेष पाहून झाले. परतताना अवशेष निरखत, फोटो काढत
त्या नैसर्गिक दरवाजातून खाली आलो.
जेमतेम ८:३०-७:४५ वाजत असावेत, सकाळी खादंती करूनही पोट परत खायला मागत होतं. अर्थातच
चांगले हॉटेल बघून गाडी थांबवली. इडली, डोसा, उपीट, पोहे, मेदुवडा जे काही मिळालं
ते रिचवून पुढच्या अवशेषांकडे वळलो.
शहरात पसरलेला “बाहरून” किल्ला बघायला सुरुवात केली. इथे रस्त्यांवरून फिरताना अवशेष दिसायला लागले.
नवरंग दरवाजाकडे जाताना अनेक लहान मोठे बुरुज लागले. जिथे शक्य झाले तिथे
उतरून ते नीट पाहता आले तर काही ठिकाणी फक्त लांबूनच ते बघता किंवा फोटो घेता येत
होते.
बहुतांशी बुरुजांची अवस्था खूपच वाईट आहे. झाडे झुडपे वाढलेली आहेत. अतिक्रमण प्रचंड
आहे. निरखून पाहिल्यास बुरुजातील काही दगडांवर कोरीव काम केलेले दिसते. हे सगळं जतन
केल्यास खूप मोठा ठेवा हाती लागू शकेल, पण अतिक्रमणामुळे ते कितपत शक्य आहेत ते
सरकारी खातंच जाणो.
एवढं करून नवरंग दरवाज्यापाशी पोचलो तर हा सगळा भाग कर्नाटक सरकारच्या
पुरातत्व विभागाने Museum केलेला दिसला. सरकारी म्हटल्यावर ९-९:३० ला काय उघडणार? त्याची
उघडायची वेळ साडे दहा होती आणि कोरोना काळामुळे ते उघडेल की नाही याचीही शाश्वती नव्हती.
दरवाजातून डोकावून जमेल, दिसेल तेवढे नजरेखाली घातले. खूप जुन्या मूर्ती,
शिलालेख इथे जतन करून ठेवलेले दिसले. आमच्या दुर्दैवाने ते जवळ जाऊन काही पाहता
आले नाहीत. आत मध्ये खूप काही बघायला असणार हे मात्र नक्की.
वेळ-काळ ओळखून, मनावर दगड ठेवून तो भाग पुन्हा कधीतरी बघू म्हणून तसाच सोडून
पुढच्या किल्ल्याकडे वळलो.
पुढे जायचं होतं मालिआबादला.
किल्ले मालिआबाद
मालिआबादला पोचल्यावर किल्ल्याची चौकशी करायच्या ऐवजी सरळ “रमणी गोशाळा”
विचारायचं. ही गोशाळा किल्ल्यातच आहे. एक कच्चा रस्ता या गोशाळेकडे घेऊन जातो. वाटेत दोन्ही बाजूला कापसाची शेती आहे तर पुढे बऱ्यापैकी
जंगलाचा भाग आहे. इथे मोर तर आरामात फिरताना दिसले.
कच्चा रस्ता आणि आजूबाजूला दिसणारे अवशेष |
साधारण दहा वाजले होते. या कच्च्या रस्त्यावर आल्यावर गोशाळेकडे जाताना वाटेतच
किल्ल्याचे अवशेष दिसायला लागले. हा किल्ला म्हणे १०० एकर मध्ये पसरलेला आहे.
अर्थातच थोडे मोठे आवार आम्हाला बघण्यासाठी कोणीही योग्य ठेवलेलं नसणार हे
गृहीत धरलेले होते. कारण एवढे मोठे वावर, त्यात शेतं असणारच. वस्ती नसेल फारशी असं जरी
धरलं तरी एवढा मोठा भाग मोकळा कोण ठेवणार?
तर... गेट मधून आत गेलो तर जवळच एक हनुमान मंदिर दिसलं. या मंदिराच्या परिसरात
असंख्य कोरीवकाम केलेले दगड आहेत. परिसरात तिथली मंडळी बसलेली होती, त्यात कदाचित
काही इथली मॅनेजमेंट बघणाऱ्या मंडळींपैकी ही असावीत. गोशाळेत तर अनपेक्षित असा
अनुभव आला. मंडळी तर कन्नड सोडून कशातच बोलायला तयार नव्हतीच. वर काही दाखवायलाही
अनुत्सुक होती. इथले काही आम्हाला ते फिरू देणार नाहीत हे समजल्यावर या
किल्ल्याबरोबर अजिबात न टाळता बघावी अशी गोष्ट म्हणजे अखंड दगडात कोरलेले हत्ती, ते
तरी बघायला मिळावे म्हणून चौकशी केली. आमच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे ते
जवळपासच्या कापसाच्या शेतात ठेवलेले असणार होते. पण चौकशी केल्यावर त्या मंडळींनी
काहीच सांगायला नकार दिला. उलट तिथल्या कामगार बायकांनी काही सांगायला सुरुवात
केल्यावर त्यांनाच गप्प राहायला सांगितल्यासारखे वाटले.
ह्या किल्ल्यात तटबंदीजवळ कुठेतरी शिवमंदिर आहे हेही वाचून होतो. पण यातलं
काहीच आमच्या नशिबात दिसत नव्हतं. या मंदिरात म्हणे ३ फुट उंचीची शंकराची पिंडी आहे
आणि वीरगळही आहे. ह्यातले काही नाही तरी जेवढा बघायला मिळेल तेवढा किल्ला आणि किमान
ते हत्ती तरी बघायचेच असं ठरवून त्या गोशाळेतून बाहेर निघालो.
बहुतेक सरकारी/पुरातत्व खात्याच्या माणसांनी यांच्या श्रद्धास्थानांना काही
धोका पोचावलेला असावा. कदाचित तिथल्या वस्तू उचलूनही नेत असावेत नाहीतर असे अनुभव
येत नाहीत. अर्थात हा आमचा तर्क होता वस्तुस्थितीची कल्पना नाही.
गोशाळेतून बाहेर पडून कच्च्या रस्त्यावर वाटेत भेटलेल्या लोकांशी चौकशी करत
एका कापसाच्या शेतात घुसलो. तिथल्या बायका बहुतेक तुळू मध्ये बोलत होत्या. त्यांनी
खाणा-खुणा करून हत्ती कुठे आहेत ते सांगितल्यावर त्या कापसाच्या शेतातून वाट काढत
ते “दगडांचे हत्ती सांगा कुणी पाहिले” करत निघालो. आम्ही सरळ किल्ल्याच्या
तटबंदीवरुन चालत होतो हे लक्षात आलं. तटबंदीला लागून किल्ल्याचा आतमध्ये सगळी शेती
आहे.
सगळेजण त्या शेतात कुठेतरी लपलेले (कि लपवलेले?) हत्ती दिसतात का ते बघत होतो.
अचानक एके ठिकाणी दुरवर ते हत्ती दिसले. आता तटबंदी सोडून सरळ त्या शेतात घुसलो.
कसली वाट अन कसलं काय! त्या कापसाच्या शेतातूनच तिथपर्यंत पोचलो.
अहाहा! हत्तींचे सौदर्य काय वर्णावे? संपूर्ण एका दगडात एक असे दोन हत्ती कोरून
ठेवलेले आहेत. अगदी Lifesize मध्ये. डोळे, सोंड, सुळे, सुळ्यावरचे दागिने, कान... काय
काय लिहायचे? अवयव आणि दागिने... सगळंच सुरेख! पाठीवर झुल, गळ्यातले वळ्यावळ्यांचे दागिने,
साखळ्या, त्या साखळ्यांना घंटा. गंडस्थळावर खास लटकन असलेला दागिना आणि गंमत म्हणजे
पाठीवरची झुल नुसतीच नाही तर त्याला व्यवस्थित Figure of 8 ची गाठ मारलेली आहे.
पायात घुंगुर... असो. वर्णन अशक्य.
मनसोक्त फोटो झाल्यावर सरळ निरखत बसलो प्रत्येक दागिना. अगदी जणू हातात घेऊन
पाहिला.
पूर्वी इथे मंदिर असावे किंवा जिथे मंदिर असेल तिथे हे हत्ती असावेत कारण
आजूबाजूला काही नक्षीदार दगडी गोळा करून ठेवलेले आहेत, जे मंदिराच्या बांधकामाचे
दिसतात. पुरातत्ववाले हे उचलून नेत असावेत म्हणून स्थानिक आम्हाला हे सगळं दाखवत
नसावेत.
आम्ही हे पाहून त्या कापसाच्या शेतातून परत तटबंदीवर आलो. पूर्ण मागे न जाता
वाटेतच एका बाजूला कच्चा रस्त्याकडे परत जायला जागा आहे. हे किल्ल्याचे एक
प्रवेशद्वार आहे. सगळी तटबंदी आणि बांधकाम प्रचंड आकाराच्या घडवलेल्या दगडांनी
बांधलेले आहे. लांबीला एक-एक दगड किमान दहा फूट तरी असावा. तरी ह्या प्रवेशद्वाराचे
सुद्धा अवशेषच शिल्लक आहेत. यामधूनच कच्च्या रस्त्याने आम्ही गोशाळेकडे गेलो होतो.
थोडक्यात जेवढा बघायला मिळाला तेवढा मालिआबाद किल्ला बघून झाला. अकरा वाजत आलेच
होते.
पुढे बघायचा होता किल्ला मान्वि.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
सुंदर विस्तृत लेखन आणि माहिती धन्यवाद ओंकारजी
ReplyDeleteधन्यवाद भाई :)
Deleteनेहमीसारखे छान वर्णन व सुंदर फोटोज.ब्लागला आकर्षक रंगसंगती दिल्याने ब्लॉग अतिशय आकर्षक आणि वाचनीय झाला आहे.एखाद्या साप्ताहिकाला पाठवल्यास वाचकांना एका उत्तम ट्रेकर व सिध्दहस्त लेखकाची ओळख होईल.
ReplyDeleteधन्यवाद काका.. नक्कीच विचार करू :)
Deleteमस्त ओ ओंकार भाऊ!👌
ReplyDeleteधन्यवाद विनीत :)
Deleteअप्रतिम
ReplyDelete