Wednesday, December 12, 2018

किल्ले मोहनदर उर्फ शिडका आणि कण्हेरगड - II

                 आम्ही नंदुरी-अथांबे वरून मोहिमेच्या दुसऱ्या भागात शिरलो. गांव: सादडविहीर. इथून 2 पोरांना आमच्याबरोबर येण्यास तयार केले, पण गाडी थांबवायच्या जागेवर आल्यावर त्यांनी माघार घेतली. त्यांना घरी काम निघाले आणि अर्थातच शेतीचे काम जास्ती महत्वाचे. पण त्यांनी गडाकडे जायची वाट दाखवून दिली.

किल्ले कण्हेरगडचा खालपासून दर्शन देणारा बुरुज
                 सादडविहीर गावाकडून पुढे जाणाऱ्या रस्त्याने साधारण 500 मीटर अंतरावर रस्त्याखालून मोरी बांधलेली आहे (पाणी जायला जागा) हीच खूण. इथून उजवीकडे बुरुजावर फडकत असलेला ध्वज दिसतो. वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. पहिला टप्पा परत डावीकडचा डोंगर आणि उजवीकडे किल्ला ह्या मधल्या खिंडीचा. इथे पोचायला आधारानं 15-20 मिनिटं लागतात. इथून डावीकडे डोंगरावरही वाट जाते. पलीकडच्या कण्हेरवाडीतून लोक इथे ससे पकडायला जातात, तसेच वर बहुतेक डोंगरदेवाचे मंदिरही आहे. आपण उजवीकडे वर बुरुजावर फडकणाऱ्या ध्वजाकडे बघत सरळ वरती जायची वाट धरायची. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. इथे आपल्याला साध्य व्यवस्थित दिसत असले तर तिथे नेणारा मार्ग सोपा नाहीये. सरळ नाकाडाने चढल्यास अगदी घसाऱ्याची वाट आहे. परंतु जरा उजवीकडची वाट पकडल्यास नाकाडाच्या कडेने पण झुडुपातून वाट वरच्या बाजूला जाते. परंतु ह्या वाटेने जाताना आपले साध्य नक्की कुठे आहे त्याचा अंदाज ठेवावा, कारण आपण जात असलेली ही कडेची वाट सरळ आपल्याला बुरुजकडे न जाता पुढे कुठेतरी घेऊन जाते. म्हणून वाटेत अंदाज घेऊन डावीकडे वरच्या बाजूला जावे लागते. इथून परत आपले साध्य म्हणजे ध्वज दिसू लागतो. आता मात्र पर्यायी रस्ता नाही. सरळ वर जायचे.

छोटेखानी पण शीण दूर करणारे नेढे
                 हा किल्ला 4 टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात पोचतानाच गडाचे अवशेष म्हणजे पायऱ्या दिसू लागतात. इथून मागे बघितल्यास उंच वाटत असलेले गडाच्या डावीकडचे डोंगर खुजे वाटू लागतात. इथे पाण्याची छोटी विश्रांती घेऊन बुरुज उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने पुढे व्हायचे. परत पायऱ्या आपल्याला बुरुजाला वळसा मारून त्याच्या वरच्या लपून बसलेल्या बुरुजावर घेऊन जातात. इथे एक पाण्याचे कोरडे टाके आहे. मागे बुरुजकडे गेल्यास दोन्ही बाजूला तटबंदी दिसते, तर मधेच मोठा चर खोदलेला दिसतो. समोरच खालच्या बुरुजवरचा ध्वज आणि समोर डोंगर दिसतो. आता मागे फिरून कोरड्या टाक्याजवळून वरच्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जायचे. सरळ टप्प्या-टप्प्यातल्या पायऱ्या आणि अगदी उंचावर अर्धवट तुटका दरवाजा सदृष अवशेष दिसतात. पुढचा पायऱ्यांचा टप्पा पार केला कि ह्या किल्ल्याचा दागिना शोभेल असे छोटेखानी पण सुंदर असे नेढे आहे. अगदी 5 फूट उंचीचे आणि 25 एक फूट लांब असे त्यात आरामात वारा खात बसावे असे वाटणारे हे नेढे आहे. त्यात बसायचा मोह तात्पुरता टाळून डावीकडच्या पायऱ्यांनी पुढच्या टप्प्याकडे जायचे. इथे वरती कातळात काही खड्डे आहेत. अजून वरच्या तुटक्या दरवाजा वाटणाऱ्या अवशेषांकडे पोचायचे. हे अवशेष दरवाजाचे वाटत नाहीत आणि मुख्य वाटही इथून नाही, तर त्याच्या डावीकडून आहे. इथे अजून काही खड्डे, गोलाकार आकार कोरलेले आहेत. इथे अजून एक कोरडे टाके आहे. आता गड माथ्यावर म्हणजे एका पठारावर पोचायचे. इथे समोरच तुळशी वृंदावन, शंकराची पिंड, नंदी वगैरे उघड्यावरच आहेत. जवळच पाण्याची टाकी, खोल्यांचे चौथरे वगैरे अवशेष आहेत. पाणी पिण्यायोग्य नाही. समोर विस्तीर्ण पठार आहे आणि पलीकडे धोडप किल्ल्याच्या माचीला जशी भलीमोठी खाच आहे, तशीच इथेही आहे. पण इथे जाता येत नाही. इथून डावीकडे गेल्यावर टाक्यांचा समूह आहे. सगळ्यात उजवीकडच्या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य असले तरी त्यात शेवाळे खूप आहे, पाणी रुमालात गाळून घ्यावे.

टाकी, गुहा आणि इतर अवशेष
                 ह्या गड माथ्यावरून सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप, कांचना हे किल्ले, तर हंड्या, बंड्या आणि इखारा हे सुळके दिसतात.
                 कडेने परतीच्या वाटेकडे येताना उजव्या बाजूला खालच्या बाजूला एक वाट जाते. इथे पूर्वाभिमुख 2 गुहा लपलेल्या आहेत. विस्तीर्ण अश्या ह्या दोन गुहा आहेत. जागा सपाट नसली तरी गरज लागल्यास पाऊस-पाण्यापासून संरक्षित आहे. ह्या गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या दिसतो. धोडपच्या डावीकडे ईखारा सुळकाही स्पष्ट दिसतो. आता गडफेरी पूर्ण होते. साधारण 10 टाकी हा किल्ला बाळगून आहे. येताना नेढ्यात निवांत बसून जेवण करावे. इथून आपण आल्या वाटेने पाऊण तासांत आपण अगदी गडाच्या पायथ्याशी पोचतो.

गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या
                 ह्या गडाचा इतिहास अंगात वीरश्री निर्माण करणारा आहे. हा फारसा प्रसिद्ध नसलेला गड आपल्या पराक्रमाने अजरामर करून ठेवलेला आहे "रामजी पांगेरा" नावाच्या मराठी रक्ताने. पावनखिंड म्हणजे वीर बाजीप्रभू, पुरंदर म्हणजे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरे असे समीकरणच आहे जणू, तसेच कण्हेरगड म्हणजे रामजी पांगेरा.
                 १६७२ च्या जानेवारी महिन्यात दिलेरखान आपली १० हजारांची भलीमोठी फौज घेऊन कण्हेरगडाच्या पायथ्याशी आला. त्याने कण्हेरगडाला वेढा घातला. त्यावेळी रामजी हे कण्हेरगडाचे किल्लेदार होते. गडावर शिबंदी होती अवघी 800 ते हजार. गडावर उपलब्ध रसद जास्त काळ पुरणार नाही हे रामजी जाणून होते. ह्या रामोश्याने आपले कपडे फाडले, दोन्ही हातात समशेरी घेऊन रामजीने मावळ्यांना आव्हान केले. 'आरं गनिम येतुया, चलाऽऽऽऽ मरायला कोन कोन तयार हाय त्येनं माज्या म्हागं यावं...' त्याचे आव्हान शब्दशः सत्य होते. हजारी सैन्यापुढे हे वेडे वीर अक्षरशः मरण्यासाठीच जात होते. ह्या वेड्याची साथ द्यायला असेच सातशे वेडे वीर तयार झाले आणि गडाचे दरवाजे अचानक उघडले. कमरेचे वस्त्र फक्त अंगावर ठेऊन उघडे बंब असे हे रामोशी हातात नागव्या तलवारी घेऊन 'हर हर महादेव' अशी गर्जना करत गनिमावर अक्षरशः कोसळत गेले. अंगावर असंख्य जखमा झाल्या. सभासद या लढाईचे वर्णन करताना लिहतो, 'टिपरी जैसी शिमग्याची दणाणते, तैसे मावळे भांडीले'. खरंच रामजी पांगेरा आणि त्याच्या मावळ्यांचा आवेश पाहून दिलेरखानाने अक्षरशः तोंडात बोटे घातली. त्याच्या डोळ्यासमोर पुरंदरच्या युद्धात उभा ठाकलेला मुरारबाजी देशपांडे आला नसेल तरच नवल. 'ये मराठे नही, भूत है' असे म्हणत दिलेरखान परत फिरला. अवघ्या सातशे मावळ्यांनी गड राखला.
                 संध्याकाळ झाली होती. थोडासा उशिर झाला होताच निघायला. घरी पोचायला साडेबारा वाजून गेले होते. सोमवार सुरूच झाला होता ऑफिस आजच होते. सह्याद्री, किल्ले, रामजी पांगेरा... सगळे तात्पुरते बाजूला ठेवले आणि 5 एक तासांची झोप मिळवायला पांघरुणात शिरलो.

2 comments: