Wednesday, December 6, 2023

विदर्भीय भटकंती - पितरांचा किल्ला - दृग

पितरांचा किल्ला - दृग

अजस्त्र किल्ला, अपरिचित किल्ला, कठीण/दुर्गम.. वगैरे वगैरे किल्ला अशी विशेषणं आपण किल्ल्यांची ऐकत असतो, पण अगागा... पितरांचा किल्ला! आता पितरांचा किल्ला म्हणजे काय, कुठे आहे वगैरे सगळं आपण नंतर पाहूच, पण आधी सांगतो की हा किल्ला, किल्ला सोडा, किल्ला असलेला हा जिल्हा पण आमच्या मूळ नियोजनात नव्हता.

नागपूर-भंडारा-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर अशी पंच-जिल्हा भटकंती करून परतताना, बुलढाण्यात देऊळगाव राजा व सिंदखेड राजा ह्या राजांना मुजरा करून परतायचं, असं मूळ नियोजन. मुळात हेच नियोजन कितपत यशस्वी होईल वगैरे धाकधूक होती. त्यापायी नियोजनात बऱ्यापैकी अधिकचा वेळ ठेवला होता. पण दिवसाच्या प्रकाशाचं नियोजन जमलं आणि तो वेळ वापरावाच लागला नाही, त्यातून तगडी साथ मिळालीच होती आणि त्यामुळे चक्क एक पूर्ण दिवस हातात पडला.

मग इतक्या लांब आलोच आहोत, तर अजून एक दिवस घालून दोन दिवसात चक्क वर्धा आणि यवतमाळ ही बघून घ्यावेत असा ठराव बहुमताने पास झाला. मागच्या लेखातले लहान लहान किल्ले जसे पाहिले, तसेच "पवनी" हा मोठा किल्ला आहे तोही पाहिला. जोडीला काही मंदिरं पण खात्यात जमा केली. "उमरेड" हा नागपूर मधला पाहिलेला शेवटचा किल्ला.

नाचणगांवची गढी व गढीचे मालक श्री देखमुख यांचे समवेत

त्यानंतर घुसलो वर्धा मध्ये. इथे बहुतांशी गढ्याच आहेत, त्यातही काहीच व्यवस्थित तर बाकी पडझड झालेल्या आणि कशाबशा तग धरून राहिलेल्या. नाचणगांवची गढी तर गढीचे मालक श्री देखमुख यांच्याकडे पाहुणचार घेऊन पहिली. "केळझर"चा गणपती, हा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपती. या गणपतीचे मंदिर हे चक्क एका किल्ल्यात आहे, तो केळझरचा किल्ला. हा गिरीदुर्ग असला तरी मंदिर असल्यामुळे इथे दारात गाडी जाते. हिंगणी, आंजी मोठी, धुळवा, पवनार, अल्लीपूर, सोनेगाव-आबाजी, नाचणगाव, विरूळ यात वर्धा संपवलं.

यवतमाळ मधीलही रावेरी, कळंब हे गढ्या-किल्ले पाहिले आणि मग ठरल्याप्रमाणे मोर्चा वळवला तो "पितरांचा किल्ला" उर्फ "दृग" उर्फ "दुरुग" उर्फ "दुर्ग" ह्या किल्ल्याकडे.

यवतमाळ जिल्ह्यातला हा एकमेव गिरीदुर्ग. पण ज्या किल्ल्याला भेट द्यायची होती, त्या किल्ल्याचे नाव मुळात दुरुग, दृग ती दुर्ग याबाबतच संभ्रम होता. महत्त्वाचं म्हणजे गुगलवर हे स्थळ मॅपही नव्हतं. त्यामुळे कळंबवरून "याला विचारू, की त्याला विचारू" करत गावात पोचलो. तिथे पोचल्यावर गावाचं आणि पर्यायाने किल्ल्याचे नांव हे दुर्ग नाही हे तरी नक्की झालं. मुळात हे "दृग" असावं आणि अपभ्रंश "दुरुग".

हनुमान मंदिर

हा किल्ला खरंच निबिड अरण्यात आहे. गांव सोडलं की लगेच इथे एक जलाशय आहे, त्यावर धरण आहे. हे दृग धरण किंवा दृग जलाशय. भारतात देव-धर्म, देवळं-मंदिरं ह्याबाबत कितीही नकारात्मक आरडाओरडा होऊ दे, या देवस्थानांमुळे त्या त्या ठिकाणांचा विकास झाला आहे, हे नाकारून चालणार नाही. अल्पपरिचित किंवा अशा दुर्गम ठिकाणी भटकंती करणारे तरी हे नक्की नाकारणार नाहीत. हा दृग किल्ला पण दुर्गम ठिकाणीच आहे. घनदाट आणि Untouched जंगल यामुळे तिथे वन्य प्राण्यांचा वावर सहज आहे. अर्थातच अशा ठिकाणी जाणं धोक्यातच असतं. पण गंमत म्हणजे त्रिभुवनात शब्दशः कुठेही पाठीशी असणाऱ्या देवतांपैकी एक, असे हनुमान इथे, ह्या अरण्यातही आपले तारणहार ठरतात. इथे असलेल्या हनुमान मंदिरामुळेच इथे रस्ता झालेला आहे. आणि सांभाळून नेल्यास इथपर्यंत चार चाकी जाऊ शकते. माझी स्विफ्ट आणि साथीदारांवर विश्वास ह्यामुळेच आम्हीही गांव ओलांडून धरणाच्या कडेने "सिनीक", पण कच्च्या रस्त्यावरून Offroading करत मंदिरापर्यंत पोहोचलो. अन्यथा गाडी धरणाजवळ ठेवून पुढे जंगलातून या मंदिरापर्यंत यायला तासभर तरी लागत असणार. आमचा हा वेळ वाचला.

श्रीपाद चितळे हे त्यांच्या विदर्भातल्या किल्ल्यांविषयी लिहिताना ह्या किल्ल्याबाबत असं नमूद करतात, की "जंगल इतके घनदाट की, सूर्यप्रकाश इथे झिरपत नाही". आता त्यांनी ज्या काळात भटकंती केली त्या काळात नक्कीच ही परिस्थिती असेल. फक्त सध्या आम्ही जात असलेल्या वेळी पानझडीमुळे म्हणा किंवा नंतर कदाचित वाढलेल्या मानवाच्या वावरामुळे म्हणा, किमान इतकी भयानक परिस्थिती नाही दिसली. हा, परंतु इथल्या जंगलाला अरण्य म्हणावं इतपत नक्कीच दाटपणा आहे, अगदी घनदाटपणा आहे. दुर्गम स्थान, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हिंस्त्र श्वापदांचा वावर, ह्यामुळे अर्थातच इकडे, चितळेंच्या भाषेत सांगायचं, तर मानवाचा चहाळ अत्यंत कमीच आहे. एकटा-दुकटा ह्या बाजूला फिरकत आला, तर श्वापदांच्या तावडीत सापडून परत जिवंत जात नसावा. त्यामुळे अर्थातच इथे भुताखेतांच्या, पितरांच्या गोष्टी जोडल्या जाणे यात नवल ते काय? म्हणूनच याला "पितरांचा किल्ला" म्हणत असावेत.

हा किल्ला १५-१६व्या शतकात बांधला असावा व माहूरच्या "उदाराम देशमुख" यांच्या अखत्यारीत येत असावा, अशी शक्यताही चितळे इथे नमूद करतात. तुरुंग सदृश अशी किल्ल्याची रचना असल्याचेही ते म्हणतात, जे स्वाभाविक वाटते ते याच्या रचनेवरून आणि स्थानावरून.

आम्ही निवडलेल्या वेळेमुळे सूर्यप्रकाश मात्र मुबलक होता. त्यामुळे अर्थातच जंगलाविषयीची भीड चेपली गेली होती. त्यात मंदिर-परिसर यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, आपल्याला सुरक्षिततेचे आश्वासक वातावरण जाणवते, हे का नाकारावे? मंदिराच्या शेजारून वाहणारा ओढा सगळं मन प्रसन्न करून गेला. वावरताना चहू बाजूला लक्ष ठेवणे क्रमप्राप्तच होते.

मंदिराजवळ सावलीत गाडी नीट लावून सरळ गडाची वाट धरली. उजवीकडची वाट गडावर घेऊन जाते तर डावीकडेही एक वाट जाते, मात्र ती जंगलातून पुढे जात असावी.

पायऱ्यामार्ग आणि दरवाजा

अवघ्या काही मिनिटातच दरवाज्यात पोचलो. म्हणजे दरवाजा असा शिल्लक नाहीये पण बहुतेक नव्याने किंवा जिर्णोद्धारित म्हणा, पण समोर असलेला पायऱ्यामार्ग पूर्वी इथेच दरवाजा असावा असं दर्शवतो.

अवशेष

किल्ल्यावर तसे फार अवशेष शिल्लक नाहीत. मुळातच दुर्गमता आणि त्यातून वापर तुरुंग म्हणून केला जात असल्याने फारसे बांधकामही केले गेले नसावे त्या काळीसुद्धा बहुदा. अर्थातच फार काही नसले तरी नैसर्गिक आणि बांधीव तटबंदी, पाण्याची व्यवस्था आणि जोडीला एखादं देवस्थान हे असतंच असतं. देवस्थानांचा फायदा हा असा, की किमान इथे येऊन पोचणारी वाट तरी रुळलेली असते. त्याप्रमाणेच आमचं लक्ष्य माहिती असल्याने ते समोर ठेवून इतरत्र अवशेष शोधत होतो. तटबंदीचे अवशेष दिसत होते आणि मंदिरामुळे वाटेत भगवे ध्वज आणि जवळपास एका वाड्याचे अवशेषही दिसले.

जगधामी मंदिर

सरळ मंदिर गाठलं. हे जगधामी मंदिर! मूळ जुन्या मंदिराचे अवशेष इथे होतेच. त्याने त्याचं स्थान आणि महत्त्व दर्शवलं जात होतं पण कालांतराने ते ढासळलं असावं. पण म्हणूनच त्यानंतर आता जिर्णोद्धारित मंदिर हे भक्तांचा आणि जुन्या देवळाचाही आसरा झालं आहे.

अवशेष

देवळाच्या मागे खालच्या बाजूला तटबंदीचे अवशेष आहेत, तर देवळाच्या समोर काही अंतरावर पाण्याची व्यवस्थाही आहे. परंतु त्याची निगा राखली न गेल्याने ते कोरडे झालेले आहे. आणि त्याचे स्थानही पक्के कळत नाही. जागोजागी वन्य प्राण्यांच्या विष्ठा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र करून देतात.

गाडीजवळ माकडंच माकडं

आल्या वाटेने किल्ला उतरून आलो. आजूबाजूला पाहिल्यावर देवळाच्या परिसरात विहीर दिसली. देवळात सामान ठेवून विहिरीतून पाणी काढलं. थंड पाणी पिऊन हातपाय धुऊन फ्रेश झालो. वळून बघितलं तर काय, गाडीजवळ माकडंच माकडं जमा झालेली होती. २०-२५ तरी असतील. आम्हाला बघून पळून जातील असं वाटलं, पण उलट आम्हाला चिडवायला सरळ गाडीवरच चढली. जाऊदे, जातील त्यांची त्यांची, असं म्हणून फार लक्ष न देता मंदिरात गेलो.

यक्षराज कपिमुखी हनुमान

हे हनुमान मंदिर, यक्षराज कपिमुखी हनुमानाचं आहे. निवांत दर्शन घेतलं. पण त्यानंतर आमच्या लक्षात आलं, की बाहेरची गाडीवर फिरणारी माकडं आता मंदिराकडे येत आहेत. आधी दरवाजा लावून घेतला, तर बाहेरून त्यांचा दरवाजा उघडायचा आटापिटा चालू झाला. मंदिराच्या छताजवळ मोकळी आणि अरुंद जागा असलेली जाळी आहे, त्यातून आत यायचा प्रयत्न चालू झाला. नंतर तर आमच्या हुसकवण्याच्या प्रयत्नांना दाद न देता ते आत घुसणार, हे लक्षात आल्यावर आम्ही सगळ्यांनी सामान घेऊन एकदम दरवाजा उघडला. आम्हीच जोरात आरडाओरडा करत बाहेर आलो आणि माकड दचकून बाजूला झाली. जरा वेळ बाजूला झाली खरी, पण आमच्या बॅगेतल्या केळ्यांचा वास त्यांना बरोबर गेला. क्षणभरही न थांबता, आम्ही सरळ सगळी केळी काढून, एका बाजूला फेकून गाडीकडे पळालो.

हुश्य... गाडीत बसलो आणि आधी गाडी बाहेर काढली. सावकाश सावकाश वळण घेत, त्या कच्च्या रस्त्यावरून परतीची वाढ धरली. थोडं अंतर जातो तर काय, समोर नीलगाईंचा कळप! थोडं मागेच थांबलो. पण ह्या नीलगाई आपल्यातल्या नांवातल्या गाईप्रमाणेच गरीबही असाव्यात, किमान आम्हाला तरी काही त्रास झाला नाही.

पुन्हा धरणाजवळच्या वाटेवरून गावात आलो. फोनला नेटवर्क आल्यावर पहिलं काम केलं, ते गुगल मॅपवर आत्तापर्यंत मॅप नसलेल्या या किल्ल्याचं स्थान चिकटवलं. जगधामी मंदिराजवळ आमचा आम्हीच Timer लावून काढलेला फोटो सुद्धा अपलोड झाला.

वर्धा-यवतमाळ मधील किल्ले पाहून झाल्यावर ही विदर्भ भटकंती सुफळ-संपूर्ण झाली. परतताना सिंदखेड राजा मध्ये किल्ला बघितला आणि जिजाऊंना मुजरा करून या भटकंतीची सांगता केली.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

4 comments:

  1. छान भटकंती आणि वर्णनही तसेच छान!
    😊👍

    ReplyDelete
  2. सुंदर माहिती

    ReplyDelete