Sunday, October 26, 2025

वेल्लोर कोट, जलकंदेश्वर मंदिर आणि अर्कोट गड (तामिळनाडू)

दुर्ग वेल्लोर

या मोहिमेची भटकंती लेखात उतरताना क्रम जरा मागे पुढे झाला आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या. एक म्हणजे वेल्लोरचा कोट आणि जलकंदेश्वर मंदिर. साजरा–गोजरा निर्मितीमागे वेल्लोर कोटाचा मोठा वाटा आहे, किंबहुना हे म्हणता येईल की हा कोट हेच तर कारण आहे या दुर्गजोडी निर्मितीचे.

वेल्लोरचा कोट गुगल मॅपवर जेवढा सुंदर दिसतो, प्रत्यक्षात मात्र तसा दिसणे शक्य नाही. कारण संपूर्ण किल्ला दृष्टिक्षेपात येण्यासाठी तशी जागा मिळणे अवघड आहे. तब्बल १३३ एकरांत हा गड व्यापलेला आहे. वास्तविक साजरा–गोजरावरून वेल्लोरकोट दिसू शकतो, पण तरीही संपूर्ण तटबंदी, म्हणजे सगळ्या बाजूंनी बघायची तर ड्रोनच हवा, किंवा फुकटात गुगल किंवा तत्सम मॅप. साजरा-गोजरा वरूनही वातावरणामुळे आम्हाला स्पष्ट असा दिसला नव्हता.

गडाचा Top View, Google Map सौजन्याने

गुगल मॅप वरच्या ह्या चित्रामध्ये खणखणीत बुरुज असलेला हा गड, चहूबाजूंनी सुंदर खंदक, काही मोकळ्या जागांचे भाग आणि मोठं मंदिर असा परिसर दिसतो. ह्यात दिसणारं, कोटाच्या आतमध्येच असणारं मंदिर म्हणजेच जलकंदेश्वर मंदिर. साधारण १८ ते २० जबरदस्त बुरुज ह्यात दिसतात.

प्रवेशद्वाराजावळून बुरुज आणि खंदक

ह्यात दिसणारा खंदक हा अतिशय महत्त्वाचा घटक होता या गडाला सुरक्षित करण्यामधला. या खंदकांमुळे या गडाची बांधणी जलदुर्गाप्रमाणेच आहे. गडाला सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. या उंच तटावर चढणे दूरच, त्यापर्यंत पोहोचण्यासाठी खंदक पार करणं गरजेचं. परंतु त्याकाळी या खंदकात सुसरी सोडलेल्या असत! म्हणूनच जिंजी जिंकून आल्यावर हा गड घेणे महाराजांसाठी तितकी सोपी बाब नव्हती.

प्रवेशद्वाराजावळून बुरुज आणि खंदक

जिंजी जिंकल्यावर महाराज सैन्यासह जातीने वेल्लोरला दाखल झाले. गडाचा किल्लेदार "अब्दुल्लाखान" नावाचा हबशी होता. महाराजांनी तहाचा विचार मांडला, पण तो सरळ धुडकावून लावण्यात आला, कारण स्पष्ट होतं. त्यालाही माहिती होतं, की हा गड जिंकणं सोपं नाही. त्यातून वेढा घालून बसणे ही मराठ्यांची पद्धत नव्हती. आणि जरी मराठ्यांनी वेढा घातलानी असता, तरी पावसाळा सहज सरेल एवढी रसद अब्दुल्ला खानकडे गडावर उपलब्ध होती. सहाजिकच तह मान्य करण्यात काहीच रस त्याने दाखवलान नाही.

पण वेल्लोरला मराठ्यांनी वेढा घातला, दुसरा पर्यायही नव्हता. परंतु त्यात वेळ वाया जाऊ लागला. इतर ठिकाणच्या काही मोहिमा पार पाडणं सुद्धा गरजेचं असल्याने महाराजांना तिकडे जाणं भाग होतं. परंतु वेल्लोर हातचा जाऊन चालणार नव्हता. त्यासाठी तेवढंच काबिल, म्हणजे कुशल मुत्सद्दी आणि चिवट नेतृत्व गरजेचं होतं. वेल्लोरची जबाबदारी महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते, आनंदराव, आणि नरहरी रुद्र यांच्यावर सोपवली. महाराजांनी गडाचा अभ्यास केलेला होता. गडासमोर दोन टेकड्या त्यांनी हेरल्या होत्या, त्या टेकड्यांवरून वेल्लोर कोट तोफांच्या माराच्या टप्प्यात येत होता. त्यामुळे त्या टेकड्यांवर दुर्ग बांधण्याचे आदेश त्यांनी दिले. एक गड ताब्यात घेण्यासाठी केवढा विचार, तोही काही आततायीपणा न करता, शांतपणे केला. कोणत्या गडाला किती महत्व द्यायचं, त्यासाठी किती वेळ-पैसा खर्च करायचा ह्याचा विचार महाराजांनी केलेला होता ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.

तह नाही, तर वेढा, तोही आपण किती काळ त्यात द्यावा, त्यासाठी नवीन दुर्ग बांधणी, हा विचारच प्रचंड मुत्सद्दीपणा दर्शवतो.

साजरा आणि गोजरा वेल्लोर कोटामधून

नरहरी रुद्र यांनी त्या टेकड्यांवर गड बांधून घेतले आणि त्यांना मराठमोळी नावं दिली, साजरा आणि गोजरा. तोफांचे मारे सुरू झाले. त्यातच गडामध्ये साथीचा रोग पसरला. ही संधी साधली नाही तरच नवल! मुत्सद्दी असलेले रघुनाथ पंत यांनी इथे राजकारण केलं आणि पन्नास हजार होन देऊन गड ताब्यात घेतला. जवळपास एका वर्षाच्या लढाईनंतर वेल्लोर मराठ्यांच्या ताब्यात आला.

दिवस होता, शके १६०० कालयुक्त संवत्सर, श्रावण शुद्ध चतुर्दशी, म्हणजेच २२ जुलै १६७८. महाराज दक्षिण दिग्विजयानंतर महाराष्ट्रात पोहोचताच त्यांनाही ही बातमी मिळाली.

या गडाचं वर्णन सभासद बखरीत असं करतात –

येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते.
तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही.
कोटांत जीत पाणियाचा खंदक. पाणीयास अंत नाही असें.
उदकांत दहा हजार सुसरी.
कोटाचे फांजीयावरून दोन गाड्या जोडून जावें ऐशी मजबुती.
पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे. ये जातीचे कोट.

भद्राचलमच्या आश्रित राजा बोमी रेड्डी याने १२७४ च्या सुमारास हा गड बांधला असं सांगितलं जातं. विजयनगर साम्राज्याची अरविंदू राजवंशाची राजधानी म्हणूनही हा गड होता. नंतर विजापूरचा सुलतान, मराठी, कर्नाटकी नवाब आणि ब्रिटिश, अशी सत्तांतरं या गडाने पाहिलीन.

टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्याचे पूर्ण कुटुंब ह्याच गडात कैदेत होते. एवढेच नाही तर श्रीलंकेचा शेवटचा सत्ताधारी राजा श्री विक्रम राजसिंह (१७९८-१८१५) आणि त्याच्या कुटुंबाला १७ वर्षे या किल्ल्यात युद्धकैदी म्हणून ठेवण्यात आले होते.

गडातील भरपूर वास्तूमधील एक

औरंगजेबाने ह्या गडामध्ये टिपू महल व हैदर महल हे राजवाडे बांधून घेतलेन होते. सध्या या दुर्ग परिसरात जलकंदेश्वर मंदिर आणि सेंट जॉन चर्च आहेत. जेल आहे, तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे संग्रहालय ही या गड परिसरात आहे. तामिळनाडूमधलं सर्वात जुनं पोलीस प्रशिक्षण केंद्रही ह्याच गडात आहे. गंमत म्हणजे गडाच्या आत कॉलेजसाठी असलेलं Cricket Ground सुद्धा आहे.

जलकंदेश्वर मंदिर

मंदिर - आतला गोपुर

जलकंदेश्वर मंदिर हे विजयनगर स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. या कलेचं शब्दात वर्णन करणं शक्यच नाही, अशी कलाकारी इथे बघायला मिळते. तासंतास नाही, तर अक्षरशः काही दिवस इथली स्थापत्यकला अभ्यासायला येऊन राहावं, अशी ही कलाकुसर आहे.

सिंहासन - सदर?

ह्या मंदिर निर्मितीमागे एक कथा सांगितली जाते. हे मंदिर आता जिथे उभं आहे त्या ठिकाणी मुंग्यांच्या वारुळांची एक विशाल टेकडी होती. सततच्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने ही टेकडी चारही बाजूंनी पाण्याने वेढली गेली होती. काही काळाने या टेकडीच्या सभोवतालच्या पाण्यात एक शिवलिंग ठेवण्यात आलं. विजयनगरचा सरदार चिन्ना बोम्मी नायक यांना स्वप्नात भगवान शंकराने दर्शन देऊन त्या ठिकाणी एक शिवमंदिर बांधण्याची आज्ञा दिली. इ.स. १५५० साली नायकांनी वारुळांची टेकडी तोडण्यास सुरुवात केली. शिवलिंग पाण्याने वेढलेलं असल्याने या देवतेला जलकंदेश्वर, म्हणजे “पाण्यात वास्तव्य करणारे भगवान शिव”, असं म्हटलं जातं.

अचंबित करणारी कोरीव शिल्प

हे मंदिर विजयनगरचा राजा सदाशिवदेव महाराया (इ.स. १५४०–१५७३) याच्या कारकीर्दीत बांधलं गेलं. मंदिरामध्ये जलकंदेश्वररची पत्नी श्री अखिलांडेश्वरी अम्मा यांची मूर्ती देखील आहे.

मंदिराच्या चहूबाजूंनी कोरीकामांनी भरलेले खांब

हे मंदिर कोरिवकामांनी भरलेलं आहे. मंदिराचा गोपुरम १०० फूटांपेक्षा जास्त उंच आहे. एवढ्या उंच गोपुरमवर सुद्धा उत्तम कोरीवकाम केलेलं आहे. मंदिर परिसरात प्रचंड कोरीवकाम असलेले दगडी खांब आहेत, एकही खांब कोरीवकाम नसलेला मिळणार नाही. मोठी लाकडी दारे, आकर्षक मोनोलिथ्स आणि उत्तम शिल्पं आहेत. मंदिराला मंडप देखील आहे, ज्यात ड्रॅगन, घोडे आणि व्याल अश्या असंख्य कलाकृती कोरलेल्या आहेत. अत्यंत आखीव-रेखीव अश्या ह्या कलाकृती आहेत. दगड इतक्या सुबकतेने कोरलेले आहेत की ही कलाकारी प्रत्यक्षात येण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागत असेल ह्याची कल्पना करणे केवळ अशक्य आहे. एखादं लाकूड कोरावं तसं दगड कोरून काढलानी आहे.

हे मंदिरच मुळात पाण्याच्या टाकीच्या मधोमध बांधलेलं आहे असं म्हणतात. प्रत्यक्षात तसं बघायला मात्र मिळालं नाही, किंवा लक्षात येत नाही. ह्याला तमिळमध्ये अगाझी म्हणतात. ह्या पाण्याच्या टाकीचा घेर सुमारे ८००० फूट आहे. मंदिरातील कल्याण मंडपात दोन बैलांची आणि एक हत्तीची मूर्ती आहे. इतर मुर्त्या तर खूप आहेत. "श्री वालमपुरी विनायक" असं एक गणेश मंदिरही परिसरात आहे. प्रदक्षिणा मार्गात एक सोनेरी उंच खांबही आहे. खालचा भाग काचेच्या चौकोनात आहे. भाषेची अडचण असल्याने कोणाला माहिती विचारायची सोय नव्हती.

देवतांच्या अभिषेकासाठी वापरण्यात येणारं पाणी हे गंगा गौरी नावाच्या प्राचीन विहिरीतून काढलं जातं अशी माहिती मात्र मिळाली.

नृसिंह आणि बारीक कोरीवकाम असलेले खांब

आणि परत.. भरगच्च कोरीवकाम

किती आणि कुठले कुठले फोटो काढू असं झालं होतं. हातात असलेल्या वेळेचा विचार करून, तरीही जास्तीत जास्त वेळ देता येईल तितका देऊन आम्ही भक्ती आणि कलाकुसर डोळ्यांत भरून घेतली आणि वेल्लोरचा निरोप घेतला.

जाता जाता सांगायची विशेष वाटणारी गोष्ट म्हणजे मंदिराच्या बाहेर नारळाचे मोड/कोंब विकायला घेऊन बसलेले होते. नारळाचा कोंब खूपच सुंदर लागतो खायला. आपल्या इथे छोटे छोटे कोंब येतात पण इथे अक्षरशः नारळाच्या आकाराएवढा मोठा कोंब होता.

दुर्ग अर्कोट

वेल्लोरहून जिंजी हा प्रवास ठरलेला असला तरी तिथून तडक जिंजीला पोहोचायचं नव्हतं. वेल्लोरवरून गुगलच्या नकाशाप्रमाणे सरळ न जाता, वाट थोडी वाकडी करायची होती.

वेल्लोर हे "पलार" नदीकाठी आहे. याच नदीच्या काठी पूर्वेकडे फक्त ३० किलोमीटरवर राणीपेठ जिल्हा आहे. याच जिल्ह्यात, नदीकाठी अर्कोट नावाचं शहर आहे.

प्रसिद्ध फोटो

वाट वाकडी करून येथे यायचं कारण म्हणजे, इथे असलेल्या गडाला भेट देणं. इथला गड हा जमिनीवरचा गड आहे, कोणत्याही डोंगरावर किंवा टेकडीवर नाही. आमच्या नियोजनात फार वेळ तिथे योजलेला नव्हता, कारण हा गड जमिनीवरचा, त्यातून गडाचा छोटासाच भाग शिल्लक आहे, जो बघायला फार वेळ लागणार नव्हता.

प्रत्यक्षात गडाची माहिती शोधायला गेलो आणि कळलं की हा गड छोटासा नव्हता! मूळ गड जवळपास आठ किलोमीटर भागात पसरलेला होता (ASI नुसार दहा किलोमीटरपर्यंत). अगदी व्यवस्थित माहिती उपलब्ध नाही परंतु ह्याचा मूळ विस्तार मोठा होता हे निश्चित. अर्थात ही जुनी गोष्ट झाली, सध्या मात्र एवढ्या मोठ्या भागावर गड-अवशेष शिल्लक नाहीत.

थोडीशी आवांतर माहिती सांगतो, पलार नदी. तमिळमध्ये पल म्हणजे दूध, आणि आर म्हणजे नदी, म्हणजेच “दुधाची नदी”. नेमकं असं का म्हटलं गेलं याचा उगम सापडत नाही, पण ही नदी प्रचंड महत्त्वाची आणि लोकोपयोगी असावी हे नक्की.

थोडं पुराणात बघायला गेल्यास या नदीचा संबंध श्रीदेव परशुराम, देवी सीता, आणि थेट वाल्मीकि ऋषींपर्यंत पोचतो. संस्कृतमध्ये या नदीचं नाव "क्षीरमदई" असं आहे, म्हणजे परत “दुधाचीच नदी”!

तर या नदीकाठी अर्कोट हे शहर आणि हा गड आहे. पूर्वी हा गड मोठा असला तरी सध्या “अर्कोट गड” असं इंटरनेटवर शोधल्यास जो पहिला मशिदीचा फोटो दिलाय तोच फोटो समोर येतो. सध्या अतिशय कमी भागात या गडाचे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत.

या गडाला “राजा–राणीचा गड” असंही गुगलवर लिहिलेलं सापडतं, पण ते ऐतिहासिकदृष्ट्या फारसं बरोबर नाही. राणीपेठ हे जिल्ह्याचं नाव आणि या शहरात राजा देसिंगह आणि राणीबाई यांचं स्मारक आहे. कदाचित म्हणूनच कधीतरी या गडालाही “राजा–राणी गड” म्हटलं गेलं असावं. पण या गडाचं अधिकृत नाव अर्कोटचा गड किंवा अरकटचा दुर्ग असंच आहे.

ब्रिटिश काळातील लेखनात याला “नवाबांचा दुर्ग” किंवा “कर्नाटीक दुर्ग” असेही उल्लेख आढळतात, कारण इथे कर्नाटक नवाबांचं मुख्यालय होतं.

चोळांच्या काळात या भागाचं नाव “थिरूवंझूरदूर” असं होतं, म्हणून काही ठिकाणी "थिरूवंझूरदूर दुर्ग" असा उल्लेख आढळतो. पण त्या काळी गड अस्तित्वात नव्हता, म्हणून त्या नावाला फारसा अर्थ नाही.

ASI Board आणि तोफ

तर एका चिंचोळ्या रस्त्याने आम्ही या ठिकाणी गेलो. ASIकडे नावापुरताच म्हणता येईल, निळ्या रंगाचा फलक आणि थोडं बांधकाम वगळता ASIच्या अस्तित्वाच्या खुणा नाहीत. इथे एक चौथरा बांधून त्यावर तोफ ठेवलेली आहे, ही ASIकृपा! आणि त्यांच्या ताब्यात असल्याने अजून काही अनधिकृत बांधकामं होत नाहीत, हीच मोठी गोष्ट.

पुष्करणी

एक सुंदर पुष्करणी या परिसरात आहे. शेजारी बांधकाम आहे. पुष्करणीत पाणी होतं आणि आत उतरण्यासाठी पायऱ्या दिसल्या.

मशीद आणि शेंदूर (?) फासलेले अनगड देव

सुरुवातीला जो फोटो दिला आहे त्या दिसणारी मशिद ही याच ठिकाणी आहे. त्या मशिदीसमोरही अशीच एक पुष्करणीसदृश रचना आहे, जी साधारणपणे मशिदींसमोर दिसत नाही.

मशिदीशेजारी एका दगडाला शेंदूर लावून, त्यावर फुलं ठेवून पूजाही केलेली दिसली, हाही प्रकार तसा वेगळाच.

मशिदीसमोरच्या पुष्करणी मधला शिलालेख

मशिदीसमोरच्या तळ्यात एक शिलालेख दिसला जो तामिळमध्ये आहे.

त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही, पण इंटरनेटच्या मदतीने त्यावरील शब्द शोधायचा प्रयत्न केला तर त्यातले काही अस्पष्ट शब्द “राजा, तलाव, मंडप” असे सापडले. बहुधा चोळांच्या कालखंडातील मंदिरासाठीचं हे दानपत्र असावं. अर्थात ह्याचं अधिकृत वाचन झालं असेल तर तशी माहिती मला नाही.

पण मंदिरासंबंधीच्या दानपत्रासारखा शिलालेख मशिदीसमोरच्या पुष्करणीत? म्हणजे कुछ तो गडबड है दया...

दिल्ली गेट

या परिसरात जाण्याआधी अजून एका ठिकाणाला भेट दिली, ती म्हणजे दिल्ली गेट. गुगलवर हा भाग “Delhi Gate, Arcot” असं शोधावं लागतं. खरं तर हाही गडाचाच एक भाग आहे. गडाचा एक दरवाजा, परंतु त्याची स्वतंत्र ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे. कारण हा दरवाजा तसा महत्त्वाचा आहे. हाही "ASI संरक्षित" स्मारक आहे

हा गड नवाब दौदखान मुघलाने बांधलान. १७४० ला मराठ्यांनी आक्रमण केलं. नंतर १७५१ ला रॉबर्ट क्लाइव्हने हा गड जिंकला. १८०१ ला शिरस्त्याप्रमाणे तो ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला.

टिपू सुलतानच्या मोहिमेत हा गड बऱ्यापैकी उद्ध्वस्त झाला, तरीही एक कबर, एक मशिद, आणि हे दिल्ली गेट व्यवस्थित शाबूत राहिले.

१७५१ साली झालेल्या "Siege Of Arcot" मध्ये हा भाग महत्त्वाचा ठरला. रॉबर्ट क्लाइव्ह तुकडीप्रमुख होता. त्याने या युद्धात विजय मिळवला. हा विजय अतिशय महत्वाचा मानला गेला. हा दरवाजा “दिल्ली विजयाकडे जाण्याचा मार्ग” ठरेल अशी सगळ्यांची धारणा झाली, म्हणूनच या दरवाज्याला दिल्ली गेट असं नाव मिळालं.

दरवाजातील मार्ग आणि वर फलक

खोलीवर जायचा मार्ग

मुख्य प्रवेशद्वारावर एक खोली आहे, ज्यात दोन्ही बाजूंनी जाण्याचे मार्ग आहेत. दरवाज्याच्या आतल्या बाजूला असलेल्या एका दरवाजावर "This gate formed part of the fortifications of Arcot during its memorable defence by Lord Clive in 1751" लिहिलेला दगड आहे. असं म्हणतात की, ही वरची खोली रॉबर्ट क्लाइव्हचं कॉर्टर होते.

वाडासदृश बांधकामाचे अवशेष आणि मुलांचा लाठी-काठी सराव

ब्रिटीश धाटणीचा पाकळी बुरुज

दरवाजा मागे काही बघणं अवशेष आहेत, ते त्या वेळेचे वाडे असू शकतील. इथे मुलं लाठीकाठीचा सराव करत होती. ह्याच परिसरात एक मंदिरही आहे. मंदिराकडे जाताना एक पाकळी बुरुज दिसतो.

मंदिर

हे सगळं पाहून झालं तेव्हा जेमतेम साडेसात वाजले होते. हा गड दोन वेगवेगळ्या ठिकाणी शोधून बघूनही झाला होता.

पुढे अर्थातच, इडली वडा! रोजचा बेत कसा चुकणार? आणि इथून मग खरंच, वाटेत अजून कुठे न थांबता, गाठायचं होतं, जिंजी.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Sunday, October 5, 2025

दुर्ग कृष्णगिरी (तामिळनाडू)

दुर्ग कृष्णगिरी

तामिळनाडूमध्ये कृष्णगिरी नावाचे मुख्यत्वे दोन दुर्ग आहेत. एक जिंजीच्या दुर्गसमूहात आहे, तर दुसरा कृष्णगिरी नावाच्या जिल्ह्यात. रायाकोत्ताई-वेल्लोर प्रवासात कृष्णगिरी हे जिल्ह्याचे ठिकाण लागतं. मुळात रायाकोत्ताई हा दुर्गही याच जिल्ह्यात येतो. कृष्णगिरी धरण आणि कृष्णगिरी दुर्ग, दोन्हीही ह्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या जवळच आहेत.

तसं म्हटलं, तर या प्रदेशात डोंगराळ भाग खूप असल्याने लहानमोठे गड तसे अजूनही आहेत. अगदी रायाकोत्ताई वरून कृष्णगिरीला येताना सुद्धा रस्त्याजवळ मध्येच "अरुलगिरी" नावाचा गड आहे. पण या सर्व गडांना भेट देणं वेळेअभावी शक्य नसलं, तरी महत्त्वाच्या दुर्गांना भेट देण्याचं मात्र टाळून चालणार नव्हतं.

रायाकोत्ताई आणि कृष्णगिरी हे ज्या प्रदेशात येतात त्याला "बारामहाल" म्हणून ओळखलं जात होतं. ह्या प्रदेशाला जुना सालेम म्हणूनही ओळखलं जातं. सध्या तो मुख्यत्वे तीन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे - कृष्णगिरी, धर्मापुरी आणि सालेम.

या भागात बारा गड होते, म्हणून बारामहाल. अर्थात, ह्या बारा गडांची संपूर्ण यादी तशी नक्की सांगता येत नाही, परंतु यातील महत्त्वाच्या दुर्गांमध्ये रायाकोत्ताई आणि कृष्णगिरीचा समावेश होतो. त्यातही कृष्णगिरी हा सर्वात महत्त्वाचा दुर्ग.

मनसोक्त ताक

दुपारी तीनच्या आसपासची वेळ असेल. झकास ऊन होतं. वाटेत सुंदर वटवृक्षाखाली ताकाची भरलेली पिंप दिसल्यावर गाडी आपोआपच थांबली. त्या तळपत्या उन्हात ताक हे अमृतासमानच की! त्यातून त्या काकूंनी लहान भांडी, छोटे ग्लास वगैरे न घेता सरळ ताकाने भरलेले तांबेच पुढे केले. वास्तविक आम्ही तामिळनाडू राज्यात होतो, जिथली भाषा आम्हाला जराही येत नव्हती आणि तिथल्या लोकांना आम्हाला समजणारी कोणतीही भाषा. पण ती अडचण मात्र इथे आली नाही. आम्ही मागत गेलो ते देत गेले. आता मनसोक्त ताक प्यायल्यावर "जरा अंमळ पडावं" असं कोणाला वाटणार नाही? पण अजून कृष्णागिरी बघायचा होता आणि रात्र व्हायच्या आधी वेल्लोरसुद्धा गाठायचं होतं. पूर्ण मोहीम शिल्लक होती, आज पहिलाच दिवस आणि मोहिमेची सुरुवातच अश्या दिवसाने कशी करून चालेल...

दुर्ग कृष्णगिरी दर्शन

साडेतीन वाजता गडाने पहिल्यांदा दर्शन दिलंन. ड्रायव्हर सीटवर नसल्याचा फायदा म्हणजे गाडीतून प्रवास चालू असतानाही बाहेर निरखता येतं. गड दिसला, तसं गडावरील ठळक वास्तू लक्षात घेतल्या. साधारण चढायचा मार्ग, स्वरूप, उंची, असा एकंदर भाग पाहून घेतला. फोटोही काढता आला.

पायरी मार्ग - सुरुवात, वारूळ पूजा

हे सगळं केवळ दोन मिनिटांत झालं असेल, कारण कृष्णगिरी गड दिसल्यानंतर पाचव्या मिनिटाला आम्ही गडाच्या पायऱ्यांजवळ, भारतीय पुरातत्त्व खात्याच्या निळ्या फलकाजवळ होतो. चढायला सुरुवात केली आणि जवळच एका उंच वारुळाला शेला वगैरे काहीसं बांधून त्याची पूजा केलेली दिसली.

जागोजागी कोरलेले देव - शंकराची पिंडी, गणपती, मारुती

पुढे दगडावरच शंकराची पिंडी, नंदी वगैरेही कोरलेले होते. त्याच्याच बाजूला चक्क गणपतीची मूर्ती, तीही आखीव, रेखीव आणि सुंदर. खाली उंदीरही कोरलेला होता. पायऱ्या संपल्यावर दगडामधूनच वाट वर जाते.

वाटेत दगडी शिळांना मध्ये मध्ये शेंदूर लावून पूजा केलेली दिसली. काही ठिकाणी शेजारी ‘ॐ’ लिहिलेलंही दिसलं. एका ठिकाणी हनुमान कोरलेला होता, त्याचीही शेंदूर लावून पूजा केलेली होती. अजून पुढे गेल्यावर आणखी एक हनुमानाची मूर्ती दगडावर कोरलेली दिसली.

हनुमान मूर्ती

ही मूर्ती मात्र अभ्यासण्यासारखी आहे. मूर्तीशेजारी मोठा शंख कोरलेला आहे. हनुमानाची शेपटी लांब, डोक्यावर आलेली असून त्यात घंटा धरलेली आहे. तो शेपटीनेच घंटा नाद करतोय असं भासतं, कारण घंटा वाजवताना जशी तिरकी होते, तशीच ती इथे शेपटीत कोरलेली आहे.

कोरलेल्या पायऱ्या

वरती दिसणाऱ्या दगडांवर तटबंदी, बुरुजाचे अवशेष दिसत राहतात. मार्ग काढत एका चढावरून वर चढल्यावर तटबंदी शेजारच्या वाटेला लागलो. चढ तीव्र असल्याने चढण्यासाठी त्यात पायऱ्या कोरलेल्या आहेत.

दरवाजाचा मार्ग आणि दरवाजा

मूळ जुन्या पायऱ्या आता व्यवस्थित शिल्लक राहिलेल्या नाहीत, तरी अवशेषांवरून पूर्वीच्या काळी हा मार्ग किती मजबूत, आखीव-रेखीव आणि सुंदर असेल हे सहज लक्षात येतं.

या पायऱ्यांवरून एका दगडी शिळेजवळ सुरक्षित स्थान निवडून दरवाज्याची जागा आहे, तिथे पोचलो. आता ‘दरवाजा होता’ असंच म्हणायचं, कारण दरवाजा तर सोडाच, त्याची कमानही शिल्लक नाहीये. वाट पुढे एका बुरुजाला वळसा घालून जाते.

तिकडे गेल्यावर वरती मोबाईलचा किंवा कसलातरी टॉवर दिसला. शेजारी जुन्या वाड्याचे अवशेषही दिसले. खाली पाहिल्यावर कृष्णगिरी शहर दिसलं.

टाक्याकडे जाण्याचा त्रिकोणी मार्ग

इथे पोचायला तासभर लागला होता. वरती दिसलेला टॉवर आणि वाड्याचे अवशेष याकडे आधी न जाता आम्हाला दुसरीकडेच जायचं होतं. गडावर अजूनही इतर अवशेष होतेच, पण ते नंतर पहायचं ठरवलेलं होतं, कारण आधी शोध घ्यायचा होता एका पाण्याच्या टाक्याचा.

साधारण बाण काढलेले होते काही ठिकाणी, पण सहज सापडावं असं त्या टाक्याचं स्थान नव्हतंच मुळी. एका ठराविक ठिकाणापर्यंत बाण सहज नेतात, त्यापुढे मात्र ‘जाओ अब आपही ढुंडो’ असं म्हणून सोडून देतात. इथे असलेल्या दगडी शिळांवर मध्येच कुठेतरी सूचना देण्यासाठी बाण काढलेले आहेत, पण ते एखाद्या कोड्यासारखे सोडवत-सोडवत जावं लागतं.

सुदैवानं कोडं पटकन सुटलं आणि समोर दोन शिळांनी डोकं जुळवून केलेला त्रिकोण दिसला.

टाकं

त्या त्रिकोणातून आत गेलो आणि टाकं सापडलं! इथे बाकीचेही बांधकाम दिसलं. म्हणजे पिण्याच्या पाण्याबरोबर कदाचित राहण्याची सोयही इथे केलेली असावी. तसे आता त्या बांधकामाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत, पण त्या भिंतीवरून अंदाज येतोच.

टाक्यातून बाहेर प्रकाशरंग

पाणी छान होतंच, अपेक्षेप्रमाणे. दुपार असल्यामुळे आतमधून बाहेर बघितल्यावर जो प्रकाश पडत होता, तो विशेष सुंदर दिसत होता. त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही.

तिथून बाहेर पडून वरच्या बुरुजाकडे गेलो. त्यापलीकडे अतिशय सुंदर बांधकाम दिसलं. दुर्गस्थापत्यात भौगोलिक स्थितीचा आणि उपलब्ध साधनांचा वापर कसा करावा याचं उत्तम उदाहरण आमच्यासमोर होतं.

दगडी छत घेऊन बांधकाम

एक मोठी दगडी शिळा जणू छत म्हणून वापरली आहे, असं ते बांधकाम होतं. साधारणपणे शिळेखाली नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मोकळ्या बांधकाम केलेलं दिसतं, पण इथे तर आधी बांधकाम करून वर छतासारखी शिळा बसवलेली आहे, असं वाटत होतं.

अर्थात तसं प्रत्यक्षात अशक्यच, पण बघताना अगदी तसंच भासावं असं ते बांधकाम आहे. आजूबाजूचं असलेलं गवत जाळलेलं होतं, त्यामुळे बांधकाम तर स्पष्ट दिसत होतं, पण आगीत बांधकामावरचंही गवत जळून काळे डाग पडलेले दिसत होते. त्या सुंदरतेला दृष्ट लागू नये म्हणून जणू काजळाची तीट जणू!

हे बांधकाम नक्की कशाचं असावं हे सांगता येत नाही, पण सैनिकांची लपण्याची जागा किंवा निवासाचं ठिकाण अशा प्रकारचं काहीतरी असावं. किंवा व्युहही असेल! कारण मध्ये भिंत असून, चहुबाजूने प्रदक्षिणा मारता येईल अशी जागा, आणि ती सुद्धा वाकूनच, काही ठिकाणी बसून तर काही ठिकाणी सरपटावं लागेल अशी उंची. ह्या बांधकामाला तीन दरवाजे. म्हणजेच एकूण वेगळीच रचना.

बांधकामाचे अवशेष आणि वक्राकार पायऱ्या

गडाची रचना तशी विशिष्ट नाही. तसा ठराविक मार्ग सांगता येत नाही, कारण बऱ्याच पायवाटा आहेत. आपल्याला जसं जमेल, जिथून आवडेल, आणि जी सापडेल त्या वाटेने फिरायचं. जे समोर ते अवशेष पहायचे.

आम्हीही तसेच फिरलो; वाटेत पडकी बांधकामं, वाडे बघत गेलो. मध्ये जर दगडी शिळा आली, तर काही ठिकाणी त्यावर पायऱ्या कोरलेल्या दिसल्या.

बांधकाम आणि मागे सूर्यास्त

सुंदर बुरुज

बरीच पडकी बांधकामं दिसली. काही खूप जुनी असतील, तर काही इंग्रजांच्या काळातील. एक बांधकाम तर अगदी अलीकडचंच (कदाचित बांधकाम जुनंच असेल फक्त वापरासाठी डागडुजी केलेली असू शकते), त्यावर तामिळमध्ये बरंच काही लिहिलं आहे, आणि इंग्रजीत "Microwave Repeater Station" असं लिहिलं होतं. म्हणजे काय ते देव जाणे!

तटबंदी

तटबंदीच्या आत तलाव

गडाच्या कडेकडेने बरीच तटबंदी आहे. त्यात बुरुजही आहेत, तलावही आहेत. काही बुरुजांच्या कडेकडेने खाली जायला जागा आहे. तिथून खाली गेल्यावर भुयारही आहे. तटबंदीच्या आतील बाजूस तलाव आहेत.

काही बुरुजांवर ध्वज आहेत. अश्याच एका बुरुजावर ध्वज आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला एक थडगंही आहे. त्यावर चादर वगैरे व्यवस्थित घातलेली आहे. काही वर्षांत तिथे नवीन बांधकाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दर्गा

या गडावर येणारे पर्यटक फार कमी असतील. जरी हा गड ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असला, तरी पर्यटनासाठी तितकासा प्रसिद्ध नाही. इथे येणाऱ्यात मुस्लिम भाविकांची संख्या मात्र जास्त असावी, कारण गडावर दर्गा आहे. हे बांधकाम जुनं असून, मुस्लिम भाविक इथे येत असतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा पूर्ण बारामहाल भाग शहाजीराजेंच्या जहागिरीत होता. तिसऱ्या अँग्लो-मैसूर युद्धात रायाकोत्ताई इंग्रजांच्या हाती गेला तसे इतर दुर्गही त्यांच्या ताब्यात गेले.

कृष्णगिरी हा एकमेव गड ते जिंकू शकले नाहीत, असे काहीजण मानतात. त्या गडाबरोबर "बकरखान" या सेनापतीचाही उल्लेख येतो. पण पुरावे मिळेपर्यंत दंतकथाच. तथापि, तसे अधिकृत उल्लेख कुठेही नाहीत.

परंतु या युद्धानंतर संपूर्ण बारामहाल प्रदेश आणि गड इंग्रजांच्या ताब्यात गेले हे मात्र निश्चित.

संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. वेळेत खाली उतरलो. पुढचा प्रवास वेल्लोरकडे चालू झाला. वेल्लोरमध्ये दुसऱ्या दिवशी साजरा आणि गोजरा हे गड पाहिले. त्यानंतर कूच केली ती जिंजीकडे.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!